साहित्य तेव्हा जॉब करत होता, आणि ललिता सध्या फ्री लान्सिंग. त्यांची मुलगी लेखना आता ५ वर्षांची झाली होती. सध्या ती एका शाळेत सिनियर के जी मध्ये होती. एका उच्चभ्रू सोसायटीतील स्वतःच्या फ्लॅट मध्ये ते राहत होते. त्यांच्या फ्लॅटच्या लॉबीच्या समोरचा फ्लॅट नुकताच विकला गेला होता. पण अजून कोणी तेथे राहायला आले नव्हते. त्या फ्लॅटच्या जुन्या मालकांचे आणि साहित्य ललिता यांचे चांगले संबंध होते. आता कोण तिथे नवीन येणार याची साहित्य आणि ललिताला उत्सुकता होती.
त्यांच्या सोसायटीच्या एंट्रन्स गेट च्या बाहेर बरीचशी कुत्री होती. काही डॉग फीडर तेथे सकाळी रात्री ठरलेल्या वेळी येऊन त्या कुत्र्यांना खायला घालत असत. ते डॉग फीडर आले की ही सगळी कुत्री शेपट्या हलवत त्यांच्या भोवती जमा होत. डॉग फीडर त्यांना रस्त्यावरच बिस्किटे, डॉग फूड देत असत, आणि कुत्र्यांचे लाड करून निघून जात. साहित्य आणि ललिता याना आजवर कधी या गोष्टीचा त्रास झाला नव्हता, आणि त्यांचे त्यावर काही फारसे मत सुद्धा नव्हते. खरंतर जॉब मधून घरी आल्यावर त्यांना या बाकीच्या गोष्टीत लक्ष घालायला त्राणच उरत नसे.
एके दिवशी रविवारी समोरच्या लॉबीत गडबड ऐकू यायला लागली. काही माणसे घरातील फर्निचर घेऊन आली होती. एक चाळीशी पंचेचाळिशीच्या बाई तिथे त्या लोकांना सूचना देत होत्या. त्या रविवारी संध्याकाळ पर्यंत सामानाची हलवा हलवी ऐकू येत होती.
ललिताला लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्याशी ओळख काढून बोलायची गरज भासली नाही. आज ना उद्या येता जात ओळख होईलच असे वाटून ती नित्य क्रमात बिझी झाली.
दुसऱ्या रात्री १०. ३० ला बेल फ्लॅटची वाजली, साहित्य ने दार उघडले तर “समोरील फ्लॅट मध्ये राहणाऱ्या बाई” दारात होत्या. एकट्या रात्री कोण आले म्हणून ललिता पण बाहेर हॉल मध्ये आली. त्या बाई साहित्यला म्हणाल्या, त्यांच्या फ्लॅट मध्ये गॅसचा वास येतोय, जरा येऊन बघता का?
साहित्यचे स्त्री दाक्षिण्य जागे झाले, आणि तो ललिताला सांगून त्यांच्या मागे त्यांच्या फ्लॅट मध्ये जाऊ लागला. साहित्य चे जसे स्त्री दाक्षिण्य जागृत झाले होते तसेच, इकडे ललिताचा पॅझेस्सीवनेस जागा झाला. ती म्हणाली, थांब मी पण येते. [ललिताच्या या कृतीचा नंतर दोघानांही खूप फायदा होणार होता].
मग तिघे ही त्यांच्या फ्लॅट मध्ये गेले. घरात त्या बाईंची शेगडी होती ती त्यांनी आणलेल्या सिलेंडरला जोडली होती. तिचा पाईप लीक असावा. साहित्यने सिलेंडर चा रेग्युलेटर काढून ठेवला, त्याची कॅप लावली आणि बाईंना उद्या सकाळी टेक्निशियन येई तोवर कॅप काढू नका सांगितले. ललिताने मग त्यांना आता तुम्हाला गॅस वर काही करून हवय का? असेल तर मी करून आणते असे सांगितलं, पण त्या बाई नको म्हणाल्या. मग थोडी ओळख पाळख झाली. त्या बाई त्या फ्लॅट मध्ये एकट्याच राहणार होत्या. सिंगल होत्या. म्हणजे घटस्फोट का विधवा होत्या ते कळले नाही, पण ते विचारायची ती वेळही नव्हती.
दिवस उलटत होते. पण साहित्यच्या सोसायटीच्या आवारात कुत्र्यांचा वावर वाढला होता. इतके दिवस बाहेर असणारी कुत्री आता सोसायटीच्या गेटच्या आत येऊ लागली होती. ते डॉग फीडर आता सोसायटीच्या आवारात येउन कुत्र्यांना फीड करत होते. एक दिवस सोसायटीच्या एका सदस्याने त्यांना टोकले. शब्दावरून शब्द वाढला. कल्ला ऐकून काय झाले ते पाहायला साहित्य आणि ललिता खाली गेले. तिथे सोसायटीचे काही लोक एका बाजूला, आणि डॉग फीडर दुसऱ्या बाजूला असा वाद सुरु होता. महत्वाची आणि गंभीर बाब अशी होती की साहित्यच्या समोरील फ्लॅटच्या त्या बाई डॉग फीडर्स च्या बाजूने तावातावाने भांडत होत्या. साहित्य आणि ललिताला त्यात पडावे असे वाटले नाही. आधीच ललिताच्या बाबांची तब्येत बरी नव्हती. (साहित्य ललिताच्या बाबांना डस्टबिन न समजता त्याच्या बाबांसारखेच मानत असे). दोघेही वर आले आणि झोपी गेले.
