मल्याळम सिनेमाशी माझी ओळख

Primary tabs

केदार भिडे's picture
केदार भिडे in जनातलं, मनातलं
2 May 2021 - 9:51 pm

पुण्यात NFAI च्या कृपेने अनेक परकीय भाषांतील आणि अनेक देशांतील चित्रपट बघायला मिळाले. अन्य देशांचे दूतावास वैगेरे NFAI येथे २-३ दिवसांचे त्यांच्या देशातील चित्रपटांचे महोत्सव अगदी मोफत आयोजित करत. युरोपिअन चित्रपट महोत्सवही सलग २ वर्षे मला बघायला मिळाला. तिथे महोत्सवाची माहिती देणारी छोटी पुस्तिका किंवा पत्रक मिळायचे. अशी मला मिळालेली पत्रके मी जपून ठेवली आहेत. नंतरही ऑस्करच्या परदेशी भाषेतील चित्रपट या वर्गात नामांकन मिळालेले चित्रपट शोधून शोधून पाहत राहिलो. भारतीय भाषांतील चित्रपटांकडे (हिंदी आणि मराठी सोडून) माझे साफ दुर्लक्ष झाले आहे. NFAI येथेच एकदा India at Cannes असा महोत्सव झाला होता आणि मी तो बघितलाही होता. त्यानंतर मग पुढे काही नाही.

मग एकदा वर्तमानपत्रात कूडे (Koode) या मल्याळम चित्रपटाचे समीक्षण वाचण्यात आले. चित्रपट चांगला वाटला ते वाचून. मात्र लगेच तो पाहण्याचा काही मार्ग नव्हता. अनेक दिवसांनी हॉटस्टार वर आल्यावर बघायला मिळाला. हॅपी जर्नी या सचिन कुंडलकरांच्या मराठी चित्रपटावरच आधारित आहे हा चित्रपट. चित्रपटाच्या सुरुवातीला तसे लिहून येते. हॅपी जर्नी पेक्षा मला मल्याळम कूडे जास्ती आवडला. केरळ मधील निसर्ग अतिशय सुंदर दिसतो या चित्रपटात. चित्रपटात एका भावा बहिणीच्या नात्याची गोष्ट आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत सुंदर आहे. पृथ्वीराज, पार्वती, आणि नाझिया यांनी उत्तम अभिनय केला आहे. या चित्रपटानंतर मी पार्वतीचा चाहता झालो.
त्यानंतर मग मी आणखी मल्याळम चित्रपट पहिले. त्यांचे थोडक्यात वर्णन पुढे करत आहे. वेगळ्या चित्रपटांच्या शोधात असणाऱ्यांनी जरूर आजमावून पाहावेत.

बंगलोर डेज - कूडेच्या दिग्दर्शक अंजली मेनन यांचाच हा २०१४ मध्ये आलेला चित्रपट आहे. ३ भावंडांची ही कथा मला आवडली. याही चित्रपटात पार्वती आहे. निवीन पॉलीने साकार केलेले पात्र मूळचे केरळच्या छोट्या गावातील असलेले आणि नंतर नोकरी करता बेंगळुरूला आलेले आहे. त्याची आई नंतर काही कारणांनी त्याच्याकडे बेंगळुरूला राहायला येते आणि तिथल्या आधुनिक गोष्टींचा हसत हसत स्वीकार करते. तेव्हा जुन्या नव्या बद्दल त्याच्या मनात होणारी चलबिचल चित्रपटाने छान टिपली आहे.

टेक ऑफ - इराक मध्ये २०१४ सालात आयसिस विरुद्धच्या संघर्षावेळी काही परिचारिका अडकून पडलेल्या होत्या. त्यांची व्यथा आणि नंतर सुटका यावर आधारित हा चित्रपट आहे. पार्वतीने याही चित्रपटात उत्तम अभिनय केलेला आहे. सौदी मधील एका उद्योगपतीच्या मध्यस्थीने पडद्यामागे हालचाली घडून त्यांची सुटका झाली. इराक मधील हळू हळू बिघडत जाणारी परिस्थिती, नंतर परिचारिकांच्या जीवाला सतत असलेला धोका, आणि नंतर सुटका; असा चित्रपटाचा प्रवास आहे. रेस्क्यू ऑपरेशनवर आधारित चित्रपट नेहमी दिसणारी मारामारी, गोळीबार इ यात नाही. परिचारिकांची स्थिती हाच चित्रपटाचा मुख्य विषय आहे.
पार्वतीने साकारलेली समीरा गरिबीमुळे इराकमध्ये धोका पत्करून काम करायला जाते. तत्पूर्वी पावसात तिच्या घरातील गळणारी कौले नीट बसवायचा प्रसंग आहे. समीरा टेबलावर खुर्ची ठेवून आणि त्यावर चढून ती गळणारी कौले व्यवस्थित बसवून गळती थांबवण्याचा प्रयत्न करत असते. अशा प्रकारे पावसात कौले नीट बसवणारी नायिका आपल्याकडे दुर्मिळच आहे.

