दोसतार - ३२

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
10 Jan 2020 - 7:36 am

डिटेक्टीव्ह घंटाकर्ण बरोबर होता. आम्ही तीघांनीही एकमेकांकडे पाहिले हसलो. हाताची घडी घातली तोंडावर बोट ठेवले. आळी मीळी गुप चिळी करत वर्गाकडे चालू लागलो.

मागील दुवा http://misalpav.com/node/45891
शाळेत कसले ना कसले कार्यक्रम साजरे होतच असतात. त्याला दिन म्हणतात. कधी कसला दिन तर कधी कसली पौर्णिमा कधी कुणाची जयंती .
निमीत्त काहिही असो कार्यक्रम ठरलेला असतो. सकाळी गेट जवळच्या मुख्य फलकावर आज काय आहे ते लिहीलेले असते. समजा जयंती वगैरे असेल तर ज्यांची जयंती असेल त्यांचा फोटो, त्याला हार . फलकावर त्यांनी लिहीलेले एखादे वाक्य , म्हणजे सुभाषचंद्र बोस असतील तर "तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा", महात्मा गांधी असतील तर " निर्भय बनो" डॉ बाबासाहेब आंबेडकर असतील तर " शिका संघटीत व्हा" कर्मवीर भाउराव पाटील तर असतील तर" स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद " बापुजी साळुंखे असतील तर " ज्ञान विज्ञान आणि सुसंकार यासाठी शिक्षण प्रसार" असले काहितरी वाक्य लिहीलेले असते. त्याला बोध वाक्य म्हणतात असे सोनसळे सरांनी एकदा सांगीतले होते
"आपणही असले एखादे वाक्य ठरवायला हवे " टम्प्याच्या डोक्यात आता एक बोध वाक्य सुरु होत होते.
" पण कशासाठी" एल्प्या
"कशासाठी म्हणजे उद्या समजा जर आपला फोटो कुठे ठेवला तर कोणीतरी ते लिहायला नको फोटो खाली? " टंप्या.
" आमच्याकडे मोठ्या खोलीत आजोबांचे आज्जीचे आणि आजोबांच्या वडीलांचे आईचेफोटो आहेत फ्रेम करुन लावलेले. त्याखाली फक्त तारखा आहेत. जन्म आणि मृत्यूच्या. आज्जीच्या आणि आजोबांच्या आईच्या फोटो खाली तर फक्त मृत्यूची तारीख आहे. जन्म तारखा नाहीतच. त्यांनी काय आयुष्यभर कधी काही म्हंटलेच नसेल का. " एल्प्या . "
" तुझे आजोबा पाहिलेत मी, कसले रागीट होते ते. त्यांचं बोध वाक्य एकच. गप्प बसा, दंगा कराल तर ही काठीच घालतो पाठीत " टंप्याने एल्प्याचे आजोबा पाहिले होते त्यामुळे तो त्यांच्याबद्दल बोलू शकत होता.पण पाठीत काठी हे असले काही बोध वाक्य कधी कुठे वाचलेलं नाही. पण प्रत्येक आजोबांनी हे वाक्य म्हंटलेलं असेलच की. "
" काहीतरी बोध वाक्य हवे …. " टंप्याला बोध वाक्य हवेच होते.
" काय असणार आपले बोध वाक्य. ही मोठे माणसे जो विचार करायची ते सांगायची ते त्यांचे बोध वाक्य ." कुठेतरी ऐकलेलं वाक्य एल्प्याने लक्ष्यात ठेवलं होतं. " आपण जे रोज बोलतो ना त्यातलेच एखादे वाक्य आपले बोध वाक्य होऊ शकेल"
" पण बोध वाक्य म्हणजे ज्यातून बोध घेता येतो असे वाक्य" सोनसळे सरांनी बोधवाक्य चा तो बहुव्रीही की कसलासा समास सोडवला म्हणून पैकीच्या पैकी मार्क दिले असते.
" ओ समास आम्ही पण सोडवतो. पण तो मराठीच्या तासाला " समास म्हंटले की टम्प्याला वेगळंच आठवते. शास्त्राच्या तासाला सरांनी त्याचा पेपर भर वर्गात वाचून दाखवला होता. अर्थात टंप्याची त्यात चूक नव्हती. संधीपाद प्राणी या शब्दाचा अर्थ त्याने संधी म्हणजे जोड असणारे पाय या ऐवजी संधी साधून पादणारे प्राणी असा लिहीला होता. आणि उदाहरण म्हणून पादन किडा पेंगूळ. उदाहरण बरोबर पण व्याख्या चूक म्हणून सरांनी त्याला उदाहरणाचा एक मार्क दिला होता.
"पण मग आपल्या फोटोखाली काय लिहीतील."
"लिहीतील की जास्त अभ्यासाची आवड म्हणून आठवीच्या वर्गात दुसर्‍यांदा बसले म्हणून " टंप्याच्या या टोमण्यावर एल्प्याकडे उत्तर नव्हते.
"आपल्या फोटोखाली लिहीतील " अभ्यासू मुले " म्हणून फोटोखाली लिहीताना त्यांनी जन्मात काय चांगले केले ते लिहीतीत. आणि तेही मोठेपणी काय चांगले केले त्या बद्दल आपण तर अजून लहान आहोत"
" मग हा विचार करायला अजून लै टाइम आहे आपल्याला. आत्ता कशाला करतोय " एल्प्याने टंप्याच्या त्या बोधवाक्याची चर्चा संपवली.
