चाँदसिंग बुलू..........एक लघुकथा.

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
6 Apr 2015 - 8:05 pm

चाँदसिंग बुलू........

सकाळीच अफजलचा दिल्लीहून फोन आला.

‘औलीयाभाई रामराम !’

‘हां बोला औलियाखान सलाम !’

‘बुरकासाब (बुरका म्हणजे प्रमुख) एलोराला येणार आहे ना संमेलनाला ?’

‘म्हणजे काय ! येणार तर !’

‘माझ्या मुलाला तुमच्याच हातून दिक्षा द्यायची आहे, आठवण आहे ना?’’

‘अफजल ते तर लक्षात आहेच पण साधू बुलूला तो कसला कागद सापडला आहे त्याचे वाचनही करायचे आहे हे लक्षात ठेव.’

‘ हो ! हो! ते तर आहेच बुलूसाब’

आमचा बुलू समाज तसा फार जूना नाही पण आहे अत्यंत सधन. असे म्हणतात ब्रिटिशांच्या काळात आमचा मूळपुरुष ब्रिटिशांच्या सैन्यात काही कारणाने भरती झाला व त्याने मगदाला येथे थिओडर राजाविरुद्ध झालेल्या कारवाईत भाग घेतला. त्यावेळी जीवावर उदार होऊन त्याने गाजविलेल्या शौर्यावर कंपनी सरकारने पदक व बढतीही दिली होती. पण त्या अगोदर तो एका ठगाच्या टोळीत सामील होता व नंतर एक नामांकित ठग झाला. मुख्य म्हणजे ठगांची परंपरा, धंदा हा त्याच्याच कृपेने चालू राहिला आहे हे कोणीही मान्य करेल.

अर्थात आमच्या धंद्याचे स्वरुप काळानुसार पुष्कळच बदलले आहे. आता कोणी रस्त्यावर वाटमारी करत नाही ना रुमाल फेकत. आता शक्यतो आर्थिक वाटमारीवर आमची जमात जास्त लक्ष देते. म्हणजे बघा आमच्यातील एकानेच सत्यम बुडविली. म्हणजे मालक होता राजू पण त्याचा आर्थिक सल्लगार होता एक बुलूच. मोठमोठ्या आर्थिक घोटाळ्याच्या मागे कोणीतरी बुलू असतोच असे आमच्या मेळाव्यात मोठ्या विनोदाने म्हटले जाते. विनोद सोडल्यास एक मात्र सांगतो, जेथे घोटाळा होणार आहे असा नुसता वास जरी बुलूंना लागला तरी त्याचा फायदा उपटण्यास कोणीतरी बुलू तेथे पोहोचतोच. म्हणजे जरी त्या गडबड घोटाळ्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरीही त्यातून पैसे उकळता येतातच. मिळालेल्या पैशाच्या दोन टक्के भाग प्रत्येक बुलू त्याच्या संघटनेला देतो.

गुप्तता पाळणे हे आमच्या समाजाच्या रक्तातच भिनले आहे. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्याकोताऱ्यापर्यंत गुप्तता पाळली जाते. बुलू एक वेळ प्राण देईल पण गुपीत फोडणार नाही. बुलूंची लग्ने बुलूंशीच होतात त्यामुळे आमच्या समाजाची वस्त्रवीण अगदी घट्ट आहे. आम्ही ठगांची पारंपारिक भाषा वापरतो. त्याचा अर्थ तुम्हाला वाटतो तो नसतो. उदा. पहिल्यांदा समोरचा ठग आहे हे कसे ठरविणार ? त्यासाठी त्याला चुकीच्या नावाने हाका मारले जाते. उदा. औलिया. समोरच्याने योग्य प्रतिसाद दिल्यावर पुढचे संभाषण सुरु होते. तोपर्यंत नाही.