व्हायरस - कोविडची साथ जगभर पसरल्यावर सोडरबर्गच्या Contagion ची आठवण अनेकांनी काढली. योगायोगाने वूहान शहर बंद झाल्याची बातमी आली त्याच दिवशी मी तो चित्रपट पाहिला. त्यानंतर आपल्याकडच्या टाळेबंदीच्या काळात प्राईमवर व्हायरस हा मल्याळम चित्रपट दिसला आणि मग मी लगेच बघून टाकला. केरळ मध्ये झालेल्या निपा विषाणूच्या प्रादुर्भावावर ही कथा आहे. निपा विषाणूचा संसर्ग पहिल्या रुग्णाला कुठे झाला आणि तो आणखी कोणत्या व्यक्तींमध्ये तो पसरला आहे याचा शोध घेणारा चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो. हॉस्पिटल मध्ये कराराने काम करणाऱ्या कामगारांचा संप सुरु असतो. मात्र निपाची साथ आल्यावर त्यांचा नेता संप आवरून हॉस्पिटल मध्ये काम करण्याचा अवघड निर्णय घेतो. मात्र तो निपा वॉर्ड मध्ये काम करत असल्याने त्याच्या मुलांना दुकानात किराणा नाकारला जातो. हा प्रसंग फारच दुःखद आहे.

प्रेमम - एका तरुणाच्या प्रेमाचा प्रवास सोळाव्या वर्षांपासून त्याच्या लग्नापर्यंत सांगणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत विशेष लक्षात राहणारे आहे. याचा शेवट चांगला होत असला तरी मनात विनाकारण एक अस्वस्थता ठेऊन गेला हा चित्रपट.

अँड्रॉइड कुंजप्पन - हा नर्मविनोदी चित्रपट एक केअरटेकर यंत्रमानव आणि वृद्ध वडील यांच्यातील नात्याची कथा सांगतो. सुरुवातीला यंत्रमानव नकोसा वाटणारे वृद्ध वडील त्याच्यावर अगदी मुलासारखे प्रेम करू लागतात. त्याला अगदी पाटा वरवंट्यावर चटणी वाटायला शिकवतात. यंत्रमानव देवळात जातो तेव्हाच प्रसंग हसू आणणारा आहे. तो हिंदू नसल्याने त्याला प्रवेश करण्यापासून थांबवले जाते. मात्र तो लगेच गीतेतील श्लोक म्हणून दाखवतो आणि आपले हिंदूपण सिद्ध करतो.

यांच्याशिवाय चार्ली, सी यू सून (पूर्णपणे स्मार्टफोन, लॅपटॉप यांच्या नजरेतून दिसणारे चित्रपट असा नवा वर्ग आलेला आहे, त्यातलाच आहे हा पण) हे पण चांगले वाटले. चार्लीचा तामिळ (मारा) आणि मराठीत (देवा) रिमेक झालेला आहे. Kumbalangi Nights अर्धा बघितलाय पण पूर्ण करायचा राहतोय.
आत्ता पर्यंत बघितलेल्या चित्रपटात नैसर्गिक अभिनय, उत्तम पार्श्वसंगीत, कॅमेऱ्याचा छान वापर अशी वैशिष्ट्ये जाणवली. केवळ हेच उत्तम मल्याळम चित्रपट आहेत असे माझे म्हणणे नाही. उपलब्धतेनुसार आणि मर्यादित माहितीनुसार जे मिळाले ते मी पाहिले. भविष्यात मी आणखीही मल्याळम आणि अन्य भारतीय भाषांतील चित्रपट शोधत राहीन आणि बघत राहीन.

चित्रपटशिफारस

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

3 May 2021 - 7:50 am | मुक्त विहारि

थोडक्यात पण उत्तम चित्रपट परिक्षण ....

खरं तर बहुतांशी चित्रपटाची मुळ कथा जास्तीत जास्त 4-5 वाक्यातच संपते...

गॉडजिला's picture

3 May 2021 - 12:03 pm | गॉडजिला

हॉलिवुडमधेही हि एक अलिखित नियम आहे टायटॅनिक असो की टर्मीनेटर अथवा अवतार पैसा मागायला जाताना स्टुडिओत दोन ते चार वाक्यात कथाबीज उलगडुन सांगायचे, त्यापेक्शा जास्त वेळच अलॉट करुन दिला जात नाही... अर्थात प्रस्थापितांना कदाचीत जरा मोकळीक असु शकते पण तरीही कथानक काही वाक्यात उलगडुन सांगता आले तरच तुमचा अभ्यास पक्का असे समजले जाते.

मुक्त विहारि's picture

3 May 2021 - 3:43 pm | मुक्त विहारि

मध्यंतरी एका उद्योगपती बद्दल वाचत होतो ...

त्यांचा एक नियम होता की, एका पानांतच रिपोर्ट हवा

एका वकिलाला, तीन शब्दातच केस सांगायला लागायची. असे वाचनांत आले होते ...

गॉडजिला's picture

3 May 2021 - 8:53 pm | गॉडजिला

कोण बरे हे उद्योगपती ? खरोखर नावं जाणुन घ्यायची उत्सुकता आहे.

कोणतीही बाब कमीत कमी अथवा किमान शब्दात समग्र सांगता येणे हे खरे कौशल्य/ज्ञान. जिथे मुद्दे फाफटपसारा करत मांडावे लागतात तिथे समजुन जायचे किर्तन प्रवचन न्हवे तर न संपणारे वादविवाद किंव्हा मनोरंजनाचा फड जमला आहे असे आमचे बाबा महाराज कल्याणकर बोलुन गेलेत.

केदार भिडे's picture

3 May 2021 - 8:41 pm | केदार भिडे

परीक्षण करण्याचा प्रयत्न नाही माझा. मला जे आवडलं ते सांगितलं. याही पेक्षा खोलात जाऊन मी चिंतन केलेले नाही मी.

उपयोजक's picture

3 May 2021 - 8:56 am | उपयोजक

तुम्ही मलयाळम कुठे शिकलात?

केदार भिडे's picture

3 May 2021 - 8:43 pm | केदार भिडे

मलयाळम येत नाही मला.
मराठी आणि हिंदी सोडून subtitles वर अवलंबून.
मलयाळम अस लिहायला पाहिजे होतं मी सगळीकडे लिखाणात. तुमचं वाचून लक्षात आलं

विजुभाऊ's picture

3 May 2021 - 12:18 pm | विजुभाऊ

तमिळ सिनेमी "ताडम ' पहा
कथानक फारसे नवे नाही. पण ज्या पद्धातीने सिनेमा घेतलाय. खूप वेगवान आहे आणि सस्पेन्स शेवटपर्यंत कायम रहातो.

चौथा कोनाडा's picture

3 May 2021 - 12:26 pm | चौथा कोनाडा

छान धागा !

कूडे (Koode) या मल्याळम चित्रपटाचे समीक्षण वाचण्यात आले. चित्रपट चांगला वाटला ते वाचून. मात्र लगेच तो पाहण्याचा काही मार्ग नव्हता. अनेक दिवसांनी हॉटस्टार वर आल्यावर बघायला मिळाला. हॅपी जर्नी या सचिन कुंडलकरांच्या मराठी चित्रपटावरच आधारित आहे हा चित्रपट.

हे वाचून मराठी चित्रपटांबद्दल अभिमान वाटला !
.. आणि ओटीटीमुळे भारतीय इतर भाषिक चित्रपट पाहिले जात आहेत हा एक चांगला ब्रेक थ्रू आहेत.

सिरुसेरि's picture

3 May 2021 - 3:16 pm | सिरुसेरि

मोहनलालचा "हिज हायनेस अब्दुल्ला" हा चित्रपट पाहण्यासारखा आहे .

राघव's picture

3 May 2021 - 3:35 pm | राघव

प्रेमम् पाहिलाय. आवडला. नवीन पॉली + साई पल्लवीचा अप्रतीम अभिनय आणि खूप सुंदर संगीत.
मल्याळमच नाही, तेलुगु/कन्नड/तमिळ चित्रपट सुद्धा बघू शकतो.. अर्थात् वेळ हवा आणि कमीत-कमी सब्टायटल्स हवेत. :-)
साऊथचा भडकपणा सोडला तर, त्यांच्या बर्‍याच चित्रपटांचं कथानक सुंदर असतं असं एक निरिक्षण नोदवावंसं वाटतं.

सिरुसेरि's picture

3 May 2021 - 3:44 pm | सिरुसेरि

काही लक्षात राहिलेले साउथचे चित्रपट - https://misalpav.com/node/46978
https://misalpav.com/node/42653
एका गाजलेल्या साउथच्या चित्रपटाची फॅन फिक्शन - https://misalpav.com/node/32595

चौकटराजा's picture

3 May 2021 - 8:05 pm | चौकटराजा

" अ डेट " हा सिनेमा किती लोकांनी पहिलाय ? नसला पाहिला तर जरूर पहा ! यु ट्यूब वर आहे !