सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

अनुभवातील व्यक्ति, प्रकृती आणि प्रवृत्ती -१

Primary tabs

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
2 May 2022 - 6:35 pm

मनुष्य स्वभावाचे बरेच अजब नमुने निमसरकारी नोकरीत असताना पहायला आणि अनुभवायला मिळाले. भले, बुरे, खरे, ढोंगी, सरळ, वाकडे, वेडे, झपाटलेले ! काहीना काही आठवणी, ठसे मनात ठेवून गेलेले. त्यातल्या काहींची मनाने जपलेली नोंद इथे नोंदवण्याचा हा प्रयत्न .
उमेदवारीच्या पहिल्या काही वर्षात क्षेत्रीय कामाचा अनुभव घेतला तेव्हा ग्राहकांशी थेट संबंध आलेला. त्यामुळे लोकसंपर्काच्या कळी माहिती झालेल्या. काही अधिकारी याबाबतीत वरचढ. तोंडावरची रेघही हलू न देता ग्राहकांना धादांत खोटी माहिती किंवा आश्वासने देऊन कसे रस्त्याला लावायचे हे यांच्याकडून शिकावे. हातात कागद धरुन त्यावर नसलेला मजकूर धडाधडा वाचून समोर बसलेल्या ग्राहकांच्या तोंडावर मारणे हे तो दैवी कौशल्य ! हा गुण यांचा हातखंडा. पण असे धडधडीत खोटे सांगणे आमच्या सारख्यांना कधी जमले नाही. सुदैवाने म्हणा किंवा कामातील अचूकपणामुळे म्हणा, माझ्यावर असे खोटे बोलण्याची वेळ कधीच आली नाही.
पण सगळेच अधिकारी असे 'कुशल' नसत. बरेच वेळा लोकसंपर्क अजिबात नसलेले अधिकारी आणि सहकारी यांच्यासोबतही काम करण्याची वेळ आली. त्यातला हा एक अनुभव.
जिल्हा कार्यालयात काम करण्याची प्रथमच संधी मिळाली आणि आता बरंच नवीन नवीन काही शिकायला मिळणार म्हणून मी खुशीत. त्यात मुख्य अभियंता म्हणून नुकतेच गायधनीसाहेब रुजू झालेले. मोठा कडक शिस्तीचा आणि विद्वान अधिकारी म्हणून खालच्या कार्यालयांकडून नावाजलेले. इथे येण्यापूर्वी अकार्यक्षम म्हणून कितीजणांना त्यांनी कसकशा नोटिसा काढल्या आणि किती कामचुकारांना सस्पेन्शनखाली वर्षभर घरी बसवले याच्या रसभरीत कथा रोज ऐकायला मिळत.