ज्याने रामायण रचले त्या वाल्मिकीला आम्ही आमचा पूर्वज मानतो. आमच्या घरी वाल्मिकीची पुजा केली जाते, रामाची नाही. अठरापगड जातींच्या माणसांनी ठगीचा व्यवसाय स्वीकारल्यामुळे आमची नावे मोठी मजेशीर झाली आहेत. उदा. आमच्या घराण्यात मी आहे बारु बुलू तर माझा भाऊ आहे सलीमखान बुलू. कोणाचेही काही अडत नाही. पैसा माणसाला एकाच पातळीवर आणतो यावर आमच्या जमातीचा दृढ विश्र्वास आहे. एक बुलू दुसऱ्या बुलूला स्वत:च्या प्राणाची किंमत देऊनही वाचवतो. तशी आम्हाला शपथच घ्यावी लागते. उदा. द्यायचे झाले तर एका खटल्यात जो एका न्यायालयात ब्रिटिशांच्या काळात चालला होता त्यात आरोपी होता बुलू. त्याने कोणाचा ततरी खून केला होता. त्याच्या नशिबाने न्यायाधीशही बुलू होता. अर्थात खटल्याचा निकाल काय लागला असेल हे सांगण्याची गरज नाही. बुलूंना दुसरे नाव घेऊन समाजात वावरायची पूर्ण मुभा असते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या समोरचा बुलू आहे की आणखी कोण हे समजणे जवळजवळ अशक्यच. आता आम्ही आमच्यातील माणसाला कसे ओळखतो हे मी सांगू शकत नाही पण तशी गरज पडत नाही कारण आमच्यातीलच एकाने आता जमातीतील ठगांचा डाटाबेस तयार केला आहे व त्यात प्रत्येकाला एक टोपण नाव आहे. जमातीचे जमलेले पैसे सफेद करण्यासाठी आता आमच्याकडे तज्ञपण आहेत. अर्थात तेही आमच्या जमातीतलेच आहेत. आता आम्ही मुडदे फार कमी प्रकरणात पाडतो. याचा अर्था असा नाही की आम्ही ते काम करत नाही. करतो पण अनिच्छेने, फारच जरुरी असल्यास. असो.... आमच्या जमातीबद्दल एवढी माहीती सध्या पूरे त्याबद्दल मी परत केव्हातरी सांगेन.

माझे नाव आहे बारु बुलू. बारु हा आमच्या भाषेतील एक शब्द आहे. त्याचा अर्थ सांगायचा म्हणजे सेलिब्रेटी.... अर्थात ज्याचे नाव हे आहे त्याला समाजात भरपूर मान असणार ही ओघाने आलेच. उद्या रात्री एलोराला जायचे आहे. औरंगाबादला ताजमहलमधे एक हॉल घेतला आहे संमेलनासाठी. नंतर दुसऱ्या दिवशी एलोराच्या देवळाला भेट व पूजा. त्याच संध्याकाळी बरतोतीचा कार्यक्रम त्यानंतर परत असा कार्यक्रम ठरला आहे. आमचे हात इतके वरपर्यंत पोहोचले आहेत की ताजमहलमधे त्या हॉलमधे त्या दिवशी अन्न आमच्या ताब्यात देऊन तो हॉल बंद करण्यात येईल. सर्व व्हिडिओ कॅमेरे काढून टाकण्यात येतीलच. विमानांनी जे बुलू येणार आहेत त्यांना आणण्यासाठी खास काळ्या काचांच्या गाड्या तयार ठेवण्यात येतील. हे सगळे नेहमीच दरवर्षी होत असते यात विशेष काही नाही. हा सगळा कार्यक्रम वर्षातून एकदा होतच असतो.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक एक करुन जमण्यास सुरुवात झाली. एकंदरीत सगळे मिळून छपन्न बुलू जमले होते. हॉल आमच्या ताब्यात आल्यावर मी माझी सुटकेस उघडली व टेबलावर त्यातील वस्तू कढून ठेवण्यास सुरुवात केली. कुदळीची सोन्याची प्रतिकृती, बारा महिन्यांची बारा चिन्हे असलेले बारा बुग्ना रुमाल काढले व टेबलावर नीट पसरुन ठेवले. चांदीच्या एका छोट्या घंगाळ्यात किसलेला गुळ व दुसऱ्यात खोबऱ्याचे तुकडे काढून ठेवले. नंतर दुसऱ्या सुटकेसमधून मी एक कालीमातेची मूर्ती काढली. पूर्ण सोन्याच्या असलेल्या या मूर्तीच्या डोळ्याच्या ठिकाणी मात्र काळ्या कवड्या लावल्या होत्या. थोडीशी भितीदायकच होती ती मूर्ती. पण सभासदांना धाक वाटावा म्हणूनच तिचे रुप असे होती असे बुजुर्गांचे म्हणणे होते. हे सगळे नीट मांडल्यानंतर माझ्या मुलाने एक धारधार चमकणारा बोरकी (सुरी) त्या टेबलावर काढून ठेवली.

