गावातल्या गजाली : पाटलांची स्कुटर

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
14 Sep 2021 - 4:42 am

एका ओळखीच्या मुलाचे लग्न होते. मी मानलेली बहीण असल्याने मला सर्वत्र मानाचे निमंत्रण होते. लग्न झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी मोठी मेजवानी ठेवली. आमचे भाऊ हे मध्यमवर्गीय परिवारांत जन्माला आले होते आणि मुलीच्या प्रेमात पडले होते तेंव्हा गरीबच होते. हळू हळू स्वतःच्या हिमतीवर त्यांनी बऱ्यापैकी संपत्ती निर्माण केली. त्यामुळे सर्वाना बाहेरून ते श्रीमंत वाटले तरी त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर होते. मेजवानीत आमची ओळख मुलीच्या मावशीबरोबर झाली. मी, मावशी, नवरा आणि आणखीन एक दोन लोक बोलत होते तेंव्हा मावशी तावातावाने नवऱ्याशी बोलत होती कि आज कालच्या पोरी कश्या मूर्ख आहेत आणि पैसे नसलेल्या पोरांच्या सुद्धा प्रेमात पडतात. गाडी आणि स्वतःचे फ्लॅट आणि आईवडिलांचा वेगळा फ्लॅट नसला तर असल्या पोरांबरोबर फिरकू सुद्धा नये असे ह्या महिलेचे म्हणणे होते. नवऱ्याने थोडे विषयांतर करण्याचा बराच प्रयत्न केला तरी ती काहीच ऐकेना.

मला मात्र लक्षात गेले ते तिची अदा. बोलण्याची तर्हा आणि एकूणच हावभाव. ती उठून गेल्यानंतर मी नवऱ्याला म्हटले "हि मला इकडची कम्म्युनिटी कॉलेज वाटत आहे". त्याला अमेरिकन संज्ञा ठाऊक नसल्याने तो गोंधळला. मग मी त्याला म्हटले. अरे हि ह्या गावची "पाटलांची स्कुटर आहे". त्याला भलताच राग आला. "माझ्या बायकोच्या घरी येऊन १० मिनिटे सुद्धा झाली नाही आणि काय हे भलते सलते बोलतेस ?" पण काही दिवसांनी त्यानेच फोन करून हि बया खरोखरच "पाटलांची स्कुटर आहे" असे मान्य केले.

तसे आमच्या गावांत पाटील म्हणून कुणी नव्हतेच. होते ते दामू मास्तर. त्यांच्याकडे होती ती एक अतिशय जुनी लॅम्ब्रेटा स्कुटर. जिला वर हाताकडे गियर असायचे. त्यांनी कुणा पाटील नावाच्या माणसाकडून ती स्कुटर विकत घेतली असावी म्हणून तिला पाटलांची स्कुटर म्हणत असावेत असा कयास होता. दामू मास्तरांना स्कुटरचे भारी प्रेम. स्कुटर अत्यंत जुनी होती. हि गोव्यातून आलेली पोर्तुगीज कालीन असावी. (नंतर भारत सरकारने हि इटालियन कंपनी विकत घेऊन तिचे नामकरण विजय सुपर स्कुटर असे केले.) दामू मास्तरांनी ह्या स्कुटर ला नववधू प्रमाणे ठेवले होते.

आता आमच्या गावांत जवळपास RTO हापिस नव्हते. हापिस दूर होते, तिथे जाऊन लर्निंग काढावे लागायचे. मग महिन्यातून एकदा हापिसर आमच्या गावांत यायचे. ग्रामपंचायतीची एक खोली ह्यांना भाड्याने दिली होती. तिथे ते टेबल घालून बसायचे आणि गांवातील अनेक मंडळी ओळीने उभी राहून लायसन टेस्ट द्यायचे. दुचाकीला ८ मारणे आणि गाडी साठी लर्निंग वाली गाडी घेऊन एक मोठी चक्कर मारणे. मला हे फक्त ऐकून ठाऊक. मी सरकारविरोधी असल्याने लायसन वगैरे काढण्याच्या भानगडीत पडलेच नाही. ४ चाकी मला फार चांगली यायची आणि बिना गियरची दुचाकी सुद्धा मी चालवत असे.

पण शेवटी लायसन काढायचे ठरवलेच. पण बिन गियरचे मला नको होते गियरची हवी होती. वडीलां कडे गियरची दुचाकी नव्हती म्हटल्यावर त्यांनी इतर लोक करतात तेच केले. पाटलांच्या स्कुटर वर मला स्कुटर शिकवायचे ठरवले. माझ्या वडिलांनी स्वतः लायसन त्याच्यावर काढले होते. इतकेच नव्हे तर गांवातील सर्व पोरा पोरींनी गियरची दुचाकी म्हणून हीच स्कुटर चालवली होती. दामू मास्तर अत्यंत सभ्य आणि उत्कृष्ट शिक्षक असल्याने लोक मुलींना सुद्धा बिनधास्त त्यांच्याकडे स्कुटर शिकवायला पाठवत असत. त्यांच्याकडे साधारण ३ तासांत संपुन स्कुटर शिकून होत असे. गियर एक म्हणजे काय, दुसऱ्या गियर मध्ये का आणि कशी टाकायची, क्लच कसा काम करतो ते सगळे शिकवायचे. "क्लच हाफ कर असे ते ओरडायचे" आता मला वाटले हाल्फ म्हणजे "अर्धा ओढायचा" मग ते ओरडायचे "हातांत ताकत नाही का ? एकदम असा दाब". पण शेवटी मी गियर चा कन्सेप्ट शिकलेच.

मी ज्या दिवशी शिकले त्या दिवशी ४ आणखीन मुले शिकली. मग तीच स्कुटर घेऊन ते RTO च्या हापिस मध्ये हजर. RTO हापिसर त्यांना एकदम ओळखायचा. कारण सर्वच मंडळी ह्याच स्कुटर वर लायसन काढायची. हा हापिसर एक नंबर चा जातीवादी , स्त्रीलंपट आणि भ्रष्ट म्हणून जगजाहीर होता आणि ते मला स्वतःचं डोळ्यांनी पाहायला मिळाले. आजपर्यंत जितक्या सरकारी नोकरांना मी तिरस्काराच्या नजरेने पहिले आहे त्यांत ह्याचा नंबर १.

गांवातील सन्नी ड्रायविंग स्कुल हे एकमेव ड्रायविंग स्कुल होते. त्याचे मालक सन्नी सकाळीच हजर होते. हापिसर उशिरानेच आले. आल्या आल्या "सन्नी, एक चहा आण" म्हणून त्यांनी ऑर्डर सोडली.

सन्नीने आधीच चहा सांगून ठेवला होता तो पोऱ्याने टेबल वर ठेवला. "हरामखोरांनो, चहा मागितला तर फक्त चहा ठेवायचा ? कधी गांवात बाहेरून कुणी आला म्हणून एखादी बिस्कीट वगैरे ठेवली असे नाही ? महाकंजूष आहात तुम्ही" असे म्हणून त्यांनी फाईल उघडली. दुचाकी वाले कुणी आहेत बरे इथे ?

सिंथिया हि साधारण प्रौढ महिला होती. ती कोंकणी ख्रिस्ती थाटाचा फ्रॉक टाईप ड्रेस घालून होती आणि तिचे नाव पहिलेच होते. ती पुढे आली. तिने आपली कागदपत्रे वगैरे ठेवली. तिच्याकडे ना पाहता हापिसर बोलते झाले. "काय रे सन्नी, इथल्या गांवात पपया चांगल्या मिळतात असे ऐकले होते. कधी आम्हाला द्या. आम्हालाही पोरे बाळे आहेत घरी.", सन्नी थोडा गोंधळला "सर ह्या दिवसांत कुठे पपई मिळेल ?" त्याचा सीजन वेगळा. मग साहेबानी नजर सिंथिआ कडे वळवली. आणि मी खोटे बोलत नाही आज पर्यंत मला ती घाणेरडी आणि अत्यंत किळसवाणी नजर याद आहे. "काय सिंथिया तुमच्याकडे आहेत का पपया ? " हा द्विअर्थी असा प्रश्न विचारला. माझे डोके सुन्न झाले. अश्लील विनोद करण्याचे पोरांचे एक वय असते त्या वयाची अनेक पोरे तिथे उभी होती पण त्यावेळी सर्वांच्याच चेहऱ्यावर शरमेचे भाव स्पष्ट होते. "ना सायेब. अमचेकडेन काय ना" तिने केविलवाण्या स्वरांत म्हटले. मग साहेबानी तिची कागदे वाचली. "नवरा कुठे आहे ?" त्यांनी विचारले. "तो कतार मध्ये आहे कामाला" तिने म्हटले. "कधी येतो ? " साहेब. "येतो कधी कधी वर्ष दोन वर्षातून एकदा". ती. "एकटीच राहतेस मग ?" ते तिच्यावर नजर रोखून. ती गप्प राहिली.

मग साहेबानी सर्वांची नावे घेऊन ओळ लावली.

दुचाकीचे लायसन रूल त्यांनी सांगितले. स्त्रियांनी म्हणे फक्त सरळ ओळींत चालवून दाखवायची. डाव्या बाजूला चालवायचे आणि पुढे जाऊन उ टर्न मारून पुन्हा डाव्या बाजूने राहत यायचे. दुचाकी उजव्या बाजूला गेल्यास लायसन मिळणार नाही. तर पुरुषांनी इंग्रजी ८ मारून दाखवायचा. पाय जमिनीला लागता काम नये. एकूण ८ संध्या मिळतील असे त्यांनी सांगितले.

पहिलीच मुलगी माझ्या पेक्षा तरुण होती. ती स्कुटी घेऊन आली होती. तिने सुरु केली डाव्या बाजूला सुरु झाली आणि रस्त्याच्या मध्ये पोचली मग उजव्या बाजूला आणि उ टर्न च्या नादांत धाडकरून बाजूच्या खळींत घातली. सन्नी ने जाऊन तिला आणि स्कुटर ला दोघांनाही काढले. "मूर्खां, ह्यांना रस्त्यावर सोडायची सोय आहे का ? ते सन्नी वर खेकसले. आणि मग त्या मुलीकडे पाहून "तुम्हा लोकांना हेल्मेट सोबत एक ब्रेन सुद्धा डोक्याला लावला पाहिजे निर्बुद्ध कुठली". ती बिचारी रडत रडत बाजूला जाऊन उभी राहिली.

मग काही वेळाने माझा नंबर आला. "चला बामणांची मुलगी तरी चालवू शकते का सरळ ओळीत पाहू" हापिसर बोलले. "मी ८ मारून दाखवणार" मी ठणकावून सांगितले. 'पाय लावला तर लायसन देणार नाही' असे म्हणून त्यांनी पुढे जायचा इशारा केला. मी स्कुटर फर्स्ट मध्ये टाकून पुढे नेली, सेकंड मध्ये टाकून मी त्या छोट्याश्या रस्त्यावर सुरेख ८ काढला. एकदाच काढला आणि त्यांनी "व्हेरी गुड" म्हणून थांबण्याचा इशारा केला. "हे बघ असे चालवायला पाहिजे" म्हणून आणखीन कुणाला सांगितले. आणि कागदावर मात्र मला नॉन गियर चे लायसन दिले. मी चूक निदर्शनात आणून देताच मी स्कुटी घेऊन ८ काढला असे त्यांनी सांगितले. "अहो मी पाटलांची स्कुटर घेऊन मारला ८" असे सांगताच थोड्या संशयास्पद नजरेने पाहून त्यांनी आपकी चूक सुधारली.

मग आली गाडीची बारी. सन्नि ची गाडी घेऊन एक फेरफटका मारायचा असे ठरवले. मी एकच स्त्री असल्याने आधी हिला घेऊन एक राऊंड मारू असे सांगून मला ड्रायवर सीट वर बसवले. आम्ही गेलो. मग एका ठिकाणी त्यांनी मला पार्क करायला लावले. तीन पुरुष कँडिडेट मागच्या सीट वर बसले होते. मग मला उ टर्न घेऊन पुन्हा पंचायती कडे आणले. त्या दरम्यान मला इंडिकेटर, हॉर्न वगैरे सर्व काही वापरायला सांगितले. आणि लायसन लिहून दिले. नंतर मी उतरले आणि एक SC जातीचा मुलगा पुढे येऊन ड्रायवर म्हणून बसला.

त्याला ह्यांनी "चल महादेवाच्या देवळाकडे जाऊ म्हटले.", त्या पोराने का कुणास ठाऊक चुकून हॉर्न वाजवला. "तुझ्या आईची ** दाबत आहे का रे माकडा ?" म्हणून ते खेकसले. इतक्या जोराने भेदरलेले कि त्या बिचार्याने क्लच सोडला आणि गाडी धक्का खात बंद बदली. त्याला तिथेच उतरवला. माझे काम झाले असल्याने मी घरी गेले.

पाटलांची स्कुटर अजून चालते. तिला अपवाद करून इंस्न्पेक्शन सुद्धा पास करून मिळते. पण गांवातील शेकडो लोकांनी दुचाकीचे धडे ह्या वाहनावर घेतले. त्या काली दुचाकी प्रकरण महाग होते. आता लोकांकडे अनेक दुचाकी असतात. लहान मुलांना सुद्धा बक्षिस म्हणून आईवडील दुचाकी घेऊन देतात आणि मोडली कि नवीन घेऊन देतात. जुनी दुचाकी प्रेमाने ठेवणे हा प्रकार कमी झाला आहे. ठेवलीच तरी कंजुषी म्हणून ठेवतात. पुण्यात मंडळी सीट ला, पेट्रोल टॅंक ला, हॅन्डल ला आणि पुढच्या दिव्याला सुद्धा अगदी घाणेरणी दिसणारी कव्हर्स घालून दुचाकी चालवतात. जर इतकीच काळजी वाटते तर बस ने फिरावे. दुचाकीच्या हँडल वर कव्हर ठेवून चालवणे एकतर चालकाचा मूर्खपणा आहे किंवा दुचाकी कंपनी कदाचित कमी दर्जाची दुचाकी विकत असावी.

आता चाणाक्ष वाचकांनी ओळखलेच असेल कि "पाटलांची दुचाकी" हा शब्दप्रयोग गावांत कश्या अर्थी वापरला जायचा. अशी दुचाकी जिच्यावर बऱ्याच लोकांनी फेरफटका मारला आहे, अनेक लोकांनी लायसन काढले आहे आणि अनेकांचा "पहिला एक्स्पीरियंस" ह्या त्याच दुचाकीवर आहे. गांवात हा शब्दप्रयोग आज सुद्धा होतो असे ऐकून आहे.

टीप : काही लोकांना अश्या प्रकारचे शब्दप्रयोग खालच्या दर्जाचे वाटत किंवा घाणेरडे वाटतात. मला तसे वाटत नाही. भाषा प्रेमी म्हणून भाषेवर अधिकार फक्त बोजड पणे व्याकरणाची पुस्तके लिहीणार्या लोकांचा नसून सर्वसामान्यांचा आहे. ज्या प्रमाणे टेस्ला चा स्टोक वर चढेल कि खाली ह्यावर वर्तमान पत्रातून लेख लिहिणाऱ्या लोकांचा स्वतःचा पगार टेस्ला विकत घेण्या इतका नसतो, त्याच प्रमाणे बद्धकोष्ठ झाल्याप्रमाणे चेहरा करून संस्कृती किंवा भाषा ह्या विषयावर बोलणार्या लोकांचा स्वतःचा ह्या विषयावरील प्रभाव जवळ जवळ शून्य असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेंव्हा ते सोळा वर्षांचे होतात असे म्हणातात, ज्ञानेश्वरी त्यांनी सामान्य माणसासाठी लिहिली. मराठी भाषेतून लिहिला गेलेला हा कदाचित पहिला ग्रंथ असावा. त्याच प्रमाणे लावणीचे फड, सैनिक, इतर लोककला, शेतकरी लोक इत्यादींनी सुद्धा भाषेंत भरपूर भर घातली आहे. त्यामुळे अनेक शब्दप्रयोग थोडे हलके वाटले तरी त्यांच्याकडे हींन भावनेने न पाहता कुतूहलाने पाहणे गरजेचे आहे.

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

14 Sep 2021 - 7:17 am | गॉडजिला

तुम्हाला पाटलाची स्कूटर ओळखता आली ? कसे काय बुआ ?

इन्स्टिंक्ट ! सिक्स्थ सेन्स. किंवा इतर काही म्हणा.

मित्राने का मान्य केले ? त्याच्या लग्नाला आता २ वर्षे झाले आहेत. इतक्या काळांत सदर महिलेबद्दल त्याला आणखीन माहिती प्राप्त झाली. महिलेच्या काही वर्गमित्रांशी माझी ओळख झाली. महिलेला एक मुलगा असला तरी त्याचे अजून लग्न होत नाही आणि कारण म्हणजे मातोश्रींचे चारित्र्य . आणखीन माहिती देऊ शकते पण मिपा हे त्या गॉसिप चे स्थान नव्हे.

आंद्रे वडापाव's picture

15 Sep 2021 - 9:13 am | आंद्रे वडापाव

आधी सो कॉल्ड लोकांसाठी

ज्या प्रमाणे टेस्ला चा स्टोक वर चढेल कि खाली ह्यावर वर्तमान पत्रातून लेख लिहिणाऱ्या लोकांचा स्वतःचा पगार टेस्ला विकत घेण्या इतका नसतो, त्याच प्रमाणे बद्धकोष्ठ झाल्याप्रमाणे चेहरा करून संस्कृती किंवा भाषा ह्या विषयावर बोलणार्या लोकांचा स्वतःचा ह्या विषयावरील प्रभाव जवळ जवळ शून्य असतो.

आता स्वतः साठी , गोलपोस्ट शिफ्ट !

इन्स्टिंक्ट ! सिक्स्थ सेन्स. किंवा इतर काही म्हणा.

तुम्हाला पाटलाची स्कूटर ओळखता आली ? कसे काय बुआ ?
मला पण हाच प्रश्न पडलाय. बादवे, तुमच्या मित्राने कबूली दिली, सो मान गये, आपकी पारखी नजर, और पाटील की स्कूटर, दोनो को :)

गॉडजिला's picture

14 Sep 2021 - 2:31 pm | गॉडजिला

तुमच्या मित्राने ही बया खरोखरच "पाटलांची स्कुटर आहे" असे मान्य केले. कबूली दिली,

त्याने कसे ते ओळखले बरे ? का त्याला कोणीतरी सांगितले म्हणुन त्याने ते मान्य केले ? तसे असेल तर तुमच्यावर अविश्वास दाखावायचे त्याला विषेश काय कारण होते ?

सहानाजी टेल टेल… स्कुटर ओळखायचे टेक्नीक तर सांगा…

जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे। सकळ जन।।

कंजूस's picture

14 Sep 2021 - 5:50 pm | कंजूस

झाली आहे.

काही लोकांना अश्या प्रकारचे शब्दप्रयोग खालच्या दर्जाचे वाटत किंवा घाणेरडे वाटतात.

शब्दप्रयोग नाही बुवा, पण त्या शब्दप्रयोगांच्या मागचे शेंतिमेण्ट काय रुचले नाहीत. सरतशेवटी शब्दांपेक्षा कंटेक्सट महत्वाचा.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

14 Sep 2021 - 10:36 pm | रावसाहेब चिंगभूतकर

+१

सौंदाळा's picture

14 Sep 2021 - 8:46 pm | सौंदाळा

ही गजाल पण चांगलीच जमलीय.
साहीत्य संपादकांना विनंती : या सर्व गजालींची कृपया अनुक्रमणिका करा

त्यामुळे अनेक शब्दप्रयोग थोडे हलके वाटले तरी त्यांच्याकडे हींन भावनेने न पाहता कुतूहलाने पाहणे गरजेचे आहे.

इतकी उदारमतवादी विचारसरणी असताना, “काय सिंथिया तुमच्याकडे आहेत का पपया ?” ह्या प्रश्नाने डोके सुन्न व्हावे हे अगम्य आहे.

लेख हलका वाटला तरी त्याच्याकडे हींन भावनेने न पाहता कुतूहलाने पाहण्याचा प्रयत्न करून बघितला!

- (Oxymoron) सोकाजी

गामा पैलवान's picture

19 Sep 2021 - 9:41 pm | गामा पैलवान

सोकाजी,

पपयांच्या प्रश्नाने डोके सुन्न झालं नसून त्यामागील वाणीने झालं आहे. शिवाय नंतरचे प्रश्न सूचक होते. नवरा कुठे असतो, एकटीच राहतेस का, वगैरे.

आ.न.,
-गा.पै.

स्वराजित's picture

18 Sep 2021 - 2:10 pm | स्वराजित

मी तुमच्या लेखनशेलीचा चाहता आहे. माफ करा पण ही गजाली आधीच्यासारखी नाही जमली.

योगेश कोलेश्वर's picture

20 Sep 2021 - 11:04 am | योगेश कोलेश्वर

ही गजाली रंगली नाही....

शानबा५१२'s picture

21 Sep 2021 - 8:57 pm | शानबा५१२

एकदा मी पाटलांबरोबर ह्याच हापिसराकडे गेलो होतो, हापिसर पाटलांना बोलला "८ मध्ये फीरवा, मग लायसन्स देतो" मग पाटलांनी तश्या आकारात फीरवले व स्कुटर उभी केली. हापिसर मातीतला आकार बघुन बोलला " हा ८ नाही, ईन्फीनीटीचे सिम्बॉल आहे, लायसन्स मिळणार नाही" तेव्हा पाटील ओरडले " तुझ्या आयला काय बघतोयस रे माकडा!"
हे सर्व एकताना मला मराठीतला ८ फक्त माहीती होता, दुसरा कुठला आठ, ईन्फीनीटीचे सिम्बॉल वगैरे मला काहीच माहीती नव्हते. आजही ८ आकडा बोलल्यावर सर्वजण नागमोडी वळणे का घेतात हे मला समजले नाही. सर्व एकाच वळणाचे आहेत हे मात्र मला पटले.

(एकदम सरळ) शानबा५१२