एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग २ {३००किमी }

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
24 Dec 2021 - 7:50 am

३०० किमी करायचे ठरवले पण त्यासाठी रूट ठरेना. सावंतवाडी क्लब चा सावंतवाडी - राजापूर - सावंतवाडी असा रूट होता. तर नवी मुंबई कल्याण सायकलिस्ट या क्लब चा वाशी - महाड - वाशी असा रूट होता. सांगली आणि पुणे क्लब चे पण रूट चेक केले. शेवटी या दोन रूट पैकी कुठचा फायनल करायचा हे ठरत नव्हतं. खारेपाटण खूप दमवणारा होता त्यामुळे परत त्याच रूट वर जायला मन धजावत नव्हतं. पण तिकडचे रस्ते सगळे चकाचक होते. तर मुंबई गोवा हायवे रत्नागिरी पर्यंत प्रचंड खराब आहे याची माहिती होती. तरीही बरीच चौकशी केली. अर्ध्या लोकांचं म्हणणं पडलं कि महाड रूट ला अजिबात जाऊ नका तर अर्धे म्हणाले एवढा काही खराब नाही,बराचसा रस्ता नवीन झाला आहे. हो ना करता महाड चा रूट फायनल झाला. चिपळूण हुन उठून कुठेही BRM करायला जायचं म्हणजे आम्ही गाडीत सायकल टाकून जातो. राहायची व्यवस्था बघायची कुठे कशी होते ती ,त्या वेळेप्रमाणे ठरवायचं. इथेही मागच्या वेळप्रमाणे मनोज दादा मदतीला आला. त्याच्या ओळखीचे रौफ भाई वांगडे यांचं घर नेरुळ येथे राहायला मिळालं. आमची उत्तम व्यवस्था तेथे झाली .
२७ नोव्हेंबर ला सकाळी वाशी स्टेशन जवळ स्पर्धेला सुरवात होणार होती. गाडीतून सायकल काढून जोडून घेतल्या. गाड्या स्टेशन जवळच्या पे अँड पार्क मध्ये लावल्या. मागच्याच वेळेचे आम्ही तिघे दापोलीच्या साथीदारांसह इथे हजर होतो. दापोली क्लब चा अंबरीश आमच्या मदतीला इथे होता. ३०० किमी साठी २० तास होते. सकाळी ६ वाजता स्पर्धा सुरु होऊन रात्री २ वाजता म्हणजेच २८ नोव्हेंबर ला पहाटे २ वाजता संपणार होती. सायकल चेक होऊन बरोबर ६ वाजता स्पर्धा सुरु झाली. पाम बीच मार्गे गोवा रोड ला लागलो. सुरवातीला खूपच चांगला रस्ता होता. सकाळच्या गार वाऱ्यात रस्ता भराभर कापत होतो. थोड्याच वेळात कर्नाळा चा चढ आला. चढ पूर्ण करून उतारावरून सायकल मस्त सोडून दिल्या. इथे सगळीकडे नवीन रस्ता जरी झाला असला तरी रस्त्याला लेव्हल हा प्रकार नाही. गाडीतून जाताना जाणवत नाही पण सायकलवर मात्र सगळं जाणवतं. एके ठिकाणी चहाला थांबून पुढे गेलो. कामत गोविंदा ला नाश्ता करून पुढे निघालो. ऊन चढायला लागलं आणि रस्त्याची वाईट अवस्था समोर आली. मध्ये मध्ये तर २/२ किमी चा पेव्हरब्लॉक चा रस्ता आहे. फारच विचित्र परिस्थती होती. गतिरोधक तर इतके उंच होते कि धक्के बसत होते. नवीन रस्त्यामुळे आजूबाजूला सावलीसाठी कुठेही झाड नव्हते. सुकेळीचा चढ चढून झाला. गाडीतून बरा वाटणारा रस्ता अपेक्षेपेक्षा फारच खराब निघाला. महाड अगदी १० किमी वर असताना मला अजिबात पुढे जाववेना. श्रीनिवास मला धीर देत होता, फक्त ४ किमी राहील सांगत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून निघाले परत. पण काही केल्या महाड येईना. महाडच्या जवळपासचा रस्ता तर आणखी बेकार होता. फ्लायओव्हर च काम चालू होत. खालचा चालू रस्ता पूर्ण खणलेला आहे. कसेबसे करत एकदाचे ठरलेल्या हॉटेल वर पोचलो.
महाड च्या PG Regency हॉटेल मध्ये चेक पॉईंट होता, जेवणाची सोय देखील होती. NMKC क्लब चा सिद्धार्थ भामरे याने सर्व सायकलस्वारांची उत्तम व्यवस्था बघितली होती. हॉटेल मध्ये एक स्वतंत्र AC हॉल घेऊन तिथेच जेवणाची सोय केली होती. दाल, राईस, पनीर ची भाजी आणि रोटी अस छान चविष्ट जेवण होत. भर उन्हातून त्या AC हॉल मध्ये प्रवेश केल्यावर इतकं सुख वाटलं. तिथल्या तिथे सिद्धार्थ ला फुल्ल मार्क दिले. थोडा दाल राईस फक्त घेऊन जेवले. जास्त जेवले तर पुढे सायकल चालवणे कठीण होईल याची भीती होती.
जेवून फ्रेश होऊन परतीच्या रस्त्याला लागलो. ऊन अजूनही रस्ता तापवत होतं. त्या AC हॉल मधून बाहेर पडायचं जीवावर येत होतं. पण आव्हान मोठं होतं. हा रस्ता निवडण्यात चूक झाली अस राहून राहून वाटत होतं. वाईट रस्त्यामुळे मी हँडल एकदम घट्ट पकडत होते. त्यामुळे हाताचे पंजे चांगलेच दुखायला लागले. बोटांना पण विचित्र काहीतरी होतंय असं वाटलं. पण तसाच प्रवास सुरु केला. 4 वाजल्यानंतर ऊन कमी झालं आणि परत जरा स्पीड घ्यायचा प्रयत्न केला.पण आता श्रीनिवासचा उजवा पाय थोडा दुखायला लागला. मी तशीही थकलेली होते. हातांबरोबर आता खांदे देखील दुखायला लागले. एके ठिकाणी थांबून पेन किलर घेऊन दोघांनी परत सुरवात केली. मनोज दादा पुढे जात होता आणि आमच्यासाठी थांबत होता. मध्येच दापोलीचा केतन दिसला. त्याचा टायर पंक्चर झाल्याने तो थांबलेला. त्याची विचारपूस केली पण थांबलो मात्र नाही कारण हाताशी वेळ नव्हता आणि दुखणं तर वाढत होत. त्यामुळे तसेच निघालो. सुकेळी चा चढ चढून कामत गोविंदा ला जेवायला थांबलो. आम्ही तिघे नि केतन देखील आता बरोबर होता. आता आम्ही एकत्र निघालो. कितीतरी वेळ कर्नळाचा चढ येतच नव्हता. शेवटी एकदाचा तो चढ आला. तो उतरलो आणि मग जरा बरं वाटलं. कारण इथून आता वाशी फारसं लांब नाही. परत उसन्या उत्साहाने सायकल चालवायला लागलो. एकदाच JNPT च्या रस्त्याला लागलो. मुंबई चे स्ट्रीट लाईट दिमाखात चमकत होते. आता थोडाच अंतर जाणवून बरं वाटत होतं.पण ते थोडं अंतर काही पार होत नव्हतं. एक अर्धा किमी जरा रस्ता चुकलो पण परत वाशी च्या रस्त्याला लागलो. इथे 1 वाजला होता.2 वाजता स्पर्धेची वेळ संपत होती. थोडं टेन्शन सगळयांनाच आलं. आता मात्र भराभर पॅडल मारायला लागलो. साधारण अर्ध्या तासात आम्ही वाशी स्टेशन जवळच्या शेवटच्या पॉईंट ला पोहोचलो. एकदाच हुश्श झालं.
सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. वेळेच्या आधी पोहोचून स्पर्धेत टिकून राहिल्याचे समाधान होतं. हात, पाय, खांदे, बोटं अगदी सगळे अवयव बोलायला लागले होते. ब्रेव्हेट कार्ड सिद्धार्थ जवळ दिली. अंबरीश थांबलेला होताच. फोटो काढून, सायकल परत गाडीत टाकेपर्यंत 3 वाजले होते. भूक लागली होती. अंबरीश आम्हाला तिथल्याच एका टपरीवर घेऊन गेला. त्याला बुर्जी पाव करायला सांगितलं. भूक लागली असली तरी फारसं खाल्लं नाही गेलं. जेमतेम 2 पाव कसेतरी खाल्ले आणि अंबरीश ला बाय करून नेरुळ ला परत आलो. आणि झोपून गेलो.

झोपून उठल्यावर मात्र परत फ्रेश झालो. आणि 400 करायची का यावर पुढची चर्चा सुरू झाली.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

24 Dec 2021 - 11:22 am | सौंदाळा

मस्तच
फोटो पाहिजे होते.
क्रमशः आहे का :) - ४०० किमीचा वृत्तांत कधी?

मार्गी's picture

24 Dec 2021 - 11:35 am | मार्गी

जबरदस्त!!! खूप खूप अभिनंदन! छान लिहिताय.

जेम्स वांड's picture

24 Dec 2021 - 12:24 pm | जेम्स वांड

आजकाल सहा अंडी आणायला घराजवळच्या चौकात पण ऍक्टिवा घेऊन जाणाऱ्या आमच्यासारख्यांना हे सगळं भयानक सुरस अन छाती दडपून टाकणारं होतं हो.

इतकी सायकल चालवायला कोणी मला पैसे दिले तरी मी चालवेन का नाही ही शंकाच आहे मला, तुम्हाला तुमच्या बीआरएम बद्दल खूप खूप शुभेच्छा आणि पुढील ४०० किलोमीटर करता ऑल द बेस्ट.

मित्रहो's picture

25 Dec 2021 - 11:02 am | मित्रहो

अभिनंदन छान लिखाण

करा

तुम्ही नक्कीच करू शकता