मनातला राम

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
21 Apr 2021 - 10:39 pm

मनातला राम
आज रामनवमी ! सगळयांच्या स्टेटस पासून फेसबुक च्या भिंती पर्यंत सगळीकडे रामराया भरून उरलाय . मी कधीच कुठल्या देवाचे फोटो शेअर करत नाही . अशा प्रचन्ड गर्दीच्या दिवशी तर देवळात जावं असं मनात देखील येत नाही . पण आज फेसबुक वर , व्हाट्स अँप वर रामावरच्या लेखांचा पूर आलाय . काही वाचले काही सोडून दिले . त्यातच एक तुळशीबागेतील रामाच्या देवळाचा फोटो आणि छोटासा लेख वाचला .

तुळशीबागेतील हे रामाचं देऊळ माझं खरंच आवडतं . एक सारसबागेतील तळ्यातला गणपती आणि दुसरा हा राम मला मनापासून आवडतात . तुळशीबाग म्हटलं तरी डोळ्यासमोर फक्त गर्दी येते . या गर्दीत धीर करून घुसायचं आणि तडक अधले मधले अडथळे पार करत मंदिर गाठायचं . आता एवढ्या त्या गर्दीत मंदिराचं प्रवेशद्वार लक्षात येणं कठीण आहे . पण सवयीनं जमतं ते . एकदा का पाऊल आत पडलं कि बाहेरच्या दुनियेचा विसर पडतो . आत देवळाच्या आजूबाजूला अनेक दुकाने आहेत . पण या दुकानांमध्ये बाहेरसारखी गर्दी ओसंडून वाहत नाही . चढे आवाज नाहीत . भांडण , घासाघीस नाही . बाहेर असलेल्या गर्दीचा लवलेशही नसतो आत . आपणही आपसूक त्या देवळाचा एक भाग होऊन जातो . चप्पल एके ठिकाणी काढून आत जायचं . दर्शन घेऊन एक प्रदक्षिणा घालून एका खांबापाशी बसायचं . मी साधारणपणे जिथून मला रामाची मूर्ती स्पष्ट दिसेल अशी जागा पकडायचे . एकटक रामाकडे बघत रामरक्षा म्हणायची . एकदा , दोनदा अगदी मन भरेपर्यंत, तिथून उठावास वाटेपर्यंत हे चालू असत . कधी नुसताच श्रीरामनाचा जप करावा . पण एकदा हे झालं ना कि मन एकदम प्रसन्न होत . जर आधी खरेदी झालेली असेल तर ते ओझं तिथेच कुठंतरी मी टेकवायचे . पण कधीही माझ्य सामानाला कुणी हात लावला नाही . रामाची मूर्ती अगदी टक लावून बघायची . हा राम स्वतः प्रसन्न चेहऱ्याने हसत असतो आणि म्हणूनच आपल्याला देखील प्रसन्न वाटत . मी शेवटची त्या देवळात गेले तेव्हा देवळाच्या जीर्णोद्धाराचं काम चालू होणार होत आणि त्यासाठी वर्गणीच्या आवाहनाचे बोर्ड लागलेले मला आठवतात . नंतर आता पुणे ट्रिप दुर्मिळ झाली . त्यात तुळशीबागेत जाणंही दुर्मिळ झालं . त्यामुळे खूप वर्षात तिथे गेले नाही . पण मनाच्या कोपऱ्यात अजूनही ती मूर्ती तशीच विराजमान आहे .

तसंच एक अगदी छोटंसं देऊळ सदाशिव पेठेतलं . सदाशिव पेठेत खुन्या मुरलीधराच्या जवळ परांजपे शनी मंदिर आहे . त्याच्याशेजारील बिल्डिंग मध्ये माझे नातेवाईक राहतात . पुण्यात असताना कायम जाण व्हायचं . या बिल्डिंगच्या मालकांनी तळमजल्यावर एक छोटंसं रामाचं देऊळ बनवलंय . जातायेता कायम मी चपला काढून बाहेरच्या बाहेर रामाला नमस्कार करून पुढे जायचे . अजूनही तेच करते . इथेही कधी गर्दी नसते . अतिशय शांत मुद्रा असलेली राम , लक्ष्मण ,सीता आणि हनुमान यांची मूर्ती आहे तिथे . टापटीप ,स्वच्छता अगदी सुंदर . सकाळच्या वेळेत गेलं तर कोणीतरी पूजा करत असत, एरवी सकाळ संध्याकाळ ठराविक वेळी देऊळ उघडत . पण बाकी दिवसभर काचेच्या दरवाजाआड राम आपल्याकडे बघत असतो . आपल्यावर लक्ष ठेवून असतो . एरवी पुण्यात चौकाचौकात देवळं आहेत . प्रत्येक ठिकाणी हात जोडणं शक्य नाही , आवडही नाही . पण इथे मात्र तस हात नाही . रामराया आपल्याकडून ते करवून घेतो असच वाटत .