असे हे गायधनी साहेब कार्यालयात रुजू झाले आणि हापिसकरी मंडळीत मोठी गडबड उडाली. कार्यालयात बिनकामा’च्या उगाचच चकरा मारणारे हवशे, गवशे, नवशे एकदम गायब झाले. दिवसातून किमान दहा वेळा चहा, तंबाखू इत्यादि यज्ञ कार्या साठी आसन त्याग करणारे कार्यालयीन ऋषि मुनि आता दिवसभर आसनातच ध्यान लावून बसू लागले. जेवणाच्या सुट्टीत ही साहेब केबिनीत आहेत का गेले ही बघून मगच आसन मोडू लागले.
साहेबांना जराही चूक चालत नसे. एरव्ही आपल्या केरळा ब्रॅंड शुद्ध इंग्रजीच्या मापाने अभियंते लोकांच्या ड्राफ्ट मधल्या चुका काढणाऱ्या नायडू स्टेनोच्याही सात स्पेलिंग मिष्टेका साहेबाने एक दिवसांत काढल्यावर नायडू चे सदा वर असलेले नाक एकदम हनुवटीवर लटकू लागले आणि सगळे एकदम क्यालिब्रेटेड झाले. एरव्ही चुकार पाखरा सारखे सहीला आत जाणारे सुट्टे पेपर आता मेण्यांत बसलेल्या दुल्हन सारखे शिस्तीत पोर्टफोलियोत बसून साहेबाच्या केबिनीत जाऊ लागले.
देवा शिपायाला साक्षात देवापेक्षाही जास्त भाव आला. साहेबाचे तान मान ताल मूड समजून घेऊन मगच कामासाठी आत जायचे तर ‘देवा’ ची आरती आधी करायलाच हवी ना ! दक्षिणे सहित !
त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट एवढीच की सहीच्या दक्षिणेचं या साहेबाला वावडं नव्हतं. साहेब हजर झाल्याच्या पाचव्या दिवशी देवानं ही सु (?)वार्ता देताच कार्यालयातल्या ‘खाऊ’प्रिय मंडळींचे आणि कंत्राटदार लोकांचे जीव भांड्यात पडले !
गायधनी साहेबांचं आजवरचं कार्यालयीन जीवन जरी उपकेंद्र आणि मशिनी यांच्या सहवासात जास्त करून गेलं होतं तरी कार्यालयीन सत्ता काबिज करून त्यावर कमांड मिळवायला त्यांना जेमतेम दोन महीने लागले. एक गोष्ट सोडून ! माणसांपेक्षा मशिनीचीच जास्त सवय असल्याने ग्राहक भांडत आले की त्यांची दांतखिळ बसायची. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या कक्षात जवळ जवळ मज्जावच असे. अगदीच अटीतटीचा प्रसंग आला तर साहेबजी हाताखालच्या दोन अधिकाऱ्यांना ढाली सारखे डावी-उजवीकडे बसवीत आणि कागदाच्या ढिगाऱ्यांत तोंड लपवून हो ला हो करीत.
त्या दिवशी शेतकऱ्यांचा मोर्चा येणार होता. पोलिस बंदोबस्त होताच. शेतकऱ्यांना राजकीय पाठबळ मिळालं असल्याने चारेकशे लोक गेट बाहेर जमले होते. वातावरण निर्मिती म्हणून मसालेदार झणझणीत निषेध-घोषणा सकाळपासूनच सुरू होत्या. मोर्चा टाळण्यासाठी खरं तर साहेबानी शक्कल लढवून उपकेंद्र व्हिजिट ठरवली होती. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यास तुम्ही जातीने हजर रहा असा फतवा काढल्याने गायधनी साहेबांचा नाईलाज झाला. डावीकडे दोघांना आणि उजवीकडे तिघांना बसवून साहेब अस्वस्थ पणे खुर्चीवर विराजमान झाले होते. समोर कागदांचा ढीग. एकावर पण सही नाही झाली अजून. उगाचच दोन घोट पाणी पी, फ्यान चा स्पीड वाढवायला सांग , पेन हातातून पेन स्टँडात आणि पेन स्टँडातून पुन्हा हातात असे चाळे चालले होते. देवा बाहेर येऊन कॉमेंट्री सांगत होता. आम्ही सगळे आपापल्या जागेवर बसून ती एंजॉय करत होतो.
कार्यालयात बसून बाहेरच्या लाऊड स्पीकर वरच्या घोषणा ऐकून ऐकून सगळ्यांचे कान किटून गेले. आता पुढारी लोकांची भाषणे सुरू झाली होती.
दुपार उलटली. कर्मचाऱ्यांनी जागेवर बसूनच डबे खाल्ले. साहेब घरी जायचे जेवायला. आज गेट अडवून धरल्यामुळे त्यांच्या पोटात कावळे ओरडू लागले होते. निवेदन घेऊन कोणीच का आत येईना म्हणून साहेबांनी अखेर एक पोलिसाला आत बोलावले आणि बाहेर काय चालले आहे ते बघून यायला सांगितले. दहा मिनिटांनी पोलिसाने येऊन सांगितले की मोर्चेकऱ्यांचे असे म्हणणे आहे की साहेब मजकूर यांनी स्वत:च गेट मध्ये यावे आणि पत्रकारांच्या समक्ष निवेदन स्वीकारावे.
बाबौ ! चारशे लोकांच्या समोर जाऊन निवेदन घ्यायचे ! साहेबांना घाम फुटला. हो, एरव्ही चारशे कर्मचाऱ्यांना भाषण ठोकणे वेगळे आणि मोर्च्याला सामोरे जाणे वेगळे ! कुणीतरी काही विचारले, बोलले तर काय सांगायचे ? पोलिस असले तरी ते मागे. पुढे आपणच की ! लावलीन एखाद्याने झापड तर पोलिस राहतील मागे. आपलं काय ! साहेबांचा चेहेरा बघून दाये बाये वाल्यांनाच अखेर दया आली. दोन्ही बाजू त्यांनी ढालीसारख्या कव्हर केल्या . मागे देवा देवासारखा पाठीराखा म्हणून उभा राहिला. त्याच्या मागे चार पोलिस.
अशी ही वरात खिडक्या खिडक्यांमधून डोकावत असलेल्या हापिसकऱ्यांच्या साक्षीने पॅसेजमधून, जिना उतरून पोर्च पार करुन शनै शनै गेटपर्यंत आली. गेट समोर असलेला चारशे जणांचा मॉब, ते लाऊडस्पीकर , त्या घोषणा आणि फटर्र फटर्र मोटर सायकली घुमवणारी तालमीतली पोरं बघून साहेबाचं काळीज लकलक करू लागलं. त्यांनी एकदा डावीकडे नी एकदा उजवीकडे मान करून बघितले आणि काही कळायच्या आतच एकदम एकशेऐंशी डिग्री मध्ये घुमजाव केले. सोबतच्या लोकांना काही कळायच्या आत साहेब परत पोर्च मध्ये. देवा आणि बाकीचे जाऊन त्यांना समजावून सांगू लागेपर्यंत ते जिन्याच्या पायऱ्या चढून हापिसच्या दारात आलेसुद्धा. मोठ्या मुश्किलीनं साथीदार आणि पोलिस यांनी त्यांना समजावून अभय देऊन पुन्हा एकदा मोर्च्याला सामोरं जायला तयार केलं.
पुन्हा मिरवणूक गेटपर्यन्त गेली. लटलट कापत असलेला हात गेटच्या गजांमधून बाहेर काढून साहेबांनी निवेदन हातात देण्यास सांगितले. तथापि पुढाऱ्यांचे भाषण अद्याप संपले नसल्याने त्यांनी तसे करण्यास नम्र नकार दिला. आता साहेब समोर असल्याने त्यांच्या जिभेवर वाग्देवता सरस्वती भरतनाट्यम करू लागली. शेतकऱ्यांच्या वर वीज कंपनी करत असलेल्या अन्यायाचे रसभरीत वर्णन सुमारे वीस मिनिटे केल्यानंतर ती शांत झाली. तोपर्यंत साहेब ‘देगा उसका भी भला और ना देगा उसका भी ..’ अशा स्टायलीत हात पसरून उभे. अर्थात गेटच्या आत. मग मोर्च्यातले पुढारी पुढारी सगळे जमा झाले आणि गेटच्या बाहेर पोज घेऊन उभे राहिले. पत्रकारांनी क्यामेरे गेटवर रोखले. एकदाचं निवेदन साहेबांच्या हातावर पडले. निवेदन हातात पडलं तरी काही जणांचे क्यामेरे अद्याप तयार नसल्याने साहेब अजून हात बाहेर काढूनच उभे होते.
एकदाचं सगळ्यांचं फोटो बिटो घेऊन झालं आणि साहेबांनी हुश्श म्हणून निवेदन सहकाऱ्याकडे दिलं. एवढ्यात एक शेतकाऱ्यानं आणखी एक लहानसा बॉक्स पुढे केला.
‘ओ साहेब, आमची गरिबाची भेट स्वीकारा की ! लैच्च वाट बघाया लावलीत राव !’ असं म्हणून त्यानं बॉक्स साहेबाच्या हातात दिला. केबिन मध्ये सुखरूप पोचल्यावर निवेदन योग्य मार्गी लावल्यावर साहेबांनी सगळ्यांना बाहेर पिटाळलं. भेट वस्तू स्वत: बघायची सवय त्यामुळे साहेबांनी बॉक्स सहकार्याच्या हातात न देता स्वत:च उघडला.