पावसाळ्याचे दिवस होते. साहित्य सकाळी पेपर आणायला खाली जायला निघाला. लिफ्ट मध्ये पाय ठेवताच त्याचा पाय घाणीत पडला. लिफ्ट मध्ये अजून एका ठिकाणी कोपऱ्यात कुत्र्याची घाण होती. त्याने कसबसा पेपर आणला, सँडल्स धुतल्या. मोबाईल चा डेटा ऑन केला. सोसायटी ग्रुपवर कडाकडा मेसेज आणि फोटोज येऊ लागले. सोसायटीतील ३ ते चार सदस्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या पुढे कुत्र्यांनी केलेल्या घाणीचे फोटो टाकून चीड चीड व्यक्त केली होती.
त्याला समोरच्या फ्लॅट मधल्या बाई [यापुढे यांचा उल्लेख आपण "समोरच्या फ्लॅट मधल्या बाई" असाच करूयात] आर्गु करत होत्या, आणि त्यांच्या बाजूने आता सोसायटीतील काही लोक बोलू लागले होते. "माणसांनी बिल्डिंग बांधल्या, मग या बिचार्या मुक्या प्राण्यांनी कोठे जायचे?" वगैरे वगैरे. मेसेज वर मेसेज सुरु होते.
दुसऱ्याच दिवशी सकाळी ललिताला खाली कुत्र्यांच्या केकाटण्याचा आवाज ऐकू आला. पालिकेची लोक आली होती. त्यांच्या हातात जेवढी कुत्री सापडली तेवढी ते घेऊन गेले. चला...! त्रास संपला म्हणून ललिताने निश्वास सोडला. साहित्यला तसे कळवले सुद्धा. साहित्यचा तिच्या या मेसेजला रेड वाईन ग्लास चा इमोजी आला.
पण आठच दिवसांनी हा आनंद ओसरला. एका संध्याकाळी साहित्य आणि ललिता घरी आले तर सोसायटीच्या आवारात सगळी कुत्री आरामात बसली होती. रात्री डॉग फीडर्स आले, त्या समोरच्या फ्लॅट मधल्या बाई पण आल्या. या सर्वांच्या चेहऱ्यावर विजयश्री चा आनंद दिसत होता. कुत्र्यांचा डीनर झकास पार पडला.
काही अंतरावर सोसायटीचे या कुत्र्यांना विरोध करणारे लोक उभे होते. साहित्य त्यांच्यात सामील झाला. एकूण त्यांच्या बोलण्यावरून असे कळले की, पालिका अशा भटक्या कुत्र्यांना पकडून घेऊन जाते, त्यांची नसबंदी करते, त्याची खूण म्हणून त्यांचा कानाचा थोडा भाग कापते, रेबीज विरोधी लस देऊन जिथून ती कुत्री पकडली आहेत तिथेच नेऊन सोडते. अशा कुत्र्यांना मारणे आता पेटा कायद्याने अवैध आहे. शिवाय कुत्री ओरडतात हा त्यांचा नैसर्गिक स्वभाव आहे. त्याबाबत पालिका काहीही करू शकत नाही.
साहित्यचा आणि पेटा या शब्दाशी आलेला हा पहिला संबंध. आणि पुढे ज्या घटना घडणार होत्या त्याने साहित्य आणि ललिता हा शब्द परत कधीही विसरणार नव्हते.
एका शनिवारी साहित्य ललिता आणि त्यांची मुलगी लेखना यांनी डॉमिनोज चा पिझ्झा मागवला. ३० मिनिटात येणारा पिझ्झा ३५ मिनिटे झाली तरी आला नाही. तितक्यात सोसायटी वाचमन चा साहित्यला फोन आला, आणि त्यांनी त्याला खाली बोलावले. साहित्य खाली गेट पाशी आला तर तिथे पिझ्झा बॉय जमिनीवर बसलेला होता, त्याच्या हातातून रक्त येत होते. वाचमन ने सांगीतले की तो सोसायटीच्या आत शिरताच सगळी कुत्री त्याच्यावर धावून गेली, त्याला चावली. तो घाबरून पडला. साहित्यने, वाचमन ने त्याला पाणी दिले. तो सावरल्यावर साहित्य त्याला त्याच्या पिझ्झा स्टोअरला सोडायला निघाला. पण तो पिझ्झा बॉय नको म्हणाला.
तेवढ्यात तिथे "समोरच्या फ्लॅट मधल्या बाई" आल्या आणि त्यांची अजून काही सोसायटीतील कुत्रे प्रेमी मंडळी आली. "आमची कुत्री कधीच चांगल्या माणसांवर हल्ला करत नाहीत, या पिझ्झा वाल्यानेच काही खोडी काढली असेल" वगैरे गप्पा सुरु झाल्या. इकडे साहित्यला पिझ्झा शॉप मधून फोन आला. त्याचा मॅनेजर भडकला होता. साहित्यवर गुन्हा दाखल करतो म्हणू लागला. साहित्यने ही कुत्री त्याची नाहीत, भटकी आहेत असे सांगितलं. काही वेळच्या वादावादीनंतर तो मॅनेजर म्हणाला की तुमची सोसायटी मी ब्लॅक लिस्ट करतोय. यापुढे तुम्हाला जर पिझ्झा हवा असेल तर स्वतः रस्त्यावर येऊन डिलिव्हरी घ्या. नाहीतर आमच्या शॉप मध्ये येऊन पिझ्झा खा.