आज मन जरा खिन्न आहे. रामनवमी असून कुठेही उत्साहाचं वातावरण नाही . चैत्र महिना सुरु झाला तरी संकटाचं सावट आहेच अजून . घरात बसून आणि टीव्ही वरच्या बातम्या ऐकून मनात नकारात्मक विचार खूप येतात . कुठेतरी काहीतरी सकारात्मक घडू दे अशीच देवाकडे प्रार्थना केली आजही . आज रामनवमी म्हणून जास्त वेळा रामरक्षा म्हणू या म्हणून सुरवात केली . जमल्यास ११ नाहीतर जेव्हढी होईल तेवढी . पण एकदा झाली , दोनदा झाली पण आज मन स्थिर होत नव्हतं . आमच्या शेजारच्या गल्लीतील एक आजी कोरोना ने आज गेल्याची बातमी सकाळी कळली . खूप वाईट वाटलं . तेच कुठंतरी मनात खुपत होत. चैन पडत नव्हतं त्यांची बातमी ऐकल्यापासून . सारखा त्यांचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. पण हळूहळू आणखी जास्त वेळा रामरक्षा म्हटली आणि थोडं बरं वाटलं . निरांजनाच्या ज्योतीकडे एकटक बघत रामरक्षा पूर्ण केली . डोळ्यातून पाणी वाहून गेलं आणि मग मोकळं वाटलं . आपण सुखरूप आहोत यात सुख मानावं कि दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हावं हेच कळत नव्हतं . पण जे घडणार आहे ते चुकणार नाही . फक्त ते सहन करायची , सोसायची ताकद रामराया मला देव हीच इच्छा . लवकरात लवकर सगळ्यांनाच या संकटातून बाहेर काढ हेच मागणं मी देवाकडे मागितलं आणि तो ते पूर्ण करेल हा विश्वास देखील वाटला . हा विश्वास वाटणं हेच महत्वाचं आहे . बाकी देव आहे नाही, मानणं , न मानणं हा ज्याचा त्याचा प्रश्न . एक सकारात्मक दृष्टिकोन आयुष्य जगायला पुरेसा असतो . आज तरी मला ती शक्ती मिळाली . सगळ्यांना देखील अशीच शक्ती मिळू दे हि सदिच्छा !

----धनश्रीनिवास

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Apr 2021 - 11:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान लिहिलंय. आजुबाजुच्या वातावरण पाहता, सध्या एकटेपणा घेरायला येतो. गाणी, संगीत आजुबाजूचा नकारात्मक कोलाहल कमी करतो. काल रामनवमीनिमित्त म्हणून नव्हे, पण वेगळं म्हणून 'अपने अपने राम' कुमार विश्वास यांचे दोन्ही भाग पाहिले. मस्त वाटले. कुमार विश्वास यांच्या कवित अनेकदा मी ऐकल्या. आणि हे त्यांचं कथन वेगळं वाटलं नक्की ऐका.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

राघव's picture

22 Apr 2021 - 11:48 am | राघव

आवडलं. छान मांडलंय.
प्रेमानं केलेलं ते भजन आणि श्रद्धेनं केलेलं ते श्राद्ध! बाकी श्रद्धा हा सद्यकाळात टॅबू झालेला विषय आहे, तो भाग वेगळा!

जिथं गेल्यावर अकारण प्रसन्नता येते, मन शांत होतं अथवा आनंदानं भरून जातं; ती जागा खरी!
अशा जागेची पुन्हा पुन्हा ओढ लागते. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला अशा १-२ तरी जागा आहेत. :-)

चौकटराजा's picture

22 Apr 2021 - 1:41 pm | चौकटराजा

अतिशय प्रसन्न शांतता मी अनुभवली ती विवेकानंद खडक कन्याकुमारी येथील ध्यान मंडपात व दुसरी जागा नासिक- वाणी रस्त्यावर दिंडोरी येथे स्वामींचा मठ आहे तिथेही असाच अनुभव आला ! तिसरी जागा पैठण येथे ज्ञानेश्वर उद्यानात ही अशीच ध्यानस्थ बसायला सोय केली आहे तिथेही फार तृप्ततेचा अनुभव येतो . आणि बाय डीफॉल्ट शांतता लाभलेला प्रदेश म्हणजे आखखा हिमालय !

आणि बाय डीफॉल्ट शांतता लाभलेला प्रदेश म्हणजे आखखा हिमालय !

चोक्कस!
Silence and Peace are two different things.
Silence is for graveyards. Peace is where flowers blossom!! :-)

श्रीगुरुजी's picture

22 Apr 2021 - 2:10 pm | श्रीगुरुजी

सुंदर लिहिलंय. सलग दुसऱ्या वर्षी श्रीरामनवमी उत्सवात श्रीराममंदीर बंद आहे. दरवर्षी गोंदवल्याला दर्शनासाठी जाण्याचा योग येतो. परंतु २०२० मध्ये मार्चपासून तेथील सर्व मंदिरे बंद आहेत. यावर्षी सुद्धा योग येईल असे वाटत नाही.

मुक्त विहारि's picture

22 Apr 2021 - 3:05 pm | मुक्त विहारि

आवडलं

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Apr 2021 - 3:15 pm | राजेंद्र मेहेंदळे

या करोनामुळे बर्‍याच गोष्टी बदलल्या अहेत, त्यात हे पण एक. पण लेखाचे शीर्षक आहे त्या प्रमाणे, मनातला राम तर कुठे जात नाही ना? मनाचे श्लोक, दासबोध, गोंदवलेकर महाराजांची प्रवचने,तुकाराम गाथा, भागवत असे उत्तम ग्रंथ आणि जोडीला जपमाळ असेल तर कुठे जायला नको आणि यायला नको. रोज चवीचवीने थोडे थोडे वाचावे आणि जमेल तसा जप करावा. मग राम घरातच आहे.

मालविका's picture

26 Apr 2021 - 12:23 pm | मालविका

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद !