व्यसनाच्या मगरमिठीतून सुटताना...

मोदक's picture
मोदक in लेखमाला
29 Oct 2016 - 12:33 am

आपल्या नातेवाइकांमध्ये, मित्रांमध्ये, ओळखीच्या लोकांमध्ये व्यसनाच्या आहारी गेलेले अनेक लोक असतात. मात्र योग्य वेळी डोळे उघडून व्यसनाधीनतेच्या दु:खदायक चक्रातून बाहेर उडी मारून पुन्हा नव्याने आयुष्याची घडी बसवणे खरोखरी धैर्याचे काम आहे.
व्यसनाशी चिकाटीने लढून तब्बल १८ वर्षे व्यसनमुक्त राहणारे आपले असेच एक मिपाकर मित्र मानस चंद्रात्रेंशी आज गप्पा मारू या..
आपल्या लहानपणाबद्दल थोडी माहिती आणि कौटुंबिक पार्श्वभूमी सांगाल का?
माझ्या लहानपणाबद्दल फारसे वेगळे काही नाही. आम्ही एक छान चौकोनी कुटुंब आहोत. आई-वडील, थोरला भाऊ आणि मी. वडील प्राध्यापक, आई सरकारी नोकरीत उच्चपदावर. आईची नोकरी बदलीची असल्यामुळे दर तीन ते पाच वर्षांनी नवीन गावात बदली ठरलेलीच. आई-वडील दोघेही चांगल्या नोकरीत असल्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती चांगली होती. वडिलांनी घर बांधले, तेव्हा ३-४ वर्षे थोडी अडचण झाली, पण बाकी तशी सुबत्ता होती.
आपले शाळा-कॉलेजचे दिवस कसे होते..?
१९७५ साली माझी बालवाडी पुण्यात झाली.
आईची नोकरी बदलीची असली, तरी माझे पहिली ते बारावी शिक्षण लातूरमध्येच झाले. शाळेत दर वर्षी पहिला किंवा दुसरा नंबर ठरलेलाच. त्यामुळे एक हुशार विद्यार्थी म्हणून मी लहानपणी प्रसिद्ध होतो. अर्थातच या गोष्टीमुळे सगळीकडे खूप कौतुक होत असे. मी पाचवीला असताना मुंबईला आईची बदली झाली. आमची शाळा आणि वडिलांची नोकरी यामुळे आम्ही वडिलांसोबत लातूरला राहिलो. आईपासून लांब राहिल्यामुळे अकाली समजूतदारपणा आला, थोडा पोक्तपणा म्हणावा असा. नेमकी याच काळात आर्थिक अडचण सुरू झाल्यामुळे मन मारायची सवय लागली, ती अजूनही आहेच.
मी दहावीला असताना आई लातूरला बदली होऊन परत घरी आली. त्या वर्षी मी जरा सैलावलो. थोडी मोकळीक मिळाल्याने खेळांकडे ओढा वाढला, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष नव्हतेच. परंतु ऐन शेवटच्या दिवशी एक घटना घडली आणि अभ्यासातून माझे पुरते लक्ष उडाले. शेवटच्या दिवशी मुख्याध्यापक आम्हाला शुभेच्छा देण्याकरिता वर्गावर आले आणि त्यांच्या पांढर्‍याशुभ्र शर्टवर कोणीतरी काळीभोर शाई टाकली. वर्गाबाहेर गेल्यावर ते त्यांच्या लक्षात आले. परत वर्गावर येऊन सर्वांची झाडाझडती, छड्या, तपासणी झाली आणि फक्त माझ्याकडे काळ्या शाईचे पेन सापडले. मग शाळेतल्या सर्वांनीच माझ्यावर भरपूर राग काढला. 'काय तुम्ही मेरिटमध्ये येणार?' वगैरे वगैरे डोसही पाजले. अर्थात शाई टाकणारा मुलगा आणि त्याने लपवलेले पेन हे दोन्ही नंतर यथावकाश सापडले. पण मी फार दुखावलो गेलो आणि 'काय करायचंय मेरिटला येऊन?' या विचाराने अभ्यासापासून दुरावलो. इतके होऊन आणि अभ्यासातला रस कमी होऊनही मला दहावीला चांगले मार्क्स मिळाले.
पुढे अकरावी, बारावी अर्थातच वडील ज्या कॉलेजला त्याच कॉलेजमध्ये. पण अभ्यासात रमलो नाहीच. मित्रही मग तसेच मिळाले. आपण मोठे झालो, कॉलेजकुमार झालो वगैरे गोष्टींचे आकर्षण वाटू लागले. विनाकारण फिरण्या-भटकण्याची सवय लागली. मग असेच कधीतरी मित्रांसोबत सिगरेट ओढली. आपण फार भारी काम केल्यासारखे वाटू लागले. याच प्रभावाखाली पुढे सिगरेटची व्यवस्थित सवय लागली. सिगरेटसोबत मग आणखी जास्त भारी काम केल्यासारखे वाटावे, म्हणून मग सुपारी (मावा) चालू झाला. आता तर फुल्ल मर्द झालो. अभ्यास आता कंटाळवाणी गोष्ट झाली. माझ्यासोबतचे अभ्यासू मित्र आता मिळमिळीत वाटायला लागले. मला तसेच भरवले गेले.
याच दरम्यान बारावीला असताना पहिली बिअर घेतली. भीत भीतच, पण मर्दानगी सिद्ध करायची होती, मोठे व्हायचे होते. नंतर मात्र बिअरवर जास्त न रेंगाळता 'हॉट' चालू केली. बस्स, मी म्हणजे आता लईच भारी माणूस झालो होतो. माझ्या बाकीच्या गुळुमुळु मित्रांपेक्षाही 'लय भारी'. दारू पिण्यासाठी मित्राच्या रूमवर रात्री अभ्यासाचे निमित्त काढायचो. घरातल्यांना अर्थातच अंदाज आला असेलच, की मुलाचे नक्कीच काहीतरी वेगळे चाललेय म्हणून. पण मी निवांत होतो.
इकडे सर्वांना माझ्यासारख्या हुशार मुलाकडून चांगल्या चांगल्या अपेक्षा होत्या, माझी मात्र अभ्यासाची पुरती बोंब उडाली होती. मग 'पुरेसा अभ्यास झाला नाही' या सबबीखाली शेवटचा पेपर मुद्दाम दिला नाही व जाणूनबुजून नापास झालो. याला गोंडस भाषेत 'गॅप घेणे' म्हणतात. अर्थातच दुसर्‍या वर्षीही फारसे काही दिवे लावले नाहीतच. आदल्या वर्षीचाच कित्ता गिरवला. माझे आदल्या वर्षीचे काही मित्र शिक्षणासाठी लातूर बाहेर गेले होते. त्यांची बोलावणी यायची. केवळ दारू प्यायला मिळते म्हणून मी उड्या मारत त्यांच्याकडे जायचो. बारावी परीक्षा कसाबसा पास झालो, तरीसुद्धा बारावीला ग्रूपिंग चांगले आल्याने शासकीय कोट्यातून औरंगाबादच्या खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्या काळी ग्रूपिंगवर प्रवेश होत. स्पर्धा परीक्षा नंतर आल्या.
कॉलेजमध्ये असताना दारू, सिगरेट वगैरे प्रकार दुर्दैवाने पुरुषार्थाशी जोडले जातात. मित्रांमध्ये एकटे पडू नये म्हणून अनेक लोक बहुतेक वेळा मित्रांच्याच संगतीने सुरुवात करतातच. पण तुमचा व्यसनांचा पुढचा प्रवास कसा झाला?
कॉलेजबाबत थोडे विस्ताराने सांगावे लागेल.
एकतर औरंगाबादमध्ये नवीन होतो आणि कॉलेजमध्ये लातूरहून आलेला एकटाच, त्यामुळे वर्गात तसा इतरांपेक्षा वेगळा वेगळाच राहायचो. पण सिगरेट आणि गुटखा (सुपारीचे व्यसन आतापर्यंत गुटख्यामध्ये बदलले होते. 'उंचे लोग..' वगैरे.) यासाठी कॉलेजच्या बाहेरची टपरी गाठायचो. इथे मग अर्थातच वर्गातल्या माझ्यासारख्याच व्यसनी मित्रांच्या ओळखी झाल्या आणि पुढे एक कंपू तयार झाला. ही सगळी स्थानिक मुले होती. कॉलेजमधील इतर मुलांपेक्षा आम्ही एकदम मर्द वगैरे. ते लोक 'साले मिठ्ठे है' वगैरे असे आमचे विचार होते. औरंगाबादमध्ये त्या वेळी एकटाच खोली घेऊन राहत होतो. त्यामुळे कंपूला, मित्रांना आयताच अड्डा मिळाला. मलाही मजा यायची. सिगरेट, दारू आता कोणालाही न भिता पिता यायची. महिन्यातून एकदा तरी पार्टी व्हायचीच. खासकरून घरून पैसे आले की. इतर वेळी मित्रांकडून असे. अभ्यास वगैरे गोष्टींचा लांबलांबपर्यंत संबंध येत नव्हता. ते म्हणजे 'मिठ्ठेपणाचे लक्षण' वाटायचे. शेवट ठरलेलाच - पहिल्या सत्रात फक्त एक विषय निघाला. दुसर्‍या सत्रात मात्र थोडे गंभीरपणे घेतले आणि पहिल्या वर्षी एटीकेटी मिळाली. सबमिशनच्या आदल्या रात्री सिगरेटी फुकत रात्र जागवणे, रात्री जागून जागून अभ्यास करणे आणि पहाटे बसस्टँडवर चहा प्यायला जाणे... वेगळेच थ्रिल वाटायचे. आपण जगावेगळे काहीतरी भन्नाट करतो याचेच कौतुक. या सगळ्या नादात पैशांचे नियोजन मात्र गडबडून जायचे. पण आई-वडील बिचारे पैसे मागितले की पाठवायचे.
दुसर्‍या वर्षी सिगरेटचे आणि गुटख्याचे व्यसन प्रचंड वाढले. आता चक्क खिशात सिगरेटचे पाकीट आणि गुटख्याच्या पुड्या घेऊन हिंडायचो. अगदी कॉलेजमधल्या सरांनासुद्धा माहीत झाले होते की याच्या खिशात सिगरेट व पुड्या असतात म्हणून. मला मात्र मी हिरो असल्यासारखेच वाटायचे. दिवसभर कॉलेज करणे, संध्याकाळी खोलीवर पडून राहणे आणि रात्री मित्रासोबत भटकणे, उगाचच रात्रभर जागरण करणे, अशा प्रकारे दिवस चालले होते. दारू प्रकरण थोडे शांत होते. अभ्यास तर ठीकठाकच. स्थानिक मित्रांच्या कंपूतील कोणी ना कोणी खोलीवर पडून असायचे. खर्चाचे गणित पार कोलमडलेले. त्यामुळे महिनाभर तंगी. यामुळे आता पानटपरीवर उधारी सुरू झाली. पहिले सत्र व्यवस्थित पार पडले, परंतु पहिल्या वर्षीचा एक विषय राहिलाच. दुसर्‍या सत्रात घरून लुना मागवून घेतली आणि भटकण्याची सोय करून घेतली. दुसर्‍या सत्रात या रुटीनमध्ये काहीही फरक पडला नाही. परीक्षेत मात्र दुसर्‍या वर्षी एटीकेटी लागली, परंतु पहिल्या वर्षाचा एक विषय गोल झाल्यामुळे घरी बसावे लागलो. अधिकृतरित्या नापास झालो होतो. मी वाया जात असल्याची सर्वांना खातरी पटत चालली होती. नापास झालो, तरी अभ्यासाचा बहाणा करून सहा महिने औरंगाबादलाच राहिलो. कंपूतले सगळे पुढे गेले. त्यात माझ्या लातूर कंपूतल्या मित्राला औरंगाबादला नोकरी मिळाल्याने तो आणि मी एकत्र राहू लागलो. मग मजाच मजा. दिवसभर काही काम नसायचे. संध्याकाळी मित्र आल्यावर भटकणे, पार्टी करणे वगैरे. सहा महिने निव्वळ ऐश करण्यात घालवले. त्या वेळची एक आठवण म्हणजे त्याच सुमारास बाबरी प्रकरणही घडले होते.
त्या सत्र परीक्षेत मात्र प्रथम वर्षाचा राहिलेला विषय निघाला आणि तिसर्‍या वर्षात प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. दुसर्‍या सत्रात मात्र घरी परतलो आणि घरीच राहिलो. झटका मिळाल्यामुळे पुढची दोन वर्षे गुणांनी अभ्यास करायचा, असा मनातल्या मनात बर्‍याच वेळा निश्चयही करून झाला.
