आमचे गाव अन देवाचे नाव

कोहंसोहं१०'s picture
कोहंसोहं१० in जनातलं, मनातलं
30 Jun 2020 - 4:21 pm

(हा धागा उडवलेला दिसला. कारण समजले नाही परंतु कदाचित काही शब्द आक्षेपार्ह असावेत असे समजून ते वगळून पुन्हा धागा पोस्ट करत आहे. धागा आक्षेपार्ह वाटल्यास जरूर उडवावा परंतु त्यामागचे कारणही कळवावे ही प्रशासनास विनंती)

रात्रीची जेवायची वेळ. बंड्या, आई, आणि बा जेवायला बसलेत. बंड्या एकदम खोल विचारात.
बंड्या(बांना): बा देवाला नाव कुणी ठेवलं?
(बा बंड्याच्या प्रश्नांनी एकदम चक्रावून जातात)
बा: आरं बंड्या, काय बी काय इचारतो.
बंड्या: आज की नई शाळेमंधी आमच्या वर्गात एक नवीन गुर्जी आलं व्हतं शहरातून. लै हुश्श्यार हाय म्हणं. आल्याआल्याच गुर्जीनं विचारलं देवाचं नाव कुणी ठेवलं सांगा पोरांनो. दिवसभर एक बी जण सांगू शकला न्हाय.
आई: आरं केवढा शिंपल. तू सांगून चाक्लेट घेतलं की न्हाय?
बा: गुमान बस ग जरा
आई: तुम्हास्नी न वं पोराचं कौतुकचं न्हाय
बाबा: बोल रं तू
बंड्या: आवं काय बोलणार? गुर्जी म्हणत व्हतं देव बिव काय नसत या. सगळं झूट. म्हने मेंदूच्या कल्पना. जप बीप नि काय मनशांती मिळत नसतीया म्हणत व्हतं
बा दोन दिवसांनी शाळेत जातात. तिथे वर्गातल्या इतर बंड्याचे बा पण आलेले असतात. असाच एक बा म्हणतो
आरं हे नवीन गुर्जी येडं म्हणायचं की खुळं? पोरास्नी काय बे शिकवालयं या. तेच बघायला आलो म्या. कालबी आलो व्हतो.
बंड्याचं बा: व्हयं आमचा बंड्याबी म्हणतं व्हतं कालच्याला. देवाचं नाव कुनी ठेवलया म्हणून इचारत व्हतं. जप बीप काय नस्तय, सगळं देव झूट म्हने.
बा२: अस्स? मग खरं काय म्हने?
बा३: काल म्या ऐकलं. काहीतरी सत्य अन बोध म्हणतं व्हतुया. तेच खरं म्हने. बाकी काळी, विठ्ठल, राम, कृष्ण सगलं खोटं म्हनतुया.
बा५: (खवळून) अरे गुर्जी येडं झालंय का? कुठं राहतं सांग रे. बघतोच त्याला. आमचा राम देव नाही म्हणतो काय. माजलाय लै.
(बाकीचे सर्व बा त्याला शांत करतात)
बा६: (समजूतदारपणा दाखवत) हेडमास्तर ची रूम कुठं हाय वं? तक्रार करायची हाय गुर्जीविरुद्ध. काय कधी हेडमास्तरकड जायची येळंच आली न्हाय त्यामुळे रूम कुठं हाय इसरलो.
(बा६ माहिती घेऊन तक्रार करून पुन्हा येतात. चर्चा सुरु असते)
बा२: अस्स? गुर्जीला झालाय का म्हने बोध?
बा३: त्यालाच माहिती की. पण बघून वाटत तरी न्हाय. आवं बोध झालेली माणसं म्हणजे आपले माउली, तुकाराम. त्यांच्यासमोर तर हे येडं काय उभं बी राहू शकत न्हाय.
बंड्याचं बा: ते बी खरंच हाय म्हना. गुर्जी जप तरी करतंय का?
बा३:: न्हाय
