काल अचानक डोक्यात आले
चहा बनवून पाहू वाटले
चहा बनवायला लागतेच काय?
चहा, साखर अन थोडीशी साय
भरकन जाऊन खरेदी केली
आधणासाठी छोटी पातेली घेतली
आधी काकूला फोन केला
चहाचा चमचा (किती मोठा) विचारून घेतला
हाय! मांजर आडवं गेलं
दूधच सगळं नासकं निघालं
शोधाशोध करून झाली
दुकानदारांनी नन्ना केली
काय करावं मला समजेना
चहाची तल्लफ शांत बसू देई ना
कपाट सगळं एकदा उचकटलं
एक्स्पायरी उलटलेलं बिस्कीट मिळालं
शेवटी मिल्कमेडचा डबा सापडला
चहाचा पाठलाग सुरू झाला
पातेली घासून सुरूवात केली
आधण आणि साखर मोजली
तेव्हाच उतावळेपणा नडला
मिल्कमेडच्या डब्ब्याला हात लागला
मिल्कमेडच्या डब्यानं नाक घासलं
जमिनीवर पावडरचं साम्राज्य झालं
जाम वैतागून रंगभेद विसरले
काळ्या चहाच्या नादाला लागले
माझंच कर्म, आडवंच आलं
साखरेऐवजी मीठच घातलं
तोंडात घातलेलं घशाशी आलं
चहानं माझं नाकच कापलं
शेवटी सगळा नाद सोडला
सगळा पसारा नीट आवरला
आज जरा विचार केला
जरी कालचा बेत फसला
काय घडले तेच सांगावे
विडंबनरुपाने सादर करावे
आता हे विडंबन संपवते
पोळ्या लाटायला आत जाते
प्रतिक्रिया
6 Apr 2009 - 7:27 pm | प्राजु
जबरदस्त!!
आदिती.... मस्त जमलाय गं चहा...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 Apr 2009 - 9:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जबरदस्त!!
आदिती.... मस्त जमलाय चहा...
6 Apr 2009 - 7:28 pm | बिपिन कार्यकर्ते
दुर्बिटणे बाई आजकाल मोकाट सुटल्या आहेत... डुर्र डुर्र डुर्र
=)) चांगलं आहे विडंबन!!!
बिपिन कार्यकर्ते
6 Apr 2009 - 7:38 pm | श्रावण मोडक
अगदी सहमत. मघाशी बोललो तोवर ठीक होती. इतक्यात बिघडेल असं वाटलं नव्हतं. ;)
6 Apr 2009 - 7:29 pm | शितल
=))
फुल टु धमाल विडंबन.
6 Apr 2009 - 7:30 pm | चतुरंग
फक्कड जमलाय हो चहा! :B
चतुरंग
6 Apr 2009 - 10:52 pm | संदीप चित्रे
आणि विडंबनासाठी दारू न घेतल्याबद्दल (म्हणजे दारू हा विषय न घेतल्याबद्दल) एक्श्ट्रा मार्क्स :)
6 Apr 2009 - 10:58 pm | आंबोळी
आणि विडंबनासाठी दारू न घेतल्याबद्दल (म्हणजे दारू हा विषय न घेतल्याबद्दल) एक्श्ट्रा मार्क्स
अहो पण चहा हे ही एक उत्तेजक पेय आहे. आणि ते घेतल गेलय.
आंबोळी
6 Apr 2009 - 7:32 pm | टिउ
मजा आली...नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न!
6 Apr 2009 - 7:36 pm | क्रान्ति
मस्त जमला हो चहा अदितीताई!
=)) =)) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
6 Apr 2009 - 7:38 pm | मदनबाण
व्वा. जबराट विडंबन...
चहा बनवण्याचा हा विरंगुळा आवडला.
माझंच कर्म, आडवंच आलं
साखरेऐवजी मीठच घातलं
:B
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
6 Apr 2009 - 7:39 pm | अनामिक
लै भारी हाय तुझी चहा करायची पद्धत... वाचून हासू आले :D
तू "राजें"चे मनोगत काव्यस्वरूपात लिहीले असे वाटले... काय रा़जे, बरोबर हाय का नाय?