तिसर्‍या वर्षी नव्या उमेदीने कॉलेजात दाखल झालो. आणि अहो आश्चर्यम, माझ्यासोबतचे जवळजवळ वीस जण माझ्यासारखेच. एकमेकांना भेटून खूप आनंद झाला. चला, सोबत झाली. यात बरेच जण दुसर्‍या वर्गातील होते, त्यांच्या नव्याने ओळखी, आणि सोबतचे म्हणून लगेच कंपूही तयार झाला. सोबतीतून हळूहळू एकमेकांच्या सवयीही माहीत होत गेल्या. मग सिगरेटी ओढणारे, दारू पिणारे कंपू आपोआपच तयार झाले. एक मोठा ग्रूप तयार झाला. मग सगळ्या गोष्टींना ऊतच आला. वर्गात गोंधळ, जो गैरहजर आहे, त्याची खोटी हजेरी लावणे (प्रॉक्सी मारणे) बिनदिक्कत होऊ लागले. त्यामुळे कॉलेजला जाण्याचीही काळजी नसायची. दारू पार्ट्या जवळजवळ रोजच. रोज कुणी न कुणी आमंत्रण द्यायचे. या वर्षी घरच्यांनी नवीन हिरो पुक ही मोपेड घेऊन दिली होती. त्यामुळे कॉलेज सुटले की आम्ही सुटायचो. बर्‍याच वेळा तर कॉलेजमधून गणवेशावरच थेट बारमध्ये. भरीस भर कॉलेजच्या समोरच एक बार सुरू झाला. दोन-तीन वेळेस तर असाच वर्गात बसल्या बसल्या मूड झाला, म्हणून कॉलेज अर्धवट सोडून समोरच्या बारमध्ये गेलो होतो. कशाचीही भीती वाटायची नाही. उलट फार मोठा तीर मारल्यासारखे वाटायचे. वर्गातल्या सर्व मुलांना प्रताप माहीत होते, त्यामुळे आम्हाला उगाच आम्ही हिरो असल्यासारखे वाटायचो. याच दरम्यान आईची औरंगाबादला बदली झाली. घर झाल्यामुळे बर्‍याच मर्यादा आल्या. दारू बंद. कॉलेज, प्रॅक्टिकल्स, सबमिशन्स सगळ्यामध्ये नियमितपणा आला. घर ते कॉलेज आणि कॉलेज ते घर. तब्येत सुधारली. शिस्तीत व्यायामसुद्धा सुरू केला. माझ्या शेजारीच माझ्याच कॉलेेजमधला लातूरचा मित्र राहण्यास आला. चांगली संगत मिळाली. हे सगळे सुरू असताना सिगरेटचे आणि गुटख्याचे व्यसन मात्र तुफान वाढले होते. दिवसाला दोन पाकिटे सिगरेट आणि जवळपास वीस पुड्या. त्या बाबतीत कुप्रसिद्धच झालो होतो. दोन्ही सत्रे व्यवस्थित पार पडली. पुढचे अंतिम वर्ष बॅकलॉग ठेवायचा नाही, म्हणून अभ्यासाला लागलो. परीक्षा झाल्या. भरपूर प्रयत्न करूनही एटीकेटीच हाती पडली. एक विषय राहिलाच.
आता अंतिम वर्ष. सर्वच जण थोडे गंभीर झालो होतो. घर असल्यामुळे शिस्त कायम होती. परंतु दुर्दैवाने आईची बदली झाली. पुन्हा खोली करून राहिलो आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या. पार्ट्या सुरू झाल्या. मित्रही तसेच गोळा झाले. हळूहळू रोजच पार्ट्या चालू झाल्या. दरम्यान हिमाचल प्रदेशच्या दोन मित्रांची ओळख झाली. ते वेगळ्या शाखेतील होते, पण सूत जुळले. त्यांच्याकडे हिमाचल प्रदेशमधील शुद्ध चरस असल्याची माहिती मिळाली. मग काय! उत्सुकतेपोटी चरस ओढून बघितली. काय मजा आली. सिगरेटमध्ये भरून ओढायची आणि किक बसली की जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन पेढे खायचे. त्याने आणखी जास्त नशा व्हायची. हा नवीन प्रकार जाम आवडला. दारू चिल्लर झाली आता. साठा कमी असल्याने लवकर संपला. पण इतका आवडला की दारू पिण्याची इच्छा होईना. काही दिवसांनंतर अर्थातच गाडी पुन्हा दारूवर आली. तरी प्रथम सत्र व्यवस्थित पार पडले. प्रथम श्रेणी मिळाली. द्वितीय सत्र उत्साहात सुरू झाले. आता सहाच महिने इंजीनिअर व्हायला. प्रोजेक्टचे ग्रूप पडले, तयार्‍या सुरू झाल्या. काही दिवसांनी कॉलेजचे स्नेहसंमेलन पार पडले. ते दोघे हिमाचली मित्र त्या काळात त्यांच्या गावी गेले होते. परत आल्यावर निरोप मिळाला की, माल आ गया है. मग परत मित्राच्या खोलीवर चरसचा कार्यक्रम सुरू. चार-पाच दिवस रोज चरस ओढल्यावर मात्र त्रास सुरू झाला. पोटात प्रचंड आग पडली. घटाघटा पाणी प्यायला सुरुवात केली. जवळपास ५-६ लीटर पाणी प्यायलो असेन. त्यानंतर प्रचंड उलट्या. सगळे घाबरले. सर्वांना वाटले, हा जातो आता. सगळ्यांचीच उतरली. रात्र कशीबशी कण्हत कुंथत काढली. सकाळी त्रास कमी झाला. कानाला खडा लावला. पुन्हा त्या वाटेला गेलो नाही. माझ्यामुळे बाकीचे मित्रही चरसपासून लांबच राहिले. पण स्वस्थ बसू ते इंजीनिअर कसले? त्या काळी इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये फेन्सेडील व कोरेक्स या खोकल्याच्या औषधांची नशा करण्याचे नवीनच खूळ आले होते. आमच्या कंपूतला एक जण अनुभवी होता. त्याने असे काही छान छान वर्णन करून सांगितले की सगळेच उतावीळ झालो. लगेच दुकानातून बाटल्या आणल्या गेल्या. ५० मि.ली.च्या बाटल्या. उघडायची आणि पटकन प्यायची. थोड्या वेळाने त्यावर चहा प्यायले की दोन ते तीन तास छान छान नशा. माझी पहिलीच वेळ, पण मी मात्र प्रेमात पडलो. मला ही नशा रोजच हवीहवीशी वाटू लागली. मित्रांचा विरोध होता म्हणून गप्प बसायचो. एकट्याने काही करायची हिंमत नव्हती. कॉलेज सुटले की चुळबुळ सुरू व्हायची. आता दारू पार्ट्या बंद करून कोरेक्स पार्ट्या चालू झाल्या.
इकडे परीक्षा जवळ येत होत्या. या दरम्यान अशी एक गोष्ट घडत होती, ज्याचे गांभीर्य नंतर माझ्या लक्षात आले. प्रत्येक प्रोजेक्ट ग्रूपसाठी एक प्रोजेक्ट गाईड असतात. आमचा तिघा जणांचा ग्रूप होता. दर दोन दिवसांला प्रोजेक्टविषयी चर्चा करण्यासाठी गाईडला भेटणे आवश्यक होते. प्रत्येक वेळी डायरीवर गाईडची सही घेणे बंधनकारक होते. आमच्या बाबतीत गाईडला भेटण्यासाठी मी एकटाच जात असे. माझ्या दोन्ही सहकार्‍यांना जणू काही देणेघेणेच नव्हते. एकाला गांभीर्यच नव्हते आणि दुसरा त्याच्या व्यवसायात मग्न. 'वो थिअरी का तू देख ले.' असे म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकून मोकळे. मीही "हरकत नाही" म्हटले, आपल्याला गरज आहे तर आपण करू. थिअरीचे काम आटोपल्यावर मी दोघांना निरोप दिला. आता मशीन तयार करणे आणि रिपोर्ट बनवणे या त्यांच्या जबाबदार्‍या होत्या. परंतु ते होण्याआधीच गाईडकडून निरोप आला की, तिघांनीही ताबडतोब भेटायला, या अन्यथा प्रोजेक्ट रद्द करण्यात येईल. आता थोडा तणाव निर्माण झाला. गाईडने सांगितले की, "तुम्ही विभागप्रमुखांना ताबडतोब भेटा अन्यथा तुमचं प्रोजेक्ट स्वीकारले जाणार नाही." नेमके काय झाले कळेना. तणाव वाढत चालला. तिघे जण विभागप्रमुखांकडे गेलो. त्यांनी सांगितले की, "तुम्ही तिघे जण प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून एकदाही गाईडला भेटलेले नाहीत. त्यामुळे तुमच्या प्रोजेक्टचा निर्णय प्राचार्य घेतील." विषय संपला. आता प्रकरणाचे गांभीर्य कळले. मी बचाव करण्याचा प्रयत्न केला, सरांना माझी प्रोजेक्ट डायरी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचा काही उपयोग झाला नाही. प्राचार्यांना भेटल्याशिवाय प्रोजेक्ट पुढे जाणार नव्हते. मला भयंकर टेन्शन, कारण गरजू मी एकटाच होतो. प्राचार्यांकडे जाण्यापूर्वी मी दुसर्‍याला ताबडतोब रिपोर्ट छापून आणायला पिटाळले. चरफडत खोलीवर आलो. आधीच डोके काम करत नव्हते, त्यात मित्रांनी टोचायला सुरुवात केली, "तेरे को बोला था, वो काम का नहीं, पार्टनर चेंज कर ले, तूने सुना नही." वगैरे वगैरे. आणखीनच वैतागलो. परीक्षा तोंडावर आणि हा वैताग. सगळे व्यवस्थित करूनही शेवटी भानगड उपटलीच, तीही आपली चूक नसताना. नुसता जळफळाट होत होता, पण आता उपयोग नव्हता. दुसर्‍या दिवशी प्राचार्यांसमोर काय होणार या विचारानेच बेचैन झालो. मित्राचे तुणतुणे चालूच होते. तसाच उठून बाहेर गेलो. एकच गोष्ट डोक्यात आली. सरळ नेहमीचे औषध दुकान गाठले आणि कोरेक्स घेतली. रस्त्यावर एका कोपर्‍यात जाऊन पिऊन टाकली आणि निवांत एका चहाच्या हॉटेलात चहा पीत बसलो. सुम्म झालो. एक-दीड तासाने खोलीवर परतलो. मित्रांनी बघितल्या बघितल्या ओळखले. शिव्यांचा भडिमार चालू झाला. मी मात्र बधिर बसलो होतो. थोडेसे जेवण करून झोपलो. दुसर्‍या दिवशी धाकधुकीतच प्राचार्यांचे कार्यालय गाठले. कार्यालयामध्ये गेल्या गेल्या त्यांनी फैलावर घेतले गेले. ते काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मी त्यांना माझी डायरी दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट मागवले. माझ्या शहाण्या मित्रांनीही कच्च्या आवृत्त्या आणल्या होत्या. त्यात असंख्य चुका. प्राचार्य आणखीनच भडकले. त्यांनी तिथेच तोंडी परीक्षा घ्यायला चालू केले. उत्तरे देणारा मी एकटा आणि हे दोघे गप्पच. प्राचार्यांनी तर मारायला हातदेखील उचलला. मीच त्यांच्या जवळ होतो आणि तो तडाखा मलाच बसला. आयुष्यात पहिल्यांदाच असला भयानक अपमान होत होता. माझी कानशिलं गरम झाली होती, पाय थरथर कापत होते. शेवटी प्राचार्यांनी निर्णय ऐकवला - प्रत्येकी पाच हजार रुपये दंड. आता मी पार उडालो. १९९५ साली पाच हजार रुपये ही खूप मोठी रक्कम होती. निदान माझ्यासाठी तरी. भयंकर अपमानित होऊन बाहेर पडलो. त्या दोघांचे ठीक होते, मोठ्या घरातले होते, त्यांना इंजीनिअर व्हायची गरज नव्हती, पण माझे काय? कुणाला एक शब्द न बोलता कॉलेजबाहेर पडलो, थेट औषधी दुकान. सुन्न होऊन खोलीवर बसलो होतो. कुठून झक मारली अन् हे फालतू लोक नशिबी आले, असे झाले होते. नशेतच झोपलो. संध्याकाळी मित्र आल्यावर त्यांनी डोळे बघून ओळखले आणि पुन्हा शिव्यांचा भडिमार. मी ऐकून न ऐकल्यासारखे केले. त्या रात्री मी गाईडना आणि विभागप्रमुखांना एकट्यानेच भेटण्याचा निर्णय घेतला. दुसर्‍या दिवशी कॉलेजमध्ये आमच्या विभागात ही बातमी सर्वच शिक्षकांना कळली होती. मी गाईडला शोधायला लागलो. कळले की गाईड लवकर घरी गेल्या. मी बहुतेक वर सांगायचे विसरलो की आमच्या गाईड मॅडम होत्या. तिथूनच त्यांच्या घराचा पत्ता मिळवला आणि थेट त्यांचे घर गाठले. त्यांनी घरातसुद्धा घेतले नाही. मी त्यांना विनंती केली की, किमान मी तरी त्यांना नियमित भेटलो आहे, हे प्राचार्यांपर्यंत माहीत होऊ द्या, जेणेकरून माझी शिक्षा थोडीफार कमी होईल. परंतु त्यांनी चक्क, "मी आता काहीच करू शकत नाही, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे." असे सांगून माझी बोळवण केली. हरकत नाही, आणखी एक आशा होती. मी परत कॉलेजमध्ये आलो. विभागप्रमुखांना भेटायला गेलो. बराच वेळ ताटकळत बसल्यावर भेटले. मी त्यांना डायरी दाखवली, गाईडच्या सह्या दाखवल्या आणि विनंती केली की, त्यांनी प्राचार्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचवावी. परंतु त्यांनीदेखील हात झटकले. "प्रकरण माझ्या हातात नाही, मी काहीच करू शकत नाही, कारण माझ्या नोकरीचा प्रश्न आहे." हे चक्क त्यांचे उत्तर होते. आता शेवटचा पर्याय. मी