त्वमेव सर्वमम देव देवः

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
17 Sep 2024 - 10:55 am

.

काय बाप्पा, निघालास? आजवरच्या आयुष्यासारखेच हे दहा दिवसही कसे गेले कळालेच नाही. बाबा शंभू आणि आई गौरी तुझी वाट पाहत असतील. नंदी उंदीर मामाकडून पृथ्वीतलावरच्या गोष्टी ऐकण्यासाठी आतुरला असेल. तू येथे येतोस त्या पर्वाला आम्ही 'गणेशोत्सव' म्हणतो. पण माणसांच्या जगात दहा दिवस जाण्याच्या परंपरेला तू मात्र 'येड्यांची जत्रा' म्हणत असशील याची खात्री वाटते. आमच्यासाठी गणेशोत्सव पवित्र, मंगल वगैरे वगैरे असला तरी तुझ्यासाठी ही 'येड्यांची जत्रा' मात्र प्रचंड विनोदी ठरत असणार. घरातली लहानी बाळं मोठ्यांसमोर खोट्या बढाया मारताना घरातली मोठी त्या खोटेपणालाही गोड मानून हसतात. तुही आमच्यावर असाच प्रेमळ हसत असशील. भक्तीचा किती जास्त आव आणतो आम्ही या दहा दिवसांमध्ये! जीवाचा आटापिटा करून तुझे फोटो काढताना आमची नाटकी भक्ती पाहून तू, 'अब रुलायेगा क्या पगले' हा फिल्मी संवाद कितीतरी वेळा स्वतःशीच गुणगुणत असशील. देवांच्या इंस्टाग्रामवर तू आमच्या गर्दीचे फोटो टाकून स्वतःची हवा करत असणार. तू चौसष्ट कलांचा अधिपती! बुद्धीची अधिष्ठात्री देवता! परंतु या दहा दिवसांत काही दुर्मिळ अपवाद वगळता आम्ही माणसे केवळ टुकार कला आणि बैलबुद्धीचा बाजार मांडतो. जत्रा म्हटली की बाजार आलाच! एका गणपती मंडळापासून अवघ्या पन्नासेक फुटांवर स्वतःची वेगळी मंडळे उभी करून माणसे कोणती भक्ती प्रदर्शित करतात, याचे कोडे तू परमेश्वर असूनही तुला सुटले नसणार. घरातील प्रत्येक मंगल कार्याचे निमंत्रण लोकांना देताना माणसे तुझी 'श्रीकृपा' आणि 'मुहूर्ताचा' आवर्जून उल्लेख करतात. आणि तुझ्या मुहूर्त ठरलेल्या विसर्जन सोहळ्यातील दोन दिवसांच्या मिरवणुकांचा मात्र हीच माणसे अभिमान बाळगतात. तुला हसण्यासाठी आणखी एक कारण!

कानांचे पडदे फाडणाऱ्या डीजेच्या भिंती, डोळ्यांसमोर अंधारी आणणारे तीव्र प्रकाशझोत आणि त्यासमोर नाचणाऱ्या हजारोंच्या झुंडी यांचा आणि तुझा संबंध काय? पण आमचा बालहट्ट म्हणून तू ते खपवून घेतोस. पण हे विनायका, तू यावेळी परत जाताना थोडी जाण आणि अक्कल आमच्यासाठी मागे ठेवून जा. लेकरांचा बापावर अंधविश्वास असतो. तसाच आम्ही तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. मंडळांचे महाकाय देखावे भ्रष्टाचाराच्या पैशातून उभे राहिलेले आहेत हे माहीत असूनही त्यातल्या मूर्तीचे पावित्र्य आम्हाला कधीच भ्रष्ट वाटत नाही. आम्ही सामान्यांच्या रांगेत उभे राहून धक्के खात तुझ्यासमोर येऊनही धक्के खाऊनच बाजूला लोटले गेलो, हे तू पाहशील आणि कृपा करशील म्हणून दरवर्षी असंख्य भक्त फक्त धक्के खाण्यासाठी या रांगांमध्ये थांबतात. तुझे दर्शन होईल असा विश्वास त्यांना आजही वाटत नाही. तुला आमचे दर्शन होऊन आमचे अस्तित्व जाणवले म्हणजे आम्हाला तुझ्या दर्शनासाठी दिवसरात्र भटकावे लागणार नाही. तू अंतःकरणात सापडशील. पण त्यासाठी तुला माझ्याकडे एक कटाक्ष टाकावाच लागेल गणराया. असुरांचा संहार करणाऱ्या शिवाचा तू पुत्र. गजशक्तीने युक्त आणि बुद्धीने पुष्ट गजानना, तुला आमच्या वागण्यात दिसत नसले तरी आम्ही म्हणतो ते, "त्वमेव सर्वमम देव देवः" अर्थात 'माझं सगळं काही तूच आहेस' ही आमची भावना अगदी शंभर टक्के खरी आहे.‌ त्याला तू आमचा विनोद समजण्याची चूक करू नकोस. म्हणून जाताना आम्हाला तेवढे बुद्धीचे वरदान दे. अन्यथा आमच्या उन्नतपणाला सीमा न राहता तू स्वतःहून या गोंधळात यायचे बंद करशील.

तुझाच

संस्कृतीधर्मविचार

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

17 Sep 2024 - 2:41 pm | कर्नलतपस्वी

भावभोळ्या भक्तीचा व्यापार पाहिला मी
मोजून पैशात भावनेचा आकार पाहीला मी
भक्तात लागली होड कुणाचा मान पहीला
पावन उत्सवाचा इव्हेंट होताना पाहीला मी

लेख आवडला.

अनुस्वार's picture

19 Sep 2024 - 1:08 am | अनुस्वार

पण कृष्णाशिवाय!

विवेकपटाईत's picture

18 Sep 2024 - 8:43 pm | विवेकपटाईत

आपली सर्वच उत्सव प्राचीन काळापासून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी होत असे. संपूर्ण देशात किमान एक कोटीच्या वर गणपती स्थापित झाले असतील. दिल्ली नोएडा येथील उत्तर भारतीय घरच्या गणपतीच्या विसर्जन साठी ही ढोल वाल्याला बोलवतात. किमान पाच ते सात लाख कोटींचा व्यवसाय गणेश उत्सवात होतो. कोटी होऊन जास्त रोजगार या दहा दिवसात निर्मित होतात. पूर्वीच्या काळी डीजे असता तर तेव्हाही तो वाजविला गेला असता. सुखकर्ता... ही आरती ही उत्तर भारतात म्हणतात. अनेक ठिकाणी मंत्र पुष्पांजली ही होते. मराठी संस्कृतीचा प्रसार गणपती उत्सवाच्या माध्यमांनी सहज होतो.
शेवटी आपल्या उत्सवा प्रति वाईट लिहणे हा एक पुरोगामी .....

अनुस्वार's picture

19 Sep 2024 - 1:06 am | अनुस्वार

आपल्या उत्सवांबद्दल आपण बोलायचे नाही. इतरांना त्याबद्दल बोलू द्यायचे नाही. कुणी सत्य बोलले की त्याला 'लेबले' लावणे हा 'विवेक' काय आपल्याला 'पटत' नाही बुवा.