स्व - राष्ट्र..!!

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
12 Jun 2019 - 9:12 pm

बर्‍याच दिवसांपासून घोळत असलेल्या काही ओळी, पूर्ण होऊनही आता महिना उलटत आला.. आणिक काही सुचतंय का हे बघत होतो.. पण नाही सुचले. म्हणून मग आता प्रकाशित करतोय.

संदर्भः
उन्हाळ्यात आमच्या सोसायटीत पाणी कमी पडतं म्हणून टँकरनं पाणी भरणं चालू होतं. सकाळी ६ तास व संध्याकाली ६ तास असं. पण नंतर २४ तास पाणी असायला हवं... मग त्यासाठी जेवढे टँकर्स लागतील तेवढे बोलवावेत असं ठरवण्यात आलं. ५०-६० जणांच्या मिटिंगमधे मी धरून केवळ ३ जण म्हणत होतो की पाण्याचं रेशनिंग असावं. पण कुणीही ऐकलं नाही. दिवसाला कमीतकमी १० टँकर्स लागत होतेत २ महिने. त्या मिटिंगमधे मी बोललो होतो की, अरे थोडी तरी लाज वाटायला हवी आपल्याला.. बाकी आपण कुणाला काहीही मदत करत नाही.. पण कमीतकमी पाणी तर जपून वापरू शकतो ना.. तेवढं तरी केलं पाहिजे.. पण कुणाला काही पटलं नाही. त्यावेळी मन इतकं विषण्ण झालं की.. असो.

ती भावना, ती सल कुठेतरी मनात घर करून होती. त्यातून आलेल्या या ओळी..

--

रंग कुणाचे कसे कळावे, मनी कुणाच्या खोट वसे?
चेहर्‍यावरला रंग.. असू दे.. सत्याचा मज त्रास नको..

स्वच्छ असावे माझे अंगण, ऋण देशाचे मला कसे?
घाण कुठेही असू देत ती.. मजला त्याचा जाच नको..

रणात ज्यांनी रक्त सांडले, रक्ताची त्या शपथ कुणा?
सुखासीन मी.. झिंग चढू दे.. दु:खाचा आभास नको..

पोटाच्या काठावर जगती.. किती जीव ते, घुसमटलेले..
कोठार माझी.. मला[च] हवी ती.. फुका कुणाचा त्रास नको..

पाण्यासाठी वणवणणारी.. बाया आणिक लहान पोरे..
सौद्यातील "उपभोग" खरा.. मज.. करुणेचा गळफास नको..

पणतीच्या वातीतून उठते, ज्योत दिव्याची, प्रकाशणारी..
तेजाचा हव्यास मनाला..वाती-जळता वास नको..

--

राष्ट्र असावे मनात आधी, स्वार्थाचा आवाज नको..
अभिमानाची मान असावी, नुसता कोरा माज नको..

--
राघव

कवितासमाज

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

12 Jun 2019 - 9:34 pm | अभ्या..

जीवघेणे लिहिलेयस राघवा,
काय सांगू मित्रा, सोलापूरात इतकी वर्षे राहून आता पुण्यात राहतोय. इथे बाथरुममधला नळ सोडला की आपसूक डोळ्यात चार थेंब येतातच. इकडं चैन चाललीय पाण्याची पण तिकडं नाही रे पाणी इतकं मुबलक. चार दिवसानी एकदा येतं. तेही दोन तीन तास. तेवढ्यात जेवढं भरेल त्यात चार दिवस चालवायचं. चांगल्या चांगल्या वस्तीत सोसायट्यात हे हाल तर गरीबाचं विचारायलाच नको. बिचारी आई नळाच्या धसक्यानं पाणी यायच्या दिवशी रात्रभर जागी राहते. चारचारदा नळाच्या तोट्या तपासून बघते. पाण्याचा रियुज तर इतका अंगवळणी पडलाय की आता फक्त ती बाजेवरची खाली घमेलं ठेवून केलेली अंघोळच बाकी राह्यलीय. लातूर, उस्मानाबादने तर महिन्यातून एकदा पाण्याचे दिवस पाहिलेत.
दोष कुणाला द्यायचा हा विचारही मनात येईना. हिरवीगार उद्याने, कारंजी, खळखळ वाहणारे पाणी सारे सारे काही कधी असणारे कुणास ठाऊक. सारं काही भकास, ओसाड, निष्पर्ण कदाचित काही वर्षानी निर्जन आणि निर्विकार.....

उत्कट.. काय बोलणार.. नि:शब्द. :-(

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

13 Jun 2019 - 9:59 pm | हणमंतअण्णा शंकर...

आजन्म दुष्काळी आहे. त्यामुळे मी तुम्ही व्यक्त केलेल्या वेदनांशी समरस होऊ शकतो. सगळ्या गावासाठी कुणाच्या तरी 'जिवंत' बोअरवेलची चिळकांडी, वीज आली की सुरु होई. दिवसभर रांगा असत म्हणून रात्री दीड-दोन वाजता कॅन घेऊन उभं राहण्याची नामुष्की आणि पौगंडातल्या उन्हाळी स्वच्छ चांदणराती यांचं विचित्र कॉकटेल स्मरणांत अडकलं आहे. आजही काही वेगळी अवस्था नाही. ऑफिसात, घरात पाण्याची हेळसांड व्हायला लागली की हे कॉकटेल हमखास चढतं. शहरातल्या पुलांवरून जाता येता खालच्या गटारी पाहताना ह्या लाखो माणसांच्या वासना-इच्छा-भोग यांना केव्हढी मोठी किंमत देतोय असल्या विचारांनी डोकं बधीर होऊन जातं.
काहीतरी वैचारिक पळवाट काढून समोरच्या गोष्टीत मन रमवायचा निष्फळ प्रयत्न करणे याशिवाय दुसरं काही होत नाही. हताश व्हायला होतं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jun 2019 - 10:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

मनातली भावना शब्दांतून नेमकी व्यक्त झाली आहे.

सर्वांनी स्वार्थीपणा टाळावा (पण मला त्यातून वगळा), हेच चित्र बर्‍याचदा दिसते मात्र. :(

सर्वांनी स्वार्थीपणा टाळावा (पण मला त्यातून वगळा), हेच चित्र बर्‍याचदा दिसते मात्र. :(

अगदी खरंय. कधी कधी मला स्वतःलाच वाटतं की मी फार स्वार्थी झालोय.

देशविचार प्रथम ठेवून, एक दिवस सुद्धा त्या भावनेशी प्रामाणिक राहून जगता आलं, तरीही स्वतःच्या वृत्तीत खूप फरक पडेल असं वाटतंय.

किती चपखल. सुरेख लिहिले आहेस.

खिलजि's picture

13 Jun 2019 - 12:29 pm | खिलजि

बोध घ्यावा अशी

काहीतरी शिकावं अशी

गर्विष्ठ मनाला थेट वरून खाली आपटणारी

डोळ्यांच्या कडा ओलावणारी

झालेली आहे .........................

कसं सांगू तुम्हाला

मी भलेही मुंबईत राहतो

पण या ओल्या डोळ्यांनीच सारं पाहतो

कधी येतो तो मॉप घेऊन, सारेच घेऊन जायला

पाणी भरभरून देतो कधीकधी इतके

कि कुणीच नसते प्यायला

कधी दुरूनच दावतो आशेचे काळे ढग

वारा वाकुल्या करून नेतो त्यांना दूर दूर

पुन्हा तेच निराशेचे जग

कधी असतो , कधी नसतो

पण ...

शाळेत मात्र नेहेमी शिकवला जातो

भिडणारं. खोलवर रुतलेली जखम जशी.. :-(

Rajesh188's picture

13 Jun 2019 - 1:40 pm | Rajesh188

सर्व आर्थिक स्तरातील लोक
आणि शिक्षित अशिक्षित लोकांना पाण्या चे आणि निसर्गा चे महत्व वाटत नाही .
ज्यांना पाणी उपलब्ध नाही ते पाण्या चे महत्व समजतात हा सुधा चुकीचा समज आहे पाणी उपलब्ध झाले की त्याची नासाडी करायला सुधा ते मागेपुढे बघत नाहीत .तसेच शिक्षित लोकांना सुधा प्रतक्ष आयुष्यात काहीच शहाणपण नसते आणि ते सुद्धा सर्व समजून सुद्धा निसर्गाची प्रचंड हानी करतात

हेही खरंय.. मराठवाड्यात पाण्याची कायमच वानवा असते...
पण तरीही बिअर बनवणार्‍या बर्‍याच ब्र्युअरीज मराठवाड्यात आहेत ज्यांना भरपूर पाणी लागत असतं...

महिन्यातून किमान एक दिवस तरी प्रत्येकानं देशविचाराला आणि त्याअनुषंगानं क्रमप्राप्त कृतीला देण्याचा नुसता प्रयत्न केला ना तरीही भरपूर फरक पडेल असं वाटतं.

