काल पाकिट रिकामे केले..
पाकिटाला टोटल चौदा कप्पे होते. कित्येक रिकामे. तर कित्येकात ढुंकूनही न पाहिल्याने काही ऐवज पडला होता.
कार्ड पैसे ओळखपत्रे अश्या महत्वाच्या वस्तू पहिले बाजूला काढून घेतल्यावर एकेक कप्पा चेक करायला घेतला..
गेल्या पाचसहा महिन्यांची मेडीकल बिले सापडली.
एक जुनी बूटाची पावती आढळली.. जिचे बूट कधीच वारले होते.
एक रिटर्न तिकीट जी दुसरया दिवशी वापरता येते म्हणून जपून ठेवली होती. आज वर्ष झाले होते त्या प्रवासाला..
आतल्या कप्प्यातून एक एटीएममधून पैसे काढल्याची पावती निघाली.. ती कोणत्या अंधश्रद्धेने जपून ठेवलेली याची कल्पना नाही.
एक चुरगळलेला पासपोर्ट साईज फोटो सापडला.. छान दाढी केलेला.. माझाच आहे हे पटकन ओळखूच आले नाही.
एक बायकोने दिलेली कसलीशी सामानाची यादी निघाली.. कधी ते सामान आणल्याचे आठवत मात्र नव्हते.
एक काढ्याची रेसिपी.. कधी तो काढाही प्यायल्याचे आठवत नव्हते..
एका कप्प्याला घट्ट चिकटून बसलेली कागदाची चपटी पुडी सापडली. आत माझे रक्षण करत निपचित पडलेला अंगारा होता.
काही कागदी चिटोरयांची अवस्था ईतकी दयनीय होती, की न वाचताच फाडावेसे वाटले..
वाचल्यावरही काही विशेष निघाले नाही.
काही विजिटींग कार्डस देखील अशीच होती. समोरच्याचे मन राखायला स्विकारली होती. बघ हं, जपून ठेवतोय असे त्याला दाखवायला पाकिटात ठेवली होती. जी ना कधी वापरली होती, ना कधी वापरणार होतो. त्यांनाही केराची टोपली दाखवली.
सरतेशेवटी सर्वात आतल्या कप्प्यात एक कागदाचा चिटोरा सापडला..
कधीकाळी दिवाळीच्या मुहुर्तावर ईदवर सुचलेल्या आणि कागदावर उतरवलेल्या दोन ओळी सापडल्या..
पत्थर माती के है टुकडे सारे..
जो ईद ना होती,
तो कोई चाँद ना कहेलाता!
बायकांच्या पर्ससारखे पुरुषांच्या बटव्यात खजिना लपलेला नसतो... तरी शोधाशोध करता काही आठवणी ओघळतातच!
- तुमचा अभिषेक
----------
ता.क. - नव्या पाकिटाला पंधरा कप्पे आहेत!
प्रतिक्रिया
2 Jul 2025 - 8:52 am | गवि
अगदी उत्कृष्ट. मनातले. माझ्याही बाबतीत पाकिटाची कहाणी अगदी सेम टू सेम. अशी साफसफाई अनेक महिन्यांनी केली की ते अगदी सडपातळ होऊन जाते.
2 Jul 2025 - 9:12 am | तुमचा अभिषेक
आणि ते सडपातळ पाकिट खिश्यात सरकवतानाच्या भावना सुद्धा संमिश्र असतात. पाकीट नव्या सारखे झाल्याचा आनंद तर त्याचवेळी इतके सडपातळ करायची गरज नव्हती, काही गोष्टी राहिल्या असत्या तर चालले असते असे वाटणे..
2 Jul 2025 - 11:25 am | गवि
हा हा हा.. अगदी अगदी..
पण क्रूर व्हावेच लागते. एरवी कुठे बूड टेकणे अवघड होईल एक दिवस.
2 Jul 2025 - 10:04 pm | तुमचा अभिषेक
बुडावरून आठवले, ते मोठे दिसावे म्हणून देखील बरेच जण मुद्दाम पाकीट जाडजूड बनवायचे आणि फिट जीन्समध्ये कोंबायचे :) आमच्यावेळी ते एक फॅड होते.
2 Jul 2025 - 10:27 am | सौंदाळा
बरेच कागद किंवा बिले सापडतात. मजकूर गायब होऊन फक्त पांढरे कागद राहिलेले असतात.
