काळा घोडा कला महोत्सव कट्टा - वृत्तांत (३)
आम्ही उत्सवस्थळी दाखल झालो. माझा या उत्सवाला हजेरी लावण्याचा पहिलाच प्रसंग. कलेचा आणि माझा काडीमात्र संबंध नाही, अगदी रेघ देखिल सरळ मारता येत नाही. पण चार लोक जातात तर आपणही जावे, लोकांना कुठे माहित असतं की मी 'ढ' आहे? मागे एकदा तर मी जहांगिरला एक चित्र प्रदर्शन देखिल पाहुन आलो होतो. मूढ मुद्रेने एका चित्रापुढे 'हे काय असावे' याचा अंदाज घेत असता तिथल्यांपैकी एकाने मला 'जाणकार' समजुन अनेक भिकार चित्रांची सहल घडवली होती वर वहीत अभिप्राय लिहावा असा आग्रह देखिल केला होता. असो.
