अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. (2)
Alice! a childish story take,
And with a gentle hand
Lay it where Childhood's dreams are twined
In Memory's mystic band,
Like pilgrim's withered wreath of flowers
Plucked in a far-off land..
~Alice's Adventures in Wonderland
त्या घडामोडींकडे वळण्याआधी एक दुसरा आठवणींचा, विचारांचा पसारा निवारायला हवा. लिहायला घेतले तेव्हा मला कल्पना नव्हती हे असे गाय रिचीच्या फिल्मसारखे नॉन्-लिनिअर होईल. हा सगळा 'वर्म्स् आय व्ह्यु' बघताना थोडे मागे-पुढे व्हायचंच असं म्हणुया. मागे जाऊया जरा.
कॉन्ग्रेस ही एक बाधा आहे असंच आमच्या भागात, नागपुरात, सगळे म्हणायचे. मोठमोठ्या नावांपुढे खास वर्हाडी हेलाने 'भोऽऽसडीचा' लावल्याखेरीज आजुबाजुचे बोलत नसत. '७७ च्या आणीबाणीत मी फारच लहान होतो आणि काही कळत नव्हतं. पण तरी नागपुरातले ते दिवस मला लख्ख आठवतात. कुंपणाचे लाकडी खांब उपटायचे आणि पेटवायचे दिवस म्हणजे होळीचे! हे समीकरण मोडलं ते त्या काळात. आमच्या घराशेजारी मा.गो. वैद्यांचे घर होते. त्या एका रात्री मोठ्ठा जमाव निषेधाच्या घोषणा, शिव्या देत, इंदिरा गांधी झिंदाबाद ओरडत आमच्या रस्त्यावर चालुन आला होता. त्यांचा रोख वैद्यांच्या घराकडे असावा. घरातुन बाहेर पडायचं नाही कोणी, असं वातावरण. फार वेळ ऐकलं, ऐकलं आणि बाबा - काका दोघे गरम डोक्याने लाठ्या घेऊन बाहेर पडले. आई, आजी हात धरून थांबवू लागल्या पण दोघे हट्टाला पेटले आणि बाहेर पडले. थोडे पुढे गेले असतील, नसतील तोच मोठा धोंडा भिरभिरत आला आणि बाबांचा हात पार फोडून गेला. रक्ताची मोठी धार लागली आणि लाठी कुठच्या कुठे उडून पडली. मारामारी झाली का नाही ते आठवत नाही. शेजार्यांनी, आईने हिंमत करून त्यांना आत खेचून आणलं म्हणून बरं. पण तेवढ्यावर कुठलं थांबायला? आम्ही उंदरांसारखे आतल्या खोलीत बसून होतो, डोकावुन पहात होतो. तेवढ्यात समोरच्या दाराचा अडसर फोडून एक हेऽऽ मोठा बल्ल्या (लाकडाचा सोट) घरात शिरला. वाटेतल्या वस्तु फोडाफाड करत स्वैंपाकघरात येऊन थांबला. मी आश्चर्याने सगळे बघत होतो. लोक बाहेरुन शिव्या देत होते, बाहेर तर या! म्हणत होते. पण आमच्या सुदैवाने ते आत आले नाहीत. वैद्य त्यांच्या घरात नसावेत तेव्हा. कारण काही कमीजास्त न होता लोक आले तसे शिव्या देत निघून गेले.
अशा वातावरणातुन आम्ही आलेलो, कोल्हापुरात, कॉन्ग्रेसच्या चिरेबंदी गडात! दर दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत (हो! उन्हाळ्याच्या सुद्धा!) नागपुरची फेरी ठरलेली, महाराष्ट्र एक्स्प्रेस ह्या ३० तास घेणार्या ढकलगाडीतुन. अधेमधे ब्रेक-जर्नी. शेगाव-खामगांव, भुसावळ. मोठी गंमत यायची. '८३ च्या दिवाळीच्या सुट्टीत मला कपिल देव ह्या माणसाने केलेले पराक्रम समजले, क्रिकेट हा खेळ असतो हे समजले आणि पेपरातली चित्रे गोळा करायला सुरवात झाली.
