सरतील कधी शोष शोषितांचे! - खंड दुसरा

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
7 Dec 2020 - 2:04 pm

सरतील कधी शोष शोषितांचे! - खंड दुसरा
भाग ७ - उलट-पलट
आदिकाळापासून चालत आलेली व्यवस्था. तिने घर सांभाळायचे आणि पुरुषाने उदरनिर्वाहाचे बघायचे. यात कधीतरी अहंकार आणि आपल्यावरच ती अवलंबून आहे हा गैरसमज शिरला. हळूहळू कुटुंबव्यवस्था नावाखाली तिचे पद्धतशीर शोषण सुरू झाले. तिचा घरच्या कामांसाठी वापर करणे, शिकून काय करायचेय, घराची कामे करायला शिक्षणाचे चोचले कशाला हवे, स्त्री म्हणजे अबला अशी मानसिकता पसरवून तिचा गैरफायदा घेणे.. जिथेजिथे शक्य होईल तसे शोषण जगभरात होऊ लागले. अनेक अपवादही असतील, पण थोड्याफार फरकाने तिच्या शोषणाचे चित्र ठळक दिसत होते.
जसजसा शिक्षणाचा प्रभाव वाढत गेला, लोक देशाटन करू लागले, समाजात बदल घडू लागले. ठिकठिकाणी स्त्रिया आणि पुरुषदेखील या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवू लागले. सोशल मिडियामुळे शोषणाच्या बातम्या आणि त्याविरुद्धचे आवाज हे अत्यंत वेगाने सर्वत्र पसरू लागले. समाजसुधारकांचे कार्य फळाला येऊ लागले. याचा परिणाम म्हणून सरकारने कायदे करून तिला अधिकार दिले. आधी हे केवळ कागदी अधिकार म्हणून मर्यादित राहिले. पण समाजसुधारकांच्या कार्याचा वणवा सगळीकडे झपाट्याने पसरू लागला. तिलाही जाणीव होऊ लागली की स्त्रियांचे शोषण थांबवायला हवे आहे. शोषणाचे चक्र हळूहळू मंदावत गेले, मग उलटे फिरू लागले.
*****
बाळाला झोके देता देता ती हातातले पुस्तक वाचत होती. आई बाहेरचे काम आटोपून परत आली तेव्हा अभ्यास करता करता तान्ह्या बाळाकडे लक्ष देणाऱ्या छोटीला बघून आईचा उर भरून आला. "भुकेली असशील गं पोरी. गरम गरम भाकरी टाकून देते. तु खाऊन घे अन शेजारी जाऊन अब्यास करत बस. बापू पिऊन आल्यावरच्या गोंधळात तुझे जेवण आन अब्यास दोनी राहून जाईल बग!” आईने भाकरीचे पीठ मळायला घेतले.
*****
"अगं तु इतकी शिकलेली, कायदा तुझ्या बाजूनी आहे. मग घाबरते कशाला? महिला मंचाच्या अध्यक्षा स्वत: लक्ष घालणार आहेत. तु सरळ हुंड्यासाठी छळ केला म्हणून केस कर. त्याचे आईवडील आणि तो जेव्हा तुरुंगात जातील तेव्हा त्यांना अक्कल येईल.” तिच्या मैत्रिणीने तिला समजावले. तिच्यात मात्र पायात मणामणाच्या बेड्या असल्यासारखी अगतीकता पसरली. कोर्ट कचेरीच्या चकरा, तिथे उकरून काढल्या जाणारे खोटेनाटे आरोप, अपमान आणि लोकांमध्ये चर्चा! त्यापेक्षा त्याच्याशी पुन्हा एकदा बोलून सामोपचाराचा मार्ग निघतोय का बघावे का? आईसुद्धा सारखे सांगत होती, "अग एखादे FDमोडू अन थोडीतरी भागवू या त्याची गरज. संसार मोडणे सोपे, टिकविणे कठीण गं बाई. पण आपण प्रयत्न करू. मी बोलते त्याच्याशी." काय करावे, काहीच कळत नव्हते.
क्रमश:
*****

समाजप्रतिभा