याआधीचा लेख खालील लिंकमध्ये वाचणे.
कलगीतुरा - पूर्वार्ध
कांतीशेठ गेल्यानंतर दार लावायला गेलो तर आमच्या सोसायटीतला त्रस्त समंध गोगटया गॅलरीतून कुचेष्टेने हसत ऊभा होताच. लगेच खवचटपणे " काय दिगूशेठ ? नवीन व्हेंचर का? " असे म्हणत खिदळलाच. या गोगटयाची गॅलरी आणि आमची खिडकी समोरासमोरच आहे. हरामखोराला आमच्या घरातली एकूणएक वित्तंबातमी गॅलरीत बसून कळते. या थेरडयाचे मी शंभर अपराध भरायची वाट बघतोय. मला लगेच वाशाला गाठायचे होते, म्हणून मी गोगटयाकडे दुर्लक्ष केले.
मी लगेच वाशाच्या घरी फोन लावला. फोन त्याच्या बायकोने ऊचलला. वाशा कुठेय विचारले तर ती म्हणाली आज ऑफीसला सुट्टी आहे ना, म्हणून ते नेहमीच्या कामगिरीवर गेलेत. वाशाला लोकेट करायला मला एव्हढा क्ल्यू पुष्कळ होता. वाशाच्या कामगिरीचे कार्यक्षेत्र म्हणजे फर्ग्युसन रोड. गुडलक चौक ते ज्ञानेश्वर पादुका चौक या टापूत तो कुठेही भेटेल याची मला खात्री होती.
मी लगेच मोटरसायकल काढली आणि फर्ग्युसन रोडला कूच केले. अपेक्षेप्रमाणे वाशा वैशालीजवळ दिसलाच. एक मोटरसायकल मिडल स्टँडवर लावली होती.तिच्या सिटवर बसून वाशाची जोरदार टेहळणी चालली होती. वास्तवीक वाशाने नुकतीच पंचेचाळीशी ओलांडलीय. पण म्हणतात ना, जीत्याची खोड ! आईबापाने नाव पण साजेसे ठेवलेय. वासूदेव! मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे.
मी गूपचूप मागून गेलो आणि वाशाच्या पाठीवर थाप मारली. वाशाने दचकून मागे पाहीले.
"काय वाशा, काय चाललंय? "
"कुठे काय . अरे हीने बरेच दिवस वैशालीचा डोसा खाल्ला नाही. म्हणाली आज जाऊ या का. तिचीच वाट बघतोय." वाशा.
ही चक्क लोणकढी थाप होती. पण वाशाकडे आज मह्त्वाचे काम होते म्हणून त्याला दुखवून चालणार नव्ह्ते.
"बरं वाशा, तुझ्याकडे एक महत्त्वाचे काम आहे." मी.
"तू फक्त बोल. नाय काम केलं तुझं तर वाशा नाव लावनार नाही. चिंगीला इंजीनीरिंगला अॅड्मिशन पाहीजे का? आपला फक्त एक फोन बास होईल. कुठल्या कॉलेजमधे पाहीजे बोल.विदौट डोनेशन अॅड्मिशन मिळवून देतो..."
"नाही रे. चिंगी यावर्षी अकरावीला आहे."
"मग पिंटयाला बिशपस किंवा डीपीएसला अॅड्मिशन घ्यायची का?" वाशा काय थांबायला तयार नव्हता.
"नाही रे.."
"आपल्या खूप ओळखी आहेत. आत्ताचीच गोष्ट सांगतो…”
आता गोष्ट ऐकल्याशिवाय सुटका नव्ह्ती.आमच्या चांडाळचौकडीतले अजून दोघे जण नव्ह्ते. नाहीतर त्यांनी वाशाची खेचायला सुरुवात केली असती. वाशाची कुचाळकी करणारे इतर दोघे जण नसल्यामुळे तो आता बिनधास्त होता.
"वैशालीजवळ मला आत्ता कुणी सोडलं असेल?'''"
"....."
"तुझा विश्वास बसणार नाही. अजीतदादांनी त्यांच्या गाडीतून सोडलं."
"काय सांगतोस !..."
"मग? शाहू कॉलेजच्या ग्राउंडवर मोठया साहेबांची सभा होती आज. ही गर्दी. मी तिस-या चौथ्या रांगेत बसलो होतो. साहेबांची नजर सभेवर घारीसारखी फिरत होती. माझी न त्यांची नजरानजर झाली मात्रं ! त्यांनी स्मित केले आणि शेजारी सुप्रियाताई बसल्या होत्या, त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. सुप्रियाताईंनी शेजारी विश्वजीत कदम बसले होते, त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. विश्वजीत कदमांनी शेजारी छ्गन भुजबळ बसले होते, त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. छ्गन रावांनी शेजारी आर्.आर. आबा पाटील बसले होते, त्यांच्या..."
" कळलं. सगळ्यात शेवटी कोणाच्या कानात सांगितलं ते सांग.". मी वैतागलो. हो. नाहीतर स्टेजवर जेव्ह्ढे पुढारी असतील नसतील त्या सगळ्यांची नावे हा सांगत बसला असता.
"सगळ्यात शेवटी आपले सबसे बडा खिलाडी होते."
"कलमाडी साहेब? अरे पण त्यांना तर प्रचारापासून लांब ठेवलंय ...?"
"आज होते! तर ते उठले आणि आपले मुख्यमंत्री चव्हाणसाहेब भाषण करत होते, त्यांच भाषण त्यांनी थांबवलं आणि त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं."
हे देवा. मी डोकं गच्चं धरलं. पुढे काय ऐकायला लागतय याची तयारी केली.
"चव्हाणसाहेबांनी माईक हातात घेतला आणि अनाउंसमेंट केली, मिष्टर वासुदेव तिरमारे, प्लिज कम ऑन दि स्टेज. मिष्टर पवार साहेब आर कॉलींग यु .."
" मिष्टर पवार साहेब आर... ? "
"मग? मोठे साहेब आहेत ते. रिस्पेक्ट दयायला नको? चव्हाणसाहेब हार्वर्डमधे शिकलेत. अशी चूक करणार नाहीत ते. तू उगाच नाही त्या चूका काढू नको. तर चव्हाणसाहेबांनी अनाउंसमेंट करताच मी टेचात उठलो आणि छाती पुढे काढून स्टेजवर गेलो. सगळे माझ्याकडे कुतुहल, कौतुक, आदर अश्या नजरेने बघत होते. चॅनेलवाल्यांचे सुद्धा माझ्यावरच कॅमेरे .." वाशा आता वेगळ्याच दुनियेत दिसत होता.
"साहेबांनी अजितदादांना सरकायला सांगितले आणि मला त्यांच्या बाजूला बसवून घेतले. सभा संपेपर्यंत मी त्यांच्या बाजूला बसलो होतो ."
"आई शप्पथ. आयला वाशा तू म्हणजे.." मी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोललो.
"सभा संपल्यावर साहेब मला म्हटले येत जा असेच सभेला. आणि आल्यावर खाली बसायचं नाही बरं का असा प्रेमाचा दम दिला."
"काय सांगतोस ?"
"मग? मग अजितदादा म्हटले येताय का आमच्याबरोबर मॅरीएटमधे जेवायला? मी म्हटले नको, वैशालीत पत्नी येणार आहे, ती वाट बघत असेल. मग त्यांनी मला येथे त्यांच्या गाडीतून सोडले."
"आयला, खरंच वाशा, तू म्हणजे ग्रेट आहेस. अरे काम याच्याशीच संबंधीत आहे. तुझ्या एव्ह्ढया मोठया लोकांशी ओळखी आहेत, तर त्याचा उपयोग का नाही आपल्या भल्यासाठी करून घ्यायचा ? "
मग मी त्याला कांतीशेठचे प्रपो़जल डीटेलवारी सांगितले.
" बघ वाशा, तू हे जर जमवले, तर मला जे पर्सेंटेज ठरवलेय, तेच तूला पण मी कांतीशेठला दयायला लावीन. शंभर कोटी प्रॉफिट म्हणजे प्रत्येकी १० कोटी तुझे आणि माझे." वाशा डोळे विस्फारून ऐकत होता.
"झालं ! काम झालंच म्हणून समज. " वाशा पेटला. " परवाच मला राज साहेबांचा फोन आला होता पुण्यात काय हवा आहे विचारण्यासाठी. आपले एकदम जवळचे संबंध आहेत. आता परवाचीच गोष्ट ..."
"वाशा, आता गोष्ट राहू दे. दोघा भावांना कसं पटवायचं आणि टी.व्ही. वर कसं समोर आणायचं त्या कामाला लाग." मी .
"ठिक आहे. पण कांतीशेठला खिसा ढीला ठेवावा लागेल."
"ते मी सांगतो त्याला. आपण आता कांतीशेठकडे जाऊ आणि त्याच्याशी चर्चा करू."
कांतीशेठला भेटल्यानंतर वाशाने त्याचे कमिशन ठरवून घेतले आणि मला म्हणाला तू जा. आता मी आणि शेठ बघून घेतो पुढचं.
तीन दिवसांनी कांतीशेठचा फोन आला, " अरे दिगूशेठ, तुमच्या दोस्तानी जमवलं बरं का. आता ८० टक्के काम फत्ते झालं. आता इव्हेन्ट मॅनेजमेंटचे काम एका कंपनीला दिले की झाले."
मला अचानक वाशाबद्दल आदर वाटायला लागला. बिचा-याची आपण उगाचच खेचायचो. दोन भावांना समोरासमोर डिबेटींगला आणले म्हणजे जबरदस्त मुत्सद्देगिरीची कामगिरी केली न काय. मला तर या कामगिरीची तुलना शिवाजी महाराजांनी अफजल्खानाला प्रतापगडावर भेटीला बोलवण्यासाठी जेव्ह्ढी पराकोटीची मुत्सद्देगिरी पणाला लावली असेल त्याच्याशी करावीशी वाटली.
कांतीशेठनी वर्तमानपत्रे, टी.वी चॅनेलवरती वातावरणनिर्मिती करायला सुरुवात केली. तमाम जनता त्या दिवसाची उत्कंठेने वाट पाहू लागली.
...(क्रमशः )...
प्रतिक्रिया
30 Apr 2014 - 9:31 pm | मुक्त विहारि
कथा बर्यापैकी पकड घेत आहे.
क्रमश: वाचून बरे वाटले.
5 May 2014 - 8:22 pm | बबन ताम्बे
:-)
30 Apr 2014 - 9:54 pm | शुचि
खूप च मजा येतेय. पवार साहेब आर कॉलींग .... :D .. :D .. :D
5 May 2014 - 8:23 pm | बबन ताम्बे
थँक यु टू :-)
30 Apr 2014 - 11:16 pm | आतिवास
चांगली पकड घेतलीय कथेने.. मजा येतेय वाचायला!
5 May 2014 - 8:23 pm | बबन ताम्बे
:-)
30 Apr 2014 - 11:18 pm | पैसा
पुढचा भाग लौकर येऊ दे!
5 May 2014 - 8:24 pm | बबन ताम्बे
पुढील भाग टाकलाय.
:-)
1 May 2014 - 7:30 am | स्पंदना
कांतीशेठ! :))
मस्त !
5 May 2014 - 8:25 pm | बबन ताम्बे
:-)
1 May 2014 - 7:36 am | चौथा कोनाडा
मजा येतेय वाचायला ! तुमचे कॅरेक्टरायझेन झकास आहे. डोळ्यापुढे पात्रं उभी राहतायत !
पुढील भागाची उत्सुकता वाढलीय ! टाका लवकर पुढचा भाग !
5 May 2014 - 5:46 pm | बबन ताम्बे
पुढ्चा भाग टाकलाय. अभिप्राय जरूर कळवणे.
कलगीतुरा - भाग ३
5 May 2014 - 12:58 pm | बबन ताम्बे
सर्व वाचकांना धन्यवाद.
पुढील भागाची लिंक देत आहे.
कलगीतुरा - भाग ३
5 May 2014 - 2:38 pm | प्यारे१
भारीच्च्च!
एकेक नग डोळ्यापुढं उभे.
5 May 2014 - 4:30 pm | बबन ताम्बे
श्री. प्रशांत आवले,
धन्यवाद.