बारमास - हायकू

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in जे न देखे रवी...
27 Nov 2020 - 3:54 pm

लाॅकडाउनमध्ये लागलेल्या छंदाने आता थोडं बाळसं धरलंय म्हणायला हरकत नाही. काही लेख आणि थोड्याफार कविता एवढी मोजकीच शिदोरी गाठीशी असताना असं म्हणणं धाडसाचंच आहे, पण मूळ मुद्दा हा की नाविन्याची ओढ बऱ्याचदा स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे काव्याचे वेगवेगळे प्रकार करून पाहावेसे वाटले. (नाही, मी बाळबोध, बऱ्या, थोड्या अधिक बऱ्या कवितांबद्दल नाही सांगत, तशाही त्या आपसूकच झाल्या असतील.) अभंग, अष्टाक्षरी, षडाक्षरी, मुक्तछंदातील कविता, सवालजवाब, अगदी गझलेचंही तंत्र शिकून त्याही रचून झाल्या. निसर्ग, प्रेम, विरह, जीवनविषय, सामाजिक आशयही यासारखे विविध विषयही हाताळून झाले. मग हायकूकडे वळावंसं वाटलं. थोडीफार माहिती होती. पण त्यावर हिंमत करणं म्हणजे नवीन स्वयंपाक शिकणारीनं You tube शिवाय स्वबळावर उकडीचे मोदक किंवा पुरणपोळी करायला घेण्यासारखं. त्यामुळे गुगलला शरण जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

हायकू म्हणजे तीन ओळींचा, मितभाषी, बंदिस्त घाट असलेला परंतु गतिमान रचनाबंध असलेला लोकप्रिय जपानी काव्यप्रकार !

तांका या पाच ओळींच्या काव्यातील पहिल्या तीन ओळी होक्कू, हायकाई, हायकू म्हणून प्रसिद्धीस आल्या. ५+७+५ शब्दावयवाचा आकृतीबंध असलेली, दोन ओळींत यमक असलेली ही रचना. उत्स्फूर्त काव्याविष्कार असला तरी अशा तंत्रशुद्ध हायकूलाच जपानमध्ये शुद्ध हायकू मानले जाते, परंतु जपानी किंवा इंग्रजी भाषेपेक्षा मराठीची धाटणी वेगळी असल्याने जपानी हायकूची सर्वच तंत्र मराठीत तशीच्या तशी उतरवणं प्रत्येक वेळी कठीण होऊ शकते हे जाणवल्यामुळे त्यात काही बदलही झाले. हा काव्यप्रकार मराठी साहित्यात रुजवण्याचं श्रेय होतं कवयित्री शिरीष पै यांचं. कवयित्री शांता शेळके यांनीही काही हायकूचे भावानुवाद केले आहेत.

हायकूरचनेचा मुख्य विषय ऋतू, निसर्ग हा असतो. पण निसर्गप्रतीकांचा वापर करून तरल, चिंतनशील, सूक्ष्म, अनाकलनीय क्षणचित्रे त्यातून साकारली जातात. निसर्ग आणि मानवी मनाची सांगड, चित्रमयता, भावोत्कटता, अल्पाक्षरी रमणीयता, जीवनचिंतन ही त्याची खास वैशिष्ट्ये. पहिल्या दोन ओळीत जी कल्पना असते, तिला एकदम धक्का लावणारी कल्पना तिसऱ्या ओळीत असते. आशय कसलाही असला तरी ही तांत्रिक बाजू यात आवर्जून सांभाळली जायला हवी. इतकी माहिती हाती लागल्यामुळे रचना जरी जमून आली नाही तरी आता निदान मला ज्ञानात भर पडल्याचं समाधान मानून घेण्यास हरकत नाही.

बारमास

चैत्रपालवी
घाली कोकीळ शीळ
कंठास पीळ

वैशाखझळा
उष्ण वातही वाही
वणवा देही

ज्येष्ठ की श्रेष्ठ?
पावसाची चाहूल
उठली हूल

आषाढवारी
काळे दाटले मेघ
रुपेरी रेघ

श्रावणसरी
ऊनपाऊस वनी
खेळ जीवनी

भादवा करी
मुक्त गाता भोंडला
श्वास कोंडला

अश्विन देई
कुणा नवं रांधणं
कुणा चांदणं

कार्तिक दावी
लक्ष दीप निर्मोही
तमाच्या डोही

मार्गशीर्षी दे
जरा ऊब शेकोटी
भरल्या पोटी

पाैष वाढवी
तिळातिळाने दिन
अंधार क्षीण

माघी साहती
झाडं पानगळती
कात टाकती

फाल्गुन जोडी
शिशिर वसंतासी
नव्या आशेसी

कविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Nov 2020 - 9:16 am | प्रचेतस

व्वा....! अतिशय सुरेख.

दृक् श्राव्य माध्यमाचा केलेला वापरही अतिशय आवडला.