संवाद-२ [कुठलाही वाचा, ही मालिका नाही]

चाणक्य's picture
चाणक्य in जनातलं, मनातलं
20 Jun 2008 - 2:10 pm

>>>नमस्कार मंडळी, हि काही कथा नाही किंवा कुठल्या कथेचा भागही नाही.हा आहे संवाद... दोघांमधला...दोन मित्रांमधला, प्रियकर- प्रेयसी मधला... दोन माणसांमधला....! हे संवाद मी जसे सुचले तसे लिहिले आहेत. यातुन काही सांगायचे वगैरे नाही. त्या त्या क्षणी जे विचार मनात याय्चे ते कागदावर उतरवायचो. ते बरोबर असतीलही किंवा नसतीलही. या संवादातल्या पात्रांना नाव नाहीत, किंबहुना त्याची गरज भासत नाही इतके लहान संवाद आहेत हे. हे संवाद कुठलीही पार्श्वभुमी न देता अचानक सुरु होतात. एखादं गाणं जसं अंत-यापासुन सुरु व्हावं तसं. जसे सुरु होतात तसेच संपतातही
हा प्रकार जरा वेगळा असल्यामुळे मि.पा. वर टाकावा की नाही या विचारात होतो....पण म्हणलं जाउदे..फार फार तर काय होईल, आपलीच लोकं शिव्या घालतील ना, ठीक आहे, खाऊ शिव्या... शेवटी हे मनातलं आहे आणि मनातलं सगळं बरोबरंच असल सगळ्यांना पटलंच पाहीजे असं थोडी आहे.
संवाद-१

-----------------------------------------------------------------------------------------------

संवाद-२

"शब्द महत्त्वाचे कि विचार?" त्याने विचारले.
"अं....दोन्ही ", कळी म्हणाली. कळी .... हे नाव त्यानेच ठेवलं होतं तिला. कारण त्याला फुलापेक्षा कळीच जास्त आवडायची...आणि... ती सुद्धा.
"असं नाही. एक काहीतरी उत्तर दे, ठामपणे."
"मग शब्दच. कारण विचार चांगले असले तरी त्याला शब्दांची जोड हवीच"
"पण विचारच नसतील तर शब्द येणार कसे. आणि आले तरी निरर्थकच ते. शेवटी शब्द हे साधन, त्याला विचारांचं भांडवल हवंच. " ,
तो म्हणाला.
"तितकसं पटत नाही, कारण शब्द ब-याच वेळेला काम करून जातात, खोटे असले तरी" ,ती उत्तरली
"उदाहरण देऊ शकशील?"
"नाही"
"असं कस?"
"हे बघ, मला तुझ्यासारखा तात्त्विक वाद वगैरे घालणं जमत नाही आणि आवडतही नाही. आता तु मला कळी म्हणतोस ते मला आवडतं. कळी...असं कधी मुलीचं नाव असत का? पण तरीही मला तो शब्द आवडतो."
"कारण त्यामागचे माझे विचार, भावना तुला ठाऊक आहेत. रस्त्यावरच्या एखद्या भिका-याने किंवा तीन वर्षाच्या एखाद्या मुलाने तुला कळी म्हणुन हाक मारली तर तु मोहरशील? मी मारल्यावर जितकी मोहरतेस तितकी?"
"नाही" , तिला उत्तर द्यायला जरासुद्धा वेळ लागला नाही.
"बाकी तुला कळी म्हणल्यावर तुझ्या चेह-यावर जो रक्तिमा पसरतो, तो पहात रहावासा वाटतं.
तिने लाजुन खाली नजर वळवली. त्याने तिचा हात हातात घेतला. तिने चमकुन वर पाहीलं.
"तु मला आवडतेस" , तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला.
तिला नजर खाली वळवायचेही भान राहीले नाही. कारण त्याच्या नजरेत कुठलंच 'मागणं' नव्हतं.

मांडणीआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

20 Jun 2008 - 2:21 pm | धमाल मुलगा

आयला,
चाणक्य, एकाच वेळी वैचारिकही आणि तरलही?
लगे रहो!

हे मला आधीच्या संवादापेक्षा आवडलं.

"उदाहरण देऊ शकशील?"
"नाही"
"असं कस?"
"हे बघ, मला तुझ्यासारखा तात्त्विक वाद वगैरे घालणं जमत नाही आणि आवडतही नाही.

एखादा मुद्दा अधांतरी सोडून द्यायचा आणि वाचणार्‍याला त्यावर विचार करायला लावायचा अशी शैली दिसत्ये आपली :)
छान...

मित्रा काही ललित, कथा वगैरेही लिहितोस का? १५-२० ओळींच्या लेखनातून तुझी पकड जाणवून येत्येय.
इतक्यात आपल्या काही कथा वगैरे वाचण्याचा योग आहे का?

पु.ले.शु.
- ध मा ल.

चाणक्य's picture

20 Jun 2008 - 11:57 pm | चाणक्य

एखादा मुद्दा अधांतरी सोडून द्यायचा आणि वाचणार्‍याला त्यावर विचार करायला लावायचा अशी शैली दिसत्ये आपली

एक नंबर धमाल्या, बरोबर ओळखलस. मान गये उस्ताद आपको.
पकड वगैरे नाही रे. भाऊसाहेबांच्या शब्दात सांगायचं तर "तो मान लेखकांचा, तितुकी आपली पायरी नव्हे"
बाकी प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद

ऋचा's picture

20 Jun 2008 - 2:27 pm | ऋचा

खुपच सही!!!

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

अरुण मनोहर's picture

20 Jun 2008 - 2:34 pm | अरुण मनोहर

असेच लिहीत रहा
तिला नजर खाली वळवायचेही भान राहीले नाही. कारण त्याच्या नजरेत कुठलंच 'मागणं' नव्हतं.

ध्रुव's picture

20 Jun 2008 - 4:11 pm | ध्रुव

सगळ्यांशी सहमत..
असंच लिहीत राहा.
वैचारीक व तरल.
विचारचक्र फिरवणारे.
वाचनीय.
जलद प्रवास करणारे.
मनुष्यप्रवृत्तीचा अभ्यास असलेले..

खरच लिहीत राहा. तुमची एक वेगळी शैली आहे. वाचकाला खिळवणारी विचार कराअयला लावणारी व तरीही अस्वस्थ न करणारी.
--
ध्रुव

विसोबा खेचर's picture

21 Jun 2008 - 7:09 am | विसोबा खेचर

तु मला आवडतेस" , तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला.
तिला नजर खाली वळवायचेही भान राहीले नाही. कारण त्याच्या नजरेत कुठलंच 'मागणं' नव्हतं.

वा! लै भारी...!

चाणक्यराव, संवादमालिका बाकी छानच सुरू आहे. हा लेखनप्रकार अंमळ अभिनव वाटतो आहे, आवडला आम्हाला!

आपला,
(संवादात रमणारा) तात्या.

अवांतर : आम्हालाही कळ्या तश्या आवडतातच परंतु चांगली छान उमललेली फुले आम्हाला अधिक मोहवून टाकतात! ;)

आपला,
(चालू!) तात्या.

मनिष's picture

21 Jun 2008 - 11:29 am | मनिष

छान लिहित आहात. चालू दे! :)

काळा_पहाड's picture

21 Jun 2008 - 2:57 pm | काळा_पहाड

तिला नजर खाली वळवायचेही भान राहीले नाही. कारण त्याच्या नजरेत कुठलंच 'मागणं' नव्हतं.
सुंदर.
छान लिहिलेय. आवडले.
काळा पहाड