विजिटींग कार्ड पूर्वी असायचे आता जवळ जवळ बंदच. (बादवे हे विजिटींग कार्ड चमचा म्हणून वापरुन एका ट्रेकला भेळ खाल्ली होती)
2 Jul 2025 - 11:42 am | गवि
हा हा. आणखी एक उपयोग असतो. अनेक हॉटेलांत रूम घेतली की एकच किल्ली मिळते. ती कार्ड रूपात असते आणि ती खाचेत सरकवून ठेवल्याशिवाय वीजप्रवाह चालू होत / रहात नाही. खाचेत सरकवायला की चेन असेल तर ठीक. त्यातून किल्ली वेगळी काढता येते.
तर दोन लोक असतील आणि एकाला बाहेर जाऊन यायचे असेल तर त्याने किल्ली घेऊन जाणे म्हणजे वीज बंद. अशावेळी मी एखादे व्हिजिटिंग कार्ड त्या स्लॉटमधे घालून कार्ड किल्ली काढून घेतो.
2 Jul 2025 - 10:34 am | सुबोध खरे
माझे पाकीट मी नियमित पणे स्वच्छ ठेवत आलो आहे. आणि महत्त्वाच्या पावत्या किंवा व्हिजिटिंग कार्ड्स मी कधीच पाकिटात ठेवत नाही तर घरी आल्यावर कपाटाचा एक कप्पा आहे त्यातच असतो.
यामुळे आजतागायत कोणता महत्त्वाचा कागद हरवला आहे किंवा व्हिजिटिंग कार्ड किंवा र्थिक व्यवहाराची कागदपत्रे सापडत नाहीत असे कधीच झाले नाही.
लष्करी सेवेमध्ये असताना देशभर इतक्या ठिकाणी फिरावे लागत असे ते सुद्धा तात्पुरत्या तैनातीसाठी ( temporary duty) कि अघळपघळ राहण्याची चैन करणे शक्य नव्हते.
असे अनावश्यक कागद फेकून देण्याची माझी सवय अजूनही अनावश्यक आठवणी किंवा गोष्टींबद्दल पूर्णपणे वापरू शकलेलो नाही.
(बऱ्याच प्रमाणात केले असले तरी)
2 Jul 2025 - 11:35 am | गवि
माझ्या वडिलांची शिस्तही अशीच दांडगी होती. बाहेरून आले की आधी सर्व कागद, पावत्या, पेन आणि इतर सर्व चीजवस्तू आपापल्या ठराविक विशिष्ट जागी बोळवून मगच पुढे बोलायचे.
डॉक्टर साहेब. तुमच्यासारखे लोक पहिले की आपण खुद्द अगदीच "ह्यॅ.." आहोत असे वाटायला लागते. पुलंसारखे.
2 Jul 2025 - 12:12 pm | Bhakti
असंच लिहिणार होते.प्रतिसाद वाचून यांचे पाकिट आणि कपाट किती टापटीप असं दृश्य डोळ्यासमोरून तराळून गेलं.खरच डॉ.खरे सारख्या शिस्तीच्या व्यक्तींपुढे आपण किती गबाळे वाटू असं उगाच वाटलं.
2 Jul 2025 - 11:17 am | मारवा
Lighter tone आवडला.
आणि relatable होता
वाचल्या बरोबर खिसा चाचपून पाकीट काढून contents तपासले.
बाकी महिला मंडळाच्या पर्स समोर
तेरे पाकीट की औकात ही क्या है ?
त्यात म्हणे छोटा आरसा ही असतो !
2 Jul 2025 - 11:31 am | गवि
पर्सेस..? त्यातून तर अडीअडचणीला एखादी इस्त्री आणि पाठोपाठ लहानसा प्रेशर कुकर देखील निघाला तरी मला धक्का बसणार नाही. ;-)
2 Jul 2025 - 11:37 am | गवि
यावरून आठवले. अशा पावत्या आणि कागद टोचून ठेवायला एका बाजूला लाकडी चकती आणि दुसऱ्या बाजूला तारेचा वळवून हुक केलेला अशी एक वस्तू पूर्वी घरोघरी असे. कोणाला आठवते का? आता ती दिसत नाही.
2 Jul 2025 - 12:57 pm | कर्नलतपस्वी
तुळईला हुक किवां मोठा खीळा ठोकून त्यात हे तारकट,जाडसर तार छत्रीच्या हॅण्डल सारखे वाकवलेले व एका बाजूला गोल लाकडी वर्तुळाकार चकती असयाची. आलेली पत्रे वाचून झाल्यावर तारकटावरच विसावयाची. पोस्टकार्डे ,अंतर्देशी किवां लग्नपत्रिका वर्षानुवर्ष एकमेकांचे ओझे सांभाळत तारकटावरच रहायचे. कधीकाळी उघडून बघीतली जायची अन्यथा धुळ जमलेली.
पुर्वी प्रेमपत्र वगैरे काही नव्हते. नवरा बायकोला पत्र लिहीताना मायना सौभाग्यवती असेच काहीतरी लिहीत. खुशाली व्यतिरिक्त अन्य विषय कमीच.
असो,गेले ते दिन गेले.
2 Jul 2025 - 1:10 pm | कर्नलतपस्वी
सर्वांनाच भासायची असे नाही. एखादी पाॅकेट डायरी त्यात बर्याच लोकांचे पत्ते लिहीलेले व त्यातच थोड्या एक दोन रूपयाच्या नोटा. बिलं पावत्या,रसीदी या तारकटावरच विसावायच्या. हाॅटेलिंग,बाहेर खाणे काही नसायचे त्यामुळेच जास्त पैशाची गरज नसावी. बिडी,कडी चहापान एवढेच. चहा दहा पैसे,एक आणा भेळ,विस पैशाची भजी प्लेट,पंचवीस पैशात लस्सी ग्लास, पंचवीस पैशाचे विडीचे बंडल असेच रेट असायचे.
जसे पगार वाढले चार पैसे खुळखुळायला लागले तेव्हां पाकीट व खुप नंतर बायकांची पर्स आली.
बाकी लेख छान आहे.
2 Jul 2025 - 9:58 pm | तुमचा अभिषेक
पॉकेट डायरी बहुधा खूप लहानपणी वडिलाना वापरताना पाहिले आहे.
त्यात पैसे ठेवले की घाईत काढताना बरेचदा त्यातील इतर कागद सुद्धा खाली कोसळायचे
अजून एक त्यांची आवडीची जागा म्हणजे पॅन्टचे चोर पॉकेट.
त्यांचे बघून मी सुद्धा एकदा शिवून घेतलेले. पण लपवून ठेवावे तितके पैसे त्या वयात कधी आलेच नाहीत. जी काही छोटी मोठी नोट असेल ती ठेवून हौस भागवायची.
2 Jul 2025 - 3:53 pm | श्वेता व्यास
लेख वाचून उगीच 'मेरा कुछ सामान' गीत आठवलं, कवितेच्या दोन सुंदर ओळींमुळे असेल.
2 Jul 2025 - 5:05 pm | विजुभाऊ
मेरा कुछ सामान तुम्हारे पाकिट मे पडा है. वो लौटा दो.
असे उसने दिलेले पैसे परत मागणारा म्हणतो
2 Jul 2025 - 6:29 pm | श्वेता व्यास
खिक्क :D
2 Jul 2025 - 6:36 pm | अकिलिज
पाकिट हे आता पैशाचे पाकिट नाहिये मुळी. तो फक्त आठवणींचा कप्पा बनून राहिला आहे.
हा लेख वाचला. आणि सॅकमध्ये ठेवलेले पाकीट रिकामे करून परत भरले. आजकाल जीपे, मोबाईल पे वगैरे मध्ये पाकीट पॅण्ट्च्या खिशात न राहता, सॅकमध्ये विराजमान असते. महत्वाचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि सीमकार्ड काढायची पिन वगैरे सोडल्यास बाकीच्या आठवणी आहेत.
२००२ साली पहिल्यांदा मुंबई लोकलचा पास काढण्यासाठीचे ओळखपत्र जपून ठेवले आहे.
१ रू च्या नोटा, आहेरात ऐनवेळी लागतात म्हणून जपलेल्या आहेत. आता चालत पण नसतील.
बाबा त्यांच्या पाकीटात रेव्हिन्यू स्टँप ठेवायचे, ती सवय मलाही लागली.
हो, कधीकाळी आजीने दिलेला अंगारा पण आहे. टाकावासा वाटत नाहीये. त्याचा एक वेगळाच वास टिकून राहिलाय. तो घेतला की आजीचा हात गालावरून फिरल्यासारखा वाटतो.
अभिषेक सारखी ट्रेनची रिटन तिकीटे पण होती, पण नंतर शाई पुसल्यामुळे टाकली कधीतरी.
