विजेची गोष्ट ७: तारेतील विद्युत संदेशांची 'इलेक्ट्रिक' भाषा आणि आद्य 'मशीन भाषा' कार सॅम्युएल मोर्स

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
3 Jul 2022 - 8:23 am

आज विक्रमाच्या राज्यात काही वेगळ्या प्रकारच्या म्हटलं तर जंगली आणि म्हटलं तर जादूगार वाटाव्या अश्या काही माणसांविषयी फार बोलबाला झाला होता, आजकालच्या भाषेत ते लोक त्यांच्या कारामतींमुळे खूप 'वायरल' झाले होते.  जिकडे तिकडे त्यांचीच चर्चा. नाविन्यपूर्ण गोष्टींची हौस असलेला विक्रम राजा त्यांना ना भेटता तरच नवल होतं. या लोकांचे विशेष म्हणजे यांना प्राण्या पक्ष्यांची, झाडांची, मगरी -विंचवाची भाषा अवगत होती म्हणे. प्रत्यक्ष बघावे म्हणून राजाने त्यांचा प्रयोग सीमेवरच्या संरक्षित अरण्यात ठेवला होता आणि काय तो प्रयोग झाला .. एका अजस्त्र गोरिला माकडाशी त्यांमधील एक माणूस बोलत होता.. गळाभेट घेत होता.. गोरिला ला म्हणे आईची आठवण येत होती.. गोरिला पण रडत होता आणि हा माणूस पण रडत होता..जणू काही या गोरिला ला माहेरचा रिश्तेदारच भेटला होता.. हंबरडाच फोडायचा बाकी होता..दुसऱ्या एका रागीट, बेभरवशाच्या हत्तीने दुसऱ्या माणसाशी दिल खोलके बात केली होती.. त्याचं तारुण्य ओसरत होतं याची जाणीव त्याला होत होती म्हणे त्याने अन्नपाण्यातली त्यांची वासना उडाली होती म्हणे त्याची.. तोही जरा शांत झाला होता.. तिसरा माणूस तर अभयारण्यातल्या सिंहाचा पूर्वीचा मित्रच निघाला होता.. सिंह लहान होता तेव्हा हा वयोवृद्ध इसम त्याची काळजी घ्यायचा म्हणे.. त्या धीरगंभीर, विक्राळ सिंहाने त्या माणसाला पहिल्या नजरेतच ओळखले म्हणे.. इतक्या वर्षांनी समोर दिसल्यावर त्याला मिठीच मारली.. हे माहित नसणाऱ्या आणि हे दृश्य पाहणाऱ्या माणसांच्या मनात मात्र हे पाहून चर्रर्र झालं.. पण खरंच सिंह आणि गोरिला यांच्यापेक्षा बेभरवशाच्या असणाऱ्या आणि अतिशय हुशार असणाऱ्या पर्वतकाय गाजराजाशी तो माणूस जसा वागला, जसे हातवारे केले, चेहऱ्याच्या जशा मुद्रा केल्या, विशिष्ट आवाज काढले, ते आवाज विशिष्ट लयीत काढले आणि त्यानुसार समोरच्या प्राण्याने त्याला अपेक्षित प्रतिसादही दिले ते पाहून पाहणार्यांची खात्रीच पटली की हे अंदाज पंचे चाललेले नसून ही प्राण्याशी बोलायची भाषा आहे आणि त्याचे विशिष्ट नियम आणि ठोकताळे आहेत. प्रत्येक प्राण्यासाठी हि भाषा वेगळी आहे. विक्रम राजा विस्मयचकित झाला हे पाहून. अमावास्येच्या रात्री चालत असताना घुबडांचे आणि इतर श्वापदांचे आवाज ऐकून तो त्यांचेही आता अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता. वेताळाचे प्रेत ठेवलेले झाड आल्याची खूण समोर एका नागराजने फुस्स करून दिली तेव्हा कुठे राजेसाहेब तंद्रीतून भानावर आले..