एका टेबलावर सगळ्यांनी आपापले सेलफोन ताब्यात दिल्यावर स्गळे त्या टेबलाभोवती उभे राहिले. अर्थात आमच्या टेक्निकल टीमने अगोदरच मोबाईल जॅमर चालू केले होते. कालीमातेची प्रार्थना करुन सभेला सुरुवात झाली. सचिव जे काही घडत होते त्याची टिप्पणे काढत होता. मागच्या सभेचा वृत्तांत वाचून त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर नवीन बरतोतला दिक्षा देण्याचा कार्यक्रम सुरु झाला.

अफजलच्या मुलाला मुख्य टेबलावर आणण्यात आले. तेथे कालीमातेच्या मुर्तीसमोर तो उभा राहिल्यावर त्याच्या मागे मी व दोन दांडगे बुलू उभे राहिले. कोणाला काही कळायच्या आत मी टेबलावरचा एक रेशमी लाल रंगाचा रुमाल उचलला व त्याच्या गळ्याभोवती फेकला. त्याचा जीव घुसमटेपर्यंत आवळला. जेव्हा त्याच्या घशातून आवाज घरघर आवाज येऊ लागला तेव्हा माझ्या रुमालाची पकड मी सोडून दिली व त्याला हाताने मागे ढकलले. मागे जे दोघे उभे होते त्यांनी त्याला अलगद जमिनीवर झोपवले. जीव घुसमटल्यामुळे तो बिचारा जवळजवळ बेशुद्धच झाला होता. त्याला तेथेच टाकून मग मी देवीला नैवेद्य दाखवला. बरतोत शुद्धीवर येण्याआधी मला तो प्रसाद त्याच्या तोंडात घालणे आवश्यक होते. मी तो प्रसाद घेणार तेवढ्यात दोघेजण मला आडवे आले. मी त्यांच्या कपाळावर त्या सोन्याच्या कुदळीने मारण्याचा आविर्भाव केला. हा सगळा त्या विधीचाच भाग होता. मी तो प्रसाद त्या खाली पडालेल्या बरतोतच्या तोंडात घातला व शांतपणे एका कोचावर जाऊन बसलो. दमायचे कारण म्हणजे हे सगळे होत असताना मला सतत काही मंत्रांचा जप करावा लागत होता. हा कार्यक्रम झाल्यावर जेवण व मद्यपान असा कार्यक्रम होता. बऱ्याच रात्री मग आम्हाला कॅमेरे नसलेल्या मार्गाने आमच्या खोलीत सोडण्यात आले.

एलोराच्या डोंगरावर कैलासच्या मागचा जो डोंगर आहे तेथे आतमधे आमचे लेणे आहे. अर्थात आम्ही आता तेथून जात नाही तर मागून जातो. ब्रिटिशांनी वेरुळ ए एस् आय् च्या ताब्यात देण्याआधी आमचे पूर्वज कैलासच्या शेजारच्या लेण्यात जो भूयारी मार्ग आहे तेथून आमच्या लेण्यात उतरायचे. सामान्य जनतेसाठी हा पाण्यासाठी काढलेला रस्ता आहे पण हा नंतर इतका अरुंद होत जातो की शेवटी त्यातून माणूस जाऊ शकत नाही. असे जनतेला वाटते. पण तेथून आत जाता येत होते हे निश्चित. त्यात ठगांच्या रुमाल फेकण्याच्या पद्धतींवर आधारीत शिल्पे आहेत तसेच एक प्रसंगही कोरला आहे. येथेच आज पूजा झाल्यावर आमच्या मूळपुरुषाने लिहिलेला कागदाचे वाचन करायचे आहे.

