एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग १ {२००किमी}

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
22 Dec 2021 - 5:54 pm

एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग १ {२००किमी}
SR अर्थात super randonneur. खरं तर हे स्वप्न श्रीनिवासच. जानेवारी २०२१ ला ६०० किमी ची BRM करून त्याने ते पूर्ण देखील केलं. आणि मग हा किडा त्याने माझ्या डोक्यात सोडला. मागच्याच वर्षी त्याच्याबरोबर २०० नि ३०० किमी BRM मी केल्या होत्या. अर्थात तेव्हा दोघांनी चालवायची Tandem सायकल वरून हा प्रवास आम्ही केला. नंतर औरंगाबाद ला ६०० किमी चा प्रयत्न केला पण अर्ध्यात ती स्पर्धा सोडून दिली आणि तो नादच सोडून दिला. पण असा ऐकेल तो श्रीनिवास कसला? पूर्ण पावसाळा जवळपास "खूप पाऊस आहे आज नको सायकलिंग "या नावाखाली काढला. मध्येच जुलै मध्ये बंगलोर क्लब च ५१ किमी १५ दिवस असं चॅलेंज घेतलं. त्यातले ८ दिवस अगदी न चुकता सायकलिंग झालं. यात बरेच वेळा मनोज दादा सोबतीला असायचा. मध्यंतरी माझी नवीन रोडी TRIBAN RC १२० आमच्या ताफ्यात दाखल झाली. मग मात्र जोरदार पाऊस सुरु झाला. इतर अनेक सदस्य ज्यात मनोज दादा देखील होता त्यांनी मात्र चिकाटीने हे चॅलेंज पूर्ण केलं. मग आला महापूर. याने सगळ्यांचं जीवनच बदलून टाकलं. आम्ही गावाबाहेर असल्याने आमचं जरी काही नुकसान झालं नाही तरी आम्ही चिपळूण ला रोज मदतीला जात होतो. पण अशा तर्हेने सायकलिंग मात्र राहत होत.
ऑक्टोबर महिना उजाडला. ऑक्टोबर च्या १५ नंतर मी पूर्ण मोकळी झाले. नोव्हेंबर महिन्यात BRM चा नवीन कॅलेंडर वर्ष सुरु होईल. जर BRM करायच्या तर आतापासून परत सुरवात करायला हवी. दुर्दैवाने चिपळूण च्या आजूबाजूच्या चारही बाजूंचे रस्ते इतके खराब आहेत कि बोलायची सोय नाही. साधे सरळ ५० किमी करायचे तरी सरळ रस्ता नाही. मग आहे त्याच अलोरे शिरगाव अशा जवळच्या रस्त्यावर फेऱ्या मारत राहणे हेच करत बसलो. तेव्हा मात्र आळस झटकून अगदी रोज सायकलिंगला जात होते. सायकलिंग मध्ये श्रीनिवास माझा गुरु. तो सांगेल ते सगळं मी ऐकणार. सुरवातीला तो म्हणाला MTB घेऊन जा रोज. लेकाची Btwin Rockrider MTB घेऊन आमच्या इथले चढ उतार पार करायचे म्हणजे जाम दमायला व्हायचं. अगदी १५किमी प्रति तास चा स्पीड जेमतेम मिळत असे. मी घाबरून गेले. १५ चा स्पीड ने BRM कशी पूर्ण होणार? पण श्रीनिवासवर विश्वास होता. जवळपास २ आठवडे MTB वर काढल्यावर मग २०० किमी BRM च्या आधीच्या आठवड्यात रोडीवर प्रॅक्टिस करायला श्रीनिवासने सांगितलं. रोडी हातात आली नि पहिल्याच दिवशी २० किमी प्रति तास चा स्पीड मिळाला. काय मस्त वाटलंय! MTB वजनाने जड असते त्यामुळे ती रेटायला कष्ट पडतात