"पोंक्शा ~~~~ येतोस का डबा खायला ?"...

kvponkshe's picture
kvponkshe in जनातलं, मनातलं
18 Feb 2021 - 11:02 am

आम्हा मुलांचे दहावीचे वर्ष असते .... आम्हा सगळ्यांना प्रिलिम चे आणि नंतर च्या SSC परीक्षेचे वेध लागलेले असतात ... शाळेय जीवन अगदी काही आठवड्यांचे राहिले असते... अभ्यास करूच , पण उरलेल्या दिवसात खूप मजा करून घेऊ अशी भावना असते सगळ्यांची ....
पण शालेय जीवन निरागस असते अशी एक फसणूक करणारी समजूत आहे ...
वर्गात एक मुलगा असतो ....
गोरा ...
घाऱ्या डोळ्यांचा ...
काटकुळा ...
संवादिनी वर काळी दोन च्या स्वरात पण नाकात बोलणारा ...
त्याची ती "पोंक्शा ~~~~ येतोस का डबा खायला ?"
अशी खर्जातील पण सानुनासिक हाक मला चांगलीच आठवते ...
त्याच्या आजी बरोबर तो एका वाड्यात राही ... आई, वडील कोणीच नसलेला तो ...
दरवर्षी "पुढे ढकलला" या प्रगती पुस्तकावरील शेऱ्यावर दहावी पर्यंत आलेला तो ...
वर्गातील टगी पोरं जी असतात त्यांचे तो गिर्हाईक ...
त्याला सर्व प्रकारे त्रास देणं म्हणजे बाकीच्यांचा असुरी आनंद असतो..
त्याचा डबा लपव, आणि डब्याची सुट्टी संपत आली की मग त्याला तो डबा दे, त्याचे दफ्तर पळव .. तो रडला की मग त्याला परत दे ...
अहो एखाद्यास त्रास द्यायचा ठरवला तर काय अनेक प्रकार शोधता येतात नाही का ?...
हे सर्व चूक आहे हे मनात कळणारा एक समूह वर्गात असतोच (आणि मीही त्याचा एक भाग असतो) पण त्या टग्या पोरांना कोण आवरणार आणि सांगणार ? त्या टग्यांच्या नादी कोण लागणार ...
त्यापेक्षा त्यांच्या मध्ये सामील होणं सोपे नाही का ?
एक दिवस डब्याच्या सुटीमध्ये त्या बिचार्या मुलाची तळी भरायची असे आम्हा सगळ्यांचे ठरते...
तो बिचारा डबा खाऊन वर्गात येत असतो ..
तेवढ्यात कोणीतरी मागून त्याचे डोळे हाताने बंद करतात ...
कोणी त्याचे हात धरून ठेवतात ...
आणि मग त्याच्या वर टपलांचा वर्षाव सुरु होतो... तो बिचारा ओरडायचा यत्न करतो ...मग टपला मारणाऱ्यांतील एक जण त्याचे तोंड दाबतो ... काही उत्साही मुलांचे नुसत्या टपलानी समाधान होत नाही ... मग बुक्क्या सुरु होतात
काहींचे त्या बुक्क्यांनी पण समाधान होत नाही ... मग एक लाथ त्याच्या पेकाटात बसते ... उजव्या छातीच्या खाली ... अगदी यकृतावर ... तो अर्धमेला होतो ..
कळवळतो ...
मग सगळे बाजूला होतात ...
काही वेळानी तो बिचारा उठतो ...
डोळे रडून लालेलाल झालेले असतात ...
सात्विक संतापाने थरथर कापत तो बोलतो ... " अरे का मला त्रास देता ? मी काय वाईट केलय तुमचे .... ~~~ सोडणार नाही तुम्हाला कोणाला ... भिकारचोटानो ... पुढचे शब्द आम्हास काळतच नाहीत ..
शाळा संपते आणि आम्ही काहीसे खजील होईन घरी परततो ...
पुढे नंतर तो शाळेत येतच नाही ... SSC ला शेवटल्या पेपरला तो आम्हास दिसतो तो शेवटचाच .... (म्हणजे तो जिवंत असताना शेवटचा ..... )
. .
. . . .
***********************************************************************
.शाळा संपून ६-७ वर्षे झालीत ... नुकतेच सगळे नोकरी धंद्यास लागतोय ... कोणी इंजिनिअर तर कोणी काय तर कोणी काय ...
पण तरीही आम्ही शाळेतील मित्र ६ एक महिन्यातून एकदा भेटतो ... पण दरवेळी भेटणाऱ्यांची संख्या कमी कमी होत आहे ....
. . .
. .
.
अंह अंह ... आम्हास नोकरी धंद्यातून वेळ मिळत नाहीये म्हणून नाही ...
.....तर आमच्यातील एक एक जण गचकतोय म्हणून ...

२ वर्षांपूवी पहिली बातमी आली ती खन्नाची ... खन्ना म्हणजे आमच्या वर्गातील भाई पोरगा ... दारू चिकार प्यायचा ... यकृत निकामी होऊन गेला .. शेवटी भ्रम झाला बिचार्यास ... कानात सारखे बोळे घालत असे ... सांगे, कस कसचे आवाज येतात म्हणे ...
मग ढोले गेला ....
मग गोडबोले ...
मग मुन्ना शेख ...
सगळॆ एक एक करून जातायत ... मरताना भ्रमिष्ट होऊन जातात .. कानात बोळे घालायला मागतात ... खूप आवाज येतात म्हणे त्यांना ....
असो..
हल्ली मला नाईट शिफ्ट असतात ... सारखे क्लायंट कॉल्स .. आजूबाजूला कलिग्स असतात ते बरंय ...
सांगायचा मुद्दा असा की ........
. .
प्रथम तो आवाज मला वॉशरूम मध्ये आला .... "पोंक्शा ~~~~ येतोस का डबा खायला ?"
आवाज जुना असला तरी ओळखीचाच ... त्याचाच ... मी हादरलो ...
मग तो पुन्हा दिसला एकदा ... सोसायटीच्या पार्किंग मध्ये .... तसेच ते लाले लाल डोळे ... आणि ...
पुन्हा तोच प्रश्न
"पोंक्शा ~~~~ येतोस का डबा खायला ?"
आता दोन आठवडे झालाय ....
"पोंक्शा ~~~~ येतोस का डबा खायला ?" या वाक्याने कान किटलेत ...
आणि किती मोठ्या आवाजातील वाक्य ते ... संवादिनी वर काळी दोन च्या स्वरात पण नाकात बोललेल ... पण भसाड्या आवाजातील ... त्याचे दिसणे तर आता नित्याचेच झालय ..
पण त्याचे डोळे प्रत्येक वेळी जास्त लाल आणि मोठे का होतात ?
माझं ENT , मानसोपचार तज्ज्ञ हे सगळं सगळं या आठवड्यात झालंय सर्व रिपोर्ट नॉर्मल ... कंपनीतून मी १ महिन्याची रजा टाकलीय ..
पण काही फरक नाही तो खर्जातील आवाज आता नाही सहन होत . कानात बोळे तरी किती कोंबणार ?
आणि त्यात भर म्हणून काल पासून उजव्या छातीच्या खाली ... यकृतावर मधूनच कळ येतीये ... कोणीतरी पेकाटात लाथ घालावी ना अगदी तशीच .......
आणि प्रत्येक कळी नंतर तोच भसाड्या आवाजातील प्रश्न ....
"पोंक्शा ~~~~ येतोस का डबा खायला ?"...
(कौस्तुभ पोंक्षे यांच्या डायरीतून...)

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

18 Feb 2021 - 11:20 am | मुक्त विहारि

कथा आवडली ...

भयानक आहे रे सगळं पोंक्षा!
सत्यकथा असू शकेल..अश्या शाळकरी विकृती पहिल्या आहेत.

उपयोजक's picture

18 Feb 2021 - 12:05 pm | उपयोजक

विदारक आहे. :(

https://youtu.be/sb98LOH0rVA
या प्रकारांना पायबंद बसलाच पाहिजे.

कंजूस's picture

18 Feb 2021 - 12:08 pm | कंजूस

असा होता एक आमच्या बरोबर दुसऱ्या तुकडीत. गुटगुटीत, हसतमुख. रोज परीटघडीचा वेगळा शर्ट आणि चड्डी .पालीश केलेले बुट. मधल्या सुट्टीत धुलाई शर्टाची ठरलेली. त्याला तुडवायचे. आनंदाने घ्यायचा. कधीही मास्तरांकडे तक्रार केली नाही.

चौथा कोनाडा's picture

18 Feb 2021 - 12:23 pm | चौथा कोनाडा

भारी लिहिलीयं ! आवडली ! आमच्या शाळेतले टारगटपणाचे दिवस आठवले !
(म्हणजे तो जिवंत असताना शेवटचा ..... ) हे नको होते .. कथा शेवटाचा अंदाज यायला सुरुवात झाली !

सौंदाळा's picture

18 Feb 2021 - 12:52 pm | सौंदाळा

परिणामकारक लिहिलय.
हे आणि याच्याहुन गलिच्छ प्रकारे मुलांनी काही ठराविक मुलांना शाळेत असताना छळलेले पाहिले आहे. अशा छळल्या गेलेल्या मुलांचा आत्मविश्वास कायमचा गेलेलासुध्दा पाहिला आहे. छळणार्‍या मुलांचे पण पुढे हालच झाले. एक जण रिक्शा चालवतो, एक जण एक ईस्टेट एजंटाकडे हरकाम्या म्हणुन आहे कायम पैसे मागत असतो. एक जण २००२/०३ ला मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग एकदम नविन झाला होता आणि तिकडे दरोडे पडायचे त्यात पकडला गेला आणि येरवडा जेल मधे होता. एकूण काय तर छळणारे आणि छळले जाणारे सगळ्यांची दशाच झाली पुढे

balasaheb's picture

18 Feb 2021 - 1:41 pm | balasaheb

एकदम मस्त कथानक

तुषार काळभोर's picture

18 Feb 2021 - 2:08 pm | तुषार काळभोर

म्हणजे पोंक्षेच्या पॉईन्टने नाही. 'त्या'च्या जागेवरून.
चौथी ते दहावी.
प्रचंड हेटाळणी, चिडवणे, सायकलची हवा सोडणे, दप्तरातल्या वस्तू लपवून ठेवणे, डबा/बाटली लपवणे, अंगावर पाणी ओतणे, मागून शर्टवर शाई उडवणे.
शारिरीक त्रास नव्हता, पण मानसिक त्रास इतका की वाटायचं, मरावं अन भूत बनून बदला घ्यावा एकेकाचा!

काही चांगले मित्र होते, जे एरवी चांगले वागायचे. पण कोणी त्रास द्यायला सुरुवात केली की ते मध्ये पडत नसत. कधी कधी ते पण सामील होत.

दोन गोष्टी मनासारख्या होत होत्या.
शिक्षकांचं वागणं खूप चांगलं होतं. अन घरात प्रचंड लाड असायचा. त्यामुळे चोवीस तासात ४-५ तास 'त्रास होऊ शकेल' अशा कालावधीचे असायचे.
त्यामुळे सात वर्षे सहन केलं.
अकरावीला गेल्यावर मग मैत्री करणं बंद केलं. ओळखी पण जास्त केल्या नाहीत. अकरावीला वर्गात असलेल्या पैकी आता फक्त ४ जण आठवतात. आणि तेच संपर्कात आहेत. त्यातले तीन शाळेपासून बरोबर होते. कॉलेजात पण तसंच. फक्त ३-४ जण संपर्कात आहेत.

त्रास देणारे काय करतात?
माहिती नाही.

हाच Attitude उत्तम ....

श्रीगुरुजी's picture

18 Feb 2021 - 2:31 pm | श्रीगुरुजी

भारी कथा!

जगप्रवासी's picture

18 Feb 2021 - 5:12 pm | जगप्रवासी

ह्या गोष्टी पाहिल्यात अनुभवल्यात पण वेगळ्या बाजूने

वर्गात सुदर्शन येरवले नावाचा मुलगा होता. त्याला जाम पिडायचे सर्वजण, चिडवणं, चिमटे काढणं हे तर नेहमीच.

पण त्याला आई नव्हती हे माहिती असल्यामुळे सर्वजण त्याचे लाड पण खूप करायचे. स्वतःच्या खाऊच्या पैशातून नेहमी त्याला खाऊ घेऊन येणं, स्वतःचा डबा त्याला खायला देणं हे सगळेजण आनंदाने करायचे म्हणायचे ह्याला किती पीडा तरी हा हसतच, कधी चिडायचा नाहीच. मजा यायची.

सोत्रि's picture

18 Feb 2021 - 7:03 pm | सोत्रि

सत्यकथा भासावी अशी कथा!

-(शाळेत असताना मवाळ असणारा) सोकाजी

Nitin Palkar's picture

18 Feb 2021 - 8:09 pm | Nitin Palkar

सुंदर कथा. रत्नाकर मतकरींची आठवण झाली.

उपयोजक's picture

18 Feb 2021 - 8:42 pm | उपयोजक

हा विषय पालकांना कान पिळून शिकवण्याची वेळ पूर्वीही होती आणि आजही आहे.भारतात तो इतका का दुर्लक्षिला जातो देवजाणे?
का फक्त आज काय अभ्यास दिला रे? मार्क एवढे कसे कमी? याचं जेवण बंद कर अभ्यास करत नसेल तर! हेच चालणार अजूनही??
वर नाशिकच्या सेडीओ मारी शाळेतल्या मुलांचा मारामारीचा व्हिडिओ दिला आहे.म्हणजे काळ उलटला तरी अवस्था तीच आहे. या मारामारीत त्या पोराला शारिरीक किंवा मानसिक अपंगत्व आलं तर जबाबदार कोण?

सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षक काय करत असतात शाळेत? लठ्ठ पगार मिळावेत म्हणून आझाद मैदानात आंदोलनं करण्यासोबत निकोप मनाचा विद्यार्थी घडावा म्हणून काहीच का करत नाहीत? करत असतील तर अशा घटना वारंवार का घडतात? की शाळेच्या गेटबाहेर गेला की विद्यार्थ्याशी नातं संपतं? तसं संपत असेल तर मग एखादा विद्यार्थी नंतर काही कौतुकास्पद काम करतो त्यावेळी आमचा विद्यार्थी आमचा विद्यार्थी हे उड्या मारत का सांगितले जाते? विद्यार्थी गुणवान निघाला की शिक्षकांनी मनोभावे शिकवलं आणि बाद निघाला की आम्हाला जबाबदार धरु नका?

अशा गुंड विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलवून अन्य पालकांसमोर त्यांचा जाहिर अपमान करावा.परीक्षेत चांगले गुण मिळवण्याआधी एक चांगला नागरिक होणे गरजेचे आहे हे ठसवून सांगण्यासाठी सर्व ते प्रयत्न व्हायला हवेत.

अत्यंत छान कथा आहे. अत्यंत छान कथा आहे. भय आहे आणि करुणा सुद्धा आहे आणि एक शिकवण सुद्धा.

प्राची अश्विनी's picture

19 Feb 2021 - 5:58 pm | प्राची अश्विनी

कथा आवडली.

सिरुसेरि's picture

20 Feb 2021 - 8:16 am | सिरुसेरि

जबरदस्त लेखन. सुरुवातीला शाळेतील गमतीदार आठवणींवर असलेला लेख असे भासवणारी हि कथा अचानक गंभीर स्वरुप घेते आणी गुढ / भयकथेच्या टोकावर संपते . कथेवरील प्रतिसादही तेवढेच वास्तववादी , उत्कंठावर्धक आणी विचार करायला भाग पाडणारे .

सविता००१'s picture

22 Feb 2021 - 4:28 pm | सविता००१

खूप सुंदर कथा आहे.

कुमार१'s picture

22 Feb 2021 - 8:35 pm | कुमार१

सुंदर कथा

ज्योति अळवणी's picture

22 Feb 2021 - 11:15 pm | ज्योति अळवणी

असतात असे विद्यार्थी जे दुसऱ्यांना त्रास देण्यात मजा घेतात

साबु's picture

24 Feb 2021 - 3:18 pm | साबु

bullying किंवा ragging खूप सामान्य असते आपल्याकडे . काहीच शाळा अश्या असतात हि त्या कडक नियम करून ह्या प्रकाराला थोडाफार आळा घालण्याचा प्रयत्न करतात . जर तुम्ही शारीरिक दृष्ट्या सुमार असाल, तुम्हाला चष्मा असेल तर bullying चे प्रमाण खूप असते . मग अश्या मुलांना काही तडजोड करून राहावं लागत.
मी एक वर्ष पालिकेच्या शाळेत काढले आहे. मला थोडे बरे मार्क्स पडायचे परीक्षेत मग माझा पेपर पळवून नेणे ( मी पुरवणी घेतली असताना ) , मला जबरदस्तीने उत्तरे दाखवायला लावणे , प्रार्थना चालू असताना मागून टपला मारणे असे प्रकार झालेत आहेत. शाळा बदलून मग त्यात फरक पडला.

