स्तुतीसुमने

साहना's picture
साहना in काथ्याकूट
29 May 2021 - 6:41 am
गाभा: 

सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन

संपादक मंडळाने ठोस भूमिका घेतली आहे त्याबद्दल आभार. विशेषतः नवीन कायद्यांचा आदर त्यांना ठेवावासा वाटत आहे ह्याबद्दल आभार. त्यांचे काम कठीण आहे आणि लंकादहनातील हनुमानाच्या शेपटा प्रमाणे धागे वाढत चालत गेल्याने संपादकीय कार्यवाहीच्या चिंध्या कदाचित त्यांना कमी पडत असाव्यात. त्यामुळे त्याचा आदर ठेवलाच पाहिजे आणि वाद न वाढवता आहे त्यावरच तेल ओतून प्रकरणाची समाप्ती व्हावी हि त्यांची अपेक्षा पूर्ण पणे रास्त आहे. कोरोना प्रादुर्भावांत समस्त सरकारी वर्ग आणि कायदेपालन यंत्रणा हि महाजालावरील माहितीच्या संदर्भांत सुद्धा नवीन कायदे काढणे आणि त्याचे पालन ना करणाऱ्यावर शिक्षा करण्यासाठी वेळ काढू शकते हे आमच्या शासनाच्या कार्यक्षम होण्याचे द्योतक आहे. त्यामुळे आम्ही सर्वानीच आणि संपादकांनी सुद्धा शासनाला शक्य ती मदत केली पाहिजे.

विविध पक्षांचे नेते आणि राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्वे ह्यांच्यावर व्यक्तिगत टीका करणे बरोबर नाही. त्यामुळे संपादकांच्या ह्या "समजे" ला माझा तरी पूर्ण पाठिंबा आहे. कारण राजकारणात उतरणाऱ्या लोकांना समाजसेवा आणि राष्ट्रप्रेम अभिप्रेत असते, वैयक्तिक प्रसिद्धी अजिबात नाही. उपरोल्लेखित उत्तुंग व्यक्तिमत्वे अत्यंत शांतपणे, मान खाली घालून आणि प्रसिद्धीच्या झोतापासून स्वतःला अलिप्त ठेवून कार्यरत असतात. जेंव्हा सदर व्यक्तिमत्वे स्वतःचे खाजगी जीवन इतक्या काळजीपूर्वक जपून ठेवतात तेंव्हा समाजाने सुद्धा प्रघाल्भता दाखवून उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या निव्वळ राजकीय आणि सामाजिक कारकिर्दी कडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. ज्या पद्धतीने सार्वजनिक संकेतस्थळावर नागरिक आपल्या राज्यकर्त्यांवर खाजगी टीका करत आहेत ते शिष्टाचारास धरून नाही. राज्यकर्त्यांनी जर आपल्या बायका मुलांना राजकारणात आणले असते, आपल्या मातोश्री किंवा भावंडांच्या आर्थिक परिस्थितीला ढाल बनवून प्रसारमाध्यमांद्वारे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, आपण काढलेली चित्रे किंवा सुमार दर्जाचे फोटो कोट्यवधीं रुपयांत लिलाव केले असते, आपला खाजगी व्यायाम किंवा ध्यानमग्नता इत्यादी प्रसिद्धीच्या झोतांत राहून केली असती तर गोष्ट वेगळी होती. पण तसे नसताना नागरिकांनी तारतम्य दाखवणे १००% गरजेचे आहे. उत्तुंग व्यक्तिमत्वांची खासियत अशी असते कि आम्हा बुटक्यांना खाली राहून त्यांचे उत्तुंगत्व डोळ्यांत सुद्धा साठवता येत नाही. ज्या पद्धतीने आम्हा अतिसामान्यांना संसद भवन किंवा राष्ट्रपती भवन दुरून सुद्धा पाहता येत नाही. त्याच पद्धतीने उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या वरच्या मजल्यावर काय चालले आहे हे आम्हा पामरांना काही खाली राहून समजने शक्य नाही. त्यामुळे खाजगी टीका करू नये अश्याच मताची मी आहे.