.. आत एक चिठ्ठी होती असं आम्हाला नंतर समजलं.
शेवटी सगळा मोर्चा पांगल्यावर साहेब मजकूर दोन पोलिस पुढे आणि दोन मागे. मागे बॅग घेऊन देवा आणि पुढे ड्रायव्हर अशा थाटात चोरासारखे मागच्या दरवाज्याने बाहेर पडले, त्यानंतर त्यांचा चेहेरा काही आम्हाला पुन्हा कार्यालयात बघायला मिळाला नाही. त्यांनी रिटायरमेन्टला चारच महिने राहिलेले असतानासुद्धा विदर्भात बदली करून घेतली असे समजले. बदलीपूर्वी राहिलेले काही दिवस सर्व कागद घरीच सह्या करून हापिसात येत होते.
.. त्या बॉक्स मधल्या चिठ्ठीत ‘ शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तुमच्या कार्यालयात आणि केबिनीत आम्ही जिवंत साप सोडणार’ असे लिहिले होते, असे नंतर देवा सांगत होता !
खरे खोटे देव, (किंवा देवा) आणि साहेबच जाणे !!
पण त्यांच्या इतक्या कामात अचूक आणि विद्वान साहेबाच्या हाताखाली पुन्हा काम करायला मिळाले नाही, एवढे खरे !

