मामाच्या गावच्या आठवणी

Primary tabs

सत्य धर्म's picture
सत्य धर्म in जनातलं, मनातलं
9 Mar 2021 - 2:55 pm

झुक झुक झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी,
पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया.
सकाळी सकाळी मुलीने मोबाइलला हे गाणे लावले आणि डोळयांपुढे मामाचा गाव उभा राहिला. माझ्या लहानपणी माझ्या मामाचे गाव म्हणजे माज्यासाठी जणु स्वर्गच होता. उन्हाळ्याची सुट्टी, गणपती आणि दिवाळीची सुट्टी याची मी चातकाप्रमाणे वाट पाहत राही. मामाच्या गावावरून आल्यानंतर माझ्या मित्रांमध्ये तिथले वर्णन आठवडाभर चालत राही.

माझ्या मामाचे गाव म्हणजे रहिमतपूर असं म्हणतात कि अफझल खानचा सरदार रहिमतखान याच्या नावावरून याला रहिमपूर नाव पडले. शिवकाळामध्ये रहिमतपूर हे आदिलशाही साम्राज्यात होते परंतु आत्ता त्याच्या खुणा अस्तित्वात नाहीत. रहिमतपूर हे छोटेखानी शहर असल्यामुळे मला त्याचे फार आकर्षण होते लहान असताना मी आई बरोबर रहिमतपूरला सारखा जात असे. ST स्टॅन्ड पासून मामाचे घर खूप लांब असल्यामुळे आमची रपेट चालतच निघायची जात असताना रस्त्यात लागणारे सिनेमाचे बोर्ड पाहत आता कोणता सिनेमा बघायचा ते ठरवतच मी चालायचो, रस्त्याच्या बाजूची मोठी मस्जिद पाहून माझे डोळे विस्फारून जात, अंबालाल सिनेमागृह म्हणजे दादा कोंडकेंचा चित्रपट हमखास ठरलेला, आतासारखे द्वैअर्थी वाक्य तेव्हा समझत नसले तरी माझ्या मोठ्या मावसभावांसोबत मी जायचो आणि खूप मज्जापण करायचो अंबालाल सिनेमागृहाच्या पुढे गेले कि लागणारी नदी हि त्याकाळी सुद्धा आत्तासारखीच प्रदूषित होती पण तरीपण का खुप छान वाटायची. नदीच्या पुलावरच मासेवाले वेगवेगळ्या जातीचे मासे मांडून ठेवत ते बघत बघतच मी चालायचो. आजीला भेटण्यासाठी माझ्या आईची पावले खूप झपाझप चालायची मला तिचा खूप राग यायचा पन मी निमूट तिच्या मागून चालायचो. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गटारे मी लहानपणी रहिमतपूरलाच पहिली. मामाच्या घरी पावसाळ्यात जाणे म्हणजे मोठे दिव्य ठरलेले सर्व रस्त्यावर चिखल असे तो तुडवत आम्ही घरी जात असू.

मामाच्या घरी पोहोचलो कि मामी बादलीभर पाणी दारात आणून ठेवत असे हातपाय धुण्याचे सोपस्कार पार पडले कि आजी मला उचलून माझे मुके घ्यायची आणि माझ्या मामी आईच्या पाय पडल्यानंतर माझ्या पाया पडत, मला अहोजाहो बोलत मला त्याचे खूप अप्रूप वाटत असे आणि आपण कोणीतरी मोठे असल्यागत वाटे. मामा लगेच बाहेर जाऊन मटण, मासे घेऊन येत असे तोपर्यंत मी आणि माझे मावसभाऊ मामाच्या आजूबाजूची मुले गोळा करून धिंगामस्ती चालू करत असू भरलेले घर बघून माझ्या आजीच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान आता मी शब्दात पण व्यक्त करू शकत नाही. रात्रीच्या जेवणावेळी सर्वानी एकत्र बसून केलेले जेवण म्हणजे जणू चढाओढ असायची त्या चुलीवर केलेल्या भाकरी आणि आजीच्या हातच्या मटणाची चव आतां काही केल्या मिळत नाही.
गुरुवारी रहिमतपूरचा बाजार किती मोठा भरतो हे घरी आल्यावरून मित्रांना सांगण्यासाठी मी आख्खा बाजार आजीसोबत फिरत असे आणि मी सर्वाना सांगून भरवलेला बाजार रहिमतपूरच्या बाजारापेक्षा खूपच मोठा असे. एखादे शुक्रवारी रहिमतपूरचे आराध्य दैवत चौंडेश्वरी देवीला जाण्याची तयारी सकाळपासूनच चालू व्हायची या सर्व माहेरवाशिणी साडी, चोळी निवद घेऊन देवीला जात सोबत आमची गॅंग असे. चौंडेश्वरी देवी मंदिर परिसरात असणारी चिंचेची आणि इतर झाडे म्हणजे तर आम्हाला पर्वणीच होती.मंदिर परिसरात धिंगामस्ती करण्यात वेळ कसा गेला आम्हाला समजत पण नसे तिथून घरी आलो कि मामाच्या मागे तगादा लावून आम्ही चित्रपट पाहायला नटराज चित्रपटगृहात जात असू त्यावेळी रहिमतपूर मध्ये तीन ते चार सिनेमागृहे होती पैकी नटराजला अमिताभचे आणि गॉडझिला टाईप हॉलिवूड सिनेमे हमखास ठरलेलं असत, आमच्यासाठी ती खूप मोठी पर्वणी असे मग मामा प्रत्येकाला ५,५ रुपये देऊन चित्रपट पाहायला पाठवत असे. मामाच्या शेतात चंद्रागिरी टेकडीकडे आमची एखादी भेट हमखास ठरत असे जात असताना आम्ही सगळे ऊस खात खात कोण आधी पोहोचतंय या चढाओढीत धडपडत असू. सायकल शिकणे, तालमीत जाणे, पोहायला जाणे हे कार्यक्रम ठरलेलेच असंत आणि आमचे लाड, हट्ट पुरवून आजी आणि मामाला कोण आनंद होत असे हे सर्व करता करता आमची सुट्टी संपत येई आणि निघायच्यावेळी जीव रडवेला होई निघताना आई-आज्जी रडत असत तेव्हा त्याचा अर्थ समजत नव्हता पण आता समजतो आतासारखे मोबाइल आणि वाहनांची सुविधा तेव्हा नव्हती आजीचे वय झाले होते लेकी नातवंडासोबत कोणती भेट शेवटची ठरेल याची शाश्वती नव्हती त्यामुळे आजीला रडू कोसळत असे. आजी गेल्यानंतर मामाचा गाव आठवणीतच राहिला शिक्षण, नोकरी, लग्न, मुले यांचा सांभाळ करता करता हृदयाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलेला आठवणींचा ठेवा आज असा अचानक समोर आला आणि पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणीने मन उचंबळून आले.

मांडणीअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

9 Mar 2021 - 7:18 pm | मुक्त विहारि

रत्नागिरी आणि सिमेंटनगरच्या आठवणी जाग्या झाल्या

चौथा कोनाडा's picture

9 Mar 2021 - 8:59 pm | चौथा कोनाडा

छान, झकास स्मरणरंजन !
रहिमतपुर वरुन जाण्याचा एकदाच योग आला. औंधहून सातारा शहराकडे येत असताना.

तुषार काळभोर's picture

10 Mar 2021 - 12:02 pm | तुषार काळभोर

मलाही एकदाच योग आला.. सातारा ते औंध (आणि परत) प्रवास करताना!