खान्देश खाद्ययात्रा पुष्प २ - फौजदारी डाळ

Primary tabs

जेम्स वांड's picture
जेम्स वांड in पाककृती
16 Jul 2022 - 2:54 pm

फौजदारी डाळ ही शक्यतो हिवाळ्यात केली जाते, सहसा ओसरत्या हिवाळ्यात संक्रातीच्या अगोदर हरभरे भरायला लागले किंवा हुरडा ओसरू लागला की शेतात फक्कड अशी खान्देशी मटन/ चिकन, फौजदारी डाळ - दाय (डाळ) गंडोरी, भरीत पुरी-वरण बट्टी अश्या पार्ट्या रंगतात... सोबतीला शेतातच उगवलेला ताजा भाजीपाला सलाद म्हणून घेतला का काम सेट.

साहित्य
3 टेबलस्पून सालाची उडीदडाळ
1 टेबलस्पून तुरीची डाळ
1 टेबलस्पून मुगाची डाळ
1 टेबलस्पून चणे डाळ
1 टेबलस्पून मसूर डाळ
1 टेबलस्पून चवळी
2 टेबलस्पून सुके खोबऱ्याचे पातळ काप
1/2 कप कांदा (साधारणतः एक मोठा) उभा चिरून
7 मोठ्या किंवा १२-१३ बारक्या लसूण पाकळ्या
बोटाच्या अर्ध्या पेरा इतके आले
1 टी-स्पून लाल तिखट
1/2 टी स्पून हळद
1 टी स्पून गरम मसाला

फोडणीसाठी
1 टी स्पून मोहरी
1/2 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
3-4 गोडलिंबाची पाने
3 टेबलस्पून तेल.

कृती :-
प्रथम सर्व डाळी तीन वेळा नीट धुवून अर्धा तास भिजत घालाव्यात, नंतर कुकरमध्ये ४ शिट्या करून शिजवून घ्याव्यात.

कढईत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा लालसर परतून घ्यावा

कांदा नीट परतला की त्यात खोबरे घालुन परत खोबरे लालसर होईस्तोवर परतून घ्यावे

आता ह्याच्यात बारीक चिरलेले आले लसूण घालून त्यांचा कच्चा वास जाईपर्यंत परतावे

आले लसूण परतून झाले का त्यातच एक चमचा लाल तिखट घालून चांगले परतून घ्यावे (पुन्हा एकदा जर ह्या स्टेपला घरच्यांनी सटासट शिंका मारल्या तर तुम्ही जिंकलेले आहात)

आता हा पूर्ण सौदा कढई उतरवून गार करून घ्यावा, नंतर त्यात अर्ध्या चमचा हळद आणि एक चमचा असल्यास खान्देशी काळा मसाला नसल्यास किचन किंग मसाला एक चमचा घालावा, आणि गार झालेल्या ह्या मसाल्याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावी.

आता कढईत 3 टेबलस्पून तेल गरम करावे त्यात मोहरी जिरे हिंग आणि गोडलिंबाची फोडणी करावी, आता ह्या फोडणीत आपण बारीक केलेले वरील वाटण घालावे अन चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे,

वाटणाला तेल सुटले की त्यात शिजवलेली डाळ घालून एकजीव मिक्स करावी, चवीनुसार मीठ घालावे आणि, ह्यात एक ग्लास गरम पाणी घालावे (एकच ग्लास कारण फौजदारी डाळ थोडी घट्टसरच असते)

पाणी घातल्यावर परत डाळ एकजीव करून तिला झाकून उकळी फुटू द्यावी, उकळी फुटली का गॅस बंद करून त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी डाळ दहा मिनिटे झाकून ठेवावी.

तयार आहे फौजदारी डाळ, सोबत काकडी टोमॅटो दाण्याचा कूट घालून केलेली कोशिंबीर आणि उडदाचेच कळणे घातलेली भाकरी अन गरम वाफाळता भात.

आता काय ? ओरपा पोट भरस्तोवर, आजचा पाऊस गारवा, रजा हे मौके अन दस्तुर यशस्वी भजी अन वडे तळण्यापेक्षा इकडे लावले अन जेवणच सार्थक झाले.

.

.

पाककृती श्रेय - हेमा वाणे, मार्फत कुकपॅड ऍप.

खान्देशी

प्रतिक्रिया

पण तिखट न केलेली पंचरत्न डाळ आणि बाटी आबू'ला खाल्ली आहे . जिन्नस हेच. (वीस वर्षांपूर्वी हाटेलांच्या गल्ल्यापाशी बाट्या ताटात ठेवलेल्या असत. एक माणूस रसत्यावर उभा राहून 'दाल बाटी' ओरडून बोलावे. आता लोकाची आवड बदलली. कुठेही बाटी दिसली नाही.) . चांगली लागते.

फोटो छान आलाय.