-अनामिक
6 Apr 2009 - 7:40 pm | शाल्मली
वा वा!!!
चहा मस्त झाला आहे.
आता पोळ्या लाटण्यासाठी शुभेच्छा!!
--शाल्मली.
6 Apr 2009 - 7:55 pm | लिखाळ
छान ..
आता पोळ्या कश्या झाल्या ते सांगा :)
-- लिखाळ.
6 Apr 2009 - 7:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पोळ्यांची सवय आहे हो समीक्षकाधिपती लिखाळराव. पुरणपोळ्याही केल्या होत्या एकदा!
पण तुझ्याकडून हुच्च समीक्षा न आल्यामुळे विडंबन हुकलं की काय असं वाटतंय.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
6 Apr 2009 - 8:03 pm | लिखाळ
हा हा .. पु पो जमल्या म्हणजे प्रश्नच नाही :)
आज कार्यालयात येताना मी माझी शब्द वैचित्र्याने भरलेली वही घरी विसरून आलो :) त्यामुळे शब्दबंबाळ मार्मिकविशेष अश्या जोडशब्दांच्या काजू-बदामांने सजवलेले समिक्षण पाडता आले नाही ;)
-- लिखाळ.
6 Apr 2009 - 8:23 pm | प्राजु
शब्दबंबाळ मार्मिकविशेष अश्या जोडशब्दांच्या काजू-बदामांने सजवलेले समिक्षण पाडता आले नाही
त्यात काय वाईट वाटून घेण्यासारखं!! शरदीनी ताईना भेटा!..(ह. घ्या. )
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 Apr 2009 - 8:13 pm | निखिल देशपांडे
मस्तच झाले आहे विडंबन...........
चहा बनवायची छान पद्धत आहे....
6 Apr 2009 - 8:16 pm | रेवती
मस्त जमलय विडंबन....चहाचं!
वाचताना मधेच लहान मुलांचं गाणं असल्यासारखं वाटतय.
एकदम जोरात आजकाल....
रेवती
6 Apr 2009 - 8:19 pm | चतुरंग
काषायपेय बनवण्यासारख्या वरवर अत्यंत साधारण वाटाणार्या एका (पाक)कृतीवर एक कविता होऊ शकते हा विचारच मुळात मूलगामी आहे!
अंतराळातल्या ग्रहगोलांवर करडी नजर ठेऊन असणार्या दुर्बीटणे बाईंसारख्या महान विदूषीचे ध्यान हे स्वयंपाक घरातल्या चहा सारख्या किरकोळ गोष्टीकडे जावे ह्याचे कोणास नवल वाटेल तर वाटो बापडे, मला तरी तो त्यांच्या बहुगामी, चतुरस्र बुध्दिमत्तेचा आविष्कार वाटला.
आता ह्याच ओळी पहाना
चहा बनवायला लागतेच काय?
चहा, साखर अन थोडीशी साय
आपली सायीची आवड कशा खुबीने त्यांनी सांगून टाकली आहे पहा! वा वा!! (तशा त्या जीममधे जातातच, त्यामुळे त्यांच्यावर वजनाचा संशय नसावा. जिज्ञासूंना पावतीही बघायला मिळू शकेल!)
त्यापुढे वाचा
आधी काकूला फोन केला
चहाचा चमचा (किती मोठा) विचारून घेतला
वा! आपल्या आप्तांशी असलेले घरोब्याचे संबंध असे सहज जाताजाता विषद करणे सोपे नाही!
एक्स्पायरी उलटलेलं बिस्कीट मिळालं
अशी किती आणि कोणकोणती बिस्किटे ह्या विदूषीने पचवली असतील? ह्या विचाराने मला अंतर्मुख केले!
मिल्कमेडच्या उल्लेखाने तर मी अंतर्बाह्य थरारलो! संकटसमयी दुधाला असा पर्याय घरात ठेवण्याच्या त्यांच्या कल्पकतेने आनंदाश्रू उभे राहिले.
