आणीबाणीची चाहूल- भाग १३

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
30 Jun 2021 - 11:23 am
गाभा: 

यापूर्वीचे लेखन
आणीबाणीची चाहूल- भाग १
आणीबाणीची चाहूल- भाग २
आणीबाणीची चाहूल- भाग ३
आणीबाणीची चाहूल- भाग ४
आणीबाणीची चाहूल- भाग ५
आणीबाणीची चाहूल- भाग ६
आणीबाणीची चाहूल- भाग ७
आणीबाणीची चाहूल- भाग ८
आणीबाणीची चाहूल- भाग ९
आणीबाणीची चाहूल- भाग १०
आणीबाणीची चाहूल- भाग ११
आणीबाणीची चाहूल- भाग १२

आतापर्यंत आपण अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आणि तो निकाल आल्यापासून ८ दिवस म्हणजे २० जूनपर्यंत घडलेल्या घडामोडी बघितल्या. प्रत्यक्ष आणीबाणी २५ जून १९७५ च्या रात्री लादण्यात आली असली तरी त्यापूर्वी दीड-दोन वर्षे बरेच काही घडले होते. गुजरातमधील नवनिर्माण आंदोलन आणि बिहारमधील संपूर्ण क्रांती आंदोलन यातून इंदिरा सरकार हादरून जाईल असे वातावरण निर्माण झाले होते. मे १९७४ मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वे कर्मचार्‍यांचा संप आयोजित केला होता. त्या सगळ्याचा परामर्थ इथे घेत नाही. पण इंदिरा कितीही खमक्या नेत्या असल्या तरी त्यावेळेस त्यांना नमते घ्यावे लागेल असे काही निर्णय घ्यावे लागले होते. त्यात गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल आणि बिहारचे मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांना राजीनामा द्यावा लागणे, गुजरात विधानसभा विसर्जित करून निवडणुका घ्यायला मान्यता देणे वगैरे निर्णयांचा समावेश होतो. या सगळ्या काळात घडलेल्या सगळ्या घटनांचा परामर्श घेणार नसलो तरी एका गोष्टीचा उल्लेख केलाच पाहिजे.

ललितनारायण मिश्रांची हत्या
इंदिरांच्या मंत्रीमंडळात आंतरराष्ट्रीय व्यापार या खात्याचे मंत्री होते ललितनारायण मिश्रा. बिहारचे नंतरच्या काळात मुख्यमंत्री झालेले जगन्नाथ मिश्रा हे या ललितनारायण मिश्रांचे बंधू. ललितनारायण मिश्रा लोकसभेवर निवडून आले होते दरभंगा मतदारसंघातून. या मिश्रांनी आपल्या दरभंगा मतदारसंघापासून काही अंतरावर असलेल्या अररियामधून लोकसभेवर निवडून गेलेल्या तुलमोहन राम या काँग्रेस खासदाराला हाताशी घेऊन आंतरराष्ट्रीय व्यापार खात्यात भ्रष्टाचार केला. तुलमोहन राव दूरच्या पाँडेचेरीमधील अनेक शेल कंपन्यांच्या संचालक मंडळावर होते आणि त्या कंपन्यांना आयात करायचे परवाने लगोलग मिळाले होते. या प्रकरणावरून विरोधकांनी लोकसभेत भरपूर गोंधळ घातला आणि त्याची सी.बी.आय चौकशी करायचे आदेश इंदिरांना द्यावे लागले. ललितनारायण मिश्रा-तुलमोहन राव प्रकरण जड जाणार अशी चिन्हे दिसायला लागल्यावर ५ फेब्रुवारी १९७३ मध्ये मिश्रांकडील आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्रालयाचा कार्यभार काढून घेऊन रेल्वेमंत्रालयाचा कार्यभार दिला गेला. हे ललितनारायण मिश्रा २ जानेवारी १९७५ रोजी बिहारमध्ये समस्तीपूरला एका कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांची तिथे हत्या करण्यात आली. ही हत्या नक्की कोणी केली याविषयी त्यावेळी गूढ होते तरी काँग्रेसच्या गोटातून संशय आनंदमार्ग आणि रा.स्व.संघावर घेतला जात होता. या हत्येचे गूढ थेट २०१४ मध्ये उकलले आणि आनंदमार्गच्या काही लोकांना या हत्येत सहभागी असल्याबद्दल न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली. मागच्या एका भागात बंगालचे मुख्यमंत्री सिध्दार्थ शंकर रे, कायदामंत्री हरी रामचंद्र गोखले आणि मुंबई काँग्रेसचे प्रमुख रजनी पटेल यांनी ८ जानेवारी १९७५ रोजी इंदिरांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख आहे. त्या पत्रात काहीतरी कडक कारवाई करावी अशी मागणी या मंडळींनी केली होती. त्याला या ललितनारायण मिश्रांच्या हत्येची पार्श्वभूमी होती. (अवांतरः ललितनारायण मिश्रांनी मनमोहनसिंगांना आंतरराष्ट्रीय व्यापार खात्याचे सचिव नेमले होते. त्यानंतरच्या काळात मनमोहन अनेक मोठ्या पदांवर दिसले त्याची सुरवात ललितनारायण मिश्रांनी केली होती).

वर्तमानपत्रांवरील सेन्सॉरशिपच्या दिशेने
संजय आणि त्याच्याभोवतीची चौकडी जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनाविरूध्द काहीतरी कडक भूमिका घ्या असा आग्रह इंदिरांकडे १९७४ पासूनच धरून होती. संजयची प्रवृत्ती हुकूमशाहीचीच होती. एका जर्मन वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले होते की त्याला हुकूमशाही आवडते. लगेचच त्याने आपल्याला हिटलरसारखी हुकूमशाही अभिप्रेत नसून लोकांच्या मनात भिती निर्माण करण्यावर आपला विश्वास आहे असे त्याने म्हटले होते. एकदा लोकांच्या मनात भिती बसली की मग ते आपले म्हणणे निमूटपणे ऐकून घेतील किंवा किमान त्याविरूध्द काही बोलायचे धाडस करणार नाहीत असे त्याने म्हटले. या प्लॅनचा एक भाग म्हणजे वर्तमानपत्रांना 'सरळ' करणे आणि महत्वाच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना गप्प बसविणे. आपल्या मारूती या महत्वाकांक्षी प्रकल्पावर टीका केल्याबद्दल संजयच्या मनात वर्तमानपत्रांविरूध्द राग होता. १९६९ मध्ये इंदिरांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्यानंतर माहिती आणि प्रसारणमंत्री इंदरकुमार गुजराल यांनी इंदिरांभोवती जे व्यक्तीपूजेचे स्तोम वाढले ते निर्माण करण्यात मोठी भूमिका बजावली होती. सरकारी रेडिओवर त्यांनी आपल्याला पाहिजे तसा प्रचार केला होताच पण अनेक लहान वर्तमानपत्रांना सरकारी जाहीरातींद्वारे नियंत्रित करून त्यांना सरकारविरोधात काहीही न लिहायला भाग पाडले. पण अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मात्र गुजराल तितक्याच उत्साहाने ती भूमिका पार पाडत नव्हते असे संजयच्या चौकडीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना पदावरून हटवायला हवे यावर त्यांचे एकमत झाले.

कुलदीप नय्यर यांच्या पुस्तकात आणखी एक गोष्ट दिली आहे. फिलीपीन्समध्ये तिथल्या सरकारने प्रेस सेन्सॉरशिप लादली होती. त्या सेन्सॉरशिपचे नियम नक्की काय आहेत ते बघायला म्हणून त्या नियमांची प्रत संजयने आपला मित्र कुलदीप नारंगच्या मार्फत दिल्लीतील अमेरिकन दूतावासातील ओळखींचा वापर करून मागवून घेतली होती. हे नक्की कधी घडले याचा उल्लेख कुलदीप नय्यर यांच्या पुस्तकात नसला तरी ते जानेवारी ते जून १९७५ दरम्यान कधीतरी घडले असावे असे दिसते.

नोकरशहांची बदली
१२ जूनला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आपल्याकडे फार वेळ शिल्लक राहिलेला नाही हे सगळ्यांच्या लक्षात आले. काहीतरी कडक आणि धडाकेबाज कारवाई करायची हे नक्की होते पण ती कारवाई कोणती असेल याविषयी कोणीच काही बोलत नव्हते. काहीही करायचे असले तरी नोकरशाहीत 'आपली' माणसे असणे गरजेचे आहे हे या चौकडीने लगेच ओळखले. २ ऑक्टोबर १९७४ रोजी दिल्लीत जनसंघाने आयोजित केलेल्या मोर्चाविरूध्द कडक कारवाई केली नाही म्हणून दुसर्‍याच दिवशी उपराज्यपाल बलेश्वर प्रसाद यांना पदावरून काढून त्यांच्या जागी किशन चंद यांची नियुक्ती केली गेली होतीच. या किशनचंदांचे सचिव नवीन चावला (जे पुढे २००८-०९ मध्ये देशाचे मुख्य निवडणुक आयुक्त झाले) संजयचे डून स्कूलपासूनचे मित्र होते. केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव हे यावेळी महत्वाचे पद असणार होते. त्या पदावर होते स्वातंत्र्यापूर्वी शेवटच्या बॅचमध्ये आय.सी.एस अधिकारी झालेले निर्मलकुमार मुखर्जी (यांना पुढे वि.प्र.सिंगांच्या सरकारने १९८९-९० या काळात पंजाबचे राज्यपाल नेमले). ते कायद्यावर बोट ठेऊन चालणारे असल्याने असे कोणतेही बेकायदेशीर निर्णय घेताना अडचणीचे ठरतील हे लक्षात घेऊन त्यांना हटवून त्यांच्या जागी राजस्थानचे मुख्य सचिव सरदारीलाल खुराणांना आणले गेले. इंटेलिजेन्स ब्युरोचे प्रमुख ए.जयराम यांना जगमोहनलाल सिन्हांचा निकाल काय असेल हे आधी सांगण्यात अपयश आले म्हणून त्यांना हटविण्यात आले आणि त्यांच्या जागी पंजाबचे इन्प्सेक्टर जनरल सुरेंद्रनाथ माथूर यांना आणले गेले.

मागच्या भागात २० जूनला दिल्लीत बोट क्लबमध्ये इंदिरांच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षाची मोठी सभा झाली होती याचा उल्लेख होता. त्यावेळी दूरदर्शन हा एकच टिव्ही चॅनेल देशात होता आणि दिल्ली आणि मुंबई अशी काही मोजकी दूरदर्शन केंद्रे देशात होती. कार्यक्रमही दिवसातून काही तासच दाखविले जायचे. तरीही दूरदर्शनवर या सभेविषयी विशेष कार्यक्रम दाखवावा असा आग्रह संजयने धरला होता. ही सभा सरकारने आयोजित केलेली नसून पक्षाने आयोजित केली होती म्हणून सरकारी दूरदर्शनवर त्याविषयी कार्यक्रम दाखविणे अयोग्य ठरेल म्हणून माहिती आणि प्रसारणमंत्री इंदरकुमार गुजराल यांनी त्याला नकार दिला. संजयला अर्थातच या गोष्टीचा संताप आला पण त्याने त्याविषयी गुजरालांवर लगेच कारवाई केली नाही तर त्यासाठी आणखी आठ दिवस जाऊ दिले.

आपल्या चौकडीकडून संजयने कोणाकोणाला तुरूंगात टाकायचे याच्या याद्या करायला सुरवात अगदी १२ जूनपासूनच केली होती. क्रिस्तोफर जेफरलॉट आणि अनील प्रतिनव यांच्या "India's first dictatorship: The emergency 1975-77" या पुस्तकात लिहिले आहे की ही पहिली यादी १५ जूनलाच पूर्ण करण्यात आली होती.

या याद्या बनवायच्या कामात संजयने नव्यानेच नेमलेल्या नोकरशहांची मदत झालीच. पण त्याव्यतिरिक्त रॉची मदतही घेण्यात आली. तसेच दिल्ली राजधानी असल्याने देशातील अनेक महत्वाचे नेते वर्षातील काही काळ तरी दिल्लीत वास्तव्याला असत. त्यामुळे दिल्लीचे पोलिसांच्या विशेष गुप्तचर विभागाचे आयुक्त प्रितमसिंग भिंदर (नंतरच्या काळात काँग्रेसकडून खासदार झालेल्या आणि नरसिंहरावांच्या मंत्रीमंडळातील मंत्री सुखबन्स कौर भिंदर यांचे पती) यांचीही मदत घेतली गेली. अशाच याद्या राज्यपातळीवरही बनवायचा आदेश संजयच्या चौकडीने काँग्रेस पक्षाचे सरकार असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला. त्याप्रमाणे अशा याद्या राज्यांमध्येही बनविल्या गेल्या. या याद्यांमध्ये विरोधी पक्षांचे राजकीय कार्यकर्ते तर होतेच पण त्याबरोबर रा.स्व.संघाशी संबंधित असलेल्यांचाही समावेश होता.

आता या सगळ्यांना नक्की कायद्याच्या कोणत्या कलमाखाली अटक करायची हा प्रश्न उभा राहिला. आणीबाणी आणायची हा बेत काही मोजके लोक सोडले तर सगळ्यांना सुरवातीला माहित नव्हता. त्यामुळे इंडिअन पीनल कोडच्या कलम १०७ खाली त्यांना अटक करावी असा प्रस्ताव कोणीतरी मांडला. हे कलम गुंडांविरोधात वापरता येते आणि माजी अर्थमंत्री आणि माजी उपपंतप्रधान मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, मधू लिमये यासारख्यांना गुंड नक्कीच म्हणता आले नसते. त्यानंतर मिसा हा कायदा आहेच त्याअंतर्गत सगळ्यांना अटक करावी असे ठरले.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची रायबरेलीतून १९७१ मध्ये लोकसभेवर झालेली निवड रद्द करायचा निकाल दिला होता त्याला इंदिरांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.आर.कृष्ण अय्यर यांच्यापुढे झाली. कृष्ण अय्यर हे कम्युनिस्ट विचारांचे होते. ते १९५७ मध्ये ई.एम.एस.नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या कम्युनिस्ट सरकारमध्ये मंत्री पण होते. एखादा प्रकांडपंडित म्हटल्यावर जे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहिल त्याला कृष्ण अय्यर पूर्ण साजेसे होते. इंग्रजी भाषेवर त्यांची इतकी विलक्षण पकड होती की अगदी ऑक्सफर्ड-केंब्रिजमधून शिकलेल्यांनाही हेवा वाटावा. कृष्ण अय्यर आपल्याबाजूने निकाल देतील अशी इंदिरांची अपेक्षा होती. सर्वोच्च न्यायालयात इंदिरांची बाजू मांडली होती ज्येष्ठ वकील नानी पालखीवालांनी. पालखीवालांनीच १९७३ मध्ये केशवानंद भारती खटल्यात एकाकी किल्ला लढवून इंदिरा सरकारला न आवडणारी बाजू खूप प्रभावीपणे मांडली होती. तरीही अलाहाबाद उच्च न्यायालयाने तांत्रिक कारणांवरून इंदिरांची निवड रद्द ठरवली आहे आणि तो निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकायचा नाही असे त्यांचे मत होते. अगदी १२ जूनलाच ते दिल्लीत होते आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आल्याची बातमी त्यांना कळताच ते ताबडतोब इंदिरांच्या १,सफदरजंग रोड या निवासस्थानी दाखल झाले. बहुदा त्यावेळी इंदिरांचे त्यांच्याशी बोलणे झाले असावे आणि त्यांनी इंदिरांचे वकीलपत्र घ्यायची तयारी दाखवली.

कृष्ण अय्यर आपल्याबाजूने निकाल देतील अशी इंदिरांची अपेक्षा का होती? त्यामागे एक कारण होते. मागे एका भागात लिहिल्याप्रमाणे न्यायालयीन कामकाजातील एका तांत्रिकतेतून वाट काढायला कृष्ण अय्यर यांनी मान्यता दिली. न्यायालयीन प्रक्रीयेप्रमाणे एकदा न्यायालयात अपीलाचा अर्ज दाखल झाला की मग न्यायाधीश कधी सुनावणी घ्यायची त्याची तारीख ठरवतात. तसेच प्रक्रीयेप्रमाणे एकदा अपीलाचा अर्ज दाखल झाल्यावर उच्च न्यायालयाने निकालाला दिलेली स्थगिती रद्द होते (हे प्रशांत भूषण यांच्या पुस्तकात लिहिले आहे). समजा एका दिवशी अपीलाचा अर्ज दाखल केला आणि सुनावणी चार दिवसांनी होणार असेल तर मधल्या चार दिवसांत इंदिरांच्या पंतप्रधानपदाचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे कृष्ण अय्यर यांनी अपीलाचा अर्ज दाखल केल्यानंतर लगेच सुनावणी घ्यायचे मान्य केले आणि त्यांनी त्या निकालाच्या स्थगितीवर लगेच निकालही दिला. आता हे अपील कृष्ण अय्यर यांच्याकडेच जाणार हे इंदिरांना कसे माहित झाले? तर कोणा न्यायाधीशापुढे कोणते खटले द्यायचे हे सरन्यायाधीश ठरवतात आणि त्यावेळी सरन्यायाधीश होते ए.एन.रे. यांना इंदिरांच्या कृपेमुळेच १९७३ मध्ये केशवानंद भारती खटल्याच्या निकालानंतर सरन्यायाधीशपद मिळाले होते त्यामुळे हे सरन्यायाधीश इंदिरांच्या मर्जीतले होते. बहुदा ही सुनावणी कृष्ण अय्यर यांच्याकडे जाईल हे इंदिरांना ए.एन.रे यांच्याकडून समजले असावे.

कृष्ण अय्यर यांच्यापुढे ही अपीलाची याचिका २३ जूनला दाखल झाली आणि त्यांनी लगेच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली. तपशीलात निकालपत्र २४ तारखेला आले. न्या.कृष्ण अय्यर यांनी दिलेला निकाल मात्र बुचकळ्यात पाडणारा होता. अय्यर यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तर स्थगिती दिली पण त्याचवेळी इंदिरा गांधींवर काही बंधने टाकली. ही बंधने होती-- लोकसभेत मतदान करता येणार नाही, लोकसभेच्या सदस्यत्वासाठी मिळणारा पगार (आणि भत्ते) घेता येणार नाही, एक लोकसभा सदस्य म्हणून लोकसभेत चर्चेत भाग घेता येणार नाही.पण पंतप्रधान म्हणून पगार घेता येईल, लोकसभेत सरकारच्या वतीने निवेदनेही देता येतील आणि पंतप्रधानपदावर कायम राहता येईल.

म्हणजेच अय्यर यांच्या निकालाने लोंबकळलेली परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला विनाअट स्थगिती दिली असती तर तो इंदिरा गांधींचा विजय ठरला असता. जर का त्यांनी स्थगिती रद्द केली असती तर तो इंदिरा गांधींचा निंसंशय पराभव ठरला असता. पण अय्यर यांनी दोन्ही गोष्टी केल्या नाहीत. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला केवळ हंगामी स्थगिती दिली आणि इंदिरा गांधींचे अपील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे वर्ग केले. न्या.अय्यर यांनी त्यांच्या निकालपत्रात म्हटले---"Draconian laws do not cease to be law in courts but must alert a wakeful and quick-acting legislature." म्हणजेच न्यायाधीश न्याय देताना कायद्याला बांधिल असतात. जरी एखादा कायदा अयोग्य असला तरी जोपर्यंत तो कायदा कायदेपुस्तकात (statute) आहे तोपर्यंत न्यायाधीश त्याच कायद्याला बांधिल असतात. म्हणजेच Representatives of People Act च्या ज्या कलमांतर्गत इंदिरा गांधींची निवड (भले तांत्रिक कारणांनी) रद्दबादल झाली होती ती कलमे जोपर्यंत कायद्यात आहेत तोपर्यंत खंडपीठातील न्यायाधीश त्याच कायद्याला बांधिल राहतील असा एकाप्रकारे इशाराच न्या.अय्यर यांनी दिला.

महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्ण अय्यर यांनी केवळ अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती द्यायचा हा निकाल दिला. मुळातल्या उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देऊन तो निकाल रद्द करावा (म्हणजे आपली लोकसभेवर झालेली निवड वैध ठरवावी) अशी इंदिरांनी याचिका दाखल केली होती तो अर्ज त्यांनी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केला. त्यावर विस्ताराने सुनावणी ११ ऑगस्ट १९७५ रोजी सरन्यायाधीश ए.एन.रे आणि न्यायाधीश हंसराज खन्ना, के.के.मॅथ्यू, यशवंतराव चंद्रचूड आणि एम.एच.बेग यांच्या पाच जणांच्या खंडपीठापुढे येणार होती.

कृष्ण अय्यर यांनी दिलेल्या निकालातून संभ्रम वाढला असला तरी एक गोष्ट साध्य झाली. न्यायालय हे नेहमी समोर असलेल्या कायद्यातील तरतुदी लक्षात घेऊनच निकाल देते असे त्यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात ऑगस्ट महिन्यात सुनावणी होण्यापूर्वी कायदाच बदलून टाकायचा म्हणजे फुटबॉलचा खेळ सुरू झाल्यानंतर गोलपोस्ट बदलायचे आणि सर्वोच्च न्यायालयाला आपल्या बाजूने निकाल द्यायला भाग पाडायचे ही कल्पना इंदिरांना त्यातून मिळाली.

आणीबाणी आणायचा निर्णय नक्की कधी घेतला गेला हे सांगता येणार नाही. पण तो निर्णय २५ जूनला अचानक घेतलेला नव्हता हे नक्कीच. १५ तारखेलाच कोणाकोणाला तुरूंगात टाकायचे या यादीचा पहिला आराखडा तयार असेल तर असे दिसते की तो निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर दुसर्‍या-तिसर्‍या दिवशीच घेतला गेला असावा. तरीही मग आणीबाणी लगेच १३-१४ जूनला का आणली गेली नाही? त्याचे कारण इंदिरांना कायदेविषयक सल्ला देणारे बंगालचे मुख्यमंत्री सिध्दार्थ शंकर रे यांनी त्यांना सांगितले की कोणतेही काम करायचे असेल ते कायद्याच्या चौकटीत बसेल अशा प्रकारेच करावे म्हणजे मग कायदा पायदळी तुडविला असा आरोप नंतर कोणाला करता येणार नाही. ते इंदिरांना पटले. त्यामुळे त्या कृष्ण अय्यर यांचा निकाल येईपर्यंत थांबल्या. जर त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायायलाच्या निकालाला कोणतीही अट न ठेवता स्थगिती दिली असती तर इंदिरांना 'आपला विजय झाला' असे म्हणता येणार्‍यातलेच होते.

आता यापुढील भागात १२ ते २५ जून या काळात विरोधी पक्षांच्या गोटात काय चालू होते हे बघू आणि आणीबाणी लादली गेली हे पण पुढच्याच भागात बघू.

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

30 Jun 2021 - 1:16 pm | तुषार काळभोर

:)

आनन्दा's picture

30 Jun 2021 - 1:35 pm | आनन्दा

मस्त.
बहुप्रतिक्षित लेख!!

सौंदाळा's picture

30 Jun 2021 - 3:03 pm | सौंदाळा

वाचतोय

तुषार काळभोर's picture

30 Jun 2021 - 3:41 pm | तुषार काळभोर

यांच्याविषयी कधी ऐकलं नव्हतं. एक दोन महिन्यांपुर्वी पहिल्यांदा हे नाव वाचलं ते पुरुलिया प्रकरणात.
परदेशातून शस्त्रे आयात करणं, रेल्वे मंत्र्यांची हत्या करणं म्हणजे हे तर भलतेच हिंसक लोक दिसतात. मग हे नाव कधी ऐकू का येत नाही?

चंद्रसूर्यकुमार's picture

2 Jul 2021 - 1:53 pm | चंद्रसूर्यकुमार

हो आनंदमार्गविषयी विशेष कधी वाचायला/ऐकायला मिळत नाही. हा पंथ बंगालमध्ये अधिक प्रमाणात आहे. महाराष्ट्रात त्याचे फार अस्तित्व नाही. तसेच ते हिंसक/दहशतवादी प्रवृत्तींचे असतील तर त्यांच्याविरूध्द काही कडक कारवाई केली आहे अशास्वरूपाची बातमीही कधी वाचली नाही.

याविषयी इंटरनेटवर अधिक शोधाशोध केल्यावर असे वाटते की भारतात असे कित्येक पंथ आहेत (उदाहरणार्थ प्रजापिता ब्रह्मकुमारी) तसाच हा पण एक पंथ असावा. अशा पंथांच्या तत्वज्ञानाचा गाभा भारतीय तत्वज्ञानच असला तरी त्यात थोडेफार फरक असतात तसे त्यांचे स्वतःचे काही तत्वज्ञान असावे असे त्यांची वेबसाईट बघून वाटते. https://www.anandamarga.org/

बहुदा आनंदमार्गींपैकी काही हिंसक/दहशतवादी प्रवृत्तीचे असावेत पण हिंसा माजविणे हे काही त्या पंथाचे ध्येय आहे असे वाटत नाही. अन्यथा त्या पंथावर बंदी आली असती. पण तसे झालेले दिसत नाही. त्यात सामील असलेले काही मात्र ललितनारायण मिश्रांची हत्या वगैरे प्रकारात गुंतले असावेत असे दिसते.

Bhakti's picture

30 Jun 2021 - 4:04 pm | Bhakti

खुपचं छान लिहिलंय.
संजय गांधी यांच्याविषयी कमीच माहिती होती, आणीबाणीत त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता हे नवीन समजलं.

तुषार काळभोर's picture

30 Jun 2021 - 4:20 pm | तुषार काळभोर

मागे एका भागात आपली न्यायव्यवस्थ बर्‍यापैकी निष्पक्ष असल्याचा प्रतिसाद मी दिला होता.
पण, न्यायव्यवस्था तितकीसुद्धा निष्पक्ष नसते. अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांपर्यंत सर्वांचे पाय मातीचेच असतात, असे दिसते.

सुबोध खरे's picture

30 Jun 2021 - 5:58 pm | सुबोध खरे

१) न्यायालयात निकाल/ निवाडा मिळतो.

न्याय मिळतोच असे नाही.

२) न्यायालयात जे मिळते त्याला न्याय म्हणतात.

सुक्या's picture

1 Jul 2021 - 12:07 am | सुक्या

बर्‍यापैकी सत्य आहे ...
भारतीय व्यवस्थेत सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या जातात ... न्यायपालिका याला अपवाद नाही.
काही नाही करता आले तरी .. .तारीख पे तारीख देउन ... यथोचीत परीणाम साधला जातो.

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2021 - 6:21 pm | श्रीगुरुजी

ललित नारायण मिश्रा यांची बॉम्बस्फोटात हत्या झाली होती.

चंद्रसूर्यकुमार's picture

2 Jul 2021 - 2:18 pm | चंद्रसूर्यकुमार

ललित नारायण मिश्रा यांची बॉम्बस्फोटात हत्या झाली होती.

हो. २ जानेवारी १९७५ रोजी रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा समस्तीपूर ते मुझफ्फरपूर या रेल्वेमार्गाचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये झाले त्याचे उद्घाटन करायला समस्तीपूरला गेले होते. त्या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांच्यावर हॅन्ड ग्रेनेड फेकला गेला.

स्वलिखित's picture

30 Jun 2021 - 6:48 pm | स्वलिखित

सिन्हा यांनी तरी सबब कारणाने आणि कायद्यावर बोट ठेऊन निकाल दिला आणि निवड रद्दबातल ठरवली , पण अय्यर यांनी कोणत्या कायद्या अन्वये निकाल जवळपास बदलाला आणि लटकवून ठेवला !!

चंद्रसूर्यकुमार's picture

2 Jul 2021 - 2:08 pm | चंद्रसूर्यकुमार

सिन्हा यांनी तरी सबब कारणाने आणि कायद्यावर बोट ठेऊन निकाल दिला आणि निवड रद्दबातल ठरवली , पण अय्यर यांनी कोणत्या कायद्या अन्वये निकाल जवळपास बदलाला आणि लटकवून ठेवला !!

उच्च न्यायालयाने एखाद्या आमदार/खासदाराची निवड उच्च न्यायालयाने रद्द केल्यावर त्या आमदार/खासदाराने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केल्यावर अंतिम निकाल येईपर्यंत सभागृहात बोलायचे नाही/पगार-भत्ते स्विकारायचे नाहीत/मतदानात भाग घ्यायचा नाही अशा स्वरूपाच्या अटी सर्वोच्च न्यायालय नेहमी घालते. तो नेहमीच्या प्रक्रीयेचा भाग आहे. पण इंदिरा पंतप्रधान असल्यामुळे आणखी काही गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे ठरले असावे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या पंतप्रधानपदावर कायम राहू शकतील का आणि दुसरे म्हणजे सभागृहात एक सदस्य म्हणून बोलता येणार नाही पण पंतप्रधान म्हणून बोलता येईल का हे पण स्पष्ट करणे गरजेचे होते. पंतप्रधानांना सभागृहात एक सदस्य म्हणून बोलायची वेळ कधीच येत नसावी तर नेहमी पंतप्रधान या अधिकारातच सभागृहात बोलायची वेळ येत असावी. तसेच राज्यघटनेच्या कलम ८८ प्रमाणे--

Every minister and the Attorney-general of India shall have the right to speak in, and otherwise to take part in the proceedings of, either house, any joint sitting of the Houses, and any committee of Parliament of which he may be named a member, but shall not by virtue of this article be entitled to vote.

त्यामुळे एकदा इंदिरा पंतप्रधान पदावर कायम राहू शकतील हे स्पष्ट झाल्यावर कलम ८८ प्रमाणे सभागृहात बोलण्यापासून आडकाठी आणणारे काहीच नव्हते. तरीही त्या पंतप्रधानपदावर कायम राहू शकतील की नाही हे स्पष्ट करणे गरजेचे होते.

त्या मुळे फक्त सम विचारी लोकांची मत ग्राह्य धरली जातील.

स्वलिखित's picture

30 Jun 2021 - 10:16 pm | स्वलिखित

करेक्ट !!
अगदी असच इंदिरा ने केले होते , आपली समविचारी माणसे गरजेच्या योग्य पदावर नेऊन बसवली होती असं या धड्यात चंद्र सूर्य कुमार यांनी अभ्यासाअंती म्हटलंय ,
उशिरा का होईना , चुकीने का होईना , आमच्या हुडपणामुळे का असेना, पण तुम्ही एक समविचारी मत दिलेत , त्याबद्दल कोटी कोटी साधुवाद . !!

असं या धड्यात चंद्र सूर्य कुमार यांनी अभ्यासाअंती म्हटलंय ,

हे वाक्य वाचलं की चंद्र सूर्य कुमार या तीन व्यक्ती आहेत असा भास होतो अन उगाच निल नितीन मूकेश सोबत तुलना सुरु होते _/\_

ज्या जनप्रतिनिधी कायदा १९५१ वर नुसार इंदिराजी ना निवडणूक लढवण्यास ,आणि पद भूषवन्यास न्यालयान बंदी केली.
ते कलम नक्की कोणते.
कारण जनप्रतिनिधी कायदा १९५१ हा खूप व्यापक आहे.
त्या कायद्यातील कोणत्या कलम नुसार निकाल दिला गेला हे लेखात दिले गेलेले नाही.

त्यासाठी मागचे लेख वाचावे लागतील, आणि थोडा अभ्यास स्वतः पण करावा लागेल.

वामन देशमुख's picture

1 Jul 2021 - 8:15 am | वामन देशमुख

निदान ह्या लेखमालेतील धाग्यांचा तरी काश्मीर होऊ नये याची काळजी घ्यावी. अयोग्य प्रतिसाद्स उडवून लावावेत आणि अयोग्य आइडींना उडवून लावावे.

Bhakti's picture

1 Jul 2021 - 9:29 am | Bhakti

सहमत

प्रदीप's picture

1 Jul 2021 - 12:45 pm | प्रदीप

इथे निदान एक आय. डी. त्याच्या नेहमीच्या संवयीप्रमाणेच अर्थशून्य, तर्कशून्य विधाने करत काही प्रतिसाद देत आहे. हा आय. डी. अन्यत्रही हेच करत आलेला आहे व ह्यापुढेही करीत राहील.

सुरूवातीस त्याला काही गंभीर प्रतिवाद करण्यात आले होते, पण वेताळाने काही विक्रमची पाठ सोडली नाही. कुठलाही मुद्देसूद प्रतिसादही दुर्लक्षित करून निव्वळ पुढे जायचे असे सदर आय. डी. करतो. एकतर त्या आय. डीस खरोखरीच काहीही माहिती नाही, इतर मते खरोखरीच समजत नाहीत व वास्तविक लक्षांत घ्यायची कुवत नाही. अन्यथा, तो आय. डी. हे सर्व मुद्दाम ('धाग्यांचे काश्मिर करण्यासाठी') जाणूनबुजून हे करीत आहे. नक्की काय आहे, हे त्यालाच ठाऊक.

मात्र सदर आय. डी. मिपाच्या सूचनांचे उल्लंघन करीत नाही. त्याच्या लिखाणांत कुठलेही अर्वाच्य काहीही नसते. तेव्हा प्रशासनाने त्याची दखल का व कशी घ्यावी? 'धाग्याचे काश्मिर होईल' म्हणून प्रशासनाने काहीतरी करावे हे मलातरी अजिबात बरोबर वाटत नाही.

मग इलाज काय? त्या आय. डी, च्या सर्व लिखाणाचे दुर्लक्ष करणे. हे तर आपल्या हातांत आहे, ना? आता इतके सारे समजूनही काही ठराविक इतर आय. डीज त्याला प्रतिवाद करीत रहातात. तेव्हा ह्याच्यामुळे 'धाग्याचे काश्मिर' होत असेल, तर त्याची जबाबदारी ह्या आय. डी. कडे नसून ती ह्या ठराविक प्रतिवाद करणार्‍यांवर येते.

तुषार काळभोर's picture

1 Jul 2021 - 9:15 pm | तुषार काळभोर

प्रचंड सहमत

तुषार काळभोर यांनी खरडफळ्यावर या गोष्टीचा दुवा दिला होता.

गुल्लू दादा's picture

1 Jul 2021 - 9:33 pm | गुल्लू दादा

वाघ आणि गाढव ची गोष्ट आवडली आहे. धन्यवाद.

Bhakti's picture

1 Jul 2021 - 3:47 pm | Bhakti

'धाग्याचे काश्मिर' होत असेल, तर त्याची जबाबदारी ह्या आय. डी. कडे नसून ती ह्या ठराविक प्रतिवाद करणार्‍यांवर येते.

Rajesh188's picture

1 Jul 2021 - 9:55 pm | Rajesh188

माझ्याच पोस्ट वर.
मग गोष्टी मधील गाढव कोण?
अजुन दुर्लक्ष करून पुढे जाणे शक्य झाले नाही मग वाघ कोण?

प्रदीप ह्यांचा प्रतिसाद गिनती मध्ये नाही .त्यांनी योग्य ते मत मांडले आहे.त्यांना जे वाटले ते.
बाकी मंडळी वाहत गेली आहेत .
तुमचे चालू ध्या ह्या धाग्यावर नी आता काहीच लीहणार नाही.
फक्त कथा पोस्ट करू नका इसाप निती मधल्या.

कंजूस's picture

1 Jul 2021 - 10:59 pm | कंजूस

आणखी काय करणार?

अभिजीत अवलिया's picture

22 Jul 2021 - 11:32 am | अभिजीत अवलिया

पुढील भागाची वाट बघतोय.

diggi12's picture

13 Apr 2024 - 2:21 am | diggi12

उत्तम लेख मालिका
पुढील भागाच्या प्रतिक्षेत