user

ज्योतिष

एबर्टीन ज्योतिष आणि स्वाईन फ्लु

एका याहूग्रुपवर एका ज्योतिषनिंद्काने प्रश्न विचारला की ज्योतिषांनी स्वाईन फ्लुचे भविष्य का वर्तवले नाही. हा प्रश्न मला उद्देशून असावा कारण मी त्या ग्रुपवरील ज्योतिषाचा खंदा समर्थक आहे. वास्तविक ऑक्टोबर २००८ मध्ये लिहिलेल्या एका टिपणात मी जे ग्रहयोगांचे वर्णन केले आहे, ते जिज्ञासूनी येथे http://rajeev-upadhye.blogspot.com/2008/10/blog-post.html अवश्य वाचावे.

आधुनिक ज्योतिष (विशेषत: एबर्टीनचे तंत्र) एखाद्या घटनेतील core issues (स्थायीभाव) चे भाकीत वर्तवण्यास कसे उपयोगी पडते हे यावरून समजून घेता येईल. 'अस्थैर्य' हे हर्षल आणि शनीच्या योगात दिसून येते. 'अनपेक्षित' हा एकच शब्द हर्षलचे वर्णन करण्यास पाश्चात्य ज्योतिषी पुरेसा मानतात. शनी-हर्षलच्या प्रतियोगात आपण वेगवेगळ्या प्रकारचे 'अनपेक्षित अस्थैर्य' अनुभवत आहोत. प्रथम आर्थिक मंदी, मग २६ नोव्हेंबरचे अरिष्ट आणि आता स्वाईन फ्लु मला वाटतं ज्योतिषाची उपयुक्ततता पटण्यास हा अनुभव पुरेसा आहे.

'स्वाईन फ्लूची साथ" येईल असे शब्द माझ्या भाकीतात नाहीत असा आक्षेप काही नतद्र्ष्ट ज्योतिषाचे निंदक घेतील. त्याचे स्पष्टीकरण असे -

- माझ्या ज्योतिषाच्या अभ्यासाच्या वैयक्तिक मर्यादा
मी साथीच्या रोगांचा आणि ज्योतिषाचा संबंध अभ्यासलेला नाही. ज्योतिषाचा सर्वसमावेशक अभ्यास एका व्यक्तीस तिच्या एका आयुष्यात शक्य नाही.

- मी जे तंत्र (एबर्टीन) वापरतो त्याची मर्यादा

वर अगोदरच म्हटल्या प्रमाणे एबर्टीनचे तंत्र एखाद्या घटनेतील फक्त core issues (स्थायीभाव) चे भाकीत वर्तवण्यास उपयोगी पडते. ग्रहयोगांच्या सक्रियतेच्या कालावधीत ज्या मोठ्या घटना घडल्या त्यांचा स्थायीभाव तो माझ्या भाकितात अचूकपणे आला आहे. एबर्टीन तंत्राच्या मूळ दाव्याशी हे सुसंगत आहे असे मला वाटते.

जाता जाता स्वाईन फ्लूच्या साथी मध्ये कुणी विशेष काळजी घ्यायची त्यासंबंधी सूचना -

ज्यांच्या पत्रिकेत शनी आणि नेपच्युन angular आहेत म्हणजे लग्न आणि दशमभाव आरंभ बिंदूशी युती करत आहेत किंवा जन्मरवीशी युती, प्रतियुती, केंद्र अर्धकेंद्र इ योग करत आहेत त्यांची प्रतिकारशक्ती जन्मत: कमी असते.

याशिवाय ज्यांच्या पत्रिकेत गोचर शनी किंवा गोचर नेपच्यून जर जन्मरवीशीवरील (म्हणजे युती, प्रतियुती, केंद्र अर्धकेंद्र इ) प्रमाणे योग करत असेल तर अशी मंडळी साथीच्या रोगांनी पट्कन आजारी पडतात.

स्वाईन फ्लूच्या साथीमूळे स्वर्गात गणपतीने मात्र नक्कीच सूटकेचा नि:श्वास टाकला असेल, हे मात्र खरे...

धोंडोपंतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...

आज धोंडोपंतांचा वाढदिवस

मिसळपाव वर आपल्या ज्योतिषविद्येबरोबरच छंदबद्ध कवितांनीही सर्वांना दिपवून टाकणार्‍या धोंडोपंतांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा... Smile

येणारे वर्ष पंत तुम्हाला आनंदाचे आणि भरभराटीचे जावो ही सदीच्छा

~सागर

तुम्ही कोण आणि कसे आहात पडताळा!

काल नागपूर सकाळचा सहावा वर्धापनदिन साजरा झाला. त्या निमित्त विवेक मेहेत्रे यांनी राशीवर्ष हा डिजिटल शो सादर केला. त्यात त्यानी चिनी पद्धतीनुसार राशीवर्ष कसे गणले जाते, त्याची विस्तृत माहिती दिली. मिपावरील सदस्यांना ती द्यावी म्हणून हा लेखनप्रपंच!
१२ वर्षांच्या कालांतराने मूषक, वृषभ, व्याघ्र, मांजर, गरुड, सर्प, अश्व, मेन्ढा, मर्कट, कुक्कुट, श्वान, वराह या प्राण्यांच्या नावाने राशीवर्ष गणले जाते. त्या राशीवर्षात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव त्या प्राण्यासारखा असतो, हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले. पहा आता आपण कोण आहोत, आणि खरेच तसे आहोत का!
१] मूषक :- १९१२, २४, ३६, ४८, ६०, ७२, ८४, ९६ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- बिन्धास्त जगतात, गोतावळा जमवतात, बचत करतात, चमचमीत खाणे आवडते. कुशाग्र व तीव्र बुद्धी.
महनीय व्यक्ती :- अटलबिहारी बाजपेयी, शेक्सपीअर, कुसुमाग्रज, राज कपूर, सौरव गान्गुली, जयवंत दळवी.
२] वृषभ:- १९१३, २५, ३७, ४९, ६१, ७३, ८५, ९७ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- परिस्थितीच्या रणांगणात पाय रोवून उभे असतात. प्रबळ इच्छाशक्ती, रुक्ष असतात.
महनीय व्यक्ती :- हिटलर, पं. नेहरु, मनोहर जोशी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुल्कर, नसिरुद्दिन शाह, हृतिक रोशन, सद्दाम हुसेन, ऐश्वर्या राय, उर्मिला मातोंडकर.
३] व्याघ्र :- १९१४, २६, ३८, ५०, ६२, ७४, ८६, ९८ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- एकाग्र, प्रसिद्धी आवडते, टोकाचे निर्णय घेतात.
महनीय व्यक्ती :- बाळासाहेब ठाकरे, सत्य साईबाबा, सूर्यकान्त मान्ढरे, करिश्मा कपूर, ट्विन्कल खन्ना. {मी सुद्धा!}
४] मांजर :-१९१५, २७, ३९, ५१, ६३, ७५, ८७, ९९ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- शांत, सभ्य, संयमी, धूर्त, निवान्तपणा आवडतो, बिन्धास्त जगतात, जीवन तृप्त असते.
महनीय व्यक्ती :- श्रीदेवी, जाकीर हुसेन, डॉ. श्रीराम लागू, अझरुद्दीन.
५] गरुड :-१९१६, २८, ४०, ५२, ६४, ७६, ८८, २००० या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- काहीतरी भव्य करण्याची इच्छाशक्ती असते, त्यासाठी सतत झटतात, बरेचदा यशस्वीही होतात.
महनीय व्यक्ती :- लोकमान्य टिळक, डॉ. आंबेडकर, लालूप्रसाद यादव, ब्रूस ली, अभिषेक बच्चन, शरद पवार, दादा कोंडके.
६] सर्प :-१९१७, २९, ४१, ५३, ६५, ७७, ८९, २००१ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- शान्त, सद्गुणी, कमी पण मार्मिक बोलतात, यांचे वागणे कळत नाही, मार्गदर्शक असले तर यशस्वी होतात.
महनीय व्यक्ती :- इन्दिरा गान्धी, सुशिलकुमार शिन्दे, लता मंगेशकर, नर्गिस, शाहरुख, आमिर, सलमान खान.
७] अश्व :- १९१८, ३०, ४२, ५४, ६६, ७८, ९०, २००२ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- दिल्दार, रंगतदार, पाय एका ठिकाणी रहात नाही, धडधाकट, मिश्किल, चन्चल. यांच्या वाट्याला न गेलेले बरे!
महनीय व्यक्ती :- छत्रपति शिवाजी महाराज, अमिताभ बच्चन, रेखा, राजेश खन्ना, नेल्सन मंडेला.
८] मेंढा :- १९१९, ३१, ४३, ५५, ६७, ७९, ९१, २००३ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- भाग्य घेऊन जन्माला आलेले असतात, कमालीचे चोखंदळ, दानशूर असतात.
महनीय व्यक्ती :- पु. ल., रजनीश, नरसिंहराव, शम्मी कपूर, माधुरी दिक्षित, जुही चावला, बिल गेट्स.
९] मर्कट :- १९२०, ३२, ४४, ५६, ६८, ८०, ९२, २००४ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- जबर आत्मविश्वास, यशस्वी होतात.
महनीय व्यक्ती :- राजीव गांधी, सुभाषचन्द्र बोस, मोरारजी देसाई, पं. रविशंकर, धीरुभाई अम्बानी.
१०] कुक्कुट :- १९२१, ३३, ४५, ५७, ६९, ८१, ९३, २००५ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- कॉमेंट्स करणे आवडते, टोक गाठतात, फटकळ, सतत बोलत राहतात, कधी काय करतील याचा नेम नाही, हिशेबी.
महनीय व्यक्ती :- सत्यजित रे, विलासराव देशमुख, लादेन, स्टेफी ग्राफ, राम गणेश गडकरी, डिम्पल कापडिया.
११] श्वान :-१९२२, ३४, ४६, ५८, ७०, ८२, ९४, २००६ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- निष्ठेने प्रेम करतात, मैत्री आयुष्यभर टिकवतात, कमालीचे प्रामाणिक, मदतीसाठी कधीही धावून येतात.
महनीय व्यक्ती :- बिल क्लिन्टन, सोनिया गान्धी, मदर तेरेसा, कपिल देव, प्र. के. अत्रे, गोविन्दा, मनिषा कोईराला, दिलिप कुमार, मायकेल जॅक्सन.
१२] वराह :-१९२३, ३५, ४७, ५९, ७१, ८३, ९५, २००७ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- दुस-यांचा नको तेवढा विचार करतात, नको तेवढे भाबडे, आपल्याला जे हवे ते मिळवण्यासाठी टोकाला जातात.
महनीय व्यक्ती :- सरदार पटेल, साने गुरुजी, धर्मेन्द्र, अनिल कपूर, संजय दत्त, देव आनंद, छगन भुजबळ, शाहीर साबळे.
तर आता पहा आपण कुठे बसतो ते! {ता. क. :- नियमाला अपवाद असू शकतात. तेव्हा---------------}
सगळ्या सदस्यांना होळीच्या शुभेच्छा!

