चिरकुट मुलगी--१

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
23 May 2022 - 9:09 pm

चिरकुट मुलगी--१
राजकुमारी वेणू ह्यांच्या कृपेने श्री भानगौडा गोपालगौडा पाटील (माननीय सदस्य “भारत इतिहास संशोधन मंडळ” पुणे) ह्यांची विविचे(विचित्र विश्व) “दरबारी इतिहासकार” म्हणून नेमणूक झाली. विचित्र विश्वची समग्र बखर लिहायची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. राजकुमारीच्या आदेशानुसार श्री भागो ह्यांनी विविच्या चित्र विचित्र लोकांबद्दल, तिथल्या जादूगिरीबद्दल सहा खंडात अनेक कथा (खर तर जसे घडले तसे) लिहिल्या. पुण्याच्या काही छिद्रान्वेशी इतिहासतज्ञांनी त्या परीकथा आहेत अशी भलावणी करून त्यांना उडवून लावल्या. “परीकथा म्हणजे इतिहास नव्हे” “ह्या कथा लहान मुलांसाठी म्हणून ठीSSSSSक आहेत.” असे त्यांचे एकूण म्हणणे होते. काहीही असो पण तमाम महाराष्ट्राच्या विशेषतः पुण्याच्या बालचमूच्या हृदयात ह्या कथांनी प्रेमाचे स्थान पटकावले. “हरी पुत्तर” च्या कथा नंतर विविच्या कथांनी बालमनावर अशी भुरळ टाकली. एक गमतीची गोष्ट सांगतो कि मोठे बापे आणि काकू आजी हे पण ह्या कथा चुपचाप गुपचूप वाचतात. पण चार चौघात हे मान्य करायची त्यांची तयारी नसते.
पुण्यात झालेल्या वादावादीची बातमी अखेर विविच्या महाराणी बाईसाहेबापर्यंत पोहोचली. पुणे काय चीज आहे हे बिचाऱ्या राणीसाहेबांना कसं माहित असणार? राणीसाहेबांचा मूड खराब झाला. दरबारीजनांनी राणीसाहेबांना समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला कि पुण्याच्या असल्या उचापतींकडे पुण्याच्या एक दोन पेठातील हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक सोडले तर इतरेजनांचे लक्ष नसते. पुण्याचे लोक घराघरातून सॉफ्टवेअरच्या कॉप्यूटर भट्ट्या लावण्यात पटाईत म्हणून जगप्रसिद्ध आहेत. ते आपल्या कामात रात्रंदिवस बिझी असतात. ते असल्या गोष्टीत काय म्हणून लक्ष घालतील? तर त्याकडे इग्नोरास्त्र वापरणे उचित. इत्यादी इत्यादी.
पण नाही. राणीसाहेबांनी जादू करून विवि अदृश्य करून टाकले. जगाचा विवीशी असणारा संपर्क तोडून टाकला. विवीची नाकेबंदी करून टाकली. पूर्वी एकदा जगात कोविड साथ आली होती तेव्हाही अशीच नाकेबंदी करण्यात आली होती. विवि जगाच्या नकाशावरून, गुगल मॅपवरून देखील गायब झाले. भागो पाटीलांचा संपर्क तुटला. त्याला ते तरी काय करणार? पुढच्या गोष्टी कशा लिहिणार? त्यांनाही काही सुचेना.
आपल्याला विविच्या कथा वाचायला मिळणार नाहीत? लहान मुले निराश झाली. मोठी माणसे गुपचूप निराश झाली. ओफिसांत बॅासशी किंवा सहकाऱ्यांबरोबर खटखट झाली किंवा स्वत्वाला कुत्रे चावले तर किंवा इतर तत्सम अश्या गोष्टींनी क्षुब्ध झालेल्या मनाला उतारा म्हणून मोठी माणसे विविच्या कथा वाचत असतात.