जालिम लोशन's picture

13 Jun 2019 - 5:56 pm | जालिम लोशन

+१

क्रूर अशी संघटना जागतिक स्तरावर असावी आणि जगाच्या कायद्यात न बसणारी असावी .
2 वर्ष फ्री hand ध्या सर्व नालायक सुता सारखे सरळ होतील

क्रूर अशी संघटना जागतिक स्तरावर असावी आणि जगाच्या कायद्यात न बसणारी असावी .
2 वर्ष फ्री hand ध्या सर्व नालायक सुता सारखे सरळ होतील

सर टोबी's picture

16 Jun 2019 - 12:35 pm | सर टोबी

फक्त भारतीय एवढेच विशेषण पुरे आहे. सहसा उन्हाळा सुरु झाला कि पुणेकरांच्या पाणी वापराबाबत टीका करायची हे एक ठरूनच गेले आहे. पण विद्यापीठात शिकताना फार विषण्ण करणारे अनुभव आलेत. नगर, जत, पाथर्डी अशा पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या गावांतून आलेली मुलं बेसिनचा नळ चालू ठेऊन दात घासणं, दाढी करणं, नळ चालू ठेऊन कपडे धुणं असे प्रकार करायचे. शेतात पाणी देण्यासाठी आजही पाण्याचा व्हॉल्व्ह मोकळा सोडलेला असतो आणि दूरपर्यंत पाणी चारीतून वाहत, जमिनीत मुरत पिकांपर्यंत पोहोचविले जाते. ठिबक सिंचन, गोबर गॅस या योजना तर आता सरकार दरबारी देखील अस्तित्वात आहे कि नाही अशी शंका आहे.

खरंय.. मन विषण्ण होतंच. "भारतीय" या शब्दाचा वापर टोचलाय अगदी.

अवांतरः
पाण्याच्या वापराबाबत जागृती करणारे अरूण देशपांडेच ना? "वॉटर बँक" सोलारपूरचे? एकदा जायचे आहे तिकडे कसे काम चालते ते प्रत्यक्ष बघायला आणि शिकायला.

नाखु's picture

20 Jun 2019 - 9:03 am | नाखु

परदेशांत आवर्जून नियम, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळणारे भारतात कुठेही थुंकणे,घाण करणे,नियम सर्रास मोडणे करताना पाहिले, अनुभवले आहेत.
माझ्या घरासमोरील कुटुंब खानदेश मधील दुष्काळी भागातील आहे पण इथे उन्हाळ्यात कंपाऊंड वॉल व रस्ता धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा सढळ हाताने वापर करून आपण कसं जिंकलोय हा आविर्भाव असतोय.
प्रश्न फक्त परिस्थिती चा नसून, वृत्ती आणि प्रवृत्ती याचा आहे
पैशाने विकत घेता येणारी वस्तू,सेवा विनाकारण वाया घालवता येणे यालाच श्रीमंती म्हणण्याची थोर परंपरा रुजत आहे

चाळीतून चाळून बैठ्या घरात रहिवासी नाखु पांढरपेशा

तेजस आठवले's picture

17 Jun 2019 - 9:25 pm | तेजस आठवले

अगदी मनापासून लिहिलं आहे.चांगले लिखाण.

शहरांत चाललेला पाण्याचा अपव्यय पाहून बऱ्याच जणांना मनापासून वाईट वाटते. ज्यांनी पाण्याचे दुर्भिक्ष्य अनुभवलेले आहे असे लोक, तसेच शहरांत राहणाऱ्या लोकांनाही वाईट वाटते.
बाकी आपल्या लोकांच्या दांभिकपणाबद्दल न बोललेलेच बरे.

दिवसातून फक्त ४५ मिनिटे कसेबसे पाणी येणाऱ्या भागात राहणाऱ्या आमच्या भांडी घासणाऱ्या मावशी काम करताना नळ इतका जोरात आणि सतत सोडून ठेवतात, आम्ही सांगूनही ऐकत नाहीत आणि सांगितल्याबद्दल राग येतो. वर त्यांच्याकडे न येणाऱ्या पाण्यामुळे किती त्रास होतो हे आम्हाला ऐकवतात.पाण्याचा प्रचंड अपव्यय होतो.

आमच्या इमारतीत राहणाऱ्या एका अतिशय सुशिक्षित, सुसंस्कृत आणि गर्भश्रीमंत कुटुंबातली स्त्री रोज सकाळी कालचे भरलेले पाण्याचे ड्रम, बादल्या, प्यायच्या पाण्याचे पिंप इ. ओतून टाकते आणि परत भरते. कालचे पाणी शिळे होते म्हणून. दोन-तीनदा समजावले पण पालथ्या घड्यावर पाणी(गम्मत बघा, पालथ्या घड्यावर पाणी ह्या म्हणीतले पाणीपण वायाच गेलेले आहे.).

