दप्तर..

विखि's picture
विखि in जनातलं, मनातलं
7 May 2021 - 3:32 pm

"जय आवरलं का रे, उशीर होतोय" शाळेचा डबा भरता भरता जयची आई किचन मधून ओरडल्याचा आव आणत होती.
"अगं आई मी काय करू, या बुटाची लेस लागतच नाहीये" कितीतरी वेळ बुटाच्या नाडीत गुंतलेला जय वैतागला आणि बाजूलाच बसलेल्या वडिलांकडे आशाळभूत नजरेने पाहू लागला. तशी वडिलांनी किंचित हसत त्याच्या बुटाची नाडी बांधायला घेतली "बाळराजे अजून किती दिवस तुम्हाला शिकवायचं हे" म्हणत जयच्या पाठीत एक मजेशीर धपाटा मारला.
"कधी कधी बांधतो मी लेस,पण हे बूट नवीन आहेत म्हणून...." जयने बाजू सावरली
"तुझी रोजची कामं तू केलीच पाहिजे जय, पाचवीला गेले तुम्ही आता, ते पण मोठ्या शाळेत" म्हणत वडिलांनी छोट्या जयला जवळ घेतले.
"झालं का तुम्हा बापलेकांच बूटपुराण, चला आता शाळेच्या पहिल्याच दिवशी उशीर नको" किचन मधून आई लगबगीनेहसत बाहेर आली आणि शाळेचा डबा जयच्या दप्तरात ठेवला.
"आई त्या डब्यातून तेल नाही ना बाहेर येणार, दप्तर खराब होईल नाहीतर" जय काळजीने बोलत होता.
"नाही होत हो दप्तर खराब, किती ते नवीन दप्तराचं कौतुक, चला आता नवीन शाळा वाट बघतेय बाळराजे" म्हणत आईने जयच्या गालावर पप्पी दिली.
चौथीपर्यंतची शाळा संपवून जय आता पाचवीला मोठ्या शाळेत आला होता.

