आज काय घडले... चैत्र व. ४ यदुवंशविलासु' रामदेवराव दिल्लीस !

Primary tabs

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
12 Jun 2021 - 9:41 am

देवगिरी

शके १२२९ च्या चैत्र व. ४ रोजी महाराष्ट्रांतील देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यांस मलिक काफूरनें कैद करून दिल्लीला नेले.

तेराव्या शतकांत महाराष्ट्रांत रामदेवराव यादव नांवाचा राजा देवगिरी येथे राज्य करीत होता. शके १२१६ मध्ये मोठ्या फौजेनिशी दिल्लीपर्ताचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरीवर हल्ला करून रामदेवरावाचा पराभव करून अगणित द्रव्य नेले होतेच. यानंतर बारातेरा वर्षांनी अल्लाउद्दीनाने तीस हजार घोडेस्वार बरोबर देऊन मलिक काफूरास देवगडावर रवाना केले. हा काफूर खंबायतच्या एका सावकाराजवळ गुलाम होता. बादशहाची मर्जी त्याच्यावर असल्याने ही कामगिरी त्याकडे आली होती. माळव्यांतून खानदेशच्या वाटेनें सुलतानपुरावरून तो देवगिरीस आला. या सरदाराशी लढा देण्यास आपण समर्थ नाही असे पाहून रामदेवराव हतबल झाला असतां मलिक काफूरने त्यास कैद केले. दिल्लीस गेल्यानंतर तेथे बादशहाने न्याचे स्वागत करून त्यास एक छत्र, गजाधिराज हा किताब, व एक लाख रुपये बक्षीस दिले; तीन महिन्यांनी तो परत आल्यावर शके १२३१ मध्ये रामदेवरावाचा अंत झाला.

रामदेवराव यादव हा कृष्णदेवाचा मुलगा. याच्या राज्यांतच या वेळी ज्ञानेश्वर-नामदेवांच्या प्रयत्नाने भागवतधर्माचा डंका महाराष्ट्रांत झडू लागला होता. श्रीज्ञानेश्वरांनी या राजाचा उल्लेख आपल्या ज्ञानेश्वरीत असा केला आहे. " तेथ यदुवंशविलासु । जो सकळकळानिवासु । न्यायातें पोषी क्षितीशु । श्रीरामचंद्र ।" महानुभाव पंथाचा चक्रधर-कृष्ण व हेमाद्रिसारखे जाडे विद्वान् याच्याच.काळांत होऊन गेले. कृष्णभक्त बोपदेव याच काळांत चमकला. रामदेवराव वारल्यानंतर आठनऊ वर्षांतच देवगिरीचे राज्य नष्ट होऊन महाराष्ट्राचे स्वातंत्र्य हरपले. आणि नंतर इस्लामी संस्कृतीच्या लाटेरवाली महाराष्ट्रांत भयंकर काहूर माजून राहिले.

-२४ मार्च १३०७

इतिहास

प्रतिक्रिया

मार्कस ऑरेलियस's picture

13 Jun 2021 - 10:53 am | मार्कस ऑरेलियस

शक आणि ईसवी सन ह्यांची सरमिसळ केल्याने रीतसर कालगणना लावताना घोळ होत आहे . माझ्या आकलना नुसार ही कालगणना खालीप्रमाणे असावी :

ज्ञानेश्वरांचा कालखंड : इ.स. १२७५ - इ.स. १२९६
अल्लाऊद्दीन खिलजीचा सत्तेतील काळ : इ.स १२९६ - १३१६
देवगिरीवरील आक्रमण : इ. स. १२९६
देवगिरीवरील दुसरे आक्रमण : मलिक काफुर च्या नेतृत्वाखालील : १३०८ आणि यादव साम्राज्याचा सर्वनाश !

सांगण्याचे तात्पर्य इतकेच की :

ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या हयातीत शांततेचा धर्म , त्याचे अनुयायी आणि त्यांची कार्यपध्दती पाहिली नव्हती , त्यामुळे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत लिहुन ठेवलेले काही शांततेच्या धर्माच्या लोकांना लागु पडत नाही. भाल्याच्या टोकावर खोचलेले राजाचे मुंडके पाहिले असते तर ज्ञानेश्वरांनी "जो जें वांच्छील तो तें लाहो " असलं काही लिहिलंच नसतं ! शांततेच्या धर्माचा भारतातील उत्कर्ष पहाण्याचे भाग्य नामदेवांना लाभले , एकनाथ , रामदास ह्यांनाही लाभले , पुढे युकोबांनी केलेला अभंग आठवला ह्या निमित्ताने --

न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दु:खी होते ।।१।।
काय तुम्ही येथें नसालसें जालें । आम्हीं न देखिलें पाहिजे हें ।।२।।
परचक्र कोठें हरीदासांच्या वासें । न देखिजेत देशें राहातिया ।।३।।
तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हिनपणें देवा जिणें जालें ।।४।।

अर्थात महात्मा फुले ह्यांच्या शब्दात - ज्ञानेश्वर हे धूर्त देशस्थ आळंदीकर ब्राह्मण आर्य भट असल्याने त्यांच्या मताला किती किंमत द्यायची हा ज्याचा त्याचा निर्णय !

असो.

मार्कस ऑरेलियस's picture

13 Jun 2021 - 11:02 am | मार्कस ऑरेलियस

* सदर अभंग तुकोबांनी लिहुन ठेवलेला आहे.
भावनेच्या आवेगात लिहिताना T च्या जवळील Y चुकुन लिहिले गेले .

चिंता विचारसरण्या कशा दूर कराव्यात याची भासते, माउली यावर काय मार्गदर्शन देतात ते सांगितले तर उपकृत होईन...

चौथा कोनाडा's picture

14 Jun 2021 - 5:15 pm | चौथा कोनाडा

धाडस आणि शौर्याच्या अभावापोटी अध्यात्म आणि भक्ति संप्रदाय फोफावला का हे तपासणे गरजेचे ठरते !

अध्यात्मासाठी शौर्य व धाडस हे गुण अत्यावश्यक आहेत. वस्तुस्थिती ही आहे की नुसते शांत बसुन राहण्यासाठीही हे अंगी असावे लागते हे जो बसतो तो तर निक्षुन सांगेल...

अभ्यास म्हटला तर
ख्रिश्चन क्रुसेड प्रसिध्द आहे,
जिहाद प्रसिध्द आहे,
शाउलिन टेंपल (कुन्ग्फु युध्दकला) नंतर राजकीय अड्डा बनले त्यामुळे अध्यात्मीक गणावे का हा प्रश्न आहे,

मला वाटते खरे नुकसान अध्यात्माचे वा भक्तीचे पांघरुण ओढणारे करतात... जे अध्यात्म जगत नाहीत पण त्यात आकंठ बुडालेले भासतात/भासवतात त्याचा बळी असणं खरे नुकसानदायक.

बाकी नॉन अध्यात्मिक व्यक्तीही भित्र्या असु शकतात...

हे बघता अध्यात्माचे पांघरुण ओढणे जेंव्हा जेंव्हा सोपे बनवले जाते तिथे त्याचा नकलिपणा फोफावतो सर्वदुर होतोच हे नक्कि. त्यांमुळे वास्तव उपरती शिवाय प्रत्येकावर निव्वळ संस्कारातुन अध्यात्म, भक्ती याची सक्ती अत्यंत नुकसानदायक असे आपण तुर्त म्हणु शकतो. बाकी युध्दातील हार जितेचा अध्यात्माशी अथवा धार्मीकतेशी संबंध नाही अध्यात्मात पोचलेली व्यक्ती युध्दात सहज पराभुत होउ शकते...आणी व्यवस्थित केले तर युध्दात कृष्ण कोणाच्या बाजुने उभा होता हे ही मॅटर करत नाही.

जसे व्यक्तीला कला, वाणिज्य, विज्ञान शाखा निवडायचे स्वातंत्र्य आहे तसेच त्याला भौतिक अनुकुलता अथवा प्रतिकुलतेच्या पलिकडे विचार करुन अध्यात्मात पारंगत व्हायचा मार्ग खुला ठेवला असेल तर असे अध्यात्म अथवा भक्तिमार्ग शौर्य व धाडसच निर्माण करेल.