सागरी महामार्गाने कोकण सफर

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in भटकंती
4 Sep 2015 - 11:23 pm

गेली कित्येक वर्षे बाईकने कोकण सफर करायची असा विचार होता. पण भारतात असताना नेमकी पावसाळ्यात सुट्टी मिळत नसल्याने व गेली काही वर्षे आखातात असल्याने तो विचार प्रत्यक्षात मात्र येत नव्हता. सहा महिन्यापूर्वीच Hero Passion Pro खरेदी केली होती त्यामुळे यंदा तसा योग आला. मुख्य अडचण अशी होती की सलग 100 किमी पेक्षा सलग प्रवास एकट्याने मोटरसायकलने केलेला नव्हता. म्हणून सुरूवातीला 250 ते 300 किमी चाच टप्पा घ्यावा असे ठरवले. मग थोडीफार तयारी करून रत्नागिरी–मालवण सागरी महामार्गाने जायचे निश्चित केले.

दिनांक 02 सप्टेंबर ला घरातून निघालो. रत्नागिरी आमच्या गावापासून 30 किमीवर आहे. रत्नागिरीत खरेदी व इतर काही कामे करून दुपारचे जेवण करून 2.00 वाजता निघालो. पावसला स्वामी स्वरुपानंद समाधीचे दर्शन घेवून पुढे पूर्णगड खाडी व बीचवर थोडे फोटोसेशन केले. कशेळी कनकादित्य मंदिर आणि आडीवरे महाकाली मंदिरात दर्शन घेऊन निघेपर्यंत चार वाजले होते. मग चहा घेवून पुढे नाटे-जैतापूर अणुप्रकल्प मार्गे कात्रादेवी येईपर्यंत पाच वाजले. घोडेपोई पूलावरून साडेपाच वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. पडेल मार्गे जामसंडे (देवगड) येईपर्यंत सहा वाजले. या रस्त्याला ट्रॅफिक अतिशय तुरळक असल्याने 70-80 च्या वेगाने आरामात जाता आले.

जामसंडे वरून कुणकेश्वर ला पोहोचल्यानंतर तिथे जरा विसावा घेतला. मंदिर व परिसर अतिशय सुंदर असून आधुनिक सुखसोयी उपलब्ध होत आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा सर्व सुखसोईनी युक्त अत्याधुनिक रिसॉर्ट नोव्हेंबर महिन्यात पर्यटकांसाठी उपलब्ध होईल होईल असे कळले. मंदिरापासून जवळच अंतरावर समुद्रकिनारी असलेला हा रिसॉर्ट सुमारे 20 कोटी रुपये खर्चून बांधलेला आहे.

03 सप्टेंबर ला कुणकेश्वर–आचरा मार्गाने प्रवास केला. या मार्गावर मीठबाव येथे श्रीदेव रामेश्वराचे सुंदर मंदिर आहे. कुणकेश्वर-आचरा-मालवण हा मार्गादेखील बहुतांश सरळसोट असून अतिशय तुरळक ट्रॅफिक असते. त्यामुळे 80-90 च्या वेगाने बाइक दौडविता आली. मालवण येथे दुपारी भोजन करून काही स्थळे पाहिली व तिथे काही मित्रांना भेटून रात्री मुक्काम केला.

04 सप्टेंबर ला सकाळी 10.00 वाजता मुंबई-गोवा हायवे गाठला. कणकवली जवळ वागदे येथे श्री आर्यादुर्गा मंदिरात दर्शन घेवून जेवण घेतले आणि हायवेने नांदगाव-तळेरे-खारेपाटण-राजापूर-लांजा मार्गे सहा वाजता घरी पोहोचलो. वाटेत राजापूर-हसोळ येथे कॉलेजमधील वर्गमित्र तुषार दिक्षित याचीही भेट झाली.

मंडळी... सगळा मिळून 450 किमीचा प्रवास झाला. एवढा मोठा प्रवास मोटरसायकलने व तोही एकट्याने करण्याची पहिलीच वेळ. प्रवासवर्णन लिहिण्याची देखील पहिलीच वेळ आहे. तरी सांभाळून घ्यावे व त्रुटी दाखवून सूचना जरूर कराव्यात. सर्व फोटो Flickr.com/photos/135269012@N08/ वर आहेत. धन्यवाद.

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

4 Sep 2015 - 11:31 pm | माम्लेदारचा पन्खा

अजून खुलवता येईल ......

फोटोचा दुवा गंडलाय.....!!

मंदार कात्रे's picture

4 Sep 2015 - 11:38 pm | मंदार कात्रे
मंदार कात्रे's picture

4 Sep 2015 - 11:40 pm | मंदार कात्रे
डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2015 - 1:15 am | डॉ सुहास म्हात्रे

चित्रे सुंदर आहेत. इथे टाका. जरूर पडल्यास साहित्य संपादक मंडळाची मदत घेऊ शकता.

प्रवासवर्णन देखील चांगलं आहे.

श्रीरंग_जोशी's picture

5 Sep 2015 - 4:37 am | श्रीरंग_जोशी

थोडक्यात लिहिलेलं प्रवासवर्णन आवडलं. दुव्यावरचे फोटोही छानच.

त्यापैकी काही फोटोज लेखनादरम्यान टाकावे ही विनंती.

चलत मुसाफिर's picture

5 Sep 2015 - 10:50 am | चलत मुसाफिर

याच मार्गाने मालवण- नेरूरपार- कुडाळ- वेंगुर्ला- तेरेखोल- गोवा हा प्रवासही मुद्दाम करण्यासारखा आहे.

तसेच दुसऱ्या दिशेला, रत्नागिरी- आरेवरे- गणपतिपुळे- मालगुंड हाही.

गुहागर तालुका मात्र अद्याप जोडला गेलेला नाही.

आहे की....
पार रायगड मधून...श्रीवर्धन - बाणकोट खाडी (फेरी बोट) - मंडणगड -(वाटेत पालघर - प.पू. सानेगुरुजी जन्मभूमी) - दापोली - दापोलीहून दाभोळ-धोपावे फेरीबोटीतून गुहागर तालुका...
गुहागर - हेदवी - वेळणेश्वर - बामणघळ - तवसाळ फेरी बोटीतून रत्नागिरी तालुका...
रत्नागिरी तालुका - जयगड - मालगुंड - गणपतिपुळे -आरेवारे मार्गे रत्नागिरी...
ईथून पुढे लेखकाने दिलेला मार्ग...
तीन जिल्हे फिरून होतात सागरी महामार्गाने.....साक्षात स्वर्ग.....

चलत मुसाफिर's picture

5 Sep 2015 - 12:56 pm | चलत मुसाफिर

गुहागर तालुक्याच्या एका बाजूला तवसाळ फेरी व दुसऱ्या बाजूला दाभोळ फेरी यांच्यावर अद्याप पूल झालेले नाहीत.

सुबोध खरे's picture

5 Sep 2015 - 1:37 pm | सुबोध खरे

मंदार शेट
फोटो अतिशय सुंदर आहेत. त्या मानाने प्रवास वर्णन घाई घाईत आटोप्ल्यासारखे वाटले. जरा तब्येतीत वेळ घेऊन डिटेल वार मध्ये लिहा की.

प्यारे१'s picture

5 Sep 2015 - 2:28 pm | प्यारे१

+११११
सुशेगात ल्हिवा मालक. मस्तपैकी समुद्रकिनारी बाइक लावून जवळच्या हाटीलातनं टेबल खुर्ची भाइर् काढून बियर, सोबतीला मासा असं समदं जामानिमा करून करायची सुरुवात ल्ह्यायला. सगळं डीट्टेलवारी यिऊन्द्या....

उगा जनामलो, शिकालो,लगीन केलो, पोरं झाली, त्यांची लगनं करस्तवर मेलो यात काय मजाय काय सांगा बघू? ;)

आम्हि दोघे पुणे ते कारवार , बदामि , हम्पि मोटरसायकल वरुन फिरलो आहोत. कारवार वरुन गोआ कोल्हापुर मार्गे
येतांना आमचा रस्त्ता चुकला , आनि नेहमि असे होते कोल्हापुर मार्गे कोकनात जाताना आमचा नेहमी रस्ता चुकतो.
काय गौड्बंगाल आहे कळ्त नाहि.

खटपट्या's picture

5 Sep 2015 - 8:33 pm | खटपट्या

वर्णन आणि फोटो आवडले.