✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अ‍ॅबॅकस् चा शोध कसा लागला - एक "कोट्याधीश" धागा ;-)

व
वामन देशमुख यांनी
Wed, 11/13/2024 - 18:49  ·  लेख
लेख
गणित सोडवायचं म्हटलं की माणसाला प्रश्न पडतो. मग तो स्वतःशीच म्हणतो, "अब्बा! कसं करायचं हे इतकं अवघड गणित?" पण या प्रश्नातच त्या गणिताचे उत्तर दडलेले असते! हा गणिती प्रश्न आणि त्याचे उत्तर म्हणजे - अब्बा! कसं करायचं हे इतकं अवघड गणित? अब्बा! कसं करायचं हे अवघड गणित? अब्बा! कसं करायचं हे गणित? अब्बा! कसं करायचं हे? अब्बा! कसं करायचं? अब्बा! कसं? अब्बाकसं? अबाकस अ‍ॅबॅकस् या रीतीने मग अ‍ॅबॅकस् या गणिते सोडविण्याच्या पद्धतीचा शोध लागला! ;-) --- चला तर मग, राजकारण, अर्थकारण, शेअर बाजार, ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, अध्यात्म, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, भटकंती, पाककृती... यांतील पारंगत मिपाखरे कोट्या करण्यातही कमी नाहीत हे दाखवू या. आपापले असेच कोट्याधीश विचार (खरंतर अविचार) इथे मांडा! सर्वोत्तम मिपाखरांचा इथे प्रतिष्ठित मिपाखरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, हार, तुरे वगैरे देऊन जाहीर सत्कार करण्यात येईल! - कोट्याप्रेमी द्येस्मुक्राव्
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3022 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

ओके. घ्या आणखी एक.

गवि
Wed, 11/13/2024 - 22:25 नवीन
ब्रिटिश राज्य असताना एक गोरा साहेब प्रवासी रत्नागिरीत भ्रमंती करत होता. स्थानिकांशी खास परिचय व्हावा म्हणून काही दिवस त्याची राहण्याची सोय एका प्रतिष्ठित सुखवस्तू कुटुंबात करण्यात आली. एका सकाळी घरातल्या घरात इकडे तिकडे फिरताना तो एका लहानशा कोठीच्या खोलीत डोकावला. सोवळे मोडू नये म्हणून त्याला हात दाखवत दाराबाहेरच रोखून वत्सलाबाई रानडेआजी घाईघाईने आपल्या कैरीच्या मसाल्यात घोळवलेल्या फोडींवर कडकडीत करून नंतर गार केलेले तेल ओतू लागल्या. मग त्यांनी मिश्रण नीट मिसळले. कुतूहलाने गोऱ्या साहेबाने मोडक्या तोडक्या मराठीत विचारले,"असा केल्यावर हे मँगो पिकंल काय?" वत्सलाबाईंनी लगेच नाही नाही अशी आडवी मान हलवली. परपुरूषाशी बोलणे प्रशस्त समजले जात नसल्याने त्या मनातच पुटपुटल्या, "गाढवच दिसतोय मेला. चिरून, फोडी करून, मसाला आणि तेल लावून आंबा कधी पिकतो होय?" पण भारतीय मान हलविण्याच्या पद्धती पाश्चिमात्य लोकांना फारच गोंधळात टाकत असल्याने गोऱ्या साहेबाने त्याचा अर्थ हो हो असा घेतला आणि डायरीत नोंद केली. तेव्हापासून इंग्रजीत लोणच्याला पिकल म्हणू लागले.
  • Log in or register to post comments

हा हा

यश राज
गुरुवार, 11/14/2024 - 13:28 नवीन
भारिये !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तेव्हापासून इंग्रजीत लोणच्याला पिकल म्हणू लागले.

टर्मीनेटर
गुरुवार, 11/14/2024 - 17:15 नवीन
तेव्हापासून इंग्रजीत लोणच्याला पिकल म्हणू लागले.
हा हा हा... भारी किस्सा आहे गवि साहेब! माझे आजोबा हयात होते तोपर्यंत चांदोबा, चंपक, ठक ठक, किशोर, फँटमची कॉमिक्स, रीडर्स डायजेस्ट, इलेक्ट्रॉनिक्स फॉर यु अशी पाक्षिके/मासिके आणि अनेक दिवाळी अंक लहानपणापासून बऱ्यापैकी मोठे होईपर्यंत नियमितपणे घरात वाचायला मिळत होते. त्यात एक फोर सीझन्स नावाचा मराठी दिवाळी अंकही असे, त्यात खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या कथेतला एक किस्सा ह्यानिमित्ताने आठवला. ब्रिटिश आमदानीत दुर्गभ्रमंती करताना वाट चुकल्याने रात्र रानात काढावी लागलेला एक गोरा साहेब सकाळी दुर्गम भागातल्या एका आदिवासी पाड्यावर पोचतो. तहानभुकेने व्याकुळ झालेला हा साहेब एका झोपडीच्या बाहेर बसलेल्या वृद्ध आदिवासी महिलेकडे काही खायला मिळेल का अशी विचारणा करतो. त्याने अनेकदा विचारणा करूनही त्याची इंग्रजी भाषा समजत नसल्याने ती म्हातारी बराच वेळ मक्ख चेहऱ्याने त्याच्याकडे नुसती बघतच बसल्याने हवालदिल झालेल्या त्या साहेबाला जगाच्या पाठीवर कुठल्याही भाषिकाला सहज समजू शकणाऱ्या खाणा-खुणांच्या भाषेत विचारणा करण्याची बुद्धी सुचते आणि ती फळालाही येते. म्हातारी झोपडीत जाऊन तिने न्याहारीसाठी उरवून ठेवलेलया रात्रीच्या भाकऱ्यांपैकी एका 'कडक' भाकरीवर कुठल्याशा कंदमुळांपासून बनवलेल्या कोरड्या भाजीचा मोठा गोळा ठेऊन त्याला आणून देते. पोटात आग पडलेला तो साहेब अधाशासारखा भाजीचा गोळा मटकावून झाल्यावर भाकरीवर दोन-चार आणे ठेऊन ती म्हातारीच्या हाती सोपवत तिचे आभार मानून परतीच्या प्रवासाला लागतो. मजल दरमजल करत मुक्कामी पोचल्यावर आपल्या डायरीत ह्या अनुभवाची नोंद करताना तो लिहितो, "इथले आदिवासी खूप गरीब असले तरी माणुसकीला चांगले आहेत. त्या म्हातारीने मला खायला दिलेली भाजी कसली होती ते कळले नाही पण ती खूप चविष्ट होती आणि ज्या प्लेट मध्ये मला ती देण्यात आली होती ती देखील अनोखी होती. माती किंवा कुठल्याही धातूपासून न बनवलेली अशी वेगळीच प्लेट मी प्रथमच पहिली. पण काही पैसे ठेऊन मी ती प्लेट परत केल्यावर ती बाई आनंदीत न होता उलट विचित्र नजरेने माझ्याकडे का पहात होती हे अनाकलनीय आहे"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गणिती प्रश्नाचे उतरत्या भाजणीतले

टर्मीनेटर
गुरुवार, 11/14/2024 - 15:32 नवीन
अब्बा! कसं करायचं हे इतकं अवघड गणित? अब्बा! कसं करायचं हे अवघड गणित? अब्बा! कसं करायचं हे गणित? अब्बा! कसं करायचं हे? अब्बा! कसं करायचं? अब्बा! कसं? अब्बाकसं? अबाकस अ‍ॅबॅकस् गणिती प्रश्नाचे उतरत्या भाजणीतले हे उत्तर वाचून 'धमाल' चित्रपटात चढत्या भाजणीत आपले 'पेट नेम' सांगणाऱ्या विनय आपटेंचा धमाल प्रसंग आठवला 😀 अय्यर... वेणुगोपाल अय्यर... मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर... चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर... पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर... एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर... त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर... श्रीनिवासन त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर... राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर... शिववेंकटा राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर... शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर... लक्ष्मण शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर... जयसूर्या लक्ष्मण शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर... अट्टापटू जयसूर्या लक्ष्मण शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर... श्रीपेरवर्धन अट्टापटू जयसूर्या लक्ष्मण शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर... प्रभाकरन श्रीपेरवर्धन अट्टापटू जयसूर्या लक्ष्मण शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर...
  • Log in or register to post comments

कहर!

चांदणे संदीप
गुरुवार, 12/05/2024 - 12:41 नवीन
एवढं टाइपलत! धन्य हो! वाचताना पण दमायला होतंय. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

लेखक,गवी,टर्मिनेटर

कर्नलतपस्वी
गुरुवार, 11/14/2024 - 18:49 नवीन
साष्टांग दंडवत. लवकरच भर टाकायचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

नेता? न्या हो.

वामन देशमुख
Sun, 11/24/2024 - 17:49 नवीन
विसाव्या शतकाच्या मध्यात घडलेल्या ज्यूविरोधी हत्याकांडांनी त्रासून गेलेल्यांनी आपल्या नेत्यांकडे, "मला आपल्या हक्काच्या मातृभूमीत प्लिज नेता? न्या हो." असा टाहो फोडला. त्यातून मग - मला नेता? न्या हो. नेता? न्या हो. नेता न्या हो नेतान्याहो नेतान्याहू असे नेतृत्व उदयास आले.
  • Log in or register to post comments

बा चा बा ची .....

कर्नलतपस्वी
Sun, 11/24/2024 - 18:14 नवीन
बाचाबाची हा शब्द कसा बनला. गुजराथी + मराठी का मराठी + मराठी
  • Log in or register to post comments

मेटाडोर

वामन देशमुख
Wed, 12/04/2024 - 14:58 नवीन
रस्त्यातून एखादं मोठं ढोर जाताना ते पादचाऱ्यांच्या तुलनेत अधिक जागा व्यापते. त्याप्रमाणे मेटॅडोरसारखी काही वाहने दुचाक्यांच्या तुलनेत अधिक जागा व्यापतात. त्यामुळे एखादं मोठं ढोर जसे अधिक जागा व्यापून रस्त्यावरून जाते तसेच जाणारे वाहन म्हणजे मेटाडोर!
  • Log in or register to post comments

एक्सप्रेस

वामन देशमुख
Wed, 12/04/2024 - 15:00 नवीन
एकेकाळी पॅसेंजर गाड्यांच्या तुलनेत (तिचे तिकिट कमी असल्याने) एक्सप्रेस गाड्यांत लोक कमी असायचे. त्यामुळे त्या गाड्यांत ऐसपैस बसता यायचे. म्हणून ज्या गाडीत ऐसपैस बसता येते ती म्हणजे एक्सप्रेस गाडी!
  • Log in or register to post comments

राम रावण युद्धात प्रभू

चावटमेला
गुरुवार, 12/05/2024 - 17:18 नवीन
राम रावण युद्धात प्रभू श्रीरामांनी डागलेल्या अस्त्रांना घाबरून रावणाच्या अनेक सैनिकांनी लंकेतून पळ काढला आणि समुद्रमार्गे दूर दक्षिणेकडील एका विस्तृत पण नगण्य लोकसंख्या असलेल्या भूभागावर आश्रय घेतला. पण, वाया जातील ती श्रीरामाची अस्त्रे कुठली. ह्या अस्त्रांनी त्या भूभागापर्यंत त्या सैनिकांचा माग काढून त्यांचा संहार केला. प्रभू रामचंद्रांच्या अस्त्राने पावन झालेल्या त्या भूमीला लोक "अस्त्रालय" ह्या नावाने ओळखू लागले, ह्या नावाचे इंग्रजांनी पुढे आंग्लीकरण करून "ऑस्ट्रेलिया" केले.
  • Log in or register to post comments

सातार्‍याहून इंग्रजांना

सौंदाळा
गुरुवार, 12/05/2024 - 18:45 नवीन
सातार्‍याहून इंग्रजांना करंडीतून पेढे जायचे. इंग्रज र चा उच्चार अस्पष्ट करत असल्यामुळे ते कएंडी पेढे म्हणायचे आणि त्याचेच नंतर कंदी पेढे असे नामकरण झाले.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा