Thrills on Wheels - चौथा टप्पा

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
23 Feb 2023 - 8:22 am

Thrills on Wheels
( Thane - Statue of Unity - Thane)
चौथा टप्पा

२६ जानेवारी. आजपासून परतीचा प्रवास सुरू. येताना जेव्हढे रिलॅक्स होतो त्यापेक्षा जरा काळजीत होतो. काळजी एवढ्याचसाठी की आलो तेव्हा कुठे थांबणार हे पक्क होत, हॉटेल बुक केलेली होती. आता आम्ही आमचा अंदाज घेवून त्यातल्या त्यात मोठ्या शहरात जाऊन मग तिथे हॉटेल बघून राहणार होतो. त्यामुळे वेळेत निघणं, वेळेत पोहोचणं गरजेचं होत. सुरवातीला अंकलेश्र्वर नक्कीच होत.

निघालो आणि केवडियाचा परिसर सोडला नि मस्त टेल विंड्स लागले. इतके दिवस एकही BRM ला या टेल विंडस नी साथ दिली नव्हती. उलट टेल वींड्स ही अंधश्रध्दा असते या मतावर आम्ही आलो होतो. येताना ज्या क्रॉस विन्ड्स नी आम्हाला दमवल होत तेच वारे आज पाठीमागून आम्हाला सपोर्ट करत होते. अगदी ढकलले गेले नाही पण मस्त वाटत होत. त्यामुळे केवडिया ते अंकलेश्र्वर हे १०० किमी अंतर आम्ही जवळपास दुपारी २ वाजेपर्यंत पूर्ण केलं. अजून ४ तास हातात असताना इथेच थांबून राहणं पटत नव्हतं. एकीकडे श्रीनिवास ला फोन करून पुढचं मोठं शहर आणि साधारण तिथली हॉटेल बघून ठेवायला सांगितली नि आम्ही पुढचा प्रवास सुरू ठेवला. पुढे ५० किमी वर कडोदरा शहर आहे हे आम्ही अगदी सुरवातीला बघितलं होत. त्यामुळे आज तिथपर्यंत जाऊन थांबायचं यावर एकमत झालं. प्रश्न हॉटेलचा होता. श्रीनिवासने दोन हॉटेल ना फोन केला ती फुल्ल होती. एक हॉटेल त्याने सुचवलं पण प्रत्यक्ष बघा नी ठरवा अस सांगितल. आम्ही त्या हॉटेलच्या बाहेर पोहोचलो पण आत जाऊन चौकशी करवेना. तिथेच काट मारून नेट वर बघून हाय वे पासून थोड्या आत असलेलं एक हॉटेल बघायला चाललो. पण वाटेत एक तिरुपती गेस्ट हाऊस दिसलं. सहज म्हणून चौकशी केली. अश्विनी वर जाऊन रूम बघून आली. आमच्या तश्याही फार अपेक्षा नव्हत्या. रात्री झोपण्यापूर्ती सुरक्षित जागा हवी बास. हे हॉटेल त्यात परफेक्ट बसलं. शिवाय हाय वे पण अगदी हाकेच्या अंतरावर होता. जेवणासाठी हॉटेल समोरच होत. सायकल ठेवायला पण त्याने जागा दिली. माफक भाड्यात चांगली जागा मिळाली. आजचा राहण्याचा प्रश्न सुटला पण उद्याच काय?

त्याच दरम्यान दादा त्याच्या मित्रांमध्ये आम्ही गुजरातला गेलो हे बोलला होता. त्याचा एक मित्र भागवत, त्याचा भाऊ वापीला राहतो म्हणाला. त्यांचा नंबर मिळाला. त्यांच्याशी संपर्क केला. कडोदरा - वापी फक्त ८० किमी होत त्यामुळे त्यांचा वापीला राहण्याचा आग्रहाला आम्ही नको म्हणालो. उलट पुढे तलासरी किंवा चारोटि मध्ये राहण्याची व्यवस्था होईल का विचारलं. त्यांनी त्यांच्या ओळखीतून शैलेश घारपुरे यांचा नंबर दिला. त्यांच्याशी बोलून घेतलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की मी हॉटेल बघतो नाही मिळालं तर आमच्याच घरी या. काय करावं सुचत नव्हतं. वापी सोडून पुढे गेलो तर तस फारस चांगलं हॉटेल मिळेल अस वाटत नव्हत. शेवटी उद्या परत शैलेशजी ना फोन करू आणि मग बघू अस ठरलं.

