चहा व कोंबडीच्या अंड्या पासुन अधिक आनंदा ची निर्मीती कशी करावी ?

मारवा's picture
मारवा in पाककृती
24 Oct 2014 - 12:28 pm

चहा व अंड (कोंबडीच यापुढे कों.च हे शार्टफ़ार्मात वाचावे) हे विधात्याने दिलेले मर्त्य मानवाच्या जीवनाच्या कठोर संघर्षात त्याच्या थकलेल्या मना-शरीराला दिलासा व विलक्षण आनंद देणारे दोन वरदान आहेत. या दोन वरदानाच्या सेवनाने मनुष्य भौतिक च नव्हे तर आध्यात्मिक जीवनातील अडथळे देखील सहज पार करु शकतो. म्हणजे ते इटसेल्फ़ अडथळे पार पाडत नाही मात्र यांचे सेवन मनुष्याला एनर्जाइझ करते व थकवा घालवुन तरतरी प्रदान करते. त्या तरतरी च्या तरफ़ेवर स्वार होउन मनुष्य भवसागर पार करु शकतो. वरचा आध्यात्मिक उल्लेख सीरीयस आहे. तिबेटी ध्यान धारणेच्या परंपरेत ध्यान करतांना झोप लागु नये यासाठी चहा पिउन ध्यानाला बसण्याची अतिप्राचीन परंपरा आहे. जपानी चहा चे अध्यात्मिक रीच्युअल्स तर प्रसिद्ध च आहेत. भारतातल्या एका विलक्षण प्रतिभाशाली शहरात चहा ची विक्री करणारया दुकानांत चहा चा उल्लेख अमृततुल्य असा सार्थ केला जातो. मात्र माझा याला आक्षेप असा आहे की याने चहा चे अवमुल्यन च होत नाही का? उलटपक्षी अमृताचा उल्लेख चहातुल्य असा व्हावयास हवा. कारण अमृताचे फ़ंक्शन बघा कीती मर्यादीत आहे. काय तर म्हणे त्याचे सेवन तुम्हाला अमर करते. म्हणजे अमृत प्राशन करुन काय करायचे तर अमर व्हायचे ? छ्या , आणि अमर झाल्यावर या भयावह जीवनात जगायचे कसे? ( ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है ) जीवन पुर्णपणे निरर्थक आहे या निहीलझम च्या तत्वज्ञानाचा पुर्ण डोलारा कोसळवण्याची ताकद एक हाफ़ चाय व एक हाफ़ फ़्राय मध्ये आहे. तर जगतांना अमृत कुठलाही आधार देत नाही. उलटपक्षी चहा जगतांना डेली बेसीस वर मदत करते. हमखास आनंदाची विरंगुळयाची शांततेची तरतरीची उत्साहाची अत्यावश्यक अशी मागणी ती सातत्याने पुर्ण करते. म्हणजे मानवाला अमृत जो अमर करुन जीवनाच्या तुमुल कोलाहलात निर्दयतेने ढकलुन देतो तेथेच चहा त्याच मानवाला रोज हात धरुन रस्ता ओलांडुन देते. एका प्रमुख भारतीय पक्षाचे प्रमुख नेते हे चहाचा वारंवार अपमान करतांना बघुन मला फ़ार वेदना होतात. ते सारख म्हणतात एक चायवाला प्रधानमंत्री क्यो नही बन सकता ? माझ म्हणण चायवाला सहज प्रधानमंत्री बनु शकतो मात्र एक प्रधानमंत्री चायवाला बनेगाइच ऐसा नही. असो तो आपला विषय नाही.
कोंच अंड ही असच आहे. त्या बद्दल काय म्हणाव कीती आनंदांच माहेरघर आहे कोंच अंड
जीवनाच सार आहे कोंच अंड
जे अंडी तेच ब्रम्हांडी
माझ्या उन्मत काव्यप्रतिभेला नाइलाजाने मुरड घालत मी मुळ मुद्यावर येतो. मतलब की बात करनेका वक्त आ चुका है. तर
चहा व कोंच अंड यांचा आनंद घेण्यासाठी मात्र त्यावर परीश्रम घेण्याची तयारी मात्र हवी, अर्थातच पाककौशल्य हवे. चहा व कोंच अंड या मधुन अफ़ाट आनंदाची निर्मीती होऊ शकते. मात्र गुरुशिवाय ज्ञान अशक्य मार्गदर्शनाशिवाय एक वेळ तुम्ही जीवनाचा अर्थ शोधु शकता. मात्र चहा व कोंच अंड यातुन आनंद निर्मीती करायची असेल तर तुम्हाला जाणकार बल्लवाचार्यांच खानदांनी शेफ़ांच वा शेफ़ारलेल्यांच ही मार्गदर्शन घेण अत्यावश्यक बाब असते.
मला स्वत:ला चहा बनवता येतो अंड्याची भुर्जी, आमलेट, हाफ़ फ़्राय, बिर्याणी, स्क्रॆम्बल्ड एग्ज, चीजी एग नुडल्स आदि प्राथमिक पातळीवरच्या डीश बनविता येतात. पण पातळी इतकी प्राथमिक आहे. की आनंदासाठी कायम इतरांवर अवलंबुन राहाव लागत. कंटाळा आलाय या परवशतेचा आता मला माझ्या पायावर उभ राहायच आहे.
मुझे चाय कैसे अलग अलग तरीकेसे बनायी जाती है
अंडो के अलग अलग पक्वान कैसे बनाए जाते है
ये सिखना है आणि आता मी संकल्प केलाय या पाडव्या पासुन की मी एक उत्कृष्ठ चायवाला बन वुन दाखवणार च आणी एक महान अंडाचारी बनणारच.
याची पहीली पायरी म्हणुन मी मिसळपाव या नावातच खाद्यसंस्कृतीला वाहीलेल्या संस्थळावर मदत मागण्यासाठी आलोय. मिसळपाव वर खाता खाता सहज चाळा म्हणुन इतर अनेक विषयांची चर्चा रुचिपालट म्हणून करण्याची उज्वल परंपरा आहे, मिसळपाव वर अनेक बल्लवाचार्य आहेत अनेक खाद्य रसिक आहेत, मी तर असे ही ऐकलेले आहेत की नाव बदलुन अनेक नामांकीत शेफ़ मिसळपाव वर लिहीत असतात.
इथे या खाद्यापिठात च मला
चहा व कोंच अंड या वर विवीध रेसीपी मिळतील यावरच चिंतन वाचावयास मिलेल अशी आशा मला आहे.
चहा हा चिंतनयोग्य विषय आहे जसे पत्ती चे विवीध प्रकार , उकाळी कीती घ्यावी, इतर उपघटकांचा जसे आलं इलायची आदिंचा मुळ घटकांवर होणारा परीणाम. दुध व पाण्याचे प्रमाण हा तर फ़्री विल की डीटरमीनीझम इतकाच महत्वाचा फ़िलॉसॉफ़ीकल परॊडॊक्स आहे. तसेच इराणी चहा व अमृततुल्य चहा त श्रेष्ठ कुठला चहा व का दोघांच्या पद्धतीत काय फ़रक आहे.
जस्मिन टी डंकन टी चा रीचनेस कशात आहे ?
ब्युटी लाइज इन द आइज ऑफ़ बिहोल्डर म्हणतात तसे टी ज टेस्ट डीपेंड्स अपॊन टीमेकर.
कोंच अंड ही तसच आहे. अक्षरश: हजारो संभावना यात लपलेल्या आहेत. जितका कुशल शेफ़ तितका तो त्यातुन आनंद निर्मीती करु शकतो स्काय इज द लिमीट असे कोंच अंड या संदर्भात आपण म्हणु शकतो.
तर सर्व खाद्यरसिकांना बल्लवाचार्यांना हात जोडुन विनंती आपले चहा व अंड्या विषयीचे जे काय अमुल्य ज्ञान असेल ते येथे मुक्त हस्ते उधळावे व मला उपकृत करावे. या अगोदर ही जालावर या संदर्भात कुठे ज्ञानाचे कण सांडलेले असतील तर तेथपर्यंत पोचण्याच्या लिंका पुरवाव्यात
ज्ञान साचवण्याने आटते वाटण्याने वाढते हे तर आपण जाणताच
तर तुम्ही चहा कसा बनविता ?
अंड्याचा कुठला छान पदार्थ तुम्हाला बनविता येतो याची रेसीपी कृपया शेअर करावी.
कळावे लोभ असावा ही विनंती

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

24 Oct 2014 - 2:12 pm | सस्नेह

नमन अगदी खुसखुशीत झाले आहे
आता खमंग प्रतिसादान्ची प्रतीक्षा आहे

टवाळ कार्टा's picture

24 Oct 2014 - 2:37 pm | टवाळ कार्टा

अंड्याचा कुठला छान पदार्थ तुम्हाला बनविता येतो याची रेसीपी कृपया शेअर करावी.

१ अंडे घ्यावे
चमच्याने ते हळूच मधोमध फोडावे
दोन्ही अंगठ्यांनी कवचाचे २ भाग बाजूला करून पटकन मटकावे

हि माझी "रॉ एग"ची पा.कृ. :)

रेग्युलर स्विमींग करायचो आधी तेव्हा आमची ही हिच रेसीपी होती !!

बाकी मारवाशेठ , नेहमीप्रमाणे खुशखुशीतच !!

बाकी पाकृ वगैरे जौद्या ... पण "आनंदाची निर्मिती" हा मिपावर्च्या अध्यात्मपटूंना फुलटॉस आहे असे नमूद करू इच्छितो.

कोण आनंदा ?

__/\__ धन्यवाद !!

मी नव्हे - कारण मी आनन्दा आहे.

आनंदा आणि आनन्दा हे उच्चारी एकच होत, फक्त लेखन वेगवेगळे. टिळकांची ती 'संत, सन्त आणि सन्+त' वाली ष्टुरी आठवून पहा की.

स्वप्नज's picture

24 Oct 2014 - 6:40 pm | स्वप्नज

कोंबडीचे 'अंडे (किंवा अंडं)' असे म्हणायचे असावे बहुधा तुम्हाला. एकाच लेखात 'मोदीं'चा उल्लेख आणि त्यांच्या नावाशी साध्यर्म असलेल्या 'मोजिं'ना साजेशी चूक... कसे काय जमते बुवा तुम्हाला.....?? मोदी-मोजी युती झाली असावी. हे शक्य झाले केवळ आमच्या ......चहामुळे. ह.घ्या.हेवेसांनल. बाकी लिखाण अप्रतिमच आहे.

अरे टवाळांनो काय सुड उगवताय माझ्यावर काय स्वप्न दाखवताय
अरे रेसीपी द्या हो रेसीपी रेसीपी
आता नाही साहवत हया कोरड्या चर्चा मला हवीय
एक कॉक्रीट रेसीपी
जी देइल माझ्या आत्म्याला शांती
कृपया विषयांतर करु नका
रेसीपी द्या

सूड's picture

24 Oct 2014 - 8:05 pm | सूड

एक कॉक्रीट रेसीपी
जी देइल माझ्या आत्म्याला शांती

क्या आपका आत्मा संत्रस्त हय ?? (क्या आपकी टूथपेस्ट मे नमक हय? च्या चालीवर वाचावे).