त्याच्याच पुढे जेव्हा मिल्कमेडचा डबा सांडल्याचे वर्णन आहे त्याने तर मला थक्क केले. कारण हा डबा हे पाश्चिमात्य शक्तींचे प्रतीक आहे आणि आपत्कालीन परिस्थितीत ह्या शक्ती तुम्हाला कशा तोंडघशी पाडू शकतात हे ह्या वरवर साध्या वाटणार्या ओळींमधून सांगणे म्हणजे मूर्तिमंत प्रतिभाच हवी!
जाम वैतागून रंगभेद विसरले
ह्या ओळींनी तर कहरच केलाय! ही कविता 'जागतिक रंगभेद आणि गुरु जालिंदर' ह्या भडकमकर मास्तरांच्या नवीन काव्यसंग्रहात मौलिक विश्वसाहित्याचे देणे ह्या सदरात समाविष्ट करावी असा मी आग्रह धरतो!
आता ही विडंबन संपवते
आणि पोळ्या लाटायला आत जाते
वा काय हा मोठेपणा! विदूषी शास्त्रज्ञ झाली तरी पोटाची भूक सगळीकडे सारखीच. जराही मानपमान न वाटता सरळ पोळ्या लाटायला? असा नम्रपणा, अशी विनयशीलता अभावानेच आढळते. जियो!! त्रिवार जियो!!
(दिग्मूढ)चतुरंग
6 Apr 2009 - 8:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
चतुरंग, साष्टांग नमस्कार तुम्हाला!! श्री. लिखाळ समीक्षावाले यांची कमरतरता साक्षात विडंबनाधीश चतुरंग यांनी भरून काढावी. केवढं हे माझं महद्भाग्य!! मागच्या जन्मी मी चार तारे जास्त मोजल्यामुळेच मला हे भाग्य लाभलं असणार या विषयी माझ्या मनात यत्किंचितही किंतू नाही.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
6 Apr 2009 - 8:39 pm | लिखाळ
या महान कलाकृतीची आपण योग्य 'जोडशब्दांत' दखल घेतलीत हे पाहून बरे वाटले. एका विडंबकाने दुसर्या विडंबकाची स्तुती करावी ही बाब मिपासाठी उल्लेखनीय आहे. तरी या थोर विदुषीला 'महान विदूषीचे ध्यान' असे आपण म्हणून शालजोडितला ठेउन दिलात की काय असा संशय आलाच :)
-- लिखाळ.
6 Apr 2009 - 8:51 pm | चतुरंग
'महान विदूषीचे ध्यान' ह्यातला ध्यान हा शब्द लक्ष ह्या अर्थाने आहे हे समजू नये किंवा समजले तरी तसे लिखाळांनी दाखवू नये ह्याचे अंमळ वाईट वाटले! :T :''(
(असा संशय निर्माण करुन ठेवणे हा दोन समीक्षक बांधवांमधला आपापसात असलेला जळफळाट तर नव्हे? ;) )
(समीक्षक) चतुरंग
6 Apr 2009 - 8:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
किंवा एक प्रस्थापित आणि एक नवविडंबनकार यांच्यात लावालाव्या लावून देण्याचा क्षीण प्रयत्न? :?
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
6 Apr 2009 - 10:27 pm | लिखाळ
चतुरंग आणि अदिती,
मी ते अगदी मजेने लिहिले होते. आपण सुद्धा त्याकडे मजेने पहाल अशी खात्री होती म्हणूनच लिहिले. तरी ते आवडले नसल्यास संपादित करावे.
--(आपला समीक्षकबांधव :) ) लिखाळ.
6 Apr 2009 - 10:38 pm | चतुरंग
मजेने लिहिलेले वाचून आणि समजूनही ते तितके हलके घेतलेले नसावे की काय असा किंतू लिखाळ ह्यांच्या मनात निर्माण करण्यात मी आणि अदिती यशस्वी झालो, हेच आमच्या समीक्षेचे यश! ;)
(अवांतर - लिखाळभाऊ चिंता करु नका हो! अहो मी मुळात ते वाक्य लिहिल्याबरोबरच मला कोणीतरी असे टोकणार ह्याची खात्रीच होती! )
चतुरंग
6 Apr 2009 - 10:55 pm | लिखाळ
आता बरे वाटले.. म्हणजे अशाच सुरात गाणे गात राहायला हरकत नाही :)
-- लिखाळ.
