हजारो ख्वाहिशें ऐसी - २०० किमी BRM - भाग १

मालविका's picture
मालविका in भटकंती
7 Dec 2020 - 3:04 pm

(खर तर हे कुठल्या जागेच वर्णन नाही तरीही आमच्या प्रवासाचे वर्णन आहे आणि म्हणून त्याला भटकंती सदरात मांडते आहे.)

गोष्टीची सुरवात होते एका सायकलस्वारापासून. या माणसाने स्लो पौझनिंग सारखी आपली सायकलिंगची आवड बायकोकडे अर्थात माझ्याकडे पास केली. हळू हळू दोघे आपल्या लेकाला पण सायकलच वेड लावून फिरायला लागले. अनेक जण सल्ले मागायला यायला लागले. त्यातच याला भेटला माझा वर्गमित्र डॉ स्वप्निल दाभोळकर. सुरवातीला करमणुकीकरता म्हणून सायकल घेणारा माणूस थोडेच दिवसात एकदम सायकलच्या प्रेमात पडला. श्रीनिवास बरोबर इकडे जा तिकडे जा अशा फेऱ्या सुरु झाल्या. यांचाच जुना साथीदार डॉ तेजानंद गणपत्ये सुद्धा यांच्यात सामील झाला. सुरवातीला कामामुळे नि बरोबर कोणी नसल्याने त्याची दुर्लक्षित झालेली हि आवड या दोघांमुळे परत उफाळून आली. आता हे तिघे मिळून आसपासच्या भागात सायकलने फेऱ्या मारायला लागले. स्वप्निल फोटोग्राफर असल्याने सुंदर सुंदर फोटो काढून फेसबुक वर टाकणे त्याने सुरु केलं. यांचे हे उद्योग बघून हळू हळू सायकल साठी चौकशी करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं. एक एक नवीन मेंबर जॉईन व्हायला लागला. संख्या वाढायला लागल्यावर स्वप्नीलने चिपळूण सायकलिंग क्लब ची स्थापना करून टाकली. एकदा हि जाहिरात झाल्यावर मग तर मेम्बर्स अजूनच वाढले. काही बरोबरीचे, काही मोठे, काही लहान. एकमेकांबरोबर अनुभव, टिप्स शेअर करणं सुरु झालं. स्वप्निल आणि श्रीनिवास एकदा मस्त पावसाळ्यात कुंभार्ली घाट चढून आले नि त्याची खूपच हवा झाली. मग काय ग्रुप मध्ये कुंभार्ली चढायची क्रेझच आली. बऱ्याच जणांनी घाट पूर्ण सर केलाही.

आता हे फारच रोजच व्हायला लागल्यावर यातली उत्सुकता संपून नवीन आव्हानं खुणावायला लागली. श्रीनिवासची जुनी BRM ची इच्छा परत उसळी मारून वर आली. याआधी २ वर्षांपूर्वी त्याने जेव्हा या स्पर्धेसाठी प्रॅक्टिस सुरु केली तेव्हा गुडघ्याला दुखापत होऊन छोटंसं ऑपरेशन करावं लागलं आणि ते स्वप्न स्वप्नच राहील. पण आता नवीन उत्साही मेंबर्स बरोबर श्रीनिवास परत एकदा स्वप्न रंगवायला लागला. यात त्याला साथ होती ती स्वप्निल आणि तेजानंदची. केव्हाही भेटल्यावर सायकल, सायकलिंग ऍक्सेसरीज , कोण कुठे सायकलने गेलं, कस गेलं काय केलं याच्याच चर्चा. शिवाय जो भेटेल त्याला सायकलचं ज्ञानामृत पाजण्यात स्वप्निल नि श्रीनिवास माहीर झाले. गम्मत सोडा पण हे दोघे आता BRM करायचीच या ध्यासावर आले. कोरोना काळात सायकलिंगने खूप मोठा आधार दिला. जिम बंद असल्याने बेस्ट एक्सरसाइज म्हणून सायकलिंग बरेच जणांनी करायला घेतलं. अशा तर्हेने चिपळूण सायकलिंग क्लबचे जवळपास 30 मेंबर्स झाले. यातच मध्ये श्रीनिवासचा एक मित्र जो SR आहे येऊन गेला. त्याच्याकडून टिप्स घेतल्या गेल्या. कोणती सायकल कमी वजनाची यावर मोठी चर्चा झाली. यावर त्या मित्राने झकास सल्ला दिला," सायकलचे वजन कमी करण्यापेक्षा स्वतःचे वजन कमी करा" हाच पाहुणा जाताना श्रीनिवाससाठी स्वतःची सायकल ठेवून गेला.

मध्येच यातील तीन जण मुंबई पुणे येथे जाऊन BRM पूर्ण करून आले. आणि मग सावंतवाडी BRM ची घोषणा झाली. कोरोनाची भीती थोडी कमी झाली होती. अनलॉक प्रक्रिया होऊन सर्व व्यवहार साधारण सुरळीत सुरु झाले होते. त्यामुळे इथे जायचं ठरलं.
थोडं BRM विषयी - BRM म्हणजे BREVETS DE RANDONNEUR MONDIAUX. Audax Club Parisien , पॅरिस यांच्यातर्फे या स्पर्धा घेतल्या जातात. भारतात या स्पर्धा Audax India Randonneurs (AIR)यांच्यातर्फे आयोजित केल्या जातात. २००, ३००, ४००,६००,१००० आणि १२०० किमी स्पर्धा असतात. ठराविक वेळ यासाठी दिला जातो. आम्ही केलेल्या २०० किमी साठी १३. ३० तास वेळ होता. शिवाय या self supported म्हणजेच कुणाचीही मदत न घेता पूर्ण करायची असते. म्हणजे सायकल पंक्चर झाली तर आपणच पंक्चर काढून परत चालवायला सुरवात करायची. नि यासाठी वेळ वाढवून मिळत नाही. मध्ये ब्रेक्स घ्या, खा, प्या सगळं १३. ३० तासात पूर्ण व्हायला पाहिजे. त्यामुळे यासाठी वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे. मध्ये मध्ये चेक पॉईंट्स असतात. तिथे त्यांच्या ठराविक वेळेत पोहोचावं लागत. उशीर झाल्यास तुम्ही स्पर्धेतून बाहेर जाता. तर अशा या स्पर्धेसाठी शारीरिक बरोबरच मानसिक तयारीसुद्धा लागते. आमची स्पर्धा सावंतवाडीहुन सुरु होऊन खारेपाटणला जाऊन वळून सावंतवाडीला परत यायचं अशी होती.

तर या सगळ्या मेंबर्स मध्ये याची चर्चा सुरु झाली. चिपळूण सायकलिंग क्लब मध्ये मी एकटीच मुलगी असल्याने मी यांच्यामध्ये कुठेच नसायचे. मी आपली माझी माझी सायकल घेऊन फिरत असायचे. मध्ये बंगलोर क्लबच २५ दिवस २५ किमी सायकलिंग चॅलेंज घेतलं होत तेव्हा सलग महिनाभर सायकल चालवून झाली त्यामुळे जरा स्वतःवरचा विश्वास वाढला होता. तरीही मी या स्पर्धेमध्ये उतरायची कुठलीही मानसिकता माझी नव्हती. पण याने फायदा एक झाला कि अगदी १४/१५किमी तासाला यावरून मी १९/२० किमी तासाला या वेगाला पोहोचले होते. स्वतःशी स्पर्धा होती आणि स्वतःमधला हा बदल सुखावणारा होता.

साधारण १० नोव्हेंबर नंतर हळूहळू जास्त अंतर पार करण जमायला लागलं आणि आपण पण स्पर्धेला जाऊ शकतो असं वाटायला लागलं. श्रीनिवास नि स्वप्निल फुल तयारीत होते. रोजचे ६०/७० किमी करतच होते. मी जेमतेम ५० किमी करायला लागले होते. पण दमून गळून जायला होतंय असं काही होत नव्हतं. सकाळी सकाळी ५० किमी करून परत घरी येऊन रोजचा स्वयंपाक आणि इतर काम वगैरे चालूच होत. त्यामुळे बर वाटत होत. एकदा जमेल असं वाटत होत तर एकदा नाही असं वाटत होत. २९ नोव्हेंबर ला स्पर्धा होती आणि २७ ला नोंदणीची शेवटची तारीख होती. ५०किमी रोज करून विश्वास येत होता तरीही १३. ३० तास सायकलच्या सीट वर बसायचं हे मोठच आव्हान होत. त्यासाठी मन तयार होईना.

