प्रवास भाग 3

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
18 Jan 2021 - 5:54 am

भाग 2

https://www.misalpav.com/node/48089

प्रवास 

भाग 3

सगळे अंगणात गाद्या टाकून चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे बघत पडले होते. आजूबाजूची किर्रर्र झाडी; गुड्डूप्प अंधार आणि चांदण्यांनी भरगच्च आकाश! एक वेगळंच गूढ वातावरण तयार झालं होतं. सहाजिकच गप्पांचा ओघ भुतं या विषयावर घसरला. कोणी सुरवात केली ते लक्षात आलं नाही पण अनघा आणि मनाली बाहेर आल्या तर मंदार त्याच्या कोणा काकांचा अनुभव सांगत होता.

मंदार : अरे काका घरीच निघाले होते...

मनाली : नक्की कशाबद्दल बोलतो आहेस रे?

असं म्हणत ती अगदी शेवटच्या खाटेवर टेकली.

मंदार हसत म्हणाला :अग काही नाही माझ्या काकांचा भुताचा अनुभव सांगत होतो.

मंदारने असं म्हणताच मनाली पटकन उठून उभी राहिली आणि वैतागलेल्या आवाजात म्हणाली;"काय यार! नवीन वर्ष सुरू होईल इतक्यात. जरा बरे विषय काढा की. त्यावर तिला चिडवत नवीन म्हणाला;"अग करोनामुळे जे गेलेत ना त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही हा विषय निवडला आहे."

मनालीने मान उडवली आणि उठून सगळ्यांच्या मध्ये येऊन बसली. तिच्या शेजारी बसत अनघा म्हणाली;"मनाली, चिंता नको करुस. परवाच पौर्णिमा होऊन गेली आहे आणि त्यात त्यादिवशी दत्त जयंती होती. एकदम चांगला दिवस. बघ न वर चंद्र किती मस्त दिसतो आहे. मुंबईमध्ये आपल्याला असं इतकं सुंदर ताऱ्यांनी भरलेलं आकाश दिसतं का?"

तिने असं म्हणताच सगळेच वर बघायला लागले. क्षणभराने आनंद म्हणाला;"तारे कमी आहेत मॅडम. चंद्र असताना तारे नसतात."

अनघा : म्हणजे?

आनंद : म्हणजे राजा एकच असतो... मालक एकच असतो.... तो असताना बाकी कोणीच नसतं आजूबाजूला.

असं म्हणून आनंद एकदम विचित्र मोठ्याने हसला. खरंतर हा काही जोक नव्हता. त्यामुळे त्याचं ते हसणं सगळ्यांना विचित्र वाटलं. अनघाने सारवासारव केल्यासारखं म्हणलं;"बरं बरं! राजे आपण जरा गप्प बसा म्हणजे मँडीच्या काकांची स्टोरी तो सांगू शकेल." अनघाकडे दुर्लक्ष करत आनंदने आपलं बोलणं चालू ठेवलं आणि मनालीकडे बघत म्हणाला;"आणि मनाली, भुतं कॅलेंडर बघून नाही बाहेर पडत. त्यांना अमावस्या काय आणि पौर्णिमा काय.... इच्छा झाली की निघाली ती. त्यात दत्त जयंती न? अग दत्ताला भुतं आवडतात....

आनंद असं म्हणाला आणि अचानक घरातून काहीतरी पडल्याचा मोठ्ठा आवाज झाला. सगळेच दचकून घराकडे बघायला लागले. खाटेवर आडवा पडलेला आनंद एकदम उभा राहिला आणि कोणालाही कळायच्या आत घराकडे धावला. नवीन आणि मंदार देखील उभे राहिले. पण अचानक मागे वळून बघत आनंद म्हणाला;"कोणीही यायची गरज नाही. मी बघून घेतो काय ते." आणि एकदम घरात निघून गेला.