एकीकडे हताश होतो आणि संतापही येत होता. हे लोक चक्क "माझ्या नोकरीचा प्रश्न आहे" असे म्हणून कसे झटकू शकतात? अन् माझ्या करिअरचे काय? डोक्याचा भुगा. मग काय, थेट औषधी दुकान. थोडा वेळ टंगळमंगळ करून खोलीवर, मित्रांच्या शिव्या, दुर्लक्ष करून झोप. सकाळी उठून प्राचार्यांच्या ऑफिसबाहेर. एक-दोन तास वाट बघूनही त्यांची बैठक काही संपेना. मी प्रचंड अस्वस्थ. बर्‍याच वेळानंतर कार्यालयातून बरेच लोक बाहेर पडले. मी लगेच पुढे झालो. तेवढ्यात स्वतः प्राचार्य बाहेर आले. मला बघून थेट कडाडले, "तुला सांगितलं ना, दंड भरल्याशिवाय तुला परीक्षेला बसता येणार नाही." मी त्यांच्यासमोर डायरी धरली. "सर, मी नियमित भेटलोय, गाईडच्या सह्या आहेत." "ती डायरी मला दाखवू नको. तुला एकदा सांगितलं आहे, आता पुन्हा भेटू नकोस." एवढे बोलून तरातरा निघून गेले. मी अपेक्षेने त्यांच्या मागे मागे गेलो, पण काही फायदा झाला नाही. आता विषयच मिटला. पैसे भरावेच लागणार, घरच्यांना काय सांगणार, या विचारांनी डोक्यात थैमान माजले. लगेच मेडिकल दुकान. आता अभ्यासातले लक्ष उडाले. तोंडी परीक्षा तोंडावरच होत्या. थोडासा साधकबाधक विचार करून कसाबसा अभ्यासाला लागलो. प्रोजेक्ट दिले मित्रांवर सोडून. मी एक विचार केला की, पैसे भरून का होईना पण मार्क्स तरी मिळतीलच, घरच्यांना सामोरे जाऊ. प्रोजेक्ट सादर करण्याच्या दिवशी मी आमचे मशीन बघितले, प्रोजेक्ट रिपोर्ट बघितला. सगळे व्यवस्थित होते. अजिबात उत्साह नव्हता. सगळ्यांसमोर फार कानकोंडे होत होते. परीक्षक अर्थातच विभागप्रमुख, आमच्या प्रोजेक्टजवळून हसत हसत गेले. "हे का तुमचे प्रोजेक्ट?" असे टोचूनही गेले. पुन्हा फिरकले नाही. बर्‍याच वेळाने एक शिक्षक जवळ आले, प्रोजेक्ट रिपोर्ट बघितला आणि हळूच म्हणाले, "गोळा करा आणि जा आता." झाले, रामायण पार पडले. आता मार्कांचीच काळजी होती. कारण प्रोजेक्टला १५० मार्क्स असायचे आणि टक्केवारी वाढवायला खूप मोठा हातभार लावायचे. पैसे घेऊन का होईना, मार्क्स द्यावे हीच अपेक्षा. टेन्शन. मेडिकल दुकान. पुन्हा थोडे सावरून तोंडी परीक्षांची तयारी चालू केली. तोंडी परीक्षा व्यवस्थित पार पडल्या. मुळात शिक्षकलोकांशी चांगले संबंध होते. शेवटच्या तोंडी परीक्षेला माझा नंबर दुपारच्या सत्रात, सगळ्यात शेवटी. माझी पाळी येईपर्यंत संध्याकाळ झाली. परीक्षा आटोपून मी बाहेर पडलो. सोबतचे दोघे थोडी चर्चा करून आपापल्या दिशेने गेले, मी टपरीचा रस्ता धरला. कॉलेज गेटसमोर दोन हॉटेल्सपैकी एकामध्ये फक्त विद्यार्थीच जायचे, त्याच्या बाजूच्या हॉटेलमध्ये शिक्षक. मी पहिल्या हॉटेलात जात असतानाच मागून एका शिक्षकांनी हाक मारली. मला दुसर्‍या हॉटेलात त्यांच्या वेगळ्या बाजूला घेऊन गेले. तिथे गेल्या गेल्या शिक्षकांनी विचारले, "पोहे खाणार का?" मी नम्रपणे नकार दिला. त्यांनी आग्रह केला तरी मी नकोच म्हणालो. मग ते म्हणाले, "सिगरेट घे." मी चक्रावलो. सर आज इतके का मेहेरबान? त्यांनी आग्रहच केला, "घे रे. आता काय राहिलंय?" मीही मग फारसे आढेवेढे न घेता शिलगावली, लगेच चहा आला. त्यांच्यासोबत आणखी एक शिक्षक होते, ते त्यांच्या कामाच्या गप्पा मारत बसले. गप्पा झाल्यावर माझ्याकडे वळून म्हणाले, "मानस, तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही तुम्हाला तिघांनाही पास केलंय." "म्हणजे सर?" "आम्ही तुम्हाला ६५ मार्क्स दिलेत, आता फक्त थिअरीचा जोरात अभ्यास कर." माझ्या डोक्यावर दाणकन वजनदार वस्तू आपटल्यासारखे वाटले मला. फक्त ६५ मार्क्स?? कारण प्रोजेक्टला १५०मार्क्स असत व ६० मार्क्सला पासिंग असे. माझे टक्केवारीचे सगळे गणित क्षणार्धात कोसळले. सर पुढे सांगत होते की, त्यांनी सर्व तोंडी परीक्षांमध्ये चांगले मार्क्स दिले आहेत म्हणून, परंतु माझे लक्षच नव्हते. मग साले यांनी पैसे कशाचे लावले? तेही पाच हजार!!! आता माझे डोकेच काम करेना. च्यायला हा काय प्रकार आहे? सरांना धन्यवाद देऊन तिथून त्यांचा निरोप घेऊन निघालो. डोके बधिर झाले होते. कोरेक्स मारूनच खोलीवर गेलो. जे घडले ते मित्रांना सांगितले. मित्रांनी आधी शिव्या घातल्या, नंतर समजावून सांगण्याचा निष्फळ प्रयत्नही केला. मी माझ्याच धुंदीत होतो. माझ्या डोक्यात सेकंड क्लास घुसतच नव्हता. नुसता जळफळाट, चरफड. आता अभ्यासावरचे लक्ष उडाले. सकाळी शुद्धीत असताना मित्रांनी पुन्हा समजवण्याचा प्रयत्न केला, माझे मात्र डोकेच चालत नव्हते. कसाबसा दुपारपर्यंत गप बसलो, शेवटी उठून मेडिकल दुकान गाठलेच. उगाच इकडे तिकडे वेळ मारून खोलीवर. पुन्हा एकदा मित्रांनी समजावले, पण नाही, मी नाहीच ऐकले. दोन दिवस नशेतच. पुन्हा एकदा स्वतःची समजूत घालून अभ्यासाला सुरुवात केली. काही दिवसात प्रवेशपत्र आल्याचे कळले. प्रवेशपत्र आणायला कॉलेजमध्ये गेल्यावर कळले की, आमच्या तिघांची प्रवेशपत्रे कार्यालयात जमा आहेत आणि पैसे भरल्याशिवाय मिळणार नाहीत. पुन्हा जाळ लागला. मी कार्यालयात वाद घातला की, तुम्ही टी.सी. अडवा, प्रवेशपत्र का अडवताय? थोडा आमच्या करिअरचा विचार करा. त्यांनी सरळ हात वर केले. उलट मलाच सुनावले की आमच्या नोकरीचा प्रश्न आहे, तुम्ही प्राचार्यांना भेटा. खड्ड्यात गेल्या यार तुमच्या नोकर्‍या. अक्षरशः दोन दिवसांवर परीक्षा अन् मी प्राचार्यांना भेटायला दिवसभर त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर. प्राचार्य काही भेटलेच नाहीत. जाऊ दे, होईल ते होईल असा विचार करून खोलीवर परतलो. येतायेताच एक कोरेक्स मारली आणि पडून राहिलो.
विचार करून करून डोक्याचा भुगा झाला होता. साले किती हपापलेले पैश्यासाठी. बरे, घरच्यांना सांगावे तरी कसे? काही चूक नसताना पाच हजार भरायचे? सगळे हेच म्हणणार की ह्यानेच काहीतरी घोळ घातलाय. दोन दिवसात पैसे येणार कुठून? बरे, इतके करूनही मार्क्स मिळणारच नाहीत. ते मला अनधिकृतरित्या आधीच कळले होते. जे होईल ते होईल. माझ्या पार्टनरांनी मात्र पैसे भरून टाकले.
मी तसाच परीक्षेला गेलो. पेपर सुरू झाला. मी भरभर लिहीत होतो. शक्य तेवढे लिहून काढायचे, कारण प्रवेशपत्र तपासणी होणारच होती. अर्ध्या तासाने परीक्षाप्रमुख, जे आमच्याच कॉलेजच्या एका शाखेचे विभागप्रमुख होते, आले. सोबत आमचेच एक शिक्षक. अर्थातच आम्हाला बाहेर थांबायला सांगितले गेले. तिथून परीक्षा कार्यालयाकडे. मी एकटा नव्हतो, आणखी पाच-सहा जण होते. त्यांची कारणे वेगळी होती. सगळे आटोपून परीक्षाप्रमुख आले. सोबतचे शिक्षक थेट माझ्याकडे आले. म्हणाले, "पैसे भरून टाक ना." मी म्हणालो की, "सर, प्लीज थोडा टाईम तरी द्या." परीक्षाप्रमुखांनाही सांगितले की प्रवेशपत्र कार्यालयात जमा आहेत. परंतु त्यांनी स्पष्ट नकार दिला. तरी शिक्षकांनी मध्यस्थी केली अन् पुढल्या पेपरला प्रवेशपत्र दाखवण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली. अर्थात गच्छंती अटळ होती. डोक्यात गोंधळ होताच. पेपर संपवून बाहेर आलो की लगेच औषधी दुकान गाठले. पेपर एक दिवसाआड असतात म्हणून बरे आहे. दुसर्‍या पेपरला पुन्हा तेच. वर्गाबाहेर, परीक्षाप्रमुखांच्या कार्यालयात. प्रमुख भडकले. मी विनंती केली की, पैसे लगेच भरणे शक्य नाही, परीक्षा देऊ द्यावी, टी.सी. अडवावा. आणखीनच भडकले. मी तरीही म्हणालो, "सर, शेवटची परीक्षा आहे, माझ्या करिअरचा प्रश्न आहे." ते उलटून मलाच म्हणाले, "अरे, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे....." माझे टाळकेच सरकले राव. च्यामारी सगळ्यांच्याच नोकरीचा प्रश्न आहे, मग माझे काय? तुमच्या नोकर्‍यांसाठी मला विनाकारण का अडकवताय? माझा पेपर काढून घेतला गेला आणि मी बाहेर. थेट मेडिकल दुकान. मला पैसे भरल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही, हे आता स्पष्ट झाले. मार्क्स, टक्केवारी तशीही बोंबललीच होती. परीक्षादेखील बोंबलली. खड्ड्यात गेले ते इंजीनिअरिंग. माझा इंजीनिअरिंगमधला रसच संपला. केवळ शेवटचे पाच पेपर आणि हे लफडे. कुणाचे काय घोडे मारले होते मी?? घरी काय उत्तर द्यायचे? सगळे सांगितले, तर विश्वास कोण ठेवणार? तो आधीच गमावला होता. एक ना दोन.... डोके प्रचंड भणाणून गेलेले. मित्रही मला काय समजावून सांगणार? त्यांना म्हटले, "तुमचे तुमचे बघा." मी निर्णय घेतला आणि पुढचे सर्व पेपर केवळ नंबर टाकून सोडून दिले. कॉलेजला जाणे, अर्ध्या तासात उठून बाहेर येणे आणि येतायेताच कोरेक्स पिऊन येणे हा एकमेव कार्यक्रम. कोरोक्स पिऊन पडून राहायचे, भटकायचे हाच दिनक्रम. मित्रांशी बोलणेही सोडून दिले. यथावकाश परीक्षा संपल्या आणि सर्व जण आपापल्या घरी परतले. जाता जाता बिचारे शेवटचे शिव्या घालून समजावून गेले. परंतु मी पुरता बधिर झालो होतो.
अशा रितीने केवळ शेवटच्या महिनाभरात अंतिम वर्षाची, पर्यायाने इंजीनिअरिंगची वाट लागली.
तुम्हाला कसे कळले की आपली सवय व्यसन बनली आहे?