पुढील काही महिन्यात सोसायटीत येणाऱ्या कामवाल्या, AC, प्लम्बिंग, सुतार अशा दुरुस्ती करणार्या लोकांचा कुत्र्यांनी चावा घेतला. आता सोसायटीत कोणी पाहुणे, किंवा अनोळखी येणार असेल तर सभासदाला त्याला खाली रस्त्यावर येऊन आत त्याच्या फ्लॅट मध्ये घेऊन जावे लागू लागले. आणि तसेच परत सोडताना सुद्धा एस्कॉर्ट द्यावा लागे. "समोरच्या फ्लॅट मधल्या बाई, त्यांची अजून काही सोसायटीतील कुत्रे प्रेमी मंडळी यांनी "पहा, या कुत्र्यांमुळे आता सोसायटी किती सुरक्षित झाली आहे, आमची "बाळे" सोसायटीत सगळ्यांना ओळखतात सोसायटीतल्या लोकांना कधीच चावत नाहीत" अशी कवने गायला सुरुवात केली.
आणि तो दिवस उगवला ....
त्यादिवशी लेखना, साहित्य याना कसलीशी सुट्टी होती. ललिता काही कामासाठी बाहेर गेली होती. साहित्यच्या मोबाईल वर सोसायटीतील अमेय शिंदे यांचा फोन आला. त्यांची मुलगी सुद्धा लेखना एवढीच होती. त्यांनी लेखनाला खाली त्यांच्या मुलीसोबत बँडमिंटन खेळायला पाठवाल का असे विचारले. साहित्यला तसा काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी लेखनाला खाली पाठवले. लेखना आता लिफ्ट वगैरे अगदी सहज वापरत असे. लेखना साहित्यला म्हणाली, बाबा मी जाते खाली, आणि ती रॅकेट घेऊन फ्लॅट बाहेर पडली. ….
पुढच्या काही क्षणात तिच्या किंचाळ्या ऐकू आल्या. साहित्यने गडबडीत दार उघडले आणि त्याला जे दृश्य दिसले त्याने तो हादरलाच !! लेखनाच्या पायाची पोटरी एका कुत्रीने तोंडात पकडली होती. लेखना कळवळून ओरडत रडत होती. साहित्यने आरडा ओरडा करून त्या कुत्रीला हाकलवायचा प्रयत्न केला पण कुत्री काही लेखनाचा पाय सोडायला तयार नव्हती.
तितक्यात आरडा ओरड एकूण त्या "समोरच्या फ्लॅट मधल्या बाई" आल्या. त्याही थोड्या दचकल्याच. मग अगदी लाडात त्या कुत्रीला " राणी, अश नाही करायचं ... लेखना आपली ताई आहे नं शोना ... असं नाही चावायचं ताईला ... " असं समजावू लागल्या... इकडे ती चिमुकली लेखना कळवळून विव्हळत होती ... ५-६ वर्षांची चिमुकली पोर... त्या लॉबीतील आजूबाजूचे लोक फ्लॅट उघडून आले. साहित्य ने आत जाऊन त्याची हॉकी स्टिक काढली... आणि बाहेर त्या " शोना राणी" नावाच्या कुत्रीवर धावून गेला ...
तेवढ्यात एका शेजाऱ्याने "शोना राणी" वर पाणी टाकले ... आणि एकदाची तिची लेखनावरील पकड सुटली ... आणि ती "शोना राणी" कुत्री "समोरच्या फ्लॅट मधल्या बाई" च्या फ्लॅट मध्ये जाऊन लपली. साहित्य तिच्या मागोमाग त्या फ्लॅट मध्ये शिरत होता ... त्याला कधी त्या "शोना राणी" चे टकूरे फोडतोय असे झाले होते. साहित्य तसा शांत स्वभावाचा होता. पण . आपल्या मुलीच्या जीवाला धोका झालेला पाहून त्याच्यातला मुलीचा बाप जागा झाला होता.
"समोरच्या फ्लॅट मधल्या बाई" नी अचानक पवित्रा बदलून साहित्य वर ओरडल्या ... कुत्रीला हात लावायचा नाही .. हात लावायचा नाही राणीला ...माझ्या घरात शिरायचे नाही ...
साहित्यला कोणीतरी मागून ओढले .. आणि फ्लॅट मध्ये जाण्यापासून रोखले ... पण साहित्य आवरेना ... तो बाईंना म्हणाला त्या कुत्रीला बाहेर काढा नाहीतर घरात घुसून मारेन तिला मी ...
"समोरच्या फ्लॅट मधल्या बाई" अजून भडकल्या ... आणि त्यांनी त्यांचे ब्रह्मास्त्र काढले ... "एकटी बाई बघून घरात शिरायला बघतो कारे भाड्या ? लाज वाटत नाही का कोणा एकट्या बाईच्या घरात शिरायला ... .... भेन्चोद, थांब तुला दाखवते ... असे म्हणून त्यांनी १०० ला कॉल लावला [नाशिब साहित्याचे की १९७ ला नाही लावला].
मधल्या काळात कोणीतरी ललिताला फोन करून बोलवून घेतले. १० मिनिटात बिट मार्शल आले. "समोरच्या फ्लॅट मधल्या बाई"नी त्यांना बोलावले होते म्हणून त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी साहित्यवर मुक्या प्राण्यांना त्रास देणे, बळजबरी घरात घुसणे, विनयभंग असले आरोप केले. मग साहित्यने त्याची बाजू मांडली. लेखनाची पोटरी दाखवली. बिट मार्शलनी दोघांना पोलीस चौकीत बोलावले. बाकीचे फ्लॅट धारक बघत होते. एकाने लेखनाला आपल्या घरी नेले. एका फ्लॅट धारकाने साहित्यची बाजू घेतली तर त्याला "समोरच्या फ्लॅट मधल्या बाई" म्हणाल्या तुम्ही गप्प बसा, नाहीतर तुमच्यावर पण केस करिन. साहित्यला आता पोलीस चौकीत जाणे भाग होते. तो बिट मार्शलला सांगत होता की " "समोरच्या फ्लॅट मधल्या बाई" खोटे बोलत आहेत, त्यांच्या कुत्रीनी लेखनावर हल्ला केलाय आणि ती त्यांच्या घरात लपून बसलीये. तुम्ही त्यांच्या फ्लॅटची झडती घ्या हवंतर."