7 Apr 2009 - 7:47 am | प्रकाश घाटपांडे
आदुगर आमाला ईदुषी म्हंजी महिला इदुशक अस वाटायचं . पन नंतर मंग आमच्या न्यानात भर पल्डी.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
6 Apr 2009 - 9:13 pm | भडकमकर मास्तर
जाम वैतागून रंगभेद विसरले
ह्या ओळींनी तर कहरच केलाय! ही कविता 'जागतिक रंगभेद आणि गुरु जालिंदर' ह्या भडकमकर मास्तरांच्या नवीन काव्यसंग्रहात मौलिक विश्वसाहित्याचे देणे ह्या सदरात समाविष्ट करावी असा मी आग्रह धरतो!
खूप छान सूचना...
...
आम्ही जरूर समावेश करू.
शिवाय जालिंदरजी (झोपेतून उठले की) त्यांचा या कवितेवर ऑटोग्राफसुद्धा पाठवू.
चहा हे पेय फार महत्त्वाचे आहे...
त्याचे ललित सादरीकरण इतके उच्चकोटीतले होईल असे वाटले नव्हते.
आणि शेवट चहा न बनल्याने जो निगेटिव्ह / दु:खद शेवट होतो आहे असे वाटून काळीज तुटते,, पण त्याबरोबरच पोळ्या तरी बनणार आहेत या एका कृष्णमेघाच्या चंदेरी कडेकडे मी लक्ष वेधू इच्छितो.
.....
टीप : जालिंदरजींनी बुरुंडी येथील त्यांच्या वास्तव्यात तीन स्थानिक स्त्रियांशी अधिकृत लग्ने केली...आणि आपापल्या परीने रंगभेद मिटवायचा प्रयत्न केला.
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
6 Apr 2009 - 8:42 pm | नितिन थत्ते
साय घातलेला चहा मला आवडत नाही.
पण ही कविता मात्र आवडली.
खराटा
(रंग माझा वेगळा)
6 Apr 2009 - 9:02 pm | अवलिया
हुच्च विडंबन !!!
हुच्च समिक्षा !!!
=))
मस्त आवडले !!
(रंगाशेट आणि लिखाळ काय दराने अशा समिक्षा लिहुन देतात हे एकदा विचारले पाहिजे ;) )
--अवलिया
6 Apr 2009 - 9:05 pm | भडकमकर मास्तर
साधा तो चहा ..
पानी उबालो पत्ती डालो और पी जाओ, इस्में क्या खास है?
पीओ तो जानो...
बागोंकी ताजगी लाए
पॅकेटबंद शुद्धता लाए
ब्रुकबाँड रेडलेबल चाय
सचमुच है बेजोड चाय
ही जाहिरात मला आवडते.
मला साय आवडते.
मला विडंबन हा प्रकार आवडतो.
मला आल्याचा चहा कधीकधी आवडतो.
मला समीक्षा आवडते.
मला भिंगाने तारे पहायला / मोजायला आवडतात.
दूध घरात नसले की मी दूधपावडरचा चहा करतो.
पण माझ्या पोळ्या माझ्या बायकोने केलेल्या पोळ्यांपेक्षा वाईट होतात, त्यामुळे मी तिने केलेल्या पोळ्या खातो.
चहाबरोबर मी बिस्किटही खातो.
कधीकधी मलाही मांजर आडवे जाते. मग मी धावत जाऊन त्याला आडवा जातो.
त्यामुळे हे विडंबन मला आवडले.
जय जालिंदर ...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
6 Apr 2009 - 9:11 pm | मराठमोळा
कधीकधी मलाही मांजर आडवे जाते. मग मी धावत जाऊन त्याला आडवा जातो.
=)) =))
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
6 Apr 2009 - 9:30 pm | रेवती
कधीकधी मलाही मांजर आडवे जाते. मग मी धावत जाऊन त्याला आडवा जातो.
अतिशय उच्च विनोद!