परीक्षा संपल्यानंतरही मी काही दिवस औरंगाबादलाच राहिलो. लातूरला परतल्यावर मला घरात करमेना. घरात काहीही सांगितलेले नव्हते. निकाल लागल्यावर काय सांगायचे, या विचाराने आता डोके भणभण करत होते. आज वाटते की त्याच वेळी सांगायला हवे होते. असो. बेचैनी वाढायला लागली. आई-वडिलांचे कदाचित काही प्लॅनिंगही चालू असेल, परंतु मी कुठे जागेवर होतो? मित्रांकडेही जात नव्हतो. एकटाच फिरायचो. मी शेवटी घरापासून लांब एक दुकान शोधून काढले. कोरेक्स मारायचे अन् चहा पीत, सिगरेटी फुकत बसायचे, हा दिनक्रम. बंधनात अडकल्यासारखे वाटत होते. शेवटी औरंगाबादला परत जायचे ठरवले. माझ्या एका सीनियर मित्राला तिथे नोकरी मिळाली होती व तो एकटाच राहत होता. त्याच्यासोबत राहू लागलो. आजकाल ५० मि.ली.च्या छोट्या बाटलीने काही होईना, म्हणून १०० मि.ली.ची मोठी बाटली घ्यायला लागलो. इथेही नुसते फिरणे, सिगरेटी फुंकणे आणि पुडी कायम तोंडात. चहा भरपूर प्यायचो. निकाल जवळ येत चालला होता. घरातले, मित्र सगळे उत्सुक होते. मी मात्र थंड. जास्त बेचैन होत होतो. त्यामुळे आता सकाळीही प्यायला सुरुवात केली. दिवसाला १०० मि.ली.च्या दोन बाटल्या. दिवसभर सुम्म. निकाल जाहीर झाला. परगावचे मित्र येऊन उत्साहात निकाल ऐकवून, सगळे सोपस्कार आटोपून परत जात होते. मी मनातल्या मनात चरफडत होतो. मी आधीच हे सगळे घरी न सांगून चूक केली होती. आता उपयोग नव्हता. घरून निकालाची विचारणा झाली, तेव्हा दोन विषय राहिले असे खोटेच सांगितले. सगळे मित्र येऊन गेल्यावर एकटाच कॉलेजात जाऊन मार्कमेमो घेऊन आलो. मनात नसताना परीक्षेचा अर्ज भरला. परीक्षा देण्याची इच्छाच नव्हती. लातूरलाही परत आलो नाही. रोज सकाळी उठल्या उठल्या बेचैनी व्हायची. कसाबसा १० वाजेपर्यंत कळ काढायचो. एव्हाना माझ्या लक्षात आले होते की, आपल्याला सवय लागली आहे. पण मला मजा येत होती. डोक्यात जे विचारांचे वादळ उठायचे, त्याला खूप घाबरायचो. नाही नाही ते विचार करत बसायचो. समस्येवर उपाय करण्याऐवजी मी गुंता आणखी वाढवून ठेवत होतो. चक्क सहा महिने असेच काढले. या दरम्यान आईची बदली परभणीला झाली होती. पैसे संपले की परभणीला पळायचो. परभणीमध्येही दुकानदार शोधून ठेवले होते. आई दिवसभर ऑफिसमध्ये, त्यामुळे मी घरी सुम्म पडून राहायचो. सात-आठ दिवसांनी पुन्हा औरंगाबाद. आता अभ्यास, परीक्षा सगळे डोक्यातून निघून गेले होते. डोक्यात फक्त कोरेक्स. हळूहळू दोन बाटल्याची गरज तीन बाटल्यांवर आली. सकाळ-दुपार-संध्याकाळ चालू झाली. परीक्षा आल्या, गेल्या. मला काही फरक पडला नाही. निकाल लागायची वेळ आली, तेव्हा मात्र मी झालेले प्रकरण घरात सांगितले. आधी कोणाला सांगितले ते आता आठवत नाही, परंतु आई-वडिलांनी अतिशय शांतपणे घेतले. कोरेक्सच्या सवयीबद्दल मात्र चकार शब्द बोललो नाही. घरच्यांना अर्थातच टेन्शन आले असणारच. त्या वेळी ते माझ्या लक्षात आले नाही. मी निवांत कधी औरंगाबाद, तर कधी परभणी करत राहिलो. लातूरला जाण्यात काहीच रस नव्हता. सोबतच्या सगळ्या मित्रांना नोकर्‍या लागल्या होत्या. त्याचा एक वेगळाच न्यूनगंड मनात वाढत चालला. त्यामुळे कोणालाच भेटत नव्हतो, अगदी एकटा राहायचो. अशात मी ज्या मित्रासोबत राहत होतो, त्याची बदली झाली. मी आता एकटा रूम करून राहू लागलो. आता आणखीनच भकास झालो. बाटल्यांचा साठा करूनच ठेवू लागलो. दिवसभर रूमवर पडून राहायचो. थोडी नशा उतरल्यासारखी वाटली की प्यायचो. यामुळे दिवसाला चार चार बाटल्या होऊ लागल्या. सवय आता माझ्या नकळत माझ्या नियंत्रणाबाहेर गेली होती. तरीही माझ्या लक्षात येत नव्हते, इतका मी बधिर झालो होतो. दिवसाला चार कोरेक्स, दोन पाकिटे सिगरेट्स, २० पुड्या गुटखा आणि दिवसभर चहा. परिणामस्वरूप पैसे पुरेनासे झाले. मग मित्रांकडे उसने मागायला सुरुवात केली. तरीही संपायचेच. दर आठ-दहा दिवसांनी परभणीला जाऊन पैसे आणायचो. एव्हाना घरच्यांच्या लक्षात आले होते की मी औरंगाबादला राहून काहीही करत नाहीये. त्यामुळे माझे चंबूगबाळे आवरून लातूरला आणण्यात आले. औरंगाबादचा दिनक्रम मी लातूरला चालूच ठेवला. वडिलांना आणि भावाला संशय येऊ लागला. मला थोडे जरी तसे वाटले की मी परभणीला पळायचो. वडिलांनी प्रयत्न म्हणून समजावून सांगितले आणि परीक्षा द्यायला राजी केले. परीक्षेसाठी औरंगाबादला आत्याकडे राहायचे ठरवले. मी मात्र घरापासून लांब राहायला मिळणार म्हणून जाम खूश झालो. मला तर बहाणाच मिळाला. पुन्हा येरे माझ्या मागल्या. आता तर दिवसाला पाच-सहा बाटल्या प्यायला लागलो. परीक्षा तर दिलीच नाही, द्यायचीच नव्हती. मजा मारून आलो. केवळ निवांत कोरेक्स प्यायला मिळावी, म्हणून हे सगळे. एव्हाना माझ्या एक लक्षात आले होते की दिवसेंदिवस व्यसन वाढत चालले आहे, आणि मी मात्र यालाच आपले आयुष्य मानत होतो.
कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती?
परीक्षेचे नाटक संपवून लातूरला आलो. मला कोरेक्सची इतकी बेफाम चटक लागली होती की, आजकाल रात्री-बेरात्रीसुद्धा बेचैन होऊ लागलो. यावर उपाय म्हणून पँटच्या खिशात एक बाटली कायम ठेवायचो. मध्येच झोपेतून जाग यायची, अशा वेळी संडासामध्ये जाऊन बाटली मारायची आणि परत झोपायचो. इतके करूनही सकाळी उठल्या उठल्या पुन्हा तलफ लागायची. प्रचंड बेचैनी व्हायची. यासाठी गाडीच्या डिक्कीत एक बाटली ठेवू लागलो. सकाळी दातसुद्धा न घासता, मी कोणाचे लक्ष नाही ना हे पाहून बाटली काढून घ्यायचो आणि संडासामध्ये पळायचो. हा सगळा डोळे मिटून दूध पिणार्‍या मांजरीसारखा प्रकार चालला होता. कधीतरी भावाला ह्या बाटल्या दिसल्या आणि त्याने वडिलांनाही दाखवल्या. घरच्यांची खातरी पटली की पोरगा वाया गेला आहे. आई-वडील वरून जरी शांत दिसत असले, तरी त्यांना काय वाटत असेल, हे मी आज समजू शकतो. आता पैशांची प्रचंड चणचण भासू लागलेली. रोज रोज पैसे मागून मागून किती मागणार? स्वस्थ तर बसवत नव्हते. शेवटी वडिलांच्या खिशातून पैसे चोरी करायला चालू केले. ते वडिलांच्या लगेच लक्षात आले. त्यांनी पैसे लपवून ठेवायला सुरुवात केली. परंतु मी मात्र ते शोधूनच काढायचो. एकदा तल्लफ आली की मी प्रचंड बेचैन व्हायचो. मला काहीही करून कोरेक्स हवेच असायचे. सारासार विवेकबुद्धी कामच करत नव्हती. वडिलांना सगळे कळत होते, परंतु तेदेखील हतबल होते. मला कसे समजावून सांगायचे हेच त्यांना कळत नव्हते. त्यांच्या मनावरचा ताण स्पष्ट दिसत होता. मला कळत होते, पण व्यसनापायी वळत नव्हते. प्रत्येक बाटली शेवटची, उद्यापासून बंद, असे प्रत्येक वेळी म्हणायचो. याच दरम्यान घरी आजी गंभीर होत्या. नातेवाईक आले होते. मी मात्र धुंदीतच होतो. एक दिवस मी बाहेरून हिंडून फिरून आलो, आल्या आल्या भावाने सांगितले की आजी गेल्या. मी तसाच घराबाहेर पडलो आणि १०-१२ बाटल्या घेऊन गाडीच्या डिक्कीत ठेवल्या. मला आजींच्या जाण्यापेक्षा माझ्या बाटल्यांचीच काळजी. कारण निदान दोन-तीन दिवस तरी घराबाहेर पडता येणार नव्हते, आणि मला त्याचीच जास्त काळजी. आज मी त्या गोष्टीचा विचार करून बेचैन होतो. इतके असूनही मी कसाबसा एक दिवस तग धरू शकलो. या सगळ्या गोष्टी आई-वडिलांच्या डोळ्यासमोर घडत होत्या. त्यांच्या मनाला किती यातना होत असतील, हे मी आज, स्वतः बाप झाल्यावर समजू शकतो. त्यांच्या यातनांची फक्त कल्पना करू शकतो. आई-वडील अक्षरशः हतबल होते. आडून आडून समजावून सांगायचे, मी दुर्लक्ष करायचो. सामाजिक प्रतिष्ठेमुळे ते कोणाजवळ बोलूदेखील शकत नव्हते. त्यांच्या यातना इतक्यावरच थांबल्या नाहीत.
नातेवाइकांचे आणि इतर मित्रांचे काय अनुभव होते?
नातेवाईक व मित्रमंडळींसोबत मी स्वतःला तोडूनच घेतले होते. संपूर्ण तीन वर्षे मी तसा अलिप्तच राहिलो. औरंगाबादच्या आत्या व जामनेर (जि. जळगाव) येथे एक आत्या यांच्याकडे राहायला मला फार आवडायचे. दोन्ही आत्या, मामा, आतेभाऊ-बहीण यांचे स्वभाव फार छान होते. त्यांच्याकडे राहायला आवडण्याचे कारण म्हणजे डोके शांत राहायचे. अर्थात पिणे सोडलेच नव्हते. त्या काळात माझे वागणेही खूप बदलले होते. भ्रमिष्टच झालो होतो. पहिल्या पायरीवरच्या वेड्या माणसासारखे माझे वर्तन होते. एकतर वजन प्रचंड वाढले होते - ६४ किलोवरून थेट ८८ किलोपर्यंत गेले होते. आगडबंब देहाचा विक्षिप्त तरुण म्हणून कदाचित त्यांना सहानुभूती वाटत असावी. आता मात्र मला मनोमन हसू येते. काहीही असले तरी त्यांच्याकडे छान वाटायचे. त्यांना कदाचित माहीत असावे. जामनेरच्या आत्या-मामा दोघेही डॉक्टर, त्यामुळे वडिलांनी सुरुवातीलाच सांगितले असावे असे वाटते. परंतु कालांतराने त्यांना कळले. नंतर आत्यानेही मदत केली. इतर नातेवाइकांचा फारसा संपर्क आला नाही. आजीच्या वेळेस सर्व जण होते. परंतु त्यांना कळले की नाही हे मात्र मलाही माहीत नाही.
मित्रांचे म्हणाल, तर मी आधी सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे अलिप्त राहिलो. मी औरंगाबादला एकटा राहत असताना माझा एक मित्र रूमवर येत असे. परंतु मी इतका बधिर की त्याच्याशी जास्त गप्पाही व्हायच्या नाहीत. तरी तो अधूनमधून येत असे. तरीसुद्धा एक मित्र असा होता ज्याच्याकडे मी नियमित जायचो. त्याचे दुकान होते, अर्थातच नेहमी पैसे असायचे. खिशातले पैसे संपले की त्याच्याकडून उसने घ्यायचो. सुरुवातीला त्याने सहज दिले, परंतु नंतर त्याच्याही लक्षात आले असणार की प्रकरण काही वेगळे आहे. तरी मी हट्टाने, अजिजीने पैसे काढायचोच. बाकी मित्र मला नंतर सांगायचे की, मी वेडा झालो असेच ते समजायचे. ते समोरून आले तरी मी त्यांना ओळखत नसे म्हणे. हे त्यांनीच मला सांगितले.
तुम्ही मुक्तांगणला जाणाचा निर्णय कसा घेतला?
मी आधी सांगितल्याप्रमाणे आई-वडिलांच्या यातना इतक्यात थांबल्या नाहीत. मी औरंगाबादला एकटा राहत असताना मला प्रचंड त्रास सुरू झाला होता. एकतर वजन बेसुमार वाढलेले, पायांवर सूजही कायम असायची. प्रचंड घाम यायचा. इतका, की भर हिवाळ्यात मी पंखा पूर्ण वेगात ठेवून त्याच्या खाली झोपायचो, तरीसुद्धा पाठ घामाने चिंब भिजलेली असायची. अंथरुणावरची चादर ओलीचिंब व्हायची. त्यात एक दिवस अंग प्रचंड ठणकू लागले, सगळे सांधे प्रचंड दुखत होते. पोटात भयानक जळजळ होत होती. एक-दोन उलट्याही झाल्या. म्हणून मी जवळच्याच एका दवाखान्यात गेलो. तिथे डॉक्टरीणबाईंनी मला तपासले. त्यांना काय वाटले कुणास ठाऊक, त्यांनी माझा रक्तदाब तपासला, पुन्हा दुसर्‍यांदा तपासला आणि त्यांच्या डॉक्टर पतींना बोलावले. त्यांनीही माझा रक्तदाब तपासला. दोघेही थोडे काळजीत पडल्यासारखे वाटले. रक्तदाब होता १२०/१९०. त्यांनी ताबडतोब कसली तरी गोळी फोडून माझ्या जिभेखाली टाकली. एक इंजेक्शन दिले व दवाखान्यातच झोपायला सांगितले. मलाही लगेच झोप लागली. तासाभराने उठलो, पुन्हा तपासले व गोळ्या लिहून दिल्या. त्या वेळी मला रक्तदाब याविषयी जास्त माहिती नव्हती त्यामुळे याचे गांभीर्य कळलेच नाही. मी दवाखान्यातून बाहेर येऊन, जेवण करून, गोळ्या घेऊन वर कोरेक्स पिऊन झोपलो.
यानंतर थोड्याच दिवसांनी एक घटना घडली. औरंगाबादमध्येच असाच रात्री पायी फिरत असताना मी एका चौकात आलो. त्या दिवशी मला वातावरण वेगळेच जाणवत होते. चौकामध्ये चार रिक्षावाले थांबले होते. मी त्यांच्याकडे बघत चाललो होतो. दुसर्‍या क्षणाला मला जाणवले की मी रिक्षामध्ये आहे. मी हादरलोच. आयला, मी रिक्षात कसा आलो? रिक्षावाला सुसाट वेगाने रिक्षा पळवत होता. मी घाबरलो. माझ्या शर्टकडे माझे लक्ष गेले, मोठा लाल डाग दिसला. मी तोंड, नाक हाताने तपासून बघितले. कुठेही जखम नव्हती. मग लक्षात आले की तोंडात गुटखा होता, लाळ शर्टवर सांडली होती. आता सावध झालो. डोक्याच्या मागच्या बाजूला हलके दुखत होते. हात लावला तर पूर्ण डोके धूळमातीने भरलेले. काहीतरी झाले. मी त्या रिक्षावाल्याला विचारले, "किधर जा रहे भाई?" "साब, तुमीच सिडकोमें बोले ना." सिडकोमध्ये माझी एक बहीण राहत असे. नंतर रिक्षावाल्यानेच सांगितले की मी चक्कर येऊन पडलो होतो व मीच त्याला सिडकोचा पत्ता दिला, अन्यथा ते मला दवाखान्यात नेणार होते. त्या बिचार्‍या प्रामाणिक रिक्षावाल्याने मला बरोबर पत्त्यावर सोडले. बहिणीकडे गेल्यावर तिला सर्व सांगितले. तिचे दीर डॉक्टर आहेत व हेडगेवार रुग्णालयात नोकरी करतात. भाऊजींसोबत माझी रवानगी रुग्णालयात. तिथे मला एक रात्र दाखल करून घेतले. तपासण्या झाल्या. गुटख्यामुळे चक्कर आली असे मला सांगितले. मात्र रक्तदाबासाठी पुन्हा तपासणीकरिता येण्यास सांगितले. सोनोग्राफी करून घेण्यात आली, सर्व काही सामान्य. जाता जाता डॉक्टरांनी मला, "कोरेक्समुळे रक्तदाब वाढतो" असे सांगितले. मी समजून गेलो की, बातमी इथपर्यंत पोहोचली. परंतु मी विश्वास ठेवला नाही. कोरेक्स सोडायला डॉक्टरच्या तोंडून असे काहीही सांगायला लावतात अशी समजूत मी करून घेतली. परभणीला असताना दोन वेळा असाच प्रकार झाला. एकदा घरी एकटाच असताना, त्या वेळी मोलकरणीने आईला फोन करून सांगितले होते. दुसर्‍यांदा रात्री बाहेर फिरत असताना, या वेळीही एक प्रामाणिक रिक्षावाला मदतीला धावून आला. परमेश्वराची कृपा. नंतर मला कळले की मला फीट्स येत होत्या.
इकडे आई-वडिलांचे धाबे दणाणले होते. डोळ्यासमोर तरुण मुलाचे हाल. परमेश्वरा मला क्षमा कर. मी मात्र बिनदिक्कत दिवसाला ८-१० बाटल्या पीतच होतो. एकदा लातूरला असताना रात्री टी.व्ही.वर चित्रपट बघत जेवत असताना मला झटका आला. वडील एकटेच. त्यांनी शेजारच्या प्राध्यापकांना - त्यांच्यासोबत आमचे खूप जवळचे कौटुंबिक संबंध आहेत - बोलावले. वडिलांनी प्रत्यक्ष माझी हालत बघितली. मी त्यांच्या अवस्थेची कल्पनाच करू शकतो. मला आमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यांनी रक्तदाबाच्या गोळ्या तीव्रता वाढवून दिल्या. "कोरेक्समुळे बी.पी. वाढते" हे सांगायला विसरले नाहीत. मला गांभीर्य कळले, पण....
काही दिवसातच माझे शरीर जागेपणी, झोपेत झटके मारू लागले. हात, पाय आपोआप हवेत फेकले जात. झोपेत तर मी पलंगावर वीतभर वर उडायचो. वडील हे सगळे बघायचे. त्या दिवसांमध्ये वडील प्रचंड तणावाखाली होते. मला जामनेरला आत्याकडे पाठवले गेले. आत्यासोबत मी औरंगाबादच्या प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञांना भेटलो. त्यांनी माझ्यासमोर फक्त परीक्षा दे, हा एकच धोशा लावला. मी जास्तच वैतागलो. अर्थात त्यांच्या तपासणीचा भाग असेल. पण मला कुठे कळत होते? त्यांनी दुसर्‍या एका मनोविकारतज्ज्ञांकडे काही तपासण्या करण्यासाठी रवानगी केली. वैतागून तिथून निघालो. दुसर्‍या तज्ज्ञाकडे जाताना वडील सोबत आले. तो चक्क पागलखाना होता. साखळ्या बांधलेले दोन वेडे फिरत होते. ते वातावरण बघूनच वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. "आपण इथे फक्त तपासण्या करुन घ्यायच्या, तुला इथे ठेवायचं नाही." वडील दारातच अगतिकतेने बोलले. धीरगंभीर, पहाडासारखा खंबीर माणूस इतका अगतिक मी पहिल्यांदाच बघितला. मी निःशब्द झालो. वर्णनच नाही करू शकत. आम्ही आत गेलो. तपासण्या केल्या गेल्या, ई.सी.जी. काढला. "सबकुछ नॉर्मल" डॉक्टरांनी निदान सांगितले आणि वडिलांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी मोठा सुस्कारा टाकला. माझ्या चांगला लक्षात राहिला. एव्हाना मी आतून पूर्णपणे हादरलो होतो. पण..... काही केल्या कोरेक्स सुटत नव्हते. मी चुंबकासारखा बाटलीकडेच जात होतो.
मी पुन्हा काही दिवसांकरिता औरंगाबादच्या आत्याकडे राहिलो. वडिलांशी बोलण्याची हिंमतच नव्हती. उगाच वेड्यासारखा पीत होतो आणि फिरत होतो. डोके भणाणून गेले होते. मन कोरेक्सकडे धाव घेत होते. महिना असाच गेला असेल. एका रात्री मी नेहमीप्रमाणे तीन-चार बाटल्या सोबत घेतल्या. एका सूनसान रस्त्यावरच्या पुलावर एकटाच बसलो होतो. बाटली लावली आणि पुडी तोंडात टाकली. अचानक विचार डोक्यात गर्दी करू लागलो. बालपणापासून सर्व काही आठवू लागले. आपण कोण आहोत, आपली पार्श्वभूमी काय आहे. इतक्या चांगल्या सुसंस्कृत घरात, इतक्या चांगल्या मायबापाच्या पोटी जन्माला आलेलो आपण आणि आज काय हालत आहे आपली..... मी जास्तच अस्वस्थ होऊ लागलो. उज्ज्वल भविष्यकाळ समोर होता आणि केवळ स्वतःच्या चुकीने आज मरणपंथाला लागलो. याच्यासाठी जन्मलो का आपण? रस्त्यावरच्या कुत्र्यापेक्षा वाईट अवस्था झाली आहे आपली. एक ना दोन! मला काय करावे सुचेना. या सगळ्याला कोरेक्सचे व्यसन जबाबदार असल्याची जाणीव प्रथमच होत होती. वडिलांची परिस्थिती आठवू लागली. आईचे काय होत असेल? या सगळ्याला जबाबदार आपण. सोबतचे सगळे कितीतरी पुढे निघून गेले आणि मी? जग फार पुढे गेले होते. त्या दिवशी मी शुद्धीवर आलो होतो. केवळ परमेश्वराची कृपा आणि आई-वडिलांचे संस्कार, मी नशेत धुत असताना माझ्या डोक्यात हे विचार आले. मी अतिशय अस्वस्थ झालो. गाडीला किक मारली थेट एस.टी.डी. बूथ गाठले. अगदी चाचरत चाचरत घरी फोन लावला. वडिलांनीच उचलला. मी सरळ सरळ वडिलांना सांगून टाकले, "मला कोरेक्स सोडायचे आहे, एखादे व्यसनमुक्ती केंद्र शोधा." वडिलांना काय बोलावे ते सुचेना. ते फक्त चारचारदा, "तू लगेच लातूरला ये बाळा" इतकेच बोलत होते. त्यांच्या आवाजातला आनंद मला फोनवर जाणवत होता. मीही खूप शांत झालो होतो. आता जरा आयुष्याला अर्थ आल्यासारखे वाटत होते. अर्थात बाहेर येऊन आणखी एक बाटली लावलीच. दोन दिवसात मी लातूरला परतलो. तोपर्यंत वडिलांनी डॉक्टरांकडे चौकशी करून 'मुक्तांगण' नावाचे पुण्याचे नामांकित व्यसनमुक्ती केंद्र असल्याची माहिती मिळवली होती. लातूरला आल्यावर अर्थातच बाटल्यांचा रतीब सुरूच होता, परंतु परिस्थिती वेगळी होती. मुक्तांगणची अधिक माहिती घेण्यासाठी मी स्वतः एकटाच पुण्याला आलो. 'येरवड्याच्या जगप्रसिद्ध मेन्टल हॉस्पिटलजवळ' इतकीच माहिती होती. तिथे गेल्यावर कळले की ते हॉस्पिटलजवळ नव्हते, तर हॉस्पिटलमध्येच होते. मागील बाजूस एका वेगळ्या इमारतीमध्ये 'मुक्तांगण' चालवले जात होते. आता ते स्वतःच्या स्वतंत्र इमारतीमध्ये स्थलांतरित झाले आहे. मी माहिती घेतली. त्यांनी विचारले, "पेशंट कोण आहे?" "मी स्वतः." आता त्यांचा आविर्भाव बदलला. त्यांनी तारीख दिली व मला दाखल होताना घरच्यांना सोबत आणण्याची दहा वेळेस सूचना केली. मीही त्यांना सोबत घरच्यांना आणण्याचे आश्वासन दिले व लातूरला परतलो.
मुक्तांगणच्या दिवसांबद्दल थोडी माहिती द्याल का?
२२ जुलै १९९८ या दिवशी मी मुक्तांगणमध्ये दाखल झालो. वडील सोबत आले होते. तिथले वातावरणदेखील गजबजलेले. ते सर्व बघून वडिलांनाही बरे वाटले. मी जाताना सरळ गेलोच नाही. फाटकाबाहेर गाडी उभी केली होती. सामान आणायचा बहाणा करून मागे थांबलो आणि पिशवीत लपवलेली शेवटची कोरेक्स उतरवली, पुडी तोंडात टाकली. साळसूदपणे सामान घेऊन आलो. आम्हाला उशीर झाल्यामुळे पटापट सर्व सोपस्कार पार पाडले. इथे दाखल होताना शारीरिक तपासणी केली जाते. बर्‍याचदा पेशंट लपवून सामान आणत असतात. माझीही झाली. वडिलांचा आशीर्वाद घेऊन वॉर्डकडे रवाना झालो. इथे नवीन दाखल झालेल्या व्यक्तींसाठी ३५ दिवसांचा कोर्स असतो आणि असे सर्व पेशंट्स एकत्रच एका वॉर्डात राहतात. जवळजवळ ८० संख्या होती. मला एक पलंग आणि लॉकर दिले गेले. जेवणाची वेळ झालीच होती, जेवण करून आलो आणि ढाराढूर झोपलो. सुरुवातीचे चार दिवस मी फक्त झोपून होतो. मला काहीच शुद्ध नव्हती. याला Withdrawal symptoms असे म्हणतात, हे नंतर कळले. तिथला दिनक्रम ठरलेला होता. सकाळी ६ वाजता उठणे, लगेच बाहेर मैदानात शारीरिक कवायत, ती झाली की चहा. त्यानंतर आन्हिके उरकणे, लगेच नाश्ता. नाश्ता म्हणजे उसळपाव ठरलेली. नंतर वर्ग होत असे. वर्ग झाल्यावर थोडा वेळ मोकळा, मग जेवण. त्यानंतर विश्रांती व तीन वाजता योगासने. ते झाल्यावर पुन्हा चहा. चहा झाल्या झाल्या मेडिटेशन. संध्याकाळी एक तास मैदानावर सोडण्यात येई. त्यानंतर आठवड्यातून दोन दिवस अे.अे.