आंबा

Primary tabs

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
7 Jun 2021 - 5:00 pm

आंबा
जन्माने आणि कर्माने कोकणातच वाढल्याने आंबा हा अगदी जिव्हाळ्याचा विषय. चिपळूण जवळच्या गावात स्वतःची हापूस आंब्याची बाग असलेल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आल्याने फक्त आणि फक्त हापूस आंबाच आवडणे हे माझे जन्मसिद्ध कर्तव्य मी आजतागायत पार पाडत आले आहे. घरी तसे इतरही आंबे असतातच. पण एकदा जी हापूस ची गोडी लागली ती काही अजून सुटायला मागत नाही. मुंबई ला कामाला असताना देखील भर मे महिन्याच्या कोकण रेल्वे च्या चेप गर्दीत देखील आंब्याचे बॉक्स घेऊन ठाणे स्टेशन ला उतरलेली आहे. दुर्दैवाने लेडीज डबा अगदीच प्लॅटफॉर्म च्या एका टोकाला नि मला जायचं दुसऱ्या टोकाला, हमाल पण दिसत नव्हता, अशा वेळी जराही लाज न बाळगता दोन्ही बॉक्स खांद्यावर नि पाठीला सॅक अशा अवतारात सगळा प्लॅटफॉर्म पालथा घालून वर सगळा रस्ता तुडवून घरी गेलेली आहे. तेव्हा आंब्यासाठी काहीही या सदरात मी मोडते. जगण्यासाठी खाणे की खाण्यासाठी जगणे या प्रश्नाला आंब्याच्या सिझन मध्ये तरी खाण्यासाठी जगणे हेच माझं उत्तर असत. अगदी डायट चालू करायची वेळ आली तरी, जरा पोटभर आंबे खाते नि मग उपाशी राहते अस माझं उत्तर असत.
आमच्याकडे आंबे हे मे महिन्याशिवाय होत नाहीत. मे महिना आला की आंबे काढणी आणि मग ते आढित घालून पिकयाला ठेवायचे. हे 7 ते 8 दिवस खूप संयमाचे असतात. मग मात्र जो उत्सव सुरू होतो तो जून पावेतो चालू राहतो. सुरवातीचे आंबे हे " ग्राहक ही देवता है" या न्यायाने जेव्हा भाव चांगला असतो तेव्हा बाहेर पाठवून होतात.त्यामुळे लोकांचे आंब्याचे फोटो बघूनही आम्हाला धीर धरावा लागतो. एकदा 10 मे तारीख उलटली की आंब्याचा भाव घसरतो आणि मग उरलेला सगळा आंबा आपला हे जाणवून मानसिक समाधान होत. आता उरलेला असला तरी गाळीव मात्र नक्कीच नसतो. एकेक अस्सल फळ असत. 300 ग्राम नि त्या वर वजनाला भरणारी फळ तशीही बाहेर विकायला जात नाहीत, कारण त्यांना तेव्हढा भाव मिळत नाही. त्यामुळे इथून पुढे ऐश चालू होते. या दिवसात पोळी नि रस एवढंच जेवण पुरत, पोळी बरोबर भाजी, कोशिंबीर, चटणी ,लोणचं यातलं काहीही लागत नाही. रस मात्र अगदी पोटभर हवा. एक बाउल, दोन बाउल अस मोजून खाणं माहीतच नाही. सरळ बऱ्यापैकी आकाराची तासराळी घ्यायची. म्हणजे परत परत भरायचा त्रास नको. दुपारी पोटभर रस खाऊन मस्त ताणून द्यायची. संध्याकाळी साधं जेवण आणि स्वीट डिश म्हणून परत आंबा. शिवाय अधे मध्ये भूक लागेल तेव्हा सुद्धा आंबा हाच पर्याय जो सर्वमान्य असतो.