यथासांग पूजा झाल्यावर साधू बुलूने तो जीर्ण झालेला कागद मोठ्या काळजीने त्याच्या बॅगेतून काढला व माझ्या हातात दिला. थरथरत्या हाताने मी त्याला वंदन केले व सगळ्यांना वाचू का ? असे विचारले.
सगळ्यांनी होकारार्थी मान डोलाविल्यानंतर मी आमच्या आद्य पुरुषाची कहाणी वाचू लागलो.....

मी हे लिहितोय ते माझ्या पुढच्या पिढ्यांची माफी मागण्यासाठी.....

‘‘अमानच्या त्या चटका लावणाऱ्या मृत्युनंतर मी मुंबई इलाख्यास जायचे म्हणून निघालो खरे पण मधे वेरुळात आमच्या लेण्यात जाऊन दर्शन करावे म्हणून मी वेरुळची वाट धरली. वाटेत माझ्या मनात तऱ्हेतऱ्हेचे विचार येत होते. माझ्या तथाकथित बापाने मला कसे फसविले होते हे आता माझ्या लक्षात येऊ लागले होते. एखाद्याला वाईट तेच चांगले असे पटविले की मग त्याला वाईटाची काय तमा ? ठगांच्या बाबतीत तसेच होते. ठगीत मेलेल्या सावजांची आयुष्येच संपत आलेली असल्यामुळे कालिमाता त्यांना मृत्युच्या दारी आणून सोडते हे एकदा मानले की कसले पाप अन् कसले पुण्य. कसले चांगले आणि कसले वाईट. हे सगळे माणसाच्या विचाराचे रंगच आहेत. आता समजा मी लाल रंगाला काळा असे म्हटले तर तो रंग काळाच म्हणून ओळखला जाईल की नाही ? हातून घडणाऱ्या पापाची जबाबदारी एकदा का कोणावरतरी टाकली की आपण मुडदे पाडायला मोकळे. ठगांची रीतच तशी होती त्यामुळे आम्हाला मुडदे पाडण्यास व त्यांचे किडूकमिडूक लुटण्यात काही वावगे वाटत नव्हते. एक दोन रुपयांसाठी आम्ही सहज मुडदे पाडत असू. त्यास आम्ही कालीची इच्छा असे मोठे अध्यात्मिक नाव दिले होते. त्या सगळ्या आठवणी माझ्या मनात दाटून आल्यावर मला माझीच मोठी शरम वाटली. मी ज्यांच्या गळ्याभोवती रुमाल आवळले होते त्या सर्व मुडद्यांचे चेहरे माझ्या भोवती फेर धरुन नाचू लागले. एकदा कालिमातेसमोर हा धंदा सोडला असे विधीपूर्वक जाहीर केले की मी या धंद्यातून मोकळा होणार होतो. पुढच्या आयुष्यात रुमालाला हातही लावायची नाही अशी प्रतिज्ञा मी केली. अमानच्या मृत्युनंतर ज्या प्रकारे आमच्या वडिलांनी मला सहजपणे टाकून दिले होते त्याने माझ्या मनात ठगांबद्दल घृणा उत्पन्न झाली होती.