अजूनही बराच मालमसाला आहे. कां ठेवलाय माहीती नाही. टाकवत नाही. एकांतात कुरवाळायला असूदे म्हणून.
तसं पाकीट भरगच्च आहे. आठवणींने भरलेलं. सॅकमध्ये असल्यामुळे टिकतंय वर्षानुवर्ष. जपतंय आठवणी.
2 Jul 2025 - 6:49 pm | अनिता
आम्ही अजूनही आमच्या घरात ते वापरतो. :)
4 Jul 2025 - 7:21 am | गवि
तारकट हे नाव आठवून दिल्याबद्दल आपले आणि कर्नल साहेबांचे आभार. आता आठवले. तारकिट असे आम्ही म्हणत असू. थोडासा उच्चारी फरक इतकेच.
2 Jul 2025 - 7:07 pm | अकिलिज
पाकिट हे आता पैशाचे पाकिट नाहिये मुळी. तो फक्त आठवणींचा कप्पा बनून राहिला आहे.
हा लेख वाचला. आणि सॅकमध्ये ठेवलेले पाकीट रिकामे करून परत भरले. आजकाल जीपे, मोबाईल पे वगैरे मध्ये पाकीट पॅण्ट्च्या खिशात न राहता, सॅकमध्ये विराजमान असते. महत्वाचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि सीमकार्ड काढायची पिन वगैरे सोडल्यास बाकीच्या आठवणी आहेत.
२००२ साली पहिल्यांदा मुंबई लोकलचा पास काढण्यासाठीचे ओळखपत्र जपून ठेवले आहे.
१ रू च्या नोटा, आहेरात ऐनवेळी लागतात म्हणून जपलेल्या आहेत. आता चालत पण नसतील.
बाबा त्यांच्या पाकीटात रेव्हिन्यू स्टँप ठेवायचे, ती सवय मलाही लागली.
हो, कधीकाळी आजीने दिलेला अंगारा पण आहे. टाकावासा वाटत नाहीये. त्याचा एक वेगळाच वास टिकून राहिलाय. तो घेतला की आजीचा हात गालावरून फिरल्यासारखा वाटतो.
अभिषेक सारखी ट्रेनची रिटन तिकीटे पण होती, पण नंतर शाई पुसल्यामुळे टाकली कधीतरी.
अजूनही बराच मालमसाला आहे. कां ठेवलाय माहीती नाही. टाकवत नाही. एकांतात कुरवाळायला असूदे म्हणून.
तसं पाकीट भरगच्च आहे. आठवणींने भरलेलं. सॅकमध्ये असल्यामुळे टिकतंय वर्षानुवर्ष. जपतंय आठवणी.
2 Jul 2025 - 9:50 pm | तुमचा अभिषेक
छान पोस्ट! १ रुपयाची नोट मलाही फार आवडायची. आहेर करायला लागायची ते सोडा पण दिसायची छान. आजकाल चालते की नाही कल्पना नाही पण एक रुपयाला किंमत आहे. बरणीतली एखादी गोळी येते.
2 Jul 2025 - 8:21 pm | सुबोध खरे
माझ्या पाकिटात एके काळी रेवेन्यू स्टॅम्प, पोस्टाचे स्टॅम्प, क्रेडिट कार्ड, रोख पैसे, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि दोन चेक असत.
यशिवाय आतल्या कप्प्यात नेहमी ५०० रुपयांची एक नोट असे. कुणी उधार मागितले तर बाहेरच्या कप्प्यातीलच पैसे देत असे.
आतल्या कप्प्यातील न हि केवळ तातडीच्या गरजेसाठी वापरात असे. कारण लष्करात असताना कुठे जावे लागेल याची खात्री नव्हती . अशा वेळेस हे रोख पैसे खेड्यापाड्यात सुद्धा कामास येत
आणि जर तात्कालिक तैनातीस (टेम्पररी ड्युटी) अचानक जावे लागले तर तेथील मेस बिल भरण्यासाठी हे चेक हटकून कामाला येत असत.
गळ्यात लष्कराचे ओळख पत्र असले तर भारतभर कुठेही जायला भीती वाटत नसे. रात्रीबेरात्री जायचा प्रसंग आला आणि गस्तीवरच्या पोलिसाने हटकले तरी या ओळखपत्रामुळे कधीच संकट आले नाही. पैसे नसले तरी कोणत्याही लष्करी ठाण्यावर जाऊन आपली सोय करता येत असे.