च्या सभा होत. नाहीतर टिवल्याबावल्या. रात्री जेवण करून दिवसाची समाप्ती. इमारतीच्या बाहेर जाण्यास परवानगी नव्हती. पैसे जवळ ठेवण्यास बंदी. ज्यांना डॉक्टरच्या गोळ्या चालू आहेत, त्यांना औषधे जवळ बाळगण्यास बंदी होती. कारण बर्‍याच औषधी गोळ्यांचा नशेसाठी वापर केला जातो. औषधे व्यवस्थापनाकडे जमा करावी लागत. तिथल्या नर्स सकाळ-संध्याकाळ गोळ्या आणून देत. आठवड्यातून दोन दिवस दोन नामांकित डॉक्टर्स मोफत सेवा देत होते. सर्व पेशंट्सना एक सल्लागार नेमून दिलेले. काहीही समस्या असो सल्लागारांना भेटावे लागे. याखेरीज इथली सर्व कामे पेशंट्सना स्वतःच करावी लागत. वॉर्ड, जेवणाची खोली झाडणे, पुसणे, जेवणाच्या सतरंज्या टाकणे, भांडी घासणे, शौचालय, हात धुण्याची जागा स्वच्छ करणे, जेवण वाढणे, चहावाटप, भाज्या चिरणे अशी सर्व कामे पेशंट्सना उपचार पद्धतीचा भाग म्हणून करावी लागत असत. ही कामे प्रत्येक आठवड्याच्या सुरुवातीलाच नेमून दिली जात असत. नवीन पेशंट्सना पहिला आठवडा कुठलेही काम दिले जायचे नाही. याखेरीज चटणी बनवणे, मेणबत्त्या तयार करणे यासारखी ऐच्छिक कामेदेखील होती. मुक्तांगणमध्ये आणखी एक पद्धत होती, ती म्हणजे पेशंटला बिडी किंवा तंबाखू यासाठी परवानगी होती. हे सर्वात भारी काम. परंतु तेही मर्यादित. आठवड्यातून दोनदा एक एक बिडी बंडल किंवा एक एक तंबाखू पूडी. याचे कारण व्यसनी माणसाला हमखास दोन-तीन व्यसने असतात व सर्वच एका वेळी बंद करू नये असा संकेत आहे. म्हणून ही सवलत. आणि हे सर्व ज्यांच्या देखरेखीखाली चाले असे वॉर्डप्रमुख. इथे श्री. प्रसाद चांदेकर उर्फ बंधू, श्री. तुषार नातू व श्री. रवी पाध्ये हे तिघे जण वॉर्ड सांभाळत. मुक्तांगणचे वैशिष्ट्य म्हणजे इथे काम करणार्‍या संचालिका सोडून सर्व जण हे एकेकाळचे व्यसनीच. सुरक्षारक्षक, स्वयंपाकी, सल्लागार सर्व. मुक्तांगणमधली वाखाणण्याची गोष्ट म्हणजे तिथले वाचनालय. पुस्तकांचा फार मोठा खजिना. पु.ल. देशपांडेंच्या ट्रस्टने दिलेल्या देणगीतून साकारलेले. या सगळ्यासोबतच एक छोटे जिम.
माझे पहिले चार दिवस अर्थातच झोपण्यात गेले. नाश्ता आला, चहा आला, जेवण आले, असे प्रत्येक वेळी कोणीतरी येऊन उठवायचे. मी परत येऊन पुन्हा झोपायचो. तिथल्या लोकांना अशा गोष्टींची सवय असावी. त्यामुळे मला कोणी जास्त त्रास दिला नाही. मला दुसरे काही सुचतच नव्हते. प्रचंड झोप. चार दिवसांनंतर थोडा ताळ्यावर आलो आणि इथल्या दिनचर्येची माहिती होऊ लागली. त्यानंतर मी सर्व सत्रांमध्ये भाग घेऊ लागलो. हळूहळू इतरांच्या ओळखी होऊ लागल्या. शेजारच्या पलंगावरचे आधी ओळखीचे झाले, नंतर बाकीचे सर्व. तिथेही कंपू तयार झाले. सर्व जण एकत्र असल्याचा फायदा हा झाला की अनुभवांची देवाणघेवाण व्हायची आणि सगळे आपल्यासारखेच हे बघून जरा बरे वाटले. सकाळी कवायत, जिवावरचे काम. हळूहळू त्यात मजा येऊ लागली. स्वतः करण्यापेक्षा इतर कसे करतात ते बघायला जास्त मजा यायची. चहा रांगेत उभे राहून घेणे, उरला तर आणखी एकदा घेणे. थंडगार पाण्याने आंघोळ करावी लागे. सर्वांसोबत रांगेत नाश्ता, जेवण घेणे हे सगळे सवयीचे झाले. दुसर्‍या आठवड्यापासून कामे सांगण्यात येऊ लागली. एक आठवड्यासाठी एखाद्या कामाची जबाबदारी देण्यात यायची. माझ्या वाट्याला फरशा पुसणे, स्वयंपाकाची मोठी भांडी घासणे, शौचालय स्वच्छ करणे, जेवण झाल्यावर सर्व जण जिथे हात धुवायचे ती जागा स्वच्छ करणे अशी कामे आली. ती मी आनंदाने, उत्साहाने केली. इतरही छोटीमोठी कामे मी न सांगताच करायचो. मला बरे वाटायचे. इथे प्रत्येकाला मार्गदर्शनासाठी एक सल्लागार ठरवून दिलेले असत. माझे सल्लागार होते श्री. खटावकर गुरुजी. ते 'गुरुजी' म्हणुनच प्रसिद्ध होते. अगदी सुरुवातीला मला सांगण्यात आले, तेव्हा मी बधिरच होतो. मी काही त्यांना भेटायला गेलोच नाही. नंतर त्यांच्याकडूनच बोलावणे आले. त्यांना बघितले की ते फार कडक वगैरे वाटायचे. पहिल्या भेटीत मी थोडा दबलेलाच होतो. परंतु जसा संपर्क वाढत गेला, तसे लक्षात आले की ते दिसतात तसे नाहीत. हळूहळू संबंधांमध्ये मोकळेपणा येत गेला. वय साधारण ५०च्या वर, अतिशय अनुभवी. बोलताना मात्र ते बरोबरीचा असल्यासारखे बोलत. कुठल्याही विषयावर त्यांच्याशी बोलावे इतके ते मोकळे होते. त्यांनी पुढे मला जबरदस्ती व्हॉलीबॉल खेळायला लावले. मला येत नव्हते, तर शिकवलेसुद्धा. ८८ किलोचे माझे धूड मैदानावर पळायचे, तेव्हा सगळे जण जोरजोरात ओरडून चिडवायचे. "रणगाडा आला रे रणगाडा" असे ओरडायचे. दरम्यान कोणी तरी माझ्या आकारावरून माझे नामकरण केले - 'कोरेक्स बेबी'. त्याचीही मजा घेतली. वाचनालयाचा पुरेपूर वापर करून घेतला. बरीच पुस्तके वाचली. योगासनांच्या वर्गात दहा-बारा प्रकारची आसने शिकवली गेली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगशिक्षक पेंडसे सर तिथे मोफत शिकवत असत. माझा आकार व उच्च रक्तदाबाचा त्रास बघून त्यांनी काही आसने सांगितली, अर्थातच तिथून बाहेर आल्यावर मी ती कधीच केली नाहीत. संध्याकाळी टाईमपास म्हणून जिमदेखील करायचो. जसाजसा रुळत गेलो, तसेतसे रवीदादा, बंधू, तुषार सरांशीहि जवळीक निर्माण झाली. रवीदादांशी गप्पा मारताना मजा यायची. एकदम शांत माणूस. गोड बोलून समजावुन सांगणार. बंधू म्हणजे तडक भडक, कधी गोड कधी कडक. चार वाजताचे मेडिटेशन हा एक वेगळा प्रकार होता. रोज एक विषय घेतला जाई, त्या विषयावर सर्वांना आपले आपले मत मांडावेच लागे. व्यसनी माणसासाठी याचे वेगळे महत्त्व आहे. व्यसनी माणूस व्यसनाच्या पलीकडे दुसरा कुठला विचार करत नाही. या पद्धतीमुळे विचारशक्ती दुसर्‍या दिशेने वळवायला फार मदत होते. काही का असेना, बोलल्यामुळे आत्मविश्वास जागा होतो. म्हणूनच कदाचित याला मेडिटेशन म्हणत असत. मीही बोलायचो, बेधडक. पस्तीस दिवसात मी खूप बदललो.
या दिवसातच ओळख झाली ती अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस (अनामिक मद्यपी) थोडक्यात ए.ए. या संस्थेशी. आठवड्यातून दोन वेळा मुक्तांगणमध्ये सभा होत व सर्वांना सक्तीने हजर राहावे लागे. सभांमधूनच ए.ए.च्या बारा पायर्‍यांचा परिचय झाला. सभेमध्ये वक्ते येत व सुरुवात करत, "मी अमुक व मी एक दारुडा आहे." बोलणारे स्वतःच्या मद्यपाशाचे अनुभव सांगत. मनमोकळेपणे स्वतःच्या चुका कबूल करत. काही काही जणांचे अनुभव ऐकून अंगावर काटा यायचा. मला सुरुवातीला हे विचित्र वाटले, परंतु ए.ए.शी परिचय वाढल्यावर त्याचे महत्त्व कळले. मला स्वतःला पहिल्यांदा बोलताना फार अवघडल्यासारखे झाले होते. "मी सचिन, मी एक व्यसनी आहे." शंभर लोकांसमोर पहिल्यांदा बोलताना जीभ जड झाली होती. ए.ए.ची पहिलीच पायरी सांगते की, 'मी मान्य करतो की मी व्यसनी आहे व व्यसनाधीनतेमुळे माझे आयुष्य अस्ताव्यस्त झाले आहे.' हे जोपर्यंत मनोमन मान्य करत नाही, तोपर्यंत पुढचा मार्ग मोकळा होत नाही. मी याचा अक्षरशः अनुभव घेतला होता. मी स्वतःहून वडिलांना सांगितल्यामुळेच माझा मार्ग सुकर झाला होता. सभेमध्ये स्वतःचे अनुभव सांगतानाही लाज वाटायची. परंतु हे सर्व बोलल्यानंतर फार हलके वाटायचे. कारण बाहेरच्या जगात हे कुणाला सांगू शकत नाही. दुसरी पायरी सांगते की, 'मला ठाम विश्वास आहे की, केवळ उच्चशक्तीच मला योग्य मार्ग दाखवेल.' याचादेखील मी शब्दशः अनुभव घेतला. मुक्तांगणचा मार्ग मिळाला, पुढे मुक्तांगणच्या माध्यमातून ए.ए.चा परिचय वगैरे सर्व आपोआप घडत गेले, ही सर्व त्याचीच कृपा. सभेमध्ये स्वतःचे अनुभव सांगणे म्हणजे ए.ए.च्या पाचव्या पायरीचे प्रत्यक्ष आचरण. परमेश्वराजवळ व इतरांसमोर स्वतःच्या चुकांची कबुली दिली. यावर बरेच लिहिण्यासारखे आहे. इथेच 'फक्त आजचा दिवस' या जीवन पद्धतीची ओळख झाली. हे म्हणजे 'आज नगद कल उधार'सारखे, फक्त आजचाच दिवस व्यसनापासून लांब राहायचे.
मुक्तांगणमधला एक संस्मरणीय कार्यक्रम म्हणजे 'अंतर्दीप प्रज्वलन'. पेशंटला पस्तीस दिवसांच्या कोर्स पूर्ण झाल्यावर निरोप देताना हा कार्यक्रम घेतला जातो. प्रत्येकाला बोलावून एक दिवा लावण्यास सांगितले जाते. मुक्तांगणबाहेरच्या स्वतःच्या नवीन आयुष्याची ही सुरुवात असते, एक नवीन जन्म मिळालेला असतो, याची आठवण म्हणून प्रत्येकाला एक सुंदर संदेश लिहिलेले व मुक्तांगणची प्रार्थना लिहिलेले कार्ड दिले जाते. त्या दिवशी एक वेगळीच भावना होती आणि उत्साहदेखील होता. जवळजवळ साडेतीन वर्षांच्या बेहोशीनंतर जगात पाय ठेवला होता.
लातूरला आल्यानंतर काही दिवस अतिशय उत्साहात गेले. काही दिवसांनी थोडी धाकधूक वाटू लागली. कारण त्याचे आकर्षण माहीत होते आणि मेडिकल दुकाने तर गल्लोगल्ली होती. घसरण्याची शक्यताही भरपूर होती. म्हणून पुन्हा एकदा मुक्तांगणमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. ज्यांना बाहेरच्या जगात राहण्याचा आत्मविश्वास नसतो, अशांसाठी एक वेगळा वॉर्ड आहे. एक महिन्याकरिता येथे राहता येते. मी पुढे अडीच महिने राहिलो. हा वेगळाच अनुभव होता. येथे काही नियम शिथिल होते. या दिवसांमध्ये मुक्तांगणच्या बर्‍याच उपक्रमांमध्ये भाग घेतला. जबाबदारीची कामे करावी लागली. आठवड्यातून एकदा भाजी आणणे, गॅस सिलेंडर आणणे वगैरे. या कामांमधून स्वयंपाक, गाडी चालवणे अशी दुहेरी कामे करणारे श्री. दत्ता श्रीखंडे यांच्याशी जवळीक झाली. दत्तासरांची कहाणी अक्षरशः अंगावर काटा आणते. रस्त्यावरचा माणूस, आज खूप मोठी उंची गाठली आहे. त्यांना माझे नाव इतके आवडले की, त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव 'मानस' ठेवले. दिवाळीच्या आधी आकाशकंदील बनवून, रस्त्यावर गाडी लावून विक्री करण्याचे कामदेखील केले.