मजल दरमजल करत मी वेरुळला पोहोचलो तेव्हा माझ्या प्रवासाचा तिसरा की चौथा दिवस असेल. नक्की आठवत नाही. पण मी वेरुळला पोहोचलो होतो तेव्हा अंधार पडला होता. मी पूर्वी फिरंगीबरोबर येथे येऊन गेलो असल्यामुळे आमच्या लेण्यात कसे उतरायचे हे मला माहीत होते. मी काळोख पडण्याची वाट बघत तेथेच कैलासच्या लेण्याच्या पायाशी पथारी पसरली. एक दोन जण मला ठेचकाळून मला शिव्या देत पुढे गेले. काळोख पडल्यावर मी ही ठेचकाळत त्या घळीत उतरलो. नीट काटकोनात कापलेली ती घळ प्रथम सरळ जाऊन गप्पकन जमिनीत घुसली. थोड्याच वेळात मी आमच्या गुहेत पोहोचलो. आत कोणीतरी होते हे निश्चित. मी पावलांचा आवाज न करता एका खांबाच्या आड लपलो व काय चालले आहे ते पाहू लागलो. ठगच होते ते. त्यांनी एक मशाल पेटवली व कालीमातेसमोर जमिनीत रोवली. पूजा झाल्यावर त्यांनी एक गाठोडे उघडले व आतील लुटीची ते वाटणी करु लागले. त्यातील काही लुट त्यांनी देवीसमोर ठेवली व ते तेथून मागे फिरले. त्यांच्या पावलांचा आवाज नाहीसा होईपर्यंत मी तसाच तेथे गप्पगार बसलो. त्या मशालीच्या उजेडात चमचम करणारा तो दागिना व त्यापुढे खोबरे व गुळाचा नैवेद्य पाहून मी आत उडी मारली व अधाशासारखा तो नैवेद्य खाऊन घेतला. तो सोन्याचा दागिना माझ्या पोतडीत टाकला. कालीमातेसमोर उभे राहून मी तिचा धिक्कार केला व तेथेच पडलेली कुदळ तिच्या डोक्यात घातली. त्या आघाताचा आवाज तेथे घुमला. तिच्या डोक्याची काही छकले उडाली व माझ्या पायाशी पडली. मी मोठ्याने म्हणालो,

‘यापुढे तू कोणालाही या मार्गाला लाऊ शकणार नाहीस. मी आजपासून ठगी सोडली. मी धर्मही सोडणार आहे. तू माझे काहीही वाकडे करु शकणार नाहीस हे लक्षात ठेव !’

एवढे बोलून मी आल्यामार्गे बाहेर पडलो. प्रतिज्ञा तर करुन बसलो होतो पण जगायचे कसे हा प्रश्र्न होता. मी जालन्याला काही दिवस काढले. तेथे मोलमजूरी करताना कंपनी सरकारच्या फौजेत भरती झालो. तेथे भरती कारकुनाने माझे नाव माझे नाव आडनाव म्हणून लिहिले व नाव काय असे विचारल्यावर मी दडपून दिले, ‘चाँदसिंग‘. त्यामुळे मी झालो चाँदसिंग बुलू.
तेथून आम्हाला मुंबईस नेण्यात आले. मोठ्या खडतर प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष लढाईची वेळ आली ती टिपू विरुद्ध. त्यानंतर समुद्रामार्गे जाऊन मग्दाला येथे. ॲबेसिनियामधे कसाला बंदरात उतरुन चारशे मैल पायपीट करुन आम्ही मग्दाला किल्ल्यावर कबजा मिळवला. या लढाईत मी खूपच शौर्य गाजविल्यामुळे मला भरपूर बक्षिसी मिळाली व सुभेदारपदी बढतीही मिळाली. मुख्य म्हणजे आजवर केलेल्या पापाचा बोजा माझ्या मनावरुन उठला. मला रात्री शांतपणे झोप लागू लागली. डोळ्याभोवती फेर धरणारे मुडद्यांचे चेहरे पळाले व मी सामान्य माणसांसारखे जिवन जगू लागलो. या सगळ्या वर्षात मी फक्त एकदाच रुमालाचा उपयोग केला तो म्हणजे मग्दालाच्या किल्ल्यावर एका पहारेकऱ्याचा जीव घेताना. मला आठवतंय तेव्हा सुद्धा मी कोणी बघत नाही हे बघून रुमाल फेकला होता. सुभेदाराला ब्रिटिश अधिकारी चांगलाच मान देत असत. म्हणजे जवळजवळ एखाद्या गोऱ्या अधिकाऱ्याइतकाच म्हणाना......