------ अर्थांक टीका करणे चुकीचे असले तरी मला वाटते स्तुती सुमने उधळणे ह्यांत गैर काहीच नाही. नवीन कायद्यांत सुद्धा स्तुती करणे ह्यावर काही बंधने असतील असे वाटत नाही. म्हणून हा लेखन प्रपंच. -----

प्रातःस्मरणीय आणि परमोच्च आदरणीय माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्राचे नेतृत्व अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करत आहेत. त्यांचे मार्गदर्शन आणि धडाडीचे नेतृत्व तसेच साक्षात ब्रहस्पतीला सुद्धा लाजवेल अशी बुद्धिमत्ता असलेले त्यांचे उजवे हात श्री संजय जी, महाभारतकालील राजा आणि त्यांचे सचिव संजय ह्यांचीच आठवण समाजाला करून देत आहे. फक्त आधुनिक संजय हे पुराणकालीन संजयपेक्षा प्रचंड तीव्र दिव्यदृष्टी आणि प्रचंड लवचिक जिव्हा ठेवून आहेत ह्यांत शंका नाही. मराठी भाषेच्या आणि इंग्रजी भाषेच्या शब्दवलींत ते दैनंदिन पद्धतीने भर घालीत असतात.

माननीय आदरणीय मुख्यमंत्री साहेब हे अतिशय मितभाषी तसेच सर्वाना बरोबर घेऊन चालतात. साक्षांत परमेश्वर श्रीकृष्ण ह्यांनी शिष्टाई करून सुद्धा कौरव आणि पांडवांत मैत्री झाली नाही पण काँग्रेस आणि शिवसेनेची युती घडवून राज्यांत सरकार घडवण्याचे आपले तीर्थरुपांचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षांत आणून दाखवले त्याला इतिहासांत तुलना नाही. साक्षांत महाराजांनी सुद्धा मिर्झा राजेंना पत्र लिहून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता आणि महाराजांना सुद्धा शत्रूचे मन वळवणे शक्य झाले नव्हते. पण परम आदरणीय मुख्य मंत्री साहेबानी समस्त समाजाच्या डोळ्यांचे पारणे फिटून डोळ्यापुढे निशासमान प्रकाशक्षय होईल अश्या प्रकारची तात्विक लवचिकता दाखवली आणि काँग्रेस सारख्या प्रखर राष्ट्राभिमानी आणि ज्यांच्या नावांतच राष्ट्रवादी आहे अश्या पक्षांना जवळ आणले.

तात्विक लवचिकता आणि सूचक धोरण हे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या शासनाचे प्रमुख कर्तृत्व आहे. दीड वर्षांत इतकी प्रचंड प्रगती क्वचितच एखाद्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे. महाराजांचे अष्टप्रधान मंडळ म्हणे प्रचंड विश्वासू आणि अत्यंत कार्यक्षम होते. पण कार्यक्षमतेच्या बाबतीत सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व पाडाव मागे टाकले आहेत. इतर शासनांना कर गोळा करण्यासाठी प्रचंड कालावधी लागतो. पण महाराष्ट्राच्या अत्यंत कार्यक्षम गृहमंत्रालयाने, स्कॉटलंड यार्डाशी तुलना होणाऱ्या मुंबई पोलिसांना सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ह्या ब्रीदाची आठवण करून देऊन विविध रेस्टोरंट इत्यादीतून घरपोच कर गोळा केला. इतरांची वाहने वापरून सरकारी वाहनांचा खर्च सुद्धा कमी केला. अगदी स्वीग्गी आणि डॉमिनो वाल्याना सुद्धा अन्न पोचवून पैसे मिळवण्यात वेळ जातो पण मुंबई पोलीस अत्यंत कार्यक्षम आहेत. ह्या एकूण उत्पन्नाचे आकडे इतर शहरातील नेत्यांना समजताच त्यांच्या मनात भय उत्पन्न झाले आहे असे ऐकिवात आहे. आमच्या शहरातून सुद्धा अश्या पद्धतीने किती उत्पन्न गोळा होईल ह्या अभ्यासात इतर राज्ये लागली आहेत पण महाराष्ट्राने पुंन्हा एकदा आपण किती प्रगतिशील आहोत हे दाखवून दिले आहे.