ज्योतिषावरील काही प्रश्न

घरी लग्नाची बोलणी सुरू झाली आणि पत्रिका, रास, नाडी, गुण वगैरे वगैरे गोष्टी एकापाठोपाठ एक कानावर येत गेल्या. आजूबाजूचे बरेच लोक रास, नाडी, गुण आणि इतर शब्द अगदी सहजपणे वापरतात पण रास म्हणजे काय? नाडी म्हणजे काय? असे मूलभूत प्रश्न विचारले तर मात्र समधानकारक उत्तरे मात्र कोणीही दिली नाहीत. मिपाच्या सदस्यांपैकी कोणाची मदत घेऊन प्रश्नांची उत्तरे मिळतात का हे पाहण्यासाठी हा लेखन प्रपंच. प्रश्न खालील प्रमाणे

१. एखाद्याची रास म्हणजे नक्की काय? एखाद्याच्या जन्मवेळी चंद्र (कि सुर्य?) ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तिची जन्मरास असं काहीसं ऐकलं आहे. पण नक्की माहीत नाही.
२. एखाद्याच्या राशी पासून आठव्या राशीची व्यक्ती त्या व्यक्तीची जोडीदार म्हणून योग्य नसते. हा काय प्रकार आहे? आणि हा आकडा आठच का? या अंकाचा उगम कोणता?
३. एखाद्या व्यक्तीला मंगळ असणे म्हणजे नक्की काय? लग्नाचे संदर्भातले नियम काय?
४. गुण जुळणे म्हणजे काय? मुळात गुण म्हणजे काय?
५. एका ज्योतिषाने जोडीदाराची नाडी सारखी नसावी असं म्हटलं होतं. या संदर्भातला नियम (आणी आधार) नेमका काय?
६. ज्योतिषाचा एखादा सर्वसामान्यपणे प्रमाण मानला जाणार ग्रंथ, पुस्तक आहे का?

नाडी ग्रंथांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन शंका उपस्थित करणाऱ्यांचे समाधान

सुप्रिया आणि नाडी ग्रंथांविषयी उत्सुकता असणाऱ्यांसाठी,

आपण नाड़ीभविष्य पाहिलेत आणि विषय काढलात म्हणून या बाबत लिहितो.
आपल्याला सारख्या अनेकांना संशय येतो की आपणाकडून माहिती काढून तीच आपणाला प्राचीन ताडपट्टीतून सांगत असल्याचा बहाणा करण्यात येतो. हा आक्षेप नेहमीच घेतला जातो. त्यावर उत्तरही अनेकदा दिले गेले आहे. तरीही पुन्हा देतो. या आक्षेपामधेच त्याचे उत्तर लपलेले आहे. ते असे की -
आपणाकडून विविध मार्गांनी माहिती काढून तीच माहिती नाडी शास्त्री आपणाला सांगतो. याचा अर्थ आपण सांगितलेली सर्व माहिती लक्षात ठेऊन तेच भविष्य म्हणून तो आपल्याला सांगतो.
जेंव्हा आपण म्हणतो की तीच माहिती तो परत सांगतो.
म्हणजे ती माहिती तो परत उगाळतो.

मग सत्यता काय आहे?
सत्यतेत तो ती नाडी ग्रंथांच्या ताडपट्टीतील मजकूर वाचून दाखवत असतो. जेंव्हा आपणांस तो पट्टी वाचून त्या पट्टीच्या अनुशंगाने विचारतो की तुला दोन भाऊ व एक बहीण आहेत का? आपण हो किंवा नाही म्हणतो. त्यामुळे आपणाला असे वाटते की आपल्याला प्रश्न विचारून उत्तरे मिळवली जात आहेत. वस्तुतः त्याची विचारणा अशी असते की आत्ता माझ्या हातात असलेल्या पट्टीतील वर्णनाच्या व्यक्तीला दोन भाऊ व एक बहीण आहे तसे तुमचे आहे का? असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा.
नाही म्हणाला तर ती पट्टी खाली ढकलून पुढची वाचून त्या पट्टीतील मजकुराच्या अनुशंगाने प्रश्न विचारले जातात. त्यावेळी तो कधी भावाबहिणांचा उल्लेख सोडून अन्य विचारणा करतो. असे करत करत एका पट्टीतील मजकूर तो इतका तंतोतंत येतो पण प्रथम पहाणाऱ्याला त्याचा अर्थ तो त्या विवक्षित नाडीपट्टीत पहाण्याचे सोंगकरून आपणाकडून काढलेली माहिती परत आपणांस सांगतो असे वाटत राहते.
आपणांस हे मान्य होईल की त्याने सांगितलेली माहिती मौखिक असल्याने ती सांगता क्षणी हवेत विरुन जाईल. म्हणजेच त्याची शहानिशा करता येईल असा पुरावा राहणार नाही. पण जर ती माहिती नाडी ग्रंथाच्या पट्टीतून सांगितली नव्हे वाचली जात असेल तर तो लेखी पडताळा येईल असा पुरावा म्हणून मिळवता येईल. तो पुन्हा-पुन्हा तपासायला येणे ही शक्य आहे. त्यामुळे ज्या एका नाडीवाचकाने प्रश्न विचारून त्या विवक्षित नाडी पट्टीचा शोध घेतला त्याच्या ऐवजी तीच नाडी पट्टी जर एका अशा अन्य वाचकाने वाचली की ज्याचा आधीच्या नाडीवाचकाने मिळवलेल्या माहितीशी अजिबात संपर्क नव्हता तर त्या नाडीवाचकाला त्यातून एक तर काहीच मजकूर वाचता येऊ नये कारण नाडीपट्टीत काहीच मजकूर नसतो असा काहींचा दावा असतो. किंवा मजकूर वाचता आला तरी त्याने ग्राहकाला प्रश्न विचारून काढलेली माहितीशी संपर्क नसल्याने त्याला तीच माहिती सांगता येणे कदापिही शक्य नाही. तसेच एकाच नाडी पट्टीचे वाचन दोन किंवा अनेक त्याच किंवा वेगवेगळ्या नाडी केंद्रातील नाडीवाचकांनी केले तर ते एकदम वेगवेगळे यायला हवे. पण ते तसे होत नाही. ते एकच येते!
याचा प्रत्यय असाही घेता येतो की मोठया नाडी केंद्रातून कामाच्या वाटणीमुळे नाडी पट्टीचा शोध एक नाडीवाचक घेतो तर दुसरा त्याच ताडपट्टीतील मजकूर ४० पानी वहीत लिहून काढतो. तर तिसरा वहीतील मजकूर वाचून त्याचे भाषांतर टेपकरून कॅसेटमधे रुपांतर करायला बसतो.
त्यामुळे अशा प्रकारची चाचणी आपण ठरवून न मागताच, आपूसूक होताना आपणांस प्रत्यक्ष डोळ्यानी पहायला मिळते. नाडी केंद्राच्या प्रथेप्रमाणे ग्राहकाने त्याच्या माहितीशी तंतोतंत जुळत असल्याचे मान्य केल्यावर नाडी शास्त्रीं त्या विवक्षित नाडपट्टीतील कूट तमिळ मधील मजकूर ग्राहकाला जरी तमिळ येत नसेल तरी सध्याच्या तमिळभाषेतून एका ४० पानी वहीत लिहून दिला जातो. त्याशिवाय त्याला ४० पानी वहीतील मजकूर वाचून त्याचे त्याला हव्या त्या भाषेत रुपांतर करून त्याच्या भविष्याची कॅसेट- टेप व काही केंद्रांतून सीडी त्याच्या सुपुर्त करतात हे आपण अनुभवले असेल.
आता असे पहा की जर आपल्याकडून विचारुन काढलेली माहिती जर त्याच पट्टीचे दुसऱ्या नाडीवाचका कडून वाचून घेतली आणि जर तीच माहिती त्याने त्यापट्टीतून वाचून दाखवली तर या आक्षेपातील हवा निघून जाते. त्यामुळे शेवटी ज्या पट्टीत आपण हो-हो म्हणून सांगितलेला मजकूर खरोखरचा कोरलेला असतो का? हे तपासणे अत्यंत महत्वाचे होते. अशी तपासणी सामान्यांना, विशेषतः तमिळेतरांना सहज शक्य होत नाही म्हणून आपल्या सारख्या मराठी लोकांचा संशय आधिक बळावतो.
नाडी ग्रंथ विरोधात प्रचार करणाऱ्या लोकांनी नाडी पट्यातील तमिळ मजकुराची तशी तपासणी करावी व त्यांचा पुरावा लोकांपुढे ठेवावा.
आम्ही तशी पट्टयातील मजकुराची तपासणी करणार नाही कारण तशी करण्याची गरज आम्हाला नाही, कारण आम्ही फक्त तर्कानेच नाडी भविष्य थोतांड मानतो असे म्हणणाऱ्यांशी चर्चा करून काय उपयोग.
मी असे शोध कार्य स्वतंत्ररित्या केलेले आहे. नाडीपट्ट्यांचे फोटो काढून, स्कॅनिग करून त्यांचा अभ्यास नाडी केंद्रांशी संबंध नसलेल्या व तमिळभाषातज्ञ व्यक्तींकडून वेळोवेळी करून घेऊन मग माझी खात्री झाल्यावर की त्या ताडपट्ट्यात खरोखरच भविष्यकथनाचा मजकूर असतो. मी माझे मत मांडत आलो आहे. याच ठिकाणी मी त्याचा पुरावा म्हणून दोन वेगवेगळ्या नाडी ग्रंथाच्या पट्यातील एका विवक्षित नावाचा पुरावा सादरही केला आहे. तो अध्यापही कोणा तमिळेतर किंवा तमिळतज्ञांनी खोडून काढलेला नाही.
आपण ही असा पुरावा गोळा करु शकता व आपले मत स्वतंत्रपणे मांडू शकता.
वर म्हटल्या प्रमाणे या आक्षेपातच त्याचे उत्तर लपलेले आहे. नाडी शास्त्री भविष्य सांगत नसून ताडपट्टीतील मजकूर वाचून दाखवत असतो. तो इतका तंतोतंत जुळणारा असतो की त्यामुळे आपला संशय बळावतो इतकेच.
शिवाय जर एखाद्याला फसवायचे असेल तर तो ग्राहकाच्या हातात असा कुठलाच पुरावा हाती लागू देणार नाही की त्यामुळे तो पकडला जाईल. पण नाडी ग्रंथांच्या बाबत नेमके उलटे आहे. आपणांस वहीच्या रुपाने पुरावा आपल्याला टेपसकट आवर्जू्न दिला जातो.
त्याची शहानिशा करणे आपल्या हातात आहे.

त्य़ामुळे हा मजकूर जर खोटारडेपणा न करता खरोखरच नाडी ग्रंथातून येत असेल तर त्याची उत्पत्ती मानवी बुद्धीच्या कक्षेच्या बाहेरील असली पाहिजे असे म्हणणे प्राप्त होते. पर्यायाने अतींद्रिय शक्तींतून ती माहिती झाली असली पाहिजे असे नाइलाजाने मान्य करावे लागते.
बुद्धिवाद्यांचा मग "वैचारिक पायाच कोसळतो" म्हणून त्यांना ते तत्वतः मान्य करणे शक्य होत नाही. मग त्यांना काहीना काही सबबीसांगून नाडी पट्टयांची शहानिशा करण्याचे टाळावे लागते.
अशा फक्त गणिताने वा तर्काने नाडी ग्रंथांना थोतांड सिध्द करु पहाणाऱ्यांशी चर्चा करून उपयोग नाही.

अमेरिकावासी मिपाकरांसाठी...

मराठीतील एका नव्या आणि कौतुकास्पद उपक्रमाची अमेरिकेतील मिपाकरांना माहिती व्हावी म्हणून लिहितोय.

मटा मधील बातमी वाचल्यानंतर मी पहिल्या दृक्-श्राव्य दिवाळी अंकाच्या डिव्हीडी सेट्स च्या खरेदीसाठी आवर्तन ची चौकशी केली असता, मी अमेरिकेत सध्या वास्तव्यास असलेल्या (South Eastern US) भागात त्यांचे डिस्ट्रिब्युटर्स नसल्याचे त्यांनी कळवले, व मी मदत करू इच्छित असल्यास येथील महाराष्ट्रीय लोकांसाठी काही डिव्हीडी सेट्स पुण्याहून पाठवण्याची तयारी दर्शवली.

मोहन आगाशे यांच्या संपादकत्वाखाली निर्मित झालेले दोन डिव्हीडी चे हे डिव्हीडी सेट्स प्रत्येकी १५ डॉलर्स किंमतीचे आहेत. कालच हे डिव्हीडी सेट्स माझ्याकडे पोहोचले, आणि मी त्यातील पहिली अडीच तासांची डिव्हीडी माझ्या कुटुंबियांसोबत आज एकाच बैठकीत पाहिली. यातील कार्यक्रमांची सविस्तर माहिती त्यांच्या संस्थळावर मिळेलच, पण आम्हा सर्वांना तरी ही डिव्हीडी आवडली, विशेषतः मला वाटतं की बाबा आमट्यांच्या कार्यावरील डॉक्युमेंटरी मध्येच माझे १५ डॉलर्स वसूल झाले. इतरही बहुतांश कार्यक्रम प्रेक्षणीय आहेत.

माझ्या आसपासच्या कुटुंबियांसाठीचे डिव्हीडी सेट्स सोडून काही मोजकेच सेट्स माझ्याकडे उपलब्ध असू शकतील, तेंव्हा अमेरिकेतील मिपाकरांना व त्यांच्या मराठी आवडणार्‍या इतर परिचितांना हे डिव्हीडी सेट्स हवे असल्यास व्य नि द्वारे मला कळवावे. म्हणजे त्याचा १५ डॉलर्सचा मोबदला आवर्तन पर्यंत आणि सेट्स पाठवण्याचा स्थानिक पत्रखर्च माझ्यापर्यंत Wink कसा पोचवायचा ते कळवेन. माझा आवर्तनच्या प्रवर्तकांशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही, आणि मी हे केवळ आधी लिहिल्याप्रमाणे मराठीतील कौतुकास्पद उपक्रमाला माझा हातभार लागावा या भावनेने करतो आहे, हे कृपया लक्षात घ्यावे.

मिपा ओळख २

प्रसंग दुसरा : मिपाचे सदस्य होउन पंधरा एक दिवस झालेत.

भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय. बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. काय म्हणालास? नाही काही नाही हे आपलं खुदं के साथ बातां. हे ही मिपावरुनच ढापलेलं बर का मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा दादा मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना! माहिते मला ते, बोलायला तर आहे ना. ते जाउ दे मग काय लिहणार? तोच विचार करतोय हे बघ एक्सेल शिट मध्ये लेखन प्रकार आणि प्रतिसाद यांचा आलेखचं काढलाय. मी त्याची ति करामत आणि नको तिथे नको त्या गोष्टिचा वापर आजि म्या ब्रम्ह पाहिलेच्या थाटात पाहिला. सर्वात जास्त प्रतिसाद चर्चाप्रस्तावाला आणि ते ही वादविवाद या उपप्रकारात होते. म्हणलं कार्ट बरच हुशार दिसतयं. खाली एक ठळक अक्षरात टिप होती प्रतिसांदांची संख्या वाढविण्यासाठी मिनसे मध्ये सामिल व्हा. आता पंधरा दिवसातली त्याची एव्हढी प्रगति पाहुन याला माझ्यासारख्या पामराकडुन काय पाहिजे याचचं टेन्शन आलं. याला निट ऊत्तर दिली नाहित तर हा एक तर माझा दंत विमा काढेल किंवा स्वतःचेच दात नको तिथे घुसवुन ड्राकुला बनेल बहुतेक. ( एकंदर हा व्यंकुची शिकवणिचा प्रकार होणार होता)

हा सांगु लागला तसं बघ मी कधी कविता केलीली मला तरी आठ्वत नाही त्यामुळे ते बाद. तसही मला रिक्श्यातुन उतरल्यावर मिटर बघुन किती पैसे झाले ते कळत नाही तर कवितेतला मिटर काय झा* कळणार. त्याचं निरिक्षण आणि शब्द ऐकुन हे नक्की कळल की हा रांत्रदिवस मिपावर पडिक असणारे. मि आपलं उगाचचं बोलायचं म्हणुन म्हणलो बरोबर आहे तु म्हणतोस ते. पण मग चारोळी तर कर आहे काय त्यात? मला मात्र मनात चुपके चुपके मधली जुलाब जोडुन केलेली चारोळि आठ्वली. म्हणला प्रयत्न चालु आहे. मी त्याला फटु साहेबांच नाव सांगणार होतो की मदत घे म्हणुन (ट ला ट आणि र ला र जोडण्यात डॉक्टरेट केली आहे यांनी) पण भकारान्त शब्दांची चारोळी करायचा प्रयत्न चालु आहे हे पुढ्चं वाक्य ऐकुन मनातं म्हणलं बर झालं फटुचं नाव नाही सांगितलं नाहितर उगाच फाट्यावर मार पडला असता. मी आपली मौनं सर्वाथ साधयेत हे जाणुन त्याच्या बोलण्याची वाट पाहु लागलो. स्वतः बनवलेल्या एक्सेल शीटमध्ये बघुन तोच म्हणाला लिहणाच्या द्रुष्टिने दुसरा सोपा प्रकार म्हणजे विडंबन त्यातही गझल व्रुत्त यमक नसलेली कविता किंवा त्रिवेणि उचलायची हा पण एक प्रयत्न करतोय मी. म्हणतो कसा केसुसरांच्या नंतर एकच नामचिन विडंबनकार राहिल्याने कॉम्पिटिशन कमी आहे. मग मात्र मला गप नाही रहावलं म्हणलं बर्‍याच लोकांनी आम्हाला गझलाच जास्त आवडतात विडंबन म्हणजे दुसर्‍याच्या प्रतिभेवर एक परप्रकाशी बांडगुळ असे केसुपंथाच्या गुरुजींच्या बहुतेक विडंबनावर प्रतिसाद देउन गांगुलीसारखी त्यांना निव्रुत्ती घ्यायला लावली. त्याचा विरोध आणि त्यामुळे निर्माण झालेली संधी पाहुन बर्‍याच नवोदितांनी प्रयत्नांची शर्थ केली पण डावखुरा फलंदाज निव्रुत्त झाल्याने डावखुर्‍या फलंदाजाचीच नेमणुक होइल या नियमाप्रमाणे रंगनाथन आनंद या अतिशय प्रतिभावंत बुध्दीबळ्पटुची निवड झाली. केसुपंथाची दिक्षाघेतलेले लोक पंथाला विसरले आणि रंगनाथन यांची एकछ्त्री सत्ता प्रस्थापीत झाली. बुध्दीबळाची उत्तम जाण असल्याने या मधुशालेचा हा भाग कधी येणार असे विचारुनही यांनी वेळोवेळि कॅसलींग करुन आपली विडंबनाची सेवा अबाधित ठेवली आहे. हा जाज्वल्ल्य इतिहास सांगित्ल्याने मला जर बर वाटलं तर म्हणतो कसा बर झालं सांगितलस ते विडंबन टाकण्याआधी बुध्दीबळ शिकाव म्हणतो. मी पुढे टाकलेल्या प्याद्याला त्याने एन् पास करुन मलाच मात दिली होती.

आता मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहचली होती मग मीच विचारलं अजुन काही लिहण्याचा प्रयत्न चालु आहे का? तर मुखातुन अम्रुत पाझरावे तसे स्व्रर्गीय स्वर (जे डोक्यावरुन जातात ते ) बाहेर पडले म्हणलं हे काय? प्.पू तात्यामहाराजांचे लेख वाचुन किर्तनकलेत शास्त्रीय संगिताचा वापर कसा शक्या असे आहे आणि रॉक आन सारख्या चित्रपटात एखादं शास्त्रीय संगितावर आधारित गाणं टाकल्याने मास्तरांच्या चित्रपट्परिक्षणामध्ये काय फरक पडला असता यावर लेख चालु आहे म्हणाला. ते ऐकुन फीट यायच्या अवस्थेतही मी विचारलं ते खर आहे रे पण मगाशी जो काही आवाज काढलास तो काय होता? सात स्वरांनी मिळुन तयार होणारा सप्तक आणि त्यात थोडिशी हिमेशबाबाच्या आठव्या स्वराचं हे मिक्श्चर आहे म्हणाला तुला नाही कळायचं ते. लेख वास्तव्वादी होण्यासाठी जी काही ग्रुहीतके, अनुभुती लागते ती फील करायचा प्रयत्न करतोय. त्याचं ते विदवत्तापुर्ण विचार ऐकुन मनातच म्हणलं एकतर याची नाडी शोधायला दिली पाहिजे हा बहुतेक बर्‍याच जणांची नाडी सोडणारे. (कोणाशी पंगा घ्यायचा झाल्यास त्याचावर सोडायला उपयोगी पडेल.) पुढे तोच म्हणाला खमंग पाककृतींसाठी कोणाकडुन मदत घेउ आणि माझ्यापुढे उस्ताद ग्यानसुद्दीनचे जनक सम्राट सर्कीट ओमप्रकाश आणि हा धर्मेंद्रच्या रुपात साक्षात उभे राहिले. म्हणलं चांगला चान्स आहे एकतर हा तरी स्रर्कीट होइल नाहितर स्रर्कीट तरी अनबॅलन्स होइल. पण म्हणलं तुला कशाला हवे रे पाककॄती? इकडेतिकडे बघितल आणि म्हणाला कांदापोहे खातोय सद्ध्या अरे नको नको ते प्रश्न विचारतात रे. हे करायला येत का ते करायला येत का लय टेन्शन आलयं. म्हणलं इथे मिपावर एक संजिव कपुरकर काका आहेत त्यांना विचार. ( मनातच म्हण्लं हा बहुतेक चायनीज पुरणाची सोडे घालुन केलेली मिसळीची कृती लिहणार बघं )

मग मीच म्हणलं तुझे प्रयत्न चालु ठेव अजुन काही विचारचय का? अरे अजुन बरच प्रकार लाइनीत आहेत. एक क्रमशः लिहायचं म्हणतोय . आणि माझ्या डोळ्यापुढे सहाशे पेक्शा जास्त चालणार्‍या चार दिवसकडून प्रेरणा घेउन एलियनवर एप्रिलमध्ये शूट केलेला बांगड्या नावाचा चित्रपट उभा राहिला. आता मला हा आणखि कितीवेळा दिवास्वप्नात प्रवास घडवणारे कोण जाणे. पुढे तोच म्हणाला एक भैयाकथा क्रमशः लिहाय्ची म्हणतो. माझ्या भैयाकथेची सुरवात कंदिल घेउन जाणार्‍या गबाळ्यापासुन करणारे. मग माझ्या डोळ्यासुमार ती शहारे आणणारी कथा आणि तो कंदिलधारी शार्पशूटर जसेच्या तसे उभे राहिले. आत्ता फार वेळ मी जर याच्याबरोबर राहिलो तर हा मलादेखिल छताला चिकटवायला कमी करणार नव्हता. पुढे तोच म्हणाला हा भैया जरी चेंगट असला तरी शेअर बाजारात मुक्तपणे भय पसरवत असतो आणि पुढे ही कथा गुढ होते तो राजेंच्या साथिने बाजारात मंदी आणन्याची धमकी म्हणे अर्थमंत्र्यांना देतो. अबे भो...डिच्या आता बंद करशील का तुझ्या फाट्यावर कट्टा मारु माझी सहनशक्ती आता संपली होती. आता खर तर मला इनोची गरज होती. जाताजाता त्याने मला एक फोटो दाखवला त्यात यात्रीप्रमाणे त्याचाही डोक्यावर हात असलेला साक्षीदेवाने फोटोशॉपमध्ये बनवलेला संसदभवानासमोरचा लकीटाइप फोटु होता. त्याखाली शुद्द संस्कृतात लिहलेलं सातारवी भाउंची कुठलतरी सुभाषित होतं. आंणित्यामागे शुद्दलेखनाचा फायदा या सदरात लिहलेले वेल्यांट्या बद्लुन तयार केलेले प्रा. साहेबांच्या आयडि सारखेच दिसणारे मगधी भषेतील तीन आय.डी. होते.

शेवटि त्याचं हे एव्हढ मिपा ज्ञान आणि करामती बघुन आपल्याला मिपा बद्दल किति ज्ञान आहे, अमुक अमुक लेखात किति ओळी होत्या. किंवा या गझलेतील व्रुत्तात कोणती चुक आहे असे बरेच चर्चाप्रस्ताव , किंवा एखादी लघुकथा स्पर्धा आयोजित करण्याच मनात ठरवुन मी झोपी गेलो.

(समाप्त)

नाडी ग्रंथ पुरावा आणि ताडपत्रलेखनावरील अभ्यास कार्य

नाडी भविष्य आणि ताडपत्रलेखनावरील अभ्यास कार्य
'नाडी भविष्यावर आता ओक साहेब काय म्हणतात ते ऐकण्याची उत्सुकता आहे.'
पुन्हा पुन्हा: नुस्तं "जाऊन पहा" असं म्हणण्यापेक्षा काही पटेलसं लिहिलंत तर "जाऊन पहा आणि मग बोला" असं म्हणण्याची वेळच येणार नाही. लोकं जातील, बघतील आणि स्वतःच प्रतिसाद देतील की "हो, या गोष्टींवर माझा अमुक-तमुक कारणांमुळे विश्वास बसला." पण मुळात ओळख करुन देणारं लिखाणच एवढं त्रोटक किंवा अविश्वसनीय वाटलं तर त्या लिखाणाचं, कदाचित विषयाचंही वर्णन तसंच होणार, आणि लोकांचं मतही!
वरील प्राथमिक प्रतिक्रियांच्यानंतर वरील चर्चेतील माझ्या या लिखाणानंतर वाट पाहूनही काहीही प्रतिक्रिया आल्या नाहीत यामुळे जरा चुकल्यासारखे वाटले. कदाचित या विषयातील सहभागी लेखनाचा बाज साशंकतेकडे वळणारा होता त्यामुळे कदाचित ह्या लेखनाकडे संपादक मंडळाचा पहाण्याचा दृष्टीकोन तसा असेल. असो.
ते काहीही असो, मी नाडी 'भविष्य' कथनाकडे 'पुढील कालातील गोष्टींचा कानोसा' असे पाहतो. त्यामुळे 'भविष्य कथन' या अंगाने या ताडपट्टयांकडे प्रथम पाहिल्यानंतर काही काळाने नाडी कथनाच्या ताडपट्ट्यात लिहिले आहे असे सांगितले गेलेले व टेप करुन दिलेले, ४० पानी वहीत श्लोकबद्ध केलेले केलेले लेखन खरोखरचे असते का? असेल तर काय असते? जे असते तेच वहीत लिहिलेले असते का? या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे.
त्या अभ्यासकार्यात असे दिसून आले की परदेशातून येऊन नाडी पट्ट्यांचे नमुने तेथील प्रयोगशाळेत नेऊन कार्बन १४ कसोटी घेऊन त्या विवक्षित नाडी पट्टीचे आयुष्य कमित कमी ३५० ते ४०० वर्षे असावे, तसेच त्यातील मजकुरची शहानिशा त्या देशातील तमिळ भाषातज्ञांकडून करवून घेऊन ते लिखाण ज्या व्यक्तिला उद्देशून केले गेलेले आहे ते त्याचेच असावे असा निर्वाळा, निष्कर्ष काढला जातो. पण त्या संदर्भात भारतीय नुसतेच तात्विक व तार्कीक चर्चा करून ते सर्व 'थोतांड' आहे. असे परस्पर आधीच ठरवून नाडीच्या ताडपत्राना शोधकार्याच्या कक्षेतून बाहेर का काढतो आहोत? भविष्य पहावे किंवा नाही या गोष्टीला तुर्तास कमी महत्व देऊन आपण या पट्ट्यातील अक्षर धनाकडे पाहू शकतो का? शेवटी ते अर्थहीन आहे असा निष्कर्ष निघेपर्यंत त्याचा पाठपुरावा करायला काहींनी कंबर कसायला नको का?
आपणापैकी किती तरी परदेशात विविध प्रयोगशाळांशी वा विद्यापीठांच्या पुस्तकालयाशी, भाषातज्ञांशी कारणपरत्वे जोडलेले असाल किंवा आपल्या मित्रपरिवारात, माहितीत अनेक असतील. त्यातील अनेक तमिळभाषी असतील त्यांच्याशी संपर्क करुन त्यांचे सहकार्य मिळवता येणे शक्य आहे काय? भारतातील लोक आणि विशेषतः मला भेटलेले तमिळ इतके दुरुत्साही आहेत की ज्यांना ते काम ऑफिशियली करायला हवे ते देखील हे काम करायला तयार नाहीत. नाडी केंद्रवाल्यांशी चर्चाकरून ते शोधकामाला तयार करायला ही सामान्यतः वेळ लागतो कारण त्यांची पारंपारिक मान्यता, एकूण भविष्यप्रकाराला प्रसिद्धी माध्यमातून दिली जाणारी प्रतिकूल प्रसिद्धी त्यामुळे निर्माण होणारी अनामिक भिती, अशामुळे त्यांचे सहकार्य मिळवताना कष्ट पडतात. तरीही आता ही परिस्थिती बदलते आहे. काही नाडीकेंद्रात शोधकार्य करायला ते ही तयार होत आहेत. अशा परिस्थितीत या अभ्यासकार्यात कोणी मदत करु इच्छित असेल तर मला ती हवी आहे.
खालील प्रतिक्रियेला प्रतिसाद न आल्यामुळे पुन्हा चिकटवत आहे. तरी रोष नसावा.

राहिला प्रश्न पुराव्याचा –
माझ्या पुस्तकात गेल्या कित्येक वर्षांपासून खालील रंगीत फोटो दिलेला आहे. त्यात प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्तीचे नाव कसे कोरून लिहिलेले असते याचा पुरावा पहायला मिळतो. त्या दोन वेगवेगळ्या महर्षींच्या पट्या असून, काही वर्षांच्या अंतराने, वेगळ्या व्यक्तीच्या संदर्भात शोधल्या गेल्या होत्या.
गैरतमिळांना ती अक्षरे वाचायला सोपा जावीत यासाठी सोबतची चौकट येथे पहावी. त्यातून लिपीचा आणखी खुलासा होईल.या शिवाय त्या फोटोतील उरलेला मजकूर काय आहे याचा वेगळा खुलासा इंग्रजी पुस्तकातून व नाडीवरील वेब साईटवरून होईल.

मग मित्र हो ऐका,
आत्ता पर्यंत आपण नाडी ग्रंथ भविष्याच्या विरोधातील एका बाजूचे विचार वाचलेत वा ऐकलेत असतील. मात्र त्याविरोधी विचारांच्या संदर्भात समर्पक उत्त्तरे मी आणि प्राचार्य गळतगे व अन्य लोकांनी कित्येक वर्षापूर्वी लेखातून व पुस्तकातून सडेतोडपणे दिलेली आहेत. त्यामुळे त्याच त्याच पोकळ आक्षेपांना उत्तरे देण्यात आम्हाला काही स्वारस्य उरलेले नाही. म्हणून मी त्याविषयी लिहायचे टाळतो. त्याचा अर्थ नाडीवर पुरावे देऊन लिहिण्यासारखे काही राहिले नाही वा नसेल म्हणून ओकबुवांची (एकांनी मला दिलेले नाव) दातखीळ बसली असावी व आता तरी त्यांच्या भूलथापांना खंड पडेल असे वाटले असावे. त्यांचा असा ग्रह होणे अत्यंत स्वाभाविक आहे. त्यांना तसे वाटले तर मला काही वाटणार नाही. कारण आत्ता पर्यंतच्या लिखाणामुळे या मंडळीची मानसिकता नाडी ग्रंथ भविष्याकडे कुत्सितपणे पहाण्याची व मानण्याची असल्याने त्यांना कितीही तर्कपूर्ण पुराव्यांनिशी दाखवून दिले तरी मीच काय कोणीही त्यांना पटवून - समजाऊन सांगून मान्य करायला लावणे शक्य नाही. हे वेगळे सांगायला नाडी पट्टया पहायची गरज नाही. अशा बुद्धिवादी लोकांनी मी, विंग कमांडर ओक, सांगतो म्हणून नाडी भविष्य मानावे असा माझाही मुळीच आग्रह नाही. पण काही गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो त्यापैकी ही एक बाब आहे.
काहींचा असा दावा आहे की मी अनुभव घेणार नाही. आम्ही नाडी भविष्याचा अनुभव घेतला आहे असे जे दावा येथे करतात त्यांनीही प्रत्यक्ष त्यांच्या संदर्भात नाडीपट्ट्या पाहिलेल्या नाहीत. तुम्ही सादर केलेले पुरावे ही पहाणार नाही. तुमच्या पुराव्याचे खंडनही करणार नाही. तरीही नाडी भविष्याला मान्यताही देणार नाही. कारण आमची विचारधारा अशा प्रकारांना मान्यता देत नाही. मग ते डॉ.जयंत नारळीकर असोत किंवा नागपूरचे प्रकांड पंडीत डॉ. नी. र. वऱ्हाडपांडे असोत किंवा स्वर्गीय महान डॉ. अब्राहम कोऊर असोत वा पालघाटच्या भागातील श्री. बी.प्रेमानंद असोत. या सर्व लोकांच्या नाडी भविष्यावरील विचारांना अत्यंत तर्कपूर्ण आणि पुराव्यानिशी उत्तरे गेलेली आहेत. तरीही ‘अजून माझे वैयक्तिकरित्या जोवर समाधान होत नाही तोवर मी कसे मानू’ असा प्रत्येकाचा प्रश्न असल्याने मी कोणा कोणाचे समाधान करत फिरणार? शिवाय, ‘ओक, हे पुरावे ठीक आहेत हो. पण आणखी पुरावा आणा. मग मानायचे की नाही ते पाहू. असे प्रत्येक वेळी हुलकावणी देणारे व आपली वैचारिक हार मान्य न करणाऱ्यांची भूक भागवणे कोणाला तरी शक्य आहे काय? असो.
असे जरी असले तरीही मी असा प्रस्ताव मांडू इच्छितो की जर मिसळपावचे आणि उपक्रमींचे संपादकमंडळ माझ्या विचारांची गळचेपी करणार नसतील तर मी त्यांना अशी विनंती करू इच्छितो की माझ्या आत्ता पर्यंतच्या लिखाणाला त्यांच्या त्यांनी माध्यामातून समाविष्ट करायला मान्यता द्यावी. तसे असेल तर मी त्यांना ‘बोध अंधश्रद्धेचा’ या पुस्तकाची एक प्रत सप्रेम भेट पाठवू इच्छितो. त्यावरून त्यांनी ते पुस्तक आपल्या माध्यामातून जगाच्या पाठीवरील कोणाही मराठी वाचकाला वाचायला मिळण्याची आयती सोय होईल. सध्या माझ्य़ाजवळ अशी यंत्रणा वा तांत्रिक ज्ञान उपलब्ध नाही की मी आपल्या बळावर हे काम करू शकेन. अर्थात ही मी घर बसल्या नाडी भविष्याची फुकटात जाहिरातबाजी करायला मागत आहे, असे वाटत असेत तर माझा काही आग्रह नाही.
माझा असा पुर्व अनुभव आहे की नाडी भविष्याविरुद्ध जरा खुट्ट झाले की पुरोगामी विचारांचा मुखवटा चढवलेल्या प्रसिद्धी माध्यमातून मोठ्या अक्षरात छापून येते पण त्याचा प्रत्यावाद केलेल्या लिखाणाची साधी दखलही घेतली जात नाही. सध्या त्य़ांची ती गरज असल्याने मी त्यांची कुचंबणा समजू शकतो. असो.

नाडी ग्रंथ भविष्य आणि इंडॉलॉजिकल स्टडी

नाडी ग्रंथ भविष्य आणि इंडॉलॉजिकल स्टडी
नाडी भविष्य ताडपत्रावर कोरून लिहिलेले असते. त्याची भाषा तमिळ असते. ताडपत्रवर कोरून लिहिण्याची प्रथा आता अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ताडपत्रे फारच जीर्ण झाल्याने त्यांची डिजिटल पद्धतीने राखण करून त्यातील मजकुराचा अर्थ तज्ञांकडून माहित करून घेण्याचे कार्य अनेक इंडॉलॉजीकल संस्थांतून केले जाते. त्यासाठी भारत सरकार तर्फे नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट्स. डिपार्टमेंट ऑफ कल्चर - मिनिस्ट्री ऑफ टुरिझम अँड कल्चरतर्फे बरेच धन उपलब्ध करु दिले जाते. पहा www.namami.nic.in त्याशिवाय युनेस्कोच्यातर्फे ही अपार धन विविध शोधसंस्थांना उपलब्ध करुन दिले जातो.
तमिळ भाषेतील अशा ताडपत्रावरील विचारधनाला संरक्षण व संग्रहित करण्याचे काम चेन्नई येथील इन्स्टीट्यूट ऑफ एशियन स्टडीज या संस्थेला आणि इन्स्टीट्यूट ऑफ पांडेचरी यांना सोपवल गेले आहे. त्या दोन्ही शोध संस्थांना मी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या कार्याची ओळख करुन घेतली. त्यांचे काम अत्यंत प्रभावीपणे चालू होते. त्यापैकी चेन्नईच्या संस्थेचे संचालक डॉ. जी. जॉन सॅम्युएल आणि त्यांच्या सोबत तमिळ ताडपत्रावर काम करून पीएच डी मिळवणाऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या डॉ श्रीमती लक्ष्मी यांनी पुण्यात १४ ऑक्टोबर २००७ला उद्यानप्रसाद कार्यालयात झालेल्या नाडी भविष्यावरील पहिल्या अधिवेशनाला अनुक्रमे अध्यक्ष आणि मुख्य अतिथि म्हणून स्थान भूषवले.
डॉ. जी जॉन सॅम्युएल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असा आवर्जून उल्लेख केला की नाडी भविष्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची उत्सुकता आणि जागरूकता पाहून मला याचे आश्चर्य वाटते की माझ्यासाऱ्ख्या तमिळ भाषातज्ञ व जाणकार म्हणवून घेणाऱ्याला अजूनही या विषयावरील ताडपट्ट्यावर शोधकार्य करायला कसे सुचले नाही? मी नुकताच जपानहून आलेल्या एक शिष्ठमंडळाला घेऊन विविध नाडी भविष्य केंद्रातून भविष्य कसे असते याचे मार्गदर्शन करुन आलो. तथापि या ताडपट्टया काही लोकांच्या व्यक्तिगत संपत्तीचा भाग असल्यामुळे या विषयाला त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने आमच्याकडे अशी एकही ताडपट्टी नाही की ज्यावरून आम्ही यावर काही शोधकार्य करू शकू. विंग कमांडर शशिकांत ओकांनी अशी ताडपत्रे उपलब्ध करून दिली तर माझी संस्था यावर आणखी काम करेल, याचे आश्वासन मी आपणासमक्ष देतो. या शिवाय सांगायला आनंद वाटतो की एका अर्थाने या कार्याची सुरवात विंग कमांडर शशिकांत ओकांनी त्याच्या आधीच्या भेटीत आम्हाला दिलेल्या काही नाडी पट्टीतील भविष्य कथनाच्या वह्यांच्या झेरॉक्सनी झालेली आहे. त्यांनी विनंती केल्यावरून विशेषतः डॉ. लक्ष्मींच्या उत्साही सहकार्यामुळे नाडी भविष्यातील शंभर शब्दांची एक सॅम्पल डिक्शनरी - नमुना शब्दकोश – मी त्यांना अर्पण करतो. इच्छुकांना या अधिवेशनाचा संपूर्ण अहवाल व फोटो अल्बम www.naadiguruonweb.org यावर न्यूज इव्हेंट्स मधे पहाता येतील.
यावेळी अनेकांच्या विनंतीवरून डॉ.लक्ष्मींना मी माझ्या मराठी आणि हिंदी पुस्तकातील दोन नाडीपट्ट्यांच्या रंगीत फोटोमधील मजकूर वाचून सांगावा अशी विनंती केली त्यावेळी त्यांनी त्या दोन्ही फोटोमधे च किंवा श, ची किंवा शी, का, इन, त ही अक्षरे कुठे व कशी आहेत हे काही उपस्थितांसमोर दाखवले व सर्वांचे समाधान केले.
नाडी भविष्याची मस्करी वा तुच्छतापुर्ण हेटाळणी करून या विषयाला अनुल्लेखाने टाळणे ही शक्य आहे. किंवा यावर आणखी बरेच अभ्यासकार्य करता येणे शक्य आहे. ते कसे करावे या संबंधी सकारात्मक विचार वा कृती कोणी या माध्यमातून करु इच्छित असेल तर त्यांचे सहकार्य घ्यायला मला कधीच संकोच वाटणार नाही. विरोधांच्या समाधानासाठी भले एक वेळ आपण असे मानू की या ताडपट्टयांमधून भविष्य वगैरे काहीही लिहिलेले नसते. त्यावर जो काही मजकूर लिहिलेला असतो त्याचा भविष्यकथनाशी संबंध नसतो. पण ज्या अर्थी त्या पट्ट्या तमिळ लोकांना वाचायला येतात त्या अर्थी त्यातील भाषा तमिळसदृष्य असावी. त्या त्यांच्या ताडपत्रावरील कष्टपुर्वक कोरीव कामाची निदान नोंद घ्याल. बऱ्याचदा आपण निरर्थक आलेली पत्रे वाचतो व फाडून फेकून देतो. का तर भले मला त्यातील मजकूर महत्वाचा वाटला नसेल तरीही ज्याने तो लिहून तयार करण्याचे कष्ट घेतले त्याच्या कष्टांची दाद म्हणून आपण नजर फिरवतो. इथे तर कित्येकांची आयुष्ये घडली असे अनुभव लोक सांगतात.
आपणापैकी कित्येक परदेशात उच्चपदे विभूषित करता. आपणासारख्यांच्या तेथील विविध विश्वविद्यालयात भारतीय भाषांवरकाम करणाऱ्या तज्ञांच्या ओळखी असतील. परदेशातून मुद्दाम येऊन नाडी ताडपट्टयांचे नमुने घेऊन त्यांचे कार्बन १४ कसोटीचे काम केले जाते. मग आपण फक्त या साहित्याला माझ्या विचारधारेशी मिळत नाहीत म्हणून सावत्रपणाची वागणूक देणे योग्य आहे काय? याचा विचार व्हावा. नाडी भविष्य हे थोतांड आहे म्हणून प्राणपणाने लढू इच्छणाऱ्यांनीही नाडी ग्रंथ भविष्य हे थोतांड नक्की नाही असे म्हणणाऱ्यांशी वैचारिक मतभेद बाजूला सारून एकत्र येऊन हे काय आहे? याचा सर्वांसाठी / मानवतेसाठी काही उपयोग होऊ शकतो का? याचा विचार करायला हरकत नसावी.
तुम्ही आलात तर तुमच्या सोबत नाही आलात तर तुमच्या विना कार्य चालू ठेवायला हरकत नसावी. ठीक आहे मदत करू नका. निदान आघात करून काम करणाऱ्यांना नामोहरम करू नका. ते तरी तुमच्या हातात आहे?
नाडी पट्टीतील शशिकांत ही अक्षरे कुठे व कशी आहेत याचे प्रात्याक्षिक
http://lh6.ggpht.com/shashioak/SNfh6GJ2WaI/AAAAAAAAAPc/tetrlyNtPNI/s160/...

नाडी भविष्य - एक चिकित्सा

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ...प्रश्नोत्तरातून सुसंवाद या माझ्या पुस्तकातील काही भाग अवलोकनासाठी ठेवत आहे. चर्चा जरुर व्हावी. वस्तुत: हा विषय किती प्राधान्य क्रमावर असावा ? यात आपण आपला वेळ पैसा श्रम किती खर्च करावा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.नाडी केंद्र जेव्हा पुण्यात फोफावली तेव्हा आम्ही नाडी केंद्राचा अनुभव स्वतः घेतला आहे.

नाडी-ज्योतिष आणि फलज्योतिष

नाडी ज्योतिष हे नेमके काय शास्त्र आहे याचा ओझरता उल्लेख सुद्धा जुन्या ज्योतिषग्रंथात आढळत नाही. आम्ही नाडी ज्योतिषाकडे या बाबत विचारणा केली असता त्याला काहीही सांगता आले नाही. प्रत्यक्षात असे दिसते की ताडपट्टीवर कोरुन ठेवलेल्या भाकितांचा संग्रह म्हणजेच नाडी ज्योतिष!
तुमची जन्म-तारीख, वेळ व ठिकाण इतक्या गोष्टी घेऊन पारंपारिक ज्योतिषी कुंडली बनवतो आणि तिच्यावरून फलज्योतिषशास्त्राच्या आधारे तुमचे भविष्य सांगतो. नाडी-ज्योतिषी सुद्धा अगदी हेच करीत असतो, पण आव मात्र असा आणतो की तुमचे भविष्य पाच हजार वर्षापूर्वी कुणा एका त्रिकालज्ञानी महर्षींनी नाडी-पट्टीवर कोरून ठेवलेले आहे आणि तो ते फक्त वाचून दाखवत आहे. तो प्रथम तुमची नाडी-पट्टी शोधण्याचे नाटक करतो आणि नंतर पट्टीवरील भाकीत वाचण्याचे नाटक करतो. ही या नाडी-ज्योतिषाची खासीयत व वेगळेपण आहे. दुसरा फरक असा आहे की जन्मकुंडलीवरून तुमचे नाव, तुमच्या आईबापांची नावे, तुमच्या मुलांची संख्या, त्यांची नावे, असली माहिती पारंपारिक ज्योतिष्याला सांगता येत नाही पण नाडी-ज्योतिषी मात्र असा दावा करतो की अशा प्रकारची माहिती नाडी-पट्टीत पूर्वीच लिहून ठेवलेली असते, इतकेच नव्हे तर तुमच्या जन्मकुंडलीचा तपशील सुद्धा तुमच्या पट्टीत लिहिलेला असतो असेही तो सांगतो. नाडीज्योतिषाचे हे दावे कसे खोटे आहेत ते आम्ही पुढील विवेचनात दाखवणार आहोत.
कूट लिपीचा अडथळा.
नाडी-ज्योतिषाच्या बाबतीत वस्तुस्थिती अशी आहे की, तामीळ भाषेच्या प्राचीन गुप्त किंवा कूट लिपीत पट्ट्या लिहिलेल्या असतात असे नाडीवाले लोक म्हणतात. मराठी माणसाच्या दृष्टीने हे म्हणजे आवाळूवर गळू व्हावे तसे आहे. तो मजकूर खुद्द तामिळी लोकांना सुद्धा जिथे वाचता येत नाही तिथे मराठी लोकांना तो काय कळणार! त्यामुळे नाडीवाले जे काय सांगतात ते प्रमाण समजून चालावे लागते. नाडी-पट्टीवरील मजकूर नाडी-ज्योतिषी सांगतो तसा खरोखरी आहे की नाही याची डायरेक्ट शहानिशा करणे या कूटलिपीच्या अडथळ्यामुळे अशक्य आहे. नाडी-पट्टीत तुमच्या आईचे नाव लिहिलेले आहे, किंवा तुमची जन्मरास आणि लग्न-रास पट्टीत लिहिलेली आहे असे नाडीज्योतिष्याने म्हटले तरी त्याच्या म्हणण्याची खात्री कशी करून घ्यायची ? जर काही मार्गाने तुम्हाला तशी खात्री करून घेता आली तर मग तुम्ही नाडी-भविष्यावर खुशाल विश्वास ठेवा असे आम्ही म्हणतो.
पट्टी शोधण्याचे नाटक.
तुमची पट्टी शोधत असल्याचे नाटक करतांना नाडीज्योतिषी तुम्हाला अनेक सूचक प्रश्न विचारत जातो व भराभर पट्ट्या उलटत जातो. उदाहरणार्थ, तुम्हाला दोन मुले आहेत ना ? पहिली मुलगी आहे, दुसरा मुलगा आहे ना ? तुम्हाला आश्चर्य वाटते की हे त्याने कसे बरोबर ओळखले असेल ? पण हे लक्षात घ्या की हे प्रश्न जेव्हा तो विचारत असतो तेव्हा तुमची पट्टी अजून त्याला सापडायचीच असते. तो हे जे सूचक प्रश्न विचारत असतो ते केवळ त्याच्या व्यवहार-चातुर्यामुळे विचारत असतो,--तुमची पट्टी वाचून विचारत नसतो ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या पट्टीत हे तपशील खरोखरीच आहेत की नाहीत ते तुम्हाला कधीच समजणार नाही.
नाडीकेंद्रात तुमच्या अंगठयाचा ठसा घेतल्यावर तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि मुख्य म्हणजे तुमची जन्मतारीख-वेळ-ठिकाण इतक्या गोष्टी नाडीज्योतिषी तुम्हाला सुरुवातीलाच विचारून घेतो. संबंधित वर्षाचे पंचांग त्याच्या हाताशी असतेच. जन्मतारखेवरून तुमची रास व नक्षत्र आणि जन्मवेळेवरून तुमची लग्नरास त्याला लगेच कळते. आता असे पहा की, या इतक्या सर्व गोष्टी जर तुमच्या नाडी-पट्टीत पूर्वीच लिहून ठेवलेल्या असतील तर अमुक एक पट्टी तुमचीच आहे किंवा नाही हे सांगणे त्याला अगदीच सोपे नाही का ? तुमची पट्टी ओळखण्यासाठी आणखी खाणाखुणांची खरे तर त्याला काहीही आवश्यकता नाही. अगदी एकसारखी संपूर्ण नावे असलेली अनेक माणसे असू शकतात हे जरी खरे असले तरी जन्मतारीख-वेळ-ठिकाण एकच असलेली व नावेही सारखीच असलेली माणसे सापडणे अशक्यप्राय आहे. शिवाय, अंगठयाच्या ठशाचे शास्त्रीय वर्णन पट्टीत लिहिलेले असते असेही नाडीवाले लोक सांगतात, म्हणजे तीही आणखी एक व्यवच्छेदक खूण त्याला उपलब्ध असते. सांगायचा मुद्दा हा की एवंगुणविशिष्ट अशा त्या व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती अस्तित्वात असणे अशक्य आहे, म्हणून तिची पट्टीही एकमेवाद्वितीय असणार. पण, गंमत अशी की, इतक्या सगळया खाणाखुणा हाताशी असूनही तुमची पट्टी शोधत असल्याचे नाटक करीत असलेला नाडी-ज्योतिषी पट्टी शोधण्याच्या मिषाने तुम्हाला अनेक प्रश्न विचारतो व त्यातून तुमच्या तोंडूनच तुमच्याबद्दलची पुष्कळशी माहिती काढून घेतो. किंबहुना तोच त्याचा खरा उद्देश असतो. पुरेशी माहिती हातात आली की तुमची पट्टी सापडली असे तो म्हणतो, नाहीतर पट्टी सापडत नाही असे म्हणतो. वास्तविक, त्याच्या दृष्टीने कुठलीही पट्टी तुमची पट्टी ठरू शकते. म्हणून तर अगदी मोजक्या पट्ट्यांच्या भांडवलावर हा धंदा वर्षानुवर्षे चालू शकतो. या धंद्यातली खरी मख्खी हीच आहे.
नावे शोधण्याची युक्ती.
तुमच्या आईचे नाव काय? असा सरळ प्रश्न तुम्हाला विचारायच्या ऐवजी ते नाव किती अक्षरी आहे, त्याचे आद्याक्षर य र ल व यापैकी आहे का, ते नाव देवीचे आहे का, असे प्रश्न नाडीज्योतिषी भाबडेपणाचा आव आणून धूर्तपणे विचारतो. भोंडल्याची आजची खिरापत काय आहे ते ओळखण्यासाठी मुली असेच प्रश्न पूर्वीच्य काळी विचारत असत! जर पट्टीत नावे खरोखरीच लिहिलेली असती तर असे चाचपडत प्रश्न त्याने कशाला विचारले असते ? सरळ नावे वाचली नसती का ? तुम्ही दिलेल्या उत्तरावरून ते नाव काय असावे हे ओळखण्याइतका तो चाणाक्ष असतो. हा चाणाक्षपणा हे त्याच्या धंद्याचे भांडवल आहे. ते नाव लक्षात ठेवून नंतर तो ते नाव वाचून दाखवतो ! पट्टीत नावे असणे अशक्य का आहे ते पुढील चर्चेवरून कळेल :-
व्यक्ती-गणिक तयार भाकित-पट्ट्या -- एक थोतांड.
व्यक्तीचे पूर्ण नाव व तिच्या जन्मकुंडलीची माहिती जिच्यावर लिहिलेली आहे अशी एखादी नाडीपट्टी जर खरोखरीच अस्तित्वात असेल तर ती पट्टी त्या व्यक्तीच्या मृत्यूबरोबरच निरुपयोगी होईल कारण तिचा पुन: उपयोग कुणालाही होणार नसतो. आमच्या विवेचनातला हा मुद्दा फार महत्वाचा आहे, का ते सांगतो. नाडीज्योतिषाचा उगम किमान ५००० वर्षांपूर्वी झाला असे नाडीवाले लोक सांगतात म्हणून गेल्या पाच हजार वर्षात निकामी झालेल्या पट्ट्यांची संख्या किती होते याचा जरा अंदाज करून पाहू. सन १९०१ या वर्षात अगस्त्य नाडीच्या सर्व ठिकाणच्या शाखात मिळून दररोज सुमारे ५० लोक आपापल्या पट्ट्यांचे वाचन करून घेऊन गेले असे समजू. म्हणजे त्या एका वर्षात सुमारे १८००० लोक त्यांच्या पट्ट्या पाहून गेले. आज त्यांच्यापैकी कुणीही माणूस हयात नसेल. म्हणजे इतक्या पट्ट्या आता निकामी झाल्या आहेत. हाच हिशोब सन १९०० च्या आधीच्या प्रत्येक वर्षाला लावला तर ५००० वर्षांच्या काळात पाच हजार गुणिले १८००० म्हणजे ९ कोटी पट्टया आजवर निकामी झाल्या आहेत. आणि शिवाय, आजपासून पुढे जेवढ्या पट्ट्या लागणार आहेत त्यांचा हिशोब वेगळाच केला पाहिजे! म्हणजे पट्ट्यांचा सुरुवातीचा स्टॉक कमीत कमी ९ कोटी एवढा होता हे तर मान्य केलेच पाहिजे. आता यापुढची गंमत पहा. प्रत्येक मूळ पट्टीच्या सोबत आणखी अकरा पुरवणी-पट्ट्या असतात व एकेका पट्टीवर एकेका स्थानाचे भाकित लिहून ठेेवलेले असते, याशिवाय आणखी चार प्रकारच्या पुरवणी-पट्ट्या असतात, अशा एकूण १६ पट्ट्या दरएक व्यक्तीसाठी लिहिलेल्या असतात असे या नाडीकेंद्राच्या माहिती-पत्रकावरून दिसते. ते खरे असेल तर, ९ कोटी गुणिले १६ म्हणजे १ अब्ज ४४ कोटी इतक्या पट्ट्यांची भाकिते वर्तवून महर्षींनी त्या पट्ट्या आपल्या शिष्यांच्याकडून लिहवून घेतल्या, आणि आता त्या सर्व पट्ट्या निकामी झाल्या आहेत हे मान्य केलेच पाहिजे. आणि असे असूनही आज प्रत्येक नाडीकेंद्रात भरपूर पट्ट्या आगामी काळासाठी शिल्लक आहेत असे नाडीवाले लोक सांगतात! म्हणजे, त्या महर्षींनी पट्ट्या लिहिल्या तरी किती ? दीड अब्ज पट्ट्या लिहायच्या हेच आधी केवढे प्रचंड काम! स्वत: महर्षी दररोज ५००० भाकिते वर्तवत होते व त्यांचे पन्नास-एक शिष्य दररोज प्रत्येकी शंभर पट्ट्या लिहीत होते असे मानले तरी एवढे प्रचंड काम पुरे करायला त्या सर्वांना ७५ वर्षे सतत राबावे लागले असले पाहिजे. धन्य ते महर्षी आणि धन्य तो त्यांचा शिष्यगण, ज्यांनी वेदाध्ययन व यज्ञयागादि आपली विहित कर्मे बाजूला ठेवून आख्खी हयात फक्त नाडीपट्ट्या कोरून लिहिण्यातच घालवली! याचा इत्यर्थ इतकाच की व्यक्तीचा नामनिर्देश व जन्मकुंडलीचा निर्देश केलेल्या भाकित-पट्ट्या हे एक थोतांड आहे. त्यावर विश्वास ठेवणारे एकतर भोळसट आहेत किंवा चलाख आहेत.
विंग कमांडर ओक म्हणतात की नाडीभविष्याचा आवाका मानवी विचारांच्या कुवतीपलीकडे जाणारा आहे. ( आम्ही म्हणतो की, असेलही कदाचित् ) पण एखाद्या नाडीकेंद्राच्या खोलीत जास्तीत जास्त किती बंडले मावू शकतील याचा अंदाज करणे हे तर मानवी कुवतीच्या पलीकडचे नाही ना ? एवढया पट्ट्या खरोखरीच पूर्वी कुणी लिहिल्या असतील का, एकेका केंद्राच्या एवढयाशा जागेत एवढया पट्ट्या मावलेल्या असतील का, त्यांचे सॉर्टिंग कसे झाले असेल, आयत्या वेळी हवे ते बंडल कसे सापडत असेल, असल्या फालतू शंका अश्रद्ध लोकांनी घ्याव्यात, ओकांना असल्या शंका येतच नाहीत. येणार कशा ? अंधश्रद्धा एकदा मानगुटीस बसली की शहाणासुर्ता माणूससुद्धा कसा मॅड होतो त्याचे हे उदाहरण पहा: बोध अंधश्रद्धेचा पृष्ठ १२१ वर ते म्हणतात या पट्ट्यातील मजकूर दर वेळी बदलत असल्याने .... पट्ट्या संख्येने कमी वाटल्या तरी यापुढेही असंख्य वर्षे मानवतेला मार्गदर्शन होत राहील यात शंका नाही.
( म्हणजे मग मजकुराबरोबर नावेही बदलत असली पाहिजेत? ) आम्हीसुद्धा तेच म्हणतो: पट्ट्या मोजक्याच असतात, त्या पुन्हा-पुन्हा वापरल्या जातात, तथाकथित कूट लिपीमुळे ही लबाडी कुणाच्या ध्यानात येत नाही. हे उघड सत्य खुद्द ओकांनीच इथे सांगितले आहे! आता आणखी काय पाहिजे ?

नाडी-पट्टीत जन्मकुंडलीचा निर्देश असणे अशक्य.
जन्मकुंडलीचा निर्देश का अशक्य आहे ते आम्ही आकडेवारीच्या मदतीने वर दाखवले. आमच्या या म्हणण्याची शहानिशा अप्रत्यक्ष मार्गानेही करता येते. तो मार्ग असा : तुमची जन्मतारीख-वेळ-ठिकाण या बाबी नाडी-ज्योतिष्याला तुमच्या तोंडून काढून घेता येत नाहीत. जर तुम्ही म्हणालात की बाकी सगळी माहिती मी देतो पण जन्मवेळ सांगत नाही, तर तो उघडपणे म्हणू शकत नाही की जन्मवेळ दिली नाहीत तर तुमची पट्टी सापडणार नाही. कारण, त्याचा दावा असा असतो की अंगठ्याच्या ठशाच्या मदतीने किंवा कुंडलीच्या मदतीने तो तुमची नाडीपट्टी शोधणार आहे. जन्मवेळ नाही म्हटल्यावर नाडीवाल्याची गाडी अडते, कारण जन्मवेळेशिवाय त्याला तुमची कुंडली बनवता येत नाही, आणि कुंडलीशिवाय भाकिते सांगता येत नाहीत. म्हणून अशा वेळी तो थोडेफार प्रश्न विचारल्याचे नाटक करून सन्माननीय माघार घेतो - म्हणजेच पट्टी सापडत नाही असे सांगतो. इथे काय घडते ते पहा. तुमच्या अंगठ्याचा ठसा तुम्ही दिलेला असतोच, आणि शिवाय तुमचे नाव, वडलांचे नाव व जन्मतारीख हेही सांगितलेले असते, फक्त जन्मवेळ लपवलेली असते. तुम्हाला अनेक प्रश्न विचारून तुमच्याकडून तुमचे वैयक्तिक तपशील त्याने मिळवलेले असतात. तेवढ्या माहितीवरून त्याला खरे तर पट्टी सापडायला हवी. पण ती सापडत नाही असे तो म्हणतो त्याचे खरे कारण हेच की जन्मवेळ माहीत नसल्यामुळे त्याला कुंडली बनवता येत नाही व भाकीत वर्तवता येत नाही. पट्टी सापडत नाही असे सांगण्यात त्याचा दुसराही एक हेतु असतो तो असा की तुमच्या पट्टीतला कुंडलीचा तपशील सांगण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही, व त्यामुळे पट्टीत कुंडलीचा काहीही तपशील नसतो हे त्याचे बिंग फुटणार नाही. परंतु ही युक्ती जर तो अशा प्रत्येक प्रसंगी वापरील तर अप्रत्यक्षपणे हेच सिद्ध होईल की पट्टीत कुंडलीचा तपशील नसतो. आम्ही अनेकदा हा प्रयोग केला आहे व अनुभव घेतला आहे. ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनीही हा प्रयोग करून पहावा. वस्तुस्थिती अशी आहे की, नाडी-ज्योतिषी स्वत:च कुंडली बनवतो व भाकिते वर्तवून ती महर्षींच्या नावावर खपवतो. ज्यांना नावाबाबत प्रयोग करायचा असेल त्यांनी जन्मवेळ सुद्धा सांगावी. तुमच्याा आईचे नांव पट्टीत लिहिलेले आहे असा दावा नाडी ज्योतिषी करतो. म्हणून जेव्हा तो तुमच्या आईचे नांव किती अक्षरी आहे, वगैरे प्रश्न विचारु लागेल तेव्हा त्याला सांगावे की, मी या प्रश्नांची उत्तरे देणार नाही. ते नांव पट्टीत असेल तर त्याने ते वाचून दाखवावे.
पट्टीत कुंडलीचा तपशील नसतो असे आम्ही म्हणण्याचे दुसरे कारण असे आहे की, नाडीपट्टीतली भाकिते महर्षींनी अंतर्ज्ञानाने लिहिली असे जर नाडीवाले म्हणतात तर भाकिते वर्तवण्यासाठी जन्मकुंडल्यांची महर्षींना काहीच गरज नव्हती हे ओघानेच आले. म्हणजे, नाडीपट्टीत कुंडल्यांची माहिती असण्याचे काहीच सबळ कारण दिसत नाही.
तिसरे कारण असे की, नाडीवाल्यांची भाकिते कुंडलीतल्या १२ स्थानानुसार वर्तवलेली असतात असे त्यांच्या माहिती-पत्रकातच म्हटलेले आहे. अशा पद्धतीचे फलज्योतिष महर्षींच्या काळात म्हणजे ५००० वर्षांपूर्वी अस्तित्वातच नव्हते, मेषादि १२ राशीही तेव्हा प्रचारात नव्हत्या हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे सध्या प्रचलित असलेल्या कुंडलीचा तपशील पट्टीत असणे शक्य नाही. या तीन कारणांमुळे पट्टीत कुंडलीचा तपशील असतो हा नाडी-ज्योतिष्यांचा दावा खोटा ठरतो.
इथे एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे: तुम्ही जन्मतारीख बिनचूक सांगून जन्मवेळ अंदाजे सांगितलीत तरी ढोबळ मानाची कुंडली नाडी-ज्योतिषी बनवील व तिच्यावर वेळ भागवून नेईल. जन्मठिकाण ही बाब ढोबळ कुंडलीत कमी महत्वाची असते.
मग लोक खोटे बोलतात काय?
नाडीकेन्द्रात आपल्याला काय काय अनुभव आले याचे रसभरीत वर्णन करताना लोक नकळत खोटे बोलतात व अतिशयोक्ती करतात असे अनुभव आम्हाला आले आहेत. ''आम्ही नुसता अंगठा दिला, बाकी काही माहिती दिली नाही. तरी सुद्धा ही माहिती पट्टीत आली!`` असे कौतुकाने सांगतात. परंतु नाडीवाल्याच्या प्रश्नांची उत्तरे देताना या बाबतची पुष्कळशी माहिती त्यांनी दिलेली असते हे त्यांना आठवतही नाही. परंतु त्यांच्या सोबत गेलेल्या माणसांना आम्ही खोदून प्रश्न विचारले असता आम्हाला असे आढळून आले की तशी माहिती नाडीवाल्याने आडवळणाने प्रश्न विचारून त्यांच्याकडून काढून घेतलेली होती.
धूळफेक करणारा प्रचार.
नाडीज्योतिष हा एक चमत्कार आहे असा प्रचार काही लोक करीत असतात. लोकांच्या मनातल्या अंधश्रद्धा हे नगदी पीक आहे हे त्यांच्या लक्षात आले आहे. ते पीक जोपासणे व वाढवणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. अशा प्रचारावर सूज्ञ वाचकांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत.

सारांश :- नाडी-पट्टीत व्यक्तींची नावे व जन्मकुंडलीचा तपशील असणे शक्य नाही हे आम्ही दाखवले. नाडी-ज्योतिषी स्वत:च भाकिते वर्तवतात व ती महर्षींच्या नावावर खपवतात हेही आम्ही दाखवले. अर्थात्, या सर्व गोष्टी अप्रत्यक्ष रितीने परिस्थितीजन्य पुराव्यावरून व तर्काचा उपयोग करून सिद्ध होतात. नाडीज्योतिषाला कूट लिपीची तटबंदी आणि 'नाडी पट्टी सापडत नाही` ही पळवाट उपलब्ध असल्यामुळे त्याच्याविरुद्ध थेट पुरावे देणे शक्य होत नाही. नाडी-ज्योतिषाची भाकिते किती खरी ठरतात व किती खोटी ठरतात, हा मुद्दा इथे अप्रस्तुत आहे.

Syndicate content
Scroll to Top