जेम्स वांड's picture

16 Jul 2022 - 5:08 pm | जेम्स वांड

पंचमेळ/ पंचरत्न डाळ कधी खाल्लेली नाही पण राजस्थानात लसूण वापरत नाहीत असं ऐकलं आहे

कंजूस's picture

16 Jul 2022 - 7:50 pm | कंजूस

कारण बाटी राजस्थानात दाल आणि चुरमा ( सोमवारचा गोड चुरमा असतो तो म्हणजे कणीक,तुप आणि साखर याचा पदार्थ.)बरोबर खातात. मप्रमध्ये बाटीवर तूप ओतून खातात. ( बाटीच्या आत गोड नसलेला चुरमा असतो. त्यामुळे लसूण घालणार नाहीत.

यश राज's picture

17 Jul 2022 - 1:48 pm | यश राज

फौजदारी डाळ मस्तच

राजस्थानात कांदा लसूण खात नाही असे काही नाही. बहुतेक वैष्णव किंवा जैन समाजात कांदा लसूण वर्ज्य असतो म्हणून खात नाहीत पण इतरत्र कांदा लसूण सर्रास खातात.

त्यानिमित्ताने एक अनुभव.

माझ्या भावाचे सासर मध्यप्रदेश व राजस्थान बॉर्डर वर आहे. सासरकडील मंडळी वैष्णव असल्याकारणाने भावाच्या लग्नात झाडून कोणत्याही पदार्थामध्ये कांदा किंवा लसणाचा किंचितही वापर नव्हता. त्यांनी आम्हाला अगोदरच कल्पना दिली होती. सर्व पदार्थ चवीला खूप सुंदर व चवदार होते त्यामुळे वरातीतल्या पाहुण्यांना त्यात कांदा लसूण नाहीये हे सांगून त्यांचा जराही विश्वास बसला नाही.
या अनुभवामुळे कांदा लसूण टाकला तरच पदार्थ चविष्ट होतो हे या माझ्या समजेला छेद बसला असे मला वाटते.

जेम्स वांड's picture

17 Jul 2022 - 4:55 pm | जेम्स वांड

नवीन माहिती अन रंजक अनुभव, मला वाटते असे देशाटन केल्याने माणूस फारच समृद्ध होत असावा, तुमच्या अनुभवातून ते पुन्हा एकदा अधोरेखित होते.

तुषार काळभोर's picture

16 Jul 2022 - 4:59 pm | तुषार काळभोर

भाकरी चुरून खायला असाच रस्सा पाहिजे!

जेम्स वांड's picture

16 Jul 2022 - 5:10 pm | जेम्स वांड

तुका पैलवान,

अक्षी मस्त भाकरी मुरगळली , रस्सा ओते ओते पर्यंत बाहेर कडकडून जोरात पाऊस सुरू झालाय अन आपण गरमागरम रस्सा भाकरी भुरकतोय हीच तर जन्नत

उगा काहितरीच's picture

16 Jul 2022 - 6:06 pm | उगा काहितरीच

छान. अगदी छान दिसत आहेत फोटो. अशा डाळी सोबत भाकरी/ भातच पाहिजे. बाकी पाऊस आणि अशी तिखट डाळ/वरण क्याच केहने. ;)

जेम्स वांड's picture

16 Jul 2022 - 7:33 pm | जेम्स वांड

केलं सगळं प्रकरण बाहेर पाऊस कोसळताना पाहूनच.

टेम्पटिंग दिसते आहे प्रकरण. रंगावर फिदा.

पचमेली दाल माझ्याकडेही करतात, त्यात मसूर आणि लसूण नसतो. खोबरंही नाही, झणझणीत असते मात्र. सोबत ज्वारीची भाकरी. पावसाळी / हिवाळी मेन्यू.

आता रेसीपीनुसार करून बघणेत येईल !

जेम्स वांड's picture

16 Jul 2022 - 9:10 pm | जेम्स वांड

आणि इकडे फक्कड रेसिपी लिहून टाका, तुमची बंगाली सिरीज वाचल्यावर तुमच्यात लेखनाची चिकाटी असल्याचे तरी फिक्स कळले आहे, त्यामुळे आग्रह आहेच.

मुक्त विहारि's picture

16 Jul 2022 - 8:17 pm | मुक्त विहारि

तोंपासू

जेम्स वांड's picture

16 Jul 2022 - 9:09 pm | जेम्स वांड

धन्यवाद

धर्मराजमुटके's picture

16 Jul 2022 - 9:11 pm | धर्मराजमुटके

छान पाककृती ! हिला फौजदारी डाळ नाव कसे पडले याचा काही इतिहास कोणाला माहित असेल तर लिहा.

जेम्स वांड's picture

16 Jul 2022 - 10:30 pm | जेम्स वांड

मला तरी काही खास कळले नाही, पण म्हणतात खरे.

डाळी=प्रोटीन्स त्यामुळे आवडतातच! नक्की करेन!छान तर्री आलीये.

जेम्स वांड's picture

16 Jul 2022 - 10:30 pm | जेम्स वांड

आभार ! प्रोटिन्स तर आहेतच

वामन देशमुख's picture

17 Jul 2022 - 12:34 am | वामन देशमुख

मस्त वाटतेय फौजदारी डाळ !

