टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
मिपा संपादकीय - "अब और कितना गिरना बाकी है "?
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
२००५ मध्ये "मातृभूमी ए नेशन विदाउट विमेन" नावाचा सिनेमा पाहिला..बरीच परीक्षणं वाचलेली होती,गोष्ट माहित होती, आपण एक सामाजिक आशय असलेला सिनेमा पाहून संदेश वगैरे घेऊन प्रसन्न मनाने बाहेर पडणार इतकी बाळबोध अपेक्षा नव्हती तरी सिनेमा इतका त्रास देऊ शकेल असंही वाटलं नव्हतं... लिंगभेद, स्त्रीभ्रूणहत्या, जातिभेद यांचं इतकं भडक भयानक रूप पाहताना कोणीतरी कानाखाली आवाज काढल्यासारखं वाटलं.....बाहेर येताना सुन्न वगैरे झालोच, मग एक पहिली प्रतिक्रिया म्हणजे एका संवेदनशील विषयावर इतका भडक सिनेमा बनवल्याबद्दल "मनीष झा'ला यथेच्छ शिव्या घातल्या...
पुढचे काही दिवस "मला सिनेमा अजिबात आवडला नाही " असे म्हणत राहिलो " असं कुठे असतं का? आपला समाज इतका काही वाईट व्हायचा नाही "अशा डिनायलमध्येही गेलो....त्यालाही काही अर्थ नव्हता...या विषयावर गुळमुळीत, सपक, गोग्गोड सिनेमा कसा बनवणार होता तो ? आणि समजा बनवला असता तरी इतका भिडला असता का?
तंत्रज्ञान जसं वाढत गेलं तशा गर्भलिंगनिदानाच्या टेस्ट अधिकाहिक विश्वसनीय, परवडणार्या होत गेल्या पण त्यामुळे स्त्रीभ्रूणहत्येचं प्रमाण फ़ार वाढलं. १९९४ला स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायदा झाला व गर्भलिंगनिश्चितीवर बंधने घालण्यात आली. तरी १९९१ मध्ये भारतातील स्त्रियांचं प्रमाण हजारी ९७१ होतं ते २००१ च्या सुमारास ९४१ इतकं कमी झालं.असल्या प्रॊब्लेमचं मूळ खेड्यात आणि अशिक्षित जनतेत असावं असा गैरसमज मी सुद्धा अनेक वर्षं जोपासला. पण आकडेवारी काही वेगळंच सांगते. हरयाणा आणि पंजाबमधल्या काही सधन जिल्ह्यांमध्ये स्त्रियांचा जन्मदर ८५०च्याही खाली उतरला आहे, असं ऐकतो...
महाराष्ट्र प्रगत आहे, तिथे असलं नसेल किंवा कमी असेल असं मानण्याचं काही कारण नाही..उलट भारतातील सर्वात जास्त अल्ट्रासाउंड क्लिनिक्स महाराष्ट्रात आहेत आणि जिथे अल्ट्रासाऊंड क्लिनिक्स जास्त तिथे जुवेनाईल सेक्स रेशो घटतोच हे नक्की सिद्ध झाले आहे. ...श्रीमंत आणि प्रगतिशील जिल्ह्यांमध्ये , कारखाने आणि बागायती असलेल्या जिल्ह्यांमध्ये स्त्रीभ्रूणहत्या जास्त दिसते...पुणे मुंबई, कोल्हापूर, नाशिक आणि सांगली हे जिल्हे यात प्रचंड आघाडीवर आहेत.... ( आणि अरुणाचल, मणिपूर आणि छत्तीसगढमधले आदिवासी बहुसंख्य असलेले काही जिल्हे असे आहेत जिथे स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक आहेत.)
जालावरच्या एका चर्चेत सुशिक्षितांपैकी अनेक जण व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली लिंगनिश्चितीचं समर्थन करताना पाहिले तेव्हा अंगावर काटा आला. हायकोर्टात याचसंदर्भात एका जोडप्याने गेल्या वर्षी एक याचिका दाखल केली होती, "पहिली मुलगी असल्यास आम्हाला दुसर्या मुलासाठी लिंगनिश्चितीचा अधिकार मिळायला हवा..माझ्या कुटुंबाचा समतोल राखणं हा माझा मूलभूत मानवी अधिकार आहे" असं त्यांचं म्हणणं होतं....ही याचिका हायकोर्टने कडक शब्दांत फ़ेटाळली की अशी परवानगी देणं हे स्त्रीभ्रूणहत्येला कायदेशीर परवानगी दिल्यासारखं होईल ... ती याचिका फ़ेटाळली म्हणून बरे...तशाही पळवाटा आहेतच...
१९९४ च्या गर्भनिदान विरोधी कायद्यान्वये खालील कारणासाठी गर्भपातांना परवानगी आहे
१....(failure of contraception) चुकून झालेली / नको असलेली गर्भधारणा..
२....( genetic abnormality) गर्भामध्ये काही गंभीर आजार / डिफ़ॊर्मिटी असतील तर
परंतु याच गोष्टी इच्छुकांसाठी उत्तम पळवाटा आहेत...
एका हॊस्पिटलमध्ये नोकरी करणार्या सोनॊलोजिस्टने सांगितलेली गोष्ट प्रातिनिधीक मानता येईल... त्यांनी एका जोडप्याला गर्भलिंगनिदानासाठी स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि हे बेकायदेशीर आहे अशी जाणीव करून दिली. मग त्यांनी बाहेरून कुठून तरी लिंगनिश्चितीचे काम करून घेतले, आणि पुन्हा त्याच हॊस्पिटलला येऊन गायनॆकॊलोजिस्टकडे जाऊन पुढचा कार्यभाग उरकला...अशा वेळी हे जोडपे त्या गायनेकॊलोजिस्टला ही नको असलेली गर्भधारणा आहे असे कारण देते.... ते सोनॊलोजिस्ट म्हणाले, "हे असेच चालू असते, मी तरी काय करू शकतो?"
मला या बाबतीत दोन महत्त्वाचे मुद्दे मांडावेसे वाटतात...
...
१. डॊक्टरांनी जबाबदारीने वागायची आवश्यकता...
वरील उदाहरणात जर बाहेरच्या डॊक्टरांनी गर्भलिंगनिदान सांगितलेच नाही तर हे घडायचा संबंधच येत नाही... बहुसंख्य डॉक्टर जरी हे नियम पाळत असले तरी थोड्या पैशांच्या मोहाने हे सारे करणारे डॉक्टरही आहेतच... याला कोणतेही नैतिक कारण वगैरे असेल असे पटण्यासारखेच नाही...
...असाही एक किस्सा वाचला होता की एक डॊक्टर कायद्याच्या भीतीने स्पष्ट लिंगनिदान सांगत नसत परंतु पुढची अपॉइन्ट्मेंट monday ला दिली तर मेल आणि friday ला दिली तर फ़ीमेल अशी त्यांची पद्धत होती.( त्याबद्दल इतर स्टाफ़कडून पेशंटला आधीच पढवून ठेवण्यात येत असे).. आता या डॊक्टरला कसं काय पकडणार?