'८४ च्या दिवाळीच्या सुट्टीत मी बदललो. घडले ते असे:
दिवाळी ऑक्टोबर महिन्यात आली होती. फराळ, फटाके अशी सगळी धमाल होती. ३१ ऑक्टोबरचा दिवस काही वेगळा नव्हता. अमर-ज्योती मंगल कार्यालयाजवळ मामा रहात होता, त्याच्या घराच्या अंगणात सकाळी खेळत होतो. तेवढ्यात मामाचा साळा, अनिल, धावत घरात शिरला आणि जरा वेळानं धावत बाहेर आला. मी म्हटलं का रे अनिलमामा, काय झालं? तो दोन मिनिटं बघत राहिला आणि म्हणाला 'इंदिरा गांधींना ठार मारले रे!' कोणी मारले हे कुणाला माहित नसावे. पण प्रत्येकाला धाकधुक वाटत होती. मग मामा घाईघाईने आला आणि मला आत घेऊन गेला. त्यानंतर दुपारी बाहेर धांदल उडालेली दिसली. समोरच्या हितवादच्या ऑफिससमोर लोक गोळा झाले होते आणि माहिती मिळवायचा प्रयत्न करत होते. तोवर उडत उडत समजले होते की पंतप्रधानांना त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या घातल्या होत्या. बिअंतसिंह आणि सतवंतसिंह ही नावे संध्याकाळपर्यंत प्रत्येकाच्या तोंडी होती. ती संध्याकाळ नाही नाही त्या चर्चा करण्यात गेली. महात्मा गांधींना मारले त्यानंतर झालेले 'ब्रह्मसत्र' बर्याच लोकांना महितीहोते. त्याच्या कटू आठवणी निघाल्या आणि शेवटी एका विचारावर सगळे थांबले. शीखांसाठी उद्याचा दिवस काळ असणार!
पण तेवढे थांबायला लोकांना वेळ नव्हता, त्याच रात्री नागपुरात एका शीख ढाबेवाल्याला जाळले, त्याच्याच बाजेला बांधुन. दुसर्या दिवशी तयारी जास्त 'प्रोफेशनल' झालेली असावी. शहरभर 'इंदिराजी के हत्यारों को फांसी दो, फांसी दो' असे नारे देत घोळके हिंडू लागले होते. दिसेल त्या शीखाला केस धरून, ओढून, लाथा-बुक्क्यांनी तुडवत जमाव न्याय करू लागला होता. मी स्कूटरवर मागे बसून बर्डीवर जात असताना हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला आहे. अर्थात माझ्या लेखी तो फारसा घृणास्पद प्रकारच नव्हता त्यावेळी! कांगारू कोर्ट प्रत्येक माणसाच्या (आणि मुलांच्याही) मनात लपलेलं असतंच आणि म्हणुनच जमावाचे मानसिक वय लहान मुलापेक्षा मोठं नसतं हे मला पटतं. हा झटपट न्याय करण्याचा पायंडा आपल्याच अंगाशी येऊ शकतो हे जेव्हा सर्वांना कळेल तेव्हा माणसाची जात सुधरेल. अर्थात हे दिवास्वप्नच रहाणार. तसा समजावायचा प्रामाणिक प्रयत्न, सर्वार्थाने, एका म्हातार्याने केला होता. त्याच्या मागे, नव्हे त्याच्या हयातीतच, त्याच्या विचारांचे काय कडबोळे झाले ते काय सांगायला पाहिजे? असा अनैतिहासिक दृष्टीचा ऐतिहासिक पुरुष जगात दुसरा झाला नाही असे कुरुंदकर म्हणतात, ते काही खोटे नाही.
त्या प्रसंगांनी मला जाण आली. माणसे मारामारी करतात, ते मुले मारामारी करतात तसे नसते, हे प्रत्यक्ष कळाले! आजही मला वाटते की त्या अनुभवा-आधीचा आणि नंतरचा मी यात एक दरी आहे, जी सांधता येत नाही. I know it's no use going back to yesterday, because I was a different person then. पेपर, पुस्तके वाचुन जे बापजन्मात समजले नसते ते एका क्षणात समजले. मोठे व्हायची किंमत निरागसपणा, चांगुलपणाला मोठमोठे पोचे पडणे असावी ही आपली शोकात्मिका. शोकांतिका म्हणत नाही कारण नवी पिढी तो निरागसपणा घेऊन येतेच आणि चक्र चालुच रहातं. हे असंच चालु रहाणार हा ऐतिहासिक, डोळस दृष्टिकोन. पण त्या म्हातार्यासारखे वेडे व्हावेत, होत रहावेत. इतिहास बी डॅम्ड्! माणुसपणा त्यातच आहे.
त्या मोठ्या भुकंपानंतर (डार्क पन् इंटेन्डेड) मग एकामागुन एक घटना घडायला लागल्या. पेपर्स फेथफुली गाळीव वृत्तांत सांगु लागले. गेलेल्यांचे आकडे समजू लागले. मेलेली माणसे इतरांसाठी आकडे होऊन राहिली. आकडे मनातुन झाडता येतात, नावे नाहीत. तेवढे निलाजरे आपण झालो नाही हीच समाधानाची बाब! पण खरंच एक दिवस सगळ्या मारलेल्यांचे फोटोसहित नाव/पत्ते एका पेपरात यायला हवे होते असं मला वाटतं. हजार पानी पेपर काढावा लागला तरी बेहत्तर! निदान लाज वाटुन तरी ते सगळे थांबलं असतं. बरं! कदाचित नसतंही. माणसांची लांडगेतोड होत असताना सगळ्या साक्षेपी संपादकांत एकही खमका निघाला नाही. कदाचित माझ्या वाचनात, ऐकण्यात आले नसेल म्हणुया. सारे क्षीण आवाजात हळहळत. राजा ओंगळ, नागडा आहे हे ठणकावुन सांगायचे धैर्य कोणीही दाखवले नाही. ठेचलेले लोक हंबरडा फोडत कोर्टाकडे धावले आणि नावं समोर यायला लागली. एच के एल भगत, सज्जनकुमार, राजेश पायलट, ललीत माकन, ब्रह्मानंद गुप्ता.... ललीत माकन हे शंकरदयाळ शर्मांचे जावई. अतिरेक्यांच्या गोळ्यांना नंतर बळी पडले आणि सुडाचा एक चॅप्टर संपला. पण सगळ्यात मोठा धक्का बसला तो जवळजवळ दोन वर्षांनी. जनरल वैद्यांची पुण्यात कॅम्पात गोळ्या घालुन हत्या करण्यात आली तेव्हा.
