नकोस विसरू

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
5 Aug 2022 - 7:30 am

नकोस विसरू-
कोसळणार्‍या
प्रपातातल्या
जलबिंदूच्या
खोल आतवर
कल्लोळाच्या
अब्जांशाचा
निनाद असतो

नकोस विसरू-
माथ्यावरती
ओणवलेल्या
निळ्यासावळ्या
घुमटावरल्या
नक्षत्रांच्या
दंतकथांना
शेवट नसतो

नकोस विसरू-
दाट धुक्याच्या
पल्याडचे जग
धूसरताना
अस्तित्वाच्या
काचेवरती
आभासाचा
चरा उमटतो

नकोस विसरू-
पैलतिराच्या
अनाहताशी
ऐलतिराच्या
कणाकणातील
कोलाहलही
रुणझुणणारे
ध्रुपद साधतो

मुक्तक

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Aug 2022 - 8:31 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली, नटसम्राट मधील स्वगताच्या चालीवर वाचायला अजून मजा येते

पैजारबुवा,

चांदणे संदीप's picture

5 Aug 2022 - 10:36 am | चांदणे संदीप

सुरेख रचना. आवडली.

सं - दी - प

अनन्त्_यात्री's picture

7 Aug 2022 - 11:54 am | अनन्त्_यात्री

धन्यवाद

प्रसाद गोडबोले's picture

7 Aug 2022 - 12:21 pm | प्रसाद गोडबोले

एकाही कडव्याचा सरळ स्पष्ट अर्थ लागत नाही . उगाचच काहीही .

आणि हो , अद्भुत हा शब्द न वापरल्याबद्दल फाऊल धरण्यात येत आहे .

श्रीगणेशा's picture

8 Aug 2022 - 10:08 am | श्रीगणेशा

नकोस विसरू-
कोसळणार्‍या
प्रपातातल्या
जलबिंदूच्या
खोल आतवर
कल्लोळाच्या
अब्जांशाचा
निनाद असतो

खूप छान!

वरील मार्कस ऑरेलियस यांच्या निरिक्षणाशी सहमत :-)
अद्भुत आहेत शब्द सर्व!