पौष व. १० श्रीशिवरायांचा वाढता प्रताप! शके १५८१ च्या पौष व. १० रोजी श्रीशिवराय यांनी चालून आलेले आदिलशाहीचे सरदार रस्तुमजमान व फाजलखान यांचा पराभव केला.

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
7 Feb 2021 - 1:31 pm

पौष व. १०

श्रीशिवरायांचा वाढता प्रताप!

शके १५८१ च्या पौष व. १० रोजी श्रीशिवराय यांनी चालून आलेले आदिलशाहीचे सरदार रस्तुमजमान व फाजलखान यांचा पराभव केला.

अफझलखानाच्या वधानंतर श्रीशिवरायांचे महत्त्व फारच बाढून बादशहाचा एक मोठाच डाव फसल्यासारखा झाला होता. आतां विजापूरकरांच्या ताब्यातील प्रांत व किल्ले सोडविणे हेच एक ध्येय शिवाजी महाराजांच्या समोर होते. २८-११-१६५९ रोजी मोठ्या युक्तीने पन्हाळा किल्ला शिवाजी राजांच्या हातांत आला. या समयी कोल्हापूर प्रांतांत विजापूरच्या एका सुभ्याचे काम रस्तुमजमान नांवाचा सरदार पहात असे. त्याच्या प्रांतांतील पन्हाळा किल्ला फारच मजबूत होता. याशिवाय पावनगड, खेळणा, रांगणा, हे प्रसिद्ध किल्ले जिंकावेत अशी मनीषा शिवाजी राजांची होती. अफजलखानाच्या वधानंतर अण्णाजी दत्तो यांच्या पराक्रमाने अदिशाहीकडून पन्हाळा हस्तगत झाला. पावनगड, वसंतगड हेहि किल्ले मिळाले. तेव्हां शिवाजी राजांचा बंदोबस्त करणे विजापूर दरबारला अत्यंत आवश्यक वाटले. या कामगिरीवर रुस्तुमजमान व फाजलखान यांची नेमणूक झाली. आदिलशाहीच्या हुकमावरून या दोघांनी फौज जमा केली व ते शिवाजी राजांवर चालून आले. परंतु पौष व. १७ रोजी शिवाजी राजांनी त्यांचा संपूर्ण मोड केला आणि कृष्णा नदीच्या पलीकडे त्यांना हांकून दिले. व शिवराय स्वतः खंडण्या वसूल करीत करीत थेट विजापूरपर्यंत चालून गेले. त्यांना प्रतिकार करावा असे कोणासहि वाटले नाही. त्यांचा पाठलाग करणेहि शत्रूंना अशक्य होऊन बसले. रायबाग सारखी समृद्ध स्थळे शिवाजी राजांच्या हाती आली. आणि त्यानंतर नेताजीनें गदग लक्ष्मेश्वरपर्यंतचा मुलूख लुटला. याप्रमाणे बरीच लूट जमा करून शिवाजी महाराज राजगडी परत आले. शिवाजी राजांचा हा पराक्रम पाहून आदिलशहा घाबरूनच गेला. रुस्तुमजमान तर उघडपणे शिवाजी राजांचा मित्र बनला होता. “आतां विजापूरचे राज्य संपून शिवाजी राजांचें चालू होणार, त्यांचे वडिल शहाजीरीजे सतरा हजार फौज घेऊन कर्नाटकांतून शिवाजी राजांचे मदतीस येत आहेत" अशी बातमी पाश्चात्य व्यापारी वरिष्ठांस कळवू लागले.

-२८ डिसेंबर १६५९shivaji maharaj

इतिहास