शरण तुला भगवंता...
शहराच्या जरासं बाहेर असलेलं विठ्ठल मंदिर. थोड्याशा उंच टेकाडावर असलेलं. मोजून पंचाहत्तर पाय-या चढून भक्ताचा आत प्रवेश होणार. मंदिर मूळचं दगडी. ब्रिटिश काळात कुणा हौशी भक्तानं बांधलेलं. पण आता त्याला ब-यापैकी रंगरंगोटी, कुंपण, छोटीशी बाग वगैरे करण्यात आली होती. परिसर जरा ब-यापैकी दिसायला लागल्यावर या देवळाकडे संध्याकाळची भक्तगणांची, हौशी कुटुंबांची वर्दळ वाढू लागली. त्याचबरोबर पाय-यांवर भिक्षा मागण्यासाठी काही म्हातारे, अनाथ-अपंग, बेघर लोक हे देखील बसू लागले. यापैकीच एक भागीबाई.
भागीबाईचं मूळ नाव भागीरथी. वय असावं ऐंशी. भागी मूळची इथली नव्हे. कधीतरी स्वतःच्या घरात राहणारी विधवा बाई होती ती. तरण्याताठ्या पोरानं कर्जबाजारीपणाला घाबरून आत्महत्या केली. खचलेली सून व दोन सशासारखी गोजिरी नातवंडं तिनं सुनेच्या माहेराला धाडून दिली. सुनेचा आमच्याबरोबरच रहा, हा आग्रह तिनं कणखरपणे मोडून काढला. सगळं जिकडचं तिकडं झाल्यावर म्हातारीनं एके दिवशी कुणालाही न कळता आपल्या घराला कुलुप लावलं आणि एका शेवटच्या प्रवासाला निघाली.
******
या ठिकाणी रुळायला भागीला पहिल्यांदा त्रास झाला. पाय-यांवर अगोदरपासूनच बसत असलेल्या भिक्षेक-यांना नवीन वाटेकरी नको होते. पण भागी जेव्हा तिच्या आर्ततेने भरलेल्या आवाजात ‘शरण तुला भगवंता’ गाणे आळवू लागली, तेव्हां सर्वांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. अनेक वर्षे कोंडलेल्या व्यथा वेदना अश्रूंचे रूप घेऊन घळाघळा गालावरून ओघळू लागल्या. त्यानंतर तिला पुन्हा कुणी तुसडेपणाने वागवलं नाही. भागी त्यांच्यातीलच एक होऊन गेली.
इथे भागीचा दिनक्रम ठरूनच गेलेला होता. सकाळी दहा वाजल्यापासून पायरीवर बसून रहायचं. भकास मुद्रेनं. कधीतरी अंगात जीव असेल तेव्हाच भागी अगदी आर्ततेने ‘शरण तुला भगवंता’ आळवीत असे. येणा-या जाणा-या लोकांपैकी काहीजण आपापल्या ऐपतीप्रमाणे पैसे, रुपये टाकत असत. काहीकाही तिरस्काराच्या नजरा किंवा बोलणीही अधूनमधून वाट्याला येत असत. भागी त्यावर गप्प बसत असे.
कधीकधी अगदी गम्मत होत असे. एखादा गोरागोमटा बाप्या त्याच्या गब्बू गब्बू लेकराला घेऊन येत असे. पोरगं अतिशय अवखळ. बापाच्या नाकी नऊ आणणारं. मग बाप त्याला भीति दाखवायला म्हणत असे, बघ हं? असा दंगा केलास तर त्या म्हातारीकडे देऊन टाकीन तुला. मग भीतिने गांगरलेलं ते पोरगं गाल फुगल्याने आणि डोळे मोठे झाल्याने अजूनच गब्बू गब्बू दिसत असे. भागीला अशा वेळेस आपल्याही नातवंडांची आठवण येत असे. पण ती आठवण प्रयत्नपूर्वक पुसायला ती आता शिकली होती.
कालचक्र असंच निर्दयपणे चालत राहिलं. त्याला कुणाच्या सुखदुःखांची फिकीर नव्हती. दुःखी जीवांसाठी लवकर धावावं आणि सुखी जीवांसाठी हळूहळू, हा भेदभाव त्याच्याकडे नव्हता. असो, त्या वर्षीची देवप्रबोधिनी एकादशी होती आज. देवळात भरपूर गर्दी होणार होती. सर्व भिक्षेकरी मंडळी मोठ्या अपेक्षेने बसलेली होती. एखादी नवीन शाल किंवा पांघरूण घेण्यापुरते पैसे मिळाले तर फारच उत्तम. येत्या हिवाळ्यात सोय तरी होईल.
पण भागीचं काही सकाळपासून चित्त था-यावर नव्हतं. काहीतरी वेगळंच वाटत होतं आज तिला. त्यात जोडीला वर मळभही दाटून आलेलं. दुपारनंतर भुरभुर पाऊस पडायला सुरुवात झाली. एक प्लॅस्टीकचा तुकडा डोक्यावर घेऊन भागी तशीच गपचिप बसून राहिली. हे काय होतंय काही कळत नव्हतं. समोर पैसे पडलेत की नाहीत याचं देखील भान नव्हतं तिला. कुण्या आनंदी माणसाने पाय-यांवर बसलेल्या सर्व भिक्षेक-यांना लाडू वाटलेले होते. भागीच्या समोर ठेवलेला लाडू एका भटक्या गायीनं खाल्ला, तरी भागीला त्याचं काहीच वाटलं नाही.
पाऊस थोडासा वाढला, तशी पाय-यांवरची वर्दळ आडोशाला पळाली. गजबजलेल्या पाय-यांवर एकदम सामसूम झाली. अचानक भागीला कुणीतरी तिच्या दिशेनं येताना दिसलं. कोण असेल हा? या क्षणाला तरी मला काहीच नकोय. आणि हा का येतोय माझ्याकडे?
तोः भागीरथी! ऊठ, मी तुला घेऊन जायला आलोय.
आश्चर्याने भागी तिच्या दुबळ्या थरथर कापणा-या पायांवर उठली. डोळ्यांवर हाताचा आडोसा करून किलकिल्या नजरेने त्याच्या चेहेर्याकडे बघू लागली. सावळा रंग. कपाळाला उभा गंध. डोक्यावर साधी पगडी. प्रेमाने, करुणेने भरलेले डोळे.
तोः आता परत यायचं नाही बरं का इथे. या सगळ्या दुःखांचा वेदनेचा शेवट झालाय. मी तुला माझ्यापासून दूर कुठेच जाऊ देणार नाही आता.
भागीला काय बोलावं, काय करावं काही सुचतच नव्हतं. त्याने पुढे केलेल्या उबदार, मऊशार हातात तिने आपला दुबळा, अस्थिपंजर हात दिला………
भागीची निष्प्राण कुडी पाय-यांवर कोसळली. मागे एकच कल्ला झाला, “आरं, म्हातारी गेली वाटतं.”
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
पांडुरंग हरि...!
कथा छान आहे. थोडी चटका लावून
मस्त आहे
छान
सुरेख!
सायुज्यता.... _/\_
तुम्हीही संवेदनशील आहात तर..
आवडली कथा.
...
....
कथा आवडली.
किती तरल
काळजाला भिडले शब्द.....
लिहिलंय अगदी जबरदस्त, पार
छान लिहिलय
:(
+१
खूप छान!
याचसाठी केला होता अट्टाहास,
पार काळजाला भिडणारंलिहिलंय
देह प्रारब्धावर सोडुन द्यावा
शेवटच्या ओळी धूसर झाल्या.....
कथा आवडली
सर्व वाचक व
वाह...
आवडली,
राजे !!
सुंदर. किती छान
मांत्रिक, हद्यस्पर्शी कथा
जय हरी विठ्ठल
मांत्रिक महाराज नाव वाचून