हे सगळं तांडव सुरू असताना पंजाब बदलत होता. रिबेरोंवर प्राणघातक हल्ला झाला आणि सरकारने त्यांना बाजुला करून एक नवा पोलिसप्रमुख नेमला: के.पी.एस. गिल!
गोळीला उत्तर मोठी गोळी. ईंट का जवाब़ पत्थर. एक पोलिस गेला तर मारणार्याचे ३ नातेवाईक गेले. मारणाराही गेला. सीमेवर कुंपण पक्कं झाल्यावर पळवाटा बंद झाल्या आणि अतिरेकी प्रेशर कुकरमध्ये सापडले. एकेक करून सारे म्होरके मारले गेले. काही कॅनडातुन पत्रकं वाटण्यापुरते राहिले, काही न्युयॉर्कच्या रस्त्यांवर निषेधमोर्चे काढुन धुगधुगी कायम ठेवु लागले. तसे काही शीख मला सॅन होजेच्या गुरुद्वारात बरेचदा दिसले होते. राज करेगा खालसा! च्या खाली भिंद्रनवालेंचा फोटो असलेला टी-शर्ट घालुन एक पिकलेला म्हातारा हळुहळु पायर्या चढत होता. लंगरमध्येही तो फोटो होताच आणि शेजारी गुरू गोविंदसिंहांचा! पण जेवण छान होते, कीर्तन छान होते, रागींचे गायन छान होते. केशधारी आणि मोना शीख एकत्र मिसळत होते. अमेरिकेचा मेल्टिंग पॉट सगळ्यांना घुसळून काढत होता.
'८७ च्या ब्लॅक थंडर नंतर दहशतवाद पंजाबातुन खरवडून काढला गेला. '९२ पर्यंत पाळंमुळं खणून काढली गेली.
त्यावेळी भारतात काय काय सुरू होतं? सुभाष घिसिंग गोरखालँड चळवळ चालवत होते. आयझॅक्-मुईवा नागांचा प्रश्न पेटवत ठेवत होते. लालडेंगा मिझो नॅशनल फ्रंट चालवत होते. मणिपुरात कांगलैपाक पार्टी सुरू झाली होती. नक्षलवाद दबा धरून होता. भोपाळ दुर्घटनेचे रामायण सुरू झाले होते. आसाम विद्यार्थी चळवळ सत्तेत आली होती. महंता आता विरोधकाच्या भुमिकेतुन राज्यकर्त्याच्या भुमिकेत आले होते. तमिळनाडुत द्रविड पार्ट्या लंकेतल्या आगीत तेल ओतत होत्या.
सगळा भवताल खदखदत होता..
वाचने
6354
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
||क्रमशः||
वाचतोय.. पुढील भागाच्या
नाही, पण त्याविषयी ऐकले आहे.
In reply to वाचतोय.. पुढील भागाच्या by मोदक
हाही भाग थरारक!!!!!!
+१
In reply to हाही भाग थरारक!!!!!! by बॅटमॅन
वाचतेय. बराचसा काळ जुळतोय
मस्त लिहीताय. वाचतोय.
धन्यवाद!
In reply to मस्त लिहीताय. वाचतोय. by प्यारे१
ठाऊक नाहीये.
In reply to धन्यवाद! by शिवोऽहम्
मलाही माहित नाही.
In reply to ठाऊक नाहीये. by प्यारे१
"न चासंगतं नैव मुक्तिर्न मेयः
In reply to मलाही माहित नाही. by शिवोऽहम्
आठवण
कमींग अप् शॉर्टली.. स्टे
In reply to आठवण by कपिलमुनी
तुमचा आठवणींचा पसारा वाचतांना
असेच..
In reply to तुमचा आठवणींचा पसारा वाचतांना by डॉ सुहास म्हात्रे
छान लिहित आहात...
...
शिवोऽहम्....वाचतो आहे. लिहीत
शिवोऽहम्,
कमाल लिखाण......
वधान्चा इतिहास
तशा तुरळक घटना घडल्या होत्या.
In reply to वधान्चा इतिहास by रमेश आठवले
...
सुरेख लिहिलंय
उत्तम लेखन !
सगळे भाग एकदमच वाचून काढले