फाल्गुन व. १३ विष्णुशास्त्री चिपळणकर यांचे निधन !

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
26 Apr 2021 - 11:06 am

चिपळूणकर

शके १८०३ च्या फाल्गुन व. १३ रोजी अर्वाचीन मराठी वाङ्मयांतील प्रसिद्ध निबंधलेखक व टीकाकार विष्णुशास्त्री चिपळुणकर यांचे निधन झाले.

अव्वल इंग्रजीतील प्रसिद्ध पंडित कृष्णशास्त्री चिपळुणकर यांचे हे जेष्ठ चिरंजीव. कॉलेजमध्ये असतांनाच यांना विद्याव्यासंगाचा नाद लागला. वडिलांनी सुरू केलेल्या रासेलसच्या भाषांतराचे काम पूर्ण करून विष्णुशास्त्री यांनी आत्मविश्वास संपादन केला. हे शिक्षण संपल्यावर 'पूना हायस्कूल' मध्ये शिक्षकाचे काम पाहूं लागले. पुढे यांची बदली रत्नागिरी हायस्कूलमध्ये झाली. विद्यार्थांच्या मनांत स्वाभिमान निर्माण करून त्यांना देशभक्तीचे धडे देण्याची महनीय कामगिरी विष्णुशास्त्री करीत होते. सन १८७४ मध्ये त्यांनी आपली प्रसिद्ध अशी निबंधमाला सुरू केली. मराठी भाषेत एक नवीनच युग सुरू झाले. “यांनी ओजस्वी लिखाण करून मराठी भाषा व महाराष्ट्रीय लोक यांच्यांत आत्मविश्वास निर्माण केला. इंग्रजांनी राजकीय परतंत्रतेबरोबर मानसिक गुलामगिरीहि पराकाष्ठेची निर्माण केली होती. तिचा प्रतिकार करण्यास तितकाच कठोर हल्ला करणारा पुरुष निर्माण व्हावयास पाहिजे होता. तो चिपळुणकरांच्या रूपाने अवतरला. धर्म, चालीरीति वाङ्मय वगैरेंची जितक्या उत्कटतेने पायमल्ली चालली होती तितक्याच उत्कटतेने प्रतिहल्ला करणारे चिपळुणकर होते. यांनी देशांतील विचाराची दिशाच बदलण्याचे काम.केले." स्वत्वापासून भ्रष्ट झालेल्या महाराष्ट्रांत विचारजागृति करून आत्मनाशापासून परावृत्त करण्याची श्रेष्ठ कामगिरी चिपळुणकर यांनी केली. निबंधमालेचे आठ वर्षांत एकूण चौऱ्याऐशी अंक बाहेर पडले. त्यांत मुख्यत्वेकरून भाषाविषय, सामाजिक, राजकीय, वाङ्मयीन असेच निबंध असून त्यांच्या वाचनाने पुढे मराठी साहित्यांत एक खंबीर पिढी निर्माण झाली. चित्रशाळा, किताबखाना, केसरी-मराठा, न्यू. ई. स्कूल वगैरे संस्थांना जन्म.देऊन विष्णुशास्त्री अवध्या बत्तिसाव्या वर्षी निधन पावले.
--१७ मार्च १८८२

इतिहास

प्रतिक्रिया

या निमित्ताने धागाकर्त्याने करून दिलेला विष्णुशास्त्रींचा अल्प परिचय आवडला. सांप्रतकाळी मुद्दाम होऊन कोणी त्या काळचे शास्त्री, विद्वान, लेखक, कलावंत वगैरेंची माहिती मिळवण्यास प्रवृत्त होत असतील असे आम्हास वाटत नाही, तत्रपी अश्या रितीने अल्प परिचय करून दिल्यास निदान काही जिज्ञासूंची उत्सुकता जागृत होऊन ते आणखी अभ्यासास प्रवृत्त होतील यद्विषयी कदापिही शंका नाही. अश्याच प्रकारे जुन्या काळातील अन्य महनीय व्यक्तींचा परिचय वाचकांस करून देण्याचा उद्यम पुढे चालू ठेवावा.
विष्णूशास्त्री आणि कृष्णशास्त्री यांच्या एकूण ग्रंथसंपदेची यादी कृपया द्यावी.
तसेच प्रत्येक लेखातील उल्लेखित व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूचे ईसवीसन दिल्यास सदर लेखांची उपयोगिता आणखी वृद्धिंगत होईल अशी आम्हास खातरी वाटत्ये.