एक दक्षिण महाराष्ट्रातले एक मोठे गायनॆकॊलोजिस्ट आहेत ... ३० वगैरे वर्षांची प्रॆक्टिस, मुलगा सून वगैरे सुद्धा डॊक्टर्स, रेप्यूटेड मोठे हॊस्पिटल वगैरे वगैरे झकास आहे.. पण त्यांना बेकायदेशीर गर्भपाताच्या कायद्यान्वये अटक होऊन त्यांचं सोनोग्राफी मशीन सील केलं गेलं, हा पेपरातला फोटो पाहून माझ्या काकानं मला माहिती दिली की त्यांना काही वर्षांपूर्वी सुद्धा अशीच अटक झाली होती, आरोप सिद्ध न होता त्यांना सोडून देण्यात आलं.... म्हणजे एकदा अटक होऊनही त्यांचं काम चालूच राहिलं होतं... इतकी वर्षं प्रचंड कमावूनसुद्धा हेच काम पुन्हा आपल्या मुलाला सुनेला करायला लावणार्या या डॉक्टरांना केवळ पैशांचं मोटिव्हेशन असेल की अजून काही उदात्त विचार असतील ? मला तरी काही उत्तर सापडलं नाही... जनाची नाही निदान मनाची तरी लाज ठेवावी...?
मग कन्व्हिक्शन नसल्यामुळे अशा डॊक्टरांना कायद्याचं भय उरलेलं नाही, कायदा अजून कडक केला पाहिजे, दंड वाढवला पाहिजे, सक्तमजुरी वाढवली पाहिजे वगैरे सारं ठीक आहे पण डॊक्टरांची आणि एकूणच समाजाची मानसिकता बदलेपर्यंत हा मार्ग प्रभावी ठरेल असे मला वाटत नाही.
( कायद्याचा बडगा आणि पोलीस असल्याशिवाय आपण चांगलं वागूच नये का ? दंडुका घेतलेल्या पोलिसानं किती कायदे इम्प्लिमेंट करायचे ? सगळी जबाबदारी पोलिसांचीच का? पोलीसांनी दंगली खून दरोडे यांचा तपास करायचा की तुमचा पोरगा हुक्का ,सिगरेट, ड्रग्ज ओढतो का ते पहायचे? असा प्रश्न एका टॊक शो मध्ये पोलीस अधिक्षक नांगरे पाटलांनी विचारल्याचं इथे आठवतं.. )
२.लिंगभेदाची मानसिकता बदलायची गरज ...
....आपल्याकडे आशीर्वाद तरी कसे असतात? पुत्रवती भव वगैरे.... कथा कादंबर्यांतूनसुद्धा देशरक्षणासाठी शूर पुत्र होऊ दे वगैरेच भाषा.... का?.नवीन लग्न झालेल्या बाईला आडून आडून का होईना " मुलगाच हवा" वगैरे टाईपातले सूचक इशारे, कधी टोमणे, घरगुती समारंभात मुलगा असलेल्या बाईला स्पेशल प्रिव्हलेजेस असणे, हुंडा आणि लग्नसमारंभाचा प्रचंड खर्च वधुपित्याला करावा लागणे ( इथे माहितीतला एक आय टीमध्ये काम करणारा एक आंध्रातला इंजिनियर आठवतो जो स्वत:चा लग्नाच्या बाजारातला भाव अंमळ अभिमानानेच २० लाखापर्यंत असेल असे सांगत होता) या असल्या गोष्टीच गर्भवती स्त्रीवरचा मानसिक ताण प्रचंड वाढवत असणार यात शंका नाही. त्यातूनच ती कुटुंबाच्या दबावामुळे स्त्रीभ्रूणहत्येचा टोकाचा निर्णय घेत असणार...
एका दूरच्या नातेवाईक स्त्रीने पहिल्या मुलीनंतर मुलासाठी तीन वेळा गर्भपात करून घेतला होता, असं ऐकलं.... तिचे विचार असे की ती स्वत: तीन बहिणींबरोबर एकत्र वाढलेली होती आणि तिला म्हणे तिच्या मुलीचं असं होऊ द्यायच नव्हतं. ( असं म्हणजे नक्की कसं ते काही मला कळलं नाही आणि तिचंही तेच म्हणणं होतं की बाकीच्यांना काय कळणार माझ्या भावना?")
मातृभूमी सिनेमा पाहिला त्याच काळात एका नातेवाईकांकडे गेलो होतो आणि तिथे महिलावर्गाची आसपास कोणाकडेतरी मूल जन्माला आल्यानंतर काही गुंतागुंत होऊन दुर्दैवाने वाचले नाही , यावर काही चर्चा चालू असताना एक बाई एकदम म्हणाल्या ," ... आणि मुलगा होता हो...." सगळ्या बायकांनी संमतीदर्शक माना हलवल्या...मी जाम उखडलो, "याचा अर्थ काय , तर ती गेलेली मुलगी असती तर तुम्हाला कमी दु:ख झालं असतं, असंच ना?"
मान्यय, या सगळ्या मनात खोलवर रुजलेल्या गोष्टी असतात, पण प्रयत्नपूर्वक त्या कमी तर करायला हव्यात... जिथे अशा गोष्टी दिसतात, अशा रूढी-परंपरांना क्वेश्चन तरी करायला हवं.. ही जबाबदारी कोणाची ?? आपण ते करतो का? की हा तर प्रत्येकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न म्हणून गप्प बसतो ? की कधी हा आगदी चावून चोथा झालेला विषय म्हणून दूर ढकलत राहतो?? साहजिक आहे , मग साउथ दिल्लीचा सेक्स रेशो पोचतो ७६२ वरती आणि बोरीवलीमधला ७२८ वरती... दहा पंधरा वर्षांत आपण केवढे खाली गेलो आहोत...अजून पाच दहा वर्षांत हे आकडे ६०० होतील, ५०० सुद्धा होतील कदाचित.....हे असंच चालू राहिलं तर मातृभूमी सिनेमातलं मनीष झानं वर्तवलेलं भविष्य फ़ार दूर नाही..
म्हणूनच म्हणतो, "अब और कितना गिरना बाकी है "?
पाहुणा संपादक : भडकमकर मास्तर.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

हे खरोखरच
हे खरोखरच भयानक आहे. माझ्या मते, हा एक फार गुंतागुंत असलेला प्रश्न आहे. त्याची मुळं आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या प्रथांमधे आहे. अश्या समस्या नष्ट करायला समाजप्रबोधन हाच एकमेव मार्ग आहे. नुसते कायदे करून वगैरे भागणार नाही. (कायदा नुसता करून भागत नाही तर त्याची अंमलबजावणी ही कडक पणे झाली पाहिजे. कोण ते परकिय इंग्रज पण त्यांनी सती सारखी भयानक प्रथा निग्रहाने मोडून काढली आणि आपल्याला स्वतंत्र भारतात साधी गर्भलिंगचाचणी नाही थांबवता येत, गर्भपात थांबवणे तर पुढची गोष्ट.)
( कायद्याचा बडगा आणि पोलीस असल्याशिवाय आपण चांगलं वागूच नये का ? दंडुका घेतलेल्या पोलिसानं किती कायदे इम्प्लिमेंट करायचे ? सगळी जबाबदारी पोलिसांचीच का? पोलीसांनी दंगली खून दरोडे यांचा तपास करायचा की तुमचा पोरगा हुक्का ,सिगरेट, ड्रग्ज ओढतो का ते पहायचे? असा प्रश्न एका टॊक शो मध्ये पोलीस अधिक्षक नांगरे पाटलांनी विचारल्याचं इथे आठवतं.. )
बहुतांशी सहमत.
२.लिंगभेदाची मानसिकता बदलायची गरज ...