आम्ही चर्चा करायला लागलो म्हनजे कशातुन काय निघेल आणि चर्चा कुठे जाईन ते कुणालाच सांगता येत नाही. इतर कुणाला कशाल आमाला पण नाही येत सांगता. म्हणजे बघा समजा चर्चा काळी कुत्रीवरून झाली तर ती अचानक बादली भरून शाई आणि भले मोठे पेन घेवून येणारा सर्कशीतला विदूषक , हत्ती चे सर्कसमधील काम, वजन काटा , एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड , वांग्याच्या भाजीपेक्षा भरीत जास्त शक्तिदायक कसे, वांगीभात करणारी सत्याची चिपळूणची काकू, आंदमान मधले आदिवासी ….. एका चा दुसर्‍याशी काहिही संबन्ध नसतो. पाटणच्या आज्जीने जर या चर्चा ऐकल्या असत्या तर ती म्हणाली असती की " काय गोल मेज परिषद चालवलीये रे. कोणताच निर्णय न घेता नुसत्याच या विषयावरून त्या विषयावर होणार्‍या गप्पां म्हणजे तीच्या मते ती गोलमेज परिषद चाललीये.
इतिहासात एक गोलमेज परिषद होती. गांधीजी त्या परिषदेला गेलेल होते. पण तिथे त्यांनी अशी चर्चा केली असेल हे पटत नव्हते. अर्थात हे विचारायचे म्हणजे शाळेत फेमस व्हायचे. आणि वर्षभर " गोलमेज परिषद" नाव पाडून घ्यायचे.
बरे झाले ,एल्प्याने आमची गोलमेज परिषद संपवली.
"आपल्याला शाळेत शिक्षक दिन साजरा करायचे ठरवले आहे. " सोनसळे सरांनी वर्गात घोषणा केली. " शिक्षक दिनानिमीत्त आपण काहितरी वेगळे करायचेय. जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करायचाय. तुम्हाला काय वाटतय कसा साजरा करुयात शिक्षक दिन."
"नवे कपडे घालून येवूया सगळे. गोळ्या वाटूया" ही असली सूचना आपी शिवाय दुसरे कोणी करूच शकले नसते.
" गोळ्या नकोत तिळच्या वड्या आणु घरून. डब्यात भरून. तेच वाटू. " वैजुची उपसूचना.
" नाहीतर सर त्या दिवशी खो खो च्या मॅचेस ठेवूया. प्रत्येक तुकडीची एक एक टीम आख्खी शाळा सहभागी होईल त्यात" सुन्याला खोखो म्हणजे जीव की प्राण. त्याच्या कंपासात वर्तमान पत्रातला महाराष्ट्राच्या टीम चा खेळतानाचा फोटोही आहे.
" ए ए ए प्रत्येक वर्गाची एकच टीम कशाला . मग आम्ही मुलींनी काय करायचं? त्युमच्यात खेळायचं? ते काही नाही ,आमची मुलींची वेगळी टीम हवी .
"पण शिक्षक दिनाचा खोखो शी काय संबन्ध ?" चंदूचे म्हणणे रास्त होते. शिक्षक कुठे काय खोखो खेळतात का?
" मग त्यापेक्षा असे करुया सरळ सुट्टीदेऊया" ही आयडीया बरी होती. पण कुणी सुचवली तेच समजले नाही. बहुतेक परशुराम ने तोंड हाताने झाकत केली असावी.
" शिक्षक दिना बद्दल कोणाला माहीत आहे?" सोनसळे सर आमच्या सूचना ऐकत होते. वर्गाला सुट्टी द्यायचा मुद्दा आला त्यावर सगळेच खूप हसले.
" शिक्षक दिन म्हणजे सर्व शिक्षकांचा दिवस. " बाल दिन जसा मुलांचा दिवस तसा शिक्षक दिन म्हणजे शिक्षकांचा दिवस."
" या दिवशी सर्व शिक्षकांना गोळ्या चॉकलेट देतात. त्यांचे लाड करतात" शर्मिलाने बाल दिनाचा निबंध शिक्षक दिनाला चिकटवला.
" एहेरे ….. शिक्षकांचे कोणी लाड करतेका? लाड लहान मुलांचे करतात" पम्याने बोलायची संधी बरोब्बर साधली. माझ्या डोळ्यापुढे प्रत्येक विद्यार्थी पुढे येवून शालाप्रमुख सरांचा गालगुच्चा घेवून जातोय असे चित्र येवून गेले.
" सांगा सांगा . अजून काही सूचना असतील तर सांगा" सोनसळे सरांची आज्ञा शिरसावंद्य मानत शिक्षक दिन कसा साजरा करायचा याची चर्चा सुरू झाली

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

शशिकांत ओक's picture

13 Jan 2020 - 11:12 pm | शशिकांत ओक

मजेदार लेख.
मला आठवते माधवनगरच्या सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशभागात रोज शेणसडा घालून नवनवीन बोधपर वाक्ये रांगोळीने लिहायला गट पाडून काम दिले जात असे. हस्ताक्षर यथातथा, रांगोळी रेखन अशक्य अशा मुलांना बोधवाक्याची शोधाशोध करावी लागे. त्यात आमचा नंबर असे. तेंव्हा वि. स. खांडेकरांच्या कादंबर्‍यातील वाक्ये टाकायला सोईची वाटत...

विजुभाऊ's picture

22 Jan 2020 - 6:34 am | विजुभाऊ

_/\_