यसवायजी's picture

24 Oct 2014 - 9:16 pm | यसवायजी

@ अंडाचारी >>
या वरुन ( अंडंकटलेट ) नावच्या एका मेन्युची आठवण झाली. ;)

काय हे अस कोड्यात कोड्यात बोलण ?

बोका-ए-आझम's picture

2 Nov 2014 - 11:48 am | बोका-ए-आझम

अंडाचारीवरून आठवलं. मारवाशेठ, ही जागा कुठल्याही अंडुलकराने किंवा अंडुल्ल्याने (गर्दुल्ल्याच्या धर्तीवर) मिस केली तर कोणतीही कोंबडी त्याला माफ करणार नाही. योगेश मोकाशी नामक माणसाने द एग फॅक्टरी नामक हा प्रकार बंगळुरास चालू केलेला आहे. ७५ वेगवेगळ्या प्रकारचे अंड्याचे प्रकार हा माणूस देतो - आपल्या मुंबई पेशल बुर्जीपावापासून ते स्पॅनिश टेक्स मेक्स हुएवोस पर्यंत. असो. इथे खाल्ल्याशिवाय ख-या अंडाहा-याने बादलीला लाथ मारू नये असे आमचे सपष्ट मत हाये!

हे असेच काही सूरतला पण बघीतल्याचे आठवते.

मुक्त विहारि's picture

24 Oct 2014 - 7:51 pm | मुक्त विहारि

भरपूर हवे तितके पेय घ्या...

तवा गरम करायला ठेवा.तवा गरम झाला की, थोडे तेल तव्यावर टा़का. तेल गरम होइपर्यंत पेय चषकात ओतून घ्या आणि पेय जलाचा एक घोट घ्या किंवा एका घोटांत चषक रिकामा करा.(मी शक्यतो एका घोटात चषक रिकामा करतो... कारण कळेलच...)

तेल थोडे तापले की. अंडे फोडून तव्यावर टाका.थोडे मीठ आणि तिखट त्या आमलेट वर टाका आणि पेयाबरोबर आस्वाद घ्या. पेय जल पिण्याचा वेग जितका अधिक तितकीच ह्या आम्लेटची खुमासदार जास्त, असा आमचा अनुभव आहे...

हे बघा उत्तेजक पेय इतर सर्व चवी घेण्याची क्षमता त्या काळापुरती स्थगित करत अस माझ मत आहे. म्हणजे थोड गावठी भाषेत म्हणायच तर बेवडयांना पेया बरोबर काहीही दिल तर चालत त्यांना एकच चव कळते.
म्हणुन पितांना प्याव खातांना खाव अस
एका जुन्या मराठी चित्रपटात सासु वरचढ जावइ मध्ये अशोक सराफ थोडा रोमँटीक होउ लागताच जहाल खमकी सासु त्याला दरडावुन म्हणते जावइ बापु रातच्या गोष्टी राती
तसे पिण्याच्या गोष्टी पितांना
पिणारे रसिक नसतात किंबुहना त्यांची सर्व रसिकता पिण शोषुन घेत अस आमच मत आहे
म्हणुन तुम्ही दिलेल्या प्रयोगाच्या सकारात्मक परीणामांविषयी मी अंमळ सांशक आहे
मी स्वतः पितो त्यामुळे अखिल भारतीय ड्रींकर संघटनेने माझ्या विरोधात हुल्लडबाजी करु नये मी तुमच्यापैकी च एक आहे मात्र खाण आणि पिण या सेपरेट करायच्या गोष्टी आहेत असे माझे मत आहे
तरी मुक्त विहारी जी आपण ज्या प्रेमाने उमद्या मनाने एक न पटणारी का होइना पण तुमच्या कडुन कॉक्रीट रेसीपी पुरवली त्या विषयी तुमचा मनापासुन आभारी आहे
थॅक्स अगेन फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट

मुक्त विहारि's picture

25 Oct 2014 - 8:28 am | मुक्त विहारि

बादवे,

मी कुठल्याही उत्तेजक पेया कडे बोट दाखवलेले नाही.

कुणाला चहा आवडतो तर कुणाला कॉफी...पसंद अपनी-अपनी...

मला चहा भरपूर लागतो, अंडे खात नाही परंतू तीर्थक्षेत्री शुचिर्भूत होऊन देवदर्शन करावे लागते अशावेळी हाफ-फ्राई करतो. दोनवर्षाँपूर्वी डिसेंबरात नर्मदातटी ओंकारेश्वरी जाणे झाले. सकाळचे साडेसात वाजलेले. थंडी खूप. अध्यात्म, आत्मा, परमात्मा, चहाची तलफ सर्व एकाचवेळी व्याकूळ झाले होते रेल्वेत ओळख झालेला एक तरूण डॉक्टर आणि त्याचा मामाजी बरोबरच नदीकिनारी आलो. आंघोळ कशी करायची या विवंचनेत. मी पटकन शर्ट काढला पोतडीतून एक प्लास्टिकचा दोन लिटरचा डबा. कमरेपासून पुढे वाकून डब्याने पाणी डोक्यावर, पाठीवर ओतले "हाफ-फ्राई !" मी. डॉक्टर यावर फारच खुश झाला. त्याने लगेच डबा मागून घेतला. त्यानेपण केले हाफ-फ्राई. आमची गट्टी जमली म्हणाला चलो अंकल हम साथ साथ देखेंगे मधप्रदेश {मध्य प्रदेश}. देवदर्शनानंतर एका टपरीवर घेतला आनंद कटिंग चा चा.