फार भयानक असते हे .

माझ्या वर्गात एक मुलगा होता. थोडासा बायकी हावभाव करायचा. सातवीपर्यंत आठवी पर्यंत काही नाही. पण दहावी नंतर त्याला बरेच जण त्रास द्यायचे.
नंतर कुठेतरी गायब झाला.
मग एकदा आमच्या वर्गमैत्रीणीला तो पुण्यात दिसला. आर्थीक परिस्थिती यथातथाच. नोकरी नव्हती. त्याची बायको त्याला सोडून गेली होती.
एकूणातच त्याचे बरे चालले नव्हते. त्या मैत्रीणीच्या मते त्याचे वागणे फारच बायकी ढंगाचे झाले होते. काही मित्रांना विचारले की आपण त्याला काही आर्थीक मदत करुयात. त्याला गेट टुगेदरला बोलवुया.
पण त्या मित्राची गेटटुगेदरला आल्यावर पुन्हा क्रूर चेष्टा होईल अशी आम्हाला भिती वाटली

उन्मेष दिक्षीत's picture

27 Feb 2021 - 8:59 pm | उन्मेष दिक्षीत

डरना मना है टाईप वाटली, भारी आहे !

कर्नलतपस्वी's picture

1 Mar 2021 - 10:36 pm | कर्नलतपस्वी

आशी पलटणी मारलीत की वाचक चारोखाने चित. आवडली.

भारी लिहिली आहे कथा, आवडली.
वरती लिहिल्या प्रमाणे, डरना मना है सारख्या पिक्चर मध्ये बसु शकेल अशी स्क्रिप्ट झाली आहे.. छान.
-
वरचे बरेच रिप्लाय पण वाचले.. म्हणुन थोडेसे.

शाळेत असताना असला त्रास मी कोणाला दिलेला पाहिला नाही की मला हि नाही मिळाला..
त्यात मागे मागच्या बाकावर बसणारा पण थोडा हुशार या दोन्ही गोष्टीं असल्याने माझे हुशार आणि मागे बसणारे टगे दोन्ही मित्र असत.
मागे बसणारे टगे मित्र हिच खरी संपत्ती आहे असे मला वाटते.. वात्रट असुद्या पण जीवाला जीव देऊ शकणारी..

फक्त आपारपी खेळतांना आम्ही एक दोन जणांना टार्गेट करत असु (दरवेळेस वेगळे जण )आणि सगळी मुले मग तो कचाकड्याचा बॉल त्या एक दोन जणांना मारत बऱ्यापैकी..
आपरप्पी खेळलेल्या लोकांना माहिती असेल हे

परीक्षेत तर आजूबाजूच्या सगळ्यांना माझा पेपर मी दाखवत असे, आणि गणिताचा पेपर तर पूर्णच :-) त्यामुळे तेथे हि. बळजबरी
नाही..
आणि अजूनही आम्ही वर्गातील २०+ जण गावाला गेलो की भेटत असतो..

त्यातील काही तर जिवलग अजूनही, बालपणीचे मित्र.. काही ट्रेक ला पण एकत्र.
बीसीएस ला पण नंतर अशीच मज्जा आली...

गुल्लू दादा's picture

18 Jul 2021 - 6:07 pm | गुल्लू दादा

खूप छान लिहिलंय. आवडलं. धन्यवाद.

नावातकायआहे's picture

18 Jul 2021 - 6:39 pm | नावातकायआहे

सुंदर कथा!
कशी काय मिसली काय माहित....

सस्नेह's picture

19 Jul 2021 - 2:22 pm | सस्नेह

जबरी कथा !

अनिंद्य's picture

19 Jul 2021 - 5:19 pm | अनिंद्य

@ kvponkshe,

bullying सारखा दुर्लक्षित विषय कथेत फार छान गुंफला आहे, इम्पॅक्ट जबरदस्त !

रागो's picture

19 Jul 2021 - 7:29 pm | रागो

भारी कथा, आवडली.

राघव's picture

21 Jul 2021 - 2:08 pm | राघव

_/\_