माझ्या पुरतं बोलायचं झालं तर, मला दोन्हीही मुलीच आहेत. मला त्याबद्दल कधीच वाईट वाटत नाही, ना माझ्या बायकोला आणि घरी अजून कोणाला. आमच्या मनात सुद्धा कधी आलं नाही. (माझा अनुभव, मुली बापाच्या जरा जास्तच लाडक्या असतात आणि त्याही बापाच्या पक्षपाती असतात.) माझ्या माहितीत अशी बरीच जोडपी आहेत ज्यांना १ किंवा २ मुली आहेत आणि त्या बाबतीत काहीसुद्धा तक्रार नाहिये त्यांची. म्हणजे, परिस्थिती सुधरते आहे हळूहळू, पण तो पर्यंत अजून किती बळी जाणार आहेत?
एक बाई एकदम म्हणाल्या ," ... आणि मुलगा होता हो...." सगळ्या बायकांनी संमतीदर्शक माना हलवल्या
भयानक... बरं झालं मी तिथे नव्हतो. त्या बाईंची खैर केली नसती.
मास्तर, तुम्ही एका अतिशय महत्वाच्या प्रश्नावर लिखाण केले आहे. आणि लिखाण ही अभ्यासपूर्ण आहे.
बिपिन.
धन्यवाद! मास्तर...
या लेखातील विचारांशी पुर्णपणे सहमत...!
मास्तर, फारच महत्वाच्या विषयावर लिहीले आहे आपण... धन्यवाद!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
मास्तर खूप
मास्तर खूप आवडला अग्रलेख.. मातृभूमी अजुन पाहायचाय, पण खूप जणांकडून ऐकले की काटा येतो अंगावर वगैरे.. पण खरंच हे असंच चालू राहीले तर ती वेळ दुर्दैवाने येईल.. हा अत्यंत गंभीर प्रश्न असला तरी अजुन लोकांना त्याचं गांभीर्य नाही कळलेले दिसतं.. स्त्रीभृणहत्या करणे तर सरळ-सरळ ह्त्या-खून आहे.. मग त्याला त्याप्रमाणेच शिक्षा का नाही होत?
असो, खूप छान, कळकळीने लिहीले आहे.. नाव समर्पक!
स्त्रीभृण
स्त्रीभृणहत्या करणे तर सरळ-सरळ ह्त्या-खून आहे.. मग त्याला त्याप्रमाणेच शिक्षा का नाही होत?
प्रश्न रास्त आहे...जीवनाची सुरुवात नक्की केव्हा सुरू होते यावर मतभेद असतात...( या प्रश्नाला अध्यात्मिक, मानसिक , वैद्यकीय दृष्टीकोन आहेत)... उदा. पूर्वीच्या ख्रिश्चन समजुतीप्रमाणे जेव्हा चौथ्या पाचव्या महिन्यात गर्भाची हालचाल जाणवायला लागते , (त्याला बहुधा क्विकनिन्ग म्हणतात) तेव्हा जीवनाची सुरुवात होते... आता हे उद्योग करणारे कदाचित असं मानत असावेत की तेव्हा त्या भ्रूणाच्या आयुष्याला सुरुवातच झालेली नसते....... असो...
माझं वैयक्तिक मत असंच की बीज फलित झाले की आयुष्य सुरू झाले....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
ज्वलंत विषयावरचा
विचारप्रवर्तक अग्रलेख. अभिनंदन. या समस्येवर माझ्या बाजूने काय करता येईल,याचा विचार करतो आहे.
(विचारमग्न)बेसनलाडू
अग्रलेख
आवडला, एका महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडल्याबद्दल अभिनंदन.
एक पहिली बेटी, धनाची पेटी ही (बहुधा सांत्वनपर) म्हण वगळली, तर 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' पासून 'अष्टपुत्रा सौभाग्यवती भव' पर्यंत सारे आशीर्वाद, सार्या म्हणी याच मानसिकतेचे दर्शन घडवतात. भारतीय जोडप्यांच्या दत्तक घेण्याच्या टेन्डन्सीवर एक लेख मागे वाचनात आला होता. बहुतेक जोडप्यांची पसंती अर्थात मुलांनाच होती.
पुढील काही वर्षांत स्त्री-भ्रूणहत्या थांबवण्याबरोबरच, एकंदरीतच समाजाची मानसिकता बदलण्यावर भर दिला नाही तर मातृभूमीत रंगवलेले कल्पनाचित्र प्रत्यक्षात उतरणे अशक्य नाही.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच म्हणतो!
मास्तर अतिशय ज्वलंत प्रश्नाला हात घातलाय!
मागील काही वर्षांपर्यंत बर्याच जोडप्यांचा "मुलगाच हवा" असा आग्रह होता.
सुदैवाने सध्या काही प्रमाणात साक्षरता अन् ग्लोबलायझेशनमुळे ही परिस्थिती बदलत आहे असे निदर्शनास येऊ लागले आहे.
बर्याच कुटुंबात मुलगा-मुलगी हा भेद केला जात नाही....घरात, कार्यालयात स्त्री-पुरुष समानता दिसुन येते....ही सर्व त्या दृष्टीने टाकलेली पहिली पावले मानता येतील.
नो डाऊट की आजही दुर्दैवाने काही प्रमाणात सुशिक्षीत कुटुंबात वंशाचा दिवा हवा असाच हट्ट धरला जातो. परंतु, ऍटलीस्ट शहरी भागाततरी लवकरच ही परिस्थीती बदलेल अशी आशा वाटते.
ग्रामीण भागाबद्दल जास्त कल्पना नाही परंतु त्यांना प्रबोधनाची नक्कीच जास्त गरज आहे!
असो लेख आवडला अन् यावर जाणकारांची मते वाचायला आवडतील!
- टिंग्या
ग्रामीण / शहरी
ग्रामीण भागाबद्दल जास्त कल्पना नाही परंतु त्यांना प्रबोधनाची नक्कीच जास्त गरज आहे!
मलाही बराच काळ असे वाटत असे...
पण मग शहरी भाग जर इतका पुढारलेला असेल तर तिथली आकडेवारी इतकी विसंगत कशी??
या बाबतीत शहरी आणि ग्रामीण अशी विभागणी थोडी फसवी आहे असे मला वाटते...
( कदाचित ग्रामीण भागात तंत्रज्ञानाला ऍक्सेस नाही तितका म्हणूनही ग्रामीण भाग बरा दिसत असेल परंतु त्यामुळे शहरी भाग कसा चांगला ठरणार?)
श्रीमंत जिल्हे नेहमीच कमी जुवेनाईल सेक्स रेशोवाले असतात.... वाचा हा दुवा... त्यातला एक ग्राफ दाखवतो की महाराष्ट्रातले नंदुरबार आणि गडचिरोली हे भाग अविकसित मानता येतील पण तिथला सेक्स रेशो ९८० च्या आसपास आहे....
http://infochangeindia.org/200601035920/Children/Books-Reports/The-riche...
आणखी काही दुवे..
http://www.hgalert.org/sexselection.PDF
http://foeticide.blogspot.com/
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
चांगला लेख
कळीचा मुद्दा विषयाला घेतल्यानेही लेखाला रंगत आली आहे. स्त्री-पुरूष हा भेद कायम राहणार. जोपर्यंत मुलीचे लग्न होऊन ती परक्या घरी जाण्याची प्रथा आहे आणि आई-वडिलांना उतारवयांत चरितार्थाचे साधन म्हणून मुलाकडे पाहण्याची गरज आहे तोपर्यंत मुलगा होणे हे अनेक कुटुंबांना हवे हवेसे वाटणारे आहे. शास्रांत सांगितले आहेच की मुलाने उत्तरक्रिया केल्याशिवाय पालकांना स्वर्गप्राप्ती नाही.