मग्दालाच्या लढाईनंतर आमच्या रेजिमेंटने, बाँबे सिपॉयने विश्रांतीसाठी बेळगावला मुक्काम टाकला. या येथेच माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली ज्यासाठी मी काय माझे वंशजही मला कधीही माफ करणार नाहीत. त्या काळात बेळगावला कँपची उभारणीचे काम चालू असल्यामुळे आम्हाला गावात कुठेही राहण्याची मुभा दिली गेली होती. आम्ही तीन मित्रांनी एक जागा भाड्याने घेतली. जगदाळे, भोसले व मी. आम्ही एकाच रेजिमेंटमधे असलो तरीही आमच्या पलटणी वेगवेगळ्या होत्या.

बेळगावाच्या वेशीबाहेर जरा आडबाजूला एक गुत्ता होता तेथे आमचे सगळे सैनिक व अधिकारी दारु पिण्यास दररोज हजेरी लावत असत. मीही जात असे पण माझे पिणे मर्यादित व वागणे आदबशीर असे. त्या गुत्याच्या मालकाला एक सुंदर मुलगी होती. तेही तेथे दररोज जाण्याचे कारण होते. माझ्या दोन सहकाऱ्यांचे लग्ने झालेली असल्यामुळे ते माझी या मुलीवरुन नेहमी चेष्टा करीत. खोटे कशाला सांगू ? मलाही ती आवडत असे. तिचा बाप नेहमी बाहेर कुठेतरी हिंडत असे. वर्षातून कधी तरी एकदा दोनदा घरी येत असे. हा दारुचा धंदा ती व तिचा भाऊ चालवीत असत. आमच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात केव्हा झाले हेच कळले नाही. आता मी चांगलाच स्थिरस्थावर झालो होतो, समाजात मान होता व गाठीशी दोन पैसे बांधले होते. लग्न करण्यास तशी कुठलीच अडचण नव्हती. मी मंजुळेला रीतसर मागणी घालण्याचे ठरविले. पण तिचा बाप गावाला गेला असल्यामुळे तो आल्यावर बघू असे तिचा भाऊ म्हणाला, त्यामुळे ते काम जरा लांबणीवर पडले. पण त्याची या विवाहाला कुठलीच हरकत नव्हती. आता फक्त तिच्या वडिलांची वाट बघायची एवढेच आमच्या हातात होते. त्या काळात आम्ही दोघे नको तेवढे जवळ आलो. पण म्ंजुळेचा माझ्यावर पूर्ण विश्र्वास असल्यामुळे व लग्नाला थोडेच दिवस राहिल्यामुळे आम्ही बेफिकीर होतो.

आम्ही दोघे लग्न करणार आहोत ही बातमी रेजिमेंटमधे पसरल्यावर सगळ्यांनी माझे अभिनंदन केले व माझ्याकडून मेजवानी उकळली अर्थात दारुही पाण्यासारखी वाहत होतीच. मला एक शंका येत होती की तिचे वडिल गावाला वैगेरे नसून फक्त माझ्यासमोर येत नाहीत. ते बेळगावातच कुठेतरी राहतात व त्यांना सगळी खबरबात व्यवस्थित पोहोचत असणार. शेवटी मी एकदा तिच्या भावाला स्पष्टपणेच विचारले की त्यांना आमचे लग्न मान्य नाही का ? यावर त्याने सांगितले की ते लवकरच आपल्याला भेटतील. असे करता करता एका रविवारी ही भेट ठरली.

त्या दिवशी मी माझा रेजिमेंटचा पोषाख घालून त्यांच्या घरी गेलो. गुत्त्याच्या मागेच त्यांचे घर होते. मी गेल्या गेल्या तिच्या वडिलांनी आमचे आगतस्वागत केले व माझ्या मित्रांना गुत्यात बसण्याची विनंती केली. तिचा भाऊ त्यांना घेऊन गुत्त्यात गेल्यावर आमच्यात बोलणे सुरु झाले.

‘सुभेदार मला हे लग्न मान्य नाही ! गैरसमज करुन घेऊ नका ! पण त्यात तुमचे भले नाही व हे लग्न टिकणारही नाही !’

‘पण का ?’ मी विचारले.

‘तुम्ही कृपा करुन मला हे विचारु नका. मी याचे उत्तर सांगणार नाही.’