या आंब्याचा चुकूनही कंटाळा येत नाही. इतकं आंबा प्रेम उतू जात असत आमचं. एक वेळी कमीत कमीत 3/4 आंब्याचा रस मीच सहज खाते, तर बाकी भावांची बातच विचारू नका. त्यातही रस हा नुसता रसासारखा खायचा. त्यात दूध, तूप, मिरपूड असलं काहीही न मिसळता , गाठी असलेला रस खायचं समाधान खूपच. मे महिना असल्याने पंगतीला पाहुणे असतातच. कोकण बाहेरचे असतील तर घरातल्या सगळ्यांच आंबा प्रेम पाहून चकितच होतात. बाधणार नाही एवढा आंबा खाऊन? या त्यांच्या प्रश्नावर नाही म्हटलं तरी हसू येतं. पण अशा वेळी दिवेकर बाईचं पटत, जिथे जे पिकत ते खावं.(सोयीस्करपणे प्रमाणात हे विसरते मी.) पण लहानपणापासून सवय असल्याने आजपर्यंत आंबा मला कधीही बाधला नाही.
जून ची 10 तारीख झाली की मात्र हापूस आंबा संपायला लागतो. आता पुढच्या वर्षीशिवाय दर्शन नाही.अर्थात कॅनिंग करून रसाच्या बाटल्या असतातच भरलेल्या ज्या 12 महिने उपलब्ध असतात. पण ताजा रस तो शेवटी ताजाच.
आणि मग आता वेळ येते ती इतर आंब्यांची. आमच्या कडे इतरही आंब्यांच्या जाती आहेत. पण हापूस संपला की मग त्यांच्याकडे नजर वळते. तोवर त्यांचाकडे ढुंकून देखील बघणं होत नाही. रत्ना नावाचा मस्त आंबा असतो. मोठ्ठं फळ असत एकदम. त्याचा रसही एकदम भरपूर निघतो. आंबा खराब निघण्याच प्रमाणही खूपच कमी आहे. त्याचबरोबर गोलांबा म्हणून पण एक आहे. तोही चवीला छान असतो. याच फळ छोटं असल तरी गोडीला सुंदर असतो. हापूस संपल्यावर मग आमची गाडी यांच्याकडे वळते. खर तर वेगळी जात म्हणून हे दोन्ही शिवाय रायवळ, पायरी वेगळं स्थान राखून आहेत. पण हापूस पुढे या जाती नाही म्हटलं तरी दुर्लक्षित होतात. जेव्हा पर्याय नाही तेव्हा माझ्यासारखी माणसं यांचा विचार करतात. काही जवळची माणसं देखील आहेत ज्यांच्या घरी ढिगाने हापूस असून देखील ती हापूस ला स्पर्श देखील करत नाहीत. मला खरंच आश्चर्य आणि वाईट दोन्ही वाटतं. लोक हजारो रुपये मोजून त्यांच्याकडून आंबा घेतात आणि हे घरात समोर रसाच पातेलं असून निर्विकार मनाने भाजी पोळी खातात.मानलं बाबा यांना.
असो तर आंबा हे माझं अत्यंत आवडत फळ आता या सिझन साठी संपत आलेलं आहे. त्याची भेट आता पुढच्या वर्षी. तोवर रत्ना, गोलांबा यावर ताव मारणे. आणि नंतर बाटलीतील रस खाऊन समाधान मानून घेणे.