मारामारी हा काय प्रकार असतो हो नेमका ? म्हणजे चहा च्या बाबतीत मुंबइत का कुठेतरी मिळतो हा प्रकार थोड उलगडुन सांगितल तर बर होइल

बोका-ए-आझम's picture

2 Nov 2014 - 11:10 am | बोका-ए-आझम

चहाच्या बाबतीत मारामारी हा शब्द ऐकलेला नाही. काही ज्यूसवाले संत्र्याचा रस आणि मोसंबीचा रस यांचं मिश्रण देतात. त्याला मारामरी म्हणतात. तसंच अननस आणि मोसंबी
यांच्या मिश्रणाला गंगाजमना म्हणतात.
संदर्भ - गुंजाळ ज्यूस सेंटर, टिळक पूल, दादर.

बोका-ए-आझम's picture

2 Nov 2014 - 11:10 am | बोका-ए-आझम

चहाच्या बाबतीत मारामारी हा शब्द ऐकलेला नाही. काही ज्यूसवाले संत्र्याचा रस आणि मोसंबीचा रस यांचं मिश्रण देतात. त्याला मारामरी म्हणतात. तसंच अननस आणि मोसंबी
यांच्या मिश्रणाला गंगाजमना म्हणतात.
संदर्भ - गुंजाळ ज्यूस सेंटर, टिळक पूल, दादर.

अमित मुंबईचा's picture

5 Nov 2014 - 5:42 pm | अमित मुंबईचा

मारामारी मधे आधी चहा बनवून त्यात वरुन कॉफी टाकून दिला जातो. जस्ट ट्राइ करायला ठीक आहे, पण मला नाही हा प्रकार आवडला.

आयुर्हित's picture

24 Oct 2014 - 9:17 pm | आयुर्हित

चहापासुन अधिक आनंदा ची निर्मीती कशी करावी ?

सन अँड सँड सारख्या ५ स्टार हॉटेलात जावे.
प्रसन्न मुद्रा घेवून शक्यतो दुपारी ४ वाजता, निवांत वेळी गर्दी नसते.
लॉबीत असलेल्या खुर्च्यांवर बसून एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घ्यावा.
जागा शोधतांना अशी भिंती जवळील जागा शोधावी, जेथून त्यांचे किचन जास्तीत जास्त लांब बाजूला असेल.

ऑर्डर घ्यायला कोण येते आहे यावरून ऑर्डर काय द्यावी, हे ठरवावे.
थंडगार पाणी प्यावे व सभोवार एक नजर टाकावी.
एखादी सुंदर ललना असल्यास मेनूकार्डमधील ४ ते ५ प्रकार कसे करतात हे विचारावे.
जमल्यास थोडा वेळ घेवून, विचार करून ठरवावे.
त्यासाठी ऑर्डर घेण्यासाठी हमखास परत बोलवावे.

दार्जेलिंग चहाची ऑर्डर द्यावी.
छान पैकी दोन घोट प्यावेत.
शक्यतोवर हा चहा दुधाशिवाय घेतात.
त्यामुळे जर दुध असलेला चहा हवा असल्यास आसाम चहा ऑर्डर करावा.
छान पैकी दोन घोट प्यावेत.
परत चहात थोडेसे दुध घालायला बोलवावे.
येतांना/जातांना नीट निरखून पाहाण्याची मजा घ्यावी.
हळू हळू चहा मजा घेत संपवावा.

चहापासुन अधिक आनंदा ची निर्मीती नक्कीच होते!
आणि यामुळे आपली काव्यप्रतिभा अधिक उन्मत्त झाल्याशिवाय राहणार नाही!!

चहाच्या पाकृसाठी पहा: चहा नक्की कसा करावा ??

आयुर्हीत जी !
तुम्ही पुरवलेल्या अभुतपुर्व लिंक साठी मी तुमचे धन्यवाअद कोणत्या शब्दात मानु तेच कळत नाही
या लि़क चा काळजीपुर्वक अभ्यास करतो. मला दाट शंका होतीच की इथल्या बल्लवाचार्यांनी चहा हा विषय अगोदर नक्कीच हाताळलेला असेल पण माहीत नव्हत कुठे आहे ते
पण तुम्ही सांगता तो ललना प्रकार विचलीत करुन चहानंदात अडथळा आणु शकतो असा माझा कयास आहे
असो अनेक अनेक धन्यवाद या लिंक साठी

असंका's picture

28 Oct 2014 - 5:33 pm | असंका

__/\__

अध्यात्मामध्ये वातावरणाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. यामुळेच हिमालय, गुहा, मठ इ. स्थाने लौकिकप्राप्त आहेत. पण प्रत्येकाला अशा ठिकाणी जाणे जमेलच असे नाही. सदर कारणास्तव आपण जिथे आहोत तिथेच असे वातावरण निर्माण करणे गरजेचे बनते. अशावेळी मस्त आम्लेट व सोबत गरमागरम चहा घ्यावा. सोबत चवीनुसार पाऊस असावा. मस्त भट्टी जमते मग. आणि नंतर मस्त ताणून द्यावी.... अहाहा....परमानंद...अहाहा... आणि मग एक जीव जन्मण्याआधी आपल्या हातून मारला गेला याची भरपाई करण्यासाठी एक नवीन जीव जन्माला घालण्याची सुरेख स्वप्ने पहावीत.......शक्यतो एकट्याने.