हे ऐकताच मंजुळेवर आकाश कोसळले. पण त्याकाळात पुरुषांनाही वडिलधाऱ्या माणसासमोर बोलता येणे अशक्य होते तर मुलींचा प्रश्र्नच नव्हता. ती आपली बिचारी तेथे रडत बसली. हे लग्न झाले नाही तर पुढे काय वाढून ठेवले आहे हे लक्षात येताच तिच्यापुढे ब्रम्हांड उभे राहिले. त्या काळात हा फारच मोठा गुन्हा ठरला असता व माझीही छिथू झाली असती. परत साहेब काय म्हणाले असते हे वेगळेच.

माझ्या मनात त्यावेळी काय चालले होते हे सांगून कोणाला समजण्यासारखे नाही.

‘पण तुमच्या नकाराचे कारण तर कळूद्या मला’ मीही हट्टाला पेटलो होतो.

‘ऐकायचे आहे का तुम्हाला ? आज ना उद्या कंपनी सरकार मला अटक करणार आहे हे विधिलिखित आहे कारण मी एक ठग आहे. आज ना उद्या तूम्ही माझा हा व्यवसाय कळळ्यानंतर माझ्या मुलीचा द्वेष करणार. ते मला टाळायचे आहे. आम्ही आहोत तेथे सुखी आहोत. तिच्याशी कोणीतरी आमच्यापैकीच लग्न करेल. तेच ठीक होईल. पण तूम्ही सरकारची नोकरी सोडून माझा व्यवसाय स्वीकारलात तर मात्र हा प्रश्न तरी निकालात निघेल. बोला आहे कबूल ?’ ते ऐकताच मंजुळा भोवळ येऊन खाली कोसळली. तिला सावरत मी म्हणालो,

‘माझ्या समोर दुसरा मार्ग नाही......’

असे म्हणून मी काही दिवसापूर्वी आमच्या हातून जे काही घडले होते त्याची त्यांना कल्पना दिली व डोक्याला हात लावला......’’

पुढे बरीच पाने होती पण आम्ही तेथेच थांबलो.....

ही कहाणी वाचून झाल्यावर आमच्या मूळ पुरुषाने हा धंदा सोडला होता व त्याला परत हा व्यवसाय स्वीकारण्यास कुठली परिस्थिती कारणीभूत झाली हे समजल्यावर आम्ही स्तब्ध झालो. आम्ही हा व्यवसाय सोडला असता तर बुलूंच्या संस्थापकाची इच्छा पूर्ण झाली असती. एकाने तसा प्रस्ताव मांडला देखील.

काय करायचे यावर बराच विचार विनिमय झाल्यावर आता हा व्यवसाय सोडणे शक्य नाही हे सर्वानुमते ठरले. एवढा किफायतशीर धंदा सोडणे कोणाला आवडणार ? शिवाय आता ब्रिटिश भारतातून गेल्ल्यामुळे तसा फार धोकाही नव्हता......

तेवढ्यात माझी नजर देवीच्या मूर्तीकडे गेली. मूर्तीच्या उजव्या बाजूच्या मस्तकाच्या ठिकऱ्या उडलेल्या मला स्पष्ट दिसू लागल्या.......
‘तिची दुरुस्ती करायला पाहिजे’ मी मनात म्हटले व सभा संपल्याचे जाहीर केले.

जयंत कुलकर्णी.
या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

6 Apr 2015 - 8:18 pm | प्रीत-मोहर

वाचतेय. मस्त सुरुवात. पुभाप्र.

अमित खोजे's picture

6 Apr 2015 - 8:57 pm | अमित खोजे

क्रमशः द्यावयाचे राहून गेले आहे का? जयंतरावांची स्टाईलमधली नविन कथा आली :)

सौन्दर्य's picture

6 Apr 2015 - 10:25 pm | सौन्दर्य

छान, अगदी वेगळ्या वातावरणात घेऊन गेली कथा. आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Apr 2015 - 11:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

लोकहो, संपली कथा !