तो आत गेला त्या दिशेने बघत सगळे खाली बसले. नविनची नजर सहज आनंदच्या वाड्यावरून फिरायला लागली. आनंदने अजूनही घराचा जुनेपणा जपला होता. घराला अजूनही कौलं होती. उंच छताचं कौलारू घर बघताना नवीन सहज म्हणाला;"आता वीज आहे म्हणून ठीक आहे... पण पूर्वी हे घर संध्याकाळनंतर किती भयानक वाटत असेल नाही?"

नवीन असं म्हणाला आणि अचानक घरातले सगळे दिवे गेले. एकदम अंधार झाला सगळीकडे. त्याक्षणी रातकिडे अंगावर आल्यासारखे कर्रर्रर्र करत ओरडायला लागले. एकदम वातावरण थंड झाल्यासारखं वाटायला लागलं आणि मेन गेट जवळून कोणीतरी चालत येत असल्या सारखा आवाज यायला लागला. मंदार, नवीन, अनघा आणि मनाली प्रचंड घाबरून गेले. आवाज जवळ जवळ येत होता... अगदी सावकाश कोणीतरी चालत होतं. काहीही घाई नसल्यासारखं! सगळ्यांची नजर आवाज येत होता त्या बाजूला लागून राहिली होती. सगळ्यांनी नकळत आपापले मोबाईल हातात घेऊन टॉर्च चालू केली होती आणि एकदम सावध पवित्र्यात उभे राहिले होते. इतक्यात....

इतक्यात आनंद मागून येऊन त्यासगळ्यांच्या जवळ उभा राहिला आणि त्याने हातातून आणलेला मोठ्ठा फुगा टाचणी लावून फोडला. सगळे भयंकर दचकत घाबरून धडपडले. त्यांच्याकडे बघत आनंद खदाखदा हसायला लागला आणि एकदम ओरडला...

HAPPY NEW YEAR TO ALL OF U!!!

धडपडत उभे राहात सगळेच हसायला लागले आणि एकमेकांना मिठ्या मारत सगळ्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या एकमेकांना.

घरातले दिवे आता लागले होते. अनघाचा हात धरत घराच्या दिशेने जात मनाली म्हणाली;"ए आपण आता आतच बसूया ह."

तिच्या मागून सगळेच निघाले. आत जाता जाता नविनने सहज मागे वळून बघितले तर; सगळे पुढे गेलेले बघून आनंद काहीसा बाहेरच्या बाजूला पुढे गेला होता आणि एका बाजूला असणाऱ्या गर्द झाडीच्या जवळ जाऊन काहीतरी करत होता. नविनने मागे वळत आनंदला हाक मारली;"आनंद.... काय करतो आहेस रे?"

नविनचा आवाज ऐकून आनंदने मागे वळून बघितले तर नविनला आनंदचे डोळे एकदम गुंजेसारखे लाल होऊन चमकत आहेत असं वाटलं. नवीन ते बघून दचकला आणि काही न बोलता घरात पळाला.

सगळे घराच्या दिवाणखान्यात जाऊन बसले होते. सगळे आले तरी आनंद आत आलेला नाही हे बघून अनघा परत मागे वळली. तिचा हात धरून तिला अडवत नवीन म्हणाला;"येईल तो. नको जाऊस तू बाहेर." नविनने अडवलेलं अनघाला आवडलं नाही. हात सोडवून घेत तिने कपाळावर आठ्या आणल्या आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून दाराकडे निघाली. अनघा घराबाहेर पडणार एवढ्यात घराच्या मागच्या बाजूने कोल्हेकुई ऐकायला यायला लागली. कोल्हा प्रचंड मोठ्या आवाजात ओरडत होता. आतामात्र घरातले सगळेच एकदम घाबरून गेले. बाहेर पाऊल ठेवणारी अनघा पण घाबरून थांबली. कोल्हेकुई हळूहळू घराच्या पुढच्या बाजूला सरकायला लागली. बाहेर जावं की नाही.... आनंद कुठे गेला आहे.... या संभ्रमात अनघा होती आणि अचानक आनंद बाहेरून आत आला. त्याच्या चेहेऱ्यावर घाबरलेले भाव होते. तो धावत आत आल्यामुळे दारातच उभ्या असलेल्या अनघावर तो आदळला आणि दोघेही घराच्या आत पडले. दोघे आत येताच घराचं दार एकदम धाडकन बंद झालं. दार बंद होताच कोल्हेकुई अचानक थांबली.