शेवटचा फोटो तर तर... तर्रीदार दिसतोय !

प्रचेतस's picture

17 Jul 2022 - 7:54 am | प्रचेतस

लैच जबराट पाकृ. फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले.
इंद्रायणीसोबत तर लैच जबरी लागेल.

जेम्स वांड's picture

17 Jul 2022 - 8:57 am | जेम्स वांड

आपले असंख्य आभार

वामनराव , हो सातारकर असल्यामुळे आम्हाला कट जरा विशेष प्रिय असतो म्हणून जरा कट केला जाळ, आपापल्या चवीनुसार ते कमीजास्त करता येईल

प्रचेतस भाऊ, आयडियाची कल्पना जोरदार आहे, इंद्रायणी सुवासिक असतोच प्रयोग करायला हवा हा, इंद्रायणी सोबतच आजरा घनसाळ पण ट्राय करायला हवा, आम्हाला भात एकतर पूर्ण फडफडीत मोकळा किंवा मस्त एकजीव आवडतो त्यामुळे मधील ऑप्शन नाही, आम्ही आपला काली मुछ केला होता त्या दिवशी.

सरिता बांदेकर's picture

17 Jul 2022 - 10:12 am | सरिता बांदेकर

मस्त दिसतंय प्रकरण.
रेसीपी नोट केली आहे. नक्की करणार.
तुम्हाला नवीन नवीन रेसीपी शिकवणारे भेटू देत अशी ईश्वर चरणी प्रार्थना.


जेम्स वांड's picture

17 Jul 2022 - 12:01 pm | जेम्स वांड

आभार आपले, ह्यात वांगी नाहीत नक्की ट्राय करा.

सरिता बांदेकर's picture

17 Jul 2022 - 7:36 pm | सरिता बांदेकर

नक्की करणार मला नवीन रेसीपी करायला आवडतात.

सस्नेह's picture

17 Jul 2022 - 5:00 pm | सस्नेह

फौजदारी नावाचा इतिहास शोधायला हवा आता.

जेम्स वांड's picture

17 Jul 2022 - 6:59 pm | जेम्स वांड

आधी डाळ करून चापा, टेस्टी होते, त्यामुळे तो इतिहास शोधण्यास मोटिव्हेशन अजून वाढेल

आंद्रे वडापाव's picture

17 Jul 2022 - 10:39 pm | आंद्रे वडापाव

वेगवेगळ्या डाळी पासून बनल्यामुळे, एका डाळीत उपलब्ध नसलेले मायक्रो न्युत्री यं ट स दुसऱ्या डाळी पासून मिळणार ....
त्यामुळे हेल्थ भी टेस्ट भी ...

दाल फ्राय, दाल तडका असे (घट्ट) डाळींचे विविध प्रकार मनापासून आवडतात त्यामुळे ही 'फौजदारी डाळ' पण खायला आवडेल!

तूर, मूग, मसूर, चणा अशा वेगवेगळ्या डाळी वापरून मूळ रेसिपीत बदल करून इम्प्रोव्हायजेशन करण्याची मला हौस आहे त्यामुळे दाल फ्राय, दाल तडका, पंचरत्न दाल अशा प्रकारांचे एक फ्युजन मी कधी कधी बनवतो त्याची रेसिपी लवकरच टाकतो. तुमच्या 'फौजदारी' डाळी वरून प्रेरणा घेत आज 'त्या' डाळीचे नामकरण मी 'दिवाणी' डाळ असे करत आहे 😀

जेम्स वांड's picture

19 Jul 2022 - 6:23 pm | जेम्स वांड

लै दिवसांनी दिसले संजुभाऊ, डाळ प्रेम पोचले तुमचे, लवकर दिवाणी डाळ बनवा अन टाका रेसिपी, एक डाळ सिरीज करून टाका कसे लगीच

श्वेता व्यास's picture

19 Jul 2022 - 6:38 pm | श्वेता व्यास

मस्त दिसतेय पाकृ. बऱ्याच डाळी असल्याने पौष्टिकही.
वेगवेगळ्या पद्धतीने डाळी करायला आवडतात त्यामुळे या पाकृबद्दल आभार :)

जेम्स वांड's picture

20 Jul 2022 - 11:49 am | जेम्स वांड

स्पेशल आहे एकदम पावसाळा/ हिवाळा.

चामुंडराय's picture

4 Aug 2022 - 1:02 am | चामुंडराय

तुम्ही दिलेल्या पाककृती बरहुकूम ही डाळ करून बघितली.

परंतु माझ्या मते ती फौजदार डाळ न होता हवालदार डाळ झाली. अर्थातच हे कौशल्य माझे, तुमच्या पाकृ चा काही दोष नाही.

पुढील वेळी मात्र हवालदाराचे प्रोमोशन करून त्याला फौजदार करणारच !

जेम्स वांड's picture

4 Aug 2022 - 6:36 am | जेम्स वांड

रेसिपी बरहुकुम केली म्हणता तरीही हवालदार झाली म्हणता, नेमकं काय हुकलं म्हणता ते काही कळेना...