बंड्याचं बा: मग कसं सांगतुया जपानं शांती मिळत न्हाय म्हनून? त्याला म्हन जरा करून बघ समजंल मग. ए रामू, जा एक तुळशीची माल घेऊन ये रं. मास्तरला देवू. दोन दिसावर आषाढी आली...जप करून बघ म्हणावं त्यास्नी. ४-५ दिसातच फरक पडतुया.
बा३: ते न्हाय करणार. लै हट्टी हाय. काल पाहिला ना त्यास्नी. शाळेतल्या ४-५ गुर्जीसोबत वाद घालत व्हतं. लै शाणं समस्तय स्वतास्नी.
बा४: आवं ते काय नवीन गुर्जी न्हाय. आधी होत आपल्या शाळेत. ३ वरीसआधी हाकलून लावलेलं शाळेतून.
बंड्याचं बा: काय सांगालागलूया?
बा४: व्हयं तर. असंच गोंधळ घातलेलं शाळेमंधी ३ वरीसपूर्वी. हेडमास्तरनं हाकलून दिलं व्हतं त्याला. परत एक चान्स देऊन आणलंया.
बा२: आल्याआल्या सुरु केलं की परत गोंधळ घालायला.
बंड्याचं बा: आवं, गोंधळच घालायचं असंल तर रात्री देवीच्या जागरला ये म्हणावं. नवरात्र सुरु हाय. तेवढाच पुण्य लाभलं की.
बा३: आवं ते पुण्य पाप कैच मानत न्हाय. पुनरजनम बी नस्तय म्हणतुया.
बंड्याचं बा: व्हयं का? मग काय होतंय म्हने मानूस मेल्यावर?
बा३: गुर्जी सांगत व्हतं काल. मानूस मेला की त्याचा मेंदू पुसला जातो आनं कायतरी मेमरीच्या दोऱ्या आकाशात जातात म्हनं आणि तिकडून बाळाच्या डोस्क्यात शिरतात म्हनं चुकून.
बा२: म्हणजे परवाच्याला तू माझा पतंग काटल्यावर माज्या मांज्याची दोरी त्या शेवंताच्या डोस्क्यावर पडली व्हती तसं का?
बा३: ते न्हाय मला माहीत. पण पोरास्नी विज्ञानाच्या तासाला शिकवत व्हतं असं कायतरी. म्या बाहेरून ऐकलंया.
बंड्याचं बा: विज्ञानाच्या तासाला? काय पुरावा हाय का त्याच्याकडं?
बा३: पुराव्याचा नाव काढला की गप्प बसतंया लक्ष देत न्हाय. पन पोरास्नी देवाचा पुरावा दे म्हनत होतया.
बंड्याचं बा: आवं देव असं कोणालाबी दिसत नस्तोया. तो काय शेतातली भाजी हाय व्ह दाखव म्हणायास्नी.
बा२: असं कोणालाबी पुरावा देत नसतया गुर्जी. आपल्यासारख्या अडाण्याला तर नायंच. ते मेमरी दोरीवरचं काय तर त्यांचं शोध तिकडं अम्रिकेच्या टाइम मॅगझीन मध्ये प्रसिद्ध होणार हाय असं ऐकलं हाय आणि नासा का फीसा म्हने दुसऱ्या जगातल्या माणसांच्या सोडलेल्या आकाशातल्या मेमरीच्या दोऱ्या पकडून त्यावर शोध करणार हाय म्हने.
बा३: अस्स?
बा२: आवं मग काय. म्हनून तर एवढं गुर्मित हाय गुर्जी. स्वतःचच खरं म्हणतुया. इकडं सत्या, शामराव, मुक्या, राजाभाऊ, अगदी आपलं पैलवान बी समजावून सांगायलाय पन कोणालाच ऐकत न्हाय. मुलांना उलटसुलट शिकवत राहणार हे येडं. कळत न्हाय आम्ही विठ्ठल किंवा राम म्हणतो तर याच्या पोटात का दुखतंय ते.