घरातले सगळेचजण अस्वस्थ झाले. सगळेच दिवाणखण्याच्या मध्यभागी येऊन उभे राहिले. सगळ्यांनीच नकळत एकमेकांचे हात धरले होते. गुपचूप उभे होते सगळे. वातावरण जणूकाही ढवळलं गेलं होतं. थोडावेळ तसाच गेला आणि सगळं एकदम शांत झालं. सगळेचजण अस्वस्थ झाले होते.

अनघाने सगळ्यांकडे एकदा बघितलं आणि म्हणाली;"चला रे झोपुया आपण सगळे. तसही उशीर झाला आहे. जागत बसलो तर आता नको ते विषय निघतील."

त्यावर आनंद अनघाकडे बघत म्हणाला;"अग इतक्या दिवसांनी भेटलोय आपण तर गप्पा मारत बसू की थोडावेळ अजून. नाहीतरी उद्या सकाळी उठायची घाई कोणाला आहे? आरामात उठून जेऊन निघू. आज की रात अपनी हें। तो उसका मजा उठाना ही चाहीये। क्या बोलते हें दोस्त लोग?" असं म्हणत आनंदने मंदार आणि नविनकडे बघितलं. वातावरण थोडं निवळलेलं असल्याने सगळेच सैलावले होते. समोरच्या दिवणावर बसत मंदारदेखील म्हणाला;"बसूया रे सगळे. आनंद म्हणतो आहे ते खरं आहे. इतक्या दिवसांनी भेटून फक्त झोपायचंच होतं तर इतकं लांब का आलो आपण?"

त्याच्याकडे बघत मनाली म्हणाली;"मुंबईमध्ये कर्फ्यु होता म्हणून इथे आलो आपण."

त्यावर टाळी वाजवत मंदार म्हणाला;"exactly! उशीर होईल आणि मग पकडले जाऊ म्हणून इथे आलो. उशीर का? कारण आपण गप्पा मारणार. म्हणजे मुळात गप्पा मारायलाच आपण इथे आलो आहोत. right?"

त्याचा युक्तिवाद पटल्यामुळे असेल किंवा वातावरण निवळल्यामुळे असेल नवीनने पण बसत मंदारला टाळी दिली.

आनंद देखील बसला आणि त्याने अनघाचा हात धरून तिला बसवलं. त्याने असं बसवल्याने अनघाला मनातून बरं वाटलं आणि ती पण मोकळेपणी हसली. मात्र जागून गप्पा मारणं मनालीच्या मनात मुळीच नव्हतं. तिला इथे पोहोचल्यापासूनच काहीसं अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे तिला खरंच खोलीत जायचं होतं. पण एकटीने आत जायची हिम्मत तिच्यात मुळीच नव्हती. त्यामुळे ती देखील मनाविरुद्ध खाली बसली.

ती बसलेली बघताच मंदारला तिची चेष्टा करायची हुक्की आली आणि अनघाकडे डोळा मारत तो म्हणाला;"अनघा, तू कोणत्या नको त्या विषयांबद्दल म्हणत होतीस ग?"

त्यावर एकदा मनालीकडे बघत अनघा म्हणाली;"ए आगाऊपणा नकोय ह. मनाली मनातून अस्वस्थ आहे. त्यामुळे भुतंखेतं असले विषय नकोत."

अनघा असं म्हणताच आनंद मोठ्याने हसला. सगळेच त्याच्या हसण्याने दचकले. त्यावर हसू दाबत आनंद म्हणाला;"सॉरी... सॉरी.... नाही बोलायचं असं म्हणत अनघानेच विषय काढला म्हणून मला हसायला आलं इतकंच."