"काय राजेसाहेब, प्राण्यांच्या भाषेच्या खोलात शिरताय ते ठीक आहे पण सापाने फणा काढला की तो दंश करू शकतो, जीवाला धोका आहे हे विसरू नका..सावध राहा.. प्राण्यांना समजणारी भाषा, या भाषेतून त्यांना नक्की काय समजतं हा भाग सोडला तरी त्या भाषेतून त्यांच्याकडून आपल्याला हवी असलेली गोष्ट बरोबर करून घेणं हे जसं तुम्ही करता तसं फिजिक्स मध्ये काही आहे कारे? या निर्जीव वस्तू किंवा इलेकट्रोमॅग्नेटिझम च्या पट्ट्यातील ऊर्जेच्या विविध प्रकारांकडून खासकरून विजेकडून किंवा विजेच्या मार्फत आपल्याला हवं ते करून घेण्याची भाषा? बऱ्या बोलानं साध्या सरळ सोप्या भाषेत उत्तर दे.. "

"होय वेताळा, तू म्हटलास ते बरोबरच आहे. प्राण्यांची भाषा हि जशी माणसाने बऱ्याच अंशी प्राण्याकडून आपल्याला हवं ते करून घेण्याची भाषा विकसित केली तशी विविध वस्तू, यंत्रे यांच्याकडून आपल्याला हवे ते करून घेण्याच्याही भाषा माणसाने स्वतः:च्या सोयीच्या दृष्टीने विकसित केल्या आणि अजूनही तो करतोय. या भाषांना ढोबळ मानाने त्या यंत्राकडून काम करून घेण्याची यंत्रभाषा किंवा मशीन लँग्वेज(machine language) असे आपण म्हणू शकतो. यात मशीन च्या भावना जाणून घेणे, व्यक्त होणे ह्याचा संबंध नसून मशीन कडून काम करून घेणे हाच एकमेव हेतू असतो. फिजिक्स मधल्या.."

"थांब थांब एक मिनिट, मशीन लँग्वेज असं काहीतरी कंप्युटर च्या बाबतीत ऐकलंय पण तो तर नंतर विकसित झाला ना?  "

"हो खरंय, पण जेव्हा पासून इलेकट्रोमॅग्नेट आणि त्याद्वारे काही अंतरावर बेल वाजवणं वगैरे सुरु झालं, मशीन द्वारे संदेश पाठवून हवं ते काम करणं सुरु झालं तेव्हा पासून मशीन लँग्वेज चा वापर सुरु झाला असं आपण म्हणू शकतो.. अशा या मशीन लॅंग्वेज मध्ये आपला संदेश पाठवणं आणि तो पलीकडे अगदी दूरवर पोहोचवणं यात अनेक देशोदेशींच्या शास्त्रज्ञांची डोकी खर्च पडत होती पण त्याचा योग्य वापर करून त्याचा मोठा बिजनेस करणारा माणूस म्हणजे सॅम्युएल मोर्स (१७९१-१८७२) हा अमेरिकन चित्रकार -राजकारणी -बिजनेसमॅन आणि म्हणायचंच झालं तर टेलिग्राफ ची पेटंट्स त्याच्या नावावर असल्याने टेलिग्राफ चा जनक.. अर्थातच एडिसन प्रमाणे याच्याही हाताखाली शास्त्रज्ञ काम करत होते आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट नुसार त्यांची  सारी संशोधने मोर्स च्या नावावर जमा होत होती.. यात त्याने जोसेफ हेन्री(१७९७-१८७८) या हाडाच्या शास्त्रज्ञाची नकळत  कशी मदत घेतली आणि त्याला न सांगताच आपली पेटंट्स तयार करून कसा बिजनेस सुरु केला.. हे कळल्यावर जोसेफ हेन्रीने कशा केसेस टाकल्या, हेन्रीला कायदेशीर लढाईत कसं अपयश आलं, आपल्या उदार प्रवृत्तीचा हेन्रीला कसा पश्चाताप झाला या कहाण्या सुरस आणि चमत्कारिक आहेत असो. पण सॅम्युएल मोर्स ने टेलिग्राफ यशस्वीपणे पलीकडे पाठवण्यासाठी तो टेलिग्राफ बटणं दाबून पलीकडे कागदावर कसा छापला जाईल आणि योग्य तो संदेश पलीकडे कळेल यासाठीची भाषा तयार केली आणि त्यासाठीची माणसं एकत्र आणली..याचं श्रेय त्याला द्यावंच लागेल"

"हो, राजकारण्यां  प्रमाणेच संशोधकांमध्येही असे चकवा -चकवी, दुसऱ्याचे श्रेय लाटणे असे प्रकार जाणते - अजाणतेपणाने चालू राहतात हे लक्षात आलं. पण हेन्री साहेबांनी आपल्या घरापर्यंत वायर टाकून बेल दाबण्याची किमया साध्य केल्या पासून या मोर्स साहेबांनी हि टेलिग्राफ ची 'कट्ट - कडकट्ट' ची डॅश आणि डॉट ची भाषा तयार करण्याची भाषा तयार कारण्यापर्यंतचा प्रवास झाला तरी कसा? मोर्स साहेबांना हे का करावंसं वाटलं? साधारण याच दरम्यान १८५७ चे पहिले स्वातंत्र्य युद्धही भारतात झाले.. तेव्हा ब्रिटिशांनी त्यात ईस्ट इंडिया कंपनीने या जलद संदेश वाहनाचाच उपयोग बंड मोडून काढण्यासाठी केला होता का? १८५४ सालीच कोलकात्यापासून आग्र्यापर्यंत पहिली टेलिग्राफ लाईन टाकली होती म्हणतात.. त्याचा उपयॊग, त्या जलद संदेश वहनाचा उपयोग त्यांना झालाच असणार.. ज्याच्याकडे अधिक चांगली टेक्नॉलॉजी त्याची युद्ध जिंकण्याची शक्यता जास्त.. असो तर सांग पुढे.. "

"होय वेताळा, सांगतो. सॅम्युएल मोर्स हा एक हाडाचा चित्रकार, अतिशयच उत्तम चित्रकार, खासकरून मोठमोठ्या राजेलोकांची, अमीर उमरावांची पोर्ट्रेट्स बनवण्यात तर त्याचा फारच हातखंडा होता आणि त्या कामात त्याने मोठे नाव कमावले होते, पैसा आणि मान -मरातब कमावला होता. युरोपातल्या देशोदेशांतून त्याला हि पोर्ट्रेटस बनवण्यासाठी बोलावणी येत त्यासाठी अनेक वेळा तो अमेरिकेतून युरोपात जात असे. युरोपातील मिकेलँजिलो इत्यादी मध्ययुगीन चित्रकारांप्रमाणेच आपणही एक महान चित्रकार आहोत असे त्याला वाटे, चित्रकलेचा तो सुवर्णकाळ परत आणला पाहिजे असे त्याला मनापासून वाटे. अशाच एका प्रवासात तो अमेरिकेतच  असताना त्याची गर्भवती पत्नी अमेरिकेतच दुसऱ्या ठिकाणी  प्रसूती दरम्यान मरण पावली पण याला पत्र हातात पडेपर्यंत ती माहिती मिळालीच नाही. कळल्यावर खूप उशीर झाला होता. या घटनेचा त्याच्या मनावर फार खोल परिणाम झाला. तो ज्या पंथाचा होता त्याशिवाय इतर पंथीयांचे युरोपातून अमेरिकेत येणारे जथ्थे च्या जत्थे त्याला अमेरिकेत नकोसे वाटू लागले. त्यांच्या देवाविषयीच्या भाबड्या कल्पना त्याला अजिबातच आवडत नसत. त्यांनी अमेरिकेत येऊच नये असे तो म्हणे. शिवाय अमेरिकेत कृष्णवर्णीयांविरुद्ध भेदभाव तर होताच होता. त्यामुळे या सगळ्या नकोशा लोकांना न कळता केवळ आपल्याच पंथाच्या लोंकांमध्ये आपल्याला संदेश पाठवता येतील का आणि त्यासाठी या विजेचा उपयोग करून संदेश पाठवण्याची काही सांकेतिक भाषा विकसित करता येईल का असा विचार त्याच्या मनात डोकावू लागला. तसा तो गडगंज श्रीमंत होताच, मोठ्यांच्यात उठ -बस होती आणि त्यामुळे आपल्याला हवी तशी सिस्टीम आणि भाषा तयार करणारी माणसे जमा करण्यात आणि आपले उद्दिष्ट साध्य करण्यात तो यशस्वी झाला.. "

"ते ठीक आहे विक्रमा, पण त्याने हि भाषा विकसित केली कशी? कार्य सिद्धीला नेलं कसं?  "

"त्याचं असं झालं की मोर्स हा काही टेक्निकल माणूस नव्हता त्यामुळे त्याने ओळखीपाळखी मध्ये या विषयी विचारणा केली आणि त्यातून त्याला कळलं की इलेक्ट्रोमेग्नेट्स चा वापर करून इंग्लंड मध्ये विल्यम स्टर्जन आणि अमेरिकेत हेन्री ने अनेक प्रयोग केले आहेत. हेन्रीने तर बेल दाबून साधा सोपा संदेश एक मैलभर अंतरावर पाठवणे सुद्धा साध्य केले आहे. पण आता या पुढची पायरी म्हणजे काही विशिष्ट संदेश म्हणजे वाक्ये कशी पाठवावीत याचा विचार सुरु केला. इकडून सर्किट पूर्ण  केले तर तिकडे बेल वाजते हा एक भाग झाला. पण इकडे सर्किट पूर्ण केले तर त्यातून तिकडे दुसरे सर्किट चालू कसे करता येईल आणि त्यातून दुसरीकडे केवळ बेल दाबणे यापेक्षाही काही अधिक कसे करता येईल असा काहीतरी विचार करावा लागेल असे त्यांच्या लक्षात आले.  मोर्स ला स्वतःचे असे शास्त्रशाखेचे शिक्षण नसल्याने त्याने लिओनार्ड गेल (Leonard Gale) या शिक्षकाची मदत घेतली. लिओनार्ड हा जोसेफ हेन्री चा मित्र असल्याने त्याने हेन्रीचे साहित्य आणि संशोधन वाचले होते. हेन्रीने दूरवरून बटन दाबून काही अंतरावर दुसऱ्या बॅटरीच्या साहाय्याने २००० पौंड वजन उचलायचा प्रयोग करून दाखवला होता. आपल्याला हवा असलेला स्विच (electromagnetic switch) हाच आहे हे त्याच्या लक्षात आले. मोर्स ने अल्फ्रेड वेल (Alfred Vail) नावाच्या हुशार तंत्रज्ञालाही आपल्या कामावर नेमले होते. गेल आणि वेल या दोन तंत्रज्ञांनी जोसेफ हेन्रीच्या प्रयोगांचा आधार घेऊन आपला एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्विच तयार केला. त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले (electromagnetic relay) असे नाव दिले.. "

"अरे विक्रमा रिले तर असे शर्यतींमध्ये पळतात ना रे? म्हणजे जागोजाग असे रनर्स बसलेले असतात.. मागचा त्याचे बॅटन घेऊन पळत येतो आणि काही अंतरावर बसलेल्या पुढच्याला देतो.. मग पुढचा पळत सुटतो..तेच ना ? मग या सर्किट मध्ये कोण पळतंय बॅटन घेऊन?"

"वेताळा तू ग्रेट आहेस..फार भारी प्रश्न विचारतोस.. या सर्किट मध्ये मूळ ठिकाणी बटन दाबले कि सर्किट पूर्ण होते. तारेत प्रवाह वाहतो आणि काही अंतरावर जातो. तिथे या विजेच्या प्रवाहामुळे पुन्हा विद्युत चुंबकीय परिणाम तयार होतो. तिथेही लोखंडाचा खटका या मॅग्नेटिसम मुळे दुसऱ्या लोखंडावर आदळतो. मग हे झाल्यावर त्या खटक्यामुळे तिथले सर्किट पूर्ण होते. मग त्या सर्किट मध्ये प्रवाह वाहतो. आल्फ्रेड वेल ने अशी यंत्रणा सिद्ध केली कि समजा दूरवरच्या बटनाने थोडाच वेळ बटन दाबले की इकडे कागदावर ठिपका(Dot) उमटेल आणि दूरवर जास्त वेळ बटन दाबून ठेवले कि इकडे कागदावर डॅश(Dash) उमटेल. वेलने असे कागदाचे रिळच जोडले. त्यामुळे दूरवर जितका वेळ बटन दाबले जाते त्याप्रमाणे इकडे डॉट -डॅश - डॉट-डॅश असा पॅटर्न छापला जाई. "

"अरे विक्रमा पण याला काय अर्थ आहे? अशी चित्र विचित्र चिन्हांची पट्टी छापून काय कळणार समोरच्याला? काय साध्य होतं अशी छपाई करून?इतकी मशिनरी तयार करून, इतके संशोधन करून फक्त एवढेच पलीकडे पाठवले?"

"इथेच मोर्स ची बुद्धिमत्ता महत्वाची ठरली. तसं पाहायला गेलं तर इंग्रजी मध्ये २६ अक्षरेमग काहींनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी २६वायर मार्फत संदेश पाठवण्याचा प्रयोग केला होता. पण असे प्रकार फारच महागाचे होत होते. असे करण्यापेक्षा मोर्स ने डॅश (dash) आणि डॉट (dot) यांच्या विविध जोड्या करून त्यांना विविध इंग्रजी अक्षरे नेमून दिली. म्हणजे आधी एक डॉट आणि मग एक डॅश असं असेल(. -) तर तो A, एक डॅश आणि तीन डॉट्स (-. . . ) असं असेल तर तो B असं साऱ्या २६ इंग्रजी अक्षरांसाठी त्याने सांकेतिक लिपी तयार केली आणि ती त्या लिपीची माहिती पाठवणाऱ्याला(sender) आणि ती स्वीकारणाऱ्याला (receiver) असेल अशी सोय केली.

त्यामुळे एकाच वायरमध्ये काम झालं. मोर्स ने त्याच्या राजकीय ओळखीचा वापर करून अमेरिकेतील बाल्टिमोर पासून वॉशिंग्टन पर्यंत टेलिग्राफ लाईन टाकण्यासाठी ३०,००० डॉलर्स चा निधी सरकारकडून मंजूर करून घेतला आणि २४मे १८४४ साली वॉशिंग्टन मध्ये बसून मोर्स ने बाल्टिमोर मध्ये बसलेल्या वेल ला खालील संदेश टेलिग्राफ मार्फत पाठवला.. "WHAT HATH GOD WROUGHT "..त्यासाठीचे डॉट आणि डॅश यांची किती मोठी लांबड लावावी लागली असेल ती कल्पना केलेली बरी..पण यातून अमेरिकेत अश्या टेलिग्राफ लाईन टाकायची एकच स्पर्धा सुरु झाली.. मोर्स ला श्रीमंतीचा लाभ झाला आणि त्याबरोबरच त्याच्या तथाकथित शोधांवर कोर्ट केसेस टाकून त्याच्याकडून आपली तुंबडी भरून घेण्याचीही चढाओढ अमेरिकेतल्या राज्याराज्यांमध्ये सुरु झाली.. जोसेफ हेन्रीनेही मोर्स च्या विरोधात कोर्ट केसेस मध्ये सहभाग घेतला.. हेन्रीला मोर्सकडून पैसे नको होते पण त्याने ज्या पद्धतीने सारे श्रेय स्वतः च्या नावावर लाटले त्याने हेन्री नाराज झाला.. इतका की त्याच्या शेवटच्या दिवसात तो म्हणाला होता कि देवाने हे आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याची संधी दिली तर मी नक्कीच माझ्या नावावर जास्तीत जास्त पेटंट्स घेतली असती. आल्फ्रेड वेलनेही त्याच्या कॉन्ट्रॅक्ट खातर आणि टेलिग्राफ च्या कामाच्या आवडीमुळे भरपूर संशोधन केले, खूप सुधारणा केल्या, पण सारी पेटंट्स मोर्सच्याच नावावर गेली. मोर्स शी असलेल्या मैत्रीखातर त्याने फारशी तक्रार केली नाही पण याची मोर्स ने काहीच किंमत ठेवली नाही हे लक्षात येऊन त्यानेही नंतर नंतर टेलिग्राफ ला अलविदा केले. मोर्सने बक्कळ पैसा कमावला,  राजकारणात गेला तर हेन्री साहेबांनी स्मिथसोनियन संस्थेची (Smithsonian Institute) ची स्थापना केली.   "

"विक्रमा हि   नंतर ची कहाणी सांगितलीस पण जेव्हा मोर्स ने त्याच्या संदेशात "WHAT HATH GOD WROUGHT " असे जे काही लिहिले ते या तारेतून कसे गेले? म्हणजे आपण जे सुरुवातीला मशीनची भाषा वगैरे बोललो त्या संदर्भात मी विचारतोय कि हे सगळे त्या वायर मधून कसं गेलं? माझ्या डोळ्यासमोर काहीच त्याचं चित्र उभं राहत नाही बघ.. "