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

7 Jun 2021 - 5:32 pm | चौथा कोनाडा

झकास आम्रकथन !

🍑

गाठी असलेला रस खायचं समाधान खूपच

आहाहा...

चौकस२१२'s picture

7 Jun 2021 - 6:07 pm | चौकस२१२

300 ग्राम नि त्या वर वजनाला भरणारी फळ तशीही बाहेर विकायला जात नाहीत, कारण त्यांना तेव्हढा भाव मिळत नाही.
या मागचं कारण काय असावे? ३०० ग्राम च्या वर असेल तर "नुसताच आकार आणि चव कमी" असे काही असते का?

भारत सोडल्यावर जरी दरवर्षी साधारण भारतात येणे व्हायचे पण ते डिसेंबर मध्ये आणि इकडे भारतीय आंब्याच्या आयातीला बंदी त्यामुळे ६ वर्षांनी सिंगापुर ला हापूस खायला मिळाला होता तेव्हाचा आनंद आठवला ... हा लेख वाचून
वाडीलाल ने या वर्षी आंब्याचे गोठवलेले काप आणले आहेत ... कालच घेऊन आलोय, त्याआधी केसर चे मिळले होते .. चांगले होते , हे हापूस पण चांगले असावेत .. बघुयात ..
एक विचीत्र गंमत म्हणजे श्लेनोंचं प्रमाणे मीही हापूस चा भक्त असलो तरी कधी आंबयाचे आयस्क्रीम एवढे आवडले नाही ...कदाचित ते बाजरी इसेन्स घातलेले असते म्हणून कि काय तसेच आंब्याची पोळी पण नाही आवडत ... का कोण जाणे उगाच फसवल्यासारखेच वाटते

गुल्लू दादा's picture

7 Jun 2021 - 8:14 pm | गुल्लू दादा

कालच औरंगाबादच्या युनिव्हर्सिटी मधून 2किलो लंगडा आणि 1 किलो केसर घेऊन आलो..मित्र-मित्र जाऊन. बाकी लेख छान आहे. इकडे हापूस च्या नावाखाली काही पण देतात. नेमका हापूस कसा ओळखावा? याविषयी माहिती दिल्यास आभारी असेल आणि तिकडे याचा रेट किती असतो आणि औरंगाबाद सारख्या ठिकाणी कुठे मिळत असेल तर सांगावा. धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

7 Jun 2021 - 8:38 pm | चौथा कोनाडा

हापुस ओव्हररेटेड वाटतो .. कारण आंबा या शब्दातील "आंबटपणा"ला तो कमी पड्तो !

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2021 - 12:23 am | टवाळ कार्टा

हापुस ओव्हररेटेड??? उद्या पु.लं.ना ओव्हररेटेड म्हणाल =))

पु.लं.ना ओव्हररेटेड म्हणाल

पु.लं. ओव्हररेटेडच आहेत :)

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2021 - 11:22 am | टवाळ कार्टा

तुम्ही आंबा न आवडणारे हाहात त्यामुळे वरचा प्रतिसाद अपेक्षित होता.....ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊउ

प्रचेतस's picture

8 Jun 2021 - 12:25 pm | प्रचेतस

आईंग...!
कोण म्हणतं आंबा आवडत नाही आम्हास? जीव की प्राण हे भो तो. :)

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2021 - 8:51 pm | श्रीगुरुजी

आंबा आणि आमरस म्हणजे आमचा जीव की प्राण. आमरस असला की वरण, आमटी, भाजी, चटणी अशा किरकोळ गोष्टींकडे आम्ही ढुंकूनही पहात नाही.

सौंदाळा's picture

7 Jun 2021 - 9:11 pm | सौंदाळा

छान लेख,
पण मी हापुस फक्त कापुनच खातो.
रस खायचा तो पायरीचाच.
आणि रायवळ आणि माणकुर चोखुन खायचा.

चौथा कोनाडा's picture

8 Jun 2021 - 5:29 pm | चौथा कोनाडा

हापुस फक्त कापुनच खातो.

र्राइट्ट स्सार ! हापुस पिळून रस खाणार्‍या लोकांची मला कीव येते !
तसा हापुस "शो" चाच आंबा आहे, पाहुणे आले की कापुन फोडी करून शायनिंग मारायला.
अमुक एका गावची भाषा हीच भारी असं पसरवणार्‍या जमातीनंच हापुस ओव्हररेटेड करुन ठेवलाय.
पायरी बोले तो पायरीच हय, बाकीच्यांनी पायरी वळकुण घ्यावी !
(पळा ... पळा ...)

प्रचेतस's picture

8 Jun 2021 - 6:20 pm | प्रचेतस

पायरी मलाही भयानक आवडतो. मात्र हल्ली कमीच मिळतो त्यातही खूपदा आंबट निघतो. अस्सल अमृत पायरी मिळण्याचे प्रमाण एकदम कमी झालेय हल्ली. बागायतदार कलमांकडे जास्त वळतात.