विजय पिंपळापुरे's picture

25 Oct 2014 - 2:02 am | विजय पिंपळापुरे

ही रेसिपी / प्रकार मी churchgate स्टेशन बाहेर [West] Govt Law College च्या पुढे रस्ता no C वर एक तेलग मेमोरिअल हॉस्टेल आहे तिथे खाल्ला आहे. फार छान असायचा. माहित नाही आता ते हॉस्टेल तिथे कि नाही.

साहित्य :

२ अंडी
२ ब्रेड स्लाईस
१ कान्दा
१ टोम्याटो
हिरवी चटणी
तेल
मिट

क्रुति:

प्रथम ब्रेडला हिरवी चटणी लावावी, तव्यावर तेल टाकावे, चटणी लावलेला स्लाईस तव्यावर ठेवावा. मग त्यावर बारीक चिरलेला कान्दा व टोम्याटो घालावा मग २ अंडी फोडुन, फेटुन घालावीत. वर ब्रेडचा दुसरा स्लाईस ठेवावा. वरुन थोड तेल
घालाव. मग पलटवुन घ्ञाव. [खालची बाजु वर करावी]

गरम गरम टोम्याटो सॉस बरॉबर खायला द्ञाव.

मारवा's picture

25 Oct 2014 - 5:29 pm | मारवा

बर्मा टोस्ट हे नाव पहिल्यांदा च ऐकतोय. रेसीपीसाठी अनेक आभार !

बोका-ए-आझम's picture

26 Oct 2014 - 12:31 am | बोका-ए-आझम

सेंट झेविअर काॅलेजच्या कँटीनमध्ये मिळतो हा प्रकार अजूनही. पण तिथे त्याला एग बर्मीज असं नाव आहे. मस्तच लागतो.

मारामारी =एक फुल +एक कटिंग चा . आबांच्या गावाकडं तासगावात मिळतो.

विजुभाऊ's picture

25 Oct 2014 - 9:51 am | विजुभाऊ

भारतातल्या एका विलक्षण प्रतिभाशाली शहरात चहा ची विक्री करणारया दुकानांत चहा चा उल्लेख अमृततुल्य असा सार्थ केला जातो.

मुक्त विहारि's picture

25 Oct 2014 - 10:35 am | मुक्त विहारि

अशाच एका शहरांत चिंचेची चटणी आणि श्रीखंडाचे पाणी पिणारे पण आहेत असे ऐकिवात आहे....

कुणाला कुठले पेय आवडेल ते काही सांगता येत नाही....

टवाळ कार्टा's picture

25 Oct 2014 - 10:59 am | टवाळ कार्टा

उन लोगोंने पीईच नै

जेपी's picture

25 Oct 2014 - 10:30 am | जेपी

तव्यावर भरपुर तुप टाका.गरम झाल्यावर बारिक चिरलेला कांदा,टोमॅटो,कोथिंबीर ,हिरवी मिरची ,मिठ टाका.यामध्ये अंड टाकुन अलगद फिरवत राहा.भाजल्यावर यावर एक पोळी/चपाती टाकुन रोल करा.चालत फिरत येंन्ज्याय

हा धागा चिंतनात्मक अधिक वाटला पण मजा आली
लिंक साठी धन्यवाद !

गौरीबाई गोवेकर's picture

25 Oct 2014 - 1:24 pm | गौरीबाई गोवेकर

दोन अंडी
चार सेँडविच ब्रेडच्या स्लाईस
तेल
मिरपूड, मीठ
टोमॅटो केचप
बटर, तेल
===============

दोन अंडी फोडून फेटा त्यात मीठ घाला. ब्रेड स्लाईसच्या कडा काढून टाका. मग त्या स्लाईसचे त्रिकोणी (एकाचे दोन) असे तुकडे करून घ्या. तवा तापवून घ्या त्यावर थोडे तेल घाला. तेल तापले की त्या तेलात बट्रर घाला. मग केलेले ब्रेडचे तुकडे फेटलेल्या अंड्यात बुडवा फेटलेले अंडे ब्रेडमधे शोषले गेले की लगेच तव्यावर टाका ओले असतानाच मिरपूड भुरभुरा. दोन्ही बाजूने खरपूर शॅलो फ्राय करा. (तेल आणि बटरचा वापर पथ्य, प्रकृती, आवडी अनुसार कमीजास्त करू शकता. ) गरम गरम टॅमेटो कॅचप बरोबर सर्व करा.

मारवा's picture

25 Oct 2014 - 5:27 pm | मारवा

गौरी जी रेसीपी साठी मनापासुन धन्यवाद ! नक्की करुन बघतो.

पैसा's picture

25 Oct 2014 - 8:08 pm | पैसा

भारी लिहिलंय!
मिपा श्टैल प्रतिक्रिया: अंडं उकळत्या चहात टाका आणि कसं लागतं ते जरूर सांगा!

आता आम्लेटची जरा वेगळी रेसिपी. २ अंडी फोडून फेटून घ्या. त्यात १ मोठा कांदा बारीक चिरून, १ टोमॅटो बारीक चिरून, १/२ हिरवी मिरची बारीक तुकडे करून (तिखट झेपेल तेवढे), कोथिंबीर बारीक चिरून आणि थोडं ओलं खोबरं टाकून, मीठ घालून मिक्स करून घ्या. तव्यावर खोबरेल तेल टाकून नेहमीप्रमाणे आम्लेट करून घ्या. ब्रेडच्या २ तुकड्यांमधे घालून हादडा. ब्रेड स्लाईस पण तव्यावर जरा गरम करून घेतल्यास उत्तम. सोबत गवती चहाची पात, आलं, आवडत असेल तर चहा मसाला घालून मस्त वाफाळता चहा घ्या. खातापिताना मिपाकरांच्या नावाने एक घास कावळ्याला टाकायला विसरू नका!