"बरोबर आहे वेताळा तुझा प्रश्न.. हे पहा की मोर्स ने यातल्या प्रत्येक अक्षरासाठी मोर्स ने काही डॉट्स आणि डॅश चा क्रम ठरवला होता.. आता what या शब्दात w साठी . - - असे तीन वेळा बटन दाबले h साठी . . . . असे चार वेळा a साठी . - असे दोन वेळा t साठी - असे एकदाच असे what या शब्दासाठी १० वेळा सर्किट पूर्ण झाले पाठवणाऱ्या कडचे.. म्हणजे १० वेळा पाठवणाऱ्या कडून स्वीकारणाऱ्याकडे जाणाऱ्या सर्किट मध्ये इलेक्ट्रॉन वहन झाले.. तितक्या वेळा तो प्रभार वाहिला.. त्या वायरला एवढेच कळले की १० वेळा तिच्यातून प्रवाह या शब्दासाठी वाहिला.. तितक्या वेळा त्या विद्युत पातळीतील फरकातून (electric potential difference or voltage) मधून प्रवाह वाहिला.. तितक्या मिली - मायक्रोसेकंदांसाठी वाहिला.. पण मजा म्हणजे विद्युतप्रवाह कसा वाहतो.. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डच त्या तारेतून प्रकाशाच्या वेगाने तितक्या वेळा  कसे जाते याचा उलगडा मॅकसवेल ने यानंतर २० वर्षांनी म्हणजे १८६४ साली गणिती स्वरूपात केला.. "

"अच्छा म्हणजे पहिल्यांदा टेलिग्राफ पाठवणे सुरु झाले आणि मग तो नक्की कसा जातो हे सावकाश कळत गेले.. उपयोग होणे महत्वाचे नाही कळलं तरी काय फरक पडतो बऱ्याच जणांना.. फायदा काढणे, कुरघोडी करणे, श्रेय घेणे यांसाठी माणसांमध्ये जास्त स्पर्धा.. समजून घेण्याचा प्रयत्न करणारा आणि ते समजलेले गणिताच्या रूपात मांडू शकणारा मॅक्सवेल हा म्हणूनच एक असामान्य प्रतिभेचा शास्त्रज्ञ ठरतो.. पण त्याचे गणितच न कळल्याने तो तसा दुर्लक्षितच राहतो.. पण काय रे विक्रमा या टेलिग्राफ लाईन एका देशातून दुसऱ्या देशापर्यंत टाकताना माणसांनी अनेक कारनामे केले म्हणे..लाखो करोडो रुपयांचा तर अक्षरश: चुराडा झाला होता असे ऐकतो, समुद्रातल्या टेलिग्राफ लाईन तर जळल्या आणि ठप्पही झाल्या म्हणे.. त्यालाच समांतर असे तारेशिवाय मेसेज पाठवण्याचाही लोक प्रयत्न करत होते म्हणे.. खरंच अशा गोष्टी सांगण्यापेक्षा तू काय हे डॉट -डॅश वगैरेचे आख्यान लावून बसलास? जरा नवीन माहिती घेकी आणि दे मला.. किती दिवस ते जुनं जुनं सांगत बसणार? रेडिओ कसे सुरु झाले लांबवर प्रक्षेपण कसे करू लागले हे सांग की जरा.. चल आता मला उशीर झाला.. पण पुढच्या वेळी नवीन माहिती दे.. नाहीतर तुझी खैर नाही.. येतो मी विक्रमा.. हाs हाss हाsss"

(क्रमश:)

विजेची गोष्ट ६: विद्युतचुंबकीय क्षेत्राचे पणजोबा जेम्स क्लार्क मॅक्सवेल आणि विजेच्या तारेतून संदेश पाठवण्याची नवीन कला (Electromagnetic Fields, James Clerk Maxwell, and Beginning of Telecommunication)
विजेची गोष्ट ५: टेस्ला – विजेचा सुपुत्र आणि आधुनिक जगाचा इलेक्ट्रिक चालक (War of Currents ends with Tesla’s Electric Genius) 

विजेच्या गोष्टी
Graduate and Engineering Physics
मुखपृष्ठ