अनेक थोर नेत्यांपुढे सर्वांत मोठी समस्या असते कि आपल्यापुढे नेता कोण ? पण आदरणीय मुख्यमंत्री साहेबाना तशी चिंता अजिबात नाही. त्यांचे सुपुत्र युवा नेते अगदी कूल आहेत आणि त्यांच्या पंखांत बळ उत्पन्न झाले कि ते खगविहंग होतील ह्यांत शंकाच नाही.

अर्थांत टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही आणि स्वतः झिजल्याशिवाय चंदन इतरांना सुघंदीत करू शकत नाही, आणि रसायनाची बाटली संपल्याशिवाय मॉर्टिन डासांना दूर ठेवू शकत नाही. त्या न्यायाने माननीय मुख्यमंत्री साहेबाना आणि त्यांच्या इतर मंत्रिमंडळाला टीकेला सामोरे जावे लागलेच. अर्थांत काँग्रेस चे थोर आणि विद्वान नेते शशी थरूर ह्यांनी ज्या प्रकारची स्तिथप्रज्ञता आपल्या प्रियावियोगानंतर दाखवली त्याच प्रकारची कमालीची स्तिथप्रज्ञता आमच्या मुख्यमंत्र्यांनी विविध राजकीय टिके नंतर दाखवली आहे. अर्थांत लोकशाही म्हणजे आरोप आणि टीका हि अभिप्रेतच असते पण नेत्याचा थोरपणा किती स्थितप्रज्ञतेने तो त्याला सामोरे जातो ह्यावर शेवटी अवलंबून आहे.

अर्थांत शुक्र तारा कितीही तेजोमय भासला तरी सूर्योदय होतांच त्याचे तेज सुद्धा फिके पडते. त्या न्यायाने भारतवर्षांत सुद्धा राष्ट्रीय स्तरावर जो सूर्योदय झाला होता तो आता पूर्णत्वास पोचून माध्यान्ह झाली असे आम्ही समजू शकतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ह्यांचे तेज जर कुठे थोडे कमी वाटत असेल तर ते राष्ट्रीय नेते सर्वधर्मह्रिदयसम्राट प्रधानसेवक महामार्गदर्शक मनोगत प्रकटन प्रमुख सन्माननीय प्रधानमंत्री ह्यांच्या पुढेच. बहुआयामी व्यक्तित्वाचे मानकरी आमचे पंतप्रधान मला "MSG" ह्या सुपरहिट चित्रपटाचे नायक ह्यांची आठवण करून देतात. त्या चित्रपटांत नायक, दिग्दर्शक, संगीतकार, डायलॉग इत्यादी सर्वत्र एकच व्यक्ती होती. कॅमेरा सुद्धा नायकानेच सांभाळला असता पण एकच वस्तू अनेक ठिकाणी असू शकत नाही हा भौतिकशास्त्राचा नियम आडवा आला. त्याच प्रमाणे जी व्यक्ती आम्हाला प्रधानसेवक म्हणून सेवारत झाली आहे ती सुद्धा अक्षरशः शेकडो जबाबदाऱ्या सांभाळत देशाला प्रगती पथावर नेत आहे. किंवा ज्या पथावरून प्रगती जाते तो पथ सुद्धा ह्याच व्यक्तीच्या देखरेखेखाली निर्माण होत आहे. ट्विटर सारख्या आधुनिक माध्यमातून आम्हाला प्रधानसेवकांचे खरे कार्य किती क्लिष्ट आहे हे समजते. गोपाळकृष्णाने गोवर्धन पर्वत निव्वळ करंगळीवर उचलला त्या प्रमाणे प्रधान सेवक सुद्धा संपूर्ण राष्ट्राची जबाबदारी उचलून आहेत. जावडेकर, रविशंकर प्रसाद, पोखरीयल इत्यादी गोपाळ रुपी मंत्रीगण आपली काठी लावून उभे असले तरी ट्विटर वरून श्रेय मात्र नेहमीच प्रधानसेवकांचे आहे हेच सांगत आहेत.

GDP सारख्या भौतिक बंधनात अडकून पडलेल्या समस्त भारतीय समाजाला प्रधानसेवकांनी हे सर्व मिथ्या कसे आहे आणि सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे जिवंत राहणे होय हे ह्या कोरोना बाधित काळांत समजावून सांगितले. भारताला विश्वगुरू व्हायचे असेल, चुकले, भारत आधीपासून विश्वगुरू आहे फक्त इतर लोकांना ठाऊक नाही. पण ते ठाऊक व्हायचे असेल तर प्रधानसेवकांच्या मार्गावर चालण्यापासून तरणोपाय नाही. "आम्ही करतो, मी काही करून दाखवीन" अश्या प्रकारची अहंकार प्रवृत्ती समाजांत बळकावत चालली आहे. कोरोना काळांत प्राणवायू आणणे. लसी निर्माण करणे, सामानाची ने आण करणे अशी कामे अनेक नागरिक अहंकार युक्त भावनेने "मी करतो" अश्या थाटांत करत होते. त्या अहंकाराला प्रधानसेवकांनी आपले विश्वरूप दर्शन दाखवले. ज्या पद्धतीने नारायणाने अर्जुनाला सत्य परिस्थिती अवगत केली त्याच पद्धतीने प्रधान सेवकांनी देशांत जे काही होते ते फक्त सरकारी आदेश आणि सरकारी सेवेकरी लोकां मुळे हे दाखवले. इतर नागरिक जे काही करतात तो मिथ्या अभिमान असून खरा कर्ता धरविता हा मायबाप सरकार आहे हि अध्यात्मिक अनुभूती प्रधानसेवकांनी आम्हाला करून दिली. अखिलकोटी ब्रह्माण्डनायक होण्याची क्षमता बाळगून असलेले महान व्यक्तिमत्व निव्वळ प्रधान सेवक म्हणून राष्ट्रसेवेंत रत आहे हे आमचे परम भाग्य आहे.

माझ्या मते महाराष्ट्र आणि दिल्ली दोन्ही ठिकाणी ह्या उच्च दर्जाचे नेतृत्व निर्माण झाले आहे, तो तसाच दुर्मिळ योग्य आहे जो ज्योतिषशास्त्रांत सर्व ९ ग्रहांच्या एका रेषेंत आल्याने होतो. समस्त भारतीय नागरिकांनी आजूबाजूला एका वडाचे झाड पाहून आणि ते मिळत नसल्यास फांदी आणून आणि तेही मिळत नसल्यास झाडाचा फोटो लावून त्याच्या भोवताली सूत ओढून पुढील ७ जन्म पर्यंत असेच थोर आणि परमआदरणीय नेतृत्व आमच्या राष्ट्रांत राहो म्हणून व्रत ठेवण्याची गरज आहे. कोरोना काळांत अन्न टंचाई निर्माण झालीच तर त्याला व्रत म्हणून समजून आम्ही समाधान प्राप्त केले पाहिजे.

टीप : दोन्ही महान नेत्यांच्या कर्तृत्वाने एक मोठी शंका मात्र मज अबलेच्या मनांत आली आहे. पूर्वी म्हणे पृथ्वीवर प्रचंड पराक्रम कुणी गाजवला कि देव, अप्सरा इत्यादी आणि ऋषी आकाशांतून पुष्पवृष्टी करून सदर नरशार्दुलाना शाबासकी देत असत. दोन्ही नेत्यांनी ज्या प्रकारचा पराक्रम दाखवला आहे तो पाहता पुषवृष्टी झाली पाहिजे होती आणि ती झाली नसल्यास समस्त देववर्गाच्या क्रेडिबिलिटी वर प्रशचिन्ह निर्माण होत आहे असे वाटते. मी स्वतःला अप्सरा समजत नसले तरी माझ्या वतीने स्तुतीरूपी सुमने मी उधळली आहेत.