या वास्तव्यात एक फार मोठी गोष्ट झाली, ती म्हणजे डॉ. अनिल अवचट या महान व्यक्तीची ओळख व व्यक्तिगत परिचय. प्रसिद्ध लेखक, संगीततज्ज्ञ, बासरीवादक, चित्रकार, काष्ठशिल्पकार असे अनेक पैलू असलेले व्यक्तिमत्त्व. सर्वात मोठे कार्य म्हणजे डॉक्टरी पेशाला रामराम ठोकून संपूर्ण आयुष्य समाजसेवेला वाहून घेतले. मुक्तांगणमध्ये त्यांना 'बाबा' या नावानेच ओळखले जाते. महत्त्वाच्या, नामांकित अनेक व्यक्ती केवळ बाबांच्या प्रेमाखातर व आदरापोटी मुक्तांगणला भेट देत, कार्यक्रमांसाठी खास वेळ काढत. इतके असूनही अगदी जमिनीवरचा माणूस. त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी एक पुस्तकच छापावे लागेल. बाबांबद्दलची एक संस्मरणीय आठवण म्हणजे बाबांनी लातूरला माझ्या घरी दिलेली भेट. एका कार्यक्रमासाठी बाबा, दत्तासर व श्री. महेंद्र कानिटकर लातूरला आले होते. केवळ माझ्या आग्रहाखातर सगळ्या धावपळीतून वेळात वेळ काढून माझ्या घरी येऊन गेले. केवळ मुक्तांगणचा पेशंट म्हणून.
खरे तर मुक्तांगणबद्दल लिहिण्यासारखे बरेच आहे. परंतु विस्तारभयास्तव बोलता येणार नाही. बरोबर १८ वर्षांपूर्वी १९९८च्या दिवाळीपूर्वी मी लातूरला परतलो, एक नवीन आत्मविश्वास घेऊनच.
व्यसनमुक्तीनंतरचे दिवस कसे होते? कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती?
व्यसन थांबवल्यानंतर एका वेगळ्याच जगात आल्यासारखे वाटत होते. व्यसनाधीनतेच्या काळात माझ्यासाठी काळ उलट गतीने गेला होता. जग खूप पुढे निघून गेले होते. मला बर्‍याच गोष्टी नव्याने शिकाव्या लागल्या, लहान मुलाप्रमाणे. डोके ताळ्यावर यायला बराच काळ गेला. वागणूक पूर्ववत व्हायलाही काही वर्षे गेली. व्यसन म्हणजे शेवटी एक स्वभावदोष असतो, तो बदलणे आव्हानात्मक होते. निर्णयक्षमता कमकुवत असते, त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची घाई करून जमत नाही.
ज्यांना माझ्या व्यसनाबद्दल माहीत नव्हते, त्यांच्यासमोर फार पंचाईत व्हायची. मी इतका मागे कसा पडलो, याला उत्तर देऊ शकत नव्हतो. त्यामुळे त्यांचे माझ्याबद्दल तयार होणारे नकारात्मक मत मला स्वीकारावे लागायचे. हे महाकर्मकठीण काम असते. पण शेवटी आपल्या चुकांचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. एखाद्या साधकाप्रमाणे दृष्टीकोन असावा लागतो. तो मी ठेवला. आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. ए.ए.ची पुस्तके, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे वहीमध्ये लिहिलेल्या महत्त्वाच्या गोष्टी या वेळोवेळी बळ देत होत्या. खूप हळूहळू गाडी रुळावर आली.
नंतरच्या काळात जगरहाटीमध्ये रुळल्यावर व्यवसायांमध्ये बरेच चढउतार आले. स्थिरस्थावर होण्याची धडपड तशी अजूनही चालूच आहे. बर्‍याचदा कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. व्यवसायात बर्‍याच उड्या माराव्या लागल्या. दोन वेळा शून्य होऊन पुन्हा सुरुवात करावी लागली. परंतु देवदयेने आणि मुक्तांगणची, ए.ए.ची भक्कम शिदोरी सोबत असल्याने मी पुन्हा तिकडे वळलो नाही. मन शांत ठेवून सर्व परिस्थितीचा सामना करू शकलो. मी यातच समाधानी आहे.
मुक्तांगणनंतरच्या काळात मी अगदी आई-वडील म्हणतील ती पूर्व दिशा याप्रमाणे राहिलो. सगळे त्यांच्यावर सोपवून दिले. एकतर फक्त आई-वडिलांनाच मुलगा परत मिळाल्याचा सर्वात जास्त आनंद झाला होता. व्यसनाच्या काळातील वागणुकीमुळे, 'हा येडा आहे, हा बावळट आहे, याला काही कळत नाही, लहान आहे अजून' ही जी समजूत लोकांमध्ये, नातेवाइकांमध्ये, मित्रांमध्ये रुजली, ती आज १८ वर्षांनंतरही कायम आहे. मला याबद्दल कोणाचाही राग येत नाही, कारण चूक माझी आहे. परंतु याचा सामना करताना त्रास होतो. आता सवय झाली आहे. आई-वडिलांना मात्र माझ्यासाठी काय करू आणि काय नको असे होत होते. मला तर निर्णयच घ्यायचा नव्हता. त्यांच्या मताप्रमाणे मी आता लगेच कामधंद्याला लागायला हवे होतं. मी काही दिवस उगाच एका मित्राच्या एस.टी.डी. बूथवर बसून राहायचो. नंतर मोठ्या भावाने त्याच्या प्रवासी गाड्यांच्या व्यवसायाचे कार्यालय चालू केले. मी ते काही महिने सांभाळले. प्रत्येक गोष्टीतच घरच्यांची घाई चालली होती. साधारण सन २०००मध्ये मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर वर्षभरातच डिसेंबर २००१मध्ये विवाहबंधनात अडकलो. लग्नापूर्वी मी पत्नीला माझ्या व्यसनाबद्दल कल्पना दिली. तिने छान उत्तर दिले, "आता करत नाही ना, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे." बहुधा ती जरा कर्मठ घरातील असल्यामुळे तिला व्यसन प्रकाराबद्दल फारशी माहिती नसावी किंवा गांभीर्य नसावे.
दरम्यानच्या काळामध्ये मी बर्‍याच चांगल्या सवयी लावून घेतल्या. मुख्य म्हणजे वाचन, माझी लहानपणापासून आवडती सवय, पुन्हा सुरू केले. रोज किमान तासभर वाचन चालूच ठेवले. विषयाचे बंधन न ठेवता चांगली चांगली पुस्तके वाचून काढली. पुस्तकांचा छोटासा संग्रह केला. भगवद्गीतेने आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला. सकारात्मक दृष्टीकोनावरची पुस्तके वाचली. इतकेच नव्हे, तर शिव खेरा आणि इतर बर्‍याच प्रसिद्ध वक्त्यांच्या सत्रांना स्वतः हजेरी लावली. गाणी ऐकण्याचा छंद लावून घेतला. मी एक ठरवले होते की रिकामे बसायचे नाही, मोकळ्या वेळात काही ना काही चांगले काम करत राहायचे. जिथून जे शिकायला मिळेल ते शिकत गेलो. आपल्याला पुढे कामी येईल की नाही हा विचार न करता शिकत गेलो. सकाळी व्यायाम करण्याची सवय लावून घेतली. काही काळ नियमित व्यायामशाळेत घालवला. याचा फायदा वजन ८८ किलोवरून ७०च्या आसपास आले. मुलीसोबतच मीही पोहायला शिकलो. नुकतेच मी माझ्या सायकलिंगच्या छंदाचे पुनरुज्जीवन केले. सध्या नियमित सायकल चालवतोय. आता बासरी शिकायचा विचार आहे. थोडक्यात काय, तर स्वतःला आणि डोक्याला रिकामे कधीच ठेवले नाही.
एकदा आपण चांगली कामे करायला सुरुवात केली की चांगल्या गोष्टी आपोआप आपल्यापर्यंत येतात. जवळपास २५ वर्षांनंतर शाळेतल्या मित्रांशी संपर्क झाला. आता आम्हा मित्रमैत्रिणींचा एक छान ग्रूप तयार झाला. गेल्या ४ वर्षांपासून वर्षातून एकदा आम्ही एकत्र येतोच. या निमित्ताने चांगल्या लोकांच्या संपर्कात राहू लागलो. २० वर्षांनंतर पुन्हा एकदा कॉलेजमधील काही मित्रांच्या संपर्कात आलो. त्यांच्याही भेटीगाठी, फोनवर बोलणे चालूच असते. बर्‍याच मित्रांशी कौटुंबिक संबंधही जुळून आले. व्यसनाबाहेरच्या मन बर्‍यापैकी जगात रमले आहे.
आज आपल्या व्यसनाकडे वळून बघताना तुम्हाला काय वाटते?
खरे सांगायचे म्हणजे माझ्या व्यसनाधीनतेबद्दल मला वाईटही वाटत नाही आणि पश्चात्तापदेखील होत नाही. व्यसन हा एक आजार आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील मान्य केले आहे. तो मला झाला आणि वेळेवर मिळालेल्या योग्य उपचारांमुळे मी त्यातून बाहेर पडू शकलो. व्यसन एक स्वभावदोष आहे, जो अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनानुसार नियंत्रित करता येतो. आपण लहानपणापासून काही गोष्टी वाचतो, ऐकतो आणि त्या आपल्या मनावर कोरल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे, मी अमुक एक चूक केली आणि बरबाद झालो किंवा मी अमुक निर्णय योग्य घेतला आणि माझे आयुष्य सुधारले, वगैरे. परंतु मला वाटते या सर्व अंधश्रद्धा आहेत, हे असे काही नसते. व्यसनाकडे वळणे हे एका चुकीमुळे होत नाही. ती एक प्रक्रिया आहे. क्रमाने केलेल्या चुका व क्रमाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांची मालिका व्यसनाधीन होण्यास कारणीभूत ठरतात. सुधारणा हीसुद्धा एक प्रक्रिया आहे. क्रमाने घेतलेल्या योग्य निर्णयांची मालिका सुधारणा घडवून आणते. म्हणून अनुभवी लोकांचे मार्गदर्शन खूप आवश्यक असते. याबरोबरच उच्चशक्तीवरचा विश्वास महत्त्वाची भूमिका बजावतो. माझ्यावर परमेश्वराची कृपा आहे, म्हणून वेळेवर मदत मिळाली. मी सुदैवी आहे की, आयुष्याच्या सुरुवातीलाच मला हा धडा मिळाला.
शेवटी एकच सांगावेसे वाटते...
सुधारणेच्या प्रक्रियेमधे ए.ए.च्या आठव्या आणि नवव्या पायरीचे पालन हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. आठवी पायरी अशा सर्व व्यक्तींची यादी करायला सांगते, ज्यांना आपल्यामुळे दुःख झाले आहे, नुकसान झाले आहे व अशा सर्व लोकांची क्षमा मागण्याची मानसिक तयारी करावी असेही सांगते. वरकरणी हे काम खूप सोपे वाटते. तसे यादी करणे सोपे काम आहे, क्षमा मागण्यासाठी स्वतःला तयार करणे हे अवघड काम आहे. मी स्वतः जसे जसे आठवत जाईल, तशी तशी यादी करत गेलो. मन कायम म्हणत असते की, अमक्याला काय करायचंय, तमक्याला काय करायचंय, माझ्याशी वाईट वागलेत. मनातला द्वेषभाव काही कमी होत नाही. मन लवकर तयार नाही. हा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला आहे.
नववी पायरी सांगते, या सर्व व्यक्तींना पत्र लिहून अथवा प्रत्यक्ष भेटून माफी मागा. हे सर्वात कठीण काम असते. निदान मला तरी वाटते. द्वेष किंवा लज्जा कायम मागे खेचते. प्रामाणिकपणे सांगतो, इतक्या वर्षांनंतरही मला जमले नाही. काय तोंड घेऊन आपण समोरच्याची माफी मागणार? असे वाटते. नाहीच जमले मला. आज मिपाच्या माध्यमातून मला एक छोटीशी संधी उपलब्ध झाली आहे. मला माहीत आहे हे उचित नाही, तरीसुद्धा मी क्षमा मागतो. माझ्यामुळे माझ्या कुटुंबीयांना, नातेवाइकांना, मित्रांना, परिचितांना, अपरिचितांना जो काही त्रास झाला, या सर्वांचे जे नुकसान झाले, त्यासाठी मी कुटुंबीयांची, नातेवाइकांची, मित्रांची, परिचितांची, अपरिचितांची सर्वांची हात जोडून क्षमा मागतो.
(समाप्त)