नवीन शाळा, नवीन वह्या-पुस्तकं-कपडे, नवीन मित्र, नवीन दप्तर या सगळ्यामुळे स्वारी जाम खुश होती. दप्तर खरेदीसाठी तर जयने संपूर्ण दिवस घालवला होता. पाच-सहा दुकानं पालथी घातल्यावर कुठं त्याला त्याच्या पसंतीचं दप्तर मिळालं होतं. लाल-काळ्या रंगाचे त्यावर स्पायडरमॅनचं कार्टून असलेलं.दप्तर घरी आल्यापासून तो ते सोडायला तयार न्हवता. हा कप्पा उघड तो कप्पा उघड. "ह्या कप्प्यात बाटली,ह्या कप्प्यात वही-पुस्तक, इकडं कंपासपेटी आणि पेन-पेन्सिल" असं स्वतःशीच पुटपुटत होता आणि नवीन दप्तर खांद्यावर लावून घरभर फिरत होता.
"जय सगळ्या गोष्टी नीट ठेव, शाळा सुटल्यावर पप्पा न्यायला येतील आणि उद्यापासून रिक्षावाले काका आणतील तुला" असं सांगून जयचे आई-वडील त्याला वर्गात बसवून जातात.
शाळेचा पहिला दिवस असल्यामुळं वर्गातील वातावरण एकदम प्रसन्न होतं. सगळी मुलं जाम खुशीत दिसत होती. पांढरेशुभ्र कपडे घातलेली मुलं टापटीप आवरून आली होती. काही मुलांची ओळख होऊन त्यांचं वर्गातच खेळणं सुरू झालं होतं. तर काहीजण जरा बुजल्यासारखे बसले होते. जय पण कुणाशी ओळख नसल्यामुळं नुसताच इकडं-तिकडं बघत होता. वर्गशिक्षिका येताच वर्ग शांत झाला. सर्वांची ओळ्खपरेड करून घेण्यात आली आणि तात्पुरत्या बसायच्या जागा ठरवून दिल्या.
जयला पुढून तीन नंबरचा बेंच मिळाला. "तू इथं बस रे" म्हणत बाईंनी एका मुलाला जयच्या बाजूला बसवलं.
हडकुळ्या अंगाचा, सावळ्या रंगाचा असा तो मुलगा अवघडल्यासारखा जयच्या शेजारी येऊन बसला. जयने पण हसून बाजूला सरकत त्याला बसायला जागा दिली. पण तो मुलगा न हसता गपगुमान बसला. वर्गात सगळ्यांनी नवीन युनिफॉर्म घातला होता, पण या मुलाचा युनिफॉर्म नवीन दिसत न्हवता स्वच्छ पण किंचित चुरगळलेले, नीळ दिलेले असे त्याचे कपडे होते. पायात निळ्या रंगाची स्लीपर आणि चेहऱ्यावर जरा कोरडेपण. इतर मुलांसारखा त्याच्या चेहऱ्यावर उत्साह नक्कीच न्हवता.
"ऐ तुझं नाव काय रे" जयने त्या मुलाला विचारलं. तसा जय गप्पीष्ठच होता त्याला ओळख वगैरे लागत न्हवती.
"आं" मुलगा जरा भांबावलेला होता
"तुझं नाव" जय ने परत विचारलं
"सिद्धू" बारीक आवाजात त्याने सांगितलं
"आधी कुठली शाळा होती तुझी"
"बाल शिक्षणला होतो" सिद्धू मोजकंच बोलत होता.
तेवढ्यात वर्गशिक्षिकांचा आवाज आला
"मुलांनो तुमची रफ वही काढा आणि मी सांगते त्या सूचना लिहून घ्या"
सगळी उत्साही मुलं लगेच वही-पेन काढून तयार झाली. जयने पण त्याच्या नवीन दप्तराच्या मागच्या कप्प्यातून खाकी कव्हर घातलेली वही आणि पुढच्या लहान कप्प्यातून एका बॉक्स मधून पेन काढला. बाजूला बसलेला सिद्धू बारीक नजरेने हे बघत होता. नवीन वह्या-पुस्तकं, नवीन कपडे ह्या सगळ्या नव्या-कोऱ्या गोष्टींना एक प्रकारचा वेगळाच मंद वास असतो, तो वर्गभर दरवळत होता.