अनेक राजकीय नेते ज्या पोटतिडकीने आणि कर्तव्यदक्षतेने जनतेची सेवा बजावत आहेत ते पाहून मला कधी कधी रडू येते. म्हणजे अगदीच अलका कुबल लेव्हल नसले तरी दिल से मधील शारुक लेव्हल. जगातील सर्वांत चांगली संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती. ह्या महान संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्याची परमपावन आणि महत्वपूर्ण जबाबदारी ज्या मानवावर आहे अश्या केंद्रीय संस्कृती मंत्र्यांनी भारतीय ध्वजाच्या बाबतीत जी जागरूकता दाखवली आहे ती खरोखर वाखाणण्या जोगी आहे. एका युगपुरुष मुख्यमंत्र्यांनी आपल्या ऑफिसच्या मागे दोन भारतीय ध्वज ठेवले आहेत त्यातील हिरवा रंग थोडा जास्त वाटतो म्हणून त्यांनी युगपुरुषांना पत्र पाठवले आहे [१]. ध्वजाच्या प्रति संस्कृती मंत्रालयाची निष्ठा पाहून खरोखर प्रचंड अभिमान वाटला. जुन्या रीन च्या जाहिरातीत तो दुकानवाला म्हणतो ना "मान गये, आपकी पारखी नजर और रीन दोनोंको" अगदी तसेच म्हणावेसे वाटत.

[१] https://twitter.com/ANI/status/1398169339824525317/photo/1

प्रतिक्रिया

हा हा हा! मस्तच... अवडण्यात आले आहे!

एकच दुरुस्ती..आपकी पारखी नजर और निरमा सुपर दोनोको!

(स्वदेशी प्रेमी) खेडूत

ते नेतेच एकमेकांवर वर्षाव करतात तो टिवीवर आपण पाहतोच. तो पुरेसा आहे.
नागरिक फक्त पाच/सहा वर्षांनी बोट लावून टुंईईईईईई अस्त्र सोडतात.

संजय पाटिल's picture

29 May 2021 - 10:43 am | संजय पाटिल

शाल जोडीतला.....

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 May 2021 - 11:16 am | ज्ञानोबाचे पैजार

अत्यंत उच्च दर्जाचा झाला आहे हा लेख.

नविन नियमांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी लेखन कसे असावे याचा आदर्श वस्तुपाठच जणू.

लेख वाचताना मराठी भाषेची ताकद परत एकदा जाणवली.

पैजारबुवा,

कॉमी's picture

29 May 2021 - 12:30 pm | कॉमी

टुकार लेख.

जबरदस्त. शाल जोडीतून कसे द्यावे ह्याचा वस्तूपाठच !

आनन्दा's picture

29 May 2021 - 1:22 pm | आनन्दा

साहना ताई..
जाम हसलो

आग्या१९९०'s picture

29 May 2021 - 1:38 pm | आग्या१९९०

पूर्वी समांतर चित्रपट यायचे त्याची आठवण झाली. फार कमी लोकांपर्यंत संदेश पोचला जायचा. अशाने मिसळपाव मिळमिळीत होण्याची शक्यता आहे,नव्हे झालीच आहे.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

29 May 2021 - 4:07 pm | ॲबसेंट माइंडेड ...

:)

पाषाणभेद's picture

1 Jun 2021 - 8:14 pm | पाषाणभेद

२०२५- २०२६ सालापर्यंत हा कोरोना राहू शकतो. (नव नवे व्हर्शन येतच राहतील. तो भाग वेगळा.)
पण कोरोना भारतातून जाईल तो कंटाळून!
अहो, मारण्यासारखे असेलच काय येथे?
जनता आधीच असल्या नेतृत्वाखाली बुजली गेली आहे.
अन भारतीय लोकशाही फार थोर! तिला जर नावे ठेवली तर नावे ठेवणाराच नतद्रष्ट ठरतो. पवित्र गाय.
त्यात एखादा नेता, उच्चपदस्त कामाला योग्य न्याय देत नसेल तर त्याला नारळ देण्यात आपली लोकशाही नकारघंटा वाजवते.
बसा आमच्या बोकांडी.

नि३सोलपुरकर's picture

2 Jun 2021 - 5:56 pm | नि३सोलपुरकर

साहना ताई.
"मान गये, आपकी पारखी नजर और लेखन शैली दोनोंको "._/\_