एक मजेशीर गोष्ट इथे ध्यानात येते की शहरांत हे मुलगा हवे असण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. याचे कारण शिक्षण, समानता इ. आहेच याबरोबर जागेचा प्रश्न हे ही आहे. दोन मुलगे असणार्या कुटुंबांना हे मुलगे वयांत आले की पोटात खड्डा येतो. त्यांची लग्ने करून इतकी कुटुंबे ३-४ खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहणे शक्य नसते आणि शहरांत दुसर्या जागा घेणे ही फार कठीण असते. या वरवर साध्या वाटणार्या पण मोठ्या समस्येतून लोकांना हल्ली निदान एक तरी मुलगी हवी असते.
कारण मुलींची लग्न उरकली की गेल्या आपापल्या घरी. म्हणजे खर्रेखुर्रे कारण मुलगी हवी हे नसून उतारवयात एकापेक्षा अधिक मुलगे असल्याने निर्माण होणार्या समस्यांना तोंड देऊ लागू नये हे असते.
असो, मातृभूमी हा चित्रपट पाहिलेला नाही. उत्तर भारतातील गावातील आहे का? पुण्या-मुंबईतही हीच परिस्थिती आहे असे ऐकून आहे. चू. भू.द्या.घ्या. लग्नाला उभे राहिलेले मुलगे आहेत पण पुरेश्या मुली नाहीत. ज्या आहेत त्यांनी आधीच आपल्याला हवे तसे नवरे निवडलेले आहेत.
मातृभूमी
मातृभूमी हा चित्रपट पाहिलेला नाही. उत्तर भारतातील गावातील आहे का?
हो... त्यांना भविष्यातला कधीतरीचा उत्तर भारत दाखवायचा असावा....
म्हणजे खर्रेखुर्रे कारण मुलगी हवी हे नसून उतारवयात एकापेक्षा अधिक मुलगे असल्याने निर्माण होणार्या समस्यांना तोंड देऊ लागू नये हे असते.
हं...हे एक वेगळे आणि योग्य निरीक्षण...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
विमनस्क
लेखानेच इतकी विमनस्कता आली...
आपला
गुंडोपंत
उत्तम लेख !
भडकमकरांनी एका ज्वलंत समस्येला अग्रलेखाचा विषय केले आहे. समस्येवर सांगोपांग विचार केला आहे. व्याप्ति नि खोलीच्या बाबतीत लेख उत्कृष्ट झाला आहे. या आणि स्त्रीवर्गाच्या इतर अनेक जटील समस्यांवर विचार करता काही मुद्दे सांगता येतील.) ( या मुद्द्यांचे स्वरूप र्हेटॉरिकल् (मराठी शब्द ?) आहे हा दोष मान्य करतो. म्हणजे "काय आवश्यक आहे" हे सांगतो आहे ; ते "कसे व्हायचे" याची चर्चा न करता. )
१. प्रतिगामी, कर्मठ विचारांच्या विळख्यातून समाजाची मुक्तता. वैज्ञानिक, मानवतावादी, विवेकी विचारांचे प्रबोधन.
२. स्त्रियांच्या हक्कांचे रक्षण आणि त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने अस्तित्वात आलेल्या हुंडाबंदी सारख्या कायद्यांचे कठोर पालन.
३. या प्रश्नांच्या नैतिक बाबींचे यथायोग्य ज्ञान (अवेअरनेस) वैद्यकीय प्रशिक्षणामधेच सामील करणे.
४. समाजातल्या तळागाळातल्या महिलांना या प्रश्नाबद्दल तक्रार नोंदणे सहजशक्य होईल अशा सुविधा शासकीय पातळीवर निर्माण करणे, अमलात आणणे.
५. मिडीया आणि एन जी ओज यांचा सहभाग. या प्रश्नाला प्रसिद्धी देत ठेवणे , प्रबोधन-मदतकार्य या बाबतीत या प्रश्नाला महत्त्वाचे स्थान देणे.
६. सेक्स रेशो, लहान बालिकांच्या मरणाचा दर , स्त्रियांच्या शिक्षणाचा दर , त्यांचा आर्थिक क्षेत्रातील सहभाग या नि अशा स्त्रियांच्या समाजातल्या स्थानाचा वेध घेणार्या मापकांची नियमित काळाने नोंद घेत ठेवणे.
मास्तर,
मास्तर, फारच महत्वाच्या विषयावर लिहीले आहे आपण... धन्यवाद!
डिट्टो! सुरेख जमला अहे लेख. २१ व्या शतकात, एकीकडे आपण परम संगणक तयर करतो अन् दुसरीकडे हे असंही लज्जास्पद वागू शकतो!!
खर्रेखुर्रे कारण मुलगी हवी हे नसून उतारवयात एकापेक्षा अधिक मुलगे असल्याने निर्माण होणार्या समस्यांना तोंड देऊ लागू नये हे असते.
खूप अंशी सत्य!
खिन्नता वाटली!
मास्तर, प्रतिक्रिया तरी काय देणार?
अशा लोकांपुढे प्रतिक्रिया तर सोडाच पण आपण कपाळ जमिनीवर आपटून जीव जरी दिला तरी त्याचा काय उपयोग!!!
बाकी,
मग कन्व्हिक्शन नसल्यामुळे अशा डॊक्टरांना कायद्याचं भय उरलेलं नाही, कायदा अजून कडक केला पाहिजे, दंड वाढवला पाहिजे, सक्तमजुरी वाढवली पाहिजे वगैरे सारं ठीक आहे पण डॊक्टरांची आणि एकूणच समाजाची मानसिकता बदलेपर्यंत हा मार्ग प्रभावी ठरेल असे मला वाटत नाही.
सहमत आहे! याबाबतीत कायद्याची नव्हे तर समाजप्रबोधनाची गरज आहे...
पण तोपर्यंत किती अश्राप मुलींचे बळी जाणार आहेत कोणास ठाउक!!!
याबाबतीत
याबाबतीत कायद्याची नव्हे तर समाजप्रबोधनाची गरज आहे...
हे खरे आहे.... पण धनंजय म्हणतात त्याप्रमाणे हा बदल साहजिकच अति हळू होणार आहे.... आणि कितीही कडक कायदे केले तरी डॉक्टर आणि पेशंट अकला चालवून त्यातून सुटणार.
तोपर्यंत किती अश्राप मुलींचे बळी जाणार आहेत कोणास ठाउक!!!हेच म्हणतो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
काय करावे?
भृणहत्या होणे आणि ती करणार्यांना उजळ माथ्याने समाजात वावरता येणे हे समाजाला लांच्छनासपद आहे. अशा विषयाकडे मिपाकरांचे लक्ष वेधून भडकमकर मास्तरांनी चांगले काम केले आहे. ह्या बाबतीत वेगवेगळ्या मार्गांनी जनजागृती होणे आवश्यकच आहे. केवळ सरकार किंवा एन जी ओ. वर विसंबून न रहाता नागरीकांनी जागरूकता दाखवणे हा जास्त परीणामकारक मार्ग ठरतो. समाजानेच जर ही काळी करणी लांच्छनास्पद आहे अशी धारणा दाखवली तर हळूहळू अशी कृत्ये बंद जरूर होतील. अर्थात ह्याला वेळ लागेल. हे काम एक दोन वर्षात होणारे नाही. मिपासारख्या सामाजीक जबाबदारी समजणार्या संस्थळांनी नेटाने करण्याचे काम आहे. हा विषय घेतल्याबद्दल भडकमकर मास्तरांचे अभिनंदन.
>>>बहुसंख्य डॉक्टर जरी हे नियम पाळत
असले तरी थोड्या पैशांच्या मोहाने हे सारे करणारे डॉक्टरही आहेतच..
........ अशा डॉक्टरांच्या खाटीक खान्यांपुढे शांततापूर्ण निदर्शने करता येतील कां?
मुक्तसुनीत यांनी "काय आवश्यक आहे" हे खूपच परीणामकारक सांगीतले आहे. मिपा खालील बाबतीत पुढाकार घेऊ शकते. आपण सर्वच लेखकांनी हे लक्षात ठेवायला हवे.
१. प्रतिगामी, कर्मठ विचारांच्या विळख्यातून समाजाची मुक्तता. वैज्ञानिक, मानवतावादी, विवेकी विचारांचे प्रबोधन.
५. मिडीया आणि एन जी ओज यांचा सहभाग. या प्रश्नाला प्रसिद्धी देत ठेवणे , प्रबोधन-मदतकार्य या बाबतीत या प्रश्नाला महत्त्वाचे स्थान देणे.
तात्यांसारखा संवेदनशील आणि सामाजीक जागृती असलेला सरपंच लाभलेल्या मिपावर आपण नक्कीच ह्या दॄष्टीने काही ठोस कामगीरी करू शकतो.
सुरेख..
मास्तर अतिशय सुरेख अग्रलेख...
मिपा संपादकीय अग्रलेखाची दर्जेदार परंपरा राखल्याबद्दल मनापासून धन्यवाद...
आपल्या अग्रलेखाचा विषय केवळ संतापजनक आहे. जी जी मंडळी स्त्रीभृणहत्येमागे जबाबदार असतात, कारणीभूत असतात ती मंडळी, 'आपली आईही एक स्त्री आहे आणि तिच्यामुळेच आपण हे जग पाहू शकलो' इतका साधा विचारही करू शकत नाहीत, किंबहुना त्यांची विचारशक्तिच इतकी खुंटलेली असते याचे नवल वाटते!
माझ्या मते स्त्रीभृणहत्येकरता संबंधित मंडळींचे हातपाय तोडून टाकण्याइतपत अधिकाधिक कडक कायदे केले पाहिजेत तरच या प्रकाराला शिक्षेची जबर दहशत बसून काही अंशी आळा बसेल. माझा उपाय कदाचित क्रूर व अमानुष वाटेल परंतु स्त्रीभृणहत्येसारख्या क्रूर व अमानुष कृत्यास अशीच शिक्षा हवी!
तात्या.
आकडेवारी आणि प्रश्न
"मातृभूमी ए नेशन विदाउट विमेन" हा चित्रपट फार पूर्वीच पाहिला होता. आजूबाजूला घडलेल्या काही घटना अशा चटका देणार्या आहेत की हा चित्रपट भडक वाटत नाही. दुधाने भरलेल्या हंड्यात नवजात बालिकेचा बळी देणे आणि केवळ स्त्रीलिंग आहे म्हणून शास्त्रशुद्धपणे गर्भातच निचरा करून टाकणे यांत काहीही फरक नाही. आजही मुलींचा लग्नात आणि लग्नानंतर मांडला जाणारा बाजार, लावली जाणारी विल्हेवाट पाहिली तर चित्रपटात दाखविलेली विवाहित स्त्रीची विटंबना बटबटीत वाटणार नाही.
मास्तरांनी विषय मांडला हे चांगले झाले. माणसाच्या सद्सद् विवेकबुद्धिला पाझर फुटावा ह्यासाठी जरूर प्रयत्न व्हावेत. पण तितके पुरेसे नसते हे अगदी स्पष्ट आहे. जे कोणी नराधम (येथे लक्ष्य फक्त "नरा"पुरते मर्यादित नाही.) असे हत्येचे/स्त्रीछळाचे कृत्य करतील वा करावयास हातभार लावतील त्यांस येनकेन प्रकारेण अद्दल घडवण्यास आपण (स्वतः तसेच समाज/कायदा) मागेपुढे पाहू नये. असो...
आणखी काही -
(१) जिथे अल्ट्रासाऊंड क्लिनिक्स जास्त तिथे जुवेनाईल सेक्स रेशो घटतोच हे नक्की सिद्ध झाले आहे.
> हे पटले नाही. समाधान होण्यासाठी आणखी थोड्या माहितीची अपेक्षा आहे.
> जरी हे खरे असले तरीही "अल्ट्रासाऊंड क्लिनिक्स"हे कारण असू शकत नाही. या क्लिनिक्सचा होणारा दुरुपयोग रोखण्यास येणारे अपयश आणि हलकट बाजारू वृत्ती हे सार्यांचे मूळ आहे.
(२) साऊथ दिल्ली आणि बोरिवली यांचे सेक्स रेशो कमी आहेत म्हणजे तेथे स्त्रीभृण हत्या होते आहे असा अर्थ निघत नाही. (कदाचित प्रत्यक्षात तसे असेलही पण किंबहुना नसेलही!) उद्योग व्यवसायात आजही पुरुष वर्गाचे प्रमाण जास्त आहे. खेड्यांकडून शहरांकडे पोट्यापाण्यासाठी जाणारी जनता प्राधान्याने पुरुष वर्गातील आहे. या सार्यांमुळेही शहरातील सेक्स रेशो फसवे असू शकतात. नेमके काय घडते आहे आणि कोणत्या प्रांतात घडते आहे हे नीट पाहणे गरजेचे आहे. म्हणजे मग हे कशाने घडते आहे याचा अधिक चांगला अंदाज बांधता येईल.
(३) २००१ मध्ये सेक्स रेशो सुधारला होता असे काहीसे वाचनात आले होते. पण ते म्हणे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने घडले होते. (कारणे ओळखा पण बक्षीस नाही - व्यसने, अपघात, तंबाखू इ.इ. ) http://www.indiatogether.org/2004/apr/hlt-csratio.htm
(४) हे पाहावे - सहज पण सुंदर माहिती http://www.mapsofindia.com/census2001/sexratio/sexratio-india.htm
(१) जिथे
(१) जिथे अल्ट्रासाऊंड क्लिनिक्स जास्त तिथे जुवेनाईल सेक्स रेशो घटतोच हे नक्की सिद्ध झाले आहे.
> हे पटले नाही. समाधान होण्यासाठी आणखी थोड्या माहितीची अपेक्षा आहे.
भारतातील सर्व गावे , जिल्हे आणि त्यांमधील अल्ट्रासाउंड क्लिनिक्स यांचा एक नकाशा आणि एक उत्तम आकडेवारी / सर्व्हे मी वाचलेली आहे...गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स ने घेतलेला सर्व्हे आहे...
त्याचा दुवा हा...
http://infochangeindia.org/index2.php?option=com_content&do_pdf=1&id=597...
http://www.hindu.com/2004/02/19/stories/2004021908070500.htm
अजून गूगलून पाहिले तर भरपूर दुवे मिळतील...
जरी हे खरे असले तरीही "अल्ट्रासाऊंड क्लिनिक्स"हे कारण असू शकत नाही. या क्लिनिक्सचा होणारा दुरुपयोग रोखण्यास येणारे अपयश आणि हलकट बाजारू वृत्ती हे सार्यांचे मूळ आहे.
अचूक बोललात....पर्फेक्ट.... दोष अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचा नाहीच्...ते अतिशय उपयोगीच आहे.