सिद्धू आजूबाजूला बघत दबक्या हाताने बेंचच्या मधल्या फळीवर ठेवलेली त्याची प्लॅस्टिकची पिशवी बाहेर काढतो. त्यातून एक वर्तमानपत्राचं कव्हर घातलेली वही काढतो आणि आणखी काहीतरी शोधायला लागतो पण त्याला ते काही केल्या सापडत न्हवतं. प्लॅस्टिकच्या पिशवीच्या आवाजाने जयचे लक्ष सिद्धूच्या हालचालीकडं जातं. सिद्धू काहीतरी हरवल्यासारखा त्या पिशवीत सगळीकडून हात फिरवत असतो.
"काय शोधतोय तू" जय त्याला विचारतो
"आरे माझा पेन, हितंच टाकला होता कोपऱ्यात" सिद्धू काळजीने बोलत होता. "कुठं गेला काय माहीत" सिद्धू परत परत पिशवीत बघत असतो, तेव्हा पिशवी एका कोपऱ्यात फाटलेली त्याला दिसते तसा त्याचा चेहरा अजून बारीक होतो.
"देऊ का तुला पेन, आहे माझ्याकडे डबल" जय त्याला विचारतो.
"आं" सिद्धू कावऱ्या-बावऱ्या आवाजात जयकडं बघतो
"धर हा घे" म्हणत त्याला एक पेन देतो
"आरे पण मी हितंच टाकला होता पेन, मंगाशी कुठंतरी पिशवी अडकली आणि फाटली, तिथनं पेन पडला बहुतेक" सिद्धूला हरवलेल्या पेनची काळजी लागली होती.
"राहू दे रे, हा पेन वापर तू" म्हणत जय त्याला धीर देतो. वर्गशिक्षिका सांगतील त्या सूचना मुलं लिहीत असतात.
"अक्षर कसलं भारीये रे तुझं" सिद्धूच्या वहीकडं बघत जय बोलतो. त्यावर सिद्धू नुसताच हसतो. अधूनमधून सिद्धूचं लक्ष न राहवून जयच्या नवीन साहित्यावर जात असतं. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने अर्धाच दिवस शाळा भरणार होती. शाळा सुटायच्या आधी मुलांना डब्याची सुट्टी होते. जय-सिद्धू मिळून डबा खातात त्यानंतर शाळेचा फेरफटका मारतात. दुसरे वर्ग बघत फिरतात. एका दिवसात त्यांच्यात चांगली गट्टी जमते.
शाळा सुटल्यावर सगळी मुलं बाहेत पळत येतात. गेटवर पालकांची गर्दी झालेली असते. जय पळत त्याच्या वडिलांकडे येतो आणि "पप्पा हा बघा माझा नवीन मित्र, सिद्धू" म्हणत मागे उभा असलेल्या सिद्धूकडं बोट दाखवतो. त्यावर सिद्धूदेखील हसतो. "बरं बरं, बस चल गाडीवर ट्रॅफिक झालंय खूप" जयचे वडील घाईत असतात. "बाय सिद्धू, उद्या ये" जय मोठ्याने आवाज देतो. सिद्धूपण त्याला "बाय" म्हणत हात दाखवतो आणि त्यांची गाडी मेन रोडला जाईपर्यंत तिथंच त्यांना बघत बसतो.
घरी जाताच जय आई-वडिलांना दिवसभर शाळेत काय काय केलं ते उत्साहाने सांगत दिवस घालवतो. आई- वडिल कौतुकाने सगळ्ं ऐकुन मजा घेतात.
दुसरा दिवस उजाडताच शाळेचे वेध लागलेला जय वेळेत शाळेत पोहोचतो. वर्गात पोचताच आधीच येऊन बसलेल्या सिद्धूला दारातूनच हात करत येतो.
"लवकर आलास का तू?" जय बेंचवर बॅग ठेवत सिद्धूला विचारतो.
"हा, माझं घर काय हितंचे, पुलाच्यावाडीत, पाच मिनिटात पोचतो मी" सिद्धू सांगतो. थोड्याच वेळात प्रार्थनेची घंटा होते. काही मुलं त्या वेळेत पण धिंगाणा घालत होती. तेवढ्यात वर्गशिक्षिका येतात, हजेरी वगैरे होऊन तासाला सुरुवात होते. सर्वजण आपापल्या वह्या-पुस्तकं बाहेर काढतात. जय त्याच्या दप्तरातून साहित्य बाहेर काढून वर ठेवतो. सिद्धूने आजपण कालचीच ती प्लॅस्टिकची पांढरी पिशवी आणली होती. कोपऱ्यात ती पिशवी तशीच फाटलेली होती. त्या प्लॅस्टिकच्या पिशवीकडं बघत न राहवून जय विचारतो.
"तू नवीन दप्तर नाही घेतलं?"
थोडावेळ काहीच न बोलता सिद्धू कोरड्या आवाजात "नाय" म्हणून सांगतो.
"का रे?" जयला परत हा प्रश्न पडतो.
"आई म्हणाली, आता पैशे नाय आपल्याकडं, नंतर घे म्हणती" सिद्धूची नाराजी लपत नसते.
वर्गात किरकोळ आरड्याओरड्यात तास चालू असतो, तर इकडं जय-सिद्धूच्या गप्पा चालू असतात.
"तुझे पप्पा काय करतात?" जय विचारतो.
सिद्धू थोडावेळ शांत होऊन सांगतो "पप्पा नाय मला'
"म्हणजे?" जयला काही समजत नाही
"पप्पा पेंटर व्हते, रोडला भिंती रंगवायचे, एकदा एका गाडीची धडक बसली आणि मेले ते मागच्यावर्षी" सिद्धू नाराज मनाने सहज सांगतो.
पण या आधी असलं काही ऐकलं नसल्यानं जयला एकदम कसंतरी होऊन जातं. सुन्न झालेल्या जयला काहीच सुचत नाही. थोडा वेळ दोघेही शांत बसतात.
"मग घरी पैसे कोण आणतं?" जयला आणखी प्रश्न पडू लागतात.
"आई जातीना कामाला, आमच्यातिथंच एक हॉटेले तिथं चपाती करती आणि घरी पापड पण बनवती"
"तू एकटाच असतोस मग घरी"
"नाय, ताई पण असती, आम्ही आईला मदत करतो" सिद्धू सांगतो.
हे सगळं ऐकून जय शांत होऊन जातो. तो काहीच बोलत नाही.
"तुझे पप्पा काय करतात" आता सिद्धू विचारतो
"ते बँकेत कामाला आहेत"
"मंग तुमच्याकडं टीव्ही पण असल ना"
"हो, आहे ना"
"मला टीव्हीला कार्टून बघायला लय मजा येती, बाजूच्या गण्याकडं बघतो मी कार्टून" सिद्धू जरा खुलून बोलत असतो.
जय-सिद्धूच्या गप्पांमध्ये मधली सुट्टी होऊन त्यांचा डब्बा वगेरे खाऊन होतो. वर्गात एकच गलका सुरू असतो. "मी पाणी प्युन येतो" सिद्धू त्याचा डब्बा पिशवीत टाकत जागेवरून उठतो. "अरे माझ्याकडे आहे ना वॉटरबॅग, ही घे" म्हणत जय सिद्धूला त्याची नवीन वॉटरबॅग देतो पण "नाय, नको" म्हणून सिद्धू शाळेत असलेल्या पाण्याच्या टाकीवर जातो. पाठमोऱ्या सिद्धूला जय बघत बसतो. त्याचं लक्ष सिद्धूच्या प्लॅस्टिकच्या पिशवीकडं जातं. डब्यातुन थोडं तेल बाहेर आल्यामुळं ती एका बाजूला पिवळी तेलकट झाली होती आणि एका बाजूला फाटली पण होती. ते बघुन आणि सिद्धूची एकंदर परिस्थिती ऐकून जयच्या मनात कालवाकालव चालू असते. कुठंतरी शून्यात हरवल्या सारखं त्याला होतं. कुठंतरी तो त्याची आणि सिद्धूची तुलना करू लागतो. घरची परिस्थिती चांगली असल्यामुळं जयला नवीन दप्तर, नवीन कपडे, बाकी गोष्टी सहज मिळाल्या होत्या. उलट आवडीचं दप्तर घ्यायचं म्हणून त्याने कसा सगळं दिवस घालवून महागाचं दप्तर घेतलं होतं हे जयला आठवलं आणि त्याला अजूनच वाईट वाटू लागतं.
थोड्याच वेळात सिद्धू जागेवर येऊन बसतो आणि बघतो तर त्याची प्लॅस्टिकची पिशवी जागेवर नसते. त्याऐवजी जयचं नवीन दप्तर तिथं असतं आणि त्याची पिशवी जयच्या जागेवर असते. पिशवी-दप्तराची झालेली अदलाबदल बघून सिद्धू विचारतो
"तुला हितं बसायचंय का"
त्यावर "नाही" म्हणत जय फक्त हसतो
"मंग, तुझं दप्तर हितं का ठेवलंय" सिद्धू परत विचारतो
"ऐक ना, हे दप्तर तू घेऊन टाक"
"काय" जयच्या या बोलण्यावर सिद्धू उडतोच
"हो, घे तू"
"आरे पण आसं कसं घेऊ मी"
"माझ्याकडे दोन दप्तर आहेत, घरी अजून एक आहे"
"आणि तुझ्या घरचे?"
"त्यांचं काय"
"तुझे पप्पा मारतील ना तुला" सिद्धू काळजीने विचारतो
"नाही रे, ते मला कधीच मारत नाही" जय हसत सांगतो
सिद्धूला हे सगळं जरा विचित्रच वाटतं. तो जरा अवघडल्यासारखा होतो. "आरे नको जय, आई मला घेणारे दप्तर पैशे आल्याव" सिद्धू तयार होत नसतो.
"पण माझ्याकडे आहे ना डबल दप्तर, तू हे वापर मी ते वापरतो" खरं तर जयकडं एवढं एकच दप्तर असतं पण सिद्धूला तयार करण्यासाठी तो असं बोलतो.
नाही हो-हो नाही करत जय सिद्धूला शेवटी तयार करतोच.
शाळा सुटल्यावर जय त्याचं दप्तर रिकामं करून सिद्धूला देतो आणि त्याच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत स्वतःच्या वह्या पुस्तकं ठेवतो. सिद्धू खरं तर शेवट पर्यंत नाही म्हणत असतो पण जयच्या आग्रहापुढं त्याचं काही चालत नाही.
आज जय रिक्षाने घरी जाणार असतो. शाळा सुटताच तो त्याची रिक्षा बघून त्यात बसतो. सिद्धूपण त्याच्या सोबत त्याला सोडायला येतो. आता त्याच्या खांद्यावर नवीन दप्तर असतं. जयने स्वतः त्याला ते दप्तर खांद्यावर घेऊन दिलेलं असतं आणि त्याची प्लॅस्टिकची फाटलेली पिशवी आनंदाने ठेऊन घेतो. रिक्षा सुरू होते. सिद्धू अवघडलेल्या चेहऱ्याने जयला विचारतो "तुला खरंच घरी मारणार नाय ना?"
"नाही रे, उद्या भेटू चल बाय" म्हणत जयपण मोकळा हसतो.
आता घरी जाताना जयची खरी पंचायत झालेली असते. घरी काय सांगायचं म्हणून. पण झाल्या प्रकाराबद्दल तो मनापासून ठाम असतो. त्यामुळं जे आहे तेच तो सांगायचं ठरवतो. पण कितीही म्हणलं तरी तो थोडा घाबरलेला असतो कारण नवीन दप्तर हे महाग होतं.
हाच सगळा विचार करता करता घराच्या पायऱ्या चढून कधी संपतात हेच त्याला कळत नाही. आणि व्हायचं तेच होतं.
घरी जाताच त्याला आई विचारते "जय दप्तर कुठंय रे तुझं" जयच्या पोटात गोळा येतो.
"रिक्षात विसरला का, आणि ही पिशवी कुणाची आहे" आई परत विचारते. बाजूलाच बसलेले त्याचे वडील हे बघत असतात.
"आई.....पप्पा..." जय अडखळत सुरवात करतो.
"अरे काय झालं, कुठंय दप्तर" आई जरा मोठ्या आवाजात विचारते. तिकडून त्याचे वडील आईला डोळ्यानेच शांत व्हायला सांगतात.
"मी दप्तर देउन टाकलं" जय दबक्या आवाजात सांगतो.
"काय...?" एखादा शॉक बसल्यासारखी आई बोलते.
"अरे कुणाला दिलं, का कोणी ओढून घेतलं तुझ्याकडून" आई आता फारच काळजीत पडते.
"नाही मीच दिलं, सिद्धूला, माझ्या मनाने" जय ठामपणे सांगतो.
"आता हा सिद्धू कोण" आई विचारते
"जय काय झालं ते नीट सांग, घाबरू नको" जयचे वडील त्याला विश्वासात घेत सांगतात.