हल्ली केशरवर प्रेम जडलंय. हापूसपेक्षा स्वस्त, हमखास गोडच निघणार आणि खराबही निघत नाही कधी. रस करा किंवा कापून खा, भारीच लागतो.

चौथा कोनाडा's picture

9 Jun 2021 - 5:53 pm | चौथा कोनाडा

केशर +१

केशर सोबत लंगडा, लालबाग, तोतापुरी हे देखील झकास आहेत !
बर्‍याचदा हे सगळे प्रकार आणून एकत्र रस करतो, भारी चव लागते !

आहाहा... काय सुंदर आम्र वर्णन केले आहे ! झ - का - स !
आंबा न आवडणारे नग बघितले तर असे वाटते की हा जीव या भुतलावरचे अमृत चाखु इच्छित नसेल तर त्याच्या सारखा दुर्भाग्यवान कोणी नसावा !
माझे बालपण असेच आंब्याच्या सहवासात गेलेले आहे आणि ते देखील वेगवेगळ्या आंब्यांच्या झाडाच्या संगतीत... फक्त फरक इतकाच की आम्ही कैर्‍या तोडण्याची मजा घ्यायचे... रानात फिरुन पिकुन खाली पडलेले आंबे वेचणे याची मजा काही औरच होती. मी आणि माझे मित्रमंडळ हे फक्त चोरुन कैर्‍या पाडणे / झाडावर चढुन कैर्‍या तोडणे किंवा मोठ्या बांबुला आकडा बनवुन कैरीला त्याच्या बेचक्यात अडकवुन गोल गोल फिरवुन ती तोडणे हा आमचा आवडता कार्यक्रम असे. मग तोडलेल्या कैर्‍यांची वाटणी केली जाई. ज्या कैर्‍या फुटल्या असतील त्यांना तिखट-मीठ चोळुन आम्ही फस्त करत असु.
अगदी इथेच आंब्यांच्या झाडाचा कैर्‍यांनी लगडलेला फोटो दिला होता आणि मिपाकरांना कैर्‍या मोजायला सांगितले होते. [ तो फोटो काही आता काही कारणाने त्या धाग्यात दिसत नाही. :(
एप्रिल फळ (२)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- We must never forget or diminish the sacrifices of those who gave everything for this nation. :- Jim Walsh

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2021 - 12:22 am | टवाळ कार्टा

हायला....मला पण घ्या ग्रुपात....दुनिया एक तरफ आणि हापूस एक तरफ....अस्सल लालसर पिवळ्या हापूससमोर कोहिनूरपण झक मारतो

पाषाणभेद's picture

8 Jun 2021 - 5:21 am | पाषाणभेद

तोंपासु

योगी९००'s picture

8 Jun 2021 - 9:50 am | योगी९००

छान लेख...

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्दा आंबा खाल्ला आहे. समाधान काय ते होत नाही. पण आता आंबा सिझन संपायला आला म्हणून वाईट वाटतेय.

आमरस किंवा मिल्कशेक पित असतो त्यावेळी नेहमी वाटते की देव अमृत पितात ते हेच असावे. लहानपणी कुठल्यातरी comics मध्ये देव केशरी रंगाचे काहीतरी अमृत म्हणून पिताना दाखवले होते. तेव्हापासून हेच माझ्या डोक्यात बसलंय की आमरस म्हणजेच अमृत. आमरस = सोमरस हेच डोक्यात बसलंय.

Bhakti's picture

8 Jun 2021 - 10:39 am | Bhakti

त्यामुळे लहानपणापासून आवडतोच.आमच्या आत्याकडे खोलीभर आंबे पिकायला ठेवलेलं असत पोट तुडुंब होईपर्यंत ताव असायचा.
माझं थोडं आमरसपुराण
अर्थात हापूसला पर्याय नाही.पण मफुकृवि आंब्याच्या काळातच पेपर चेकिंग असायचे रोज अपडाऊन मग आंब्याने परिसर घमघमलेला असायचा रोज शेजारी पाजारी, ओळखीचे सगळे आंबे आण अशी मागणी करायचे, मज्जा असायची.
बाकी मी पहिल्यापासून आमरसात तुप, कुरडई,पापड टाकून खाते. लग्न झाल्यावर पहिल्यांदा हे आमच्या ह्यांना नवीनच होतं अजूनही त्यांना हे चमत्कारीकच वाटत ;)
बाकी मुलगी आता याला म्यंगो ज्यूस म्हणते:)
छान लिहिलंय तुम्ही!

