तुम मेरे हो

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
29 Dec 2021 - 10:23 am

हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात इच्छाधारी नाग हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. जुन्या ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट नागिनपासून ते आजपर्यंत इच्छाधारी नाग - नागिणींवर अनेक सिनेमे आले. इच्छाधारी नाग - नागिण सिनेमातून टीव्हीच्या चॅनलवरही आले आणि चांगले चार-पाच सीझ्न होईपर्यंत चालले. इतकंच नाही तर अगदी एलओसी ओलांडून पाकिस्तानातही गेले आणि तिथल्या टीव्हीसिरीयलमध्येही हिट झाले. आपल्याकडे वैजयंतीमाला, रीना रॉय यांची इच्छाधारी नागिण हिट झाली खरी पण ती खर्‍या अर्थाने गाजवली ती श्रीदेवीने. नगिनामधली दोन्ही हातांनी फणा काढून आपलं नागपण एस्टॅब्लीश करण्याची अ‍ॅक्शन इतकी हिट झाली की त्यातून श्रीदेवी स्कूल ऑफ स्नेक डान्सिंगचा जन्म झाला. श्रीदेवीची नागिण गाजल्याबरोबर तिच्याबरोबर स्पर्धा म्हणून रेखा, माधवी, डिंपल, मीनाक्षी शेषाद्री इतकंच काय अगदी मनिषा कोईरालानेही इच्छाधारी नागिण होण्याची हौस भागवून घेतली. वास्तविक ढम्मकढोल मनिषा कोईराला नागिण हा खरंतर नागजातीचा घोर अपमान आहे, तिला फारतर अ‍ॅनाकोंडा म्हणता येईल, असो!

नागपटांमध्ये नाग-नागिणीची जोडी असेल तर दोघांपैकी एकजण काहीतरी कारणाने गचकणार हा अलिखित नियम आहे. रीना रॉयच्या नागिनमध्ये नागोबा असलेला जितेंद्र गचकतो तर जानी दुश्मन नामक भयानक सिनेमामध्ये इच्छाधारी अ‍ॅनाकोंडा मनिषा कोईराला आधी नागिण म्हणून गचकते आणि पुनर्जन्मात माणूस म्हणूनही गचकते. त्यानंतर तिचं भूत झालेलं पाहिल्यावर इच्छाधारी नागाचंही भूत होतं हे नवीन ज्ञान मला मिळालं. दोघांपैकी एकजणच नागकुळातला असेल तर बहुतेकदा हिरॉईनच इच्छाधारी नागिण असते कारण वळवळत नाचण्याची सोय करणं सोईचं जातं. वैजयंतीमालाचा नागिन, श्रीदेवीचा नगिना, निगाहे हे सिनेमे या कॅटॅगरीतले. नाचे नागिन गली गली मध्ये हिरो-हिरॉईन नाग-नागिण आहेत पण दोघांपैकी एकाचाही बळी द्यायचा नाही म्हणून मग त्यांची ताटातूट केली जाते. इथे मीनाक्षी शेषाद्रीच्या नागिणीबरोबर नागोबा आहे चक्क नितिश भारद्वाज! आता नितिशभाऊ कुठेही कधीही दिसले आणि कोणत्याही रुपात समोर आले तरी ते श्रीकृष्ण सोडून काही वाटणारच नाहीत ते चक्क नाग? कृष्णजन्मात कालियामर्दन केल्याची ही शिक्षा असावी बहुतेक! आयी मिलन की रात या गुलशन कुमार फॅक्टरीतल्या छळवादात तर तांत्रिक असलेला परेश रावल योग्य वेळेआधी यांची मिलन की रात येवू नये म्हणून दिवसा हिरोला नाग तर रात्री हिरॉईनला नागिण अशी अफलातून व्यवस्था करतो! पण हिरो-हिरॉईन दोघांनाही माणूस दाखवायचं आणि जोडीला इच्छाधारी नागिण पण हवी असेल तर?

'कयामत से कयामत तक' हा १९८८ सालचा सुपरहीट सिनेमा. या सिनेमाबरोबरच आमिर खान आणि जुही चावला यांची जोडी हिट झाली. या दोघांनी त्यानंतर 'हम है राही प्यार के' आणि 'इश्क' हे धमाल सिनेमेही केले. त्याचबरोबर कोणाच्या लक्षातही राहिले नसतील असे लव्ह लव्ह लव्ह, दौलत की जंग, आतंक ही आतंक (याबद्दल लवकरच स्वतंत्रपणे लिहीणार आहे) असे आचरट सिनेमेही या दोघांच्या नावावर आहेत. पण आमिर खानचे तीर्थरुप ताहीर हुसेन यांनी कयामत से कयामत तक मधून हिट झालेली ही जोडी एन्कॅश करायला लव्हस्टोरीला इच्छाधारी नागिणीची फोडणी देत जी काही खिचडी शिजवली होती त्याला तोड नाही! १९९० साली आलेला हा अचाट आणि अतर्क्य सिनेमा होता - तुम मेरे हो!

पण तुम मेरे हो हा टिपीकल नागपट नाही हे इथे मुद्दाम सांगितलं पाहिजे. वर आधीच म्हटल्याप्रमाणे यात हिरो-हिरॉईन या दोघांपैकी एकही जण इच्छाधारी नाग किंवा नागिण नाही. या सिनेमाचं वेगळेपण म्हणाजे इथे इच्छाधारी नागिण आहे ती व्हिलन - खरंतर व्हॅम्प म्हणून!

सिनेमाच्या ओपनिंग शॉटमध्येच आपल्याला एक चमचमणारा प्रकाशमान दगड हा नागमणी म्हणून दाखवला जातो. त्याच्या बाजूला दोन नाग हजर आहेत. आता पहिल्या शॉटमध्येच इच्छाधारी नागाने नागमणी काढून ठेवलेला पाहून त्या नागमण्याच्या प्रकाशात नाग-नागिण मानवी रुपात डॅन्स करणार असं नागपटातलं स्टँडर्ड दृष्य दिसणार अशी माझी अपेक्षा होती, पण इथेच या सिनेमाचं वेगळेपण जाणवलं. नागमणी पाहिल्याबरोबर "ये नागमणी मुझे हासिल करनी है!" असे शब्द कानावर आले. इथे बहुधा व्हिलनची एंट्री होणार आणि हा बहुतेक कोणीतरी मांत्रिक किंवा गारुडी असणार हा विचार करेपर्यंत एका झाडावर चढलेला नॉर्मल ड्रेसमधला सुधीर पांडे दिसला आणि पुन्हा एकदा माझा अंदाज साफ चुकला. त्या झाडावरुन ज्या अचूकपणे दोरीच्या सहाय्याने वजन खाली पाडून हा नागाला चिरडतो त्यावरुन तो आधीपासून त्यांच्यावर पाळत ठेवून असणार यात शंका नाही. पांडेकाका झाडावरुन बघत असतानाच मण्याच्या दुसर्‍या बाजूला असलेली नागिण अचानक मानवी रुपात येते. या नागिणीचं ओरीजनल मानवी रुप बघितल्यावर नागांनाही पूर्वसुकृताप्रमाणे मानवी रुप मिळत असावं अशी माझी पक्की खात्री झाली कारण ही नागिण आहे कल्पना अय्यर! आता कल्पना अय्यार ज्याची इच्छाधारी नागिण आहे तो इच्छाधारी नाग कोण या कल्पनेनेच मला धडकी भरली आणि बिचार्‍याविषयी मनात अतीव भूतदयाही निर्माण झाली, पण बहुतेक एका सीनपुरता का होईना नागिणरुपातल्या कल्पनातैंचा हिरो होण्यासाठी कोणी तयार झालं नसावं! मृत नागाच्या डोळ्यात कल्पनातैना पांडेकाकांचा चेहरा दिसणार आणि त्या त्यांच्या मागे लागणार हा माझा अंदाज पुन्हा एकदा साफ चुकला कारण मृत नागाचे प्रेमभराने मुके घेऊन झाल्यावर स्लो मोशनमध्ये हळूहळू वर बघून मग एकदम अ‍ॅटॅक आल्यागत कल्पनातै हंबरडा फोडतात. इच्छाधारी नागिणीचं एखाद्या चांगल्या हिरॉईनचं रुप दिसण्याऐवजी कल्पना अय्यर असं भयंकर रुपांतर झालेलं पाहून सुधीर पांडेची आधीच टरकलेली असते, त्यात तिची ती भयानक किंकाळी! आप्पा भिंगार्ड्याची भयाकारी शिंक आठवा! पांडेकाका झाडावरुन पडतात आणि पळायला बघतात पण कल्पनातै त्याला गाठतात. ही त्याला डसणार ही आपली अपेक्षा पुन्हा एकदा चुकीची ठरते, का? कारण तो नागमणीवाला मृत नाग तिचा मुलगा होता! हा मात्रं इतके नागपट बघितलेल्या माझ्यासारख्या प्रेक्षकालाही शॉक होता. इच्छाधारी नागांच्या जोड्यांमध्ये, खासकरुन नागमणीवाल्या जोड्यांमध्ये बहुतांशी नवरा-बायकोचीच जोडी असते, आई-मुलाची जोडी असलेला हा एकच सिनेमा असावा. पांडेकाकानी आपल्या मुलाचा बळी घेतल्याने आपण त्यांना न चावता त्यांच्या मुलाला चावणार असं कल्पनातै डिक्लेअर करतात. खून का बदला खून और बच्चे का बदला बच्चा!

पांडेकाकाना प्रॉमिस केल्याप्रमाणे कल्पनातै त्यांच्या मुलाला चावतात. पांडेकाकांच्या बायकोच्या रोलमध्ये आपल्या सुहास जोशी दिसतात! डॉक्टरने "आय अ‍ॅम सॉरी" हा स्टँडर्ड डायलॉग मारल्यावर जोशीबाई कल्पनातैंच्या वरताण नही SSS अशी आरोळी ठोकून धाडकन मुलाच्या अंगावर पडतात. आता चार वर्षांचा मुलगा मरण पावला तर त्याचं दहन केलं गेलं पाहिजे पण तसं केलं तर सिनेमाला हिरोच मिळणार नाही, त्यामुळे इथे महाभारतातली कर्णाची थीम वापरली जाते आणि त्याला ताटीवर झोपवून नदीत सोडून दिलं जातं. हा सोहळा आटपून घरी येणार्‍या पांडेकाकाना कल्पनातै आता तू पण तुझ्या मुलासाठी तडफडशील असं टिपीकल टाँटींग करुन घेतात. आता नदीत सोडलेला हा मुलगा वाहत वाहत दुसरीकडे जाणार आणि कोणालातरी मिळणार ओघाने आलंच. इतकंच नाही तर तो 'ठाकूर के खानदान का' असला तरी सिनेमाच्या सोईसाठी 'निचली जाती'वाल्या कोणाला तरी मिळणार आणि नंतर त्यावरुन त्याचा आणि त्याच्या खानदानाचा उद्धार केला जाणार हा हिंदी सिनेमाचा अलिखित नियम आहे. त्याप्रमाणे तो सापडतो गुंडा मधला लंबू आटा उर्फ इशरत अली याला! हा डॉक्टरपेक्षाही एक्सपर्ट असावा कारण मुलाचे डोळे उघडून बघितल्याबरोबर हा अजून जिवंत असल्याचं तो डिक्लेअर करुन टाकतो. गारुडी आणि बाबा बंगाली यांचं अफलातून कॉम्बिनेशन असल्याने इशरत अली विष उतरवतो, पण दरम्यान त्या मुलाचा स्मृतीभ्रंश झालेला आहे. इच्छाधारी नागिणीच्या विषात इतकी पॉवर असते हे नवीन ज्ञान मला मिळालं. अशा परिस्थितीत इशरत अलीने त्याला आपला मुलगा मानणं हे ओघाने आलंच! त्याप्रमाणे तो त्याला आपला मुलगा मानतो आणि मंत्र-तंत्र आणि पुंगी वाजवायला शिकवायला सुरवात करतो. पाचेक मिनिटांच्या या ट्रेनिंगमध्ये गळ्यात साप अडकवलेला हा लहान मुलगा शंकराचं रुप असल्यासारखा दिसतो म्हणून त्याचं नाव शिवा! स्मशानातल्या चितेसमोर हातात एक लांबलचक हाड घेऊन ते कवटीवरुन फिरवून समोर असलेल्या चितेत "ॐ नमो चामुंडे रुद्राय मरघटदेवता फट फट स्वाहा" असा मंत्रजप करत त्याचं ट्रेनिंग पूर्ण होतं. तात्या विंचूच्या ॐ फट् स्वाहा च्या आधी हा मंत्र पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला! (झ्पाटलेला १९९३ चा आहे)

ट्रेनिंग पूर्ण झाल्याने आता हिरोची एंट्री झाली पाहिजे त्यामुळे शिवा मोठा होतो आणि होतो आमिर खान! डोक्याला कवड्या आणि इतर काही मणी लावलेला हेडबँड घातलेला टॉपलेस आमिर खान हातात एक हाड घेऊन कवटी उडवताना पाहून मला हसू आवरलं नाही. एंट्रीलाच एका आत्म्याला कवटीमध्ये बंद करुन वश करुन घेताना पाहून एव्हाना तो सिद्धहस्त तांत्रिक झाल्याचं एस्टॅब्लीश केलं आहे. इथे एक धमाल इस्टर एग आहे. साधारणपणे मांत्रिकांची किंवा गारुड्यांची शक्ती त्यांच्या काठीत किंवा पुंगीत असल्याचं दाखवलं जातं पण या शिवाची शक्ती मात्रं एका मोठ्या हाडात आहे! इशरत अली "इसे हमेशा अपने पास रखना!" असं ते हाड त्याला देऊन बजावताना दाखवला आहे.

गारुड्यांच्या वस्तीत आमिरचे मित्रं आहेत ते म्हणजे डमरु झालेला राज झुत्शी आणि बिंदीया झालेली नफीसा शर्मा. राज झुत्शी नफीसाला गटवायच्या प्रयत्नात आहे पण ती उघडपडे आमिरवर लाईन मारते. त्याला अर्थातच तिच्यात काहीच इंट्रेस्ट नसतो. गारुड्यांची वस्ती असली तरी त्याला पहाडी लोकांचा कबिला का म्हणतात हे अनाकलनीय आहे, कारण हिंदी सिनेमाच्या स्टँडर्डनुसार कबिला हा बंजार्‍यांचा असतो. तर या कबिल्यात नागपंचमीच्या रात्री लग्नसोहळा होत असतो. हा लग्नसोहळा साधासुधा नाही तर चक्क एक कुस्तीचा आखाडा आहे. जो मुलगा ज्या मुलीला उचलून जबरदस्ती आपल्या घरात घेऊन जाईल त्यांचं लग्न लावून दिलं जातं! यामागचं जस्टीफिकेशन देताना इशरत अली सांगतो, "हमारे कबिलेकी लडकीयां अपनेसे ज्यादा ताकतवर शौहर पसंद करती है! वो इतनी आसानीसे अपने आपको ले जाने नहीं देती. वो पहले नोंचती है, काटती है, मारती है! ये काम इतना आसान नहीं है!" यानंतर जे गाणं होतं त्या गाण्यात रीतसर एक - दोन मुलं आपापल्या गर्लफ्रेंडना फटकावून उचलून घरात नेताना दाखवली आहेत आणि त्यानंतर त्यांचं रीतसर लग्न! आता अशी पद्धत असलेल्या कबिल्यात इशरत अली स्वत: ब्रह्मचारी राहिला यात काहीच आश्चर्य नाही!

हिंदी सिनेमात हिरोची एंट्री झाल्यावर पुढच्या दहा मिनिटांत हिरॉईनची एंट्री झाली नाही तर तो फाऊल धरला जातो. या नियमाप्रमाणे आता हिरॉईनची एंट्री होते. ही आहे पारो उर्फ जुही चावला. जलजलाप्रमाणे इथे शिवाची जोडी राधेशी न जुळवता पारोशी जुळवलेली पाहून मी सुटकेचा नि:श्वास टाकला. आता या दोघांच्या भेटीला निमित्त हवं ते म्हणजे मेला. या मेल्यात आमिर पुंगी वाजवून नागाचे खेळ करतो आहे. नव्वदच्या दशकातला सिनेमा असल्याने पहली ही नजरमें प्यार होना ही मंगता है! त्याप्रमाणे ते होतंच. इथून पुढचा अर्धा एक तास सिनेमा टिपीकल लव्हस्टोरीच्या वाटेने जातो. आमिर आणि जुही कयामत से कयामत तकच्या मोडमध्येच गाणी म्हणतात, रोमान्स वगैरे करतात. टायटल साँगच्या एका कडव्यात पावसात भिजल्यावर टिपीकल शेकोटी, अंगाभोवती गुंडाळलेला चिथडा आणि त्यानंतर दृष्टीआडच्या सृष्टीत जे काय झालं ते दर्शवलेलं असं सगळं साग्रसंगित होतं. जुहीच्या बापाचा चमचा असलेला मुनिम या दोघांना बघतो आणि तिच्या बापाला - अजित वाच्छानीला व्यवस्थित आग लावतो. तो आमिरला मारायला एक तांत्रिक पाठवतो. इथे आमिर खानने हातात हाड घेऊन जे काही एक्स्प्रेशन्स दिले आहेत ते अवर्णनीय आहेत! त्या मांत्रिकाच्या नाकातून कपाळातून नाकाच्या दोन्ही बाजूला एका सिमेट्रीत रक्ताची धार लागलेली पाहून तर हसून हसून पुरेवाट होते. हा प्रकार आटपल्यावर आमिर आपल्या हातून निसटतोय हे बघून वैतागलेली नफीसा इशरत अलीकडे जाऊन पचकते आणि यांचं अफेअर सांगून टाकते. आता दोघांचेही बाप दोघांना आपापल्या खोल्यांमध्ये बंद करुन मोकळे होतात.

इच्छाधारी नाग दरवाजाला कडी लावू शकतो हे रीना रॉयच्या नागिनमध्ये आपण पाहिलं आहे, तर इच्छाधारी नसलेला नाग कडी उघडू शकतो हे ज्ञान या सिनेमात मिळतं. नागोबाने दार उघडल्यावर आमिर जुहीला भेटायला जातो. तिला बोलावण्याची याची पद्धत म्हणजे पुंगी वाचवत सुटणं! अरे लेका तू पुंगी वाजवल्यावर डोलत येण्यासाठी ती काय नागिण आहे का? कारण आधीच्या एका सिनमध्ये याच्या पुंगी वाजवण्यामुळे नाग आलेले दाखवले आहेत, पण जुहीला भेटायला बोलावताना पुंगी वाजवतो तेव्हा मात्रं एकही नाग येत नाही. याचा अर्थ नागांना फक्त ऐकायलाच येतं इतकंच नाही तर त्यांना आपल्याला बोलावण्यासाठी वाजवलेला सूर आणि हिरॉईनसाठी वाजवलेला सूर यातला फरक कळण्याइतकी रागदारीची समजही आहे हे सिद्ध होतं. नागाला ऐकू येत नाही हे शास्त्रीय ज्ञान चुकीच असावं बहुतेक! ठाकूर खानदानाच्या दृष्टीने सपेरे म्हणजे निचल्या जातीतले असल्याने आमिरला भेटते म्हणून अजित वाच्छानी जुहीला रीतसर कानफटतो आणि आमिरला आपल्या माणसांकरवी बडवतो. वैतागलेली जुही त्याला कारण विचारते तेव्हा कारण सांगितलं जातं ते म्हणजे ही चार वर्षांची असताना हिचं लग्न झालं आणि नवरा गचकला, त्यामुळे ती बालविधवा आहे! हिचा लहानपणचा नवरा आमिरच असणार हे अनुभवी प्रेक्षका लगेच ओळखू शकतो पण तरीही मी कपाळावर हात मारलच! विधवेचा पुनर्विवाह ही इतकी कॉमन गोष्ट असताना बालविधवा? कम ऑन! इथे टायटल साँगमध्ये दोघांचं 'सारं काही' करुन झालेलं असल्याने कहानीमें ट्वीस्ट टाकण्यासाठी तिला प्रेग्नंट कशी दाखवली नाही हेच आश्चर्य आहे.

त्यानंतर अपेक्षेप्रमाणे जुहीने आमिरला फसवल्याचं नाटक करणं, त्याच्याकडून कानफटात खाणं, तिच्या मैत्रिणीच्या लग्नात त्याने बेवफाईचं गाणं म्हणणं वगैरे सगळे टिपीकल प्रकार झाल्यानंतर तिची रीतसर विधवेच्या पांढर्‍या साडीत सासरी बिदाई केली जाते. इथून क्लायमॅक्सपर्यंत पांढर्‍याच साडीत वावरावं लागल्याने ती नक्कीच वैतागलेली असणार. हिचे सासू-सासरे अर्थातच सुधीर पांडे आणि सुहास जोशी. ते अगदी हौसेने तिला आपल्या घरी नेतात. दरम्यान तिची मैत्रिण आमिरला गाठून त्याचा गैरसमज वगैरे दूर करते आणि तिचं नेमकं लोकेशन त्याला सांगते. असे जीपीएस सारखे मित्रं-मैत्रिण आम्हाला जन्मात कधी मिळाले नाहीत! तिचा पत्ता लागल्यावर म्हातार्‍या इशरत अलीला मॅनिप्युलेट करणं त्याला अगदी सहज शक्य होतं. आता पुन्हा दोघं एकाच एरीयात आलेले आहेत. हा पुन्हा आपली पुंगी वाजवत तिच्या दारात हजर! सुरवातीला ती त्याच्यावर इग्नोरास्त्र टाकते पण शेवटी पुंगीच्या आवाजाने डोकं उठल्याने एकदा त्याला भेटायला जाते. तो लहानपणचं लग्न वगैरे विसरुन प्रॅक्टीकल विचार कर असं तिला सांगतो पण ती आपलं विधवेचं रुप सोडायला काही तयार नाही!

हिरॉईन आपल्याबरोबर येत नाही या सिच्युएशनमधे हिरो टिपीकली दारु पितो, पण या सिनेमाची बातच निराळी! हा आपला झाडाखाली बसून पुंगी वाजवत बसतो! जुही काही येत नाही, पण सिनेमाच्या सुरवातीला सुधीर पांडे - सुहास जोशी यांच्या मुलाला डसल्यावर गायब झालेल्या कल्पनातै मात्रं त्याच एरीयात असल्याने पुंगीच्या आवाजाने बरोबर प्रगट होतात! इच्छाधारी नागाच्या डोळ्यात टेलीस्कोपीक झूम लेन्सवाला कॅमेरा असतो आणि तो रात्रीच्या अंधारातही आपल्याला गोळ्या घालणार्‍यांचे क्रिस्टल क्लीअर फोटो काढतो हे रीना रॉयच्या नागिनमध्ये आपण पाहिलंच आहे. इच्छाधारी नागिणीच्या डोक्यात सुपर कॉम्प्युटर असतो आणि लहानपणी डसलेल्या मुलाला तो मोठा झाल्यावर ओळखण्याचा प्रोग्रॅम त्यात असतो हे ज्ञान इथे मिळतं. कल्पनातै आमिर खानला बरोबर ओळखतात. त्याचा पाठलाग करुन रात्री त्याच्यावर हल्लाही करु बघतात, पण आमिर डोळे वटारुन आणि मुठी आवळून मंत्र म्हणतो तेव्हा आता बॅकफूटवर जाणंच योग्य आहे हे समजून त्या कलटी मारतात. पण जाण्यापूर्वी आपल्या मानवी रुपात येऊन त्याला खुल्लम खुल्ला चॅलेंज करुन जातात. "मेरा नाम है कल्पना मुझे तेरेको है डसना, फुस्स!"

आमिरला काही कामधंदा नसल्याने त्याचं रोज झाडाखाली बसून पुंगी वाजवणं आणि जुहीचं डोकं उठवणं सुरुच असतं. ती काही येत नाही पण हा चान्स बघून कल्पनातै तिचं रुप घेऊन येतात आणि एकदम नाचायला लागतात. या गाण्यात नाचताना दोन्ही हातांनी नागासारखा फणा काढायची हौस जुहीनेही भागवून घेतलेली दिसते. आमिरकडे तोंड असताना जुही आणि पाठ वळल्यावर कल्पनातै अशी सेकंदासेकंदात बदलणारी रुपं बघून मी धन्य झालो! नागिन मध्ये रीना रॉय प्रेमा नारायण, योगिता बाली, मुमताज, रेखा या सगळ्यांचं रुप घेत असली तरी इतक्या फास्ट बदलत नाही. इच्छाधारी नागांनीही मॉडर्न टेक्नॉलॉजीचा आधार घेतल्याची माझी खात्रीच पटली. इतके दिवस पांढर्‍या साडीत रडवेलं तोंड घेऊन फिरणारी आपली गर्लफ्रेंड एकदम टकाटक कपडे घालून आणि नागिणीच्या पोझमध्ये नाचते आहे हे बघून वास्तविक मला तरी काहीतरी गडबड असल्याची शंका आली असती, पण हा एवढा मोठा मांत्रिक वगैरे असूनही याला इच्छाधारी नागिण ओळखता येत नाही? एकदाची पटली या आनंदात नाचतोय आपला तिच्याबरोबर! गाण्याच्या शेवटी हा पुंगी वाजवण्यात तल्लीन झालेला आणि कल्पनातै त्याला डसणार तोच जुही तिथे वेळेवर तडमडते आणि हा भलत्याच बाईबरोबर नाचत असलेला पाहून "शिवाSS" करुन बोंब ठोकते. (मला "शिव्या फोकलीच्या.... " असं ऐकायला आलं.) त्याबरोबर हा लगेच मूठ आवळून आणि डोळे वटारुन मंत्र म्हणतो आणि कल्पनातैना कलटी मारावी लागते. आपल्या डोळ्यासमोर बाईची नागिण झालेली पाहूनही जुहीला ती कोण होती हे कळत नाही, त्यामुळे ती "ये कौन थी?" असा प्रश्न विचारुन आपण किती डम्ब आहोत हे सप्रमाण सिद्ध करते!

इकडे सुधीर पांडे आणि सुहास जोशी जुहीचं दुसरं लग्न ठरवून मोकळे होतात. सुहास जोशीतर हौसेने "कल ही ये शुभ काम हो जाए!" म्हणतात तेव्हा हसू आवरत नाही. अर्थात त्यांच्यादृष्टीने विचार केला तर लहानपणी लग्न झालं म्हणून मुलगा गेला तरी हिला घरी आणली, काळवेळ न बघता कधीही पुंगी वाजली की ही त्याला भेटायला जाणार, त्यापेक्षा हिला रीतसर उजवणंच श्रेयस्कर असा विचार त्या माऊलीने केल्यास तिची काय चूक? हे कानावर पडल्यावर जुही अर्थातच कलटी मारते आणि आमिरला गाठते. हे दोघं पळून जात असताना त्यांना नेमका इशरत अली आडवा येतो. आमिरचं जन्मरहस्य सांगायला यापेक्षा दुसरा चांगला चान्स कोणता असणार? तूच सुधीर पांडेचा मुलगा आहेस असं तो सांगतो आणि त्यांना सुधीर पांडेकडे घेऊन येतो. एव्हाना जुहीने कलटी मारल्याचं कळल्याने अजित वाच्छानीही तिथे आलेला आहे. सुधीर पांडे आणि अजित वाच्छानी अर्थातच इशरत अलीवर विश्वास ठेवत नाहीत पण सुहास जोशी मात्रं पाघळणार हे देखिल चाणाक्ष प्रेक्षकाला अपेक्षित असतं. त्याप्रमाणे मां - बेटा असा टिपीकल इमोशनल सिन आपल्याला दाखवला जातो. सुधीर पांडे अर्थातच त्यांना हाकलून देतो.

आपल्या कबिल्यात परतल्यावर इशरत अली आपल्याकडे असलेला एकमेव उपाय काढतो तो म्हणजे नागपंचमीचं लग्नाचं गाणं! या गाण्याच्या शेवटी एव्हाना आमिर खान काही आपल्याला पटत नाही याची खात्री झाल्याने नफीसा शर्मा राज झुत्शीला ओढत घरामध्ये नेते आणि आपली सोय लावते. त्यापूर्वी एका सीनमध्ये दोघांची बेसबॉल बॅटच्या आकाराच्या काठ्यांनी दाखवलेली मारामारी अवर्णनीय आहे! आमिर जुहीला उचलून नेणार ही तर पत्थर की लकीर! त्याप्रमाणे एकदाचं साग्रसंगित लग्न होतं. हा सगळा प्रकार सुरु असताना कल्पनातै चेतेश्वर पुजाराच्या पेशन्सने आपल्याला आमिरला डसायचा चान्स कधी मिळेल याची वाट बघत असतात. इच्छाधारी नागांनी नॉन-इच्छाधारी नागाशी स्नेकफाईट करताना नागरुपातच लढलं पाहिजे हा हिंदी सिनेमाचा नियम आहे, पण हा सिनेमाच ट्रेंडसेटर आहे, त्यामुळे आमिरने आपल्या दारावर वॉचमनच्या कामावर ठेवलेल्या नागाशी स्नेकफाईटमध्ये वेळ नघालवता कल्पनातै त्याला त्रिशुळाने भोसकतात. तोपर्यंत आमिर आणि जुही सिनेमाच्या सिक्वेलला हिरो देण्यासाठी आवश्यक ते काम करण्यात मग्न असल्याने त्यांना हे काहीच माहीत नाही. कल्पनातै नेमक्या वेळेवर तिथे टपकतात आणि चान्स घेतात, पण आमिरच्या ऐवजी मध्ये तडमडलेल्या जुहीला डसतात आणि कल्टी मारतात. इशरत अली आमिरचा गुरु असला तरी क्लायमॅक्समध्ये हिरोलाच महत्व मिळालं पाहिजे हा अलिखित नियम असल्याने त्याने आपली सिद्धी आमिरला वाचवण्यासाठी वापरल्याची सोईस्कर पळवाट काढली जाते. आता उपाय काय तर नागिणीकडूनच विष चोखून घेणं!

या सिनेमाचा सगळ्यात अशक्य विनोदी प्रकार काय असेल तर तो म्हणजे क्लायमॅक्स! एकावेळेस आमिर्, राज झुत्शी आणि चार ज्युनियर पुंगीवाले यांच्या एकत्र पुंगीने साक्षात शेषनागाचं डोकं उठेल तिथे कल्पनातैंची काय कथा! त्यांना झक् मारत तिथे प्रगट व्हावंच लागतं. तोपर्यंत सुधीर पांडे आणि अजित वाच्छानीही तिथे आलेले असतात. कल्पनातैना पाहिल्यावर पांडेकाकांची टरकते. कल्पनातैनी गुपचूप विष चोखून घ्यावं असं इशरत अली तिला बजावतो पण ती त्याला नकार देणार हे ओघाने आलंच. इतकंच नाही तर आमिरची रिप्लेसमेंट म्हणून जुहीला डसल्याचंही सांगून मोकळ्या होतात. त्यानंतर आमिर आणि कल्पनातै यांच्यातली मॅन - स्नेक फाईट म्हणजे निव्वळ धमाल आहे.

इशरत अली पुंगी वाजवतोय, आमिर डोळे वटारुन मूठ आवळून उभा आहे आणि कल्पनातै कॅटवॉक करत चालल्या आहेत या पहिल्या शॉटनेच मी हसून हसून आडवा झालो. कल्पनातैंचं हसणं पाहून त्या नागिण कमी आणि इच्छाधारी हडळ जास्त वाटतात. एक-दोनदा नागरुपात लाँग डिस्टन्स जंप मारुन कल्पनातै आमिरला डसण्याचा प्रयत्न करतात, पण आमिरला बॉडीलाईन बॉलिंग खेळण्याची सवय असल्याने तो व्यवस्थित डक करतो. ही फाईट बघत असलेले एक्स्ट्रॉ अगदी कुत्ता जाने चमडा जाने असा भाव चेहर्‍यावर आणून उभे आहेत. मधून मधून व्हॅम्पचाही स्कोर झाला पाहिजे म्हणून एक-दोन किरकोळ जखमा आमिर खानलाही झालेल्या दाखवल्या आहेत. तेवढ्यात इशरत अली त्याचं ठेवणीतलं हाडूक आमिरला देतो. ते हाडूक मिळताच आमिर बॅकपॅडलिंग करत एकदम मागे जातो, हाड एकदा आकाशात आणि एकदा हवेत उडत असलेल्या नागिणीवर रोखतो. हाडातल्या पॉवरमुळे नागिण डायरेक्ट जमिनीवर! पुढच्या सिनमध्ये तर आणखीन धमाल प्रकार आहे. आमिर आपल्या स्वत:च्या मनगटाभोवती दोनदा हाड फिरवतो आणि मनगटावरुन ते ओढतो. त्याबरोबर मनगटातून रक्ताची धार! त्या हाडाला काय ब्लेड वगैरे लावली होती का रे बाबा? त्या रक्ताने ठिबकसिंचन करत तो जुही चावलाला ठेवलेल्या खाटेभोवती रिंगण आखतो. हे रिंगण आखताना ते हाड डोक्यावर हवेत धरलेलं, डोळे वटारलेले आणि मंत्र पुटपुटणं सुरुच! हा सगळा खटाटोप कल्पनातैना लांब पळून जाता येऊ नये यासाठी!

पुढच्या सीनमध्ये तर आणखीन धमाल! आता आमिरच्या डाव्या हातात एक कवटी धरलेली आहे. त्या कवटीभोवती तो मोजून तीन वेळा अँटीक्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये ते हाड फिरवतो, पुन्हा एकदा डोक्यावर आकाशात रोखतो आणि फट स्वाहा की उभ्या राहिलेल्या कल्पनातैना पुन्हा लोळणफुगडी खेळावी लागते. पुन्हा एकदा हाड आकाशात, डोळे वटारलेले आणि मग आमिरखांसाहेबांचा आदेश - "चूस! जहर चूस!" मध्येच जुहीच्या चेहर्‍याचा एक शॉट दाखवून तिचा चेहरा विषामुळे निळसर पडलेला आहे हे दाखवलं जातं. पुन्हा एकदा हाड जमिनीकडे आणि कल्पनातै धाडकन बरोबर जुहीच्या हातावर पडतात. इथे मला "चूस" याच्या ऐवजी "छू" असं ऐकायला आलं. मग पुढचे काही सेकंद आमिरचे वटारलेले डोळे आणि नागिणबै आपलं विष चोखताहेत! वास्तविक कल्पनातैंचा अवतार पाहिला तर त्या विष चोखण्याऐवजी हाताला चावताहेत असंच वाटतं. शेवटी तर विष चोखून घेतलेल्या कल्पनातै स्वत:चा विष चढल्यासारख्या काळ्यानिळ्या दिसतात. जुहीचा हात पुरेसा चावून झाल्यावर हाडकाची डायरेक्शन रक्ताच्या रेघेवर आणि त्या धाडकन त्या रेघेवर आपटतात आणि डायरेक्ट आग लागून जळून जातात. कल्पनातैंचं सिनेमातलं अवतारकार्य समाप्त! यानंतरही आणखीन एक शॉट म्हणजे आमिर दोनवेळा कवटीवरुन हाड फिरवतो आणि त्या बॉर्डरवर हाडाने फुली मारुन ऑपरेशन कोब्रा संपल्याचं डिक्लेअर करतो. या क्ल्यू नंतर जुही शुद्धीवर आलीच पाहिजे त्याप्रमाणे ती येते. एवढं सगळं झाल्यानंतरही आमिरच्या मनगटावर कापल्याची खूण राहत नाही की एक्सेसिव्ह ब्लिडींगमुळे त्याला काहीही होत नाही! आफ्टरऑल ॐ फट स्वाहा!

क्लायमॅक्सच्या सीनमध्ये सुधीर पांडे, सुहास जोशी, इशरत अली आणि आमिर खान यांची इमोशनल डायलॉगबाजी आणि रडारड होते. अजित वाच्छानी मात्रं एक शब्दही बोलत नाही. आपला जावई किती डेंजर माणूस आहे याची कल्पना आल्याने त्याची टरकलेली दिसते. थोड्याफार डायलॉगबाजीनंतर अखेर ऑल इज वेल होतं आणि सिनेमा एकदाचा संपतो. एक प्रश्न मात्रं तसाच राहतो की पहिल्याच शॉटमध्ये दाखवलेला तो शिंचा नागमणी गेला कुठे?

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Dec 2021 - 12:44 pm | अमरेंद्र बाहुबली

तुमचे ह्या आधीचे दोन नी हा असे तीनही लेख मी ह्या आधी वाचल्या सारखं वाटतंय.

स्पार्टाकस's picture

29 Dec 2021 - 5:05 pm | स्पार्टाकस

चिरंजीव प्रतिक,
विनाकारण संभ्रम आणि संशय निर्माण करण्याचे धंदे बंद करा जरा.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Dec 2021 - 6:18 pm | अमरेंद्र बाहुबली

हे नक्की तुम्हीच लिहीलंय का? कारण मी बर्याच दिवसाआधी ईतरत्र वाचलं होतं. अगदी शब्द नी शब्द तसाच आहे..

स्पार्टाकस's picture

29 Dec 2021 - 8:25 pm | स्पार्टाकस

हे मी काल टाईप करुन पोस्ट केलंय, उगाच फालतूगिरी बंद कर.
चॅलेंज देतो, लिंक शोध आणि इथे दे.

प्रसाद_१९८२'s picture

4 Jan 2022 - 3:04 pm | प्रसाद_१९८२

का लिंक ?

मुक्त विहारि's picture

15 Jan 2022 - 10:03 am | मुक्त विहारि

लिंक मिळाली का?

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Dec 2021 - 12:59 pm | राजेंद्र मेहेंदळे

"हिंदी चित्रपटातील इच्छाधारी नाग" या विषयावर पी एच डी वगैरे करायला पाहिजे कोणीतरी. लेख वाचुन प्रत्येक परीच्छेदाला हसत होतो. जबरदस्त परीक्षण केलय राव.

एवढं फाड फाड बोलून [.. बोले तो.. लिहून..] केलेली चित्रपटाची अशक्य चीरफाड बघीतल्यावर, डायरेक्टरला स्वतःच्या धोबाडीत फाड फाड मारून घ्यायची इच्छा होईल!
केवढा तो पेशन्स.. बघण्याचा वेगळा आणि लिहिण्याचा त्याहून वेगळा! =))

मुक्त विहारि's picture

29 Dec 2021 - 3:27 pm | मुक्त विहारि

केवढा तो पेशन्स.. बघण्याचा वेगळा आणि लिहिण्याचा त्याहून वेगळा! =))

+1

आगाऊ म्हादया......'s picture

29 Dec 2021 - 6:17 pm | आगाऊ म्हादया......

+१

रंगीला रतन's picture

29 Dec 2021 - 3:01 pm | रंगीला रतन

चिरफाड भारीच पण मनीषा कोयराला गोल मटोल? हे काय पटलं नाय ब्वा.

आगाऊ म्हादया......'s picture

29 Dec 2021 - 6:21 pm | आगाऊ म्हादया......

एके काळी आवडायची राव मला. गोल मतोल?

नाही....sssssssss

रंगीला रतन's picture

29 Dec 2021 - 8:39 pm | रंगीला रतन

मला पण लैच आवडायची राव. लज्जा मधे कसली भारी दिसली होती.

पण माधुरी समोर तिचा डान्स म्हणजे जरा.... यू नो? ;-)
०:५८ ची माधुरीची स्टेप, ३:३५ पासूनच्या दोघींच्या स्टेप्स.. माधुरीची नज़ाकतच वेगळी.. तिच्या स्टेप्स फारच पॉलिश्ड / सफाईदार / स्मूथ वाटतात.. नाचतांनाचा आनंद तिच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहतो.. ती सहजता फार कमी जणींमधे सापडते. ती त्याबाबतीत वेगळीच कलाकार आहे!

रंगीला रतन's picture

3 Jan 2022 - 11:05 pm | रंगीला रतन

ती त्याबाबतीत वेगळीच कलाकार आहे!
+०३०१२०२२
माधुरी ती माधुरीच.

मित्रहो's picture

29 Dec 2021 - 6:15 pm | मित्रहो

भयंकर प्रकरण आहे. अडीच तास असला चित्रपट बघणे आणि त्यावर लिहिणे सलाम तुम्हाला.
लेख मस्त आहे वाचताना मजा आली.

आगाऊ म्हादया......'s picture

29 Dec 2021 - 6:19 pm | आगाऊ म्हादया......

देवा देवा देवा. ह्या असल्या सिनेमात ह्यांनी कामं तरी कशी केली?

तर्कवादी's picture

4 Jan 2022 - 11:19 pm | तर्कवादी

ह्या असल्या सिनेमात ह्यांनी कामं तरी कशी केली?

ताहिर हुसेन म्हणजे आमिर खानचा सख्खा बाप हो.. नाही कसं म्हणणार.. हा आता जुही चावलाने वा इतरांनी कसं काम केलं हा प्रश्न पडू शकतो.. तर शेवटी पैसा आहे..

स्पार्टाकस's picture

29 Dec 2021 - 8:24 pm | स्पार्टाकस

हे मी काल टाईप करुन पोस्ट केलंय, उगाच फालतूगिरी बंद कर.
चॅलेंज देतो, लिंक शोध आणि इथे दे.

स्पार्टाकस's picture

29 Dec 2021 - 8:24 pm | स्पार्टाकस

हे तुम्हाला नाही, प्रतिकला लिहीलंय.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

2 Jan 2022 - 4:22 pm | रावसाहेब चिंगभूतकर

चार दिवस झाले. आतापर्यंत लिंक द्यायला हवी होती अबा नी.

कानडाऊ योगेशु's picture

30 Dec 2021 - 9:04 pm | कानडाऊ योगेशु

ढम्मकढोल हा शब्द बर्याच दिवसांनी वाचला. लहानपणी फार वापरायचो.
एकुण लेखच अचाट आहे.
व्यंगचित्रात्मक परिक्षण आहे हे.
मनिषा कोईराला जर मराठी असती आणि तिने ही चिरफाड वाचली असती तर तिने ही दाद दिली असती.

लिहण्याचा पेशन्स दांडगा आहे, [ माझा वाचण्याचा देखील नाही हे मी विनोदाने मागच्या धाग्यात सांगितले आहे. :) ] इतकं डिटेल्ल मदी लिवलं हाय की नाग नागिण देखील हा लेख लयं इंट्रेस्ट घेउन वाचतील ! :)
श्रीदेवीचा उल्लेख आल्यावर मला तिचे गाणे [ मै तेरी दुष्मन ] आठवले आणि तिचे डोळे देखील ! अश्या रंगाचे कॉन्टॅक्ट लेंस कुठली कंपनी बनवत असेल आणि हे कुठे विकत मिळत असेल असा प्रश्न देखील मनात डोकावुन गेला होता.
शरत सक्सेना आणि अजित वाच्छानी यांची जोडी [ डागा और तेजा ] मिस्टर इंडियात दिसली होती... बर्‍याच काळात अजित वाच्छानी यांना कुठल्या रोल मध्ये आता पाहिल्याचे आठवत नाही.
शरत सक्सेना यांना फिर हेरा फेरी मध्ये छोट्याश्या रोल मध्ये पाहिल्याच आठवत, त्यांचा एक सीन देऊन जातो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pucho Na Yaar Kya Hua... :- Zamaane Ko Dikhana Hai

स्पार्टाकस's picture

15 Jan 2022 - 7:11 am | स्पार्टाकस

अजित वाच्छानी २००३ मध्ये गेला.