त्यांनी आता काय करावे? ट्विटरवर एकाने सुचवले कि चला आपण भागोवर इमेलचा मारा करूया. त्याच एकाने मेलचा मजकूर बनवून दिला. मग काय इमेल फुक्कट असल्याने सर्वांनी कॉपी पेस्ट करून भागोला धडाधड धाडून दिल्या. बिचाऱ्या भागोची इमेल पेटी दुथडी भरून वाहू लागली.
एका हुशार मुलीने मात्र चाकोरीबाहेर जाऊन विचार केला. परिस्तिथीवर मात करण्याची युक्ति शोधून काढली.
(अवांतर---- “एका हुशार मुलीने” ?----मी तुम्हाला सांगतो, खरोखर मुली खूप हुशार असतात हो. लॉंग हेअर, शॉर्ट ब्रेन अशी हिणवणी करणाऱ्या लोकांनी हे ध्यानात ठेवायला पाहिजे). असो.
तिने लिहिले, “मत्प्रिय भागोजी, का नाही आपण राजकुमारीशी मोबाईलवर संपर्क करू शकत? मोबाईलच्या अति तीव्र लहरी विविच्या सुरक्षाकवचाला भेदू शकतील अस माझे मन मला सांगतेय. नाही म्हणू नका. प्रयत्न करायला काय हरकत आहे? भागोजी, बी+!”
भागोनेही प्रयत्न करायचे ठरवले. आणि अहो आश्चर्यम्! फोन लागला! राजकुमारी वेणूशी गप्पागोष्टी झाल्या. परिणामस्वरूप भागोने ही “चिरकुट मुलगी” कथा लिहिली.
(खर पाहीलेतर VHF, UHF. X-RAY. GAMA-RAY, COSMIC-RAY विविच्या सुरक्षाकवचाला भेदू शकत नाहीत. सुरक्षाकवच भेदले गेले ते मुलांच्या इच्छाशक्तीमुळे. त्यामुळेच केवळ भागो आणि राजकुमारी ह्यांच्यात संपर्क होऊ शकला. त्यामुळेच विविच्या महाराणी बाईसाहेबांचे हृदयपरिवर्तन झाले व त्यांनी हे वन टाईम एक्सेप्शन सूट दिली. फक्त भागो आणि राजकुमारीसाठी.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की राणीसाहेबांना हे समजले तरी कसं? उत्तर अगदी सोप्प आहे. राणीसाहेबांच्या महालात एक मोठ्ठं रजिस्टर आहे. त्यात जगात घडणाऱ्या घटनांची नोंद केली जाते. जसं आपल्या हृदयाच्या जरा डाव्या बाजूला चित्रगुप्त बसलेला असतो. तो आपल्या चांगल्या वाईटाची नोंद करत असतो. विचित्र विश्वचे इंजिनिअर ह्याला distributed processing असं म्हणतात. विवीच्या पद्धतीला ते central processing पद्धत म्हणतात. इकडे राणीसाहेब दररोज सकाळी ह्या नोंदी स्वतः बघतात. विचित्र विश्वावर येणाऱ्या संकटांची चाहूल त्यांना आधीच लागते. त्यावर उपाययोजना करायला मग सोपं पडतं.
ते पहा. पुण्याच्या त्या बैलोबा बबडूने फुलपाखराचे पंख उपटून टाकले. झाली त्याची नोंद इकडे. आता बबडूला विविचा व्हिसा कधीच मिळणार नाहीये. त्याचे नाव काळ्या यादीत गेले आहे. आता मी हे लिहितो आहे आणि तुम्ही ते वाचाल, बरा वाईट प्रतिसाद द्याल. हे सगळे त्या रजिस्टरमध्ये नोंदले जाणार आहे ह्याची जाणीव ठेवा.
हे एवढे नमन पुरे आहे. अस नको व्हायला की नमनालाच घडाभर तेल,
“चिरकुट मुलगी” लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

Frank Baum ह्यांच्या Patchwork Girl ह्या कथेचे स्वैर, मनःपूतम् मराठी रुपांतर.

कथाबालकथा

प्रतिक्रिया

सुखी's picture

24 May 2022 - 6:31 am | सुखी

हे हे मस्त लिहिलंय

भागो's picture

24 May 2022 - 8:24 am | भागो

अरेरे,काय तुमचे मराठी.
'परिस्तिथी' नाही भागो 'परिस्थिती' असा शब्द आहे.