***हरिश्चंद्रगडावरचं खरेपणं***

लेखनवाला's picture
लेखनवाला in जनातलं, मनातलं
10 Oct 2021 - 11:06 pm

*******
मागच्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली पिकनिक यंदा हरिश्चंद्रगडाला जाऊन पूर्ण होणार होती. ही सगळी कामावर गट्टी जमलेली दोस्तीयारीतली माणसं. सगळ्यांचं एकत्र असं मागच्या कित्येक काळापासून भेटणं झालचं नव्हतं. पिकनिक कमी आणि ट्रेक जास्त होता. कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन बसावं असा साधारण मूड असताना कशाला उगाच पाय थिजवत डोंगर-माथा चढायचा असा विचार मनात होता, मग हरीश्चंद्रगड नको तर तू ठिकाण सांग, आणि असं कुठलं ठिकाण माझ्या डोक्यात नसल्यामुळे आणि सांगितलं तरी पुढची सगळी पुढारीपणापासूनची जबाबदारी आपल्या खांद्यावर येऊन पडेल या विचाराने हरिश्चंद्रगडाला भेट देण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरलाच नव्हता.

चारचाकी गाडी ड्रायव्हर सोबत घेऊन जाण्याच्या ठरावाने शनिवार-रविवारची सुट्टी जोडत एकदाचा व्हाटसअँपवर खूप काळ गप्पागोष्टीत रेंगाळलेला प्लॅन एकदाचा नक्की झाला. याअगोदर हरिश्चंद्रगडाला जाणं झालं नसल्यामुळे एकूणच उत्सुकता लागून राहिली होती. पिकनिकला जाणाऱ्या नेहमीच्या काही मंडळींचं शेवटच्या क्षणी टांग देण्याचे प्रकार लक्षात घेत सक्त ताकीद देऊन पाहिली पण ती दिल्यावरही हो-नाही करता करता शेवटी एकदाची दहाच मंडळी तयार झाली, चारचाकीत दहा जण मावणार नाहीत हे लक्षात घेत मग एक बाईकही प्रवासासाठी घेण्यात आली. त्या बाईकवरून आलटून-पालटून प्रवास करण्याचं सगळ्यांनी मान्यही केलं.

आम्हाला पाचनई गावात पोचून हरिश्चंद्रगड गाठण्याचा कार्यक्रम सुरु करायचा होता. हरिश्चंद्रगडाकडे जाणा-या जवळच्या वाटेपैकी ही एक. शनिवारी सकाळी सहा वाजता ठाण्याला निश्चित जागी भेटण्याचं ठरलं होतं, पण ठरल्याप्रमाणे काही होत नसल्याचा मागचा अनुभव दांडगा असल्यामुळे गाडी निघेपर्यंत सात वाजलेच. ठाण्यावरून पाचनईला पोचायला एकशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास करायला साधारण पाचऐक तास तरी लागतील असा अंदाज होता. पावसाचे दिवस असले तरी पाऊस काही पडत नव्हता. ड्रायव्हर पकडून गाडीत सगळ्याचं साधारण वय पंचवीस-सव्वीसच्या आसपास होतं. त्यामुळे एकमेकांची खेचणे, टिंगल-टवाळी करणे अशे नसते उद्योग खूप जोरात सुरू होते. ड्रायव्हर या साऱ्या मैफिलीला काही वेळातच सरावला होता. गाडी कसारा घाट ओलांडून घोटी मार्गे राजुरला पोचणार होती. राजूर हे बाजारहाटीचं मुख्य ठिकाण असून तेथून आत मध्ये साधारण बावीस ते पंचवीस किलोमीटर पाचनई गाव होतं.

मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे बाहेर निवांत फिरण्यासाठी जाताच आलं नव्हतं. या अगोदर त्या भागातला मुक्काम हा रतनगडाला झाला होता, त्यावेळी भंडारदरा, रांधा वॉटर फॉल इत्यादी दोन वर्षांपूर्वी ऐन पावसात पाहून झालं होतं. त्यामुळे निसर्गाचा हिरवागार माहौल काय असू शकतो याचा निव्वळ अंदाज गाठीशी होता.

यावेळी, हरिश्चंद्रगडाकडे जाण्याच निश्चित झाल्यावर तिथली इंत्यभूत माहिती जमा करण्यासाठी युट्युबचा आधार घेण्यात आला. तिथून मिळालेल्या माहितीनुसार, पाचनई गावातून हरिश्चंद्रगडाला जाणारा सगळ्यात जवळचा मार्ग आहे असं कळलं, गडावर रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था असते हेही समजले, मग स्थानिक स्तरावर जेवणाची व राहण्याची व्यवस्था करणाऱ्या माणसांचे मोबाईल नंबर मिळवले, राहण्या-खाण्याचा सरासरी माणशी कितीसा खर्च होईल याचा अंदाज घेतला, आणि त्याप्रमाणे पिकनिकला येणाऱ्या कडून कॉन्ट्री घेणे सुरू केले.

पाचनई गावच्या तरुणाशी फोनवर बोलून आम्ही आता सकाळी निघत असून दुपारपर्यंत पोचू असं कळवण्यात आलं. एकदाचा प्रवास सुरू झाला, सुरूवातीचे टोल नाके आणि शहराकडचा गजबजहाट सुटला की मग निवांत मोकळे रस्ते, सुसाट वेगाने चाललेल्या गाड्या, रस्त्याच्या दुतर्फा नजरेस पडणारी हिरवळ याने खऱ्या अर्थाने एका सुखकर प्रवासाला निघालो असल्याचा जाणीव करून दिली. पावसाची रिमझिम मात्र या साऱ्यात कुठेच नव्हती. पण एकूण वातावरण मात्र आल्हाददायक होतं, गाडीच्या प्रवासातली गाणी हा एक वेगळाच विषय, गाणी वाजतात, तुमचं मन मग नुसतं प्रवासात लागत नाही त्यासोबतच तुम्ही कुठल्यातरी विषयाला,आठवणीला स्पर्श केलेला असतो काही विषय नाजूक होऊन बसतात, मन तिथेचं अडून राहत, काहीसे मग तुम्ही नुसतेच नॉस्टेलियजिया फील करु पाहता, मग एका क्षणाला गाणं संपत आणि मग तुम्ही होता तिथचं भानावर येतं प्रवासात असल्याचं कळतं, मन पुन्हा एकदा प्रवासातल्या रस्त्यावर येतं, आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागतं. कसारा घाटाच्या मागे आसनगावच्या आसपास रेल्वे ट्रॅक वरून जाणारी मालगाडी लक्ष वेधून घेत होती, आणि आपल्या चारचाकीशी स्पर्धा तर करत नाही ना अशी उगाच मनात कल्पना येऊन गेली. सकाळचे साडे नऊ वाजले असतील, गाडी इगतपुरीच्या रस्त्यावर नाश्त्यासाठी थांबली, जिकडे बघावं तिकडे नुसतचं मोकळं हिरवगार रानोमाळ, इतका विस्तीर्ण मोकळा निसर्ग मागच्या दोन वर्षात नजरेस पडलाच नव्हता.