"बघा तरी मी तुम्हाला म्हणत होते एवढं महागाचं दप्तर घेऊ नका" आई मध्ये बोलते.
"तू थांब जरा, काय झालंय ते तरी त्याला सांगू दे" जयकडं बघत त्याचे वडील बोलतात.
"पप्पा तुम्हाला काल दाखवला ना तो माझा नवीन मित्र, सिद्धू, त्याला दिलं मी दप्तर" विषय गंभीर होत चाललाय हे बघून जय झाला प्रकार घडाघडा सांगून टाकतो. सिद्धू, त्याची परिस्थिती, त्याचे आई-वडील, आणि त्याची ती फाटकी प्लॅस्टिकची पिशवी बघून त्याला कसं वाईट वाटलं त्यामुळं सिद्धू तयार नसताना आपण कसं त्याला तयार केलं, सगळं सांगतो.
जयचे आई-वडील आवाक होऊन सगळं ऐकत असतात. जय असं काही वागेल त्यांना अजिबात अपेक्षित न्हवतं. सगळं सांगून टाकल्यामुळं जयला आता मोकळं वाटत होतं. तो वर आई-वडिलांकडे बघतो. ते दोघेपण शांत होऊन एकमेकांकडे बघत असतात. जरा वेळ जातो आणि जयच्या पाठीत एक हलका धपाटा पडतो.
"शाब्बास"
"शाब्बास जय शाब्बास" जयचे वडील आनंदाने त्याला जवळ घेतात.
"अरे गधड्या, आधी का नाही सांगितलंस हे, छान केलंस तू" म्हणत डोक्यावरून हात फिरवत आईपण त्याला जवळ घेते. जय आश्चर्याने दोघांकडे बघत बोलतो
"म्हणजे तुम्ही रागावले नाही"
"अजिबात नाही, उलट आम्हाला आनंद झाला, आपल्या गरजू मित्रांची अशीच मदत करायची असते" वडील कौतुकाने बोलतात.
"पप्पा अजून एक, मला आता नवीन दप्तर घेणार असाल तर साधंच घ्या, महाग नको" जयच्या बोलण्यावर आई-वडील हसू लागतात.
"ते बघू आपण, तुला आवडेल ते घे, आणि तुझ्या नवीन मित्राला अजून काही मदत लागली तर सांग"
"पप्पा...!" म्हणत वडिलांना मिठी मारतो आणि "मी चाल्लो खेळायला " म्हणून पळत बाहेर जातो. वडिलांच्या चेहऱ्यावर असलेलं हसू बघून आई विचारते
"आता तुम्हाला काय झालं"
"काही नाही, कित्येकवेळा आपण मुलांना उगाचच काय-काय शिकवत असतो, असं वागा तसं वागा, आज हा जय आपल्याला शिकवून गेला, गरीब मित्रासाठी आपल्या आवडत्या गोष्टीचा किती सहजतेने त्याग केला त्यानी, कौतुक वाटलं त्याचं, 'कर्मण्येवाधीकारस्ते' हे फक्त वाचलं-ऐकलं होतं, आज पाहिलं" मुलाचा दानशुरपणा पाहुन दोघांना समाधान वाटले होते.

तिकडं पुलाच्यावाडीत एका पत्र्याच्या खोलीत सिद्धू आनंदाने खांद्यावर लावलेलं नवीन दप्तर त्याच्या घरातल्या फुटक्या आरशात परत परत बघत असतो आणि पुटपुटत असतो "हिकडं वह्या, ह्या कप्प्यात डब्बा, हिकडं कंपासपेटी" त्या फुटक्या आरशात सिद्धूचा आभाळाएवढा आनंद नक्कीच मावत न्हवता...!

तळटीप- मराठी कवी अनंत राउत यांच्या "दुःख अडवायला उंबऱ्या सारखा... मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा..!" या कवीते वरुन हा किस्सा आठवला.

धन्यवाद..!

कथाअनुभव

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

7 May 2021 - 7:44 pm | सिरुसेरि

छान लेखन . "किशोर"च्या सुट्टी विशेषांकाची आठवण झाली .

चौथा कोनाडा's picture

10 May 2021 - 10:01 am | चौथा कोनाडा

सुंदर लेखन !

लिहित रहा !