बिट मार्शल ने वॉरंट शिवाय अशी झडती घेऊ शकत नाही असे स्पष्ट केले. मग साहित्यने मुलीला दवाखान्यात नेऊन आणतो, अँटी रेबीज देतो आणि मग चौकीत येतो अशी विनंती केली. पण बिट मार्शल ऐकेना. उलट त्यांनी "साहेब, गोडीत येताय का फरफटत नेऊ" असे विचाले? साहित्य मुकाट्याने त्यांच्या मागे चौकीत गेला. वाटेत फोन करून ललिताला थेट अमुक पोलीस स्टेशनला ये असे सांगितले. सगळ्यात शेवटी समोरच्या फ्लॅट मधल्या बाई पण चौकीत निघाल्या.
[ पण ही सगळी मंडळी त्या लॉबीतून दिसेनाशी झाली आहेत अशी खात्री करून त्यांनी गुपचूप त्यांच्या लाडक्या शोना राणीला बाहेर काढले आणि जिन्यात सोडले. शोना राणी शेपूट आत घालून जिना उतरत दिसेनाशी झाली... ]
============
चौकीत सगळ्यात आधी ललिता पोहोचली, मग समोरच्या फ्लॅट मधल्या बाई आणि मग साहित्य. समोरच्या फ्लॅट मधल्या बाई नी फोन करून अजून कोणाला कोणाला बोलवून घेतले. नंतर कळले की ते सगळे कोणत्याश्या स्ट्रे डॉग फीडर संस्थेचे लोक आहेत. साहित्य च्या बाजूने एक दोन फ्लॅट ओनर आले. आश्चर्य म्हणजे समोरच्या फ्लॅट मधल्या बाई च्या बाजूने बोलायला सोसायटीतील काही फ्लॅट ओनर पण आले.
चौकीत महिला फौजदार *** होत्या. त्यांनी साहित्यला झापायला सुरुवात केली. "शिकले सवरलेले दिसता, एका बाईच्या घरात दिवसा ढवळ्या शिरता कसे? लाज नाहीका वाटत?" वगैरे वगरे. ...
समोरच्या फ्लॅट मधल्या बाईनी साहित्यने यापूर्वीही तुमच्या फ्लॅटमधून गॅस चा वास येतोय या बहाण्याने त्यांच्या फ्लॅट मध्ये शिरायचा प्रयत्न केला होता असा अजून एक आरोप केला. त्यावर ललिता भडकली. आणि त्या समोरच्या फ्लॅट मधल्या बाईच्या अंगावर धावून गेली. एका महिला कॉन्स्टेबलने तिला धरले आणि गप्प राहायला सांगितले. पण ललिता आवरेना. आधीच लेखनाच्या काळजीत ती होती. तिला लवकरात लवकर अँटी रेबीज लस द्यायला हवी होती, ड्रेसिंग करायला हवे होते ...
आणि त्यात साहित्यवर केलेल्या आरोपांनी ती संतापली ...
ती आवरली जात नाही असे बघून शेवटी त्या महिला कॉन्स्टेबलने तिच्या एक कानफटात लगावली.
ललिता तशी जिम करत असे, वेट्स सहजगत्या उचलत असे ... पण जिम करणे वेगळे आणि पोलिसचा मार खाणे वेगळे ... बसलेल्या कानफाटीने ती चकित झाली ... डोळ्यासमोर तारे चमकले ... आणि मग अश्रूंनी ते नाहीसे झाले ...
आता दोघे गप्प बसला नाहित तर दोघांना सरकारी कामात हस्तक्षेप केला म्हणुन आत टाकीन असे सुनावले .. साहित्य आणि ललिता आता हतबल झाले होते ...
त्यांच्या बाजूचे फ्लॅट ओनर पण हतबुद्ध झाले ...
ललिताने रडत रडत तो गॅसचा किस्सा सांगितला, आणि साहित्य बरोबर मी पण होते असे सांगितले.
मग साहित्य च्या बाजूने आलेले एक फ्लॅट ओनर धैर्य करून नम्र पणे बोलू लागले. त्यांनी "असे काही नाही मॅडम”, म्हणून घडलेले सगळे सांगितले. साहित्य आणि ललिता याना आपण आधीपासून ओळखतो, ते तसे नाहीत. पाहिजे तर लॉबीतील CCTV फुटेज दाखवतो असे सांगितले. CCTV फुटेज चे नाव काढताच "समोरच्या फ्लॅट मधल्या बाई" आणि त्यांच्या बरोबरचे लोक चपापले. फौजदारबाई पण जरा निवळल्या.
फौजदार बाई साहित्यला म्हणाल्या "सर, तुमच्यावर या बाईंनी केलेले आरोप गंभीर आहेत. कुत्र्याला तुम्ही मारायाला निघालात म्हणून सेक्शन ४२८ , ४२९ नुसार फाईन किंवा तुरुंगवास असे तुम्हाला होईल. हे मॅनेजेबल आहे. पण त्या बाईंनी केलेले बाकीचे आरोप गंभीर आहेत जसे सेक्शन ३५४ आणि त्यासाठी त्या आताच साहित्यला ताब्यात घेऊ शकतात. पण तुम्ही एकंदरीत चांगले लोक दिसता, आपसात मिटवलेत तर बरं राहील" वगैरे वगैरे.
मग त्या समोरच्या फ्लॅट मधल्या बाई ना फौजदार बाई म्हणाल्या “CCTV पाहिले तर त्यात सगळे दिसेलच. साधा कुत्र्याच्या चावण्याचा विषय आहे. ती कुत्री तुमची आहे का? तसे असेल तर सेक्शन २९१ प्रमाणे तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊन त्यांना सुद्धा दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो. आणि साहित्यने कोणत्या कुत्र्याला मारले आहे त्याला घेऊन या, आम्ही त्याची अससेसमेंट करून मग काय ते ठरवू.”
आता समोरच्या फ्लॅट मधल्या बाई पण जरा टरकल्या. त्यांनी ती कुत्री भटकी आहे आणि त्यांचा आणि आपला काही संबंध नाही असे सांगितले. मग साहित्यने तुम्ही त्याला खायला घालता त्याचे काय असे विचारले?
तेव्हा पेटाच्या नियमा नुसार अशा भटक्या कुत्र्यांना सोसायटीमध्ये आत येण्या पासून रोखणे, खायला देण्यापासून रोखणे हा गुन्हा आहे असे सुनावले. त्यांच्या बरोबर आलेल्या स्ट्रे डॉग फीडर संस्थेच्या लोकांनी फौजदार मॅडमना त्या सोसायटीतील सगळ्या भटक्या कुत्रांचे लसीकरण आणि नसबंदी झाल्याचे प्रमाणपत्र दाखवले.
तासभर वाद विवाद सुरु होता. पण साहित्य ललिताच्या प्रत्येक अर्ग्युमेण्टला स्ट्रे डॉग फीडर संस्थेचा एक माणूस पेटाचे वेगवेगळे नियम सांगून निरुत्तर करत होता. शेवटी यातून काही निष्पन्न होईल असे दिसत नाही हे साहित्य ललीताला समजले. त्यांना लेखनाची काळजी पडलेली.
बिचारी पोर, किती विव्हळली होती. त्यांनी फौजदार बाईंना हे सगळे मिटवायची विनंती केली आणि घरी जायची परवानगी मागितली. ललिताने ज्या फ्लॅट मालकाने लेखनाला घरी नेले होते त्याला फोन करून तिला घेऊन दवाखान्यात जाऊन ड्रेसिंग करून आणा असे सांगीतले.
साहित्य ललिताचा बचावात्मक पवित्रा पाहून समोरच्या फ्लॅट मधल्या बाईना जोर चढला. त्यांनी कुत्र्याचा विषय सोडून देण्याची तयारी दर्शवली [आणि तेच तर त्यांचे उद्दिष्ट होते !!]. पण बाकीचे आरोप [जबरदस्ती करणे, विनयभंग] मागे घ्यायला त्या तयार नव्हत्या. पण बाकीच्या फ्लॅट मेम्बर नी समजावल्यावर त्यांनी साहित्य ललिताने त्यांची लेखी माफी मागितली तर हा विषय संपवायची तयारी दर्शवली.
साहित्य ललिता आवाक्क झाले. या बाईंनी बोलावले म्हणून तो गॅस चेक करायला त्यांच्या घरात गेलेला होता, त्यांच्या मुलीवर या बाईंच्या कुत्रीने हल्ला केला होता, आणि बचावासाठी त्याने त्या कुत्र्यावर हॉकी स्टिक उगारली होती, आणि शेवट यांनीच माफी मागायची?
शेवटी साहित्य ने त्याचा तारणहार कौस्तुभ पोंक्षे ला फोन केला आणि सगळे सांगीतले. कौस्तुभ पोंक्षेंने दहा मिनिटात फोन करतो म्हणून सांगितले आणि फोन ठेवला.
हा पोंक्षे ऐन गरजेच्या वेळी थड लावणार असे साहित्यला कळले. पण पुढच्या १५ मिनिटात साहित्यला एक फोन आला. ट्रू कॉलर वर ऍड. ** ** असे नाव होते.
पलीकडून ऍड . ** ने साहित्यला सांगितले की "त्यांना आताच कौस्तुभ चा फोन आलेला आणि पोंक्षेने सगळी स्टोरी मला सांगितली आहे.
हे बघा साहेब, पेटा चे कायदे बरेचसे प्राणी प्रेमी, डॉग फीडर्स च्या बाजूने आहेत. त्यांच्यामागे एक मोठा राजकीय वरदहस्त आहे, पेट फूड बनवणाऱ्या कंपन्या, प्राण्यांची औषधे बनवणाऱ्या कंपन्या अशी मोठी इको सिस्टिम या मागे आहे. त्यांच्याशी लढण्यात अर्थ नाही.
बाकी तुमच्या वर जर विनयभंग, जबरदस्ती घरात शिरणे असे कलमे लागले तर निस्तरता थोडी होईल. विशेषतः IPC ३५४. बेल मिळताना तोंडाला फेस येईल. तेव्हा त्या बाई जर माफी मागून थांबत असतील तर माफी मागा आणि प्रकरण मिटवा."
इकडे फौजदार बाई वैतागल्या होत्या. साहित्य आणि ललिताने निमूटपणे एका ए ४ पेपर वर "समोरच्या फ्लॅट मधल्या बाई" ची माफी मागितली.
पुन्हा सोसायटीतल्या कुत्र्यांना त्रास देणार नाही, डॉग फीडर्स ना त्यांना खायला घालण्यापासून रोखणार नाही, पेटा कायद्याचा मान राखेन, सोसायटीची शांतता भंग होणार नाही असे वगैरे वगैरे लिहून दिले. त्याची एक प्रत फौजदार बाईंना दिली, एक प्रत समोरच्या फ्लॅट मधल्या बाईना दिली आणि एक प्रत स्वतःकडे ठेवली.
शेवटी सगळे घरी निघाले. ललिताच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ज्या कानावर कानफटात बसली होती तो कान दुखू लागला होता. तितक्यात तिला फोन आला. शेजाऱ्यानी लेखनाचे ड्रेसिंग करून आणले होते. पण अँटी रेबीज साठी सरकारी दवाखान्यात जावे लागेल आणि तिकडेच ते तिला नेत आहेत, काळजी करू नका असे सांगितले. ललिता साहित्यला थोडे हुश्श झाले. वाटेत ते एका ठिकाणी चहा साठी थांबले. त्याची गरजही होती.
चहा घेऊन ते सोसायटीत आले तेव्हा "समोरच्या फ्लॅट मधल्या बाई" सोसायटीतल्या कुत्र्यांना खायला घालत होत्या, शोना राणीला कुरवाळत होत्या. बरोबर त्यांचे ते पोलीस स्टेशनला आलेले लोक पण होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर विजयोन्माद होता.
सोसायटीत बाकीचे लोक घोळक्याने जमून साहित्य ललिता कडे बघत कुजबुजत होते.
खाली मान घालून ते आपापल्या फ्लॅट मध्ये गेले. दोघेही सुन्न होऊन बसले होते. तेव्हढ्यात लेखना ला घेऊन शेजारी आले. त्यांनी तिला अँटी रेबीज देऊन आणले होते. पण उद्या आणि अजून काही डोस घ्यावे लागणार होते. लेखनाला सोडून ते शेजारी निघून गेले. जाताना त्यांनी साहित्यचा हात हातात घेऊन थोपटला.
ते गेल्यावर साहित्यने लेखनाला आणि ललिताला आपल्या बाहुत सामावून घेत तिघांनीही आपल्या अश्रूंचा बांध सोडला ...
रात्री कधीतरी ते अश्रू आटले ... झोप लागली.
==========
दुसरा दिवस :
सकाळी थोडे उशिरानेच जाग आली. सवयीप्रमाणे साहित्यने आपला मोबईल घेतला.
सोसायटी ग्रुपवर समोरच्या फ्लॅट मधल्या बाईंनी "फॉर सोसायटीज ऑल मेम्बर्स इन्फॉर्मशन " असा टॅग करून पोस्ट केले होते ...
आणि खाली साहित्य आणि ललिताने काल दिलेल्या माफीपत्राचा फोटो पोस्ट केला होता……..
प्रतिक्रिया
10 Jun 2025 - 1:01 pm | सौंदाळा
लेखाशी सहमत आहे. जवळजवळ सर्वच मोठ्या सोसायट्यांमधे हे प्रकार चालू आहेत. नसबंदी करुन पण कुत्र्यांची संख्या बेसुमार वाढली आहे. कुत्रेप्रेमी पेटाचा धाक दाखवतात लगेच कोणातरी वकीलाचा, पेटाचा शहरप्रमुख यांचे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्यांचे फोन येतात त्यामुळे कोणीच यांच्या नादी लागत नाही. काही महिन्यापुर्वी पिंपरी मधील एका मोठ्या सोसायटीत १० भटकी कुत्री विषप्रयोग करुन मारली याचा पोलीसतपास चालू आहे. कुत्रे मारण्यासाठी ५ लाखांची सुपारी दिली होती असा कुत्रेपेमींचा आरोप आहे.
भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी कठोर कायदा केलाच पाहिजे.
10 Jun 2025 - 1:21 pm | कंजूस
मोठ्यांची दुखणी मोठी.
10 Jun 2025 - 2:43 pm | कपिलमुनी
आमच्या सोसायटीत डॉग फीडर होता ..नंतर कुत्रे सोसायटीत आणून फीड करत होता . पार्किंग मध्य कारण बाहेर पाउस असतो ... विरोध केला तेव्हा सगळि पेटा कम्युनिटी घेउन आला . मोर्चे वगैरे पोलीस केस .. मग काही दिवसांनी राणी शोना माझ्या ४ वर्षाच्या मुलावर धावून आली ..
मग त्या माणसाला आधी रट्टे घातले आणि शोना ला पण !
वर सांगितले , असा पण पोलिस स्टेशन वारी आहे तशी पण आहे ..पैसे देउन सुटेनच !
पुढे प्रकरण मिटले ..पुढे बिचार्या शोनाला पण गाडीने उडवले म्हणे !
11 Jun 2025 - 11:24 pm | सौन्दर्य
कपिलमुनी साहेब ,
ती गाडी आपलीच होती अशी गावभर चर्चा सुरु आहे .
हलकेच घ्या .
10 Jun 2025 - 2:45 pm | कपिलमुनी
हे पेटावाले उच्च्भ्रू साले मिडल क्लासचा गैर फायदा घेतात ..
10 Jun 2025 - 2:53 pm | कर्नलतपस्वी
प्रत्येक सोसायटीत असेच चालू आहे.
कुत्राप्रेमींचा दांभिकपणा. यांना कुत्र्याचे कान कापले तर चालतात. नसबंदी केलीतर चालते. नवल वाटते, अजून कुणी कुत्रा प्रेमीने पालिकेला विचारले नाही की नसबंदी करण्या आगोदर कुत्र्याचे संमतिपत्र घेतले का नाही?
सोसायटितील एक असेच प्रेमी, इथेही तोच त्रास. काय करणार, पोलीस झाले,चौकी झाली शेवटी लोकांनी नाद सोडला. प्रेमी काही दिवसांकरता गावाला गेला.कुत्री उकिरडे शोधू लागली. तरुणाईने भन्नाट आयडिया लढवली. खाण्याच्या गोष्टी घेऊन समोरच्या टेकडीवर गेले. मागोमाग सारी कुत्री. तिथेच खायला घातले. देखा देखी इतर सोसायटितील लोकही तिकडेच टेकडीवर कुत्र्यांना खायला देऊ लागले. कुत्र्यांनी सोसायटी सोडली. आता प्रेमी टेकडीवर जातात. गुडघे दुखीचा त्रास सुरू झालाय म्हणे.
असेच कबुतरांचे, पाळीव प्राण्यांचा सुद्धा कमी त्रास नसतो. दोन बेडरूम फ्लॅट ,कुत्रा बाल्कनीत, रात्रभर केकाटत असतो. सकाळी पुप करता सोसायटितील आवारात फिरवतात घाण करतात सगळी कडे.....
साहित्य दांपतीला आमच्या संवेदना.
10 Jun 2025 - 5:06 pm | स्वधर्म
आमच्या सोसायटीतील लोक तर कुत्र्याला फॅमिली मेंबर म्हणतात. कालच एका मित्राला काय चाललेय असे विचारले तर घरी सिनियर सिटीझन आहे, त्याच्यात खूप वेळ जातो म्हणाला. कोण म्हणाल्यावर कुत्रीचे नांव घेतले. १०-१२ वर्षात ते पिल्लू सिनियर सिटीझन झाले असून या मित्राचा वेळ तिची काळजी घेण्यात जातो.
10 Jun 2025 - 6:10 pm | कर्नलतपस्वी
फार बडदास्त ठेवावी लागते. अंतकाळी आगदी माणसासारखे. जीवंत असताना वाढदिवस वगैरे करतात. आमची एक मेव्हणी तीच्या कुत्र्याला फाईव्ह स्टार चाॅकलेट खायला द्यायची.परत कुत्र्याला कुत्रे नाही म्हणायचे,सनी म्हणायचे. एका पेक्षा एक वरचढ किस्से.
आहो,अम्रीकेत तर आमचा कुत्रा हरवला आहे आमची मुलगी तीन दिवसापासून जेवत नाहीये सापडल्यास अमुक पत्यावर पोहचला अशी जागोजागी हॅण्डबिले लावतात.
एक मजेशीर लेख पाडता येईल.
बाकी सर्व ठिक पण मला नवल वाटते ते त्यांना बिना कॅलेंडर भाद्रपद महीना कसा आला ते कसे कळते.
10 Jun 2025 - 6:10 pm | कर्नलतपस्वी
फार बडदास्त ठेवावी लागते. अंतकाळी आगदी माणसासारखे. जीवंत असताना वाढदिवस वगैरे करतात. आमची एक मेव्हणी तीच्या कुत्र्याला फाईव्ह स्टार चाॅकलेट खायला द्यायची.परत कुत्र्याला कुत्रे नाही म्हणायचे,सनी म्हणायचे. एका पेक्षा एक वरचढ किस्से.
आहो,अम्रीकेत तर आमचा कुत्रा हरवला आहे आमची मुलगी तीन दिवसापासून जेवत नाहीये सापडल्यास अमुक पत्यावर पोहचला अशी जागोजागी हॅण्डबिले लावतात.
एक मजेशीर लेख पाडता येईल.
बाकी सर्व ठिक पण मला नवल वाटते ते त्यांना बिना कॅलेंडर भाद्रपद महीना कसा आला ते कसे कळते.
10 Jun 2025 - 6:29 pm | युयुत्सु
पाडून प्रसिद्ध पण झाला आहे
https://www.misalpav.com/node/52996
10 Jun 2025 - 8:09 pm | कर्नलतपस्वी
शैलीत लेख पाडलेला दिसतोय.
10 Jun 2025 - 8:09 pm | कर्नलतपस्वी
शैलीत लेख पाडलेला दिसतोय.
10 Jun 2025 - 9:26 pm | Bhakti
कुत्र्यांचा स्वैराचार,जस्ट ज्ञानेश्वरीतील एक दृष्टांत वाचण्यात आला..
विषयासक्त, स्रैण पुरुषाच्या निर्लज्ज व्यवहारास माऊली ग्रामसिंहाचा म्हणजे कुत्र्याचा दृष्टांत देतात.
'इया ग्रामसिंहाचिया ठायी । जैसा मिळणी ठावो अठावो नाही । तैसा स्रीविषयी काही। विचारीना ।।' (ज्ञा. १३/६८१).
जसे कुत्रे कामक्रिडेस चव्हाटा किंवा आडबाजू असा कुठलाही भेद पाहत नाही. तद्वत विषयासक्त मनुष्य विधीनिषेध डावलून स्वैराचाराने वागतो.
एकंदरीत ग्रामसिंह आणि भाद्रपद पुरातन कनेक्शन आहे !
11 Jun 2025 - 9:08 am | कर्नलतपस्वी
वैकुंठवासी ह भ प सोनोपंत उर्फ मामा दांडेकर यानी विशद केलेली ज्ञानदेवी वाचत आहे. एक एक पाट उघडत आहे.
आता नामदेवांचे म्हणणे समजत आहे,"एक तरी ओवी अनुभवावी".
10 Jun 2025 - 5:46 pm | कंजूस
लहानशा जागेत कुत्र्यांना डांबणे गुन्हा नाही का? जागा तळमजल्यावर असेल मांजरे पाळणे ठीक आहे. ती आत बाहेर स्वतःच करतात.
10 Jun 2025 - 6:52 pm | मूकवाचक
Every dog deserves a home, but every home does not deserve a dog.
तळटीपः अमर्याद संख्या झाल्याने मानवी जीवनालाच जिथे किंमत उरलेली नाही, तिथे श्वानांना कोण विचारणार? असो.