प्रतिक्रिया

मोदक,

कृपया मानस चंद्रात्रे यांना अभिवादन आणि शुभेच्छा कळविणे. धन्यवाद.

मानस यांचे अनुभव सुन्न करणारे आहेत. श्री. तुषार नातूंची अनुदिनी वाचली. ते देखील असेच व्यसनाच्या गर्तेतून यशस्वीरीत्या बाहेर आले आहेत. तुलना करू जाता त्यांच्या मानाने मानस थोडक्यात सुटले असं म्हणायला पाहिजे. काहीका असेना सुटणं महत्त्वाचं, आणि त्याहूनही अधिक म्हणजे पुनर्स्खलित न होणं. भावी जीवनास शुभेच्छा.

आ.न.,
-गा.पै.

पण त्याचबरोबर आई वडील, बंधू आणि साथ देणाऱ्या मित्रांचे खरंच कौतुक आहे. आपला मुलगा या अवस्थेत आहे हे बघणे त्या दोघांना किती कठीण गेले असेल, पण त्यांनी हार मानली नाही. मानसराव खरंच नशीबवान आहात की असे आईवडील, भाऊ आणि बायको मिळाली. प्रत्येक मार्गावर एक परतीचा बिंदू (Point of return) असतो. जो तुम्हाला बरोबर गवसला आणि त्याचा तुम्ही फायदा करून घेतलात.

मला आठवतंय की पूर्वी सर्दी खोकल्यावर कोरेक्स सर्रास लहान मुलांनापण द्यायचे. त्याचे एवढे वाईट परिणाम असतील हे माहित नव्हतं. मी ऐकलंय की आयोडेक्स पण खातात आणि त्याचं पण व्यसन लागतं.

आयुष्यात संगत किती महत्वाची असते बघा. कारण एक वय असतं ज्यात आईवडील आणि नातेवाईकांपेक्षा मित्र जवळचे असतात. त्यामुळे आयुष्याची दिशा बदलण्याचं सामर्थ्य मित्रमंडळींमध्ये नक्कीच असतं.

अरिंजय's picture

2 Nov 2016 - 4:45 pm | अरिंजय

सर्व प्रतिसादकांचे मनापासुन खुप खुप आभार.

आपल्या शुभेच्छांमुळे माझे बळ व उमेद आणखी वाढली आहे.
__/|\__ __/|\__

सस्नेह's picture

3 Nov 2016 - 3:38 pm | सस्नेह

विदारक वास्तवावर इच्छाशक्तीची मात, त्याची ज्वलंत कहाणी.

पिलीयन रायडर's picture

3 Nov 2016 - 6:54 pm | पिलीयन रायडर

खरं सांगायचं तर तुमच्या वडीलांना होणारा त्रास वाचताना तुमचा भयानक राग आला होता. पण तुमचं तुम्हालाच ह्यातुन बाहेर पडावं वाटलं हे वाचुन मग तो निवळला. आजही त्या घटनांचे पडसाद तुमच्या आयुष्यात घुमत असतील. पण इतक्या वाईट दिवसांमधुनही तुम्ही बाहेर पडलात, आज लोकांना नजर देत आत्मविश्वासाने काम करत आहात. आणि इतक्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये स्वतःला गुंतवुन ठेवत आहात, हे ही सोप्पे काम नाही. हे करायलाही फार धीर लागतो. त्यासाठी तुम्हाला सलाम!

किती कौतुक करावे हे समजत नाहीये. जवळच्या नात्यात आणि आजूबाजूला अनेक कुटुंबे व्यसनांमुळे उद्ध्वस्त झाल्याचे पाहिले आहे, पाहत आहे. त्यामुळे जास्त आत्मीयतेने तुमची आणि वरूण मोहिते साहेबांची कहाणी समजून घेऊ शकलो. हॅट्स ऑफ!

लालगरूड's picture

4 Nov 2016 - 3:23 am | लालगरूड

रडवलं :'-

नूतन सावंत's picture

5 Nov 2016 - 10:19 am | नूतन सावंत

मानस,तुमच्या आईवडिलांना साष्टांग नमस्कार.त्यांनी जे भोगालेय ते त्यांची काही चूक नसताना,तरीही अकांडतांडव न करता, त्यांनी हा एक आजार आहे हे समजून घेऊन तुम्हाला मदत केली.यात त्यांचे मोठेपण आहे.सगळ्याच व्यसनी लोकांना असे आईबाप मिळूशात नाही.ते तुम्हाला मिळाले हा तुमचा मोठा अॅसेट आहे.
वेळेवर मागे फिरता येणे हे फार महत्वाचे आहे आणि ते तुम्ही जमवलेत, याबद्दल तुमचे अभिनंदन.
या मुलाखतीतील सर्व उत्तर तुम्ही स्वत: टंकली आहेत हे समजल्यावर ,तुम्ही नववी पायरीही सहज ओलांडाल याची खात्री पटली आहे.
Do it! You can do it very easily.Best luck.

पसायदान's picture

5 Nov 2016 - 1:47 pm | पसायदान

मानस यांचे मनापासून अभिनंदन! अत्यंत प्रांजळपणे लिहिलय. नि:शब्द केलत! लेखाचे काही भाग वाचता वाचता डोळ्यांना नकळत धारा लागल्या. एक पुस्तकच लिहा तुम्ही.

बापरे , मला वाचवेना न वाचल्या वाचुन राहवेना अस झाल होत ,
ग्रे८ आहात सगळेच, तुम्ही , तुम्चे घरचे , आणी मुक्तांगण :)

यशोधन_राऊत's picture

10 Aug 2017 - 12:33 am | यशोधन_राऊत

मिसळपाव वरील माझा वाचलेला हा पहिलाच लेख.. वाचून बर वाटल म्हणून इथे सदस्य झालो... स्वता वर ताबा ठेवायला शिकाल की कधीच कोणतं व्हसन जडत नाही हे कळलं...