बंड्याचं बा: आव तिकडं कोणीतरी म्हणत व्हतं की गावाला नास्तिक करायला कोणीतरी पैसे देऊन पाठवलाय याला. बहुतेक शेजारच्या गावाचा सरपंच असणार. मागच्याला आपली दहीहंडी त्यांच्यापेक्षा भारी झाली व्हती ना. म्हनून यंदाच्याला दहीहंडी आधीच गावाला नास्तिक करायला पाठवलाय बहुतेक.
बा३: म्हंजे आपन दहीहंडी हरणार या टायमाला?
बा२: सरपंचावरून आठवलं. गुर्जी म्हनत व्हतं की शाळेतून काढलं नसतं तर मागल्या वर्षीचा सरपंच वेगळा असता.
बा३: अस्स? कसं काय म्हने ब्वा?
बा२: गुर्जी सगळ्यांना सांगत सुटलं व्हतं सरपंचांनी गावच्या विकासासाठी उचललेलं पाऊल कसं चुकीचं होतं ते
(तिकडं चालता चालता एका शिक्षिकेनं ऐकलं)
शिक्षिका: बरं झालं बया हे मास्तर शाळेत नव्हतं मागल्या निवडणुकीला. सरपंच बदलला नाही म्हनून गावाला वीज आणि गॅस मिळाला.
बंड्याचं बा: आवं त्यानं सांगितलं आणि तुम्ही ऐकलं व्हयं? विकासासाठी उचललेलं पाऊल चूक असो कि बरोबर. तो विषय न्हाय पन ह्यांच्या सांगण्यावरनं डायरेक्ट सरपंच पडणार निवडणुकीत? येडं म्हणायचं कि खुळं या मास्तरला?
बा३: आता हेच मास्तर देव नाही म्हणतंय बघा. ते सांगायला तासंतास हिंडत असतंय शाळेतल्या वर्गावर्गातून. पानाच्या पण भरवत असतंय तासाला हेच सांगत. काल शांती म्हंजे काय हे सांगत बसलेलं २-३ तास. गुर्जी एकटं सोडून बाकी सगळं शांत व्हते. गुर्जी एकटेच अशांत दिसले (ख्या ख्या ख्या)
बंड्याचं बा: एवढी पाने भरवण्याऐवजी देवाचा नाव लिवलं असतं तर कल्याण झालं असतं की वो.
बा२: त्यास्नी समजावून काय उपयोग न्हाय. सस्ग्ल्यांनी त्याचंच ऐकलं पाहिजे तोवर काय शांत बसणार न्हाय. ह्या संक्षी गुर्जींनी लै काव आणलाय. आता सर्वांनी तोंडदेखल्यागत म्हणायचं तुम्हीच बरोबर. म्हंजे शाळेत जरा अजून काहीतरी वेगळं वाचायला शिकायला मिळेल.
शाळा सुटल्यावर शाळेतल्या बऱ्याच बंड्यांचे बाबा एकत्र जाऊन संक्षी गुर्जींना 'सॉरी शक्तिमान. देव नाही...तुम्हीच बरोबर' असे म्हणुन घरी परतले
(रात्री बंड्या घराबाहेर पडताना)
बंड्याचे बा: कुठे चालला बे एवढ्या रातच्याला?
बंड्या: गुत्त्यावर. गुर्जींनी निर्भ्रांत जगायला सांगितलंय.
बंड्याचे बा: अस्स? थांब मीच दावतो तुला निर्भ्रांत काय असते ते.
(असे म्हणुन काठी घेऊन बंड्याच्या पार्श्वभागावर दोन फटके हाणतात. त्या फटक्यांनी बंड्याची र्भ्रांत एकदम दूर होते आणि बंड्या बां च्या बरोबर गावामध्ये सकाळी येणाऱ्या तुकाराम माउलींच्या पालखी सोहळ्याच्या तयारीला लागतो)

सूचना: वरील कथेमधील सर्व पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याची पात्राशी, घटनेशी, धाग्याशी, किंवा प्रतिसादाशी कोणताही संबंध नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा

विनोदजीवनमानलेखविरंगुळा