उकडलेले अंडे!

लई भारी's picture
लई भारी in पाककृती
6 Apr 2021 - 9:50 am

हो, तुम्ही शीर्षक बरोबर वाचलेत. उकडलेल्या अंड्याच्या पाककृती(!) बद्दलच लिहितोय :-)
आता असा प्रश्न पडणे साहजिक आहे की एवढ्या साध्या गोष्टीची कृती कशाला लिहायला पाहिजे! आणि गूगलबाबाला विचारले तर चिक्कार रेसिपी आहेत.
तर, असो!

अंड्याचे बरेच प्रकार खूप आवडतातच. पण बहुतांश पदार्थ बाहेर जसे जमतात तसे घरी जमत नाहीत. सर्वांची आवडती 'बुर्जी'; कितीही प्रकारे करून बघितली तरी यष्टी स्टॅन्ड बाहेर मिळणाऱ्या टपरी वरची चव नाहीच येत. तीच गोष्ट 'poached egg' नावाच्या विंग्रजी प्रकारची. मला प्रचंड आवडतो पण घरी जमलंच नाही. माझ्या मते 'super fresh eggs' हे सोडून बाकीचा सगळा जुमला मी केला तरी पण नाही जमले! किंवा फुल्ल/हाफ फ्राय परतणे/प्लेट मध्ये घेणे. सांगा कुणाला माहित असेल तर यांच्या युक्त्या.

तर, उकडलेले अंडे आपण खात असतोच लहानपणापासून. मी तरी लहानपणी खाल्ले ते म्हणजे इतर काहीतरी गोष्टींसोबत उकडलेले म्हणजे बटाट्या सोबत वगैरे. त्यामुळे खूप उशिरा एक Quora पोस्ट वाचून कळले की अंडे नीट कसे उकडलेले असायला हवे. म्हणजे त्याचा पिवळा बलक कसा दिसायला पाहिजे. मग लक्षात आले की आतापर्यंत खात आलो त्या अंड्याचा पिवळा बलक पार काळपटलेला असायचा. मग सुरु झाले रेसिपि वाचणे. बहुधा त्या पोस्ट मध्ये असे लिहिले होते की शेफ किती भारी आहे याची ही जणू एक चाचणीच आहे आणि पाककौशल्यातील प्राथमिक गोष्ट आहे ही!
बरेच दिवस मी एक पद्धत वापरायचो ते म्हणजे, पाण्यात मीठ टाकून अंडी उकडायला ठेवल्यावर बरोबर १-२ मिनिटे उकळी आल्यानंतर गॅस बंद करून झाकण लावायचे आणि १५ मिनिटांनी अंडी बाहेर काढायची, मग थंड पाण्यात बुडवून सोलायची. यामुळे बरीच सुधारणा झाली. आता बलक पिवळाच दिसत होता आणि आधीइतका कोरडा होत नव्हता.
पण अजून काही पोस्ट्स वाचताना लक्षात आले की पाहिजे तेवढा creamy दिसत नाही आहे बलक; पूर्ण उकडल्या सारखाच दिसतोय. आणि creamy बलक करण्यासाठी कमी उकडल्यानंतर कवच नीट निघायचे नाही. मग अजून रेसिपी बघणे आले आणि साधारण एक गोष्ट कॉमन लक्षात आली, म्हणजे बरोबर ५-६ मिनिटे अंडी उकळत्या पाण्यात पाहिजेत. (अगदी पाणी आधी उकळून घेऊन मगच त्यात अंडी सोडावीत, त्यासाठी वेगळा चिमटा वगैरे घ्यावा हे काही केले नाही म्हणा). तर या पद्धतीने सुद्धा छान येतच होती पण 'picture perfect' नव्हती जमली!
आज मग तो युरेका क्षण आला :-)
एक गोष्ट मी दुर्लक्षिली होती म्हणजे उकळत्या पाण्यातून ६ मिनिटांनी अंडी काढल्यानंतर बर्फाच्या किंवा जास्त थंड पाण्यात टाकायची. मी दर वेळी आळस करून साधे पाणी घ्यायचो. आज थंड पाणी घेतले आणि दोन्ही गोष्टी साधल्या - कवच नीट निघाले आणि बलक पाहिजे तसा उकडला गेला!
(रेसिपी पेक्षा काथ्याकूट मध्ये जास्त शोभेल बहुधा :-) )

image