एक पावसाळी संध्याकाळ.....

एस.बी's picture
एस.बी in जनातलं, मनातलं
15 Jun 2021 - 2:12 pm

"खरं आजोबा तू फार लक्की म्हणजे अगदी लक्की आहेस बघ!!! एन्जॉय कर !!बाय!!!" असं म्हणून तिने फोन ठेवला अन स्वत:शीच गुणगुणत अलगद हसताना मी तिला पाहिलं..

आणि आज विचारूनच बघुयात म्हणून म्हणालो," मला एक समजत नाही ,तुझे आजोबा तुला रोज एकदा कॉल करून तास तास भर काहीतरी ऐकवतात आणि तूही रोज अगदी उत्साहाने अरे वा!!!छान!!! मस्तच!!! अशा प्रतिक्रिया देत सगळं ऐकून घेतेस आणि फोन ठेवताना तू फार लक्की आहेस आजोबा असं म्हणतेस ! मला सांग त्यांच्या आयुष्यात रोज अगदी नियमित पणे एवढ्या आनंदाच्या कोणत्या गोष्टी घडतात ???"

क्षणभर शांत राहून ती खिडकीतून बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या धारा पाहत राहिली ,आम्हा दोघांमध्ये एक अनामिक शांतता पसरून राहिली होती ,पावसाच्या टिपऱ्या छतावर तडतड करून आपलं अस्तित्व दाखवून देत होत्या...मला वाटलं की उगाच नकोसा सवाल करून बसलो आपण !!!

" तुला तर माहीतच आहे ना की काही महिन्यांपूर्वीच आजोबाला स्मृतिभ्रंश ( अल्झामायर्स) चे निदान झाले होते.
त्यानंतर त्याला सतत अधून मधून गोष्टी विसरायला होतं.
मग कधी कधी तो आजीला घरात पाहतो तेंव्हा बागेत जाऊन किंवा बाहेर जाऊन ताजे गुलाब घेऊन येतो आजीकडे कडे अगदी नवखा कॉलेज कुमार असल्यासारखा घाबरत घाबरत जातो....आणि तिला " ऐक ना मला ना तू खूप आवडतेस!! मी एवढा म्हातारा झालो आहे पण बहुतेक माझं लग्न झालेलं नाही ...आपण दोघे पळून जाऊन लग्न करूयात का?? मी खूप सुखी ठेवेल तुला!!!" असं अगदी कोवळ्या प्रेमविरा सारखी मागणी घालतो तिला!!!"

हे ऐकून मी अजून अचंबित झालो," अग पण ह्यात लक्की असण्याचा काय संबंध??? उद्या रस्त्यात कोणाला पण म्हणतील ना चल पळून जाऊयात!! म्हातारपण मध्ये काय भांडण वगैरे झाली तर केवढ्यात पडेल ते????"
माझा आपला मध्यमवर्गीय संस्कारी जीव कळवळून चालला होता!

"खरं कारण वेगळं आहे रे..मी त्याला लक्की म्हणते कारण जेंव्हा कधी असं होतं ना तेंव्हा आजी त्याला सांगते की त्याचं आणि तीच लग्न खूप अगोदर झालं आहे! आपला दोघांचं एक भरलं गोकुळ आहे ज्यात मुलं आहेत नातवंडं आहेत!! त्या सर्वांचा सुखाने संसार सुरू आहे!!हे ऐकून आजोबाचा आनंद गगनात मावत नाही ..त्याला विश्वास बसत नाही की एवढ्या म्हातारपणात त्याला जी आवडली तीच त्याची केवळ पत्नी नाही तर मुलं नातवंडं असलेल्या संसाराची भागीदार पण आहे..
मग त्याच सुरू होतं मला किती मुलं आहेत ...आपण त्यांना फोन करूयात ?...मी कित्ती दिवस बोललो नाही त्यांना?.... रागवली तर नसतील.?...मला नातू नाती किती आहेत ..?
मग आजी त्याला सगळ्यांना फोन लावून देते आणि तो ही सगळ्यांना मन लावून त्याच्या म्हातारपणात घडलेल्या पहिल्या (म्हणजे त्याच्यासाठी पहिली) प्रेमकथेचे रसभरीत वर्णन करून सांगतो....शेवट करताना देवाचे आभार मानतो की त्याला जसं हवं होतं तसंच आयुष्य त्याला मिळालं आहे!! आणि रात्री झोपेपर्यंत एका विलक्षण धुंदीत आपलं गेलं काही दशकांच आयुष्य एका दिवसात जगून घेतो बघ तो!!!! " हे सांगताना तिची नजर अजूनही खिडकीच्या बाहेर असणाऱ्या जगात काहीतरी हरवलेलं शोध घेण्याचं काम करत होती.

थोडा वेळ असाच हव्याहव्याशा शांततेत पार झाला अन् मग हळू हळू बाहेर आभाळ पण स्वच्छ व्हायला लागलं....आणि ती माझ्याकडे बघत मला म्हणाली," तो फार लक्की आहे असं मी त्याला म्हणते ह्याच कारण हे नाही की त्याला सकाळी सगळं विसरायला होतं अन मग त्याला साथ देणारी त्याची पत्नी किंवा त्याचा परिवार आहे . माझ्या साठी हे महत्वाचं आहे की रोज रात्री झोपी गेल्यावर तो मागचं सारं आयुष्य विसरून सकाळी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून उठतो आणि पुन्हा फिरून आजीच्याच प्रेमात पडतो ...त्याची विस्मृती त्याच्या प्रेमाच्या आड येत नाही.... कविता,पुस्तके फार वाचलीस आहेस तू पण...मी पण....मला सांग कोणत्या कथेत नायकाला असं रोज नव्यानं प्रेमात पडायचं अन ते प्रेम साध्य करायचं भाग्य मिळतं....देवाने त्याची स्मृती भले हिरावून घेतली असेल पण शतजन्माचे प्रेम एकाच जन्मात त्याला दिलं आहे ......ते ही आयुष्याच्या अशा सांजवेळी जेंव्हा माणसं गलितगात्र होऊन खाटेवर खिळून आयुष्याच्या अतृप्त इच्छांचा हिशोब लावत अखेरच्या घटका मोजत असतात!!! तेंव्हा तो रोज नव्याने आयुष्य जगतो!!! हे भाग्य त्याला मिळालं आहे म्हणून मी त्याला लक्की म्हणते!!!!!"
बाहेरचं आभाळ आता निरभ्र स्वच्छ झालं होत... पाडगावकरांचे "ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे !" ह्या ओळी ती स्वतः शीच गुणगुणत असताना तिला पाहताना मला मात्र चार भिंतीमध्ये असून सुद्धा सर्वांगावर सरींचा शिडकावा झाल्यासारखं वाटायला लागलं होतं!!!!!!

© (एस.बी)

kathaa

प्रतिक्रिया

सरिता बांदेकर's picture

15 Jun 2021 - 5:14 pm | सरिता बांदेकर

मस्त तरल कथा .

एस.बी's picture

15 Jun 2021 - 7:47 pm | एस.बी

धन्यवाद!!!!

गुल्लू दादा's picture

15 Jun 2021 - 5:15 pm | गुल्लू दादा

आवडलं. याच आशयाचा चित्रपट पाहिल्याचं आठवतंय पण नाव विसरलो. धन्यवाद.

एस.बी's picture

15 Jun 2021 - 7:48 pm | एस.बी
एस.बी's picture

15 Jun 2021 - 7:48 pm | एस.बी
एस.बी's picture

15 Jun 2021 - 7:48 pm | एस.बी
एस.बी's picture

15 Jun 2021 - 7:52 pm | एस.बी

आठवलं की नक्की सांगा!

यश राज's picture

15 Jun 2021 - 8:27 pm | यश राज

कथा आवडली

बहुतेक त्यांना "फर्स्ट ५० डेट्स" हा सिनेमा म्हणायचे आहे. खुप सुन्दर सिनेमा आहे.

एस.बी's picture

15 Jun 2021 - 8:34 pm | एस.बी

धन्यवाद यशराज....

विजुभाऊ's picture

17 Jun 2021 - 10:43 am | विजुभाऊ

गोजिरी

चौथा कोनाडा's picture

15 Jun 2021 - 5:40 pm | चौथा कोनाडा

व्वा ! किती हळूवार !
क्लासिक !!! लव्हली
💖

एस.बी's picture

15 Jun 2021 - 7:49 pm | एस.बी

मनापासून आभार!!!

गॉडजिला's picture

15 Jun 2021 - 7:37 pm | गॉडजिला

भारतीय नातीच्या नजरेतुन....

एस.बी's picture

15 Jun 2021 - 7:49 pm | एस.बी

खरं आहे!

प्रमोद देर्देकर's picture

16 Jun 2021 - 8:01 am | प्रमोद देर्देकर

मस्त कथा. हळुवार शिडकावा झाल्यासारखी.

एस.बी's picture

16 Jun 2021 - 12:58 pm | एस.बी

धन्यवाद प्रमोदजी!