योगी९००'s picture

8 Jun 2021 - 2:39 pm | योगी९००

नाशिक साईडला भातात आमरस घालून खाणारे लोक पाहीले आहेत.

मला मात्र आमरस व पुरणपोळी एकत्र खायला खूप आवडते.

चौकस२१२'s picture

8 Jun 2021 - 3:21 pm | चौकस२१२

मला मात्र आमरस व पुरणपोळी एकत्र खायला खूप आवडते.
हे करून बघायाला पाहिजे खरे ... ह...म म .... कसे लागेल? म्हणजे दोन्हीचा आनंद मिळेल कि मारला जाईल?

इरसाल's picture

8 Jun 2021 - 4:23 pm | इरसाल

खान्देशात, मे महिन्यात जावई घरी आला म्हणजे त्याला आमरस-पुरी(पुरणाची पोळी) या व्यतिरिक्त दुसरा पाहुणचार म्हणजे घोर पापच.
बाजारातुन लंगडा (आंब्याची जात) आणुन त्याचा रस बनवुन त्यासोबत पुरणपोळी, कांदामिरचीच्या भज्या, अळुच्या पानांच्या भज्या, पापड (४/५ प्रकारचे) कुर्डाया तळुन, सोबत भात आणी रसोई ( तिखट तर्रीवाला रस्सा ज्यात गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे सोडतात जस्टलाईक डुबुकवड्या) आणी आवडणार्‍याला आमरसात भरभरुन साजुक तुप... काहीजण दुधही मिक्स करतात आमरसात.

कधी कधी रात्री आमरस शेवया हा देखील हिट कार्यक्रम असतो.

इरसाल's picture

8 Jun 2021 - 4:25 pm | इरसाल

आजकाल गॅसतव्यावर बनवलेल्या पुरणपोळ्या असतात. चुलीवर खापरावर बनवलेल्या पुरणपोळ्या (मांडे) ते तर एक कमालच असायची.

मुक्त विहारि's picture

9 Jun 2021 - 10:11 pm | मुक्त विहारि

हापूस किंवा केशर आंब्याचा रस, तुपात तळलेली पुरणपोळी, बाजूला भरपूर तूप, आणि जोडीला वैदर्भिय पद्धतीने केलेली ढेमश्याची भाजी आणि मिरच्यांची भजी , हे माझे एक आवडते पंचखाद्य..

चौकस२१२'s picture

10 Jun 2021 - 5:40 am | चौकस२१२

ढेमश्याची ?

इरसाल's picture

10 Jun 2021 - 12:59 pm | इरसाल

गोल भेंडी

मुक्त विहारि's picture

10 Jun 2021 - 1:39 pm | मुक्त विहारि
सौन्दर्य's picture

9 Jun 2021 - 11:17 pm | सौन्दर्य

काश हम खानदेश के जमाई होते !

चौकस२१२'s picture

8 Jun 2021 - 3:33 pm | चौकस२१२

आमरसात , कुरडई,पापड टाकून खाते
कसे लागेल? म्हणजे दोन्हीचा आनंद मिळेल कि मारला जाईल?

गोड गोड आमरस आणि तळलेली खमंग कुरडई,पापड/पापडी मस्त लागते,एकदा ट्राय कराच!
आमरस शेवया खाण्याची इच्छा आहे ,बघते एकदा.

मुक्त विहारि's picture

9 Jun 2021 - 10:07 pm | मुक्त विहारि

भरपूर तूप मात्र हवेच

बेकार तरुण's picture

8 Jun 2021 - 12:30 pm | बेकार तरुण

लेख आवडला....
मी अत्यंत दुर्दैवी ईसम आहे हे मला कबुल आहे, पण मला आंबा विषेश आवडत नाही... (म्हणजे लोकांना सफरचंद आवडते तितकाच मला आंबा आवडतो, वाट वगैरे बघुन अन मिळाल्यावर त्यावर ताव मारावा असे काही मला वाटत नाही)....
पण मला कधीतरी आमरस भात अन त्यावर भरपुर तुप घेउन खायला आवडते... अजुन कोणी खाते/तो का आमरस भात????

शाम भागवत's picture

8 Jun 2021 - 6:01 pm | शाम भागवत

आता उरलेला असला तरी गाळीव मात्र नक्कीच नसतो. एकेक अस्सल फळ असत. 300 ग्राम नि त्या वर वजनाला भरणारी फळ तशीही बाहेर विकायला जात नाहीत, कारण त्यांना तेव्हढा भाव मिळत नाही.

काय हे?

अहो, जर असं वजनदार व खात्रीचे फळ असेल तर मला कळवा. मी तेवढ्यासाठी एक कोकण ट्रीप मारीन.

गोरगावलेकर's picture

9 Jun 2021 - 8:17 pm | गोरगावलेकर

आमच्याकडेही आमरस त्यावर साजूक तुपाची धार आणि पोळी/पुरी सगळ्यांना आवडते. दोन महिने तर दुपारच्या जेवणात काय स्वयंपाक बनवायचा याची चिंताच नसते. सोबत गावाहून मिक्स डाळींच्या वड्या (सांडगे) येतात त्याची भाजी किंवा नुसत्या कांद्याची किंवा कुर्डयांची भाजी असतेच असते.
(आमचे शेजारी आंब्याचे व्यापारी आहेत त्यामुळे काही वर्षांपासून मनसोक्त हापूस खायला मिळतोय. भाव विचारायचा नाही. सीझनच्या शेवटी सांगतील तेव्हडे बिल द्यायचे. साजूक तूप घरीच बनवते. आंब्याचा सिझन सुरु व्हायच्या आधी एक महिन्यापासूनच तुपाची साठवण करायला सुरुवात करते. )

सिरुसेरि's picture

9 Jun 2021 - 9:55 pm | सिरुसेरि

मस्त आठवणी .

मुक्त विहारि's picture

9 Jun 2021 - 10:06 pm | मुक्त विहारि

आमच्या घरांत माणसे तशी 4च, पण दिवसाला दोन डझन हापूस सहज लागतो ....

ह्या वर्षी, कच्छ मधून केशर आंबे मागवले होते. अप्रतिम मिळाले. होम डिलीव्हरी असल्याने, चिंता नाही...

बदलापूर मधील, राजू भट, यांच्याकडे नैसर्गिक रित्या पिकवलेले आंबे मिळतात, ते पण उत्तम मिळाले...

उगा काहितरीच's picture

10 Jun 2021 - 10:32 am | उगा काहितरीच

फोटो, लेख, प्रतिक्रिया सगळं सगळं छळ आहे केवळ !

जन्म मराठवाड्यातील असल्यामुळे हापूस ची ओळख तशी उशिराच झाली. पण खरं सांगतो जेव्हा पासून हापूस अनुभवला तेव्हा पासून बाकी आंब्याकडे बघवत पण नाही. नशीब म्हणा वा योगायोग पण मागच्या ७-८ वर्षांपासून अस्सल रत्नागिरी भागातील हापूस मिळतोय. कधी आंब्याच्या सिजन मध्ये तिकडे जाणं होते तर कधी ऑफिस मध्ये कुणी घरच्या बागेतील आंबे विकत असते. मागच्या वर्षी एवढा कडक लॉकडाऊन असून पण सोसायटीत कुणीतरी सोय केली. या वर्षी फक्त एकदाच मिळाले चांगले आंबे. १० १५ दिवस चंगळ झाली बस त्यानंतर मात्र केसर वगैरे. बिलकुल मजा नाही आली.
असो! आंबा म्हणजे खरंखुरं प्रेम! कितीही लिहिलं तरी कमीच आहे.