समाजअनुभव

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

2 May 2022 - 6:51 pm | तुषार काळभोर

अन झक्कास लिव्हलंत!
आठवणीच्या पोतडीतून येणारे असे व्यावसायिक अनुभव वाचायला भारीच वाटतं. अन् त्यात सरकारी काम म्हणजे अजून जोरदार!!

कुमार१'s picture

2 May 2022 - 7:14 pm | कुमार१

छान लिहिले आहे.

प्रमोद देर्देकर's picture

2 May 2022 - 7:18 pm | प्रमोद देर्देकर

बाबो तायडे तब्ब्ल दोन वर्षांनी तुझी लेखणी पाझरली की!
येऊ दे अजून असे भन्नाट किस्से.

ते वीज वितरण संबंधितपण लिही की.

मस्त! अनुभवाधारित लेखन वाचायला आवडते 👍
कुठल्याना कुठल्या राजकीय पक्षाचे प्रवक्ते असल्याच्या थाटात मत प्रदर्शन करणारे काथ्याकुटीय धागे आणि भाषा, धर्म, जात-पात, व्यक्ती अशा बद्दल द्वेष पसरवणाऱ्या धाग्यांचे पेव फुटून मिपा वाळवंट वाटू लागते तेव्हा आलेले असे धागे ओॲसिस सारखे वाटतात.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे!

मुक्त विहारि's picture

3 May 2022 - 9:12 pm | मुक्त विहारि

आवडला ...

फारएन्ड's picture

4 May 2022 - 2:59 am | फारएन्ड

मस्त लिहीले आहे! :)

अजून लिहा तुमचे अनुभव.

लै भारी किस्सा. सरकारी काम अन चार महिने थांब अशातली गत. साहेब इतके घाबरट असतील असं वाटलं नव्हतं.
तुमच्या पोतडीतील अजूनही किस्से येऊ द्यात आणि लिहिते राहा.

वामन देशमुख's picture

4 May 2022 - 8:34 am | वामन देशमुख

छान लिहिलंय.
अजून येऊ द्या.

जबरा लिहिले आहे, मजा आली वाचताना,

साहेबांच्या स्वभावातले बारकावे आणि हापिसातले वातावरण यांच्या डिटेलवार वर्णनाने सगळा प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला.

येउद्या पुढचे भाग लवकर लवकर,

पैजारबुवा,

निनाद's picture

4 May 2022 - 9:18 am | निनाद

मस्त किस्सा! अजूनही किस्से येऊ द्या, आणि हो लिहिते राहा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 May 2022 - 11:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त ! अजुन येऊ द्या कार्यालयातील आठवणी.

-दिलीप बिरुटे

श्रीरंग_जोशी's picture

6 May 2022 - 12:38 am | श्रीरंग_जोशी

गायधनी साहेबांचे व्यक्तिचित्रण, निमसरकारी कार्यालयातले वातावरण अन मोर्चाचे प्रसंगवर्णन एकदम फर्मास आहे.
हा लेख वाचून शंकर पाटलांच्या लेखनाची आठवण झाली.

सुक्या's picture

6 May 2022 - 5:47 am | सुक्या

वाचताना मजा आली....
सरकारी कार्यालयाचे हुबेहुब वर्णन....

जेम्स वांड's picture

7 May 2022 - 6:38 am | जेम्स वांड

त्या ऑफिसचे हे चित्रण असल्यास हुबेहूब सीन डोळ्यापुढे घडल्यागत जाणवले लॉल

सिरुसेरि's picture

7 May 2022 - 11:30 am | सिरुसेरि

मस्त व्यक्ती चित्रण .

स्वराजित's picture

7 May 2022 - 3:05 pm | स्वराजित

खुप छान लेख

नाव बदललंत होय तुम्ही!!!

जबरदस्त चित्रण....!

धन्यवाद!!