२७ जानेवारी. भराभर अंतर कापीत निघालो नि १२ वाजायच्या दरम्यान वापित पोहोचलो. श्री भागवत यांना आधीच फोन करून भेट होऊ शकेल का विचारलं होत. त्याप्रमाणे तिथे त्यांची भेट घेवून त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. त्यांनी जेवणाचा आग्रह केला पण उशीर झाला असता म्हणून परत त्यांचे आभार मानून निघालो. तोवर त्यांनी शैलेशजी ना आम्ही वापी क्रॉस करून पुढे निघालो असा फोन करून ठेवला. घारपुरे यांनी चारोटीच्या हॉटेल अतिथी येथे रूम बुक करून ठेवली आहे असं सांगितलं. आम्ही गुगल वर रिव्ह्यू चेक केले तर फक्त जेवणाचे, पदार्थांचे रिव्ह्यू होते. राहण्याचा, खोली बद्दल वगैरे रिव्ह्यू कुठेच नव्हता. पण श्री घारपुरे यांच्यावर विश्वास ठेवून साधारण साडे पाचला चारोटिला हॉटेलवर येऊन पोहोचलो. तिथे गेल्यावर वरच्या मजल्यावर त्यांच्या रूम्स आहेत आणि क्वचित कोणी ओळखीचं असेल तरच ते रूम देतात अस कळलं. हॉटेल छान होत, रूम पण मस्त होत्या. अनेक सायकलिस्ट इथे येत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई BRM चा २०० चा हाच यू टर्न आहे हे देखील कळलं.

फार बरं वाटलं. आता उद्या इथून ठाणे फक्त ९५ किमी. आम्ही फ्रेश झालो नि श्री घारपुरे यांना भेटायला गेलो. तिथून थोड्याच अंतरावर त्यांचं घर होत. आम्ही घरी गेलो, त्यांचे आभार मानले, त्यांच्या कुटुंबीयांना भेटलो. तिथून मात्र त्या सगळ्यांनी खूप आग्रह करून आम्हाला जेवायला ठेवून घेतलं. खूप दिवसांनी घरच जेवण मिळालं. तृप्त वाटलं. त्यांच्या आग्रहाने आणि प्रेमाने खूप छान वाटलं. आजी आजोबा, स्वतः श्री घारपुरे, त्यांची बायको आणि मुलगी सर्वजण खूप छान होते. सर्वांशी छान गप्पा झाल्या. रात्री त्यांनी आम्हाला हॉटेल वर सोडलं.

२८ जानेवारी. आज फक्त ९५ किमी जायचं होत त्यामुळे जरा आरामात म्हणजे सात वाजता निघालो. लगेचच चारोटिचा चढ लागला. उतरून पुढे एके ठिकाणी नाश्ता करून निघालो. १० वाजल्यानंतर ऊन तापायला लागलं. काल पण उन्हाने वाईट अवस्था झाली होती. आज तर अंतर पण कमी आहे तरी असच होणार का म्हणून थोड अस्वस्थ झाले. पण सायकल चालवत पुढे जात राहिलो. वसईच्या चढात बारा वाजता मात्र सायकल वरून उतरलो. थोड थांबलो पण पाणी मिळेना कुठेही. तशीच सायकल हातात धरत थोड चाललो आणि समोर नीरा च दुकान दिसलं. थांबून दोघींनी नीरा प्यायली, गार पाणी डोक्यावर मारलं, बाटल्या भरुन घेतल्या. जरा एनर्जी आली. ट्रॅफिक लागायला सूरवात झाली होती.

