जेष्ठ गझलकार श्री. घनश्याम धेंडे यांचे दुःखद निधन

psajid's picture
psajid in काथ्याकूट
15 Apr 2017 - 12:50 pm
गाभा: 

आज दैनिक लोकमत मधील एक बातमी वाचून खूप वाईट वाटले काल म्हणजे शुक्रवार दि. १४ एप्रिल २०१७ रोजी जेष्ठ गझलकार श्री. घनश्याम धेंडे यांचे दुःखद निधन झाले. त्यांचे 'बासरी' व 'तहानलेलं तळे' हे दोन मराठी गझलसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. गझल लेखनातील हझल, गीत, विडंबन, लावणी इत्यादी प्रकारामध्ये विपुल लेखन त्यांनी केले आहे. त्यांनी पणजी येथे झालेल्या सहाव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते.
अनेकदा मला त्यांना व्यासपीठावर प्रत्यक्ष गझल वाचताना ऐकण्याचे भाग्य मिळाले. त्यांच्या निधनाने साहित्यक्षेत्राची कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
त्यांनी १४ ऑगस्ट २०१६ मध्ये दैनिक 'सकाळ' च्या 'सप्तरंग' मध्ये "अशी बोलते माझी कविता" या सदरामध्ये प्रकाशित झालेली "विठो माउली" ही गझल त्यांच्या श्रद्धांजली मध्ये प्रकाशित करीत आहे.
- साजीद पठाण

विठो माउली...

भक्त, भागवत, वारकऱ्यांतिल तूच नाळ व्हावे
विठोमाउली, तव कुशीत मी पुन्हा बाळ व्हावे !

तव पायाशी वीटही होणे नसेल नशिबी जर का
मृदंग, वीणा, अबीर, चिपळ्या, झांज, टाळ व्हावे

लेखणीत उतरावी प्रतिभा ज्ञानदेव, तुकयाची...
कविता, गाणे अभंगापरी बहुरसाळ व्हावे

आषाढी-कार्तिकीस जाता पायि पालखीसंगे...
मीपण माझे सोहळ्यामधे त्या गहाळ व्हावे !

आत्म्यावरले वसन भर्जरी गळुन पडावे बाप्पा !
गळ्यात तुझिया भावभक्तिची तुळशिमाळ व्हावे

वारकऱ्यांसह नाचू दोघे वाळवंटि भिवरेच्या
तप्त वाळुच्या नुपुरांचे मम पदी चाळ व्हावे

वावरात मी राबावे, तव अभंग-ओव्या गाता
कृषीवलाच्या नांगरासही मीच फाळ व्हावे

तुझ्या कृपेने सरून जावो अंधकार अंतरीचा
होनाजीच्या भूपाळीतिल मी सकाळ व्हावे

महापुरे झाडेही जाती, ज्ञात विठ्ठला, मजला
कवितारूपे उरावयाला मी लव्हाळ व्हावे

पंख छाटले तरी वाटते घ्यावी उंच भरारी
इवल्याशा घरट्याचे माझ्या अंतराळ व्हावे

- घनश्‍याम धेंडे, पुणे

प्रतिक्रिया

विनिता००२'s picture

15 Apr 2017 - 1:12 pm | विनिता००२

भावपूर्ण श्रद्धांजली ___/\___

अ भा मराठी साहित्य संमेलनात त्यांना ऐकण्याचा योग आला होता.
सादरीकरणातला खट्याळपणा फार हसवून गेला होता.

अनुप ढेरे's picture

16 Apr 2017 - 12:13 pm | अनुप ढेरे

श्रद्धांजली!
दिलेली गझल फारच सुंदर आहे.

पैसा's picture

16 Apr 2017 - 12:29 pm | पैसा

भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Apr 2017 - 1:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भावपूर्ण श्रद्धांजली

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2017 - 5:56 pm | चौथा कोनाडा

GD1<

धेंडे साहेबांच्या कविता/गझल ऐकण्याचा योग चार-आठ वेळा आला होता.
सुंदर सादरीकरण असायचे. उच्च वर्तुळात प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा साध्या-छोट्या, छोट्या संमेलनातून सादरीकरण्यावर त्यांचा भर होता.

आषाढी-कार्तिकीस जाता पायि पालखीसंगे...
मीपण माझे सोहळ्यामधे त्या गहाळ व्हावे !

खुपच सुंदर !

या कलंदर शब्दकारास पु:न एकदा भावपूर्ण श्रद्धांजली !