2
2

*******

महाराष्ट्रातल्या रस्त्यांची दुरवस्था हा आता नुसता चावून चौथा झालेला विषय, गाडीने राजूर सोडलं, आता केवळ बावीस किलोमीटरचं अंतर राहिलं होतं, पण गुगल मॅपवर या अंतराला एक तास लागेल असं सांगण्यात आलं, कोणत्याही प्रकारचं ट्राफिक असण्याचा प्रश्नच नव्हता, मग का बरे इतका वेळ लागेल, उत्तर मिळालं, या रस्त्याची निघालेली खरडपटटी, अशरश: या रस्त्याची चाळण झाली होती, कोणत्याही प्रकारचा माय-बाप या रस्त्याला उरलाच नव्हता, गाडी अश्या रस्त्यातून काढणं जिकरीचं आणि जोखमीचं होतं होततं, गाडीने ब-यापैकी अंतर पार केल्यावर, एक भलामोठी ‘हरिश्चंद्रगड अभयारण्यात स्वागत’ लिहलेली कमान लागली, काही गाडया अगोदरच थांबल्या होत्या, एक छोटी चौकी होती, तिथं प्रवेश फी भरण्यास सांगितली, प्रत्येक माणशी तीस आणि गाडीचे शंभर रुपये आकारले गेले, गाडीच्या क्रमांकाची नोंद करुन घेतली आणि पैसे भरल्याची पावती दिली गेली. हे घेतले जाणारे पैसे आणि आतापर्यंत सोसत आलेल्या रस्त्याच्या प्रवासाचा काही तरी असंबध-संबध आहे एवढं मात्र तिथल्या तिथं कळून आलं. इतक्यात शेवटाला गाडी पाचनाई गावात दाखल झाली. गावाच्या वेशीवर अजून एक चौकी होती तिथ मागच्याच पावत्या चेक करुन प्रवेश देण्यात आला. ज्यांच्याकडे राहायची-खायची सोय केली होती त्याला फोनाफोनी केली, गावात मोबाईल नेटवर्क नुसतचं नावाला होतं, पर्यटकांची रेलचेल मोठयाप्रमाणात दिसून येत होत्या, गाडयांचे ताफेचे ताफे लागलेले दिसत होते. एकदाचं आम्ही निश्चितस्थळी पोहचलो, दुपारचे दोन वाजले होते, गाडी एका बाजूला व्यवस्थित पार्क केली गेली, बाहेर पडताच आजूबाजूचं वातावरण पाहण्यात गुंगुन गेलो, काहीशी मळभ होती, थोडसं आळसावल्यासारखं होतं होतं, बघावं तिकडे मोठमोठाली डोंगररांग नजरेस पडत होती, ज्यांच्या घरी जेवण्याची व्यवस्था केली होती तो देखील आमच्याच वयाचा सूरदास (नसत्या उठाठेवी नको म्हणून नाव बदलयं) नाव त्याचं. महादेव-कोळी समाजाची माणसं, घराची रचना कूडाची, छप्पराला गवताच्या भा-या पार जमिनी पर्यंत टेकलेल्या, आतली जमिन मातीची, आधुनिकतेचा कुठलाच मागमूस इथल्या घराला नव्हता अपवाद फक्त छप्परावर टाकून ठेवलेल्या छोटेखानी सोलार पॅनलचा.

3

*******

येताच तिथल्या एका स्थानिकांशी बोलणं सुरु झालं, कितीसा वेळ लागेल गड चढायला, एक-दीड तासात पोचालं त्याने त्यांच्या अंदाजाने सांगितलं म्हणजे आपल्याला दोन-अडीच तास लागतील असा लगेच मी कयास बांधला. त्याने समोरच्या दिशेला बोट केलं, तिथूंन वरच्या बाजूला बघितलं त्या डोंगररांगातल्या कपा-यात माणसं कपडयाच्या रंगावरुन ओळखून येत होती पण पार मुंगीएवढी दिसत होती. आपल्याला पण तिकडचं जायचं आहे हे कळत तर होतं पण पोटाला भूक लागून राहिली होती, सूरदासने जेवणं बनत असून थोडावेळ बाजूच्या खोलीत बसण्यास सांगितलं. त्या खोलीत प्रवेश करताच अंधार असल्याचं एकदम कळालं, लाईट गेल्याचं सूरदासनं सांगितलं, इथं अशी बहुतेकवेळा लाईट जाते हे त्याने अगदी नेहमीचचं असल्याच्या सूरात सांगितलं, घरावर सोलार उपकरणं का बसवलं हे एकदमच लक्षात आलं. या जेवणात पण शाकाहारी आणि मांसाहारी असा प्रकार होताच, मांसाहाराला थोडा वेळ होता, मग शाकाहार तयार होता, मग मी आणि अजून एकजण जेवायला बसलो, मटकी आणि बटाटयाची मिक्स भाजी, आणि गरमा-गरम बाजरीची भाकरी, जेवण पोटात गेल्यावर हायसं वाटलं, तितक्यात अनोळखी एकजण तिथं आला, सूरदासने त्याला बसायला दिलं, तो हिंदीत बोलत होता, “अरे मूझे इतना उपर चढना नही जम रहा था तो मैं वापस आ गया, मेरा खाना यही दे दो”, सूरदासही आपल्या हिंदीत सुरु झाला ”पर आपके लिए खाना उपर बनाया था, अलगसे पिठला बना या था, अब ठीक है बैठो इनके साथ” मग तो ही अगदी जेवणावर तूटून पडला. हा गड खरचं कठीण आहे का असा प्रश्न मनात घर करु लागला. सूरदासशी जूजबी बोलणं झालं, तो म्हणाला सगळं घर शेतीवरचं चालतं, त्यातही फक्त भात पिकतो, मागच्या दोन वर्षांपासून पर्यटन बंद असल्यामुळे रोजगाराचा प्रश्न भेडसावत होता, इथे शाळा केवळ प्राथमिक, ती ही मागच्या दोन वर्षांपासून बंद, ऑनलाईन शिक्षणाला लागणारा मोबाईल आणि वीज दोन्ही गोंष्टीची इथे प्रंचड वाणवा दिसून येत होती. पहिलीतल्या मुलाला आता डायरेक्ट तिसरीला टाकणार आणि त्याला विचारलं तर त्याचं नावही गिरवता येणारं नाही अशी सध्याची अवस्था असल्याचं त्यानं सांगतिलं. जेवण झाल्यावर नुसतचं फिरायचं म्हणून आजूबाजूला हिंडू लागलो, लाईट गेल्यामुळे असेल कदाचित सगळा परिसर शांत शांत होता, अश्या वातावरणाची कानांना सवय नव्हती, घरासमोरच्या बाजूला केवढयातरी उंचच उंच डोंगरकपा-या नजरेस पडत होत्या, त्या जुरासिक पार्कमध्ये दाखवतात अगदी तश्याच त्या वाटत होत्या, कधी एखादा डायनॉसर त्या काताळावरुन खाली झेप घेईल असं वाटतं होतं, इथल्या घरच्या म्हाता-या बाया-बापडी निवांत बसून होते, बाकी जगाचं रहाटगाड कसं चालतं यांची इथल्या कुठल्याच परिसराला फिकीर नव्हती, एकदमच निवांतपणा होता, पण याला का कोणजाणे गरीबीची झालर होती, सरकार खूप काही इथं करु शकत यांची प्रचिती आली, या माणसांना अजून किती वर्ष लागतील मुख्य प्रवाहात आणायला कोण जाणे, यांना पाहिलं की पटत का आरक्षण गरजेचं आहे, सूरदास सांगता सांगता म्हणाला, इथल्या कोणीच आपल्या जमिनी विकत नाहीयं, आम्ही मूळनिवासी आहोत, कुणी बाहेरच्या माणसाने येऊन डेव्लपमेंट केल्याशिवाय इथे काहीएक सुधारणार नाही असंही त्याला वाटतं, सूरदासचं स्वतःच शिक्षण दहावीपर्यंतच झालेलं, पण एकूण तो बोलण्यात पाहुणचार राखण्यात पटाईत वाटला, इथं कोणी सहसा आजारी पडत नाही, पडल तरी अंगावर दुखण काढलं जातं, डॉक्टरचा दवाखाना येथून पंधरा किलोमीटर आहे, सध्या ब-यापैकी लोकांचे किमान एक कोरोना लसीचे डोस घेवून झाले आहेत गावात. संडासची मात्र सोय अगदीच कूचकामी होती, आतल्याबाजून कढी नव्हतीच.

*******

मग थोडयावेळाने मांसाहारी जेवण तयार झालं, बाकी मित्राचं जेवण होईपर्यंत चार वाजले. आता इथून निघायचं, वरती गडावर पोहचायचं, रात्री तिथचं राहायचं आणि सकाळी परतायचं, राहायची-खाण्याची सोयवरती गडावरचं करण्यात आली होती. ड्राईव्हरलाही आम्ही आमच्यासोबत वरती येण्यास सांगितलं आणि तो तयारही झाला. सगळ्यांनी बॅगा आणि बाकी गोष्टी ट्रेकसाठी गोळा करण्यास सुरवात केली, शेवटी निघायला साडेचार वाजले. गडाची वाट दाखवण्याची काही गरज नव्हती, सतत माणसाचां वरती आणि खालती राबता चालूच होता.

हरिश्चंद्रगडाला ट्रेकर्स लोकांची पंढरी म्हणतात हे ऐकून होतो पण आता ते सगळं अनुभवायचं होतं, इथे अगदी सुरवातीला जिथून गड सुरु होतो तिथे एक कमान आहे, लोकाचं सेल्फीपुराण इथूनचं सुरु होतं आणि शेवटी गड उतरल्यावर इथचं येऊन संपत. मी मागचे कित्येक महिने अशी चढण न चढल्यामुळे पहिल्या दहा मिनिटाचं धापा लागू लागल्या, माझ्याबरोबरच्या सहका-यांचा ही साधारण असाच अनुभव होता, हदयाची धडधड अगदीच स्पष्ट जाणवत होती, फुफ्फुसं, श्वसनप्रकिया जलद गतीने होत असल्याचं जाणवत होतं, पुन्हा एकदा थांबलो. गडावरुन खाली येणा-या माणसाकडे बघितल्यावर आपण पण सकाळीचं आलो असतो तर एवढा थकवा जाणवला नसता असं उगाच वाटू लागलं. मध्ये मध्ये दगडावर किती मीटर अंतर उरलयं याबदल लिहिलं होतं, वातावरण थंड असल्यामुळे गरमी अशी खास काही जाणवत नव्हती.

यात विशेष बाब ही की कुणीही मास्क घातला नव्हता, अगदी आम्हीही. जसे जसे वरती जाऊ लागलो तसे तसे वर जाणा-याची संख्या कमी होऊ लागली होती आणि उतरण्या-ची संख्या वाढत असल्याचं नजरेस येत होतं. थकवा आला की थांबण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हताच, याशिवाय खांदयावरची जड बॅग अधिकचचं ओझं होवून बसली होती. थोडया थोडया अंतराने वरती पोचल्यावर, खाली बघितल्यावर आपण किती उंचावर आहोत ते कळतं होतं. काही ठिकाणी चढणीच्या रस्त्यावर लोंखडी शिडया होत्या, काही ठिकाणी चढणीची नुसतीच पायवाट होती, बाकी रिस्की म्हणावं असा कोणताही पॅच अजूनतरी लागला नव्हता, पण दम मात्र लागत होताच, मधल्या भागात मग सरळ चालणं सुरु झालं, त्या गुहेसारख्या दिसणा-या भागात आत मॅगी आणि मक्याची कणसं विकणं चालू होतं, काही माकड आणि त्यांची पिल्लं देखील नजरेस पडली. साधारण एक-सव्वातास उलटून गेला असेल आता एक झरा काठ नजरेस पडला तिथंदेखील एक लोंखडी कमान घातली होती पावसाळी प्रवाह वाढल्यावर झरा पार करण्यासाठी, गडावरुन खाली उतरण्यापैकीं काही वयाने बुजुर्ग होते, या वयात इतकं उत्साहाने येणं कमाल होतं. गड चढणं सुरुचं होतं, आता पुन्हा चढणीची वाट सुरु झाली, काही उतरत असलेल्यापैकी एक-दोघांना विचारणा केली तेव्हा कळालं अजून साधारण अर्धा तास उरला होता गड सर करण्यासाठी, दमायला होत होतं, पण उत्सुकता शिगेला पोचली होती. आता एक फक्त शंभर मीटर बाकी असल्याचा दगड नजरेस पडला, आता गड उतरण्याची संख्या तुरळक होऊ लागली. संध्याकाळचे सहा वाजले होते पण ते फक्त नावाला कारण आजूबाजूचं वातावरण काही वेळेशी मेळ खात नव्हतं असं वाटत होतं की पहाटेचे पाच वाजले असावे, एकदाची ती चढणं संपली, आणि मग सभोवार नजरेस पडली ती हिरवीगार डोंगरकपार, त्यातून एकास एक करत येणा-या धुक्याच्या चादरी, आता इथं पुन्हा फोटोसेशन सुरु झालं, तसं बघायला गेलं तर गड आता फक्त पंधरा मिनिटावर होता, त्यामुळे सारेजण रिलॅक्स होते, आपण ही निसर्गाचाचं एक भाग आहोत, फक्त आपल्याला जाणीव आहे, आपल्याला भावना आहेत, आपण विकसित मेंदूप्रणालीने आजूबाजूचा भोवताल अनुभवू शकतो, त्यावर प्रतिक्रिया देऊ शकतो हा सगळा एक भाग पण मग त्या एकूण सगळ्या जगाच्या मूळतेचा घटक असलेला निसर्ग कुठल्याच घाईगडबडीत नसल्याचं कळतं, यांच्या मनात नेमकं काय असेल, आपल्या इथं असण्याचं प्रयोजन तरी काय, इतक्या मोठया वैश्विक अवाढव्य पसा-यात आपलं अस्तित्व खरचं आहे की आपण नुसतेचं या एकूण ऊर्जा प्रकियेतून घडलेली एक अवस्था किंवा स्वरुप आहोत, काळ खरचं आहे की आपली जाणीवक्षमता तशी असल्याचा भास करुन देत आहे, आजच्या आधुनिक जगातले ताण खरचं घेण्याची, करिअर, पैसा यांच्या मागे धावण्याची खरचं गरज आहे का? की सगळचं क्षणभुंगर आहे. इतक्या दिवसात मनात घर करुन राहिलेलें प्रश्न आज मी निसर्गाला इतक्या जवळून अनुभवून सोडवू पाहतोय.

4
*******

गडाकडच्या भागात महादेवाचं मंदिर असल्याचं समजलं होतं, आमच्या या गडचढाईच्या कार्यक्रमात दोन शिवभक्त होते, ते हे तिथं संध्याकाळी आमच्यासोबत वर गडाकडे कूच करत होते. एकदाचे तिथं लावलेल्या झोपडीवजा घराच्या बॅनरमधून आम्हाला अपेक्षित असलेले नाव धुंडाळीत एकदाचे निश्चितस्थळी पोहोचलो, जिथे वरती मुक्काम करायचा होता त्याला ही लोक हॉटेल म्हणत होते, त्या तिथल्या हॉटेलच्या बाहेरच्या बॅनरवर मुक्कामाची व्यवस्था करण्या-चं नाव, मोबाईल नंबर आणि उत्तम शाकाहारी जेवण्याची व्यवस्था होईल असं लिहिलं होतं. वरती महादेवाचं मंदिर असल्याकारणानं मांसाहारी जेवण बनवणं निषिदध. अश्या ब-याच झोपडीवजा खोल्या नजरेस पडत होत्या. आम्ही पोचल्यावर कळालं की अजून दोघ जण आमच्या अगोदर तिथं आले होते, म्हणजे आता तिथं बाराजण रात्री मुक्कमाला होते, त्यांच्या जेवण्याची व्यवस्था करण्यासाठी तिथं एक आजीबाई होत्या, त्यांना रात्रीच्या जेवणाविषयी-राहण्याविषयी विचारलं. जागा म्हणाल तर सगळ्यात आत चूलीची व्यवस्था होती ती दहा बाय दहाची खोली, झापाच्या भिंतीला लाकडाचा आधार दिला होता, त्याला लागून बाहेरच्या बाजूला झोपण्यासाठीची खोली आणि बाहेर एक पडवी. नुसतीच जमीन, त्यावर बसण्यासाठी म्हणून प्लॅस्टिक अथरलेलं, सगळ्यांनी त्या मधल्या जागेत बॅगा ठेवल्या, त्या अगोदरपासून आलेल्यांसोबत थोडी विचारपूस केली त्यावर कळालं की ते मुरबाडमार्गे पाच तास चालत इथंपर्यंत आले होते दुपारी तीन वाजता. ते ही दोघं मुंबईचे. इथून अर्ध्या तासांवर कोकणकडा होता तिथं सकाळीच जाणार होतो, आता ब-यापैकी अंधार होत आला होता. ब-या प्रमाणात चार्जिंग टयूबलाईट प्रत्येक घराच्या झरोक्यातून नजरेस पडत होत्या, त्या गडाच्या परिसरात नेटवर्क गुल होतं, घरी फोन करुन सांगायचं राहूनच गेलं होतं, गडावर नेटवर्क नसेल यांची बिलकुल कल्पना नव्हती. जेवण बनण्यास एक-दीड तासाचा अवधी होता, त्यामुळे त्या अंधारातच आजूबाजूचा परिसर फिरु लागलो, पावसाचा मौसम असल्यामुळे त्या गडावरच्या परिसरात ब-याच ठिकाणी पाणी होते, अंधारात फिरायचं म्हणून मोबाईलच्या प्रकाशाचा आधार घेतला. त्या घडीला तिथं नाही म्हटलं तरी शे-दोनशे लोकं सहज रात्रीच्या मुक्कामाला होती, इतक्या प्रमाणात लोक रात्रीच्या वेळी येतात यांचा अंदाज घेत सरकारने मोठाले हाय मास्क लाईट लावायला हरकत नव्हती, किमान त्या मंदिराच्या परिसरात तरी तसं करायला हवं होतं. आता बारीकशी का होईना थंडी जाणवू लागली, त्या मंदिरात प्रवेश केला, पाषाणात घडवलेल्या त्या मंदिराचं बांधकाम पुरातन असल्याचं दिसून येत होत, या मंदिराची डागडुजीची वेळ आली आहे असं सहजच कळत होतं, तिथल्या त्या शंकराच्या पिंडीवर एकजण मोठमोठयाने शिवस्त्रोत म्हणत होता, प्रदक्षिणा घालणं चालू होता, हे मघाशी नजरेस पडलेल्या त्या दोन शिवभक्तांपैकी हाच तो एकजण. दुसरा मंदिराबाहेर होता, त्यांच्या हातात चिलीम होती, तो या आतल्यांची कधी प्रार्थना संपते यांची वाट बघत असावा. “आमच्या दोघाच्यातं देवाचं वारं येत” तो चिलीम अधिकच हातात घटट पकडत सांगत होता. इथूनच थोडं वरच्या अंतरावर तारामतीचं शिखर होतं, त्या भागात सापाचं वास्तव्य जास्त. थोडावेळ त्या अंधारात मंदिराच्या परिसरात राहिल्यानंतर पुन्हा आम्ही वास्तव्याच्या ठिकाणी आलो.

*******

इतक्यावेळात त्या दोघांनी त्या बाहेरच्या पडवीत टेन्ट म्हणजे तंबू घालून घेतला, म्हणजे आता हे दोघे त्या तंबूत झोपणार हे पक्क झालं, आणि आम्हाला आतल्या खोलीमध्ये झोपावं लागणार होतं, तंबू तिथे मावलेच नसते. आता बाहेर येत नुसतेच उभे राहिलो, वारा जोरात होता, काळे ढग असल्याकारणाने आकाशातले ग्रह-तारे दिसण्याचा काही एक संभव नव्हता. बाजूला असलेल्या त्या हॉटेलातही काही पर्यटक आले होते त्यात काही मुलीदेखील होत्या, तिथं त्या एका कोप-यात नेटवर्क येत असल्याकारणानं खूप सारे जण आता जमा होत होते.

5

आता तिथं आलेल्या त्या दोघांशी आमची चर्चा सुरु झाली, सकाळी साडेसहाला गेलात तर तुम्हाला कोकणकडा पाहता येईल एकदा का दिवस सुरु झाला की मग धुक्यामुळें काही पाहता येणार नाही, ते दोघे सांगू लागले, ते सकाळी इथून सहा वाजता निघणार होते, याला काय अर्थ होता, इतकं पाच तास चालून आल्यानंतर लगेच सकाळी निघणार कारण काय तर राजूर गाठायला सकाळीच वाहन भेटेल गावातून जाणारी एसटी बंद आहे सध्या. ते सांगत होते त्यांच्या अनुभवाबदल, त्यांनी डाकबहिरी पाहा, रायगडावर जायचं असेल तर किमान दोन दिवस काढा, तिथचं गडावर राहणा-याकडेंच राहायची सोय करुन घ्या, रतनगडावरच्या काजवा महोत्सव इतका ही काही खास नसतो याचं निरीक्षण, राजगड, राजमाची याविषयी बोलणं चालू होतं. हे दोघेही अस्सल ट्रेकर वाटत होते. थंडी वाढत चालली होती, जेवण वाढली गेली, घरात मोठयाल्या चार्जिंग टयूबमुळे प्रकाश ब-यापैकी होता, पिठलं होतं, भात, बाजरीच्या भाक-या आणि मूगाची आमटी होती. जेवणं झाली, रातकिडयाचा आवाज वाढू लागला, बेडकाचं डरावं डरावं कानावर येतं होतं, गड चालल्यामुळे अंगावर आलं होतं, थंडी असल्यामुळे बाहेर फिरण्यास धीर होत नव्हता, तिथली ती तेवढीशी जागा दहा जणांना झोपण्यास कमीच पडत होती पण कसं तरी अडजस्ट केलं, तिथल्या त्या आजीने ही मग सगळं काही आटपत घेत चूलीपाशी अंथरुण टाकलं, मला वाटलं आता ही प्रकाशमान टयूब बंद होईल पण त्यांनी सांगितलं इथं उंदराचा वावर मोठयाप्रमाणात आहे त्यामुळे ती रातभर चालूच राहणार आहे, यात अंथरायला चादर आणायला हवी होती ती पण न आणल्यामुळे रातभर कूडकूडत डोळ्यावर प्रकाश झेलत काढावी लागणार होती.

*******

1

अंधाराशिवाय रात्रीच्या झोपेची सवय नसल्यामुळे एका कुशीवरुन दुस-या कुशीवर आलटून-पालटून डोळ्यावर दोन्ही हाताची घडी करत झोप येते का ते पाहू लागलो. एखादे वेळेस उंदीर येतो का ते ही पाहू लागलो, मग कधी तरी एकदाची झोप लागली. शेवटी एकदाची सकाळ झाली, इथं वेगळी अशी संडासची सोय नव्हतीच, त्यामुळे एखादा रानाकडचा अडवसा पाहून बसावं लागलं. किमान व्यवस्था इथं असायला हवी होती असं आता राहून राहून वाटतं कारण इथं नुसतेच पुरुष नाही तर महिलादेखील मोठया संख्येने येतात. आंघोळीचा प्रश्नच नव्हता, मशेरी लावली, तोंड धुतलं. ते दोघं उठून त्यांनी त्यांचा तंबू गुंडाळला आणि सहा वाजता जायला निघाले, आम्हाला आता कोकणकडा पाहायचा होता, सगळ्याचे सोपस्कार होईपर्यंत पावणेसात वाजले. आता गडाकडे खूप माणसं येताना दिसत होती. रात्री पाहिलेल्या गडाच्या परिसरात आणि आता सकाळी सकाळी पाहिलेल्या रुपात खूपच फरक होता, मस्त सगळीकडे हिरवगार नजरेस पडत होतं, धुक्याचा एखादा मोठाला पुंजका समोरचं सार काही अंधुक करुन टाकत होतं.

*******

शेवटी दरमजल करत कोकणकडा बघितला, धुक्कं आता ब-यापैकी आलेलं नव्हतं, तिथलं लोखंडी रेलिग संरक्षणासाठी होतं, पण लोक सहज ते पार करुन एकदम टोकाच्या दिशेने जात होते, कितीतरी खोल खोल हिरवीगार वनराई नजरेस पडत होती, इंटरनेटवर पाहिल्यामुळे साधारणतः आपण कश्यावर उभे आहोत यांचा अंदाज होता, पण जे त्या क्षणी डोळ्याने अनुभवत होतो ते शब्दात सांगण कठीण आहे, यांच ठिकाणी पावसाळ्याच्या सुरवातीला इंद्रव्रज दिसतं ज्यांच्याविषयीचा उल्लेख ज्ञानेश्वरीत आहेत असं मागे वाचनात आलं होतं, पण एकाएकी धुक्कं वाढत गेलं आणि मग कोकणकडा अनुभवता नाही आला, अजून थोडं लवकर यायला हवं होतं, पण ठीक आहे जितकं पाहिलं ते ही नसे थोडके. इथे कोकणकडयापाशी मोबाईलला नेटवर्क येतं होतं. जर धुक्कं नसेल आणि वातावरण स्वच्छ असेल तर कल्याणपर्यंतचा परिसर दिसतो असं कळालं पण त्यादिवशी ते काही आमच्या नशिबी नव्हतं. काही हरकत नाही पुढच्यावेळी या एकाच कारणासाठी येऊ.

इथेही सरकार प्रंचड निराशा करत, कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत, नायझरा धबधब्यासारखं काचेचं रेलिंग इथं उभं राहू शकत, ज्यांना पायी चालत येणं शक्य नाही त्यांच्यासाठी रोपवे सारख्या गोष्टी सरकारनं करायला हवं, त्याशिवाय शाश्वत विकास होणार कसा? मोठया प्रमाणावर पर्यटक आल्याशिवाय इथल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार कसा? आणि मग म्हणायचं शहरातलं बकालपणा वाढतो.

आता कोकणकडा पाहून झाल्यावर पुन्हा त्या महादेवाच्या मंदिरापाशी आलो, सकाळचे नऊ वाजले होते, आता संपूर्णपणे त्या परिसराला जत्रेचं स्वरुप आलं होतं, ब-यापैकी तरणीताठी पोरं-पोरी होती, मास्क अजिबात कोणीही घातला नव्हता, कोरोना इथे नाहीच आहे तो कुठे तरी दुरच्या प्रदेशात झालेला आजार आहे असा सगळ्यांचा अभिर्भाव होता, लोकांच्या हातात स्लेफीस्टीक, ट्रायपॉड, ग्रोप्रोसारखी गॅजेट नजरेस पडत होती, याशिवाय आपआपल्या ग्रुपसोबत ट्रेक करण्यासाठी एकाच रंगाचे ट्री-शर्ट घातलेली आणि त्यावर बॅच लावलेली उत्साही मंडळी दिसून आली.

तिथचं पुष्करणी नावाचं कुडं होतं, पाणी स्वच्छ नसलं तरी त्यात जिवंत मासे ब-यापैकी होते, त्याशिवाय ग्रुप फोटो काढण्यासाठीचा तो परफेक्ट पांईट होऊन बसला होता, मग तिथंही फोटो काढणं सुरु झालं. त्या पुष्करणीच्या खालच्या बाजूला गुहेत डोहासारखा भाग होता आणि ते पाण्याने तुडुंब भरलेलं होतं, त्या तिथचं शंकराची भल्लीमोठी पिंड होती, त्यात पोरं न्हात होती, त्या तिथले तीन खांब निखळले होते. त्या पिंडालाही लोक मनोभावे पूजत होते, हार आणि नाणी अर्पण करत होती.
महाराष्ट्र डोंगरकपा-याचा प्रदेश का म्हटला जातो ते पुण्या-मुंबईत सिंमेटच्या जंगलात आयुष्य काढणा-या आमच्या सारख्यांना इथं आल्याशिवाय कळायचं नाही. मला किंवा माझ्या सारख्या खूप सा-याजणानां या परिसराचा इतिहास, त्याचें ऐतिहासिक संदर्भ जाणून घेण्यात खूप स्वारस्य असतं, पण प्रत्येकवेळी तश्या व्यक्ती तुमच्यासोबत असतीलच असं नाही तर त्यासाठी शासनाने माहितीचे फलक लावायला हवेत असं सारखं सारखं वाटतं.

आता निरोपाची वेळ आली, सकाळचे साडेदहा वाजले जायला निघालो, रविवाराचा दिवस असल्याकराणाने खूप सा-या जणांचा गडाच्या दिशेने येणं सुरु होतं आणि आमचं उतरणं. उतरताना जास्त वेळ लागला नाही, पाऊल पटापटा टाकत एकदाचा पायथा गाठला तरी पावणेबारा वाजले. पुन्हा सूरदासपाशी आलो, ठरल्याप्रमाणे पैशाचे व्हवहार झाले, निरोप घेऊन झाले, सगळं काही नजरेत साठवत परतीच्या वाटेला निघालो. कोविडनंतरची पहिली ट्रिप पार पडली.
परतल्यावर ठरवून इथल्या समस्याबदल सरकारमधली आणि विरोधी पक्षाची नेते मंडळी आणि बाकी मिडीयाला बोचणा-या हरिश्चंद्रगडावरच्या खरेपणाविषयी टिविट केलं, पण अपेक्षेप्रमाणे काहीएक प्रतिक्रिया नाहीत, आशा करतो की पुढच्यावेळी भेट देणा-या अगोदर चित्र सकारात्मकरीतीने बदलेलं असेल.

-समाप्त
*******

–लेखनवाला
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )

समाजजीवनमानप्रवासभूगोलशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

कंजूस's picture

11 Oct 2021 - 4:28 am | कंजूस

बरेच बदल झाले आहेत वीस वर्षांत.

चौकस२१२'s picture

12 Oct 2021 - 6:45 am | चौकस२१२

हो ना .. तेव्हा फक्त मंदिर होत आणि त्याच्या गुहेत राहिलो होतो
आता कल्पना करवत नाही.... अर्हताःत एव्हरेस्ट चा जर हायवे झालाय तर महाराष्ट्रातील गडाच काय.... घेऊन बसलात
त्याआधी एकदा पन्हाळा विशाळगड प्रवास केलं होता तेव्हा विशाळगडावर "जागृत दर्गा" असल्यामुळे तिथे खरंच जत्रा असायची.. ती बकाल बाजू सोडून दूर असलेलया देवळाच्या गुरवाला पैसे देऊन त्याचं अंगणात आम्ही मस्त रात्र घालवली होती .. ती आठवण झाली ,,,,,

कंजूस's picture

12 Oct 2021 - 1:17 pm | कंजूस

शेवटचा फोटो

सुक्या's picture

11 Oct 2021 - 5:47 am | सुक्या

वास्तवदर्शी वर्णन . .

भारतात .. त्यातही महाराष्ट्रात वन पर्यटनाच्या खुप संध्या आहेत असे दिसते. मला भारतातला हायकिंग किंवा ट्रेकिंग चा अनुभव नाहे परंतु इकडे खुप डोंगर पालथे घातले आहेत. बर्‍याच ठिकाणी बेसिक सुविधा (टॉयलेट / मार्गदर्शक रस्ते/ बर्‍यापैकी बनवलेली पायवाट) असतात. अगदी फ्लश टॉयलेट नसले तरी किमान पीट टॉयलेट असतेच असते. जर मुक्काम करवा लागत असेल तर कँपींग करण्या साठी कँपसाईट केल्या तरी बराच फरक पडतो. त्यातुन उत्पन्न पण मिळेल.

सरकार काही करत नसेल तर गावकरी तेसे करुन शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करु शकतात.

लोकसंख्येचया परिणाम.. पूर्वी दादर चोपाटी पण स्वच्छ आणि सुंदर होती आता !
सुवर्ण मधय कसा गाठाण्याचा मार्ग कसा सापडणार अवघड आहे
-सध्याची गंमत बघा भाडीपा वर "कॅम्पिंग विथ स्टार्स" चालू आहे .. डोम्बलाचे कॅम्पिंग, पत्राचे च्या शेड खाली तंबू बांधणार , तयार जेवण .. म्हणे कॅम्पिंग.... नुसता दिखावा ... ग्लॅम्पिंग आहे ते !
- माती कशी खायची हे आपण उत्तम जाणतो...
- गणपती पुळे देवस्थान ज्याचा जीर्नोधाहर झाला... पैसाभरपूर पण नवीन बांधतांना जणू राजस्थान मधील आणि ते सुद्धा दगडाचे नाही तर साच्यातील काँक्रीट चे देऊळ बांधले... जुन्य कोकणी स्थाहपत्याचे पडसाद काहीही नाहीत ...

- जीर्णोद्धार म्हणलं कि दगडी देवळाना भडक तेलाचे रंग देणं !
- नैनिताल ला गेलो तर जणू आपण लक्ष्मी रस्त्यावर आहोत असा भास . शांतता नाही , भडक फेल्क्स
- दुर्मिळ गडावर मोबाइलला आहे कि नाही हे महत्वाचे !
-पैश्यची कमी नसते , कमी असते ते दृष्टीची

छान अनुभव ,छान लिखाण,त्यातला सुधारणांचे मुद्दे रास्त वाटले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Oct 2021 - 8:09 am | ज्ञानोबाचे पैजार

दोनवर्षांपूर्वी आमच्या हापिसच्या मित्रांसोबत पाचनई मार्गेच गडावर गेलो होतो. दोन दिवस वरती मुक्काम केला होता.
प्रेमात पडावा असाच गड आहे, कितीही पाहिले तरी समाधान होत नाही.
कोकण कड्याची भव्यता पाहून नजरेचे पारणे फिटते, तिथुन परत परत फिरावेसेच वाटत नाही.
कोकण कड्यावर गेले की मोबाईल ला थोडी रेंज मिळते.
पैजारबुवा,

मुळात हरिश्चंद्रगड हे पिकनिक ठिकाण नाही. गडावर यावं, गडाचं गडपण पहावं, हरिश्चंद्रेश्वर, केदारेश्वर मंदिरं निरखून पाहावीत. त्यावरचे प्राचीन शिलालेख वाचावेत, तारामती रोहिदास शिखरांवर जावे. जुन्नर दरवाजाची प्राचीन वाट न्याहाळावी. कधी नळीच्या वाटेने चढावं तर कधी बैलघाटानं सादडे घाटात उतरावं.

कशाला हवाय शाश्वत विकास? तुमच्या म्हणण्याप्रमाणे हाय मास्क लाईट्स लावले तर रात्रीच्या अंधारातला अनुभव कसा येणार? ग्रह, तारे, नक्षत्र कसं बघणार? तुम्हीच लिहिल्याप्रमाणे आताच गडावर इतकी जत्रा आहे तर सरकारने सोयीसुविधा निर्माण केल्या तर गडाची काय अवस्था होईल विचार करा. निसर्गाची हानी करुन होणार्‍या विकासाला काय अर्थ आहे? तसाही आत्ता स्थानिकांना रोजगार बर्‍यापैकी उत्तम आहे तिथं. नुसते फलक लावण्यापेक्षा गडाच्या प्राचीन इतिहासाविषयी, वास्तूंच्या महत्वाविषयक शिकवण देऊन स्थानिकांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले पाहिजे. यामुळे रोजगार पण मिळेल आणि गडाचं गडपण पण जपलं जाईल.

गॉडजिला's picture

11 Oct 2021 - 9:32 am | गॉडजिला

सहमत.

+१

तुषार काळभोर's picture

11 Oct 2021 - 9:22 pm | तुषार काळभोर

++१

हाय मास्ट दिव्यांच्या उल्लेखापाशीच अडखळलो. पुढे शंभर दोनशे जणांची गर्दी गडावर हे वाचून ठेच लागली. मध्यममार्ग वगैरे काही नसतो. चोरपावलांनी जत्रा सुरू झालीच आहे. एसी रूम्स, पंजाबी-चायनीज जेवण, नाश्त्याला मसाला डोसा काही लांब नाही.

चौकस२१२'s picture

12 Oct 2021 - 6:36 am | चौकस२१२

वाजून मौज वाटली या बाबत सिंहगडाची आठवण झाली .. पुण्याच्या एवढया जवळ असल्यामुळे आणि वरती जागा पण कमी असल्यामुळे तिथे प्रचंड गर्दी असतेच ( साहजिक आहे) पण तिथे जे जेवण मिळते त्या ईद्योगशील गावकऱ्यांचे एक कौतिक मात्र करावेसे वाटले त्यांनी " तंदुरी चिकन/ छोले भटुरे ,, भुट्टा मिलेगा क्या" या मागणीच्या दबावाला बाली ना पडता आपली कांनंदा भजी, झुणका, वांग्याची भाजी / भरीत / भाकरी आणि मातीचं बुडकुळ्यातील दही हा बेत कायम ठेवला आहे ( साधारण ५ वर्षापूर्वीचे सांगतोय )

लेखनवाला's picture

11 Oct 2021 - 7:58 pm | लेखनवाला

मध्यम मार्ग हवा

सुक्या's picture

11 Oct 2021 - 10:14 pm | सुक्या

शाश्वत विकास म्हणजे सगळ्या हाय फाय सुविधा आल्याच पाहिजे असे नाही. निसर्गाचे संवर्धन करुन सोयी सुविधा निर्माण करता येउ शकतात. सध्या मला तरी तिथे येणारी गर्दी ही अनियंत्रीत आहे असे जाणवते. वरती हाय मास्ट दिवे वगेरे याची गरज नाही परंतु येणारी गर्दी थोडी नियंत्रीत केली तरी बराच फरक पडेल.

म्हणजे नैसर्गीक विधी साठी जागा , रात्री मुक्काम करता येइल अशी कँपसाईट जिथे टेंट लावायची सुविधा, बांधलेली पायवाट, कुंपण वगेरे वगेरे. यामुळे एक नियंत्रीत्पणा येतो. आता जसे आओ जाओ घर तुम्हारा आहे ते कमी होइल. हे करुन रात्रीच्या अंधारातला अनुभव जरुर घेता येईल. त्याला कसलीही बाधा येणार नाही. तिथे येणारा पर्यटकही थोडा सिरियस होइल.

श्रीगणेशा's picture

12 Oct 2021 - 7:48 am | श्रीगणेशा

+१
सहमत.

ऐतिहासिक/नैसर्गिक ठेवा आपण आहे तसा जपून ठेवणं खूप गरजेचं आहे. शिवनेरी किल्ला हे एक छान उदाहरण म्हणता येईल - किल्ल्याच्या फक्त पायथ्याला/सुरुवातीला तुम्हाला खाण्या-पिण्याच्या आणि इतर सुविधा आहेत, नंतर तुम्ही इतिहासात प्रवेश करता.

चौथा कोनाडा's picture

12 Oct 2021 - 12:20 pm | चौथा कोनाडा

प्रचेतस यांच्याशी १००१ % सहमत !

आजकाल सांदणदरीत सुद्धा एवढी गर्दी व्ह्यायला लागली आहे म्हणे की काही दिवसात " सांदणदरीत चेंगराचेंगरीचे आमुकतमुक बळी" अशी बातमी वाचन्यात आली तर नवल वाटायला नको !

Rajesh188's picture

13 Oct 2021 - 8:14 pm | Rajesh188

गड किल्ल्यांची अवस्था भयानक आहे .ज्या काही वास्तू शिल्लक आहेत त्यांची नीट डागडुजी नाही.पाण्याची व्यवस्थित सोय नाही.नियंत्रण ठेवा पण लोकांची राहण्याची उत्तम सोय,रस्ते,हे असेलच पाहिजेत.
काही वर्षा नंतर फक्त डोंगर राहील बाकी सर्व खुणा पुसून जातील अशी अवस्था आहे.
आणि योग्य ते नियम करून सर्व व्यवस्था असलीच पाहिजे.

गोरगावलेकर's picture

11 Oct 2021 - 7:42 pm | गोरगावलेकर

आवडले वर्णन.
प्रचेतस यांच्या प्रतिसादाशी सहमत

कंजूस's picture

11 Oct 2021 - 8:39 pm | कंजूस

कुठे आहेत तटबंदी? दरवाजे? बुरुज?

सर टोबी's picture

11 Oct 2021 - 11:38 pm | सर टोबी

हा विषय अजून फारसा आपल्या जिव्हाळ्याचा झालेला नाही. तसेही हवा आणि पाणी याचे प्रदूषण आपल्या अस्तित्वाशी निगडित असूनही आपण हट्टाने मूर्ती आणि निर्माल्य विसर्जन, होळी साजरी करतो तेथे प्रकाशाच्या प्रदूषणाची कोण काळजी करेल?

रात्रीच्या वेळेस प्रकाशाची गरज माणूस सोडल्यास कोणत्याच सजीवाला नसते. त्यांच्या दृष्टीने ती अडचणच असते. असे असतानाही झाडाच्या खोडाला तीव्र उष्णता निर्माण करणारे दिवे बांधल्यावर ते झाड आणि त्या झाडावरील जीव जंतूंना काय यातना होत असतील याची कल्पनाच नको.

आसामात काही आदिवासी रात्रीच्या वेळेस प्रकाश निर्माण करून पक्ष्यांची शिकार करतात. दिव्यावर पतंग आणि किडे झेप घेतात रात्रीच्या अंधारात कृत्रिम प्रकाश इतर साजिवांसाठी अनैसर्गिक असतो.

चौथा कोनाडा's picture

12 Oct 2021 - 12:17 pm | चौथा कोनाडा

व्वा लेखनवाला, सुंदर तपशीलवार व वृतांत आवडला !
💖
अतिशय ओघवतं लेखन आहे, वाचायला सुरुवात केली आणि शेवटालाच पोहोचलो.

फोटो का दिसत नाहीयत ? कोणत्या साईटवरुन शेअरिंग केलेत ?
धागा संपादित करून फोटो पुन्हा डकवा. लेखाला चारचंद्र लागतील !

इरसाल कार्टं's picture

12 Oct 2021 - 4:44 pm | इरसाल कार्टं

पण फोटो दिसत नाहीत.

लेखनवाला's picture

12 Oct 2021 - 5:14 pm | लेखनवाला

प्रयत्न करून पण त्या attachment दिसत नाही. फेसबुक ची लिंक देतो. https://www.facebook.com/342595526352109/posts/907034136574909/?sfnsn=wi...

चौथा कोनाडा's picture

13 Oct 2021 - 5:40 pm | चौथा कोनाडा

प्रयत्न करून पण त्या attachment दिसत नाही. फेसबुक ची लिंक देतो.

तुम्ही फेसबु़कवरचे प्रचि टाकल्यामुळे दिसत नाहीत का ? त्याला "शेअर ऑल" करण्याची सोय नसते का ?

तुम्ही दिलेल्या फेबुलिंकवरुन प्रचि उघडले, पण ते फेबु मध्ये. त्याच प्रचिवर उजवी टिचकी ( राईट क्लिक) मारून ""Open Image in New Tab" हा पर्यायात प्रचि उघडावे. नंतर त्याची URL लिंक कॉपी करून इथे धाग्यात इन्सर्ट करावी.

उदा:

HNBDH2234123

तुम्ही शेअर केलेल्या फेबुवरच्या प्रचिची मी सांगितल्या प्रमाणे केल्यास खालील लिंक मिळते (एकदा खात्री करुन तपासुन घ्या) हिच लिंक मी इन्सर्ट केली आहे :

https://scontent.fpnq20-1.fna.fbcdn.net/v/t1.6435-9/244702476_9070388165...

लेखनवाला's picture

13 Oct 2021 - 11:36 pm | लेखनवाला

धन्यवाद! पुढच्यावेळेस असचं करतो

चौथा कोनाडा's picture

14 Oct 2021 - 5:19 pm | चौथा कोनाडा

+१

कंजूस's picture

15 Oct 2021 - 5:49 am | कंजूस

पण लेखाच्या संदर्भात काही नाहीत.

चौथा कोनाडा's picture

17 Oct 2021 - 1:14 pm | चौथा कोनाडा


गाडीच्या प्रवासातली गाणी हा एक वेगळाच विषय, गाणी वाजतात, तुमचं मन मग नुसतं प्रवासात लागत नाही त्यासोबतच तुम्ही कुठल्यातरी विषयाला,आठवणीला स्पर्श केलेला असतो काही विषय नाजूक होऊन बसतात, मन तिथेचं अडून राहत, काहीसे मग तुम्ही नुसतेच नॉस्टेलियजिया फील करु पाहता, मग एका क्षणाला गाणं संपत आणि मग तुम्ही होता तिथचं भानावर येतं प्रवासात असल्याचं कळतं, मन पुन्हा एकदा प्रवासातल्या रस्त्यावर येतं, आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागतं. कसारा घाटाच्या मागे आसनगावच्या आसपास रेल्वे ट्रॅक वरून जाणारी मालगाडी लक्ष वेधून घेत होती, आणि आपल्या चारचाकीशी स्पर्धा तर करत नाही ना अशी उगाच मनात कल्पना येऊन गेली. सकाळचे साडे नऊ वाजले असतील, गाडी इगतपुरीच्या रस्त्यावर नाश्त्यासाठी थांबली, जिकडे बघावं तिकडे नुसतचं मोकळं हिरवगार रानोमाळ, इतका विस्तीर्ण मोकळा निसर्ग मागच्या दोन वर्षात नजरेस पडलाच नव्हता.

+१