10 Jun 2025 - 8:12 pm | Bhakti
आमच्या निम शहरी भागात,कॉलनी आहे पण नियम असे नाही.
सदा न कदा श्वानांची फौजच फिरते.अजून तरी काही घडलं नाही.पण रात्री खुप भुंकतात,त्याचा त्रास होतो.आणि शीट.. खुपच घाण करतात :(
लहानपणी आमच्याकडे पामेरियन डॉली होती.त्यामुळे जरा लळा आहे.पण वेळेच्या अभावामुळे आता श्वान पाळणे शक्य नाही.
पण आमच्या इथे भटकी भू भू आहे ट्रेसी (हे नाव मीच दिले.)ती पूर्ण कॉलनीची आहे.सगळे जण तिला खाऊ घालतात.तिने दोनदा पिल्ले दिली माझ्या लेकीला त्या पिल्लांचा खुप लळा लागायचा.काही वाहत्या रस्त्यावर गाडीखाली गेली.काही कोणी कोणी नेली.त्यामुळे मी नेहमी श्वान आवडतात की नाही याबाबत संभ्रमात असते!
बाकी या कथेतील समोरच्या घरातील बाई सारख्या व्यक्ती मोठ्या शहरात खुप असतात त्यामुळे असे किस्से घडतच राहणार यात शंका नाही.
11 Jun 2025 - 9:41 am | कंजूस
सोसायटीच्या बाहेरचे लोक आत येऊन कुत्र्यांना खायला कसे देऊ शकतात?
........
कुत्रा हा प्राणी कोल्हा,लांडगा, तरस वगैरे जमातीत आहे असे म्हणतात पण मोठा फरक म्हणजे ते प्राणी आपली पिले एकत्र वाढवतात. आईबाप मिळून पिले सांभाळतात. तसे कुत्रा करत नाही उलट दुसऱ्या कुत्रीच्या पिलांना चावून मारून टाकतो. मांजरी कुळात( वाघ, सिंह वगैरे) माझी एकटीच पिलांना वाढवते. पिलांना बोक्यांपासून वाचवावे लागते. समजा असं नसतं तर कुत्रा आणि मांजर मानवाचे मित्र झालेच नसते
11 Jun 2025 - 12:13 pm | कपिलमुनी
कुत्रा करत नाही उलट दुसऱ्या कुत्रीच्या पिलांना चावून मारून टाकतो ??
हे मी पाहिले नाहि . बोके मारतात .. कुत्र्यांनी मारलेले बघण्यात नाही
11 Jun 2025 - 3:37 pm | विवेकपटाईत
न्याय पालिकेने निर्णय दिला आहे. बाहेरचे लोक येऊन तुमच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये आवारा कुत्र्यांना खाऊ घालू शकतात.
11 Jun 2025 - 3:36 pm | विवेकपटाईत
गेल्या वर्षी ग्रेटर नोयेडात बिल्डर सोसाइटीत रहायला आलो. वाटले होते इथे कुत्र्यांच्या त्रास नसेल. पण इथे तर बेसमेंट पार्किंग मध्येच अनेक कुत्रे आहेत. इथे ही कुत्र्यांना खायला घालणारे आहेत. पण जे खाऊ घालतात ते कुत्रे पाळत नाही. (त्या जेवणावर कुत्र्यांचे पोट भरणे शक्य नाही) किमान 20-25 कुत्रे या हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये असतील. दर महिन्यात किमान एक दोन लोकांना कुत्री चावतात. कुत्र्यांना मारणे शक्य नाही. बाहेर हाकलू शकत नाही. कुत्रे समर्थक पोलिसांना बोलवायला क्षणाचा ही उशीर करत नाही. या घटकेला रात्र पाळीचे सर्वच गार्ड दंडुका घेऊन बसतात. कुत्र्यांना फक्त दुरून घाबरविण्यासाठी. त्यांना दंडुका मारू शकत नाही. अनेक गार्ड कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले आहे. मी ही सकाळी फिरायला जाताना हातात छडी घेऊनच जातो.
कुत्र्यांची संख्या देशात कमी नाही. त्यांना संरक्षणाची गरज नाही. दरवर्षी 25000 हून जास्त लोकांचे प्राण घेतात. त्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात किमान हजारहून जास्त लोक ठार होता. कुत्रे फॅमिली प्लॅनिंग करू शकत नाही. त्यांची संख्या नियंत्रित करणे गरजेचे आहे.
11 Jun 2025 - 6:54 pm | प्रकाश घाटपांडे
अतिरिकी प्रेम व अतिरेकी द्वेष यातून अशा गोष्टी घडतात. साहित्यात मात्र अतिशयोक्ति हा अलंकार असतो. तो अतिरेक रसग्रहणीय असतो
11 Jun 2025 - 8:22 pm | कपिलमुनी
प्राण्यांचे अधिकार सर्व प्राण्यांना सेम असतील तर साप पाळा, नाग , फुरसे जिथून मिळतील. तिथून सर्व मित्रांना सांगून सोसायटी आवारात सोडायला सांगा..
12 Jun 2025 - 7:52 pm | सौंदाळा
नारायणगाव, जुन्नर, ओतुर वगैरे भागात आडगावात भटकी कुत्री एकदम गायब झालेली आहेत. बिबट्याचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे नाग, साप, फुरसे यांपेक्षा प्रत्येक सोसायटीत एक दोन बिबटे सोडले पाहिजेत, काय म्हणता :)
11 Jun 2025 - 11:38 pm | सौन्दर्य
आता कबुतरावरच्या लेखाच्या प्रतीक्षेत.