कुणीही यावे......

सुनील मोहन's picture
सुनील मोहन in जनातलं, मनातलं
13 Jan 2009 - 4:12 pm

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सरकारने भारतीय नागरिकांना अतिशय सक्षम अशा सुरक्षाव्यवस्थेची हमी दिलेली होती. सर्व राजकारणी लोकांनी अगदी जीव तोडून सांगितले की भारताच्या सर्व तपास यंत्रणा, पोलिस,सी.बी.आय, लष्कर इत्यादींना हाय अलर्ट वर ठेवण्यात आले आहे. पण ह्या सर्व यंत्रणा खरंच कार्यरत आहेत?

बहुधा नसाव्यात अशी दाट शंका यावी अशा दोन बातम्या गेल्या काही दिवसात वाचनात आल्या. आज या दोन घटना घडून सुद्धा अनेक दिवस उलटून गेले आहेत पण सरकार किंवा सुरक्षा यंत्रणा यापैकी कुणाकडूनही काही खुलासा केला गेला नाहीय. प्रसारमाध्यमे सुद्धा मौन पाळून आहेत.

बातमी क्र.१. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चेन्नई आणि रामेश्वरम च्या किनारपट्टीवर रक्तलान्छित अवस्थेत आणि गोळीबाराच्या अनेक खुणा असलेल्या सुमारे आठ बोटी बेवारस सोडून दिलेल्या आढळून आल्या. पोलिसांकडून त्यावेळी हा घुसखोरीचा प्रकार असावा अशी शंका व्यक्त केली गेली होती आणि तपास सुरू आहे असे
एक ठराविक छापाचे उत्तर दिले गेले होते.

या घटनेला आता महिना उलटून गेला आहे तरी माध्यमांमधे किंवा पोलिसांकडून काहीच खुलासा झालेला नाही.

या बोटी कुणाच्या मालकीच्या होत्या? कोण त्यामधून भारतात आले? गोळीबार कुणी केला? बोटींच्या इंजिन नंबर वरुन काही तपास करण्यात आला होता का? हे आणि असे काही प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत.

बातमी क्र.२. पून्छच्या जंगली आणि डोंगराळ भागात दडलेल्या अतिरेक्यांना पकडण्यासाठी भारतीय लष्कराचे साडेतीनशे जवान अतिरेकी होते त्या जागेला वेढा घालून बसले होते. हवाईदला कडून एरियल सपोर्ट दिला गेला होता. दहा दिवसांच्या कारवाई नंतर एके दिवशी लष्कराने जाहीर केले की कारवाई संपली.

एकही दहशतवादी घुसखोर पकडला किंवा मारला गेला नाही ते नाहीच पण लष्कराचे तीन जवान प्राणाला मुकले.

इथे तर प्रश्नच प्रश्न आहेत आणि उत्तरे काहीही नाहीत.

प्रश्न १: भारताच्या सीमेच्या आत आठ किलोमीटर घुसून अतिरेकी कुणाला न कळता आले कसे?
प्रश्न. २: डोंगराळ भागातील एका गुहेचे परिवर्तन एखाद्या अभेद्य बंकर प्रमाणे करून तिथे शस्त्रास्त्रांचा साठा जमा करेपर्यंत आपले गुप्तचर खाते आणि आर्मी इंटेलिजन्सचे लोक काय करत होते?

प्रश्न.३ : स्थानिक पोलिस आणि त्यांच्या खबर्‍यांना काही सुगावा का लागला नाही?

प्रश्न ४ : लष्कराने संपूर्ण भागाला वेढा दिलेला असताना अतिरेकी पळून जाण्यात यशस्वी कसे झाले?

प्रश्न.५ : लष्कराने दिलेल्या माहितीनुसार ४ अतिरेकी मारले गेले असताना एकाचे सुद्धा शव कसे मिळाले नाही?

आज पाकिस्तानी / तालेबानी दहशतवादाची टांगती तलवार भारताच्या डोक्यावर असताना आपली सुरक्षा यंत्रणा इतकी ढिसाळ कशी असु शकते? आज आपल्या सीमा आणि समुद्रकिनारे यांच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज आहे.

तेव्हा सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यांना असेच म्हणावेसे वाटते की कृपया दक्ष रहा.

आओ जाओ घर तुम्हारा असं नका होऊ देऊ.

धोरणविचारमतबातमीसमीक्षा

प्रतिक्रिया

ढ's picture

13 Jan 2009 - 4:30 pm |

दक्षता घेतलीच पाहिजे.
नाहीतर पुन्हा मुम्बई सारखा हल्ला होऊ शकतो.