तर रोडी वजनाने एकदम हलकी असते त्यामुळे स्पीड ला पळते. विश्वास वाढला. बऱ्याच राईड ना मनोज दादा सोबत असायचा. सकाळच्या वेळी जाताना छान वाटायचं पण उन्हाची प्रॅक्टिस व्हायला हवी म्हणून ३/४ वेळा भर दुपारी जाऊन आलो. जमतंय याचा विश्वास वाढत गेला. सावंतवाडी क्लब ची २००BRM जाहीर झाली. हीच BRM आम्ही मागच्या वेळी tandem सायकल वर केली होती. त्यामुळे इथे जरा अति आत्मविश्वास होता. रस्ता माहिती आहे ,BRM चा अनुभव आहे, तयारी झालेली आहे तेव्हा जाऊया. म्हणून मी, श्रीनिवास आणि मनोज दादा यांनी नावे रजिस्टर केली. दापोलीच्या खानविलकरआणि पालवणकर यांनी पण नावे दिली.
आदल्या दिवशी जाऊन सावंतवाडीला पोहोचलो. इथेच संध्याकाळी मिपा सदस्य मोदक आणि नूलकर काका यांची भेट झाली. मनोज दादाच्या ओळखीने छान जागा मिळली. १३ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता BRM सुरु झाली. सावंतवाडी - खारेपाटण - सावंतवाडी असा प्रवास होता. सकाळच्या गार हवेत मस्त ६० किमी भरभर पूर्ण झाले. नाश्ता करून निघालो. मग मात्र ऊन चढायला लागलं. कोकणातले रस्ते म्हणजे फक्त चढ उतार. त्यामुळे जस जस ऊन वाढत होत तसतसा उन्हाचा त्रास जास्तच जाणवायला लागला. काही केल्या खारेपाटण येईना कि बोर्ड दिसेना. आपल्याला हवं ते गाव ,शहर हे बोर्ड कधीच का दाखवत नाहीत कोण जाणे ? मध्येच नडगिवे चा घाट आहे हे माहित होत पण अधलेमधले चढ पण इतके दमवत होते कि घाट कसा पार करणार याच खरं तर टेन्शन येत होत. खारेपाटणला खाण्याची सोय केली आहे असं आयोजकांनी सांगितलं होत म्हणून बाकी काहीच मध्ये खाल्लं नव्हतं. एकदाच नडगिवेचा उतार आला. पूर्ण उतार फुल्ल स्पीड मध्ये उतरलो तर खारेपाटणला मनोज दादा, खानविलकर, पालवणकर आमची वाट बघत बसलेले. आयोजकांचा पत्ताच नाही. "देवा! का रे हि शिक्षा मला "असाच मनात आलं. आयोजकांची गाडी बिघडल्याने तो सेल्फी पॉईंट केला गेला. म्हणजे त्या जागेवर सेल्फी काढायचा नि ग्रुप वर टाकायचा. त्यावर वेळ आपोआप येते. तिथे मात्र माझी अवस्था वाईट झाली. आधीचा आठवडाभर पाऊस, मग ना थंडी ना ऊन असं काहीस विचित्र वातावरण झालेलं. त्याचा चांगलाच त्रास झालेला. तरी श्रीनिवास दर १५ मिनिटाला पाणी प्यायची आठवण करून द्यायचा. ह्युमिडिटी मुळे खूपच दमायला झालं. त्यात त्या ठिकाणी ना खाणं ना पाणी अशी अवस्था. आम्ही ५हि जण एकत्र होतो. तिथून परत फिरलो नि एका हॉटेल मध्ये जेवलो. त्या सावलीतून निघायचं जीवावर येत होत." २०० च्या BRM ला जर माझी अशी अवस्था झाली तर पुढच्या BRM कशा झेपणार ?" राहून राहून हेच विचार मानत येत होते. "सांगितलेलं कुणी यायला ?""मोठी शायनिंग मारायला आली, इथे २०० किमी नाही होत नि म्हणे SR होणार " हे आणि असेच विचार मनात यायला लागले. नुसते चढ दिसत समोर. सगळ्याचा परिणाम म्हणून मी श्रीनिवासला सांगितलं कि मी काही पुढच्या BRM ला येणार नाही, माझा प्रवास इथेच संपला. यावर श्रीनिवास एकदम कूल."आता हि पूर्ण करायची ना?" म्हटलं,"हो हि नक्की वेळेत पूर्ण करणार. पुढच्या करायला मला फोर्स करू नको " लगेच श्रीनिवास, "पुढचं पुढे आता चल तर " म्हणून परत सुरवात केली. श्रीनिवास बऱ्याचदा अशा वेळी भाष्य करायचं टाळतो. शांत राहतो जेणेकरून मीदेखील शांत होते. हळूहळू करत नडगिवेचा घाट पूर्ण केला आणि मग मोठा उतार मिळाला. इथे मात्र फुल्ल स्पीड मध्ये उतार उतारला. आता जरा परत बरं वाटत होत. फास्ट अँड अप च पाणी पिणं अखंड चालू होत. आवडत नव्हतं तरी इलाज नव्हता. ३. ३० नंतर जरा सूर्य खाली गेला आणि मग परत स्पीड आला सायकल चालवायला. मग मात्र जोशात परत सुरवात झाली. मनोज दादा थोडा पुढे होता तर मी नि श्रीनिवास एकत्र होतो. मजल दरमजल करत परत एकदाच सावंतवाडी गाठलं. तरीही किती वेळ तो झाराप चा चौक दिसेना. एकदा मात्र तो दिसल्यावर जीवात जीव आला. २०० किमी साठी १३.३० तास दिलेले होते. आम्ही १२.३० तासात हे अंतर पूर्ण केलं. वेळेवर पोहोचल्याच समाधान होत. जुने ओळख झालेले सावंतवाडीचे मित्र भेटायला आलेले. आयोजकांनि तिथे खाण्याची चांगली सोय केली. अशा तर्हेने हि पहिली स्पर्धा पार पडली. एकदा शेवटच्या टप्प्यावर वेळेत पोहोचल्यावर आणि थोडी विश्रांती झाल्यावर मग बरं वाटलं आणि अशी थोडी विश्रांती झाली तर अजून १०० किमी आपण नक्की पार करू शकतो याचा विश्वास आला. भर दुपारी अजिबात नाही म्हणणारी मी संध्याकाळी "बघू ३०० करायची का ?" यावर आले आणि रात्रीच्या विश्रांती नंतर तर ३०० ला जाण्याचं नक्की ठरलं.
बरोबर असणारा मनोज दादा वय वर्ष फक्त ५२. तो खरं तर मागच्या वर्षी येणार होता पण श्रीनिवास नको म्हणाला म्हणून थांबला. यावेळी मात्र फुल्ल तयारी करून आला होता. फक्त २०० किमी करायची एवढाच त्याच उद्दिष्ट होत. पण ते चांगल्यापैकी साध्य झालं नि आपल्यलाला जमतंय म्हटल्यावर तोदेखील ३०० साठी तयार झाला. आता ३०० कुठल्या रूटवर करायची या चर्चेची सुरवात झाली.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

झकास सुरुवात.

फोटो कुठे आहेत?

मालविका's picture

30 Dec 2021 - 9:03 pm | मालविका

फोटो चिकटवणे अजूनही जमत नाही.

मुक्त विहारि's picture

22 Dec 2021 - 7:44 pm | मुक्त विहारि

वाचत आहे

Nitin Palkar's picture

22 Dec 2021 - 7:54 pm | Nitin Palkar

सुरेख वर्णन. प्रयत्न चालू ठेवा. ६०० किमी नक्की पूर्ण कराल.

गोरगावलेकर's picture

26 Dec 2021 - 10:46 am | गोरगावलेकर

अभिनंदन आणि पुढच्या शर्यतीस शुभेच्छा !