Fountain ला आल्यावर एका हॉटेल मध्ये जेवलो. घरचे, मनोज दादाचे फोन आले. फक्त १८ किमी बाकी होते की आमची ट्रीप पूर्ण झाली असती. मनोज दादा तर वाट बघत होता की केव्हा सांगायचं सगळ्यांना. त्याला म्हटल थांब जरा पूर्ण मुक्कामी पोहोचू दे मग सांगू.

तिथून घोडबंदर चा चढ सुरु झाला. परत दुपारी दीडच्या उन्हात चढ चढून ठाण्यात आलो. हिरानंदानी क्रॉस केल्यावर मात्र भयानक ट्रॅफिक सुरू झालं. कोणीही गाडीवाला आम्हाला काहीही किंमत देत नव्हता. रिक्षावाले आम्हाला शक्य तेव्हढे कडेला चेपत होते. आणि कडेचा रस्ता हा पेव्हर ब्लॉकचा खड्डे असलेला. त्यात कडेला काचा, खिळे, प्लास्टिकचे धारदार तुकडे पडलेले. शेवटच्या ४ किमी साठी सायकलची वाट लागतेय की काय वाटलं. जवळपास दीड दोन किमी आम्ही उन्हातून सायकल हातात धरून नेली. अगदी कंटाळलो की आता इथेच थांबावं आणि सायकल रिक्षात टाकून न्यावी इथपर्यंत विचार आले. पण आता थोडक्यासाठी का सोडा असंही वाटलं. सायकल कशीबशी ट्रॅफिक मधून काढत पुढे आलो. ऋतू पार्क च्या गल्लीत वळल्यावर एकदम हायस वाटलं. गेट वर पोहोचल्यावर तर आनंद पोटात माझ्या माईना अशी अवस्था झाली.

दोघी जणी स्वतःवर नि एकमेकांवर खुश झालो. एकमेकींच्या साहाय्याने एक मोठं ध्येय आम्ही गाठलं होत. खूप अनुभव, खूप मजा, खूप आठवणी घेवून आलो होतो. एकमेकींना मिठी मारली. काळवंडलेल्या चेहऱ्याचे सेल्फी काढून घेतले. घरी, मनोज दादाला फोन करून कळवल. मनोज दादाने लगेच सगळ्या ग्रुप वर पोस्ट केली. आणि आम्ही दोघीही समाधानाने तृप्त झालो.

- धनश्रीनिवास

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Feb 2023 - 12:15 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त झाली की सायकल ट्रिप!! दोन बायकानीच ही ट्रिप करताना त्या दृष्टिकोनातुन काही वेगळे अनुभव आले का? चांगले/वाईट दोन्ही?
पुन्हा म्हणतो--फोटो टाकले असते तर वाचायला अजुन मजा आली असती.

आता पुढचे टार्गेट काय? अष्टविनायक, कोस्टल कर्नाटक, केरळ, बँगलोर, कन्याकुमारी किवा मुंबई ते कलकत्ता व्हाया कोस्टल रूट?

मालविका's picture

23 Feb 2023 - 9:41 pm | मालविका

प्रतिसादाबद्दल आभार. पण फोटो चिकटवणे अजूनही नाही जमेल मला. फेसबुक वरील अक्षधन ग्रुप वर मी लेख आणि फोटो पोस्ट केले आहेत.
https://m.facebook.com/groups/557041041371574/permalink/1486577408417928...

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Feb 2023 - 11:18 am | राजेंद्र मेहेंदळे

१. जी मेल आय डी वापरुन गूगल फोटोज मध्ये जा आणि एक फोल्डर बनवा
२. फोल्डर बनवतान शेअर्ड फोल्डर बनवा आणि सगळे फोटो त्यात टाका
३. एक एक फोटो उघडुन राईट क्लिक करा आणि कॉपी लिंक करुन घ्या
४.मिपाच्या कॉमेंटमधे महिला आयकॉन "इन्सर्ट इमेज" घ्या आणि एक एक फोटोची लिंक पेस्ट करा

ईतके सोपे आहे.