ठाणे महानगरपालिकेला आम्ही दर महिना २०० रुपये पाणीपट्टी भरतो,आम्ही पाणी कसेही वापरू, त्यासाठी पैसे मोजले आहेत असा माज दाखवणारी लोकं.(असा माज किंवा हे वर्तन चुकीचेच आहे, पण कधी कधी ह्या लोकांचे पण पटते.वर्षोनुवर्षे पाणीपट्टी भरणारी जनता आणि कधीही एक पैसे ही पाणीकर न भरणारी, पाईप फोडून पाणी राजरोसपणे चोरणारी लोकं एकाच तराजूत पाहिली की चीड येते.वर हेच चोरलेले पाणी वापरून काही जणांनी गाड्या धुवायची अनधिकृत गॅरेजही टाकलीत.) चोरलेल्या ह्या पाण्याचे टँकरही विकले जातात.

दुष्काळी भागातून आलेल्या काही लोकांकडूनसुद्धा शहरांत आल्यानंतर पाण्याचा भरपूर वापर केला जातो. कदाचित पाण्याची विपुल उपलब्धता पाहून हे सुरवातीला होत असावे. पण नंतर पाण्याची उधळपट्टी अंगवळणी पडत जाते.आता मात्र गावावरून आल्यावर तिकडे थेंबभरही पाणी नाही हे सांगताना त्यांचा स्वर कापत नाही.

नवीन बांधकामांमध्ये भारतीय पद्धतीचे संडास न बांधता पूर्णपणे पाश्चात्य पद्धतीचे संडास बांधणे.एका वेळेच्या फ्लश मध्ये भरपूर पाणी वापरले जाते.हा दोष बिल्डरांच्या माथी.घर घेताना ह्या गोष्टीवर काहीही नियंत्रण नसते आणि घर घेणार्यांचे ह्यामध्ये काही चालतही नाही.

पूर्वीच्या विहिरी एक तर बुजवून टाकणे किंवा त्यांची काहीही देखभाल नसल्याने त्या खराब होणे हे नित्याचेच.ठाण्यात, मुंबईत कित्येक विहिरी होत्या.आता त्यांचे नामोनिशाणही राहिले नाही.गावागावातही ग्रामपंचायतीची पाण्याची लाईन आल्याने विहिरींचा उपसा कमी होऊन पाणी वापरण्याजोगे राहत नसल्याची भीती आहेच.

हागणदारीमुक्त गाव होण्याची दुसरी एक बाजू म्हणजे पूर्वी झाडीत अथवा काही विशीष्ट ठिकाणी लोकं शौचास जाताना एक लोटीभर पाणी घेऊन जात आणि त्यात कार्यभाग साधत. हेच कार्य जेव्हा शौचालयात होते तेव्हा पाणी वापरावर नियंत्रण राहत नाही.

लई भारी's picture

20 Jun 2019 - 8:37 am | लई भारी

_/\_
अगदी भिडणार लिहिलं आहे.
टँकर रात्रंदिवस येत असतात आणि त्यामुळे बिनधास्त नळ सोडणाऱ्या लोकांना बिलकुल जाणीव होत नाही. आमच्याकडे थोडं रेशनिंग केलंय.

तेजस म्हणतात त्याप्रमाणे दुष्काळी भागातून काम करायला आलेल्या भांडीवाल्या मावशी पाणी वाया कस घालवू शकतात हा प्रश्न मला पण पडला होता. समजावणं अवघड आहे, कारण त्यांना समोर पाणी आहे एवढंच दिसतंय. त्यामुळे जोपर्यंत सगळ्यांना झळ लागत नाही तोवर ही जाणीव येणार नाही; फ्लॅटधारक आणि कामवाल्या, सगळेच!

श्वेता२४'s picture

20 Jun 2019 - 11:03 am | श्वेता२४

होणारी तुमची तळमळ .थेट काळजाला भिडली. काय बोलावे? पश्चिम महाराष्ट्र सोडला तर सुन्न करणारी परिस्थिती आहे बहुतांशी महाराष्ट्रात

सस्नेह's picture

20 Jun 2019 - 3:48 pm | सस्नेह

तळमळ पोचली...भापो.
या देशाचे एकच दुखणे आहे...लोकसंख्या ! ती निम्मी करा, समस्या एक चतुर्थांश होतील !
सुजलाम सुफलाम असून काय उपयोग, रिसोर्सेस कमी पडताहेत.