एकदा गुन्हेगारीची चटक लागली की सुटत नाही. काळाप्रमाणे गुन्ह्याचे स्वरूप बदलत जाते, इतकेच.

ठगी एक सोच है । आदमी मरा करते है । लेकीन सोच मरा नही करती ! क्या ?!

जयंत कुलकर्णी's picture

6 Apr 2015 - 11:22 pm | जयंत कुलकर्णी

सही बात कही आपने...... :-)

पॉइंट ब्लँक's picture

7 Apr 2015 - 8:30 am | पॉइंट ब्लँक

एकदम बरोबर.

प्रचेतस's picture

7 Apr 2015 - 10:43 pm | प्रचेतस

अगदी हेच.
कथा अर्थातच आवडली.

नाखु's picture

8 Apr 2015 - 10:18 am | नाखु

सहमती सर्वे लिखाणांद भवन्ती !!! अस्तू अस्तू अस्तू !

वाचक बिल्ला क्र १०१५

संपली हे खरं, पण संपायला नको होती.... अजून लिहा.

अर्धवटराव's picture

7 Apr 2015 - 1:27 am | अर्धवटराव

(साभार, एक्का साहेब)

या एका लवंगीसाठी कसला चाबुक विडा जमवलाय जयंतराव. साला हे असलं लेखन तुम्हीच करु जाणे.
तुफ्फान.

खूप मस्त कथा आणि ठगांबद्द्ल माहीती.
क्रमश: असेल तर पुभाप्र...

किसन शिंदे's picture

7 Apr 2015 - 2:37 am | किसन शिंदे

खुप मस्त आणि उत्कंठावर्धक कथा.

वॉल्टर व्हाईट's picture

7 Apr 2015 - 2:55 am | वॉल्टर व्हाईट

तुमच्या 'ठग'कथांमधली ही कथाही आवडली. तुमच्या भाषांतरित कथाही खुप आवडतात. धन्यवाद.

आधीची कथा अगदी लख्ख आठवते आहे.
वेरुळच्या लेण्याभोवती अस गुढ गंभीर काही रचण अतिशय आवडल आहे.

एस's picture

7 Apr 2015 - 8:19 pm | एस

आधीची कथा अगदी लख्ख आठवते आहे.

अगदी असेच!

मदनबाण's picture

7 Apr 2015 - 9:13 am | मदनबाण

कथा आवडली...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Atu Amalapuram Remix... ;) { Kotha Janta }

जयंत कुलकर्णी's picture

7 Apr 2015 - 5:27 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

सिरुसेरि's picture

7 Apr 2015 - 8:55 pm | सिरुसेरि

यावरुन दिलिपकुमारचा संघर्ष सिनेमा आठवला . तसेच गो.नी.दां चे 'रुमाली रहस्य' आठवले .

कविता१९७८'s picture

7 Apr 2015 - 9:33 pm | कविता१९७८

मस्त कथा

नगरीनिरंजन's picture

7 Apr 2015 - 10:07 pm | नगरीनिरंजन

कथा आवडली. ती नावं, तो कल्ट, ऐतिहासिक-भौगोलिक रेफरन्सेस वगैरे चांगलं परिणामकारकपणे जुळवून आणलंय.

hitesh's picture

8 Apr 2015 - 6:50 am | hitesh

मस्त आहे.

कालीची इच्छा !

:)

कथा आवडलीच शिवाय वेरुळला परत जाणे झाले की उगाच कुठे अशी गुहा दिसते की काय शोधणे आले!!

खंडेराव's picture

8 Apr 2015 - 12:51 pm | खंडेराव

जबरदस्त जमलीये.
लगेचच Confessions of a Thug (Philip Meadows Taylor ) मिळ्वुन वाचायला सुरुवात केली!

वॉल्टर व्हाईट's picture

8 Apr 2015 - 10:23 pm | वॉल्टर व्हाईट

गटेनबर्गवर हे पुस्तक उपलब्ध आहे.

इनिगोय's picture

8 Apr 2015 - 9:52 pm | इनिगोय

क्रमशः नाही का!
वर्णन मस्त जमलं आहे. कथा आवडली.