विटेकर's picture

27 Oct 2014 - 12:59 pm | विटेकर

जिथे तिथे खोबरे आणि खोबरेल !!!
चहात घालता का हो खोबरे ?

घालून बघायला पाहिजे!

अजाबात नाय
सनातन्यांची धुलाइ करतांना सावरकर म्हणाले होते माझी सुंदर आई आणि कावळ्याच्या रुपात येईल केवळ अशक्य.
माझे सुंदर गोड गोंडस मिपाकर त्यांच्या नावाने घास कावळ्याला कधीच नाही.
त्यांच्या नावाने घास मी
राजहंसाला खाउ घालीन ( पुरुष मिपाकरांच्या नावाने )
चिउ ला खाउ घालीन (स्त्री मिपाकरांच्या नावाने )
किंवा मोर ऑर लांडोर अ‍ॅज पर पब्लीक ओपिनीयन

अय्या नाही हो!! त्या अय्या वायल्या !!

माम्लेदारचा पन्खा's picture

25 Oct 2014 - 10:34 pm | माम्लेदारचा पन्खा

तुम्हाला डोळ्यासमोर नको असलेल्या माणसाला ती फेकून मारा...नवशत्रू निर्मिती होईल....

कवितानागेश's picture

25 Oct 2014 - 11:15 pm | कवितानागेश

एग फ्लिप करा की. अंड, दूध, मध, ब्रॅन्डी, साखर- नंतरचे ३ आयटम १-१ चमचा फक्त. मिक्सरमध्ये एकत्र करुन घ्यायचं. आवडत असल्यास बटर्स्कॉच इसेन्स टाका.

आयुर्हित's picture

26 Oct 2014 - 11:54 pm | आयुर्हित

करून पाहायला हरकत नाही.
आत्तापर्यंत फक्त दुधात एक अंडे फोडून टाकायचो व वरून एक चमचा साजूक तूप टाकून प्यायचो!

विजय पिंपळापुरे's picture

26 Oct 2014 - 5:10 pm | विजय पिंपळापुरे

आणखी एक पाकृ

अंडी फोडून घेणे.त्यात लाल तिखट, मिरे पुड, मीठ घालुन फेटुन घेणे.

२ ब्रेड स्लाईसेस घेवुन त्याला चिझ स्प्रेड लावावे.आवडत असेल तर चिझ स्प्रेड वर ओरेग्यानो घ्यालावे.
मग २ ब्रेड स्लाईसेस एका वर एक sandwitch सारखे ठेवावेत, त्याचे चार तुकडे करावेत, मग फेटलेल्या अंड्याच्या मिश्रणात घोळवून पॅनवर दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करुन घ्यावे.
आणी गरम गरम खावेत.

चिझ स्प्रेड च्ञा जागी चिझ स्लाईसेस पण वापरु शकता.

दिपक.कुवेत's picture

26 Oct 2014 - 7:43 pm | दिपक.कुवेत

पण मागे मी अंडे के पकोडे केलेले. हि त्याची डिट्टेल पाकॄ

मारवा's picture

29 Oct 2014 - 9:59 am | मारवा

इस बेहतरीन रेसीपी के लिए शुक्रगुजार हु.
और फोटुवा भी बहोत मुह मे पानी लाने वाले है
थॅक्स अगेन !!!

मारवा's picture

29 Oct 2014 - 9:59 am | मारवा

इस बेहतरीन रेसीपी के लिए शुक्रगुजार हु.
और फोटुवा भी बहोत मुह मे पानी लाने वाले है
थॅक्स अगेन !!!

विटेकर's picture

26 Oct 2014 - 9:06 pm | विटेकर

इराणी हाटी लात चहात अंडे घालतात अशी वन्दता आहपूवी असा चा आय एम् डी आर च्या कंटिन ला मिळत असे..
लै वेळा पिलाय....
तेवढे एकच अब्रह्मन्यम झाले आहे आजपावेतो.... पण लै वेळा झाले आहे

झाली का अधिक आनंदाची निर्मिती?

मारवा's picture

27 Oct 2014 - 8:02 am | मारवा

हा प्रश्न आहे
की उपहास आहे
की विधान आहे
कशाच्या संदर्भात आहे
?????
उलगडा व्हावा ही जनतेची मागणी आहे

स्पंदना's picture

27 Oct 2014 - 8:16 am | स्पंदना

वाक्याच्या शेवटी जे विराम चिन्ह असेल तो वाक्याचा भाव असतो.

हे उत्तर म्हणजे मर्ढेकरांना अर्थ विचारायला जावे तर त्यांनी अगोदर इलियट काय लिहीतोय ते नीट वाचा म्हणण्यासारखे आहे.
माझ्या भावशुन्य जीवनात मुळात भावाचा च अ भाव आहे तर तुम्ही जे म्हणताय ते कस कळेल ?
तुम्हीच जर अजुन विस्तार केल्यास तो अधिक कृपाळुपणा च उदाहरण च नाही का ठरणार ?
त्याने तुम्ही कीती समजुन घेता लहानसहानांना अस च नाही का म्हटल जाणार ?