रेवती
6 Apr 2009 - 9:56 pm | टायबेरीअस
बालपणी कुठेतरी वाचलेले आठवले..
"कराग्रे वसते स्पूनम|
करमध्ये बिस्किटम |
करमुले तु चहापात्रम|
प्रभाते कपदर्शनम|| "
छान विडंबन झाले आहे.. अजून येऊद्यात!
6 Apr 2009 - 10:56 pm | आंबोळी
अति उच्च काव्य ! अति उच्च समिक्षा!!
सर्वाना माझा दंडवत!!!
प्रो.आंबोळी
7 Apr 2009 - 2:43 am | पिवळा डांबिस
आदितीबाय, 'पावणा कप' चाय मस्त जमलीये!!!
"अहो, मुंबईबाहेरच्या लोकांनी मुंबईची मराठी भाषा बिघडवली. 'चाय पिली' याऐवजी 'चहा घेतला' म्हणायला लागले! काय हे!!" - पुल
:)
7 Apr 2009 - 2:56 am | बेसनलाडू
('चहा''टळ')बेसनलाडू
7 Apr 2009 - 10:17 am | नरेश_
गोड बिस्किटांबरोबर खारा चहा केवळ अप्रतिम..
नवी म्हण : आपलं ते प्रेम आणि दुसर्याचं ते लफडं ;)
7 Apr 2009 - 11:11 am | जागु
लय भारी.
7 Apr 2009 - 11:16 am | दशानन
हिहिहिहिहिहिहिहिहिहिहिहि !!!!
लै भारी.. चला म्हणजे तुम्ही पण किचन मध्ये लढाई करता तर ;)
7 Apr 2009 - 11:16 am | जयवी
खी खी खी ........!!
7 Apr 2009 - 11:56 am | परिकथेतील राजकुमार
आणि हो 'दुर्बीणीच्या कपातले' विडंबन आवडले.
भयानक पाठलाग
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
7 Apr 2009 - 12:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वतःच्याच धाग्यावर शक्यतो मी प्रतिसाद देणं टाळते, पण 'चहाटळ', 'दुर्बिणीच्या कपातले', मुंबैची भाषा बिघडवली इ. प्रतिसादांमुळे रहावलं नाही.
लिखाळपंत, तुमच्या समीक्षेचीच समीक्षा झाली हे पाहून अंमळ मौज वाटली. तुमचा प्रश्न अर्थातच मी ह. घेतला आणि माझा प्रतिप्रश्न तुम्ही ह. घेतलाच असेल! तेव्हा मज्यशि मयत रि कर्न्र क?
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
7 Apr 2009 - 12:14 pm | सुप्रिया
=D> =D> =D> =D>
मस्त विडंबन आणि समिक्षा त्याहून भारी.
सुप्रिया.
--------------------------------
देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.
7 Apr 2009 - 4:30 pm | स्वाती दिनेश
अदिती,
सॉलिड झालाय चहा,त्याचबरोबर चतुरंग,लिखाळ आणि मास्तरांची तोंडीलावणी पाहता हा "हाय टी" म्हणायला हरकत नाही,;)
स्वाती
7 Apr 2009 - 5:42 pm | सुधीर कांदळकर
धम्माल आली. भडकमकर मास्तर आणि चतुरंग यांचे प्रतिसादहि मस्तच.
सुधीर कांदळकर.
7 Apr 2009 - 8:55 pm | ऋषिकेश
चहा फक्कड जमलाय :))
बाकी प्रकाशराव म्हणतात त्याप्रमाणे स्त्री विदुषकाला काय बरं म्हणतात?
ऋषिकेश
7 Apr 2009 - 9:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
डझ नॉट कंप्यूट!
स्त्रियांना विनोदबुद्धी नसते ना! ;-)
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
11 Apr 2009 - 2:23 pm | जागल्या
बास करा राव ,
विक्षीप्त बाई, लिखाळराव आणि चाररंगवाले
फार झाले आता. डोक्याच भुस्कट झाल पार.
जागल्या
11 Apr 2009 - 3:57 pm | संध्यानंदन
चहा च सोडा, पोळ्या कश्या झाल्या....................?