त्यावर आनंदला फटका मारत अनघा म्हणाली;"उगाच काय? मनालीला कसली भिती वाटते ते मी सांगत होते इतकंच."

अनघाकडे शांतपणे बघत आनंद म्हणाला;"हो का? एकट्या मनालीला भिती वाटते का? तू एकदम झाशीची राणीच आहेस!! तसं असेल तर आत जाऊन बीअरच्या बोटल्स घेऊन ये की." आनंदाचं बोलणं अनघाला आवडलं नाही. पण ती काही न बोलता उठली आणि आत जायला वळली. ती जेमतेम आतल्या दाराजवळ पोहोचली असेल आणि एकदम त्या दारातून भिकू बाहेर आला. त्याच्या हातात बऱ्याच बीअरच्या बाटल्या होत्या. त्याला असं एकदम समोर आलेलं बघून अनघा दचकली. तिच्या हातात बाटल्या देत भिकू म्हणाला;"मी इथेच आहे आत ताई. काही लागलं तर हाक मारा."

त्याच्याकडे आश्चर्याने बघत अनघाने बाटल्या घेतल्या आणि ती मागे वळली. मधल्या टेबलावर बाटल्या ठेवत तिने आनंदला विचारलं;"तू थांबवलं आहेस का भिकुला?" अनघाकडे एकदा शांतपणे बघत त्याने 'हो' म्हणून मान डोलावली. त्यावर अनघाचे डोळे मोठे झाले. ती काहीतरी बोलणार होती पण मग गप बसली.

बिअरच्या बाटल्या उघडल्या आणि सगळेच सावकाश एक एक सिप घ्यायला लागले. नकळतच सगळेजण आपापल्या विचारात दंग झाले होते.

अनघा : असा का वागतो आहे हा आनंद? इथे आल्यापासून एकदम विचित्रच बोलतो आहे. आज ज्या दरवाजातून त्याने आम्हाला आत आणलं तो दरवाजाचं काय पण तिथल्या दोन्ही खोल्यांमध्ये त्याने कधी पाय ठेवला नव्हता. आम्ही जेव्हा जेव्हा आलो... तो मला म्हणाला आहे की त्याला तिथे असं काहीतरी जाणवतं ज्यामुळे तो अस्वस्थ होतो... आणि जी बेडरूम त्याने स्वतःसाठी घेतली ती देखील! मागे पहिल्यांदा त्याने मला आणलं तेव्हा एकदाच तो मला म्हणाला होता की ती बेडरूम त्याच्या सावत्र आईची होती. त्यामुळे त्या बेडरूमच्या आत जायला त्याला कधीच आवडलं नव्हतं. आज मात्र तीच खोली त्याने त्याच्यासाठी घेतली होती. सर्वात कमाल म्हणजे तो भिकू याला मुळीच आवडायचा नाही. भिकुला देखील ते माहीत होतं. त्यामुळे तो देखील आनंदच्या समोर यायचा नाही. आज मात्र तो बीअर घेऊन बाहेर येत होता... जेवण गरम करून द्यायला आला. अजूनही इथे थांबला आहे!

मनाली : इथे सगळंच कसं विचित्र वाटतंय आल्यापासून. अनघा आणि आनंद इतके सिरीयस असतील असं नव्हतं वाटलं मला. मागे एक-दोन वेळा आनंद मला भेटला होता मुंबईमध्ये तर मला वाटलं होतं की तो मला हिंट्स देतो आहे की त्याला माझ्यात इंटरेस्ट आहे. त्यामुळेच तर मला त्याच्याबद्दल काहीतरी वाटायला लागलं होतं. त्यात तो एकटा; आई वडील नाहीत; इतकी मोठी प्रॉपर्टी. त्याच्याशी लग्न म्हणजे सुखच सुख हे देखील आलं होतं मनात. बरं झालं इथे आले. माझ्या मनातल्या शंकांचं निरसन झालं.

मंदार : आनंद एकटा भेटतच नाहीये इथे. दोन मिनिटं मिळाली होती ब्रेकफास्टला थांबलो होतो तेव्हा. त्याचवेळी विचारलं होतं काही ठरलं का तुमचं. तर याने उत्तर देखील दिलं नाही. जेव्हा मदत हवी होती तेव्हा सतत फोन्स आणि डिनर्सना घेऊन जात होता साला. आता काम झालेलं दिसतंय. म्हणून ओळख पण देत नाही त्या विषयाची.

नवीन : अनघाला कसं कळत नाही की आनंद तिला फक्त वापरतो आहे. उद्या लग्न केलंच तरी घरात ठेवलेली भाऊली इतकीच किंमत ठेवेल तिची. हिला काहीच कसं दिसत नाही? की ती त्याच्या पैशावर इतकी भाळली आहे की दिसत असून दुर्लक्ष करते आहे?

सगळेच विचारात गढलेले होते. मध्ये कधीतरी भिकूने येऊन वेफर्स-चकल्या असं काहीबाही आणून ठेवलं होतं. त्याने अजून थोड्या बीअरच्या बाटल्या देखील आणून ठेवल्या होत्या.

सगळे विचारात गढले होते आणि आनंद मात्र शांतपणे प्रत्येकाचं निरीक्षण करत होता. त्याने पुढे होत बाटल्या उघडायला सुरवात केली आणि सगळेच तंद्रीतून जागे झाले. सगळ्यांकडे हसत बघत आनंद म्हणाला;"किती विचार करता रे या सगळ्याचा."

खरंतर हे अत्यंत साधं वाक्य होतं. पण प्रत्येकाने ते स्वतःच्या विचाराशी जुळवलं आणि प्रत्येकाच्या मनात आलं... याच्या कसं लक्षात आलं माझ्या मानत काय आहे ते? सगळ्यांची नजर आनंदकडे वळली. तो मात्र शांतपणे बाटल्या उघडत होता.

आनंदने नविनच्या हातात एक बिअर दिली आणि मंदारकडे वळताना म्हणाला;"नवीन पैसा जर फार महत्वाचा नाही तर मग तू का इनक्रिमेंटच्या मागे लागलेला आहेस रे?" त्याच्या प्रश्नाने नवीन मनात दचकला. पण चेहेऱ्यावर काहीही भाव येऊ न देता म्हणाला;"हे काय अचानक अन्या?" आनंदने मंदारकडे बघितलं आणि त्याच्या हातात एक बिअर देत म्हणाला;"तूच सांग मँडी त्याला मी अचानक काय काय म्हणत असतो." आनंदच्या त्या वाक्याने मंदार मनात चरकला. त्याने चोरट्या नजरेने अनघाकडे बघितलं आणि आनंदला म्हणाला;"मला काय माहीत तू अचानक काय बडबडतोस?" मनालीच्या हातात एक बिअर देत आनंदने एक अनघाला दिली आणि स्वतः एक घेऊन मग परत दिवाणावर येऊन बसला. क्षणभर मनालीकडे बघून हसत म्हणाला;"मनाली सांगू शकेल मी अचानक काय बडबडतो."

आनंद प्रत्येकाचं नाव घेऊन काहीतरी म्हणत होता आणि अनघा अजूनचं बुचकळ्यात पडत चालली होती.

अनघा : हा असं का वागतो आहे आज?

आनंदने सगळ्यांकडे एकदा निरखून बघितलं आणि मग अनघाकडे वळून म्हणाला;"जाऊ दे ग. फार विचार नाही करायचा कोण काय बोलतं आहे आणि विचार करतं आहे याचा."

आता सगळेचजण आनंदकडे संशयाने बघत होते आणि आनंद मात्र एक एक सिप घेत छताकडे बघत बसला होता. नविनला आनंदचा हा विचित्र स्थितप्रज्ञपणा आवडला नाही. तो उठला आणि आनंद जवळ जाऊन त्याच्या खांद्याला हात लावून म्हणाला;"अन्या तू न इथे आल्यापासून फारच विचित्र वागतो आहेस. त्यामुळे आम्ही सगळेच अस्वस्थ आहोत. अरे आम्ही काय पहिल्यांदाच आलो आहोत का इथे? पण यावेळचं सगळंच विचित्र वाटतं आहे. अर्थात मागच्या वेळी इथल्या त्या care taker होत्या. त्यामुळे घर वापरात होतं. आता बहुतेक बंद असतं त्यामुळे देखील एक विचित्र शांतता भरून राहिली आहे इथे. मुख्य म्हणजे अन्या इथे कोल्हे आहेत? आणि ते घराच्या इतक्या जवळ येतात? तो भिकू मग त्याच्या घरी कसा जातो? एकूण काय... तर तू जरा आम्ही comfortable होऊ असा वागशील का?"

नवीनच बोलणं ऐकून प्रत्येकाला वाटलं हा आपल्या मनातलंच बोलला आहे. त्यामुळे सगळेच आनंदकडे अपेक्षेने बघायला लागले. एकदा सगळ्यांवर नजर फिरवून आनंदने खांदे उडवले आणि म्हणाला;"हे खरं आहे की यावेळची इथली शांतता काहीशी वेगळी आहे. हे देखील खरं आहे की ती care taker होती म्हणून या घराला घरपण होतं. इथे कोल्हे येतात का? हम्म!! मला देखील तसं म्हंटल तर हे वेगळं आहे यार. त्यामुळे मी तरी काय सांगणार?" हे बोलताना अचानक आनंदचा आवाज खेळीमेळीचा होता. बऱ्याच वेळानंतर आनंद आपल्यातलाच एक आहे.... जुना आनंद आहे.... असं सगळ्यांना वाटलं. सगळेच हसले आणि वातावरण भलतंच हलकं झालं.

हळूहळू गप्पा रंगायला लागल्या. जुन्या आठवणी... कॉलेज मधले न भेटलेले जुने मित्र-मैत्रिणी; प्रोफेसर्स आणि त्याच्याशी केलेले pranks... सगळेच आता परत पहिल्यासारखे वागत होते. बघता बघता चार वाजून गेले. बिअरचा परिणाम प्रत्येकाच्या डोळ्यांवर दिसायला लागला आणि 'चला झोपुया' असं म्हणत सगळेच उठले.

नवीन आणि मंदार त्यांच्या बेडरूममध्ये गेले. मनाली देखील उठली. अनघा तिच्या मागोमाग जायला उठली. तिने एकदा आनंदकडे बघितलं. आनंदने तिला त्याच्या खोलीत येण्याची विनंती डोळ्यांनीच केली. पण अनघाने मानेनेच नाही म्हंटलं आणि ती मनालीच्या मागे गेली. आता दिवाणखान्यात एकटा आनंद बसला होता..... एकटा? की.....???

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणे हा ही भाग खिळवुन टाकणारा. पुभाप्र.

सतिश म्हेत्रे's picture

18 Jan 2021 - 3:46 pm | सतिश म्हेत्रे

मस्त होता हाही भाग. पुभाप्र.

मास्टरमाईन्ड's picture

21 Jan 2021 - 9:38 pm | मास्टरमाईन्ड

मागच्या दोन्ही भागांसारखा हा पण खिळवून टाकणारा.
पुढचा भाग कधी?

तुषार काळभोर's picture

25 Jan 2021 - 6:19 pm | तुषार काळभोर

आणि लिहिताना समोर चित्र उभं राहत होतं...
कुणीतरी प्रत्येक पात्राच किंवा वा किंवा प्रसंगाचं रेखाटन टाकलं तर चार चांद लागतील!

परत एकदा.. पहिल्या भागात कोण कोणाचा काय कशाला... काहीच कळत नव्हते. पण दुसऱ्या भागात गोष्टी क्लिअर झाल्या आणि आता तर एकदम मोसम पकडलाय!