आता काळ बदलला आहे त्यामुळे पोस्टाचे स्टॅम्प आणि रेवेन्यूए स्टॅम्प पाकिटात नसतात. पण ५०० ची नोट मात्र असतेच.
इतर बऱ्याच गोष्टींची सोय भ्रमणध्वनीने केलेली आहे. म्हणूनच मी मुलांना नेहमी सांगत असतो कि एक पाचशे ची नोट पाकिटात ठेवा
आपला भ्रमणध्वनी हरवला तर या नव्या पिढीची फारच गोची होते. मोबाईल नाही म्हणून पॆसे नाही आणि तातडीचे मोबाईल क्रमांक पण त्यांना पाठ नाहीत.
मुलं ऐकतात पण ५०० ची नोट खर्च झाली तर पटकन दुसरी काही खिशात ठेवत नाही. परत परत आठवण करावी लागते.
2 Jul 2025 - 11:25 pm | राजेंद्र मेहेंदळे
नोटबंदी झाल्यापासुन पेटीएम्,फोन् पे नी गुगल पे मुळे पाकीट ठेवायची सवयच गेली.
मोबाईल मुळे फॉवर ल्युबाचे गजराचे किल्लीवर चालणारे घड्याळ,रिस्टवॉच, स्वयंपाकघरातील ट्रान्झिस्टर, टॉर्च,डिजिटल कॅमेरे, कॅलक्युलेटर अशा अनेक वस्तू ईतिहासजमा झाल्या.
माझ्या वडीलांचा टाईपरायटर [ज्यावर त्यांनी १० पैसे पर पान याप्रमाणे हजारो पाने टाईप केली असतील :( ] पाहुन माझ्या मुलांना भलतेच आश्चर्य वाटले होते. प्रिन्ट आणि टाईप एकत्र करणारे हे यंत्र त्यांनी प्रथमच पाहीले. आजीकडचे चावीचे भिंतीवरचे घड्याळही त्यांनी असेच "अजि म्या ब्रम्ह पाहीले" असे पाहीले. ट्रिन्ग ट्रिन्ग वाल्या टेलिफोनचेही तेच. मी स्वतः ट्राम कधीच (भारतात) पाहीली नाही. मुलाला बँकेचे पासबुक भरुन आणायला सांगितले तर त्याने "हे काय भलतेच?" असा चेहरा केला.
शेवटी काय? कालाय तस्मै नमः असे म्हणुन पुढे चालावे.
3 Jul 2025 - 1:54 pm | गवि
पेन, रुमाल, चावी, पास, पाकीट
ऊर्फ पेरुचा पापा...
ही घरातून बाहेर पडताना आठवण्यासाठी एक चेकलिस्ट मानली जायची आणि हा शब्द प्रचलित होता. आता पेन रुमाल पाकीट हे अनेकांकडे नसते.
3 Jul 2025 - 12:01 pm | विवेकपटाईत
माझ्या पाकिटात मेट्रो कार्ड, डेबिट कार्ड, आधार कार्ड आणि हॉस्पिटल मध्ये जाताना सीजीएचएस कार्ड ठेवतो. थोडे बहुत पैसे. बाकी काहीच ठेवत नाही.
3 Jul 2025 - 12:14 pm | कर्नलतपस्वी
आता फक्त ममता दिदींच्या राज्याच्या राजधानीत ट्राम आहे.
भटकंती काढा लगे हात हावडा ब्रिज, काली मंदिर, रोशगुल्ले आणी पुचका खाऊन या. येताना मिपाकरांना लवंग लतिका व चमचम घेऊन या.
3 Jul 2025 - 2:09 pm | कानडाऊ योगेशु
मुली आणि बायकोने वाढदिवसाला नवे कोरे पाकिट भेट म्हणुन दिले आहे.जुने अगदीच जीर्ण झाल्याने.पण माझी अजुनही हिंमत झाली नाही पाकिट बदलायची. जुन्या पाकिटाची इतकी सवय झाली आहे कि नवे पाकिट घेतले आणि ते बाहेर काढुन ठेवले तर मला असेच वाटेल कि ते पाकिट माझे नाहीच आहे.
3 Jul 2025 - 3:00 pm | कर्नलतपस्वी
पाकीटात के टी मिर्झा,योगीताबाली, मुमताज असे फोटोही असायचे.
4 Jul 2025 - 3:21 am | चामुंडराय
RFID प्रूफ पाकीट वापरा.