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
पुरून उरणे
पण ते म्हणे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने घडले होते. (कारणे ओळखा पण बक्षीस नाही - व्यसने, अपघात, तंबाखू इ.इ. )
स्त्रिया अनेक बाबतीत पुरूषांच्या पेक्षा जास्त कणखर असतात. संदर्भासाठी म.टा.तला हा लेख पहा:
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3178004.cms
विश्वास बसेल अशी विधानं आणि आकडेवारी (?) दिलेली आहे.
(समानतावादी) अदिती
'मातृभूमी'
'मातृभूमी' पाहताना हातपायाला कापरे भरल्याचे आठवते. अक्षरशः एखाद्या गाईसारखी दावणीला बांधली गेलेली ती स्त्री, तिच्या आयुष्यात नसलेले कुठल्याच प्रकारचे स्वातंत्र्य आणि माणसांची ती रानटी अवस्था पाहताना जीव घशाशी गोळा झाला होता. श्रीकांत बोजेवारांनी चित्रपटाचे परीक्षण करताना दिग्दर्शकाच्या बटबटीतपणाला नावे ठेवल्याचेही आठवते. ते वाचून माझ्यावरच कुणीतरी वैयक्तिक हल्ला करावा, तसे संतप्त आणि हवालदिल झाल्याचेही आठवते.
अखेरशेवट तुमच्या जातीचे (species) अस्तित्वाचे प्रश्न दुसर्या जातीला कळणे अशक्य नसले, तरी काहीसे दुरापास्तच, असे वाटले होते.
या अग्रलेखामुळे ते सगळे पुन्हा जागे झाले.
ज्या 'मातृभूमी'चे निमित्त झाले, त्यातला लिंगभेदाचा अनुभव हा लैंगिक अत्याचाराचे चित्रण करणारा, अंगावर येणारा, प्रतीकात्मक, भीषण अनुभव असेलही. पण वास्तवात त्याची बहुसंख्य आणि सूक्ष्म रूपे असतात. तुमच्यासोबत चालणारा तुमच्याइतकाच शहाणासुरता मित्र गर्दीतून जाताना एकाएकी तुमचा संरक्षक आणि पालनकर्ता होतो. एरवी व्यक्तिस्वातंत्र्य मानणारा बाप काही विशिष्ट बाबतीत तुमचे निर्णय स्वतः घेऊ पाहतो. नेहमी शहाणी वाटणारी माणसे 'मुलगा हवा - वारस हवा' म्हणून वेडीपिशी होऊन लिंगनिश्चिती आणि गर्भपातही करतात. आपल्यासारखीच वाटणारी सख्खी मैत्रीण लग्नानंतर 'आमच्याकडे असंच असतं' असं म्हणून निमूट नोकरी सोडून खेड्यात राहायला जाते. एक ना दोन.
संताप ही पहिली प्रतिक्रिया असते खरी. पण मग त्याची जागा हळूहळू कडवटपणा, मग तीव्र दु:ख आणि सरतेशेवटी एक शहाणपणा घेतो. हा अस्तित्वाचा झगडा आहे. सत्तेचा झगडा आहे. त्यात राजकारण आणि अशा अनेक घृणास्पद सूक्ष्मातिसूक्ष्म खेळी व्हायच्याच. दुर्दैवाने वा सुदैवाने - आपण रेषेच्या या बाजूला आहोत. रेषेच्या त्या बाजूला जाण्यासाठी नव्हे, तर रेषा पुसून टाकण्याकरता प्रयत्न करायला हवेत, याचे भान येत जाते. हे भान कधी पुसले न जावो. फक्त माझेच नव्हे, कुणाचेच.
मास्तर, एका भीषण प्रश्नावर नेमके बोट ठेवणारा अग्रलेख. अभिनंदन.
गंभीर विषय
स्त्रीभ्रूणहत्या हा मोठा गुंतागुंतीचा विषय चर्चेस घेऊन पाहुण्या संपादकांनी जबाबदारी चोख बजावली आहे.
हा एक जालीम सामाजिक गुन्हा आहे. पण या गुन्ह्याला कुठल्याही वैयक्तिक उदाहरणात पुरावा देता येत नाही. कुठल्याही एका गर्भपाताबद्दल गरोदर-स्त्री/पुरुष/डॉक्टर तिकडीला विचारले, तर "हा अनपेक्षित (अन्प्लॅन्ड) गर्भ होता" असेच काही उत्तर मिळेल - असा गर्भपात कायदेशीर असतो. पण सांख्यिकी आपल्याला सांगते, की हे असे फक्त स्त्री-गर्भाबाबतच होणार नाही, समप्रमाणात पुं-गर्भाबाबतही होईल, आणि शेवटी समसमान प्रमाणात मुली आणि मुले जन्म घेतील. ज्या अर्थी जिवंत जन्मलेल्या मुलींच्याच संख्येत घट झाली आहे, त्यावरून स्पष्ट अनुमान निघते, की स्त्री-भ्रूण म्हणून गर्भपात केला जात आहे.
समस्या अशी - संख्याशास्त्र सांगते की मोठ्या प्रमाणात गुन्हे होत आहे, पण प्रत्येक व्यक्ती कायदेशीर वागल्याचा सफल कांगावा करू शकतो. स्वतंत्र राज्यांमध्ये व्यक्तीच गुन्हा करू शकतो, "समाज" गुन्हा करू शकत नाही, व्यक्तीलाच दंड केला जाऊ शकतो, "समाजा"ला नाही. इथे कायदा किंकर्तव्यमूढ झालेला आहे.
(अशाच प्रकारे सांख्यिकी सामाजिक गुन्हे/वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे जातीबाहेर लग्न होऊ न देणे, परजातीच्या लोकांना सोसायटीतल फ्लॅट देणे, इ. इ. इथेसुद्धा प्रत्येक व्यक्ती जातीतल्या व्यक्तीशी लग्न करण्याचे स्वातंत्र्य सांगते, सोसायटीत घेतलेल्या लोकांचेच उत्तम अर्ज होते, असे सांगतात, आणि हे सांगण्याचे स्वातंत्र्य असते.)
या सर्व बाबतीत मास्तर म्हणतात ते खरे - समाजाच्या मनात हा अन्यायच "श्रेय" म्हणून खोल रुजला आहे. "...आणि मुलगा होता हो..." हे चुकून बोललेले वाक्य मनातली ठाम कल्पना सांगते. कायदा हतबुद्ध झाला आहे तेव्हा संस्कृतीत बदल करणे हेच महत्त्वाचे आहे.
समाजाच्या संस्कृतीची बाब आहे, हे कसे कळते? मास्तरांनी काही आदिवासी जमातींचे आकडे सांगितलेच आहेत. पण कर्नाटक, केरळ, तमिळ नाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल - या सर्व राज्यांत स्त्रीजन्मप्रमाण जीवशास्त्राच्या अपेक्षेप्रमाणे दिसते. यांच्यात गरीब राज्ये आहेत, श्रीमंत राज्ये आहेत, सुशिक्षित राज्ये आहेत, अशिक्षित राज्ये आहेत, साम्यवादी जोराची राज्ये आहेत, साम्यवादी कमजोर असलेली राज्ये आहेत - जे काही आहे ते आहे, पण त्या ठिकाणी स्त्री-शिशु-जन्माचे लांछन मानले जात नाही अशी संस्कृती आहे. ती महाराष्ट्रातही रुजू शकेल.
या बाबतीत तात्यांनी व्यक्त केलेली चीड मलाही तशीच वाटते. पण कठोर शिक्षा करायला जाळ्यात फार थोडे सापडतील असेही वाटते.
मुक्तसुनीत आणि इतरांनी सांगितलेले लोकशिक्षणात्मक आणि समाजसुधारणेचे उपाय हळूहळू (अति-हळू) वाटतात, तरीही कालांतराने काम देतील असे वाटते.
गंभीर
गंभीर विषय आणि हाताळणी.
तुम्ही दोघी बहिणीच का, भाऊ नाही का म्हणून लहानपणी अनेकांकडून प्रश्न ऐकले आहेत. अजूनही विचारतात!
ओळखीतल्या एका स्त्रीने दहा वर्षांपूर्वी मुलगा झाल्यावर सांगितले होते, की पहिल्या गर्भधारणेनंतर गर्भपात करून घेतला कारण मुलगी होती आणि एकच मूल हवे होते तर ते मुलगाच झालेले चांगले असे घरच्या सर्वांनी (ती धरून) ठरवले - तेव्हा काय बोलायचे ते कळले नव्हते.
अजून एका घरात "मुलीस भाऊ नसलेने" मुलीला लग्नाला नकार मिळाल्याची माहिती आहे. म्हणजे नवरीच्या भावावर (त्याच्या आणि कदाचित बहिणीच्याही ) घराची जबाबदारी, आणि त्या भावाच्या बहिणीचे मन माहेरी लागून रहाण्याचे कारण नाही, अशी खात्री झाल्यावरच लग्न करायचे.
मुलींना इतका तुच्छ समजणारा समाज किंवा त्या समाजाच्या धारणा समजायला अवघड आहेत, आणि ही परिस्थिती मनाला चटका लावून जाणारी आहे. सुशिक्षित म्हणवल्या जाणार्या घरांत असे दॄष्य दिसते तेव्हा वाईट वाटते म्हणण्यापेक्षा संताप येतो.
पण वर काही प्रतिसादांमध्ये म्हटल्याप्रमाणे कितीही हळू असला तरी लोकशिक्षण हा योग्य मार्ग आहे.
अतिशय गंभीर विषय
अतिशय गंभीर विषयाला ह्या उत्तम अग्रलेखातुन हात घातल्याबद्दल मास्तरांचे अभिनंदन.
वरील सर्व प्रतिसादातुन बरीचशी कारणे, उहापोह आलाच आहे त्याच्याशी सहमत.
सामाजीक परिस्थिती [प्रियाली, मुक्तसुनित यांनी लिहल्याप्रमाणे] बदलल्याशिवाय पर्याय नाही. तो पर्यंत कडक कायदे व उदाहरण घालुन दिले पाहिजे अश्या शिक्षा कितिही कडक वाटल्या तरी झाल्या पाहीजेत.
मुलांनी अजुन किती बेजबाबदार वागले पाहीजे की आई-वडलांना आपल्याला मुलगीच व्हावी असे वाटेल.
हु॑ड्याचे पैसे कोठून आणायचे?
भारतीय समाजातल्या अनिष्ट रूढी- पर॑पराही स्त्री-भ्रूण हत्त्येस कारणीभूत आहेत असे मला वाटते. 'हु॑डा' हे मला ठाऊक असलेली सर्वात चीड आणणारी प्रथा! माझ्या एका शेट्टी मैत्रिणीने सा॑गितलेला अनुभव अ॑गावर काटा आणणारा. त्या॑च्यात मुलगा झाला की बाप अत्यान॑दाने उड्या मारतो व वीस-प॑चवीस वर्षा॑न॑तर मिळणार्या घसघशीत हु॑ड्याची स्वप्ने पाहू लागतो. आणि मुलगी झाली तर रडतो व हु॑ड्याच्या प्रच॑ड रकमेची त्याच वेळेपासून जमवाजमव करायला सुरूवात करतो. शिकलेल्या मुलास कमीत कमी तीस लाख रेट पडतो (तिच्या अनेस्थिटिस्ट नवर्याला मिळाला होता!)
महाराष्ट्रातही हे प्रमाण लक्षणीय आहे. काही विशिष्ट जाती॑मध्ये हु॑डा पद्धतीचे फार स्तोम आहे. माझ्या काही लेवा-पाटिल मित्रा॑नी आपल्या पदव्युत्तर शिक्षणाचा वीस-प॑चवीस लाखा॑चा खर्च देऊ करणार्या वधूपित्या॑च्याच मुली॑शी लग्न केली आहेत व प्रवेश मिळविले आहेत. शिवाय न॑तर आलिशान दवाखाने थाटण्यासाठीसुद्धा सासर्याकडून पैसे उकळलेले आहेत. ग॑मत म्हणजे त्या मुली दिसायला, शिक्षणात वगैरे त्या मुला॑च्या तुलनेत एकदम बे॑गरूळ आहेत
शिक्षणाचा अभाव असे ह्या॑च्या बाबतीत म्हणावे तर ही म॑डळी एम.डी., एम.एस आहेत बर॑ का! असले डॉक्टर असले की मग गर्भलि॑गनिदानही करणे अवघड नाही. अर्थात मला कुठल्याही जातीवर शरस॑धान करायचे नसून वृत्ती॑वर आक्षेप घ्यायचा आहे हे सूज्ञा॑स सा॑गणे न लगे. चा॑गली उदाहरणेही असू शकतील.
असो. मास्तरा॑नी एका ज्वल॑त समस्येस हात घातला आहे व अग्रलेखाचे शिवधनुष्य उत्तमरित्या पेलले आहे.
खरंच हुंडा
खरंच हुंडा ही देखील चीड आणणारी घटना! माझ्या नवर्याचा मित्र आंध्रचा आहे, दिसायला बेताचा,शिक्षण ओके टाईप, आणि नोकरी अमेरीकेमधे कन्सल्टंट म्हणून.. म्हणजे कायमस्वरूपी नोकरी नाही.. प्रोजेक्ट मागे प्रोजेक्ट शोधायचे न तेवढे करायचे.. त्या मुलाला जवळ जवळ ५० एक लाखाचा ऍक्चुअल हुंडा आणि तेव्हढ्याच किंमतीची जमीन दिली हुंडा म्हणून.. म्हणे युएस मधे काम करणार्याचा 'रेट' तेव्हढा आहे!! पथेटीक !! मुलीला, घरच्यांना देण्यात काही वाटत नाही आणि यांना घेण्यात लाज वाटत नाही!! खरंच पथेटीक..
खरे आहे ....
आंध्रात ह्या गोष्टी अतिशय कॉमन आहेत. आपल्याकडे शक्यतो असे घडत नाही त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटते . मी सांगतो डिटेस्ल ...
आंध्रात "रेड्डी" नावाचा जो समाज आहे त्यात ह्या गोष्टी घडतात, हे लोक पुर्वी लँडलॉर्ड असत त्यामुळे जमीन / प्रचंड हुंडा ह्या गोष्टी येतात.
प्रचंड श्रीमंती असल्याने शिक्षण जवळपास नाहीच. शेती व उद्योगधंद्यात पुढे ...
त्यामुळे मुलगा जर "शिकलेला " असेल तर त्याला प्रचंड डिमांड असते ....
लाज वाटाणे वगैरे जाणीवा थोडे शिकल्यावर , जाण आल्यावर व थोडे माणुस समंजस झाल्यावर येतात ...
आता एक उदाहरण सांगतो ...
माझ्या जुन्या कंपनीत एक सहकारी होता, आंध्राचा रेड्डी खानदानचा ...
बुद्धीने , रुपाने , कर्तुत्वाने अगदी यथातथा. आख्ख्या खानदानात सगळ्यात शिकलेला हाच. बाकी परिस्थीती सधन म्हणावी अशी ...
त्याचे लग्न ठरले तो आमच्याबरोबर असताना ....
त्यानंतर त्याचे वागणेच बदलले, एका महिन्यात त्याने कार घेतली, पुण्यात फ्लॅट बुक केला, बाकीची प्रचंड खरेदी केली ...
आम्ही एकदम चाट पडलो. एकदा अनौपचारीक गप्पांमध्ये त्याला छेडताना विचारले "लै हुंडा मिळाला दिसतोय" तर त्याचे उत्तर ऐकुन आम्हाला फेफरे यायची वेळ आली ...
त्याला हुंडा म्हणुन "४० लाख कॅश , पुण्यात फ्लॅट, होंडा सिटी गाडी, दागदागिने व इतर गोष्टी" असा जवळजवळ १ कोटीचा माल मिळाला होता ...
मग आमचा जेष्ठ सहकारी ज्याची मते हुंडाविरोधी आहेत तो भडकला व त्याने त्याला खुप झाडले ....
त्यावर त्याचे उत्तर असे होते की "जर हुंडा दिला नाही तर मुलीला त्रास होतो व हुंडाबळी जातो " अशी तिकडे रित आहे ...
त्यामुळे "ज्याठिकाणी हुंडा घेत नाहीत तेथे सासरचे पुढे पैसा मागुन त्रास देतील ह्या भितीने मुलगी देत नाहीत व पर्यायाने त्या मुलाचे लग्न राहते" अशी परिस्थीती आहे.
त्यामुळे योग्य वयात लग्न व्हायचे असेल तर "हुंडा घेणे हा तिथला रिवाज " आहे असे म्हणायला हरकत नाही ....
आता ह्यालाच "पॅथेटीक " म्हणातात का ते माहित नाही ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
नाही, तो
नाही, तो हुंडा घेतला नाही, तर म्हणे त्या मुलाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे,जर सगळं व्यवस्थित असेल तर हुंडा घेतलाच पाहीजे म्हणे....असं समजत असतील तर का नाही घेणार मुलं/पालक हुंडा..
वा मास्तर वा !!!
स्त्री भ्रृणहत्या हा विषय उत्तम हाताळला त्या बद्दल प्रथम अभिनंदन !!!
मास्तर आपल्या लेखातील आकडेवारी पाहता स्त्री जिथे पुजनीय असते तिथे अशा हत्या कमी होतात असे जरी ग्रहित धरले तरी भविष्यात आपले कसे होईल आधार शोधण्याच्या प्रयत्न्नात अशा स्त्रीहत्या होतात, असे वाटते. अर्थात अशा समस्यांचे मुळ कशात आहेत. कायदे, रुढी,नीतीनियम, या बरोबर सामाजिक जीवनाला पद्धतशीर वळण लावण्यासाठी शासन, धर्म, इ.इ. संस्था असतात. त्याच्या योग्य परिणामाने आणि शिक्षणाने समाजावर काही बदल झाला तर अशा भ्रृणहत्या कमी होऊ शकतात.
अर्थात कधी-कधी वाटते चर्चा करणे मला सोपे वाटते पण प्रत्यक्षात डॉक्टरांपेक्षा पालकच अशा घटनांना जवाबदार असतात.
फार कमी पालकांना वाटते आपल्या घरात मुलगी जन्माला यावी.
मुलींचे शिक्षण, परक्याचे धन, लग्नझाले आणि तिचा संसार व्यवस्थित चालला तर ठिक नाही तर आई-बापांना मुलगी जन्माला घातल्याचा पश्चाताप, या आणि अशा कितीतरी गोष्टी मुलगी नको च्या पाठीमागे आहेत. असे वाटते. याचाही विचार झाला पाहिजे.
अवांतर : उत्तम कांबळेचे 'आई समजून घेतांना' हे पुस्तक वाचत होतो. मुलगी झाल्याचे ऐकल्यावर उत्तम कांबळेच्या आईचा पडलेला चेहरा बराच काही सांगून गेला. असे अनेक कुटुंबे आपलया आजुबाजूला वावरत असतात.
शहारा !!
लेख अन प्रतिक्रिया वाचुन शहारा आला ! मातृभुमी कधी बघेल असे वाटत नाही आता. लेखात अन प्रतिक्रियांमधे समस्येचा उहापोह अगदी योग्य झालाय.
मास्तरांचे चांगल्या अग्रलेखाबद्दल अभिनंदन.
स्त्री भ्रृणहत्या !
तुम्ही दोघी बहिणीच का, भाऊ नाही का म्हणून लहानपणी अनेकांकडून प्रश्न ऐकले आहेत. अजूनही विचारतात!
चित्रासारखाच माझाही अनुभव, पण हे ही तितकेच खरे की आमच्या आईवडिलांनी 'मुलगी' म्हणून अनेक इतरांकडे असतात तशी बंधने कधी घातली नाहीत.अर्थात इतर मैत्रिणींच्या घरातली बंधने पाहताना ,त्यांच्या घरून अनेक कार्यक्रमांसाठी परवानग्या मागताना हे जास्त प्रकर्षाने जाणवत असे.
लोकशिक्षण आणि समाजाच्या मानसिकतेमध्ये होणारा बदल कायद्यापेक्षा प्रभावी ठरेल असे वाटते.
कायद्याचा बडगा आणि पोलीस असल्याशिवाय आपण चांगलं वागूच नये का ? दंडुका घेतलेल्या पोलिसानं किती कायदे इम्प्लिमेंट करायचे ? सगळी जबाबदारी पोलिसांचीच का? पोलीसांनी दंगली खून दरोडे यांचा तपास करायचा की तुमचा पोरगा हुक्का ,सिगरेट, ड्रग्ज ओढतो का ते पहायचे?
हे फारच पटले.
ह्या गंभीर विषयाबद्दलच्या अग्रलेखाबद्दल अभिनंदन.
स्वाती
घरातूनच समानता
मला मोठा भाऊ असला तरी आई-बाबांनी कधीही आम्हाला वेगळी वागणूक दिली नाही. बहिणींनी भावासाठी त्याग करायचा आणि भावाने मजा मारायच्या असं कधीही झालं नाही. एका वर्षीपासून आम्ही राखी बांधणं, बांधवणंही सोडून दिलं. तेव्हा आम्हाला हे डावं-उजवं समजत नव्हतं, पण आता वाटतं, त्यामधे एवढाच विचार होता की, त्याने माझं रक्षण का करावं? मला स्वतःला स्वतःचं रक्षण करता आलं पाहिजे. आणि दुर्दैवाने वेळ पडलीच तर तो माझं रक्षण करेलच पण त्याच्यावर वेळ आली तर मीही त्याच्याबरोबरीने उभी राहेन.
मी कटाक्षाने आता पुरूष नातेवाईकांकडून "ओवाळणी" घेत नाही, भले तो भाऊ असो वा नवरा! मुलींना मिळणाय्रा कमी दर्जाच्या वागणूकीविरुद्ध बोलायचं, लिहायचं आणि स्वतः मात्र परंपरांच्या नावाखाली पुरूषी वर्चस्व मान्य करायचं, आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत हे दाखवायचं, हे मला पटत नाही.
मास्तर लेख उत्तम आहे, आणि विषयही खूप चांगला आहे. थँक्स!
अदिती
१०१% सहमत...