मारवा's picture

27 Oct 2014 - 10:37 am | मारवा

हर सवाल का जवाब नही होता सारख हिंदी चित्रपटातल विधान आहे ?

सुबोध खरे's picture

27 Oct 2014 - 8:59 am | सुबोध खरे

राजू आम्लेट वाला बडोदा
तू नळीचे दुवे पहा
http://www.youtube.com/watch?v=sq4bKB9qZhQ
http://www.youtube.com/watch?v=2jDnebrpPB8

सुबोध जी
जर मला माहीत असते की मिसळपाव हा इतका मोठा आधार केंद्र आहे
तर मी अगोदरच कीती तरी मदत येथुन मिळवु शकलो असतो.
आता विचार करतोय की काय काय विचारायच राहुन गेल इथे याचा
पुन्हा एकदा लिंक साठी अनेक आभार.

आयुर्हित's picture

27 Oct 2014 - 11:49 am | आयुर्हित

सुबोधजी, मनापासून धन्यवाद या लिंक साठी.
मला सर्वात जास्त आवडलेली थाळी बडोदा येथीलच आहे, त्या आठवणी ताज्या झाल्या.

राजू आम्लेट वाला बडोदावाला.
ह्यो आपला फेवरीट आहे. काय बटर टाकतो. आणी बनवायची श्टाईल तर लय भारी.

सतिश गावडे's picture

27 Oct 2014 - 10:37 am | सतिश गावडे

थोड मोकळ करुन बोला की गडे

अय्या.... मिपाकरांच्या नावाने घास कावळ्याला ?

आजवर या गडे, जा गडे, अय्या वगैरे शब्दप्रयोग हे स्त्रीयांनीच करावेत असा एक समाजसंकेत होता. आपण हा संकेत मोडून काढत आहात याबद्दल आपले अभिनंदन आणि आपल्या पुरोगामित्वाला सलाम !!!

तो एक शेर ऐकला आहेस का ?

हम शम्मा है रहते है मगर परवानो मे

म्हणजे हा शेर मानसिकते संदर्भात आहे बर का नाही तर अजुन काही वेगळा च विचार करशील.

स्वगत "- (सांभाळुन रे बाबा मारवा कितीदा सांगितलय तुला जपुन बोल )

सतिश गावडे's picture

27 Oct 2014 - 11:12 am | सतिश गावडे

>> हम शम्मा है रहते है मगर परवानो मे
ये हुई ना बात !!!

मात्र मला राहून राहून वाटून र्हायलंय की तुम्ही अवतारधारी* आहात.

*इथे पुरुष शब्द लिहू की नको या संभ्रमात पडलो. मग नाहीच लिहिला. अवतारधारी काय पुरुषच असतो होय, स्त्रीही असू शकते.

मारवा's picture

27 Oct 2014 - 11:46 am | मारवा

माझी भीती खरी ठरली सतिश
चुकीची च वाट धरलीस रे बाबा शेवटी. परत फिर पांथस्था परत फिर
ईश्वर तुला सत्याच्या राजमार्गावर त्वरीत परत खेचुन आणो.
लहरो से लडती हुइ नाव को जैसे मिल ना रह हो किनारा
ईश्वर तुझ्या होडीला तात्काळ कीनारा दाखवो.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Oct 2014 - 1:15 pm | अत्रुप्त आत्मा

@ईश्वर तुझ्या होडीला तात्काळ कीनारा दाखवो. >>> =))

सतिश गावडे's picture

27 Oct 2014 - 1:26 pm | सतिश गावडे

ईश्वराला होडी किनार्याला लावता आली असती तर जगाच्या इतिहासात कुणीच पाण्यात बुडून मेलं नसतं.

सुनील's picture

27 Oct 2014 - 2:11 pm | सुनील

प्रासंगिकतेचा संदर्भ आता उरला नसल्यामुळे, ह्या प्रासंगिक पाकृकडे आता एक निव्वळ पाकृ म्हणून पाहता यावे!

सुनील's picture

5 Nov 2014 - 12:18 pm | सुनील

अजून एक फार पूर्वी लिहिलेली पाकृ आठवली -

पाण्यावर तळलेले अंडे!

टवाळ कार्टा's picture

5 Nov 2014 - 12:33 pm | टवाळ कार्टा

हैल्ला...हे नवीनच वाचतोय

विजुभाऊ's picture

27 Oct 2014 - 2:15 pm | विजुभाऊ

ईश्वराला होडी किनार्याला लावता आली असती तर जगाच्या इतिहासात कुणीच पाण्यात बुडून मेलं नसतं

ईश्वराला तेवढा एकच उद्योग आहे का?

सस्नेह's picture

27 Oct 2014 - 2:26 pm | सस्नेह

नेमके काय उद्योग करीत असतो
अशी आपली कल्पना/माहिती आहे ?
(कृपया माहितीसाठी विदा द्यावा )

सतिश गावडे's picture

27 Oct 2014 - 3:04 pm | सतिश गावडे

ईश्वराला तेवढा एकच उद्योग आहे का?

ते मला माहिती नाही. तुमच्या या प्रश्नावरुन तुम्हाला ते माहिती आहे असे दिसते. कृपया प्रकाश टाकावा.

विजुभाऊ's picture

28 Oct 2014 - 5:16 pm | विजुभाऊ

तुमच्या या प्रश्नावरुन तुम्हाला ते माहिती आहे असे दिसते. कृपया प्रकाश टाकावा.

माझा खरेतर प्रश्न होता की इश्वराला तेवढे एकच काम असते का? की इतर आणखीही कामे असतात. उदा प्रत्येक मंदीरात अंघोळ करवून घेणे , नैवेद्य चाखणे , भक्तांचे नमस्कार स्वीकारणे , झालेच तर स्पेश्यल दर्शन तिकीट काढून आलेल्या भक्ताना स्पेश्यल दर्शन देणे , भक्तानी तयार केलेल्या कॅसेटी ऐकणे , प्रत्येकाच्या हाकेला ओ देणे , विटेवर उभे रहाणे , भक्ताना बोलावणे , लोकांच्या अंगात जाणे , मंत्र / जप ऐकून शाम्त होणे , वहीत लिहीलेले श्री राम जयराम जयजयराम वाचणे वगैरे.

एस's picture

27 Oct 2014 - 3:20 pm | एस

चहा आपण प्यावा आणि अंडे कोंबडीला उबवायला द्यावे. त्यातून पिल्लू बाहेर आले की त्याला आनंदा असे नाव द्यावे. आनंदीपण चालेल. अशीच प्रोसेस दोनदा केल्यास अधिक आनंदाची निर्मिती आपसूकच होत राहील. कोंबड्यांना मराठी कळत नसल्याने सगळ्याच पिल्लांना एकच नाव दिले तरी ती आक्षेप घेणार नाहीत.
शुभेच्छा!

स्वप्नज's picture

30 Oct 2014 - 8:10 pm | स्वप्नज

_/\_

बोका-ए-आझम's picture

2 Nov 2014 - 11:55 am | बोका-ए-आझम

मस्तच. लईच आध्यात्मिक!

याला बहुतेक 'एग बास्केट' की 'एग इन बास्केट' असे नाव आहे. नक्की काय नाव आहे ते माहित नाही कारण हा प्रकार कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, सातारा, कोपरगाव, कु़काणा (ताल. नेवासा, जिल्हा अहमदनगर), आणि भोपाळ, इत्यादी शहरातील/खेड्यातील गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना परवडणार्‍या हॉटेलात मिळत नाही. वरच्या वर्गांना परवडत असणार्‍या हॉटेलात मिळत असल्यास मला कल्पना नाही.

सर्वप्रथम मी हा पदार्थ पाहिला तो एका सिनेमात, त्याचे नाव 'V For Vendetta'. हे फार पूर्वी झाले. तो सिनेमा पाहिला, तेव्हा "नेट" च्या सर्वसमावेशकतेची मला एवढी कल्पना नव्हती. ती कल्पना आली सुमारे तीन वर्षांपूर्वी आणि मग मी सिनेमाचे नाव टाकून पाककृती शोधून पाहिली. पहिल्याच प्रयत्नात यश आले.

साहित्यः एक ब्रेडचा जाडसर स्लाइस, एक लहान वाटी, आणि एक गावठी अंडे (लहान असते म्हणून घ्यायचे, चवीत मला काहीही फरक वाटलेला नाही.), थोडे तेल, चवीनुसार मीठ, तिखट व इतर मसाले.

कृती: लहान वाटीने स्लाइसच्या मधोमध एक चकती कापून घ्यावी. चकतीचा एरवी काही उपयोग नाही, काही इतर प्रयोग करायचे असतील तर ठेवा नाहीतर टाकून द्या/लगेच खाउन टाका. मग मंद आचेवर एक तवा ठेवून त्यावर थोडे तेल घेऊन हा शिल्लक राहिलेला स्लाइस ठेवा. त्यावर एक अंडे फोडून हळूच ओता. थोडेफार बाहेर जातेच ते जाऊ द्या. मग पटकन मीठ, तिखट आणि मसाले घाला. खालून सेट व्हायला लागल्यावर उलटा. आजपर्यंत मला हे न सांडता उलटता आलेले नाहिये. त्यामुळे जाणकारांचे सल्ले येतायत का बघा...

दोन्ही बाजूंनी सेट झाल्यावर गरम गरम खायला घ्या....

शिद's picture

28 Oct 2014 - 8:00 pm | शिद

जबरदस्त पा़कृ. आताच नेटवर शोध घेतला आणि खालील विडीओ मिळाला.

कपिलमुनी's picture

29 Oct 2014 - 1:20 pm | कपिलमुनी

अंडे हा आवडता पदार्थ आहे . येत्या विकांताला करून पहाण्यात येइल.

@कंफ्युज्ड अकौंटंट तुम्हास धन्यवाद

अनेक अनेक धन्यवाद कन्फ्युज्ड अकौंटट जी या रेसीपी व त्यामागील इंटरेस्टींग माहीतीसाठी देखील धन्यवाद !

कपिलमुनी's picture

30 Oct 2014 - 3:54 pm | कपिलमुनी

गुगलून पहाता एग बेनेडिक्ट ही रेसिपी सापडली .

हा फोटू आंजा वरून साभार
egg

मारवा's picture

30 Oct 2014 - 7:49 pm | मारवा

मुनिवर धन्यवाद !
जो पुरवत नाही केवळ पाककृती
जोडतो सोबत चित्र
तोच खरा मित्र
धन्यवाद मुनिमित्रा

काकाकाकू's picture

31 Oct 2014 - 3:14 am | काकाकाकू

हा अजून एक प्रकार....

https://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=yUgIcl6GRvY

कपिलमुनी's picture

31 Oct 2014 - 1:08 pm | कपिलमुनी

हीच ऑम्लेट पॅन मधे केली आणि न हलवता तसाच शिजू दिला तर केक सारखा दिसता .
खालच्या थराला परतलेला कांदा आणि मसाला आणि वरती अम्ड्याचा आवरण .. मस्त लागता.