शेवटी तयारी तर करू जायचं कि नाही नंतर ठरवू असं म्हणून मी माझं ५० किमी चालू ठेवलं. पण २००किमी करायचे तर स्पर्धा सकाळी ६ ला सुरु होऊन संध्याकाळी ७. ३० ला संपणार होती. म्हणजे मग मधल्या उन्हाची प्रॅक्टिस व्हायला हवी म्हणून मग मी नि श्रीनिवास २/३ वेळा भर दुपारी १२ वाजता ५० किमी करायला गेलो. यात मध्ये तेजानंद पण यायला लागला. मध्ये निदान एकदा तरी १००किमी करायचे म्हणून मी, श्रीनिवास आणि तेजानंद एक दिवस सकाळीच गुहागर मार्गाला लागलो. शृंगारतळी पर्यंत जाऊन परत फिरलो. घरी येईपर्यंत ९० किमी झाले होते. पण मला दमही लागला होता शिवाय थोडा गुडघाही दुखायला लागला होता. १००किमी पूर्ण करायची इच्छा होती पण उगाच पायावर ताण देण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे त्या दिवशी मी तिथेच सोडून दिलं. श्रीनिवास आणि तेजानंद १६० किमी पूर्ण करून आले. त्यामुळे त्यांची तयारी जवळपास झालीच होती. स्वप्निल तर चांगलाच तयार झाला होता. त्याची २०० किमी, १५० किमी अशा वेगवेगळ्या फेऱ्या मारून झाल्या होत्या. कधी या चढावर, कधी त्या रस्त्यावर अशी त्याची प्रॅक्टिस चालू होती. मध्ये एकदा श्रीनिवास नि स्वप्निल कशेडी घाट चालून १३०किमी करून आले. तेव्हा या तिघांची तयारी पूर्ण झाली होती. मी अजूनही तळ्यात मळ्यात करत होते. इथल्या रोजच्या रस्त्यावर ५०/६० किमी करणं कठीण जात नव्हतं. पण हाच स्पीड कुठल्याही रस्त्यावर राहणं गरजेचं होत. जे मला कठीण वाटत होत.

आमच्याकडे दोघांनी चालवायची tandem सायकल पण आहे. श्रीनिवासला अचानक काय वाटलं कुणास ठाऊक आपण हि सायकल घेऊया म्हणाला. दोघे एकत्र राहू आणि एकमेकांबरोबर जायला मजा येईल. पण मी आधी नकारच दिला कारण या सायकलने खूप त्रास दिलाय. चेन उतरण हा कायम प्रॉब्लेम होता.शिवाय सीटची उंची, वजन अशा खूप गोष्टी होत्या. पण श्री कडे चिकाटी खूप आहे. तो चिपळूणला टाकळे सायकल्स या दुकानात सायकल घेऊन गेला. २/३ तास तिथे बसून त्यांच्याकडून काम करून घेतलं. टाकळे भाऊंचे त्यासाठी मनापासून आभार. हे सगळं जेमतेम एक आठवडा आधी. सायकल दुरुस्त करून आल्यावर आम्ही एक ५०किमी चा राउंड मारून आलो. सुदैवाने काही झालं नाही. दुसऱ्या दिवशी ८० किमी ची अजून एक राईड केली. तसा वरकरणी प्रॉब्लेम नाही आला पण चाकातून आवाज येत होता. परत श्री सायकल घेऊन टाकळे भाऊंकडे. परत २/३ तास बसून काम करून घेतले. मग मात्र छोटीशी राईड केली त्यात काही अडचण आली नाही. पण नंतर मोठी राईड करायला वेळच मिळाला नाही. तोवर तेजानंद नि स्वप्निल ने नाव दाखल केलं होत. श्रीनिवास ने आधीच नाव नोंदवलं होत. हो नाही करता २६ तारखेला माझ नाव नोंदवलं. tandem घेऊन जायचं ठरलं. स्वनिलचा मेहुणा ओंकार भालेकर देखील देवरुखहुन येऊन आमच्याबरोबर सज्ज झाला. केवळ २ महिन्यांच्या तयारीवर हा आमच्यात सगळ्यात लहान मुलगा फारच उत्साही होता. आता ५ जण आणि ४ सायकल असं समीकरण होत. त्यातही आमची मोठी लांबलचक सायकल कुठल्याही कार मध्ये मावण शक्य नव्हतं. मग दादाची बोलेरो पिक भाड्याने करायचं ठरलं. एकाच गाडीत सगळ्या सायकल मावतील नि एकाच कार मध्ये आम्ही सगळॆ माऊ. तेजानंदच्या आत्येच घर सावंतवाडीला असल्याने राहण्याचा मोठा प्रश्न सुटला होता.

२८ ला चिपळूणहुन सावंतवाडीला जायचे आणि २९ ला स्पर्धा संपली कि परत यायचे असे ठरले. दुर्दैवाने स्वप्नीलचे काका २७ ला स्वर्गवासी झाले आणि स्वनिल आमच्यातून गळला. तो नाही हटल्यावर ओंकार भालेकर देखील नाही म्हणाला. आता उरलो आम्ही दोघे नि तेजानंद. ५ जणांची टीम एकदम ३ जणांवर आली. अगदीच मूड गेला. स्वप्निल म्हणजे श्री च्या भाषेत "self motivated ". कायम उत्साही आणि दुसर्यांना कायम प्रोत्साहन देणारा. सगळया ऍक्टिव्हिटीज मध्ये कायम पुढाकार घेणारा. आपलं क्लीनिक सांभाळून वेळा ऍडजस्ट करून सगळ्यात पुढाकार घेणारा उत्साही माणूस. पण मग संध्याकाळी त्याचा फोन आला कि घरचे जा म्हणून सांगत आहेत. एवढे दिवस तयारी केली आहे तर जाऊन ये. दोन दिवसांचा प्रश्न आहे. स्वप्निल येणार म्हटल्यावर ओंकार पण हो म्हणाला. परत एकदा ५ जणांची पूर्वीची टीम तयार झाली. या सगळ्यासाठी मानसिक तयारी मोठी होती. आम्ही ५ जण एकमेकांना धीर देत होतोच पण इतरही अनेक जण अनुभवी आपल्या टिप्स देत होते.

-धनश्रीनिवास

प्रतिक्रिया

चंबा मुतनाळ's picture

7 Dec 2020 - 3:16 pm | चंबा मुतनाळ

सुरवात मस्त झाली आहे, पुढचा भाग लवकर येऊ द्या

भ ट क्या खे ड वा ला's picture

7 Dec 2020 - 9:24 pm | भ ट क्या खे ड वा ला

अभिनंदन उभयतांचे. चिपळूण मध्ये सायकलिंग रुजवण्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे.
अजून अशा अनेक राईड साठी शुभेच्छा.
एकदा या असेच फिरत फिरत खेड ला.
म्हणजे मला ही टॅंडम घ्यायची परवानगी व नंतर पार्टनर ही मिळेल घरचाच .

प्रशांत's picture

7 Dec 2020 - 10:49 pm | प्रशांत

असेच म्हणतो

सायकलचे वजन कमी करण्यापेक्षा स्वतःचे वजन कमी

करा

हा सल्ला कोणी दिला?

मालविका's picture

8 Dec 2020 - 3:26 pm | मालविका

सल्ला महत्वाचा! कोणी का देईना ?
तसही असे सल्ले देणाऱ्या व्यक्ती आपली ओळख नेहमीच लपवून ठेवतात (हसणारी स्माईली )

मस्तच तुमच्या भटकंतीची वाट पाहत होतो. पु भा प्र

उज्वलभविष्य's picture

31 May 2021 - 5:48 pm | उज्वलभविष्य

मालविका ताई ,मी रीतसर मिसळपाव ची सदस्य आत्ता झाले पण खूप आधी पासून तुमचे सायकलिंग चे अनुभव वाचत होते।खरचं खूप हेवा वाटतो।अशीच सायकलिंग सुरू राहू द्या।खूप शुभेच्छा ।

मार्गी's picture

4 Jun 2021 - 11:12 am | मार्गी

जबरदस्त!!!!!!! खूप सुंदर लिहिलंयसुद्धा.