मैत्र..
अगदी अचानक काहीच न कळवता आपण मित्राच्या घरी धडकावं.
त्याने दरवाजा उघडताच त्याला बाजूला सारून आत शिरावं.
चपला पर्स फेकून खिडकीजवळच्या मऊ गुबगुबीत माऊसारख्या खुर्चीवर धप्पकन बसावं.
आपलं अगडबंब वाढलेलं वजन, परीटघडीच्या ड्रेसला पडणा-या चुन्या, खांद्यावरून डोकावत असलेला किंवा नसलेला चुकार पट्टा कसला कसला विचार मनात येऊ देऊ नये तेव्हा.
"तुझीच आठवण काढली होती मी आज बघ डेविलिणबाई" म्हणत हसत त्यानं ग्लुकोज बिस्किटं आणि पाण्याचा ग्लास पुढे करावा.
खरंतर मनात खुश होत पण वरवर "चल् काहीही खोटं" म्हणत त्याला उडवून लावावं.
अगं हो, तुझ्या आवडीची शेवळाची भाजी केलेली हिने तेव्हा तुझी आठवण आलेली. त्याच्या शब्दातलं सत्य डोळ्यातून ओळखू यावं.
(त्याची "ही" ऑफीसला असणार हे आपल्याला नक्की माहित असावं)
"मग? काय म्हणतेस?" त्याने आपल्या समोर फतकल मारून बसत विचारावं.
"काही नाही मज्जेत!" तोंडभर हसत आपण उत्तर द्यावं.
त्यानं तसंच आपल्याकडं पहात बसावं, विस्कटणा-या डोळ्यांनी.
"ग्रेस वगैरे वाचलास की नाही हल्ली?"
"हा हा , बिझी इन बीईंग ग्रेसफुल" आपण फालतु पीजे मारावा.
त्यावर न हसता, चाचपडणा-रया नजरेनं तो आपल्याकडंच पहातोय हे जाणवताच आपणही न फुटणारं हसू आवरावं.
"मुलं काय म्हणतायत?"
मस्त मजेत. पंख फुटलेत त्यांना. आपण चिवचिवावं.
"यंदाच्या पावसात भिजलीस की नाही?" त्यानं खोडकर पणं विचारावं.
"देव बाभळी बघितली वाटतं?" आपण प्रश्नाला प्रश्नानं काटावं.
"Btw त्या दिवशी हरिप्रसादजींची मैफल काय रंगली होती सांगू"
आता हसण्याची पाळी त्याची असावी.
"गोविंदाची गाणी ऐकणारी तू , हरिप्रसाद कधीपासून enjoy करायला लागलीस?"
किती म्हणून हसण्याचा प्रयत्न केला तरी डोळे वाहू लागावे. कारण आपल्यालाही समजू नये.
"काय झालं" म्हणत त्याने हलके हात हातात घ्यावा. हळुवार थोपटावं.
त्या थोपटण्याच्या लयीत मनातला अव्यक्त संभ्रम, मळभ आपोआप निघून जावं.
ओठांवर पुन्हा सावरीचं हसू फुलावं.
तेव्हाच्या त्या स्पर्शात निव्वळ माया असावी. नजर नीतळ असावी.
मग इकडच्या तिकडच्या गप्पा , चिडवाचिडवी जोक यात वेळ भुर्रकन उडून जावा.
अरे बापरे उशीर झाला म्हणत आपण मोकळ्या हलक्या मनानं तिथून लगबगीने निघावं.
"अरेच्चा तो कसाय विचारायचं राहूनच गेलं की. वय झालं खरं आपलं." हा विचार मनात येईतो घरी पोचलेलं असावं.
कुकर लावायचाच, भाजी कसली करावी बरं या विचारात तोही विचार हरवून जावा.
असं मैत्र लाभायला भाग्य लागतं.
आणि जर चुकून कधी गवसलंच तर त्याला कध्धी कध्धी हरवू देऊ नये.
निव्वळ अप्रतीम
धन्यवाद.
वा! खरच खुप सुरेख.
खरंय , असेच मोती हातून निसटून
मस्त..
:)
मस्त
धन्यवाद.
मोकळ आणि सुरेख
धन्यवाद आणि तुमच्या इतर
वाह!!
किती सुंदर प्रतिसाद आहे!_/\_
सुंदर!!
धन्यवाद.
धन्यवाद.
आवडलं.
उत्कृष्ट
White rose...